"वायझेड आहेत साले" ऑफिसच्या कॅब मधे माझा सात्त्विक संतापयुक्त आवाज घुमला आणि सगळे दचकले. निमित्त होतं एका एफ.एम. वाहिनीवरच्या कार्यक्रमाचं. "....पेश करते हैं मिस्टर घंटा." नेहमीच्या ऐकण्यातल्या घंटा सिंगचं मिस्टर घंटा हे रुपांतर ऐकलं आणि माझी सटकली. सटकली म्हणजे भयानक, मरणाची, प्रचंड, लय वगैरे सटकली. काही मित्रांच्या मते माझी सटकली ही द्विरुक्ती आहे म्हणून मग भयानक, मरणाची, प्रचंड, लय वगैरे शब्द जोडावे लागतात.
हे कृत्य पोलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली केलं गेल्याचं समजलं आणि त्या सटकण्यात आणखी भर पडली. डोंबलाचा पॉलिटिकल करेक्टनेस.
पोलिटिकल करेक्टनेस या शब्दप्रयोगाची तोंडओळख झाली ती मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना. कृष्णवर्णीय लोकांना निग्रो म्हणू नका हे मान्य, पण काळ्या लोकांना काळं (Black) नाही म्हणायचं हे समजल्यावर माझी पहिल्यांदा भ, म, प्र, ल वगैरे स. काळं (Black) या शब्दाला आलेला पर्यायी शब्दप्रयोग इतका हास्यास्पद आहे की त्यापेक्षा विनोदी दुसरा असूच शकत नाही. काळ्यांना काळं न म्हणता म्हणे आफ्रिकन-अमेरिकन (African-American) म्हणा. छान. आनंद आहे. म्हणजे काळी लोकं काय फक्त आफ्रिकेतूनच अमेरिकेत आली? बरं ठीक आहे. पण मग शेकडो वर्ष अमेरिकेत राहून अनेक पिढ्या तिथलं नागरिकत्व उपभोगून पूर्ण अमेरिकन झालेल्या, अमेरिकेशी अगदी रक्ताचं नातं निर्माण झालेल्या काळ्या लोकांचं काय? अरे बाबांनो, जे आहे ते आहे तेच म्हणा की. खरं बघायला गेलं तर 'आफ्रिकन-अमेरिकन' हा शब्दप्रयोग काळं या शब्दापेक्षा जास्त वंशद्वेष्टा आहे. काळे, गोरे म्हटलं की ते कोणत्याही देशाचे असू शकतात, त्यातून त्वचेचा रंग सोडला तर इतर कसलाही बोध होत नाही. पण जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी (वाचा: वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर, रेडिओवर, आणि विपत्र, पत्रकं, जाहीराती, वगैरे औपचारिक संपर्कमाध्यमांतून) 'आफ्रिकन-अमेरिकन' असं संबोधून काळ्यांना "तुम्ही बाहेरचे आहात" असा संदेश सतत जात नाही का? याकडे कुणाचंच कसं लक्ष गेलेलं नाही? मी स्वतः काळा किंवा गव्हाळ आहे, ओबामा काळा आहे, आंद्रे आगासी गोरा आहे, जॅकी चॅन पिवळा (yellow) आहे - बोला काय म्हण्णॉय? अरे कुणाला शिव्या घालतोय का? मग जे आहे ते तसं म्हणा ना!! काय आफ्रिकन-अमेरिकन, ऑरियेंटल वगैरे भंकस लावली आहे!!
आणखी एक बकवासयुक्त शब्दप्रयोग नुकताच वाचनात आला. "...इस्लामधर्मियांचा हा महत्त्वाचा सण आहे". महान वैताग. अरे, अरे इस्लामधर्मीय काय? सरळ मुसलमान म्हणा ना! गंमत बघा, मुसलमान स्वतःला मुसलमान म्हणवतात. काळे स्वतःला काळे म्हणवतात. ज्यु स्वतःला अभिमानाने ज्यु म्हणवतात. मग काय फरक पडतो ज्याला जे आहे ते म्हणण्यात?
भाषा, जात, वगैरे तर विनोदनिर्मितीची राखीव कुरणे आहेत. द्वेषमूलक विनोद होऊ नयेत हे अगदी मान्य, पण पोलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली यांच्यावर आधारित विनोदांवर संपूर्ण बंदी घातली तर विनोदाचे एक मोठे दालन बंद होईल. लहानपणापासून सरदारजीचे विनोद ऐकलेले आहेत. आणि साधे विनोद सरदारजीच्या नावावर खपवलेलेही आहेत (आपल्याकडे कसं सर्वसाधारण विनोदावर फारशा हशा होत नाही पण तोच विनोद पु.लं.चा आहे हे जोडून सांगितला की ठो ठो ठॉ सगळे असतात तसं). दोन्ही बाबतीत अगदी सातमजली हसलो आहे, इतरांना हसवलं आहे. मग आत्ताच का या रिकाम्या न्हाव्यांना भींतीवर तुंबड्या लावण्याची बुद्धी झाली आणि बाकी सगळं सोडून सरदारजीचे विनोद खुपू लागले? अरे घंटा सिंग चा मिस्टर घंटा करणार्यांनो, ही कसली 'घंट्याची' विनोदबुद्धी?
अरे कोकणस्थ ब्राह्मणांवर विनोद हवेत? लेले, नेने, गोडबोले हे आपापल्या नावांचे रबरी शिक्के कसे बनवून घेतात ते विनोद तर चावून चावून चोथा झालेले आहेत. भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी, रिकामा सुतार कुल्ले ताशी, चांभार चौकशा या म्हणींचं लहानपणी काही वाटत नसे आणि आजच्या पोलिटिकल करेक्टनेसच्या नामक भंपकपणाच्या मागे लागलेल्या जगात तर त्याहून काही वाटत नाही. पण मग अचानक सगळ्यांच्या भाषिक आणि प्रांतिक आणि जातीय अस्मिता अचानक का बरं जाग्या झाल्या? अरे जरा बुद्ध्यांक वाढवा स्वतःचा.
आजकाल तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या गोष्टीसुद्धा पोलिटिकल करेक्टनेसच्या भीतीपोटी "ढोबळमानाने असं म्हणता येईल की" किंवा "असं म्हणायला थोडाफार आधार आहे की..." अशा भंपक आवरणांखाली लपवल्या जातात तेव्हा भयानक चिडचिड येते. वंश (race) याची व्याख्या "मानवाचे जनुकीय आणि भौगोलिक वारशाने मिळालेल्या दिसण्यावर आधारित गटात वर्गीकरण" (Race is classification of humans into large and distinct populations or groups often based on factors such as appearance based on heritable phenotypical characteristics or geographic ancestry. म्हणजेच, काही रंग, उंची आणि इतर काही शारिरीक वैशिष्ठ्ये ही वंशाशी संबंधीत असतातच. मग त्याबद्दल शब्दांच्या उपयोगाला आक्षेप का?
पोलिटिकल करेक्टनेसचा उद्देश समाजाच्या सर्व स्थरावर समानता आणणे आहे असं म्हणतात. पण पोलिटिकल करेक्टनेसच्या नको तितकं मागे लागल्याने अनेक हास्यास्पद शब्दप्रयोग वापरात घुसले आहेत. वेडा म्हणू नये हो, मनोरुग्ण म्हणा (इंग्रजीतला शब्द अतीगोड आहे. वेड्याला तिकडे mentally challenged म्हणतात) —एका वर्तमानपत्राने कहर केला होता 'मानसिक अस्वास्थ्याने बराच काळ त्रस्त असलेल्या श्री. अमुकतमुक यांनी परवा आत्महत्या केली.....' मला आत्महत्या सोडून बाकीच्या वाक्याचा अर्थ लागायला मोजून एक मिनीट लागलं. अरे हे काsssय्ये? वेडा म्हणा ना वेडा. वेडाच होता ना तो? मग? मग काय, अर्थातच माझी भ, म, प्र, ल वगैरे स. वेडा! वेडा!! वेडा!!!
कालचक्र उलटं फिरवावं असं कुणाचचं म्हणणं असणार नाही. काळ्यांना पूर्वीसारखं 'नैसर्गिक गुन्हेगारी वृत्तीचे लोक' अशा दृष्टीने बघा असं कुणीच म्हणणार नाही. किंवा नाभिक जातीने इतर कुठला व्यवसाय करु नये असंही कुणाही सुसंस्कृत माणसाचं मत नसेल. पण मग काळ्यांना आफ्रिकन-अमेरिकन म्हटल्याने त्यांच्याकडे नैसर्गिक गुन्हेगार म्हणून बघण्याची वृत्ती नष्ट झाली आहे का? अजिबात नाही. उलट ती वृत्ती वाढीला लागली आहे हे कटू सत्य आहे. इंग्लंड मधे नुकत्याच गाजत असलेल्या वांशिक भेदाभेदाच्या आरोपांनी हे सत्य अधिकच उघडं नागडं करुन समोर आणलं आहे. अशुतोष गोवारीकरचा स्वदेस बघितला तर आपला विणकराचा पारंपारिक व्यवसाय सोडून शेती व्यवसायात पडू पाहणार्या हरिदासची कथा ही निव्वळ कथा नाही, तर आजही आपल्या ग्रामीण भारतातलं वास्तव आहे. मग, काय डोंबलाची क्रांती केली आहे तुमच्या पॉलिटिकल करेक्टनेसने? 'त्याने' असं लिहीण्याऐवजी आता 'त्याने/तिने' (he/she) असं लिहीण्याची पद्धत अनेक आस्थापनात रुढ झाली आहे. बिझनेसमनच्या ऐवजी बिझनेसपर्सन (businessperson) असा शब्दप्रयोग रुढ झाल्याला काही कमी काळ लोटलेला नाही. पण त्याने भेदभाव आपोआप थांबला आहे? स्त्रीमुक्ती संघटनांची आंदोलनं थांबली आहेत?
दुरावा हा अबोल्याने सुटत नाही. तसंच एखादं खदखदणारं शल्य किंवा अवघड प्रश्न, एखादा कठीण भासणारा मुद्दा हा त्याला बगल दिल्याने, त्याला गोड गोड भंपक शब्दांमागे आणि खोट्या कल्पनांमागे लपवल्याने सुटत नाही. त्याला सर्व शक्तीनिशी भिडलं तरच त्याचा निकाल लागतो. मला तरी म्हणूनच वाटतं की पोलिटिकल करेक्टनेस हा एक पलायनवादी दृष्टीकोन आहे, समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हे. समानतेचा खरा अर्थ हा की आपण आपल्यातले मतभेद उघडपणे बोलून चर्चा करुन सोडवणे.
म्हणूनच म्हणतो, पोलिटिकल करेक्टनेसच्या बैलाला @#($*&( #&@)*#$(@#*$
अरे बाप रे! काय सांगताय? मी वर एके ठिकाणी "रिकामा न्हावी" म्हणालो? बरं म्हणालो, काय म्हण्णॉय?
--------------------------------------------------------------------------------------
थोडसं अवांतरः आपली मराठी लोकं जगभर पसरलेली आहेत. त्यामुळे नेहमीच्या वापरातले काही शब्द आता तिथली-तिथली लोकं ओळखू लागली आहेत म्हणे. "काळे" म्हटलं की म्हणे तिथल्या लोकांना हल्ली व्यवस्थित समजतं कुणाबद्दल बोलणं सुरू आहे ते. म्हणून आता आपली लोकं काळ्यांबद्दल बोलायचं झालं तर "व.पू." म्हणतात असं ऐकिवात आहे. आहे की नाही आपला मराठी माणूस डोकेबाज!
--------------------------------------------------------------------------------------