अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद
आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे
प्रकाशित करत आहे.
२०११ च्या डिसेंबरातली एक रविवार सकाळ.
टी.व्ही.वर "रिमझिम के तराने लेके आयी बरसात" अशी मूक साद घालत नायक देव आनंदने नायिका वहिदाला छत्रीत घेतलं आहे. ती त्याला 'याद आये किसीसे वो पहली मुलाका़त' म्हणत तसाच प्रतिसाद देते आहे. माझ्या हातात मस्त वाफाळत्या चहाचा कप आहे...आणि अशातच माझं खिडकीकडे लक्ष जातं. या पार्श्वभूमीवर बाहेर योगायोगाने इकडे पुण्यात पावसाचे अगदी हलके शिंतोडे सुरू झाल्याचं दिसतं आणि त्या गाण्याची लज्जत शतपटीने वाढते. कुठल्याही संवेदनशील निसर्गप्रेमी माणसाला धुंद करेल असा पुण्याचा रोमँटिक पाऊस. मग देव तर मुळातच रसिक माणूस. ह्या शहरातल्या पावसाने त्याला भुरळ घातली नसती तरच नवल होतं. देव आनंदने रेल्वेतून उतरून पुण्यात पहिलं पाऊल टाकलं आणि प्रभात स्टुडिओपर्यंत पावसाचा आनंद लुटत गेला तेव्हाच त्याचे आणि पुण्यातल्या रिमझिम पावसाचे ॠणानुबंध जुळले आणि पुढे आयुष्यभर टिकले, हे कुठेतरी वाचल्याचं आठवतं. अशा स्मरणरंजनात मन गुंतत असतानाच अचानक मोबाईल वाजतो आणि मित्राचा परिचित आवाज कानी पडतो. रविवारी सकाळी आठ वाजता याने का फोन केला असावा असा विचार करत असतानाच "देव आनंद वारला...काल रात्री....लंडनमधे.....बातम्या लाव" हे एका दमात सांगून तो फोन ठेवतो.
कानांनी जे ऐकलं ते मेंदूच्या समजूतीच्या कप्प्यात शिरायला जरा वेळ लागला. काही क्षणांनी मात्र जेव्हा शिरलं तेव्हा या माणसावर आपण किती प्रेम करत होतो या जाणीवेने डोळ्यांत टचकन पाणी आलं. 'I thought she was immortal' (मला वाटायचं ती अमर आहे) — प्रसिद्ध लेखक पी. जी. वूडहाऊसची चौदा वर्षांची मुलगी लियोनारा गेली तेव्हा त्याने हताश होऊन काढलेले हे उद्गार मनुष्यस्वभावाविषयी खूप काही सांगून जातात. आपल्या आसपासच्या अनेकांचं अस्तित्व आपण गृहित धरतो. आपल्या आधी ते जाणारच नाहीत असं आपल्याला वाटतं. किती स्वार्थी असतो ना आपण? देव आनंदला आपण सगळ्यांनी असंच गृहित धरलं होतं. म्हणूनच देव गेल्याची बातमी जेव्हा ऐकली तेव्हा माझ्याही मनात नेमकी अशीच प्रतिक्रिया उमटली. आपल्याला वाटायचं तो अमरपट्टा घेऊन आला आहे. निदान याची तरी पूर्ण खात्री होती की तो शंभरी आरामात पार करेल....आणि स्वतःच्या शंभराव्या वाढदिवसाप्रित्यर्थ आणखी एका चित्रपटाची घोषणा करेल. पण म्हातारपण या शब्दाचा आणि स्थितीचा आपल्या उत्साहाने आणि उमेदीने सतत पराभव करणारा ८८ वर्षांचं समृद्ध धडधाकट आयुष्य जगून देव गेला तो शेवटी हृदयविकाराचा तीव्र झटका हे सर्वसामान्यांचंच दुखणं होऊन. पण तो जसा आयुष्यभर जगला तसाच आपल्यातून गेला - ताठ मानेने, मनाने तरूण असतानाच. लंडनच्या हीथ्रो विमानतळावर दिलेली व्हीलचेअर फणकार्याने नाकारून तरातरा चालत टॅक्सीत जाऊन बसला. आणि मग बातमी आली ती थेट तो गेल्याचीच.
"देव साहेबांचं पार्थिव भारतात आणलं जाणार नाही..." वृत्तनिवेदक सांगत होता. बरं झालं. देवला तसं बघताच आलं नसतं. या सदगृहस्थावर आपला इतका जीव का होता, तो गेल्यावर आपण इतके का हळहळलो, ते आज अनेकांना सांगून समजणार नाही. त्यासाठी फक्त देवचा चाहता असून चालत नाही. त्या सोनेरी काळावर माया असावी लागते. त्या माणसांबद्दल जिव्हाळा असावा लागतो. प्रत्यक्षाहून उत्कट असलेल्या प्रतिमेवर प्रेम करावं लागतं. त्यांनी विकलेली स्वप्नं ही आपलीही असावी लागतात, तरच त्यांच्या सादरीकरणाशी आपण तादात्म्य पावू शकतो. एखाद्याची ओळख होण्यापासून ते त्याचा चाहता होण्यापर्यंतच्या प्रवासाशी तद्रूप व्हावं लागतं. राज, दिलीप, देव, शम्मी, रफी, किशोर, मुकेश, ओ.पी. नय्यर, गुरुदत्त, सचिनदा, ललिता पवार, नुतन, ऋषिकेश मुखर्जी, विजय आनंद, राजेश खन्ना हे आणि असे असंख्य हिरे दिलेल्या त्या काळाचं अप्रूप वाटत मी मोठा झालो. त्यामुळे या खजिन्याची मोजदाद करण्याच्या खुळ्या खटाटोपात देवची आणि माझी ओळख नेमकी कधी झाली ते सांगणं अवघड आहे. पण मनावर त्याची सगळ्यात पहिली आठवण कोरली गेली ती गाईड मधल्या बंडखोर राजूच्या रूपाने. गाईड सर्वप्रथम बघितला तेव्हा चित्रपट म्हणून नक्की काय वाटलं ते नीटसं नाही सांगता येणार. पण राजूने मला माझ्या मनातली अनेक वादळं शांत करायला मदत केली. समोर आ वासून उभ्या असणार्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत केली. "तुम कोई वादा नहीं कर रही हो, तुम्हारा हात अपने दिल पे रख कर मै एक वादा करना चाह्ता हूं" असं म्हणत प्रेमातलं समर्पण कसं असावं ते दाखवलं. एक चांगला माणूस म्हणून शांत मनानं जगायचं असेल तर आपल्यातल्या करड्या छटाही निर्भयपणे स्वीकारायला शिकलं पाहिजे. नैतिकतेच्या पोकळ चौकटींपेक्षा न्याय्य गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जायला हवं. देव आनंदच्या राजू गाईडने मला हे शिकवलं आणि मनात उगीचच साचलेला अपराध भाव कमी केला.
देव गेला त्याच दिवशी माझ्या संग्रहातला हम दोनो एकटाच बघत बसलो होतो. एक गाणं आलं आणि काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जशाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला. ध्यानीमनी नसताना अचानक मला माझी नोकरी गमवावी लागली. कंपनीला काहीही करून माणसं कमी करायची होती. "तुम्ही आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या, आणि उद्यापासून येऊ नका. महिन्याचा पगार तुमच्या खात्यावर जमा होईल", असं सांगून सरळ हातात नारळ ठेवण्यात आला. आपलं काम सांभाळून व्हॅल्यु अॅड करत जीव ओतून प्रचंड मेहनत करत असताना हे माझ्या बाबतीत का व्हावं? असा विचार करत अत्यंत संतापलेल्या पण तेवढ्याच विमनस्क अवस्थेत बसची वाट बघत बाहेरच्या टपरीवजा हॉटेलात डोळ्यांतले अश्रू लपवत बसलो होतो. माझा कंपनीतलाच एक मित्र तिथे आला आणि काहीही न बोलता त्याचा मोबाईल माझ्यासमोर टेबलावर ठेऊन हेडफोन कानात कोंबले आणि स्वतः सिगारेट शिलगावत समोर बसला. याच गाण्याच्या ओळी कानावर पडल्या.
बरबादीयों का सोग मनाना फिजूल था
बरबादीयों का जश्न मनाता चला गया
हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया
असंख्य वेळा ऐकलं असेल या आधी हे गाणं. पण आज त्या शब्दांचा नव्याने अर्थ लागला. मनाने नवी उभारी धरली. विचार योग्य दिशेला काम करु लागले. आणि गेलेल्या नोकरीचं दु:ख बाजूला सारून मोजून तेवीस दिवसात नवी नोकरी मिळवली. आवडत्या गाण्यांच्या यादीत हे गाणं सामील होतंच. पण या प्रसंगापासून ते आयुष्याचा मंत्र बनलं. अनेक कठीण प्रसंगात जिवलग मित्रासारखी त्याने साथ केली. आयुष्यात हातातून गेलेल्या गोष्टी ह्या सिगारेटच्या धुरासारख्या. काळाच्या ओघात हवेत विरून जाणार्या. मग त्यांच्यासाठी रडत कुढत बसण्यात काय हंशील? उलट त्यांचं साचून न राहता विरणंच महत्वाचं. आणि मग हसत हसत 'जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया' म्हणत लागलेली ठेच विसरणारा देव आणखी जवळचा वाटू लागला.
आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात आपापल्या सुरैय्या येतात. त्यातल्या काहींच्या बाबतीत कुणाच्या तरी दुराग्रहापायी, हट्टापायी, किंवा दुष्टाव्यापायी दूर निघून जातात. काही जणांच्या मनात आपलं आयुष्य संपवायचाही विचार येतो. तर काही जण रडतात, कुढतात, आणि काळ नामक औषध लागू पडलं की ती जखम विसरूनही जातात. मात्र बहुतेकांच्या मनात आपल्या दुरावलेल्या सुरैय्याविषयी कायमची उरते ती कटुता आणि द्वेष. देव पहिल्यांदा त्याच्या सुरैय्याच्या प्रेमात पडला आणि त्यात अयशस्वी कसा ठरला, या गोष्टींची रसभरित खरी-खोटी वर्णनं जिकडेतिकडे सापडतील. पण त्याने या अपयशाला कसं हाताळलं हे आज फारसं कुणाला ठाऊक नसेल. नकार कसा पचवावा याची गाईडबुकं अशी सहजासहजी सापडत नाहीत. देव आनंदला त्याच्या सुरैय्याची आठवण यायची का? आलीच तर त्याच्या लाडक्या नोझीच्या आठवणीने तो हळवा व्हायचा की त्याच्या नेहमीच्या सवयीने कोरडा रहायला शिकला होता? देवच्या मनात तिच्या विषयी ओलावा होता की कडवटपणा? खाजगीपणा अतोनात जपणार्या देवच्या गूढ मनाचा थांग देवच्या अगदी त्याच्या जवळच्या मित्रांनाही लागत नसे, तर या प्रश्नांची उत्तरं मिळणं अंमळ कठीणच. एका प्रसंगात मात्र देवने आपले अंतरंग अप्रत्यक्षपणे उघड केले. आकाशवाणीवर जयमाला कार्यक्रमात देव त्याच्या वेगवेगळ्या नायिकांबरोबरची गाणी सादर करत होता. मधेच तो थबकला आणि म्हणाला "....आणखी एका नायिकेचं नाव घ्यायचं राहूनच गेलं. ती म्हणजे सुरैय्या." मग त्याने सुरैय्याबरोबर चित्रित झालेलं जे गाणं ऐकवलं त्यातून कदाचित या प्रश्नांचं एकच पण संदिग्ध उत्तर सिनेरसिकांना मिळू शकलं. या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान सचिनदांनी सुरैय्याला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजीच्या दहशतीपोटी सुरैय्याची हिंमत झाली नाही. गाण्याचं चित्रिकरण संपलं आणि दोघांच्या प्रेमकहाणीचा अंत झाला. तेच गाणं देवने निवडलं होतं....'नैन दिवाने, एक नहीं माने'.
अरे देखी जमाने की यारी
बिछडे सभी बारी बारी
गुरुदत्तच्या प्यासा चित्रपटातल्या एका गाण्यातल्या ह्या ओळी वास्तविक आयुष्यातही किती खर्या आहेत ना! नवकेतनचा 'फंटुश' साफ झोपला. यात भर म्हणून की काय फंटूशच्या सेटवर एका गाण्याच्या चित्रिकरणावरुन झालेल्या वादामुळे भाऊ चेतन फंटुश प्रदर्शित झाल्यावर नवकेतन सोडून बाहेर पडला आणि त्याने 'हिमालया' ही चित्रसंस्था काढून वेगळी चूल मांडली. सुरैय्याच्या विरहाने बसलेल्या धक्क्यानंतर देवला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता. पण त्याने तो ही पचवला. देव आनंद मला खूप गूढ वगैरे वाटतो कधी कधी. खिशातलं पाच रुपयाचं पेन हरवलं, बॉसने एखाद्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष केलं, ऑफिसमधे शेजारी बसणारी चवळीची शेंग जाऊन त्याजागी कलिंगड आलं, बायकोने डब्यात नावडती भाजी दिली, नव्या कोर्या गाडीला लहानसा चरा गेला, कुठल्यातरी नवख्या क्रिकेट संघाने भारतीय संघाच्या नाकी नऊ आणले...आपल्याला निराश आणि घाबरं गुबरं व्हायला काहीही कारण पुरतं. साध्या सर्दी-खोकला-ताप आले की शरीरबरोबरच आपण मानसिकदृष्ट्याही कमकुवत होतो. आपल्यावर लहानसा जरी अन्याय झाला तरी मीच काय घोडं मारलंय अशी चडफड होते. आपलं सोडा. प्रेयसी हवा तसा प्रतिसाद देत नाही म्हणून तिच्या घरावर दगडफेक करणारे हीरो आपण नुकतेच बघितले आहेत. माझ्यासाठी देव आनंद म्हणूनच प्रचंड कोडं आहे. हा इतका शांत कसा राहू शकला? स्वतःच्या प्रत्येक चित्रपटाला स्वतःचं बाळ समजणारा देव, ते बाळ अपयशी होत असताना, आपला भाऊ दूर होत असताना इतका स्थितःप्रज्ञ कसा? पुढे त्याच्या मुलीचं लग्न मोडल्यावरही तिला त्याने नव्याने आयुष्य सुरू करायला प्रोत्साहन दिलं. कोलमडणं तर दूरच, उलट झालेल्या गोष्टीचा फारसा विचारही देवने कधी केला नाही. कदाचित अस्थानी वाटेल, पण एक गंमत सांगतो. मी नियमितपणे हिशेब लिहीतो. लिहीताना आणि लिहून झाल्यावर अमुक एक खर्च का केला, जास्त केला का, टाळता आला असता का, तोच पैसा इतर ठिकाणी खर्च करता आला असता का, कशावर कमी खर्च झाला असा विचार खूप वेळ करत बसतो. मला असं करताना बघितलं की माझा भाऊ गालातल्या गालात हसतो. जो खर्च झाला, आता ते पैसे आपल्याकडे नाहीत, जे संपलं निघून गेलं त्यावर इतका विचार का? हा त्याचा प्रश्न नेहमीचाच. मला पटतोच असं नाही. मला पटावा असा त्याचा आग्रहही नाही. पण मी तरीही तितक्याच नियमितपणे हिशेब लिहीत जातो. आणि असं करताना त्यावर नेहमी इतकाच विचारही करत जातो. बरोबर की चूक नाही ठाऊक. मात्र माझ्या भावाला असं हसताना पाहीलं की त्याच्यामधे आणि "जो खो गया मैं उसको भुलाता चला गया" म्हणत झालेल्या गोष्टींना बाजूला सारणार्या देव मधे मला अचानक साम्य दिसू लागतं. या माणसाने आडनावाप्रमाणेच आयुष्यभर आनंद साजरा केला आणि वाटला. दु:ख मात्र मनाच्या कुठल्यातरी अज्ञात अडगळीच्या कोपर्यात कायमचं ढकलून दिलं. फंटुश मागोमाग आलेला मधुबाला बरोबरचा काला पानी आणि वहिदा बरोबरचा काला बाझार सुपरहिट झाले. पण अपयश सहजी मागे सारून पुढे जाणारा देव या यशालाही कुरवाळत बसला नाही. लगेच काहीतरी वेगळं करुन दाखवण्याच्या उर्मीपायी 'हम दोनो'च्या मागे लागला. सुखदु:खे समे कृत्वा हे इतकं जगलेला दुसरा माणूस माझ्या माहितीत तरी नाही.
भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमाभागातील एक लष्करी रुग्णालय. रोजचा राउंड घ्यायला डॉक्टर व त्यांच्याबरोबर नियमित सर्वेक्षणासाठी येणारे ठराविक लष्करी अधिकारी आलेले. मात्र आज त्यांच्या बरोबर एक खास पाहुणा आहे. तो ही त्यांच्याबरोबर जखमींची जिव्हाळ्याने विचारपूस करतोय. हळुहळु एकेकाशी बोलत युद्धात एक पाय गमावलेल्या एका सैनिकाच्या खाटेपाशी ती लोकं येतात. त्या पाहुण्याला पाहून तो सैनिक अचानक उत्साहात ओरडतो "अभी एक टांग तो है! एक...टांग तो है!!". त्या भेटीनंतर त्या सैनिकाची तब्येत झपाट्याने सुधारून त्याला अपेक्षेपेक्षा लवकर डिस्चार्ज देण्यात आल्याचं त्या पाहुण्याला डॉक्टरांकडून काही दिवसांनी समजतं. तो पाहुणा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून तो होता आपला देव. हम दोनो मधला मेजर वर्मा त्या सैनिकाला इतका आपला आणि खरा वाटला होता की युद्धभूमीवरचं मृत्यूचं तांडव, घरच्यांचा विरह, इतर मानसिक आघात, आणि त्यावर कहर म्हणजे स्वतःचा पाय कापायला लागल्याचं दु:ख हा हा म्हणता मागे टाकून त्याचं कोमेजलेलं मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं. ही घटना म्हणजे देवच्या हम दोनो मधल्या अभिनयाची जिवंत पावतीच म्हणायला हवी. चित्रपटातला एखाद्याचा अभिनय किंवा एखादी व्यक्तिरेखा कुणावर असा परिणाम करुन जाईल याची कल्पना खुद्द देवलाही करता आली नसती.
काहींनी कॅप्टन आनंद बनून दुरावलेल्या नवरा-बायकोला एकत्र आणायचे प्रयत्नही केले असतील. सैन्यातले अविवाहित जवान "रुमासारखी बायको हवी" अशी पत्र नंदाला पाठवत, तेव्हा रुमाची भूमिका तिला देण्याच्या निर्णयाचा देवला सार्थ अभिमान वाटत असणार. जर्मनीत एका चित्रपटगृहात खेळ संपल्यावर प्रेक्षकांनी देव आणि नंदा यांचा हारतुर्यांनी सत्कार केला. दोन महायुद्धात पोळून निघालेल्या या देशाच्या सामान्य नागरिकांनी कॅप्टन आणि मेजरच्या भूमिकांसाठी देवच्या अभिनयाला दिलेली ही मानवंदना यापेक्षा मोठं उत्तर तथाकथित समीक्षकांसाठी काय असावं?
देव नुसताच सुपरस्टार आहे, अभिनेता नाही अशी टीका देववर सुरवातीपासूनच होत असे. देव हा सर्वोत्कृष्ठ नट आहे असा अवाजवी गैरसमज त्याचाच काय पण त्याच्या कट्टर चाहत्यांचाही नसेल. प्रत्येक नटाला आपल्या अभिनयाची ताकद आणि मर्यादा यांची जाणीव असते. तशी जाणीव देवलाही होती. ह्या बाबी लक्षात घेऊनच तो कॅमेर्यासमोर वावरला. अर्थात, चांगले दिग्दर्शक मिळाले (विशेषतः गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली) तेव्हा त्याचा अभिनय अधिक खुलला हे खरं. आणि त्याने स्वतःमधल्या अभिनेत्याला पूर्ण न्याय दिला नाही हे सुद्धा खरं. पण म्हणून त्याला अजिबातच अभिनय येत नाही असं म्हणणंही तितकंच हास्यास्पद नव्हे का? सी.आय.डी. मधे वहिदा रहमानच्या हातात पिस्तुल पाहून "तुम गोली चला सकती हो, लेकिन चलाओगी नहीं" असं फणकारणारा आणि आपण इन्स्पेक्टर आहोत, सामान्य माणूस नव्हे अशा तोर्यात वावरणारा इन्स्पेक्टर शेखर आठवा. नेहमी देव नायिकेच्या भोवती रुंजी घालणार, मग मधे काहीतरी गडबड होणार आणि शेवटी नायिका त्याची होणार अशा ठराविक पठडीबाहेरचा 'बंबई का बाबू' आठवा. त्यात नायिकेच्या भाऊ असल्याची बतावणी केल्यानंतर तो दैवयोगाने तिच्या प्रेमात पडतो. ही भावना तिच्यापर्यंत पोहोचवताना झालेली तगमग देव आनंदने ज्या पद्धतीने व्यक्त केली आहे तिला तोड नाही. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी नायिका पालखीत बसून वरातीबरोबर सासरी जायला निघते तेव्हा त्याच्या चेहर्यावरची जीवघेणी भावनिक ओढाताण बघवत नाही आणि आपल्याला ओरडून सांगावसं वाटतं......अरे हा देव आहे देव आनंद. सिनेमाच्या शेवटी हिरोईन यालाच मिळायला हवी!!! 'तेरे मेरे सपने' मधला डॉक्टर आनंदच्या भूमिकेतला देव डॉक्टर जगन्नाथ कोठारीला त्याच्या दारूबाजपणाबद्दल जाब विचारताना तिरकसपणे म्हणतो "मेरे लिये अभी ये जान लेना बहुत जरूरी है...ठर्रे की ये बदबूदार बोतल देखता हूं तो एम.आर.सी.ओ.जी. लंडन, समझमें नहीं आता". डॉक्टर होताना जे आदर्श समोर ठेऊन वैद्यकी स्वीकारली आणि ते आदर्श पुढे वास्तविक जीवनात पाळणे कठीण होऊन बसल्यावर होणारी मनस्थिती देवने अत्यंत परिणामकारकरित्या दाखवली आहे (एम.आर.सी.ओ.जी. मधलं प्रत्येक अक्षर एकदा देवच्या शैलीत म्हणून बघा). 'दिन ढल जाए' या गाण्यातील 'दिल के मेरे पास हो इतनी, फिर भी हो कितनी दूर' या ओळी पडद्यावर म्हणणार्या देवच्या विदीर्ण चेहर्याकडे बघवत नाही. आणि 'पल भर ले लिये कोई हमें प्यार कर ले' मधे 'माना तू सारे हसीनों मे हसीं है, अपनी भी सूरत बुरी तो नहीं हैं' असं नखरा करणार्या ड्रीमगर्ल हेमा मालिनीला ठणकवून सांगण्याचा अधिकार फक्त देवलाच आहे हे पटूनच जातं.
देव चॉकलेट हीरो, रोमँटिक नायक म्हणून लोकप्रिय झाला. पण देवचा प्रणय हा मुळातच हळूवार, खट्याळपणा करत नायिकेला हलकेच छेडत तिच्या अवतीभवती पिंगा घालत तिची आर्जवं करणारा होता. तो कधीच धुसमुसळा झाला नाही. अगदी जोरदार पावसातही. पाऊस आठवला की पहिलेछूट जी चार-पाच गाणी आठवतात त्यांपैकी दोन देव आनंदवर चित्रित झालेली आहेत यातच सारं आलं. प्रेयसीला मिठ्या मारत अंगाशी झोंबाझोंबी नाही, की पावसात उगाच रस्त्यावर लोळणं नाही. नायिकेचा पदर खेचणं नाही की उगाच तिला चापट्या मारणं नाही. हातात छडी किंवा काठी असली तरी तिचा उपयोग प्रेयसीला 'घे हवी ती शिक्षा मला दे, पण माझी हो' हे सांगण्यापुरता. हळुवारपणा हा देव आनंदच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीचा पाया होता. "रिमझिम के तराने लेके आयी बरसात" या गाण्यात दोघं एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवत एकच छत्रीत जात असले तरी एकमेकांमधे योग्य अंतर राखून आहेत. या गाण्यात वहिदा आणि देवचे डोळे बोलतात. आठवलेल्या प्रत्येक क्षणाबरोबर दोघांच्या डोळ्यांत एक निराळीच चमक दिसते. अशा प्रणयाराधनात देवचा अभिनय फुलायचा. पावसातलं आणखी एक गाणं आठवतं ते म्हणजे 'एक बुत बनाउंगा तेरा और पूजा करुंगा'. या गाण्यात पावसाचा प्रभाव ठायी ठायी जाणवत राहतो. पण अजिबात न भिजलेल्या नायकाचा खट्याळपणा आणि नायिकेचं मधाळ लाजणं या दोन गोष्टी मिळून आपल्याला जो आनंद देतात त्याला उपमा नाही. फळ्याच्या मागे उभी असलेली बासुंदीसारखी गोड साधना, आणि पुढून हळूच डोकावत 'कसं ओळखलं' हे भाव चेहर्यावर आणत तिला चिडवणार्या देवचा या गाण्यातला अभिनय म्हणजे संयत रोमँटिक अदाकारीचं झकास उदाहरण आहे. याच गाण्यात आता रोज भेटणं होईल या आनंदात "शाम सवेरे हर मौसम मे होंगी मुलाकातें" म्हणताना देवच्या चेहर्यावरचे भाव इतके गोड आहेत की क्षणभर गाण्यातल्या साधनाचा विसर पडतो. अभी ना जाओ छोडकर, दिल का भंवर करे पुकार, खोया खोया चांद, अच्छा जी मैं हारी, आजा पंच्छी अकेला है, दिल पुकारे आ रे - अशी अगणित गाणी देवच्या नितांतसुंदर रोमँटिक अभिनयाची साक्षीदार आहेत.
देवच्या यशात उत्तमोत्तम गाण्यांचा सर्वाधिक वाटा आहे हे मान्य करावंच लागेल. पण याच सुरेल मैफिलीला पडद्यावर झळाळी आणि दृष्टीला प्रसन्नता प्राप्त करुन देण्याचं श्रेय मात्र देवलाच आहे. तो अभिनयाचं विद्यापीठ वगैरे म्हणून ओळखला जात नसेल, पण खास 'लिप सिन्क' कसं असावं हे शिकायचं असेल तर देव आनंदची गाण्यांची पारायणं करावी. त्याला गाण्याची नुसतीच आवड नव्हे तर उत्तम जाणही होती, शब्दांचं महत्त्वही ठाऊक होतं. इतकंच नव्हे तर तो स्वतः छान गायचा असं त्याचे अनेक सहकलाकार आणि परिचित सांगतात. गाणं शिकल्याने अभिनय नैसर्गिक होतो, ते पडद्यावर सादर करताना शारीरिक हालचाली जशा एका विशिष्ठ लयीत व्हायला हव्यात तशा व्यवस्थित होतात हे त्याला माहित होतं. गायकाच्या स्वरांनुसार ओठांची आणि मानेच्या स्नायुंची हालचाल व्हायला हवी आणि गाण्यांतल्या शब्दांनुसार खांदे, हात, पाय यांच्या हालचाली व्हायला हव्यात हे ठावूक असल्याने ते कसब त्याने उत्तमरित्या आत्मसात केलं होतं. देवला प्रामुख्याने आवाज दिला तो रफी आणि किशोरने. देवची बहुसंख्य गाणी याच दोघांच्या आवाजात आहेत. दोघांकडे आपापली जादू होती. रफी आवाजातून जो नट असेल त्या अनुसार अभिनय करायचा तर किशोर गाण्याच्या मूडमधे शिरून कमाल करायचा. वास्तविक देवच्या आवाजाला आणि संवाद म्हणण्याच्या शैलीकडे बघता त्याला पार्श्वगायक म्हणून किशोर अधिक शोभत असे. तरीही गाण्याची उत्तम जाण आणि कॅमेर्यासमोर सादरीकरणाचं अप्रतीम कौशल्य असल्याने गायक कुठलाही असला तरी देवला फरक पडत नसे. 'जायें तो जायें कहाँ' मधे तलत मेहमूद, 'साँझ ढली दिल की लगी थक चली पुकार के' मधे मन्नाडे इथपासून 'है अपना दिल तो आवारा' मधे हेमंत कुमार अशा विविध गायकांनी देवला आवाज दिला. गायक गाताना कुठे श्वास सोडतो आणि कुठला शब्द कसा उच्चारतो त्याकडे लक्ष ठेऊन बरोबर तिथेच आणि तसाच श्वास सोडल्याचा कायिक आणि मुद्राअभिनय देव करायचा आणि गायकाच्याऐवजी देवच गातोय असा भास निर्माण करायचा. याचं चपखल उदाहरण म्हणजे जॉनी मेरा नाम मधलं 'पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले' हे गाणं. यातली एक जागा पहा: 'सुन सुन कर तेरी नहीं नहींssssss, जाँsss अपनी निकल जाएsss एsss ना कहीं' यातल्या 'नहीं नहींssssss' म्हणताना उचललेलं शरीर 'जाँsss' म्हणताना देव एकदम खाली आणतो आणि 'जाएsss एsss' च्यावेळी आपल्या दातातली ती सुप्रसिद्ध कातील फट दाखवत मान हलवत हसतो. मग हेमा मालिनी सकट आपणही देवच्या त्या मोहक अदांनी केव्हा घायाळ होऊन जातो कळतच नाही.
देव नक्की कुठे चुकत गेला, याचा विचार करताना बोट ठेवण्यासारख्या अनेक जागा आहेत. देवच्या डोक्यात दिग्दर्शनाचा किडा फार पूर्वी शिरला होता. प्रेम पुजारी आपटल्यावर त्याला आणखी एक प्रयत्न करावासा वाटला असेल हे मान्य. पण हरे रामा हरे कृष्णाच्या जमलेल्या तूफान यशस्वी भट्टीचं यश हे देव निव्वळ त्याच्या दिग्दर्शनाचं समजला आणि मग हा किडा जाईचना. 'गोल्डी डायरेक्ट करेगा तो फिर मैं क्या करुंगा' हे त्यानं एका प्रश्नाला दिलेलं उत्तर त्याच्या मनातल्या या गोड गैरसमजाची साक्ष आहे. हरे रामा हरे कृष्णा नंतर देस परदेसचा छोटासा अपवाद वगळता त्याचे इतर चित्रपट आपटतच गेले. मनोरंजनाच्या दृष्टीने चित्रपटात अनेक गोष्टी मिसळा, पण कथेचं मूळ हे आपलं वाटायला हवं. देवच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या टप्प्यातले सिनेमे हे वास्तवापासून, या मातीपासून खूपच दूर जाणारे होते. देव चित्रपटासाठी अगदी ताजे विषय निवडत असे. भान हरपावं असं निसर्गसौंदर्य, आजूबाजूला घडणार्या घटना, सामाजिक संदर्भ असलेले महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, गुन्हेगारी, बेकारी असे असंख्य वैविध्यपूर्ण विषय देवकडे असत. मात्र अशाच अतीआधुनिक, अतीताज्या विषयांमुळे देवचे चित्रपट मागे पडत गेले. कारण एखादी घटना बारा वाजता घडली तर तीच घटना साडेबारा व्हायच्या आत झाडून सगळीकडे झळकते. मग अशा काळात ताज्या विषयांवर कुणी प्रचारकी डॉक्युमेंटरी वाटावा अशा दर्जाचा चित्रपट काढला, तर तो कोण बघेल? एखाद दुसरा चित्रपट सोडला, तर देव हाच प्रमुख भूमिकेत असायचा. तोच चित्रपटाचा नायक असायचा. मग आधी फक्त बहीण आणि बायको असलेला नायक, मग बायको-मुलं असलेला नायक, मग आणखी वय झाल्यावर सिनेमात एक तरुण नट आणि त्याच्या जोडीला एक हिरवीण असली तरी नायक मात्र देवच!! भारतीय प्रेक्षक आजही वयस्कर नायक पडद्यावर बघू शकत नाहीत. यालाही अपवाद आहेत, पण तशी परिस्थिती आजही सर्वसामान्य झालेली नाही. मग सबकुछ देव आनंद असलेले सिनेमे प्रेक्षक स्वीकारतील ही शक्यता नव्हतीच.
अफलातून कल्पनांचा त्याच्याकडे तुटवडा नव्हता. पण या सगळ्या गोष्टींचं चित्रपटात रूपांतर करताना त्यांची अवस्था धरण फुटून इतस्ततः वाहणार्या पाण्यासारखी व्हायची. सिनेमात चांगल्या बाजू असल्याच तर त्या ह्या महापूरात सहजी वाहून जायच्या. विषय काहीही असो, चित्रपटातल्या व्यक्तिरेखा सशक्त असाव्या लागतात. त्यांना स्वतःचे स्वभाव असावे लागतात. त्या स्वभावाचे विविध कंगोरे दृश्यांतून, संवादांतून दिसावे लागतात. इथेच कुठेतरी देवचा जबरदस्त घोळ व्हायचा. देवच्या चित्रपटातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा या दिलेल्या संवादांची पोपटपंची करण्यार्या असायच्या. त्यांचे संवाद हे संवाद न वाटता शाळेतल्या सांस्कृतिक कार्यकमात म्हणायला घोटून घेतलेलं भाषण वाटावं अशा प्रकारचे असायचे. त्यात भरीस भर म्हणून देवच्या चित्रपटात पात्रांनी संवाद एकसुरीपणे आणि कानात पुटपुटल्यागत म्हणायच्या 'हरे रामा हरे कृष्णा' पासून सुरू झालेल्या प्रकाराने नंतर नंतर कळस गाठला.
देव आनंदवर पाश्चात्य विचारांचा खूप प्रभाव होता. त्याच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या टप्प्यांत काढलेल्या चित्रपटात त्याचा अतिरेक झाला. भारतीय प्रेक्षकांना अभिप्रेत असलेलं नाट्य, कौटुंबिक वातावरण, भावनिक कल्लोळ, थोडीशी रडारड ह्या गोष्टी देवच्या चित्रपटातून अदृश्य झाल्या. पाश्चात्य वातावरणातलं चित्रिकरण, त्याच वळणाची कोरडी कथानके, पाश्चात्य उच्चारांनी हिंदी बोलणारे मठ्ठ नट्-नट्या, नको तिथे बलात्कार आणि अतीप्रसंगांची दृश्ये हे प्रकार सिनेरसिकांना आपले वाटलेच नाहीत. प्रेक्षक चित्रपटाचा, त्यातल्या एखाद्या दृश्यांचा आस्वाद घेण्याऐवजी कथानकाचा प्रचंड वेगामुळे सुरवातीला वाहून गेले आणि नंतर त्याचे सिनेमे बघत नाहीसे झाले. प्रेक्षक हा घटक बाजूला झाला आणि उरले फक्त चाहते. नवकेतनच्या चित्रपटांतली गाणी म्हणजे अर्थपूर्ण शब्दांना अवीट गोडीच्या सुरांनी कसलेल्या गायकांच्या माध्यमातून चढवलेला कळस होता. त्या संगीतात असणारा गोडवा कुठेतरी हरवला, गाण्यांतल्या शब्दसामर्थ्याचा र्हास झाला, त्यांचा साहित्यिक दर्जा हरवला, आणि उरला तो फक्त धागडधिंगा आणि वाद्यांचा गदारोळ. अजूनही बहुतेकांना त्याचे सत्तर सालानंतरचे बहुतेक सिनेमे आठवतच नाहीत, मग त्यातली निरस गाणी तरी कशी आठवतील? देव गेल्यावर मित्रमंडळीत सहज झालेल्या गप्पांमधे कुणीतरी 'सच्चे का बोलबाला' चित्रपटाचं नाव घेतलं. देव ऐन भरात असताना निघालेले अनेक सिनेमे एकेकदाच बघितलेले असले तरी त्यातल्या अनेक गोष्टी आजही स्पष्टपणे आठवतात. पण इथे स्मरणशक्तीला कितीही ताण दिला तरी आवर्जून व्हिडिओ कॅसेट आणून बघितलेल्या त्या सिनेमात देवआनंद संपादक(!) असतो, त्यात हेमा मालिनी असते आणि तिचा खून होतो, आणि तिच्या आणि तिच्या धाकट्या बहिणीच्या अंगावर कुठेतरी गुलाब गोंदलेला असतो यापलीकडे तपशील आठवेना. अशा चित्रपटांतलं अतर्क्य दॄश्याचं आणि सुमार गाण्याचं एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी मुळात ते आठवायला तरी हवं ना? नवकेतनच्या शेवटच्या अनेक चित्रपटांची ही अवस्था होती. पण दुर्दैवाने आपले देव साहेब वास्तवापासून फार दूर पोहोचले होते. मुंगेरीलाल के हसींन सपने बघत कधीतरी आपला एखादा चित्रपट हिट होईल असं स्वप्नं बघत ते नेमाने चित्रपट काढत होते. आणि असाच एखादा सिनेमा निघाला आणि सालाबादप्रमाणे आपटला की काही दिवस 'मी देव आनंदचा फॅन आहे' असं चारचौघात सांगण्याची सोय ठेवत नव्हते. लाखो चाहत्यांनी त्याची मूर्ती ठेवण्यासाठी बांधलेली मनमंदिरं तो एकापाठोपाठ स्वतःच्या हाताने उध्वस्त करत सुटला होता.
देव आनंद म्हणायचा, 'मी चित्रपट काढणं थांबवेन ते माझ्या मृत्यू झाल्यावरच, त्या आधी नाही'. कारण चित्रपट काढणं हा त्याचा फक्त आवड किंवा व्यवसाय नव्हता. तो त्याचा प्राणवायु होता. देवने चित्रपटात काम करायला सुरवात केल्यापासून जपलेली आर्थिक शिस्त त्याच्याकडे पैशाचा तुटवडा भासू देत नसे. शिवाय त्याच्यावर प्रेम करणार्या लाखो चाहत्यांपैकी कुणीतरी त्याला पैसा पुरवायचंच. सिनेमे काढायला त्याने कधीही संशयास्पद स्त्रोतांकडुन पैसा घेतला नाही. पैसा कमावण्याची जी साधनं, मालमत्ता देवकडे होती ती सगळीच्या सगळी चित्रपटांशीच संबंधीत होती. बांद्र्याला असलेलं एक रेकॉर्डिंग रूम आणि एक फिल्म प्रिव्ह्यु थियेटर आणि त्याचा स्वत:चा बंगला वगळता चित्रपटांतून त्याने काहीही इस्टेट उभी केली नाही. आज अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत आल्यावर उणीपुरी पाच वर्ष होत नाहीत तोच एकूण किंमत कोट्यावधीच्या घरात जाणार्या चार पाच सदनिका घेताना आपल्याला दिसतात. पण देवने चित्रपटांतून जे कमावलं ते चित्रपट काढण्यातच गुंतवलं. त्याच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका तरुण अभिनेत्रीने व्यक्त केलेले विचार अगदी योग्य होते. ती म्हणाली "चित्रपटसृष्टीने आम्हाला काय दिलं ह्याचा आम्ही नेहमी विचार करतो. पैसा-अडका, बंगला-गाडी, मानमरातब वगैरे. पण देव साहेबांनी चित्रपटसृष्टीकडून नुसतं घेतलंच नाही तर त्याच्या कित्येक पटीने सिनेमाला दिलं आहे." त्यामुळे देवने वेळीच थांबायला हवं होतं, हे बोलण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे, ते तो वरचा देवच जाणे.
पन्नासच्या दशकात जेव्हा देव चित्रपटसृष्टीत स्थिरावत होता, तेव्हा एका पत्रकाराने एका इंग्रजी नियतकालिकात त्याच्याविषयी बरंच काही(बाही) लिहीलं होतं. त्यात एक वाक्य होतं "आजपासून पंचवीस वर्षांनंतर देव आनंदचं नावसुद्धा कोणालाही आठवणार नाही." आज ते लिहीणारा कुठे आहे त्या परमेश्वरालाच ठावूक. देव मात्र सढळ हस्ताने आनंद वाटून त्याचं नाव हिंदी चित्रपटरसिकांच्या हृदयावर कायमचं कोरून गेला आहे. देवने आपल्याला काय नाही दिलं? 'फूलों का तारों का, सबका कहना है, एक हजारों मे मेरी बहना है' म्हणत भाऊ आपल्या बहिणीचं कौतुक करू लागले, तर प्रेयसीबरोबर अधिक वेळ मिळावा असं वाटणारे प्रियकर 'अभी ना जाओ छोडकर' अशी आर्त साद घालू लागले. रुसलेल्या प्रेयसीचा राग 'देखो रुठा ना करो' म्हणत दूर करू लागले तर प्रेम यशस्वी झालेले प्रेमिक 'हे मैनें कसम ली' असं म्हणत एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याची वचनं देऊ लागले. अनेकांच्या मोबाईलच्या रिंगटोन आणि हेलोटोन मधे हम दोनो मधल्या सिगारेट लायटरच्या संगीताने स्थान मिळवलं. अंताक्षरी खेळताना 'श' अक्षर आलं की हमखास "शोखियों मे घोला जाये" हे गाणं आठवतं.
वयाची ऐंशी वर्ष उलटली तरी शरीरावर थकल्याचं कुठलंही लक्षण नव्हतं. मन ताजंतवानं असल्यावर शरीर थकेल तरी कसं? उतारवय, म्हातारपण, वयोवृद्ध, वगैरे विशेषणं ही देवसाठी नव्हतीच. त्याचा उत्साह हा प्रत्येकवेळी त्याच आवेगाने किनार्यावरच्या खडकांवर आपटणार्या समुद्राच्या लाटांसारखा होता. भावलेला एखादा विषय घेऊन मनातल्या खळबळीचं रूपांतर चित्रपटात करुन टाकायचं, आणि तो सिनेमा कितीही जोरात आपटला—नाही, आपटला हा फार सौम्य शब्द आहे. त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या खेळाला एका चित्रपटगृहात एकही तिकीट विकलं गेलं नाही म्हणून खेळच रद्ध केला म्हणे—तरी ही त्या आणि त्याआधी साफ झोपलेल्या असंख्य चित्रपटांचं अपयश विस्मरणात ढकलून नव्या उमेदीने पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागत असे. या वयातही ज्या उत्साहात रणरणत्या ऊन्हात उभं राहून काम करायचा त्याच उत्साहात बर्फात पाय रोवून युनिटला सूचना देताना दिसायचा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना चित्रपट हिट झाल्यावर तो ना कधी उतला-मातला, ना पडल्यावर कधी दु:ख करत घेतला वसा टाकून दिला. देवनं अगदी राजकारणातही हात पोळून घेतलेले आहेत. पण त्यात अयशस्वी झाल्यावर अधिक धडपड न करता पुन्हा चित्रपटनिर्मितीकडे वळला. 'जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया' हे तत्त्व आयुष्यभर जगला. देव प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतो, टक्कल लपवायला टोपी घालतो अशी टीका झाली. पण तो वागण्यात शिस्त ठेवतो, नियमित व्यायाम करतो, आहारावर नियंत्रण ठेवतो, त्याला अनेक वर्ष सुपारीच्या खांडाचंदेखील व्यसन नाही याकडे सोयिस्करपणे दुर्लक्षही झालं. नामांकित आहारतज्ञांनी "चेहर्यावर असा तजेलदारपणा कृत्रिमरित्या आणणं शक्य नाही" असं सांगताच अशी टीका तात्पुरती बंदही झाली. देवची जन्मतारीख सगळ्यांना माहित असताना तो वय लपवायचा ही हास्यास्पद टीका सुद्धा झाली. आपलं कौटुंबिक जीवन खाजगी राखण्याच्या त्याच्या वृत्तीवर टीका झाली. पण या जगाची जाण येईपर्यंत त्याने मुलांना नीट शिक्षण दिलं, चित्रपटसृष्टीत यायचं ते समजून उमजून याचं भान दिलं, ते मात्र विसरलं गेलं. देवची कारकीर्द भरात असतानाही त्याला उत्कृष्ठ अभिनयाबाबत एखादा पुरस्कार मिळाला तरी त्याच्या अभिनयाचं कौतुक करण्यात हात आखडता घेतला गेला. उलट कॅमेरा स्वतःवर रहावा म्हणून त्याने इतर कलाकारांच्या भूमिकेवर कात्री फिरवली अशी टीका झाली. पण त्याचवेळी चित्रपटातल्या नायक-नायिकेची भूमिका महत्त्वाची असते, इतरांची नाही हे साधं व्यावसायिक गणित लक्षात घ्यायची गरजही लेखणी परजणार्यांपैकी कुणाला भासली नाही. देव मात्र या सगळ्या आरोपांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याची उत्तरं इतरांनीच दिली.
गेल्या वर्षा-दीड वर्षात सिनेरसिकांच्या मनावर बरेच आघात झाले. शम्मी कपूर गेला तेव्हा आपलं दंगा करणारं खोडकर बालपण गेलं. देव आनंद गेला म्हणजे आपल्या स्वप्नील विश्वातलं तारुण्य हिरावलं गेलं. आत्तापर्यंत लांब भासणारा मृत्यू जवळ आल्याचा भास झाला. तुमच्या लक्षात आलं ना आता, मी सुरवातीला आपण किती स्वार्थी असतो असं का म्हणालो ते? शेवटी आपल्याला भीती वाटते ती आपल्या मृत्यूची!! देव हे जग सोडून गेला असेल. पण वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आपल्या चिंता धुम्रवलयासम मानून उडवून लावणारा देव आनंद त्याची ही वृत्ती, ही मानसिकता एखाद्या शिकवणीसारखी आपल्यासाठी सोडून गेला आहे. जुन्या गोष्टींना फार चिकटून न राहण्याच्या सवयीमुळे म्हणा किंवा आर्थिक कारणांमुळे म्हणा, देवच्या आयुष्याची पस्तीस वर्ष ज्या जुहूच्या आयरीश पार्क बंगल्याने बघितली त्याची डागडुजी करण्याऐवजी तो विकून त्याजागी टॉवर बांधायचं त्याने ठरवलं होतं. त्याच्यावर आता कदाचित 'इथे देव आनंद यांचे निवासस्थान होतं' अशी मुंबई महानगरपालिका पुरस्कृत पाटी लागेल. २००९ सालच्या डिसेंबरात त्याने बंगला सोडला होता. गेल्या डिसेंबरातल्या चार तारखेला देवने शरीररूपी देव्हार्याचाही निरोप घेतला. आता त्या देव्हार्यात देव नाही. पण लाखो सिनेरसिक आणि त्याच्या चाहत्यांच्या मनात मात्र तो अमर असेल.
आनंद मधल्या अमिताभचं शेवटचं वाक्य थोडं बदलून असं करता येईल "देव आनंद मरा नहीं, देव आनंद मरते नहीं!!"
---------------------------------------------------------------------------
टी.व्ही.वर "रिमझिम के तराने लेके आयी बरसात" अशी मूक साद घालत नायक देव आनंदने नायिका वहिदाला छत्रीत घेतलं आहे. ती त्याला 'याद आये किसीसे वो पहली मुलाका़त' म्हणत तसाच प्रतिसाद देते आहे. माझ्या हातात मस्त वाफाळत्या चहाचा कप आहे...आणि अशातच माझं खिडकीकडे लक्ष जातं. या पार्श्वभूमीवर बाहेर योगायोगाने इकडे पुण्यात पावसाचे अगदी हलके शिंतोडे सुरू झाल्याचं दिसतं आणि त्या गाण्याची लज्जत शतपटीने वाढते. कुठल्याही संवेदनशील निसर्गप्रेमी माणसाला धुंद करेल असा पुण्याचा रोमँटिक पाऊस. मग देव तर मुळातच रसिक माणूस. ह्या शहरातल्या पावसाने त्याला भुरळ घातली नसती तरच नवल होतं. देव आनंदने रेल्वेतून उतरून पुण्यात पहिलं पाऊल टाकलं आणि प्रभात स्टुडिओपर्यंत पावसाचा आनंद लुटत गेला तेव्हाच त्याचे आणि पुण्यातल्या रिमझिम पावसाचे ॠणानुबंध जुळले आणि पुढे आयुष्यभर टिकले, हे कुठेतरी वाचल्याचं आठवतं. अशा स्मरणरंजनात मन गुंतत असतानाच अचानक मोबाईल वाजतो आणि मित्राचा परिचित आवाज कानी पडतो. रविवारी सकाळी आठ वाजता याने का फोन केला असावा असा विचार करत असतानाच "देव आनंद वारला...काल रात्री....लंडनमधे.....बातम्या लाव" हे एका दमात सांगून तो फोन ठेवतो.
कानांनी जे ऐकलं ते मेंदूच्या समजूतीच्या कप्प्यात शिरायला जरा वेळ लागला. काही क्षणांनी मात्र जेव्हा शिरलं तेव्हा या माणसावर आपण किती प्रेम करत होतो या जाणीवेने डोळ्यांत टचकन पाणी आलं. 'I thought she was immortal' (मला वाटायचं ती अमर आहे) — प्रसिद्ध लेखक पी. जी. वूडहाऊसची चौदा वर्षांची मुलगी लियोनारा गेली तेव्हा त्याने हताश होऊन काढलेले हे उद्गार मनुष्यस्वभावाविषयी खूप काही सांगून जातात. आपल्या आसपासच्या अनेकांचं अस्तित्व आपण गृहित धरतो. आपल्या आधी ते जाणारच नाहीत असं आपल्याला वाटतं. किती स्वार्थी असतो ना आपण? देव आनंदला आपण सगळ्यांनी असंच गृहित धरलं होतं. म्हणूनच देव गेल्याची बातमी जेव्हा ऐकली तेव्हा माझ्याही मनात नेमकी अशीच प्रतिक्रिया उमटली. आपल्याला वाटायचं तो अमरपट्टा घेऊन आला आहे. निदान याची तरी पूर्ण खात्री होती की तो शंभरी आरामात पार करेल....आणि स्वतःच्या शंभराव्या वाढदिवसाप्रित्यर्थ आणखी एका चित्रपटाची घोषणा करेल. पण म्हातारपण या शब्दाचा आणि स्थितीचा आपल्या उत्साहाने आणि उमेदीने सतत पराभव करणारा ८८ वर्षांचं समृद्ध धडधाकट आयुष्य जगून देव गेला तो शेवटी हृदयविकाराचा तीव्र झटका हे सर्वसामान्यांचंच दुखणं होऊन. पण तो जसा आयुष्यभर जगला तसाच आपल्यातून गेला - ताठ मानेने, मनाने तरूण असतानाच. लंडनच्या हीथ्रो विमानतळावर दिलेली व्हीलचेअर फणकार्याने नाकारून तरातरा चालत टॅक्सीत जाऊन बसला. आणि मग बातमी आली ती थेट तो गेल्याचीच.
"देव साहेबांचं पार्थिव भारतात आणलं जाणार नाही..." वृत्तनिवेदक सांगत होता. बरं झालं. देवला तसं बघताच आलं नसतं. या सदगृहस्थावर आपला इतका जीव का होता, तो गेल्यावर आपण इतके का हळहळलो, ते आज अनेकांना सांगून समजणार नाही. त्यासाठी फक्त देवचा चाहता असून चालत नाही. त्या सोनेरी काळावर माया असावी लागते. त्या माणसांबद्दल जिव्हाळा असावा लागतो. प्रत्यक्षाहून उत्कट असलेल्या प्रतिमेवर प्रेम करावं लागतं. त्यांनी विकलेली स्वप्नं ही आपलीही असावी लागतात, तरच त्यांच्या सादरीकरणाशी आपण तादात्म्य पावू शकतो. एखाद्याची ओळख होण्यापासून ते त्याचा चाहता होण्यापर्यंतच्या प्रवासाशी तद्रूप व्हावं लागतं. राज, दिलीप, देव, शम्मी, रफी, किशोर, मुकेश, ओ.पी. नय्यर, गुरुदत्त, सचिनदा, ललिता पवार, नुतन, ऋषिकेश मुखर्जी, विजय आनंद, राजेश खन्ना हे आणि असे असंख्य हिरे दिलेल्या त्या काळाचं अप्रूप वाटत मी मोठा झालो. त्यामुळे या खजिन्याची मोजदाद करण्याच्या खुळ्या खटाटोपात देवची आणि माझी ओळख नेमकी कधी झाली ते सांगणं अवघड आहे. पण मनावर त्याची सगळ्यात पहिली आठवण कोरली गेली ती गाईड मधल्या बंडखोर राजूच्या रूपाने. गाईड सर्वप्रथम बघितला तेव्हा चित्रपट म्हणून नक्की काय वाटलं ते नीटसं नाही सांगता येणार. पण राजूने मला माझ्या मनातली अनेक वादळं शांत करायला मदत केली. समोर आ वासून उभ्या असणार्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत केली. "तुम कोई वादा नहीं कर रही हो, तुम्हारा हात अपने दिल पे रख कर मै एक वादा करना चाह्ता हूं" असं म्हणत प्रेमातलं समर्पण कसं असावं ते दाखवलं. एक चांगला माणूस म्हणून शांत मनानं जगायचं असेल तर आपल्यातल्या करड्या छटाही निर्भयपणे स्वीकारायला शिकलं पाहिजे. नैतिकतेच्या पोकळ चौकटींपेक्षा न्याय्य गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जायला हवं. देव आनंदच्या राजू गाईडने मला हे शिकवलं आणि मनात उगीचच साचलेला अपराध भाव कमी केला.
देव गेला त्याच दिवशी माझ्या संग्रहातला हम दोनो एकटाच बघत बसलो होतो. एक गाणं आलं आणि काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग जशाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला. ध्यानीमनी नसताना अचानक मला माझी नोकरी गमवावी लागली. कंपनीला काहीही करून माणसं कमी करायची होती. "तुम्ही आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या, आणि उद्यापासून येऊ नका. महिन्याचा पगार तुमच्या खात्यावर जमा होईल", असं सांगून सरळ हातात नारळ ठेवण्यात आला. आपलं काम सांभाळून व्हॅल्यु अॅड करत जीव ओतून प्रचंड मेहनत करत असताना हे माझ्या बाबतीत का व्हावं? असा विचार करत अत्यंत संतापलेल्या पण तेवढ्याच विमनस्क अवस्थेत बसची वाट बघत बाहेरच्या टपरीवजा हॉटेलात डोळ्यांतले अश्रू लपवत बसलो होतो. माझा कंपनीतलाच एक मित्र तिथे आला आणि काहीही न बोलता त्याचा मोबाईल माझ्यासमोर टेबलावर ठेऊन हेडफोन कानात कोंबले आणि स्वतः सिगारेट शिलगावत समोर बसला. याच गाण्याच्या ओळी कानावर पडल्या.
बरबादीयों का सोग मनाना फिजूल था
बरबादीयों का जश्न मनाता चला गया
हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया
असंख्य वेळा ऐकलं असेल या आधी हे गाणं. पण आज त्या शब्दांचा नव्याने अर्थ लागला. मनाने नवी उभारी धरली. विचार योग्य दिशेला काम करु लागले. आणि गेलेल्या नोकरीचं दु:ख बाजूला सारून मोजून तेवीस दिवसात नवी नोकरी मिळवली. आवडत्या गाण्यांच्या यादीत हे गाणं सामील होतंच. पण या प्रसंगापासून ते आयुष्याचा मंत्र बनलं. अनेक कठीण प्रसंगात जिवलग मित्रासारखी त्याने साथ केली. आयुष्यात हातातून गेलेल्या गोष्टी ह्या सिगारेटच्या धुरासारख्या. काळाच्या ओघात हवेत विरून जाणार्या. मग त्यांच्यासाठी रडत कुढत बसण्यात काय हंशील? उलट त्यांचं साचून न राहता विरणंच महत्वाचं. आणि मग हसत हसत 'जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया' म्हणत लागलेली ठेच विसरणारा देव आणखी जवळचा वाटू लागला.
तू अमुक गोष्ट करुच शकणार नाहीस असं कुणी म्हटलं की चवताळून ते करुन दाखवायची खुमखुमी मला स्वस्थ बसू देत नाही. अशा प्रकारची नकारात्मक प्रेरणा काही जणांवर किती सकारात्मक परिणाम करते त्याचं देव हे चपखल उदाहरण आहे. एकदा नाटकात काम करताना देव चुकला तेव्हा बलराज सहानीने संतापून भविष्य वर्तवलं, "तू कधीच नट बनू शकणार नाहीस!" हे ऐकल्यावर एखादा खालमानेने दुसरं क्षेत्र धुंडाळू लागला असता. पण देव सहजी हार मानणार्यातला नव्हताच. त्याने त्याच क्षणी बलराजला ठणकावून सांगितलं की मी यशस्वी होऊन दाखवीन ते नट म्हणूनच. दातातली फट कृत्रिमरित्या भरायची तयारी असेल तर काम मिळेल या डी.डी.कश्यप यांच्या अटीला धुडकावून दातांना हात देखील न लावता यश मिळवून दाखवण्याची प्रतिज्ञा करुन ते खरं करुन दाखवलं. इतकं की कालांतराने ती फट दाखवत त्याचं देवतुल्य हसणं दिसलं की तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकायचे. पुरुषालाही सुंदर हे विशेषण लावता येणं शक्य आहे हे देवकडे बघितल्यावर समजायचं.
आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात आपापल्या सुरैय्या येतात. त्यातल्या काहींच्या बाबतीत कुणाच्या तरी दुराग्रहापायी, हट्टापायी, किंवा दुष्टाव्यापायी दूर निघून जातात. काही जणांच्या मनात आपलं आयुष्य संपवायचाही विचार येतो. तर काही जण रडतात, कुढतात, आणि काळ नामक औषध लागू पडलं की ती जखम विसरूनही जातात. मात्र बहुतेकांच्या मनात आपल्या दुरावलेल्या सुरैय्याविषयी कायमची उरते ती कटुता आणि द्वेष. देव पहिल्यांदा त्याच्या सुरैय्याच्या प्रेमात पडला आणि त्यात अयशस्वी कसा ठरला, या गोष्टींची रसभरित खरी-खोटी वर्णनं जिकडेतिकडे सापडतील. पण त्याने या अपयशाला कसं हाताळलं हे आज फारसं कुणाला ठाऊक नसेल. नकार कसा पचवावा याची गाईडबुकं अशी सहजासहजी सापडत नाहीत. देव आनंदला त्याच्या सुरैय्याची आठवण यायची का? आलीच तर त्याच्या लाडक्या नोझीच्या आठवणीने तो हळवा व्हायचा की त्याच्या नेहमीच्या सवयीने कोरडा रहायला शिकला होता? देवच्या मनात तिच्या विषयी ओलावा होता की कडवटपणा? खाजगीपणा अतोनात जपणार्या देवच्या गूढ मनाचा थांग देवच्या अगदी त्याच्या जवळच्या मित्रांनाही लागत नसे, तर या प्रश्नांची उत्तरं मिळणं अंमळ कठीणच. एका प्रसंगात मात्र देवने आपले अंतरंग अप्रत्यक्षपणे उघड केले. आकाशवाणीवर जयमाला कार्यक्रमात देव त्याच्या वेगवेगळ्या नायिकांबरोबरची गाणी सादर करत होता. मधेच तो थबकला आणि म्हणाला "....आणखी एका नायिकेचं नाव घ्यायचं राहूनच गेलं. ती म्हणजे सुरैय्या." मग त्याने सुरैय्याबरोबर चित्रित झालेलं जे गाणं ऐकवलं त्यातून कदाचित या प्रश्नांचं एकच पण संदिग्ध उत्तर सिनेरसिकांना मिळू शकलं. या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान सचिनदांनी सुरैय्याला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजीच्या दहशतीपोटी सुरैय्याची हिंमत झाली नाही. गाण्याचं चित्रिकरण संपलं आणि दोघांच्या प्रेमकहाणीचा अंत झाला. तेच गाणं देवने निवडलं होतं....'नैन दिवाने, एक नहीं माने'.
अरे देखी जमाने की यारी
बिछडे सभी बारी बारी
गुरुदत्तच्या प्यासा चित्रपटातल्या एका गाण्यातल्या ह्या ओळी वास्तविक आयुष्यातही किती खर्या आहेत ना! नवकेतनचा 'फंटुश' साफ झोपला. यात भर म्हणून की काय फंटूशच्या सेटवर एका गाण्याच्या चित्रिकरणावरुन झालेल्या वादामुळे भाऊ चेतन फंटुश प्रदर्शित झाल्यावर नवकेतन सोडून बाहेर पडला आणि त्याने 'हिमालया' ही चित्रसंस्था काढून वेगळी चूल मांडली. सुरैय्याच्या विरहाने बसलेल्या धक्क्यानंतर देवला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता. पण त्याने तो ही पचवला. देव आनंद मला खूप गूढ वगैरे वाटतो कधी कधी. खिशातलं पाच रुपयाचं पेन हरवलं, बॉसने एखाद्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष केलं, ऑफिसमधे शेजारी बसणारी चवळीची शेंग जाऊन त्याजागी कलिंगड आलं, बायकोने डब्यात नावडती भाजी दिली, नव्या कोर्या गाडीला लहानसा चरा गेला, कुठल्यातरी नवख्या क्रिकेट संघाने भारतीय संघाच्या नाकी नऊ आणले...आपल्याला निराश आणि घाबरं गुबरं व्हायला काहीही कारण पुरतं. साध्या सर्दी-खोकला-ताप आले की शरीरबरोबरच आपण मानसिकदृष्ट्याही कमकुवत होतो. आपल्यावर लहानसा जरी अन्याय झाला तरी मीच काय घोडं मारलंय अशी चडफड होते. आपलं सोडा. प्रेयसी हवा तसा प्रतिसाद देत नाही म्हणून तिच्या घरावर दगडफेक करणारे हीरो आपण नुकतेच बघितले आहेत. माझ्यासाठी देव आनंद म्हणूनच प्रचंड कोडं आहे. हा इतका शांत कसा राहू शकला? स्वतःच्या प्रत्येक चित्रपटाला स्वतःचं बाळ समजणारा देव, ते बाळ अपयशी होत असताना, आपला भाऊ दूर होत असताना इतका स्थितःप्रज्ञ कसा? पुढे त्याच्या मुलीचं लग्न मोडल्यावरही तिला त्याने नव्याने आयुष्य सुरू करायला प्रोत्साहन दिलं. कोलमडणं तर दूरच, उलट झालेल्या गोष्टीचा फारसा विचारही देवने कधी केला नाही. कदाचित अस्थानी वाटेल, पण एक गंमत सांगतो. मी नियमितपणे हिशेब लिहीतो. लिहीताना आणि लिहून झाल्यावर अमुक एक खर्च का केला, जास्त केला का, टाळता आला असता का, तोच पैसा इतर ठिकाणी खर्च करता आला असता का, कशावर कमी खर्च झाला असा विचार खूप वेळ करत बसतो. मला असं करताना बघितलं की माझा भाऊ गालातल्या गालात हसतो. जो खर्च झाला, आता ते पैसे आपल्याकडे नाहीत, जे संपलं निघून गेलं त्यावर इतका विचार का? हा त्याचा प्रश्न नेहमीचाच. मला पटतोच असं नाही. मला पटावा असा त्याचा आग्रहही नाही. पण मी तरीही तितक्याच नियमितपणे हिशेब लिहीत जातो. आणि असं करताना त्यावर नेहमी इतकाच विचारही करत जातो. बरोबर की चूक नाही ठाऊक. मात्र माझ्या भावाला असं हसताना पाहीलं की त्याच्यामधे आणि "जो खो गया मैं उसको भुलाता चला गया" म्हणत झालेल्या गोष्टींना बाजूला सारणार्या देव मधे मला अचानक साम्य दिसू लागतं. या माणसाने आडनावाप्रमाणेच आयुष्यभर आनंद साजरा केला आणि वाटला. दु:ख मात्र मनाच्या कुठल्यातरी अज्ञात अडगळीच्या कोपर्यात कायमचं ढकलून दिलं. फंटुश मागोमाग आलेला मधुबाला बरोबरचा काला पानी आणि वहिदा बरोबरचा काला बाझार सुपरहिट झाले. पण अपयश सहजी मागे सारून पुढे जाणारा देव या यशालाही कुरवाळत बसला नाही. लगेच काहीतरी वेगळं करुन दाखवण्याच्या उर्मीपायी 'हम दोनो'च्या मागे लागला. सुखदु:खे समे कृत्वा हे इतकं जगलेला दुसरा माणूस माझ्या माहितीत तरी नाही.
भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमाभागातील एक लष्करी रुग्णालय. रोजचा राउंड घ्यायला डॉक्टर व त्यांच्याबरोबर नियमित सर्वेक्षणासाठी येणारे ठराविक लष्करी अधिकारी आलेले. मात्र आज त्यांच्या बरोबर एक खास पाहुणा आहे. तो ही त्यांच्याबरोबर जखमींची जिव्हाळ्याने विचारपूस करतोय. हळुहळु एकेकाशी बोलत युद्धात एक पाय गमावलेल्या एका सैनिकाच्या खाटेपाशी ती लोकं येतात. त्या पाहुण्याला पाहून तो सैनिक अचानक उत्साहात ओरडतो "अभी एक टांग तो है! एक...टांग तो है!!". त्या भेटीनंतर त्या सैनिकाची तब्येत झपाट्याने सुधारून त्याला अपेक्षेपेक्षा लवकर डिस्चार्ज देण्यात आल्याचं त्या पाहुण्याला डॉक्टरांकडून काही दिवसांनी समजतं. तो पाहुणा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून तो होता आपला देव. हम दोनो मधला मेजर वर्मा त्या सैनिकाला इतका आपला आणि खरा वाटला होता की युद्धभूमीवरचं मृत्यूचं तांडव, घरच्यांचा विरह, इतर मानसिक आघात, आणि त्यावर कहर म्हणजे स्वतःचा पाय कापायला लागल्याचं दु:ख हा हा म्हणता मागे टाकून त्याचं कोमेजलेलं मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं. ही घटना म्हणजे देवच्या हम दोनो मधल्या अभिनयाची जिवंत पावतीच म्हणायला हवी. चित्रपटातला एखाद्याचा अभिनय किंवा एखादी व्यक्तिरेखा कुणावर असा परिणाम करुन जाईल याची कल्पना खुद्द देवलाही करता आली नसती.
काहींनी कॅप्टन आनंद बनून दुरावलेल्या नवरा-बायकोला एकत्र आणायचे प्रयत्नही केले असतील. सैन्यातले अविवाहित जवान "रुमासारखी बायको हवी" अशी पत्र नंदाला पाठवत, तेव्हा रुमाची भूमिका तिला देण्याच्या निर्णयाचा देवला सार्थ अभिमान वाटत असणार. जर्मनीत एका चित्रपटगृहात खेळ संपल्यावर प्रेक्षकांनी देव आणि नंदा यांचा हारतुर्यांनी सत्कार केला. दोन महायुद्धात पोळून निघालेल्या या देशाच्या सामान्य नागरिकांनी कॅप्टन आणि मेजरच्या भूमिकांसाठी देवच्या अभिनयाला दिलेली ही मानवंदना यापेक्षा मोठं उत्तर तथाकथित समीक्षकांसाठी काय असावं?
देव नुसताच सुपरस्टार आहे, अभिनेता नाही अशी टीका देववर सुरवातीपासूनच होत असे. देव हा सर्वोत्कृष्ठ नट आहे असा अवाजवी गैरसमज त्याचाच काय पण त्याच्या कट्टर चाहत्यांचाही नसेल. प्रत्येक नटाला आपल्या अभिनयाची ताकद आणि मर्यादा यांची जाणीव असते. तशी जाणीव देवलाही होती. ह्या बाबी लक्षात घेऊनच तो कॅमेर्यासमोर वावरला. अर्थात, चांगले दिग्दर्शक मिळाले (विशेषतः गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली) तेव्हा त्याचा अभिनय अधिक खुलला हे खरं. आणि त्याने स्वतःमधल्या अभिनेत्याला पूर्ण न्याय दिला नाही हे सुद्धा खरं. पण म्हणून त्याला अजिबातच अभिनय येत नाही असं म्हणणंही तितकंच हास्यास्पद नव्हे का? सी.आय.डी. मधे वहिदा रहमानच्या हातात पिस्तुल पाहून "तुम गोली चला सकती हो, लेकिन चलाओगी नहीं" असं फणकारणारा आणि आपण इन्स्पेक्टर आहोत, सामान्य माणूस नव्हे अशा तोर्यात वावरणारा इन्स्पेक्टर शेखर आठवा. नेहमी देव नायिकेच्या भोवती रुंजी घालणार, मग मधे काहीतरी गडबड होणार आणि शेवटी नायिका त्याची होणार अशा ठराविक पठडीबाहेरचा 'बंबई का बाबू' आठवा. त्यात नायिकेच्या भाऊ असल्याची बतावणी केल्यानंतर तो दैवयोगाने तिच्या प्रेमात पडतो. ही भावना तिच्यापर्यंत पोहोचवताना झालेली तगमग देव आनंदने ज्या पद्धतीने व्यक्त केली आहे तिला तोड नाही. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी नायिका पालखीत बसून वरातीबरोबर सासरी जायला निघते तेव्हा त्याच्या चेहर्यावरची जीवघेणी भावनिक ओढाताण बघवत नाही आणि आपल्याला ओरडून सांगावसं वाटतं......अरे हा देव आहे देव आनंद. सिनेमाच्या शेवटी हिरोईन यालाच मिळायला हवी!!! 'तेरे मेरे सपने' मधला डॉक्टर आनंदच्या भूमिकेतला देव डॉक्टर जगन्नाथ कोठारीला त्याच्या दारूबाजपणाबद्दल जाब विचारताना तिरकसपणे म्हणतो "मेरे लिये अभी ये जान लेना बहुत जरूरी है...ठर्रे की ये बदबूदार बोतल देखता हूं तो एम.आर.सी.ओ.जी. लंडन, समझमें नहीं आता". डॉक्टर होताना जे आदर्श समोर ठेऊन वैद्यकी स्वीकारली आणि ते आदर्श पुढे वास्तविक जीवनात पाळणे कठीण होऊन बसल्यावर होणारी मनस्थिती देवने अत्यंत परिणामकारकरित्या दाखवली आहे (एम.आर.सी.ओ.जी. मधलं प्रत्येक अक्षर एकदा देवच्या शैलीत म्हणून बघा). 'दिन ढल जाए' या गाण्यातील 'दिल के मेरे पास हो इतनी, फिर भी हो कितनी दूर' या ओळी पडद्यावर म्हणणार्या देवच्या विदीर्ण चेहर्याकडे बघवत नाही. आणि 'पल भर ले लिये कोई हमें प्यार कर ले' मधे 'माना तू सारे हसीनों मे हसीं है, अपनी भी सूरत बुरी तो नहीं हैं' असं नखरा करणार्या ड्रीमगर्ल हेमा मालिनीला ठणकवून सांगण्याचा अधिकार फक्त देवलाच आहे हे पटूनच जातं.
देव चॉकलेट हीरो, रोमँटिक नायक म्हणून लोकप्रिय झाला. पण देवचा प्रणय हा मुळातच हळूवार, खट्याळपणा करत नायिकेला हलकेच छेडत तिच्या अवतीभवती पिंगा घालत तिची आर्जवं करणारा होता. तो कधीच धुसमुसळा झाला नाही. अगदी जोरदार पावसातही. पाऊस आठवला की पहिलेछूट जी चार-पाच गाणी आठवतात त्यांपैकी दोन देव आनंदवर चित्रित झालेली आहेत यातच सारं आलं. प्रेयसीला मिठ्या मारत अंगाशी झोंबाझोंबी नाही, की पावसात उगाच रस्त्यावर लोळणं नाही. नायिकेचा पदर खेचणं नाही की उगाच तिला चापट्या मारणं नाही. हातात छडी किंवा काठी असली तरी तिचा उपयोग प्रेयसीला 'घे हवी ती शिक्षा मला दे, पण माझी हो' हे सांगण्यापुरता. हळुवारपणा हा देव आनंदच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीचा पाया होता. "रिमझिम के तराने लेके आयी बरसात" या गाण्यात दोघं एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवत एकच छत्रीत जात असले तरी एकमेकांमधे योग्य अंतर राखून आहेत. या गाण्यात वहिदा आणि देवचे डोळे बोलतात. आठवलेल्या प्रत्येक क्षणाबरोबर दोघांच्या डोळ्यांत एक निराळीच चमक दिसते. अशा प्रणयाराधनात देवचा अभिनय फुलायचा. पावसातलं आणखी एक गाणं आठवतं ते म्हणजे 'एक बुत बनाउंगा तेरा और पूजा करुंगा'. या गाण्यात पावसाचा प्रभाव ठायी ठायी जाणवत राहतो. पण अजिबात न भिजलेल्या नायकाचा खट्याळपणा आणि नायिकेचं मधाळ लाजणं या दोन गोष्टी मिळून आपल्याला जो आनंद देतात त्याला उपमा नाही. फळ्याच्या मागे उभी असलेली बासुंदीसारखी गोड साधना, आणि पुढून हळूच डोकावत 'कसं ओळखलं' हे भाव चेहर्यावर आणत तिला चिडवणार्या देवचा या गाण्यातला अभिनय म्हणजे संयत रोमँटिक अदाकारीचं झकास उदाहरण आहे. याच गाण्यात आता रोज भेटणं होईल या आनंदात "शाम सवेरे हर मौसम मे होंगी मुलाकातें" म्हणताना देवच्या चेहर्यावरचे भाव इतके गोड आहेत की क्षणभर गाण्यातल्या साधनाचा विसर पडतो. अभी ना जाओ छोडकर, दिल का भंवर करे पुकार, खोया खोया चांद, अच्छा जी मैं हारी, आजा पंच्छी अकेला है, दिल पुकारे आ रे - अशी अगणित गाणी देवच्या नितांतसुंदर रोमँटिक अभिनयाची साक्षीदार आहेत.
राज कपूर, दिलीप कुमार, आणि देव आनंद या त्रयींपैकी पहिले दोघे शहरी आणि ग्रामीण भूमिकांमधे सहज वावरू शकायचे. देव आनंद मात्र बहुतेक काळ तेरे घर के सामने मधला आर्किटेक्ट, सी.आय.डी. मधला इन्स्पेक्टर, ज्वेल थीफ मधला रत्नपारखी अशा चकाचक शहरी भूमिकांमधेच दिसला. अगदी बंबई का बाबू मधली त्याची भूमिकादेखील एका शहरी मवाल्याचीच होती. देवच्या अशा शहरी प्रतीमेमुळेच कदाचित त्याला समीक्षकांनी फार गांभीर्याने घेतलं नसावं. मात्र देव अभिनयाच्या क्षेत्रात जनरल प्रॅक्टिशनर नव्हता, तर स्पेशालिस्ट होता. पण देव हा निव्वळ सुपरस्टार नव्हता, तर ट्रेंड सेटर होता. याची दोन प्रमुख कारणं आहेत. अशोक कुमारच्या १९४३ साली आलेल्या 'किस्मत' पर्यंत अगदी सरळमार्गी, बिचारा, निर्व्यसनी, आणि सभ्य नायक बघायची सवय असलेल्या तत्कालीन समाजाला चक्क ओठांत सिगारेट घेऊन वावरणारा पाकीटमार हीरो बघून एक प्रकारचा मोठा संस्कृतिक धक्काच बसला होता. पण हा फक्त धक्का होता. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी खलनायकाच्याही वरताण दुष्कृत्ये आणि क्रूरकर्मे करणारे नायक आपण खूप नंतर स्वीकारले. साधनशुचितेला फारसे महत्व न देता इप्सित 'साध्य' करण्याकडे अधिक कल असलेले अॅन्टी हीरों आपल्या अंगवळणी पडण्याच्या आधी आपली खरी 'मानसिक तयारी' करुन घेतली ती असे कमालीच्या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचे, प्रवाहपतीत, नैतिक अध:पतन झालेले किंवा होणे शक्य असणारे नायक रंगवणार्या देव आनंदने. क्षयरोगग्रस्त बहिणीच्या उपचारांसाठी नाईलाजाने जुगारी बनलेला आणि हा प्रेमात पडल्यावर पुन्हा त्यातून बाहेर पडण्याचा निश्चय केलेला 'बाजी' मधला मदन ही देवच्या अशा प्रकारच्या भूमिकांची सुरवात होती. 'काला बाजार' मधला बस कंडक्टरच्या नोकरीवरुन काढलेला रघुवीर हा आजारी आई आणि दोन भावंडांचं पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे सिनेमा तिकीटांच्या काळा बाजार करण्याकडे वळतो आणि प्रेमात पडल्यावर बदलतो. हाऊस नंबर ४४ मधला गुंड अशोक हा देखील प्रेयसीमुळे गुन्हेगारीचा मार्ग सोडतो. टेक्सी ड्रायव्हर मधला बाई (सिल्व्ही - शीला रामाणी) आणि बाटलीच्या नादाला लागलेला मंगल दरोड्यासाठी त्याची टॅक्सी वापरणार्या गुन्हेगारांना सामील होतो. मात्र प्रेमात पडल्यावर अर्थातच तो ही बदलतो आणि सन्मार्गाला लागण्याचा प्रयत्न करतो. जाल मधल्या टोनीच्या संपूर्ण व्यक्तिरेखेला तर चक्क संपूर्णपणे खलप्रवृत्तीच्या छटा आहेत. अगदी गाईडमधल्या राजूचा वाल्मिकी होण्यापर्यंतचा प्रवास हा सुद्धा वाल्या असण्यापासूनच सुरू होतो. हे झालं एक कारण.
दुसरं म्हणजे नवकेतनच्या स्थापनेपासून देव आनंदने पगारदार नटांची परंपरा मोडीत काढून प्रत्येक चित्रपटाचा स्वतंत्रपणे मोबदला आकारायला सुरवात केली. स्वतःच्या नवकेतनचे चित्रपट करत असतानाच बाहेरच्या चित्रपटात भूमिका करुन त्यासाठी ठराविक पैसे घ्यायला सुरवात केली. मी अमुक इतके पैसे घेईन. मान्य असेल तरच चित्रपट साईन करेन अशी स्पष्ट भूमिका देव घेत असे. मात्र एकदा करार केला की क्षुल्लक गोष्टींसाठी निर्माता-दिग्दर्शकाला वेठीला धरण्याचा अव्यावसायिकपणा तो कधीही करत नसे. चित्रिकरणाबाबत स्वतःची मतं असली तरी सूचना करण्यापलीकडे दिग्दर्शकाच्या कामात हस्तक्षेप तो करत नसे. त्याच्या काम करण्याच्या शिस्तीमुळे चित्रपटही लवकर किंवा वेळेवर पूर्ण होई आणि सगळेच खूष असत. गाईडच्या नेत्रदीपक यशाचं श्रेय दिग्दर्शक विजय आनंदला दिलं जातं. मात्र तितकंच श्रेय देवच्या नियोजन आणि व्यवस्थापनकौशल्याला आहे. देवने गाईड काढताना रंगभूषाकार वसंत देसाईंना दोन लाख रुपयांचं साहित्य निव्वळ रंगीत चित्रिकरणासाठी रंगभूषा करायचा सराव म्हणून आणून दिलं होतं. गाईडच्या चित्रिकरणाच्या वेळी उदयपुरच्या महाराज भगवतसिंहांनी संपूर्ण युनिटला राजवाडा रहायला देण्यापासून हरे रामा हरे कृष्णाच्या चित्रिकरणासाठी नेपाळचे राजे महेन्द्र यांनी दिलेलं सहकार्य या सर्व प्रसंगांतून देवच्या लोकप्रियतेची प्रचिती येत राहिली.
नवकेतनच्या चित्रपटासाठी जुळवाजुळव सुरु करण्याआधीच प्रत्येक कलाकाराला दिली जाणारी पटकथेची छापील प्रत, चित्रिकरण सुरु असताना कलाकार, तंत्रज्ञ, आणि इतर कामगार यांच्या जेवणाखाणाची आणि औषधपाण्याची घेतली जाणारी काळजी, देवसोबत काम करताना असणारी एक सुरक्षिततेची भावना, फक्त चित्रिकरणाच्याच वेळी नव्हे तर इतरही वेळी असणारा देवचा वेळेच्या बाबतीतला काटेकोरपणा या सगळ्या गोष्टींमुळे देवच्या सिनेमात काम करायला कुठलाही कलाकार तयार होत असे, अगदी त्याचे नंतरचे सातत्याने चित्रपट आपटत असतानाही. ह्या गोष्टी नवकेतनच्या स्थायी भाव बनल्या होत्या. देवची प्रतिमा ही रोमँटिक हीरोची असून देखील त्याच्या झाडून सगळ्या नायिका त्याचं 'अत्यंत सभ्य माणूस' असं वर्णन करतात. इतकंच नव्हे तर त्याच्याबद्दल जिव्ह्याळ्याने आणि मनमोकळेपणाने बोलतात हे विशेष. व्यावसायिकता ठासून भरलेल्या आणि पैशासाठी रोकठोक असणार्या देवने गरजेच्या वेळी सढळ हस्ताने गरजूंना मदतही केली. आपल्या चित्रपटांचे खेळ चॅरिटी शो म्हणून दाखवले - अगदी हम दोनोच्या प्रिमिअरचं उत्पन्नही त्याने अशाच एका विधायक कामासाठी दिलं. काहींनी त्याने केलेल्या मदतीची जाण ठवली, तर काहींनी कृतघ्नपणा दाखवला. पण कुणाचा राग धरणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. देवने अनेक नवोदित नायिकांना जसं त्याने नाव मिळवून दिलं तसंच विस्मरणात गेलेल्या नटांना पुन्हा पडद्यावर आणून नवसंजीवनी प्राप्त करुन दिली. अनेक वर्ष अडगळीत पडलेल्या प्रेमनाथकडे 'जॉनी मेरा नाम' नंतर पुन्हा खलनायकी भूमिकांची रीघ लागली. मधुबाला चित्रपटात काम करु लागली तेव्हा तिला इंग्रजीचा गंध नव्हता. देवने तिला मार्गदर्शन केलं. तो उत्कृष्ठ मास्तर आहे असं ती नेहमी म्हणायची. त्याचं इंग्लिश, हिंदी, आणि उर्दू लाजवाब होतं. देवच्या या भाषाप्रभुत्वामुळे त्याची मुलाखत घेणं हे पत्रकारांसाठी समृद्ध अनुभव असायचा. दुसरं म्हणजे नवकेतनच्या स्थापनेपासून देव आनंदने पगारदार नटांची परंपरा मोडीत काढून प्रत्येक चित्रपटाचा स्वतंत्रपणे मोबदला आकारायला सुरवात केली. स्वतःच्या नवकेतनचे चित्रपट करत असतानाच बाहेरच्या चित्रपटात भूमिका करुन त्यासाठी ठराविक पैसे घ्यायला सुरवात केली. मी अमुक इतके पैसे घेईन. मान्य असेल तरच चित्रपट साईन करेन अशी स्पष्ट भूमिका देव घेत असे. मात्र एकदा करार केला की क्षुल्लक गोष्टींसाठी निर्माता-दिग्दर्शकाला वेठीला धरण्याचा अव्यावसायिकपणा तो कधीही करत नसे. चित्रिकरणाबाबत स्वतःची मतं असली तरी सूचना करण्यापलीकडे दिग्दर्शकाच्या कामात हस्तक्षेप तो करत नसे. त्याच्या काम करण्याच्या शिस्तीमुळे चित्रपटही लवकर किंवा वेळेवर पूर्ण होई आणि सगळेच खूष असत. गाईडच्या नेत्रदीपक यशाचं श्रेय दिग्दर्शक विजय आनंदला दिलं जातं. मात्र तितकंच श्रेय देवच्या नियोजन आणि व्यवस्थापनकौशल्याला आहे. देवने गाईड काढताना रंगभूषाकार वसंत देसाईंना दोन लाख रुपयांचं साहित्य निव्वळ रंगीत चित्रिकरणासाठी रंगभूषा करायचा सराव म्हणून आणून दिलं होतं. गाईडच्या चित्रिकरणाच्या वेळी उदयपुरच्या महाराज भगवतसिंहांनी संपूर्ण युनिटला राजवाडा रहायला देण्यापासून हरे रामा हरे कृष्णाच्या चित्रिकरणासाठी नेपाळचे राजे महेन्द्र यांनी दिलेलं सहकार्य या सर्व प्रसंगांतून देवच्या लोकप्रियतेची प्रचिती येत राहिली.
देव नक्की कुठे चुकत गेला, याचा विचार करताना बोट ठेवण्यासारख्या अनेक जागा आहेत. देवच्या डोक्यात दिग्दर्शनाचा किडा फार पूर्वी शिरला होता. प्रेम पुजारी आपटल्यावर त्याला आणखी एक प्रयत्न करावासा वाटला असेल हे मान्य. पण हरे रामा हरे कृष्णाच्या जमलेल्या तूफान यशस्वी भट्टीचं यश हे देव निव्वळ त्याच्या दिग्दर्शनाचं समजला आणि मग हा किडा जाईचना. 'गोल्डी डायरेक्ट करेगा तो फिर मैं क्या करुंगा' हे त्यानं एका प्रश्नाला दिलेलं उत्तर त्याच्या मनातल्या या गोड गैरसमजाची साक्ष आहे. हरे रामा हरे कृष्णा नंतर देस परदेसचा छोटासा अपवाद वगळता त्याचे इतर चित्रपट आपटतच गेले. मनोरंजनाच्या दृष्टीने चित्रपटात अनेक गोष्टी मिसळा, पण कथेचं मूळ हे आपलं वाटायला हवं. देवच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या टप्प्यातले सिनेमे हे वास्तवापासून, या मातीपासून खूपच दूर जाणारे होते. देव चित्रपटासाठी अगदी ताजे विषय निवडत असे. भान हरपावं असं निसर्गसौंदर्य, आजूबाजूला घडणार्या घटना, सामाजिक संदर्भ असलेले महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, गुन्हेगारी, बेकारी असे असंख्य वैविध्यपूर्ण विषय देवकडे असत. मात्र अशाच अतीआधुनिक, अतीताज्या विषयांमुळे देवचे चित्रपट मागे पडत गेले. कारण एखादी घटना बारा वाजता घडली तर तीच घटना साडेबारा व्हायच्या आत झाडून सगळीकडे झळकते. मग अशा काळात ताज्या विषयांवर कुणी प्रचारकी डॉक्युमेंटरी वाटावा अशा दर्जाचा चित्रपट काढला, तर तो कोण बघेल? एखाद दुसरा चित्रपट सोडला, तर देव हाच प्रमुख भूमिकेत असायचा. तोच चित्रपटाचा नायक असायचा. मग आधी फक्त बहीण आणि बायको असलेला नायक, मग बायको-मुलं असलेला नायक, मग आणखी वय झाल्यावर सिनेमात एक तरुण नट आणि त्याच्या जोडीला एक हिरवीण असली तरी नायक मात्र देवच!! भारतीय प्रेक्षक आजही वयस्कर नायक पडद्यावर बघू शकत नाहीत. यालाही अपवाद आहेत, पण तशी परिस्थिती आजही सर्वसामान्य झालेली नाही. मग सबकुछ देव आनंद असलेले सिनेमे प्रेक्षक स्वीकारतील ही शक्यता नव्हतीच.
अफलातून कल्पनांचा त्याच्याकडे तुटवडा नव्हता. पण या सगळ्या गोष्टींचं चित्रपटात रूपांतर करताना त्यांची अवस्था धरण फुटून इतस्ततः वाहणार्या पाण्यासारखी व्हायची. सिनेमात चांगल्या बाजू असल्याच तर त्या ह्या महापूरात सहजी वाहून जायच्या. विषय काहीही असो, चित्रपटातल्या व्यक्तिरेखा सशक्त असाव्या लागतात. त्यांना स्वतःचे स्वभाव असावे लागतात. त्या स्वभावाचे विविध कंगोरे दृश्यांतून, संवादांतून दिसावे लागतात. इथेच कुठेतरी देवचा जबरदस्त घोळ व्हायचा. देवच्या चित्रपटातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा या दिलेल्या संवादांची पोपटपंची करण्यार्या असायच्या. त्यांचे संवाद हे संवाद न वाटता शाळेतल्या सांस्कृतिक कार्यकमात म्हणायला घोटून घेतलेलं भाषण वाटावं अशा प्रकारचे असायचे. त्यात भरीस भर म्हणून देवच्या चित्रपटात पात्रांनी संवाद एकसुरीपणे आणि कानात पुटपुटल्यागत म्हणायच्या 'हरे रामा हरे कृष्णा' पासून सुरू झालेल्या प्रकाराने नंतर नंतर कळस गाठला.
देव आनंदवर पाश्चात्य विचारांचा खूप प्रभाव होता. त्याच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या टप्प्यांत काढलेल्या चित्रपटात त्याचा अतिरेक झाला. भारतीय प्रेक्षकांना अभिप्रेत असलेलं नाट्य, कौटुंबिक वातावरण, भावनिक कल्लोळ, थोडीशी रडारड ह्या गोष्टी देवच्या चित्रपटातून अदृश्य झाल्या. पाश्चात्य वातावरणातलं चित्रिकरण, त्याच वळणाची कोरडी कथानके, पाश्चात्य उच्चारांनी हिंदी बोलणारे मठ्ठ नट्-नट्या, नको तिथे बलात्कार आणि अतीप्रसंगांची दृश्ये हे प्रकार सिनेरसिकांना आपले वाटलेच नाहीत. प्रेक्षक चित्रपटाचा, त्यातल्या एखाद्या दृश्यांचा आस्वाद घेण्याऐवजी कथानकाचा प्रचंड वेगामुळे सुरवातीला वाहून गेले आणि नंतर त्याचे सिनेमे बघत नाहीसे झाले. प्रेक्षक हा घटक बाजूला झाला आणि उरले फक्त चाहते. नवकेतनच्या चित्रपटांतली गाणी म्हणजे अर्थपूर्ण शब्दांना अवीट गोडीच्या सुरांनी कसलेल्या गायकांच्या माध्यमातून चढवलेला कळस होता. त्या संगीतात असणारा गोडवा कुठेतरी हरवला, गाण्यांतल्या शब्दसामर्थ्याचा र्हास झाला, त्यांचा साहित्यिक दर्जा हरवला, आणि उरला तो फक्त धागडधिंगा आणि वाद्यांचा गदारोळ. अजूनही बहुतेकांना त्याचे सत्तर सालानंतरचे बहुतेक सिनेमे आठवतच नाहीत, मग त्यातली निरस गाणी तरी कशी आठवतील? देव गेल्यावर मित्रमंडळीत सहज झालेल्या गप्पांमधे कुणीतरी 'सच्चे का बोलबाला' चित्रपटाचं नाव घेतलं. देव ऐन भरात असताना निघालेले अनेक सिनेमे एकेकदाच बघितलेले असले तरी त्यातल्या अनेक गोष्टी आजही स्पष्टपणे आठवतात. पण इथे स्मरणशक्तीला कितीही ताण दिला तरी आवर्जून व्हिडिओ कॅसेट आणून बघितलेल्या त्या सिनेमात देव