Showing posts with label चित्रपट हिंदी. Show all posts
Showing posts with label चित्रपट हिंदी. Show all posts

Sunday, October 14, 2012

माझा आवाज: किशोर कुमार




महंमद रफी हा गानस्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्नर, इत्यादी. कदाचित हिमेश रेशमियाला असुरवंशातील उपमा शोभेल. पण किशोर कुमार हा माझा आवाज आहे. बस्स. बाकी काहीही वर्णन नाही. तो माझा आवाज आहे. कंपनीतल्या सी.ई.ओ. पासून चपराशापर्यंत आणि देशाच्या राष्ट्रपतींपासून महापालिकेच्या झाडूवाल्यापर्यंत कुणालाही येताजाता गुणगुणता येतील अशी गाणी गाणारा तो माझा किशोर आहे. सामान्य माणसाचा आवाज. ते उर्दूत दर्द वगैरे का काय म्हणतात ते त्याच्या गळ्यातून प्रत्येक शब्दानिशी टपकायचं. शास्त्रीय गाणं अजिबात शिकला नसूनही अनेक दशकं गात राहणं यातच किशोरचं मोठेपण आहे. "मी गायचो ते किशोर कुमार आरामात गाऊ शकायचा. पण तो गायचा ते मला जमायचं नाही." - हे साक्षात मन्ना डे यांचे शब्द आहेत.

त्याच्या व्यवहारीपणाला इंडस्ट्रीतल्या कोत्या मनाच्या लोकांनी कंजूषपणाचं लेबल लावलं. त्याच्या उत्स्फूर्तपणाला कायम आचरटपणाचं लेबल लावलं गेलं. प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल असतंच. त्याने ते लपवून ठेवलं नाही इतकंच. किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

इतर गायकांनी गायलेल्या दु:खी गाण्यांत आणि किशोरने गायलेल्या दर्दभर्‍या म्हणजेच सॅड साँग्स यांची तूलना केल्यास किशोरची गाणी आपल्याला सरस वाटतील ते किशोरच्या गाण्यांचं एक वैशिष्ठय आहे त्यामुळे. 'मेरा जीवन कोरा कागज' यासारख्या अगदी थोड्या गाण्यांचा अपवाद वगळला तर त्याच्या दु:खी गाण्यांतही हताश भाव कधीही दिसला नाही. नेहमी सकारात्मक वृत्ती आणि आशावाद दिसला. पुढे जाण्याचा मार्ग सुचवलेला असे. समस्येला काहीतरी समाधान सुचवलेले असे. 'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे. हाच आशावाद त्याला माझा आवाज बनवण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण आज माजलेल्या बजबजपुरीत माझा हरवलेला आवाज मला किशोरच्या आवाजात सापडतो.

म्हणूनच किशोर नामक सोबती हा आपल्यात नाही असं म्हणवत नाही. तो आहे. आणि माझा आवाज बनून राहिला आहे.














Tuesday, October 2, 2012

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥

सत्यासारखा दुसरा धर्म नव्हे. सत्यापलीकडे काहीच नाही. आणि असत्याहून अधिक तीव्र काहीच नाही.


एकदा अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातल्या एका नाट्यगृहात चार्ली चॅप्लीन नक्कल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुणालाही संशय न येऊ देता खुद्द चार्ली चॅप्लीन एक सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र या खोट्याच्या दुनियेची गंमत बघा. स्वतः चॅप्लीन या स्पर्धेत विजयी होऊ शकला नाही. निकालांचा उल्लेख मात्र संदिग्ध आहे. काही ठिकाणी तो तिसरा आल्याचा उल्लेख आहे तर काही ठिकणी असं म्हटलंय की तो अंतीम फेरीत देखील पोहोचू शकला नाही. मात्र स्वतः चॅप्लीन म्हणायचा की त्याला चॅप्लीनला परीक्षकांची आणि स्पर्धकांची इतकी दया आली की ती प्रसिद्ध चॅप्लीनची चाल नक्की कशी असावी याचे धडे द्यायची त्याला त्या क्षणी हुक्की आली. पण आयोजक आणि स्पर्धकांच्या उत्साहाला टाचणी लावण्याची त्याला इच्छा नसावी. म्हणून ती सुरसुरी त्याने महत्प्रयासाने आवरली. त्या स्पर्धेत चॅप्लीनच्या प्रवेशिकेचा नक्की निकाल काय लागला तो परमेश्वरालाच ठाऊक. मात्र चार्ली चॅप्लीन त्याचीच नक्कल करायच्या स्पर्धेत विजयी ठरू शकला नाही हे मात्र खरं. वरच्या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे असत्याहून तीव्र काहीच असू शकत नाही. अरे, ही तर खोट्याची दुनिया!

आता अमेरिकेतून जरा भारतात येऊया. मनोजकुमार उर्फ भारतकुमारचा भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या बलिदानावर आधारित चित्रपट शहीद हा १९६५ साली भारतातल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो पर्यंत आलेल्या सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांना मागे टाकत न भूतो न भविष्यति असं घवघवीत यश मिळवलं.



प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: Newspapers are unable, seemingly to discriminate between a bicycle accident and the collapse of अ civilization. वर्तमानपत्रांना एक सायकल अपघात आणि एखाद्या संस्कृतीचं लयाला जाणं, नष्ट होणं यात फरक करता येत नाही. शहीद या चित्रपटाबद्दल वाचलं तर वर्तमानपत्रांना निव्वळ हेच नव्हे तर खर्‍याखोट्यामधेही फरक करता येत नव्हता, अजूनही करता येत नाही हे स्पष्ट होतं. शहीद प्रदर्शित झाला आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून भरभरून लिहून येऊ लागलं. एका समि़क्षकाने चित्रपटाबद्दल बरंच काही स्तुतीपर लिहून थोडीशी टीका करताना पुढे लिहीलं होतं: चित्रपटातल्या तुरुंगाची दृश्य मात्र तितकीशी खरी वाटत नाहीत.

हे वाचून मनोजकुमारने कपाळाला हात लावला. त्याला यावर हसावं का रडावं ते कळेना. मनोज कुमारने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट उपसले होते. चित्रपटाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भगतसिंगच्या आईशी चर्चा करण्यापासून त्याला अगदी ओझरतं भेटलेल्या एखाद्या माणसाशीही बोलणं त्याने वर्ज्य केलं नव्हतं. चित्रपटातली दॄश्य परिणामकारक व्हावीत म्हणून चित्रिकरणाची ठिकाणं अत्यंत काळजीपूर्वक निवडली होती. तुरुंगातलं चित्रिकरण अधिकाधिक वास्तव वाटावं म्हणून मनोजकुमारने ते लुधियाना तुरुंगात केलं होतं. चित्रपटातले प्रमुख कलाकार वगळता तुरुंगातल्या इतर कैद्यांच्या भूमिकांमधे 'एक्स्ट्रा' कलाकार नव्हे तर त्या तुरुंगातले खरेखुरे कैदी वापरण्यात आले होते. तुरुंग खरं, कैदीही खरे. मात्र ह्या खर्‍या गोष्टी त्या समीक्षकाला 'तितक्याशा खर्‍या' वाटल्या नाहीत. कदाचित खरा तुरुंग आणि खरे कैदी त्याने कधी बघितलेच नसावेत. खरं काय ते आयुष्यभर कधीही न बघता, न तपासता जे खरं आहे हे तितकंसं खरं वाटत नाही असं त्याने ठोकून दिलं होतं. आहे की नाही गंमत?

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

Thursday, October 27, 2011

चैतन्यमूर्ती शम्मी कपूर

एका रविवारची सुस्त सकाळ. अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली. घड्याळ बघितलं तर सात वाजलेले. "रंगोली लागलं असणार" असं म्हणून रिमोटकडे हात गेला. आणि पहिल्याच गाण्याने रविवारी सकाळी सात वाजता जो काही आळस अंगात भरलेला असतो तो पार कुठच्याकुठे पळाला. मी ताडकन उठून उभा राहिलो. "ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा...." म्हणत काश्मीरच्या दाल लेकमधे शिकार्‍यात शम्मी कपूर शर्मिला टागोरला पटवण्यासाठी बेभान होऊन नाचत होता. आमच्या पिढीतल्या कित्येकांना याच गाण्याने शम्मीचा परिचय करून दिला होता. काही माणसात अजब जादू असते. आपल्या नुसत्या असण्याने ते आसपासच्या सगळ्या मनुष्यमात्रात चैतन्य आणतात. शम्मी कपूर त्यातलाच. घरी कुणी नव्हतं हे माझ्या पथ्यावरच पडलं. सगळ्या खिडक्यांचे पडदे लावून शम्मीच्या नाचावर घरातल्या घरात त्याच्या उत्स्फूर्तपणा आणि बेभानपणाला गाठण्याची पराकाष्ठा करत नाचायला सुरुवात केली.

शेवटी एकदाचा तो बोटीतून धप्पकन पाण्यात पडला, गाणं संपलं, जाहिरात लागली आणि मी भानावर आलो. अचानक एक पोकळी निर्माण झाल्याचं वाटू लागलं. पण तो रविवार त्या काही मिनिटातच साजरा झाला होता.



शमशेरराज कपूर असं भारदस्त नाव घेऊन मुंबईत जन्मलेल्या शम्मी कपूरच्या बालपणीची सुरुवातीची वर्ष कलकत्त्यात गेली. वडील पृथ्वीराज कपूर कलकत्त्याच्या न्यू थिएटर्समध्ये अभिनेता म्हणून काम करायचे. सुरुवातीची काही वर्ष तिथे शिक्षण घेतल्यावर मुंबईत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमधे तो मात्र फार काळ रमला नाही. लवकरच त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि वडिलांच्याच पृथ्वी थिएटरमध्ये उमेदवारीला सुरुवात केली.

काही काळ तिथे घालवल्यावर १९५३ साली त्याने जीवन ज्योत या चित्रपटाद्वारे नायक म्हणून पडद्यावर पदार्पण केलं. मनमोहक निळे डोळे, अत्यंत देखणा चेहरा, तलवारकट मिशा आणि एकंदरीत रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या शम्मीला सुरूवातीला मात्र यशाने सतत हुलकावणी दिली. त्या काळी प्रस्थापित असलेल्या स्टार्स मधुबाला, नलिनी जयवंत, नूतन यांच्यासारख्या अभिनेत्रींबरोबर अनेक चित्रपट करूनही शम्मीच्या पदरात सतत अपयशाचं दान पडत गेलं. मोठा भाऊ राज कपूरच्या जवळ जाणारं व्यक्तिमत्त्व ही त्याच्या विरोधात जाणारी एक महत्त्वाची गोष्ट. त्या मिशांमुळे म्हणा किंवा सारख्या केशरचनेमुळे म्हणा, तो तसा दिसायचाही. त्याच्यावर राजची नक्कल केल्याचा सुरूवातीला आरोप केला जायचा.

   
यशाच्या प्रतिक्षेत असलेल्या शम्मीच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक महत्त्वाची घटना घडली. त्या काळात यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या अत्यंत गोड चेहर्‍याच्या गीता बाली बरोबर रंगीन रातें (१९५६) हा चित्रपट करत असताना साहेब तिच्या प्रेमात पडले. "माझ्याशी लग्न कर!" म्हणून अनेक आर्जवं केल्यानंतर अचानक एके दिवशी गीताने "लग्न करते तुझ्याशी, पण आजच्या आज करत असलास तर!" अशी विचित्र अट घातली. मग काय, एका पायावर तयार झालेल्या शम्मीने लगेच तयारी दाखवली आणि दोघे मुंबईतील बाणगंगा परिसरातल्या एका देवळात विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे तेव्हा शम्मी हा चित्रपटसृष्टीत कुणीही नव्हता आणि गीता लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आधीच प्रस्थापित झाली होती. शम्मीच्या आयुष्यात एका भक्कम आधाराने आता प्रवेश केला होता.

शम्मीने त्याच्या तलवारकट मिशांना सोडचिठ्ठी दिल्यावर त्याचं नशीब फळफळलं. मग आला तो फिल्मिस्तान स्टुडिओजच्या नासिर हुसैनने काढलेला तुमसा नहीं देखा (१९५७). तोपर्यंत अपयशाला कंटाळलेल्या आणि हा चित्रपट न चालल्यास चित्रपटसृष्टीलाच रामराम ठोकण्याच्या निर्णयाप्रत आलेल्या शम्मी कपूरला या सिनेमाने चांगलाच हात दिला. तिकीटबारीवर घवघवीत यश तर या चित्रपटाने मिळवलंच, शिवाय शम्मीला रातोरात तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणून स्थानही मिळवून दिलं. चॉकलेटी अभिनय करणारा देव आनंद, तुपकट चेहर्‍याचा राज कपूर आणि 'करुण' कुमार दिलीप कुमार यांनी आपल्याभोवती बांधलेल्या चाहत्यांच्या आवडीनिवडीच्या अभेद्य भासणार्‍या कवचाला शम्मीने अखेर भेदलं होतं. मूर्तीमंत चैतन्य असलेल्या शम्मीच्या रूपात तरुण वर्गाला या सिनेमाने एक नवा 'युथ आयकॉन' मिळवून दिला. एका आख्ख्या पिढीला वेड लावलं, बेभान केलं.

तुमसा नहीं देखा नंतर दोन वर्षांनी आलेल्या दिल देके देखो (१९५९) या चित्रपटामुळे उंच, गोर्‍यागोमट्या, खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या शम्मी कपूरचं धडाकेबाज नायक म्हणून तरुणांच्या हृदयातलं स्थान आणखी पक्कं झालं. हे दोन चित्रपट केवळ शम्मीसाठीच नव्हे तर अनुक्रमे अमिता व आशा पारेख या दोन नवोदित अभिनेत्रींसाठीही परीसस्पर्श ठरले. दोघी पुढे नामवंत अभिनेत्री म्हणून नावाजल्या गेल्या. यानंतर नवोदित अभिनेत्रींना शम्मी कपूरबरोबर संधी देण्याची निर्मात्यांमध्ये स्पर्धाच लागली.

उपरोल्लेखित दोन चित्रपटांनी शम्मी कपूरच्या एक धडाकेबाज आणि बिंधास नायक म्हणून प्रस्थापित केलेल्या प्रतिमेवर त्यानंतर आलेल्या जंगलीने (१९६१) शिक्कामोर्तब केलं. 'जंगली' तून सायरा बानोने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटातलं (अर्थातच रफीच्या आवाजातलं) याssssssहू हे गाणं त्या वेळीच काय तर आजही तितकंच लोकप्रिय आहे.

यानंतर शम्मीने जंगली, दिल तेरा दीवाना, प्रोफेसर, चायना टाऊन, ब्लफ मास्टर, राजकुमार, कश्मीर की कली, आणि जानवर अशा यशस्वी चित्रपटांची रांगच लावली. शम्मीच्या चित्रपटांचं एक अविभाज्य अंग (म्हणजे काश्मीर हे भारताचं अविभाज्य वगैरे अंग आहे त्यापेक्षा जास्तच अविभाज्य) म्हणजे रफीच्या स्वर्गीय आवाजात गायलेली कर्णमधुर गाणी. तुमसा नहीं देखा मधलं "यूं तो हमने लाख हसीं देखें है, तुमसा नहीं देखा" आणि दिल देके देखो मधलं "दिल देके देखो, दिल देके देखो, दिल देके देखो जी, दिल लेने वालों दिल देना सीखो जी" या चित्रपटांपासून सुरू झाला तो रफी आणि शम्मीचा चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय असा सुरेल आणि देखणा प्रवास. मुळातच संगीताची उत्कृष्ट जाण असलेल्या शम्मी कपूरने प्रत्येक गाण्यातली प्रत्येक फ्रेम आपल्या चैतन्यपूर्ण देहबोलीने आणि नितांतसुंदर अभिनयाने पडद्यावर प्रेक्षणीय केली, तर स्वर्गीय गळ्याच्या रफीने प्रत्येक गाणं श्रवणीय करून सोडलं. शम्मीच्या अभिनयाला साजेसा आवाज देण्याकडे रफीचा नेहमीच कटाक्ष असे. शम्मी स्वतःच्या प्रत्येक गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी जातीने हजर असे. शम्मी कपूरने अनेकदा "रफी साहेबांशिवाय मी कुणीच नव्हतो!" हे जाहीररीत्या कबूल केलं आहे. जेव्हा रफीचं निधन झालं तेव्हा ती बातमी त्यांना "शम्मीजी, तुमचा आवाज गेला!" अशी सांगण्यात आली.

अर्थात यामुळे धम्माल आणि धागडधिंगा असलेला नाच एवढीच शम्मीच्या गाण्यांची ओळख आहे असा समज मात्र कुणी करून घेऊ नये. सुंदर मुद्राभिनयातही तितकंच प्राविण्य मिळवलेल्या शम्मीने हळुवार रोमँटिक गाण्यांनाही तितकंच प्रेक्षणीय केलं. तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ, एहसान तेरा होगा मुझपर, ए गुलबदन, है दुनिया उसीकी जमाना उसीका, हम और तुम और ये समां, तुमने किसी की जान को जाते हुए देखा है, इशारों इशारों मे दिल लेने वाले, रात के हमसफर थक के घर को चले, मै जागू तुम सो जाओ ही व अशी अनेक गाणी आठवून बघा. शम्मी कपूर हा अष्टपैलू अभिनेता असल्याची तुमची नक्की खात्री पटेल.

देव आनंदला नाचता येत नसेच. पण राज आणि दिलीप या दोघांनी नाचण्याचा फारसा प्रयत्न केल्याचं ऐकिवात नाही. तेव्हा चित्रपटांत कथेच्या नावाखाली काहीही चालून जात असलं तरी प्रेक्षक मोर आणि माकड यांमध्ये नक्कीच फरक करू शकत असले पाहिजेत, कारण पुढे एक गृहस्थ जंपिंग जॅक म्हणून प्रसिद्धीस आले तरी त्यांना कुणी छान 'नाचतो' असं म्हणायला धजावलं नाही. शम्मीने मात्र उत्तम नाचणारा नायक म्हणून अनेक वर्ष सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याला नाचता येत नसे असे तो म्हणे. विश्वास बसतो? गाण्यात नाचणं कुठे आवश्यक आहे, कुठे लयबद्ध पदलालित्य अपेक्षित आहे हे अचूक ओळखून तो स्वतःच कसं नाचायचं ते ठरवी. शम्मीला संगीताची आणि ठेक्याची इतकी चांगली जाण होती की त्याच्या गाण्यांसाठी त्याला कधीही नृत्यदिग्दर्शकाची गरज पडलीच नाही. एक काळ असा होता की गाण्यावर शम्मी नाचतोय की त्याच्या नाचामुळे गाणं बहरतंय असा प्रश्न पडावा. 'गोविंदा आला रे आला' हे गाणं आठवा, आजही हे गाणं लागलं की कृष्णभक्ती आणि कान्हाचा नटखटपणा याचं मिश्रण चेहर्‍यावर बाळगत रस्त्यावर बेभान होऊन नाचणारा शम्मीच डोळ्यांसमोर येतो.


जणू शम्मीच गातोय असं वाटावं इतका फिट बसणारा रफीसाहेबांचा आवाज आणि उत्स्फूर्ततेचं उत्तम उदाहरण असलेला शम्मीचा अप्रतिम नाच या गोष्टींमुळे शम्मी 'भारताचा एल्विस प्रिस्ली' म्हणून ओळखला जाऊ लागला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे १९६६ साली आलेला गोल्डीचा तीसरी मंझिल हा चित्रपट. प्रचंड लोकप्रिय झालेला हा रहस्यपट मात्र अत्यंत नाट्यमय रीतीने शम्मीच्या पदरात पडला. एका पार्टीत निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडला (बरं झालं, नाहीतर बेभान होऊन देव आनंद ड्रम वाजवतोय की ड्रम देव आनंदला वाजवतायत असा प्रश्न पडला असता) आणि शम्मी कपूरचा नायक म्हणून चित्रपटात प्रवेश झाला. दिग्दर्शकाच्या भूमिकेत गोल्डी मात्र तसाच राहिला. 'ओ हसीना जुल्फों वाली' या गाण्यात नृत्यनिपुण हेलनच्या प्रत्येक अदा आणि पदलालित्याला तोडीस तोड नाच शम्मीने करून दाखवला आहे. या चित्रपटातलं एक दृश्य शम्मी त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर ('पीक') असल्याची जाणीव करून देतं. प्रेमनाथने एका खोलीत पाठवल्यावर कपाट उघडून त्यातला एक वेश तो परिधान करतो. त्याच वेळी त्याची बटणं बघून त्याला अचानक खुनी कोण ते ध्यानात येतं, तेंव्हा त्याचे विस्फारलेले डोळे आणि अप्रतिम मुद्राभिनय आपल्याला जिंकून जातो.

तीसरी मंझिलचं चित्रीकरण सुरू असतानाच गीता बाली देवीच्या आजाराला बळी पडून हे जग सोडून गेली. या घटनेने शम्मीला बसलेला धक्का इतका मोठा होता की जवळजवळ तीन महिने तो चित्रीकरणात सहभागी होऊ शकला नाही. शम्मी कपूरची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही विजय आनंदने हा चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण केला. नायक म्हणून कारकिर्दीसाठी शम्मीच्या आयुष्यात गीताचा प्रवेश जसा शुभशकुन ठरला, तसाच गीताचा मृत्यू हा अपशकुन. याच चित्रपटानंतर शम्मी्चा कारकिर्दीतला दुसरा टप्पा सुरू झाला. अनेक चित्रपटांमधून झालेल्या अनेक छोट्यामोठ्या अपघातांमुळे झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या नाचण्यावर बंधनं आली आणि त्याची कारकिर्द नायक म्हणून हळूहळू उतरणीला लागायला सुरुवात झाली.

अर्थात या कालावधीतही शम्मीने अनेक सुंदर आणि लोकप्रिय कलाकृतींचा आनंद सिनेरसिकांना दिला. बदतमीज, लाट साहब, अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस, प्रिन्स यासारखे सिनेमे हे याहू पठडीतल्या शम्मी कपूरची आठवण करून देत राहिले, तर ब्रह्मचारी आणि अंदाज या चित्रपटातून त्याच्या प्रगल्भ आणि संयत अभिनयाचं दर्शन घडलं. यांपैकी 'ब्रह्मचारी' ने त्याला त्याच्या कारकिर्दीतलं एकमेव फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ठ अभिनेता हे पारितोषिक मिळवून दिलं. याच सिनेमातील 'मैं जागू तुम सो जाओ' या गाण्यात शम्मीच्या चेहर्‍यावर मूर्तीमंत वात्सल्य झळकताना आपल्याला दिसतं.

शम्मीच्या चरित्र भूमिकांची खर्‍या अर्थाने सुरुवात झमीर या चित्रपटापासून झाली आणि या अष्टपैलू अभिनेत्याने कारकिर्दीतला हा टप्पाही यशस्वीपणे पेलला. इंग्रजी चित्रपट इर्मा ला दूस (Irma La Douce) ची नक्कल असलेला मनोरंजन या चित्रपटात अभिनयाबरोबाच दिग्दर्शनही करुन त्याने एका वेगळ्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न त्यानंतर आलेल्या बंडलबाज या चित्रपटापर्यंतच टिकला. विधाता चित्रपटातल्या भूमिकेने त्याला सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळवून दिलं. मग परवरिश, मीरा, रॉकी, नसीब, हीरो, बेताब, इजाजत अशा चित्रपटांद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकत राहिला. शेवटी नव्वदच्या दशकात त्याने चित्रपटामधे भूमिका करणं कमी कमी करत शांत जीवन जगणं पसंत केलं.

पण शांत बसेल तर तो शम्मी कसला? कंप्यूटर सॅव्ही असलेला शम्मी भारतात इंटरनेटच्या पहिल्या वापरकर्त्यांपैकी एक होता. इतकंच नव्हे तर आंतरजाल वापरणार्‍यांची संघटना 'इंटरनेट युजर्स कम्युनिटी ऑफ इंडिया' (ICUI) चा तो संस्थापक अध्यक्षही होता. त्याच्याच म्हणण्यानुसार "भारतात इंटरनेट येण्याआधीपासून मी इंटरनेट वापरतोय!". गंमत म्हणजे शेवटपर्यंत विंडोज आणि मायक्रोसॉफ्टच्या आहारी न जाता निष्ठेने अ‍ॅपल मॅक वापरलं. शम्मी त्याच्या भरभराटीच्या काळात जसा शांत आणि समजूतदार होता, तसाच तो निवृत्तीनंतरही तितकाच प्रेमळ आणि दानशूर राहिला. अनेक वर्षांपूर्वी 'जयबाला आशर' नामक एका तरुणीवर रेल्वेगाडीत एका व्यसनाधीन तरुणाने हल्ला करुन चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले होते आणि या घटनेत तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले होते. शम्मीने त्या तरुणीस बर्‍याचदा भेट देऊन तिचं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला आणि ती इस्पितळातून घरी गेल्यावर तिला एक नवा कोरा संगणक भेट म्हणून दिला.

किडनीच्या विकाराने ग्रासलेल्या शम्मीला डायलिसिस सारख्या त्रासदायक प्रक्रियेसाठी आठवड्यातून तीनदा इस्पितळात यावं लागे. अशावेळी स्वभावात कडवटपणा, किरकिरेपणा शिरण्याची शक्यता असते. पण "The difficulties of life are intended to make us better, not bitter" ह्या पंक्ती अक्षरशः जगलेल्या शम्मीचा एकंदर जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन कधी बदलला नाही. शेवटपर्यंत त्याची 'देवाने मला आयुष्यात भरभरून दिलं आहे आणि माझी कशाबद्दलही काहीच तक्रार नाही' हीच वृत्ती कायम राहिली. ह्या त्याच्या प्रवासात त्याला खंबीर साथ होती ती त्याची द्वितीय पत्नी नीलाची.

याच आजाराशी लढता लढता अखेर शम्मी कपूरने १४ ऑगस्ट २०११ च्या पहाटे इहलोकीची यात्रा संपवली. त्याच्या अंत्यसंस्कारांना त्याचा धाकटा भाऊ शशी कपूर व्हीलचेअरवर हजर होता. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव जणू म्हणत होते, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे."

मला खात्री आहे. शम्मी कपूरचा आत्मा न्यायला यम स्वतः आला असणार. इतकंच नव्हे तर त्याच्यासारख्या राजकुमाराला न्यायला स्वर्गातून एक स्पेशल हत्तीही सोबत आणला असणार. त्याच्या पृथ्वीतलावरच्या वास्तव्याची स्तुती करत कुणीतरी गाणंही म्हणत गेलं असेल "आगे पीछे तुम्हारी सरकार, तुम थे यहाँ के राजकुमार".
 


© मंदार दिलीप जोशी

Tuesday, December 28, 2010

मनोरंजनाचे घेतले व्रत - ३: अशोक कुमार उर्फ दादामुनी

माझे आजोबा मी फक्त पाच वर्षांचा असताना हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू, ज्यांना आम्ही काकाआजोबा म्हणायचो, ते आणि काकूआजी, यांनी स्वतःच्या नातवंडांवर कुणी करणार नाही इतकं प्रेम आमच्यावर केलं. त्यामुळे माझ्या आजोबांबरोबर जे नातं फुलण्याआधीच संपलं ते मात्र काकाआजोबांबरोबर बर्‍यापैकी बहरलं. त्यांचा सहवास मला मी आठवीत असेपर्यंत लाभला.

हे आजोबा-आजी दक्षिण मुंबईतील पंडित पलुस्कर चौकातल्या हंसराज दामोदर ट्रस्ट बिल्डींगमधे राहत. हा भाग म्हणजे ऑपेरा हाऊस जिथे आहे तो परिसर. काकूआजीची एक दातार आडनावाची मैत्रीण होती. तिचे यजमान एम.टी.एन.एल. मधे मोठे अधिकारी होते. मी बघितलेला पहिला व्हीडिओ कॅसेट रेकॉर्डर (व्ही.सी.आर.) हा त्यांच्याकडेच. सिनेमा बघायची हुक्की आली की आम्ही काकूआजीला मस्का लावायचो. आजीचा दातारांकडे फोन जायचा. मग आजी फर्मान काढायची, "चला रे योगेशदादाकडे" (मैत्रिणीच्या मुलाचं नाव). पडत्या फळाची आज्ञा घेऊन आमची चिमुकली पाऊले आजीचा हात धरून लिफ्ट नसलेल्या त्या इमारतीचे चार मजले उतरून केनडी ब्रीज खालून जाणार्‍या रेल्वेगाड्या बघत बघत एम.टी.एन.एल. क्वार्टर्सच्या दिशेने चालायला लागायची.

त्या व्ही.सी.आर.वर मी बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे खूबसूरत. हा चित्रपट बघायला जाताना मी अर्धवट झोपेतच होतो. पण त्यातल्या अशोक कुमार उर्फ दादामुनींना बघून मी खडबडून जागा झालो. एक हनुवटीचा भाग सोडला तर त्यांची चेहरेपट्टी तंतोतंत काकाआजोबांशी मिळतीजुळती होती. अगदी केशरचनेसकट. घरी परत आल्यावर उत्साहात सगळ्यांसमोर सिनेमाचं आणि अर्थातच सिनेमातल्या प्रेमळ आजोबांच तपशीलवार वर्णन झालं.

तेव्हापासून आजोबा म्हटलं की अशोक कुमार अशी एक विशिष्ठ प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. पण इतर नायक, नायिका, खलनायक, दिग्दर्शक वगैरे लोकांसारखं मुद्दामून नाव पाहून सिनेमा बघावा असं मात्र त्यांच्या बाबतीत कधीच झालं नाही. कारण आमच्या पिढीला ते नायकाच्या रूपात फारसे आठवतच नाहीत; आठवतात ते कर्तबगार जेष्ठ बंधू, संवेदनशील मनाचे वडील, प्रेमळ सासरे, लाघवी आजोबा या रुपांत - थोडक्यात, दादामुनी म्हणूनच.

कालांतराने अशोक कुमार नायक असलेले काही मोजके पण त्याकाळी गाजलेले चित्रपट दूरदर्शन आणि नंतर स्टार गोल्डच्या कृपेने बघायला मिळाले. अर्थात अशोक कुमार हे काही चित्रपटसृष्टीत नायक व्हायला आलेच नव्हते. त्यांना अधिक रस होता तो कॅमेर्‍यामागे चालणार्‍या तांत्रिक बाबींमध्ये. म्हणूनच जेव्हा बॉम्बे टॉकीजचे हिमांशु राय यांनी 'जीवन नैया'चा नायक नजमल हुसेनच्या हातात अचानक नारळ ठेऊन निरंजन पाल यांच्या सांगण्यावरून लॅब विभागात काम करणार्‍या कुमुदलाल कुंजीलाल गांगुली या तरुणाला नायक बनवायचा घाट घातला, तेव्हा त्याने तडक पाल यांच्या घरी जाऊन "कशाला माझ्या आयुष्याची वाट लावताय?" असा मिश्किल प्रश्न टाकला. या सिनेमाचा जर्मन दिग्दर्शक फ्रॉन्ज ऑस्टेन हा वेगळ्या कारणाने त्याच्याशी सहमत होता. त्याने चक्क त्या तरुणाला त्याच्या अवाढव्य जबड्यामुळे पडद्यावर हीरो म्हणून अजिबात भवितव्य नसल्याचं तोंडावर सांगितलं ("You will never make it in films because of your tremendous jaws").

पण इतर नायकांच्या बाबतीत अनेकांनी वर्तवलेल्या अशा प्रकारच्या भाकितांप्रमाणेच ह्या भाकितालाही खोटं ठरवत मारुन मुटकून 'हुकुमावरून' नायक बनलेल्या अशोक कुमारने नंतर मात्र अभिनयक्षेत्रात मागे वळून पाहिलंच नाही. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त तो इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकला. गंमत म्हणजे कॅमेर्‍यासमोरील अशोक कुमारच्या भवितव्याचं अंधःकारमय वर्णन करणार्‍या याच फ्रॉन्ज ऑस्टेनने नंतर तो नायक असलेले अनेक चित्रपट दिग्दर्शित केले.



बॉम्बे टॉकीजने त्याकाळी धाडसी आणि वादग्रस्त सामाजिक विषयांना हात घालणारे अनेक चित्रपट काढले. त्यातलाच एक म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण तरूण आणि अस्पृश्य समजल्या जाणार्‍या समाजातली तरूणी यांच्यातली प्रेमकथा सादर करणारा १९३६ सालचा 'अछुत कन्या' हा सिनेमा. याही सिनेमात अनुभवी देविका राणी समोर नायक म्हणून समर्थपणे उभं राहत अशोक कुमारने आपला दर्जा दाखवून दिला.

१९४३ साली आलेला 'किस्मत' हा फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण सामाजिक वातावरण ढवळून काढणारा ठरला. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी खलनायकाच्याही वरताण दुष्कृत्ये आणि क्रूरकर्मे करणारे नायक किंवा आपल्या हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी अगदी वाट्टेल ते थराला जाणार्‍या अ‍ॅन्टी हीरोंचे सिनेमे बघत मोठे झालेल्या आमच्या पिढीला या सिनेमाने त्यावेळी केवढी खळबळ माजवली होती ते सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तोपर्यंत अगदी सरळमार्गी (की भोळसट?), निर्व्यसनी, आणि सभ्य नायक बघायची सवय असलेल्या तत्कालीन समाजाला चक्क ओठांत सिगारेट घेऊन वावरणारा पाकीटमार हीरो बघून एक प्रकारचा मोठा संस्कृतिक धक्काच बसला. 'किस्मत'ने मात्र प्रचंड लोकप्रिय होत तीन वर्षांहून अधिक काळ सिनेमागृहांत हाऊस फुल्लचा बोर्ड मिरवत ठाण मांडलं. त्यानंतर अशा प्रकारचे हीरो असलेल्या सिनेमांची लाट जरी आली नाही तरी साधनशुचितेला फारसे महत्व न देता इप्सित 'साध्य' करण्याकडे अधिक कल असलेले नायक मात्र प्रेक्षकांनी स्वीकारले ते कायमचेच.



अशोक कुमार यांनी निर्माता म्हणून बनवलेल्या तीन चित्रपटांपैकी पहिला म्हणजे १९४९ साली बॉम्बे टॉकीजसाठी बनवलेला गूढपट 'महल'. तो प्रचंड सुपरहीट ठरला. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने नायिका मधुबाला आणि प्रामुख्याने 'आएगा आनेवाला' या गाण्याच्या तूफान लोकप्रियतेमुळे पार्श्वगायिका लता मंगेशकर या दोघींनाही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं.


लाजर्‍या हावभावांनी अछुत कन्या मधे 'मै बन का पंछी बन के संग संग डोलूं रे..." असं म्हणणार्‍या अशोक कुमारने (पार्श्वगायनही त्याचंच) मग 'हावडा ब्रिज' मधे सिगारेटचे झुरके घेत "आईये मेहेरबाँ, बैठीये जानेजाँ" असा पुकारा करणार्‍या सौदर्यस्म्राज्ञी मधुबालाचं मादक आव्हान चेहर्‍यावर कमालीचं सूचक हास्य बाळगत स्वीकारलं आणि "ये क्या कर डाला तूने.." अशी तिची कबुलीही ऐकली. अशोक कुमारचा या चित्रपटातला वावर हा म्हणजे संयत आणि प्रगल्भ अभिनय कसा असावा याचा उत्तम नमूना.



वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्‍या या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमारने वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमारने अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.



या प्रवासात अशोक कुमारला ज्या दोन गोष्टींनी साथ दिली ती म्हणजे त्याच त्या अजस्त्र जबड्यामुळे चेहर्‍याला लाभलेलं नैसर्गिक प्रौढत्व आणि कृत्रीमतेचा लवलेशही नसलेलं प्रसन्न हास्य. अशोक कुमारच्या चरित्र भूमिकांची सुरवात खरं तर १९५८ सालच्याच 'चलती का नाम गाडी' मधे मनमोहन (किशोर कुमार) आणि जगमोहन (अनुप कुमार) या दोन धाकट्या भावांचा सांभाळ करणार्‍या ब्रिजमोहनची भूमिका करतानाच झाली होती, पण त्यावर शिक्कामोर्तब केलं ते राजेंद्रकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या १९६० साली आलेल्या 'मेरे मेहबूब'ने. यात त्यांनी नायिका साधनाचा मोठा भाऊ साकारला होता. मुस्लिम-सोशल म्हणुन ओळखले जाणारे अनेक सिनेमे एकेकाळी आले. अशा सिनेमात कुणीही सोम्यागोम्या नवाब वगैरेंच्या भूमिका करत असे, पण खर्‍या नवाबासारखं रुबाबदार दिसणं आणि त्याच थाटात वावरणं म्हणजे काय ते या सिनेमात अशोक कुमारला बघितल्यावर कळतं.

राज-देव-दिलीपच नव्हे, तर अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांसारखे अनेक लहानथोर सिनेस्टार आले आणि गेले, पण दादामुनींना त्यांच्या अढळपदावरून कुणीच हलवू शकलं नाही. आधी हीरो म्हणून राज्य केलेल्या अनेक अभिनेत्यांनी नंतर चरित्र भूमिका केल्या, पण कथानकाची गरज वगैरे बाबी आणि काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांची सहज प्रवृत्ती ही नेहमीच इतर कलाकारांवर कुरघोडी करण्याची असल्याने एकूणच आयुष्याच्या उतरार्धात त्यांच्या कारकीर्दीला मर्यादा आल्या. याउलट दादामुनींनी मात्र कुठेही आपली भूमिका वरचढ न होऊ देता इतर कलाकारांना आपापली भूमिका फुलवायला संपूर्ण वाव देत स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यश मिळवलं. अगदी त्यांची प्रमुख किंवा अत्यंत महत्वाची भूमिका असलेल्या चित्रपटात सुद्धा त्यांनी याला अपवाद केला नाही. मग तो १९७८ सालचा राकेश रोशन बरोबरच्या 'खट्टा मीठा' मधला होमी मिस्त्री हा पारशी विधुर असो किंवा 'छोटीसी बात' मधल्या अरुण प्रदीपचा (अमोल पालेकर) 'गुरूजी' कर्नल ज्युलीअस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग असो.

चरित्र भूमिका करत हिंदी चित्रपटात जम बसवू पाहणार्‍या श्रीराम लागूंना आपल्याला मनाजोगत्या भूमिका मिळत नाहीत अशी नेहमी तक्रार असे. त्यांना एकदा दादामुनींनी त्यांच्या यशाचे रहस्य सांगताना समजावलं होतं की चित्रपटसृष्टीत सतत लोकांच्या डोळ्यांसमोर राहणं महत्वाचं आहे, त्यामुळे फार चिकित्सा न करता ज्या भूमिका मिळतील त्या स्वीकारत जावं. हव्या तशा भूमिका त्यातूनच मिळतात.

दादामुनींना आपल्या कारकिर्दीत अनेक सटरफटर भूमिका जरी कराव्या लागल्या तरी अशा सकारात्मक वृत्तीमुळे साहजिकच त्यांना असंख्य वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिकाही मिळाल्या. याचा आणखी एक फायदा असा झाला की त्यांच्यावर कधी ज्याला साचेबद्ध (टाईपकास्ट) म्हणतात तसं होण्याची वेळ आली नाही.

वर उल्लेख केलेल्या 'खूबसूरत' मध्ये प्रेमळ, सज्जन, सुनेवर मुलीसारखं प्रेम करणारा आणि शेवटी शिस्तीचा अतिरेक होतोय हे जाणवल्यावर बायकोला सुनावून भावी सुनेचीच बाजू घेणारा सासरा त्यांनी अगदी उत्तमरित्या उभा केला होता. 'मिली' मधे मुलीच्या जवळजवळ असाध्य असलेल्या आजाराने आतून व्यथित झालेला तरीही इतरांना धीर देणारा बाप साकारताना दादामुनी अमिताभइतकाच भाव खाऊन जातात. आशीर्वाद मधल्या जोगी ठाकूरची तडफड त्यांनी इतक्या ताकदीने उभी केली आहे, की हा सिनेमा पाहिल्यावर आपल्या पोटच्या पोरीचं लग्न लपुनछपून पाहण्याची वेळ आपल्या शत्रूवरही येऊ नये असं वाटल्यावाचून राहत नाही. त्याच सिनेमातलं त्यांच्याच आवाजातलं "रेलगाडी, रेलगाडी" कोण विसरू शकेल? हे गाणं आज भारतातलं पहिलं रॅप गाणं म्हणून ओळखलं जातं. पाकीजा मधला शहाबुद्दीन (आधी प्रियकर आणि मग बाप) आणि शौकीन मधला 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' या गाण्याची आठवण करुन देणारा चावट म्हातारा अशा दोन टोकं असलेल्या व्यक्तिरेखा त्यांनी जीव ओतून साकार केल्या.

अगदीच साधारण असला, तरी व्हिक्टोरिया नंबर २०३ हा चित्रपट केवळ प्राण (राणा) आणि अशोक कुमार (राजा) या दोन कसलेल्या अभिनेत्यांच्या धमाल जोडीमुळेच हीट झाला. आजही ह्या चित्रपटाचा विषय निघाला की नायक-नायिके आधी हेच दोघे आठवतात. प्राण आणि अशोक कुमार या दोघांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेते म्हणून मिळालेले नामांकन हाच काय तो या सिनेमाचा फिल्मफेअर पुरस्कारांमधला सहभाग.

अष्टपैलू अभिनेता हे विशेषण आजकाल सरसकट कुणालाही लावलं जातं. पण ज्यांनी गोल्डीचा 'ज्वेल थीफ' पाहिलाय त्यांना हे विशेषण अशोक कुमारला कसं शोभून दिसतं हे वेगळं सांगायची गरज भासणार नाही. हीरोगिरीवरुन 'दादा'गिरीकडे वळलेल्या अशोक कुमारने आपल्या नेहमीच्या 'इमेज'च्या विरोधात जात या चित्रपटात चक्क खलनायक साकारला. एवढंच नव्हे, तर त्या भूमिकेचं सोनं केलं, इतकं की हिंदी चित्रपटसृष्टी एका उत्कृष्ठ खलनायकाला मुकली असं तो चित्रपट पाहिल्यानंतर वाटू शकतं. चित्रपटाच्या शेवटी एक मजेशीर दृश्य आहे. नायक विनय (देव आनंद) मेला आहे असं समजून ज्वेल थीफ उर्फ प्रिन्स अमर (अशोक कुमार) हा आपला गाशा गुंडाळून कायमचा पळून जायच्या तयारीत असतो. त्याच वेळी विनय तिथे पोहोचतो आणि त्याच्यावर पिस्तुल रोखतो. आता हीरोने व्हिलनवर पिस्तुल रोखणे यात मजेशीर काय असं आपल्याला वाटू शकतं. पण खरी गंमत यानंतर आहे. विनयला जिवंत बघून धक्का बसलेल्या प्रिन्स अमर वर पिस्तुल रोखलेला विनय म्हणतो "....और फिर ऐसे बढिया बढिया अ‍ॅक्टरों की सोबत मे रह कर थोडी बहुत अ‍ॅक्टींग तो आदमी सीख ही जाता है." पुन्हा सिनेमा बघितलात तर हा सीन जरा बारकाईने बघा. हे दोघं अभिनय करत नसून एकमेकांशी खरंच बोलताहेत असा भास होतो. देव आनंदला जिद्दी मधे चमकवणार्‍या अशोक कुमारला ज्वेल थीफ मधे केलेला हा मानाचा मुजरा वाटतो. अर्थात, सदैव 'एव्हरग्रीन' रहाण्याच्या अट्टाहासामुळे देव आनंद दादामुनींकडून थोडीफार अ‍ॅक्टींग वगळता फारसं काही शिकला नसावा हे उघडच आहे.

दादामुनींच्या उत्कृष्ठ अभिनयाची उदाहरणं देताना जवळ जवळ दोनशे ते अडीचशे सिनेमांपैकी कुठल्या सिनेमांचं नाव घ्यावं आणि कुठल्याचं वगळावं याचा निर्णय करणे केवळ अशक्य आहे. अशोक कुमार यांच्या बाबतचं माझं वैयत्तिक मत बाजूला ठेवून तटस्थपणे पाहिलं, तरी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत इतकं मायाळू आणि प्रसन्न असं एकही व्यक्तिमत्व माझ्या तरी डोळ्यांसमोर येत नाही. अशोक कुमारला दादामुनी (बंगालीत मोठा भाऊ) हे गोड टोपणनाव मात्र त्यांच्याच एका बहिणीने (निर्माते शशिधर मुखर्जी यांची पत्नी) त्यांना दिलं. सिनेमाच्या क्षेत्रात सज्जन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोजक्याच व्यक्तींमधे ते मोडत, त्यामुळे हे टोपणनाव अल्पावधीत सर्वांनीच स्वीकारलं.



इतक्या सज्जन माणसाच्या वाट्याला काही कटू अनुभव आले नसते तरच नवल होतं. पण एक प्रसंग मात्र त्यांच्या कायम लक्षात राहिला. अशोक कुमारसाठी परिणीता बनवण्याची जबाबदारी असलेल्या बिमल रॉयनी चित्रपटाचं थोडं चित्रिकरण कलकत्त्यात करण्याच्या बहाण्याने चक्क 'परिणीता'च्या निर्मितीत गुंतलेल्या कलाकारांचा संच वापरून स्वत: निर्मिती आणि दिग्दर्शन करत असलेल्या 'दो बिघा जमीन' हा चित्रपट सगळाच्या सगळा चित्रित केला. त्याबद्दल जाब विचारल्यावर 'परिणीता' न भूतो न भविष्यती असा लोकप्रिय सिनेमा होणार असल्याचं बिमल रॉयनी रंगवून सांगितलं आणि स्वत:चा 'दो बिघा जमीन' हा त्या आधी प्रदर्शित न करण्याचं आश्वासनही दिलं, पण नंतर सोयीस्कररित्या ते पाळायला विसरले. या घटनाक्रमाचा धक्का बसलेल्या अशोक कुमारने त्या नंतर त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. सुंदर कलाकृती (दो बिघा जमीन, परिणीता, मधुमती, बंदिनी, वगैरे) निर्माण करणारे प्रत्यक्षात किती कोत्या मनाचे असू शकतात याचा हा उत्तम नमूना म्हणायला हवा.

दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केल्याखेरीज दादामुनींच्या बाबतीतलं कुठलही लिखाण अपूर्ण आहे. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'हम हिंदूस्तानी' मधला साकारलेला डॉक्टर आणि बहादुरसहा जफर मलिकेत खूप काही करण्याची इच्छा असलेला पण प्राप्त परिस्थितीकडे हताशपणे बघणे सोडून काही करू शकत नसलेला बहादूरशहा या भूमिका आपल्या अभिनयाने त्यांनी अविस्मरणीय केल्या. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. या आधी कधीही अशोक कुमारबरोबर कॅमेर्‍यासमोर यायची संधी न मिळालेला शम्मी कपूर या जाहिरातीत त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं म्हणून प्रचंड हरखून गेला होता.


लग्नाआधी एकमेकांचा चेहराही न बघितलेले दादामुनी आणि त्यांची पत्नी शोभा यांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं आणि त्यांचं लग्न पत्नी शोभाचा मृत्यू होईपर्यंत टिकलं. असं असलं, तरी त्यांचे वैवाहिक जीवन मात्र संपूर्णपणे सुखाचं झाले नाही. त्याबद्दल बोलताना दादामुनींनी अनुराधा चौधरींना दिलेल्या एका मुलाखतीत आपलं मन मोकळं केलं होतं. शोभाला काही काळाने दारूचं व्यसन लागलं. इतकं, की दिवसभराच्या कामाने थकून घरी आलेल्या त्यांना पाणी, चहा वगैरे हातात घेऊन सुहास्यवदनाने बायकोला समोर बघण्याची इच्छा सतत मारावी लागली. त्याऐवजी त्यांना दिसे ती तर्र होऊन पडलेली शोभा. बराच काळ सहन केल्यावर शेवटी त्यांनी वेगळं रहायला सुरवात केली, पण तरी शोभाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. दादामुनींची माफी मागून तिने त्यांच्याबरोबर पुन्हा रहायला सुरवात केली. मात्र तिचं पिणं काही सुटलं नाही. अखेर अनेक दिवस इस्पितळात काढल्यानंतर दादामुनींसोबत लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा मनातच ठेऊन तिने बरोबर दोन दिवस आधी या जगाचा निरोप घेतला.

दादामुनी पुढे म्हणतात, "तिची इच्छा अपूर्ण राहिल्याचा परिणाम म्हणून की काय, जाताना तिचे डोळे अर्धवट उघडे होते. मला कुणीतरी सांगितलं इच्छा अपूर्ण राहिल्यावर असं होतं म्हणे. मला माहीत होतं ती माझ्या प्रेमाला आसुसलेली होती. पण मी पूर्ण प्रयत्न करूनही तिचं व्यसन सोडवू शकलो नाही. विचित्र गोष्ट अशी, की मी तिच्या चेहर्‍याचं चुंबन घेतल्यावर तिचे डोळे पूर्णपणे मिटले. जणू आता कसलीच इच्छा राहिली नसावी." यानंतर दादामुनींनी चित्रपटात काम करणं जवळ जवळ बंद केलं.

माणसाने किती दुर्दैवी असावं? ज्यांनी त्यांना खांदा द्यायचा त्याच दोन्ही धाकट्या भावांचा मृत्यु त्यांना बघावा लागला. १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी दादामुनींचा वाढदिवशीच किशोर कुमारचं निधन झाल्यापासून त्यांनी आपला वाढदिवस साजरा करणंही सोडून दिलं. मग १९९७ साली २० सप्टेंबर रोजी अनुपही हे जग सोडून गेला.

काकाआजोबा मी आठवीत असताना, म्हणजे १९९१ साली वयाच्या ६४व्या वर्षी हे जग सोडून गेले. काकाआजोबा गेल्यानंतर मी जेव्हा जेव्हा मी दादामुनींना सिनेमात बघत असे तेव्हा तेव्हा मला आजोबांची जास्तच आठवण येत असे आणि मग दादामुनींचा सहभाग असलेली दृश्ये अधिकच समरस होऊन बघितली जात. माणूस कशात आणि कोणात नात्यांची पोकळी भरून काढायला भावनिक आधार शोधेल सांगता येत नाही. कदाचित फ्रॉइडकडे याची उत्तरं असू शकतील.

मला तीन लोकांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. पुलंना मी भेटलो. सचिन तेंडुलकरला कधीतरी भेटेन, फक्त हात लाऊन बघता आला तरी चालेल. पण दादामुनींना भेटण्याचं स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं. स्वतः होमिओपथीचे तज्ञ असलेले दादामुनी मात्र अनेक वर्ष दम्याशी झुंज दिल्यावर थकले होते. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानंतर दोनच महिन्यांनी त्यांनी १० डिसेंबर २००१ रोजी ह्या जगाचा निरोप घेतला. मी फक्त दोनदा भरपूर रडल्याचं मला आठवतंय. एकदा काकाआजोबा गेल्यावर आणि दुसर्‍यांदा माझे हे सिनेमातले आजोबा देवबाप्पाला भेटायला निघून गेले तेव्हा.



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः चित्रपट बघणे, दूरदर्शन मुलाखती, व आंतरजालावरील अनेक.
लेखातील छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Sunday, November 21, 2010

मनोरंजनाचे घेतले व्रत: विजय आनंद उर्फ गोल्डी

मला देव आनंदचे सिनेमे का आवडतात, किंबहुना का आवडायचे, त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे याचाच धाकटा भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याचा त्याच्या अनेक चित्रपटांना लाभलेला परीसस्पर्श.


विजय आनंदचं मला पहिल्यांदा दर्शन झालं ते त्याच्या सर्वोत्तम म्हणून गणला गेलेल्या 'गाईड' (१९६५) या सिनेमाच्या श्रेयनामावलीत. दूरदर्शनवर पहिल्यांदा पाहीलेल्या या चित्रपटातलं 'तेरे मेरे सपने एक रंग है' हे गाणं का कोण जाणे मनात घर करुन बसलं होतं. पुढे तो सिनेमा अनेकदा पाहिल्यावर त्याच्यातली अनेक सौंदर्यस्थळं उलगडली आणि गोल्डीच्या दिग्दर्शनाबद्दल आदर निर्माण झाला. कल्पक चित्रिकरण करून श्रवणीय असलेली गाणी प्रेक्षणीय बनवण्याची हातोटी काही मोजक्या दिग्दर्शकांना साधली होती त्यातलाच एक म्हणजे गोल्डी.

त्याचं एक वैशिष्ठ्य म्हणजे कमीत कमी गोष्टी वापरून केलेलं चित्रीकरण. देव आनंद, वहीदा, आणि दोन-तीन झाडं या शिवाय होतं काय ह्या गाण्यात? गाण्याची गंभीर प्रकृती आणि देव आनंदला फारसं नाचता वगैरे येत नसणे (अर्थातच त्यामुळे झाडांच्या फांद्यांना लटकणे वगैरे सर्कस कॅन्सल) ह्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर विजय आनंद पुढे काय आव्हान असेल याची कल्पना येते. दृश्ये बर्‍यापैकी मोठ्या टेक्स मध्ये चित्रित करणं आणि कॅमेरा हलकेच वळवून दुसर्‍या मितीत काय चाललं आहे ते दाखवणं या आपल्या वैशिष्ठ्याचा उपयोग इथेही करून त्याने हे गाणं फक्त तीन मोठ्या टेकस् मध्ये चित्रित केलं होतं.



कथा ऐकताच गोल्डीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुरवातीला नाकारली होती, पण अनेक कारणांनी इतर कुणी उपलब्ध न झाल्याने त्यालाच ती स्वीकारावी लागली. आर.के.नारायण यांच्या गाईड या पुस्तकावर आधारित सिनेमा काढणं हाच एक मोठा जुगार होता. नायिकेचे नायकाबरोबर असलेले विवाहबाह्य संबंध आणि बंडखोरपणा हे प्रमुख कारण होतंच, पण त्याचबरोबर नायक असलेल्या राजू गाईड याचं हीरो या संकल्पनेला फटकून असलेला क्वचित आप्पलपोटा वाटू शकेल असा स्वभाव, राजूमुळे आपण आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत याची जाणीव न ठेवता एका चुकीमुळे त्याला लाथाडणारी स्वार्थी नायिका रोझी, कथा नक्की कुठे चालली आहे किंवा शेवट काय होणार याच्याविषयी अजिबात अंदाज न येणे, आणि धड ना सुखांत धड ना दु:खांत असलेला शेवट. पण विजय आनंदच्या दिग्दर्शन कौशल्याने हा चित्रपट त्याकाळचा मोठा हिट ठरला. चित्रपटात गावात दुष्काळ पडतो ते दर्शवण्यासाठी दाखवलेली गावातल्या लोकांची दृश्ये आठवली तर याचा अंदाज येईल. नायकाचा विचित्र स्वभाव गृहित धरला तरी त्याच्या वेदना, आक्रोश, शेवटची धडपड काळीज चिरुन जातात. देव आनंदला अभिनय यायचा नाही हे म्हणणार्‍यांनी हा सिनेमा - शक्यता कमी आहे, पण पाहिला नसेलच तर - जरूर पहावा. गोल्डीने दगडातून देव निर्माण केलाय. याचीच परिणिती देवला त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळण्यात झाली (पहिला काला पानी साठी). शिवाय गोल्डीलाही सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शन आणि पटकथेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले ते वेगळंच.

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी जसे मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक चित्रपट केले, तसं विजय आनंदने रहस्यपटांमध्ये प्राविण्य मिळवलं होतं. तीसरी मंझील (१९६६) हा १९५७ सालच्या नौ दो ग्यारह यानंतरचा गोल्डीचा पुढचा रहस्यपट. निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडला (बरं झालं, नाहीतर बेभान होऊन देव आनंद ड्रम वाजवतोय की ड्रम देव आनंदला वाजवतायत असा प्रश्न पडला असता). दिग्दर्शकाच्या भूमिकेत गोल्डी मात्र तसाच राहिला. दुर्दैवाने चित्रीकरण सुरू असतानाच देवच्या जागी नायक म्हणून आलेल्या शम्मी कपूरच्या दोन लहान मुलांची आई असलेली आणि जिच्यावर तो प्रचंड जीव टाकत असे अशी त्याची बायको गीता बाली हे जग सोडून गेली. शम्मी कपूरची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही विजय आनंदने हा चित्रपट ठरवलेल्या वेळेत पूर्ण केला. चित्रपटातील पात्रांपेक्षा कॅमेरा हाच प्रमुख निवेदक असला पाहिजे याची जाणीव असलेल्या गोल्डीने सिनेमातील पात्रांच्या बरोबर फिरत असलेल्या कॅमेर्‍याच्या वेगवान हालचाली, तुकड्यातुकड्यात चित्रीत केलेली दृश्ये एकत्र गुंफणे अशा करामतींचा प्रभावी वापर करून हिंदी चित्रपटांच्या इतिहासातल्या उत्तम थरारपटांपैकी एकाला जन्म दिला. संपूर्ण चित्रपटभर संशयाची सुई खून झालेल्या रूपाचा होणारा नवरा रमेश (प्रेम चोप्रा) आणि नर्तिका रुबी (हेलन) यांच्या भोवती फिरवत ठेऊन शेवटी अगदी अनपेक्षित पात्र (प्रेमनाथ) खलनायक म्हणून समोर आणणं या या चित्रपटातल्या रहस्याचा यु.एस.पी. ठरला.



याच क्लुप्त्यांसह नेहमीच काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न करण्यार्‍या विजय आनंदने त्याच्या पुढच्याच वर्षी ज्वेल थीफ हा आणखी एक जबरदस्त रहस्यपट सिनेरसिकांना सादर केला. रहस्यपटांची एक गोची असते. त्यांना रिपीट व्हॅल्यू नसतो असं म्हणतात. ज्वेल थीफचं वेगळेपण ह्यातच आहे की आज चाळीसहून अधिक वर्षांनीही पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा आणि क्षणभरही कंटाळा न येता तितकीच मजा आणणारा हा हिंदीतला एकमेव रहस्यपट असावा. इतर रहस्यपटांमध्ये अतीपरिचयात अवज्ञा झालेल्या अनेक गोष्टी पटकथेचा अविभाज्य भाग असल्यानं इथे कंटाळवाण्या होत नाहीत. उत्कृष्ठ पटकथा-संवाद लेखक असलेल्या गोल्डीला या सिनेमात दिग्दर्शनाबरोबर याही गोष्टी करायला मिळाल्याने असलेल्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करत अनेक अनेक नव्या गोष्टी समोर आणल्या. विचार करा, ज्वेल थीफ मध्ये अशोक कुमारच्या ऐवजी प्राण असता, तर त्यातला 'सस्पेन्स' चाणाक्ष प्रेक्षकांच्या लगेच लक्षात आला असता की नाही? किंवा एखाद्या भलत्याच व्यक्तिरेखेला खलनायक म्हणून आणलं असतं तर? सगळ्या सस्पेन्सचा तिथेच चुथडा झाला असता आणि सिनेमा साफ झोपला असता ते वेगळंच.

पण ती भूमिका अशोक कुमारने करणे यात विजय आनंदने अर्धी लढाई जिंकली. आपल्या नेहमीच्या 'इमेज'च्या विरोधात जात खलनायक साकारणार्‍या अशोक कुमारने त्या भूमिकेचं सोनं केलं, इतकं की हिंदी चित्रपटसृष्टी एका उत्कृष्ठ खलनायकाला मुकली असं तो चित्रपट पाहिल्यानंतर वाटू शकतं. खलनायकाच्या माणसांनी बेशुद्ध केल्यावर जमिनीवर पडलेल्या नायक देव आनंदला बघत बघत प्रवेश करणारा अशोक कुमार हे दृश्य म्हणजे खास गोल्डी टच. एक नायक-दोन नायिका किंवा दोन नायक-एक नायिका असलेले प्रेमाचे त्रिकोण या मसाल्याच्या जोरावर असंख्य निर्माते-दिग्दर्शक-नट मंडळींच्या घरातल्या चुली पेटल्या, पण त्याचबरोबर हिंदी चित्रपटातल्या नायकाने अनेक ललनांबरोबर जेम्स बॉंड छाप फ्लर्टींगही करणे ही एरवी धक्कादायक आणि धाडसी वाटणारी गोष्ट ज्वेल थीफमध्ये मात्र त्याकाळी कुणालाही खटकली नाही.




रहस्यपटात गाणी टाकली की तो प्रेक्षकांच्या मनावरची पकड गमावतो असाही एक समज आहे. पण 'दिल पुकारे आ रे आ रे आ रे' या गाण्यात नायिकेच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसणारा ताण बघितला तर हे गाणं उत्कंठा वाढवायला मदतच करतं हे लक्षात येईल. चित्रपटाच्या शेवटाआधी असलेल्या 'होठों पे ऐसी बात' या गाण्याचं वेगवान चित्रीकरण, नाचणार्‍या वैजयंतीमाला भोवती वेगात गोल फिरणारा कॅमेरा, एका तुकड्यात दिसणारा चेहरा अर्धवट झाकलेला प्रिन्स अमर हे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला नेऊन पोहोचवतात.

'आपली शेजारी राष्ट्रे' हा विषय विजय आनंदला त्याचा भाऊ चेतन आनंद प्रमाणेच प्रिय असावा. याचे संदर्भ त्याच्या काही चित्रपटातल्या संवादांतून आपल्याला पहायला मिळतात. 'तेरे घरके सामने' या सिनेमात नायक आणि नायिका या दोघांच्या वडिलांचं एकमेकांशी हाडवैर असतं. त्यांच्या प्रेमाचं पर्यावसान लग्नात होण्यात (असंख्य हिंदी शिणूमांप्रमाणे इथेही) हीच अडचण असते. पण ही समस्या सामोपचाराने सोडवली पाहीजे हे समजावताना गोल्डीचा नायक नायिकेला नेहरूप्रणित पंचशील तत्वांची आठवण करून देतो.

प्रख्यात दिग्दर्शक आणि हृषिकेश मुखर्जी यांच्यावरच्या माझ्या लेखात मी विजय आनंदचा उल्लेख केला होता तो गाण्यांच्या सुंदर चित्रिकरणासंदर्भात. तसं बघायला गेलं तर या दोघांच्या सिनेमांत खरं तर काही फारसं साम्य नाही, पण दोन गोष्टींचा उल्लेख करावाच लागेल. एक हे की त्यांच्या चित्रपटांतील गाणी नुसती ऐकत असलो तरी डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहतात. आणि दुसरं हे की गाणी कुठेही 'घुसवली आहेत' असं वाटत नाही. सहज आधीची दृष्ये किंवा संवाद यांच्या माध्यमातून चित्रपट आपल्याला लीलया गाण्यात घेऊन जातो.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी (१९५४) देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या विजय आनंदने दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्याने काला बाझार (१९६०) मध्ये नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्याने एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती (नायिकेचा भूतपूर्व प्रियकर). या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या 'ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं' या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो.

तेरे घर के सामने या सिनेमातलं तेच शब्द असणारं गाणं आठवा. या गाण्याच्या आधी नायक म्हणतो, "...लेकिन एक बात कहे देता हूं. चाहे आसमान टूट पडे, चाहे धरती फूट जाए, चाहे हस्तीही क्यों न मिट जाए, फिरभी मैं......" असं म्हणून थोडासा थांबल्यावर नायिका नुतन म्हणते "फिरभी मै?" आणि मग "तेरे घर के सामने...." म्हणत गाणं सुरु होतं. दारूच्या ग्लासात नुतन असल्याची कल्पना करून देव आनंद पडद्यावर हे गाणं म्हणतो. कळस म्हणजे जेव्हा बिअरच्या ग्लासात बर्फ टाकला जातो तेव्हा ग्लासातल्या नुतनचं शहारून देवला विनंती करणं आणि मग देवने चिमट्यानं तो बर्फाचा तुकडा ग्लासातून काढून टाकत तिची 'सुटका' करणं......अहाहा! निव्वळ अप्रतीम!! त्याच चित्रपटातलं 'दिल का भंवर करे पुकार' च्या आधी नायक नायिका कुतुबमिनार चढत असताना काय वातावरणनिर्मिती होते ते आठवून बघा.




काला बाझार चित्रपटातल्या एका गाण्याची तर बातच न्यारी. यात देव आनंदच्या वरच्या बर्थ वर असलेल्या नायिका वहीदाला उद्देशून तो 'उपरवाला जान कर अंजान है' असं म्हणतो, पण समोर बसलेल्या तिच्या आई-बाबांचं लक्ष जाताच 'उपरवाला म्हणजे देव' या अर्थाची खूण करून सारवासरव करतो ते लाजवाब!



जॉनी मेरा नाम चित्रपटातलं "पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले" या गाण्यात तरी काय होतं? नायक, नायिका, आणि एक छोटसं घर. पण गोल्डीने घराच्या असंख्य खिडक्यांचा धमाल वापर करून हे गाणं अजरामर केलं. हे गाणं ऐकलं की आजही डोळ्यांसमोर येतं ते ते त्यातलं वेगवेगळ्या आकाराच्या असंख्य खिडक्यांचं बंगलेवजा घर आणि त्यातून आत येण्याचा प्रयत्न करत देव आनंदचा हेमा मालिनीला पटवण्याचा प्रयत्न.

अशी असंख्य गाणी आहेत, पण एक शेवटचं उदाहरणं देऊन हे गाणं चित्रिकरण पुराण थांबवतो. ब्लॅकमेल चित्रपटातलं किशोर कुमारने गायलेलं सुप्रसिद्ध 'पल पल दिल के पास' हे गाणं सगळ्यांना माहित असेलच. नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही बरं! मी सांगणार आहे त्या चित्रपटातल्या शेवटच्या गाण्याबद्दल. चित्रपट बघण्याआधी मी फक्त 'पल पल...' हेच गाणं ऐकलं/पाहिलं होतं. डि.व्ही.डी. आणल्यावर चित्रपटातली गाणी वारंवार बघितली. चारी बाजूंनी आग लागलेली असताना जीव वाचवण्यासाठी लाकडांच्या ओंडक्यांखाली गवतात लपून बसलेले नायक-नायिका आणि बाहेर हत्यारबंद व्हिलनमंडळी - या पार्श्वभूमीवर 'मिले, मिले दो बदन' हे गाणं टाकण्याच्या गोल्डीच्या आयडीयाच्या कल्पनेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दुर्दैवाने संगीत गाजलं असलं तरी हा चित्रपट आपटला. कदाचित अगदीच बालीश कल्पनांवर आधारित असल्यानं असेल (तिरसट वैज्ञानिक, त्याचा सौर ऊर्जेविषयक संशोधन आणि शोध, वगैरे).

'कहीं और चल' हा चित्रपट दिग्दर्शित केल्यावर फायनॅन्सरकडून फसवणूक वाट्याला आलेल्या गोल्डीने नायक म्हणून कारकीर्द उताराला लागलेल्या देव आनंदला 'जॉनी मेरा नाम' मार्गे यश मिळवून दिलं. दुर्दैवाने या नंतर तूलनेने माफक यशस्वी ठरलेले 'तेरे मेरे सपने' आणि 'राम-बलराम' वगळता यशाने त्याच्याकडे नेहमी पाठच फिरवली.

'तेरे मेरे सपने' बरोबरच त्याने अनेक चित्रपटात नायकाची भूमिकाही केली, पण त्यातले 'मै तुलसी तेरे आंगन की' आणि कोरा कागज' हे दोनच उल्लेखनीय म्हणावे लागतील. दुर्दैवं असं, की त्यातही त्याच्याबरोबर असलेल्या अभिनेत्री - अनुक्रमे नूतन-आशा पारेख आणि जया भादुरी - भाव खाऊन गेल्याने तो या दोन सिनेमातही अभिनेता म्हणून दुर्लक्षितच राहिला.


कालांतराने त्याने 'तहकीकात' या दूरदर्शन मालिकेत डिटेक्टिव्ह सॅमच्या रूपात आपल्यातल्या अभिनयाची पुन्हा एकदा चुणूक दाखवली.

एव्हाना 'गाईड'मध्ये गोल्डीने ज्याला दगडाचा देव करून शेंदूर फासला त्या देव आनंदने चक्र उलटं फिरवून देवाचा दगड आणि मग दगडाची खडी करून त्यावर एव्हाना डांबरही फासला होता. आपल्याला दिग्दर्शन येतं या समजातून त्याने स्वतः ते करायला सुरुवात केली. प्रसिद्ध पत्रकार शिरीष कणेकर यांनी त्याला एकदा देव आनंदला 'गोल्डीला तो त्याचे चित्रपट दिग्दर्शित करायला का सांगत नाही' असं विचारलं असता त्याने "गोल्डी तो मोटा हो गया है" आणि "गोल्डी डायरेक्ट करेगा तो फिर मैं क्या करुंगा?" अशी दोन अचाट आणि अतर्क्य उत्तरं दिली. तेव्हा त्यांच्यातलं गोल्डी दिग्दर्शन करणार आणि देव अभिनय हे नातंही संपुष्टात आलं होतं.

चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होता. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला.

विजय आनंदने हिंदी चित्रपटसृष्टीला काय दिलं ह्याचं उत्तर सोप्प आहे. एक किस्सा सांगतो. अमर-अकबर-अँथनी मधली रक्तदान वगैरे दृश्यांचा संदर्भ देऊन एकाने मनमोहन देसाईंना "तुम्ही असले आचरट सिनेमे का बनवता?" असं विचारलं असता त्यांनी "हिंदी चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकाचं सरासरी मानसिक वय तेरा आहे असं आम्ही मानतो" असं उत्तर दिलं होतं. कुठल्या आधारावर त्यांनी हे विधान केलं होतं बाप्पा जाणे, पण ते खरं असेल तर ते तेरापर्यंत खेचून आणण्याचं श्रेय गोल्डीला निर्विवादपणे द्यावं लागेल.

अशा या गुणी दिग्दर्शकाला २३ फेब्रुवारी २००४ रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घ्यायला लावला. असं म्हणतात की देव आनंद आपल्या सबंध आयुष्यात फक्त दोनदा रडला. पहिल्यांदा त्याची आई गेली तेव्हा आणि दुसर्‍यांदा विजय आनंद गेला तेव्हा.

"हा चित्रपट पुन्हा बनवायचा झाला तर नायकाच्या भूमिकेसाठी सद्ध्याच्या अभिनेत्यांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतो?" रेडिओ मिर्ची पुरस्कृत पुरानी जीन्स फिल्म महोत्सवात (२०१०) 'तीसरी मंझील' च्या प्रदर्शनाच्या वेळी शम्मी कपूरला एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला. "मला नाही वाटत हा चित्रपट पुन्हा कुणी बनवू शकेल" प्रचंड आत्मविश्वासाने क्षणाचाही विलंब न लावता शम्मी ताडकन् उत्तरला. २००७ साली आलेल्या जॉनी गद्दार चित्रपटात एक पात्र 'जॉनी मेरा नाम' हा सिनेमा बघत असल्याचे दृश्य आहे. विजय आनंदला वाहिलेली ही श्रद्धांजली होती.



ज्याचे चित्रपट आजही निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक यांना स्फूर्तीस्थान ठरतात पण क्वचितच त्याच्या एवढी उंची गाठू शकतात अशा या ओजस्वी कलावंताला माझा सलाम!



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ: ज्वेल थीफ, तीसरी मंझील, ब्लॅकमेलच्या व्ही.सी.डी. आणि डी.व्ही.डी., माझे चित्रपट प्रेम, तसंच आंतरजालावरील अनेक.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पहिला लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत: ऋषिकेश मुखर्जी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Wednesday, October 20, 2010

मनोरंजनाचे घेतले व्रत: ऋषिकेश मुखर्जी

अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने पूर्वप्रकाशित हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

आपल्याला एखादा चित्रपट आवडण्याची कारणं अनेक असू शकतात. कुणाला एखाद्या चित्रपटातली हाणामारी आवडेल तर कुणाला भावनिक संवाद, कुणाला त्यातलं चित्रिकरण आवडेल, कुणाला अभिनय आवडेल, तर कुणाला आणखी काही. पण एक कारण सनातन आहे आणि ते म्हणजे चित्रपटात आपल्या दैनंदिन जीवनाचं प्रतिबिंब दिसणं. ज्या चित्रपटात ते दिसतं तो त्या प्रेक्षकाच्या भावविश्वाचा एक अविभाज्य अंग होऊन जातो.

पण मनुष्यस्वभावाची एक गंमत आहे. हे प्रतिबिंब चित्रपट बघताना आपल्याला उपदेशाच्या स्वरूपात नको असतं. दोषारोप करणारं बोट दाखवून आपल्या वागण्यातली विसंगती जाणवून दिलेली आपल्याला आवडत नाही. आपल्याला हवी असते ती करमणूक. इथे प्रवेश करतं ते हलक्याफुलक्या विनोदाच्या माध्यमातून सामाजिक विषय मांडण्याचं कसब. हे कसब चित्रपटसृष्टीत अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच चित्रकर्त्यांना साधलं. त्यांपैकी एक म्हणजे या लेखाचे उत्सवमूर्ती ऋषिकेश मुखर्जी. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी करण्यात ज्या अनेक गुणी बंगाली कलावंतांचा सिंहाचा वाटा आहे त्यातले एक उत्तुंग व्यक्तिमत्वं म्हणजे ऋषिदा.
मूळचे कलकत्त्याचे असलेल्या मुखर्जी यांनी सुरवातीला पोटापाण्याच्या सोयीसाठी काही काळ प्राध्यापकी केली. पण चित्रपटक्षेत्रात नाव कमवायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. आजच्यासारखेच त्याकाळीही अनेक तरूण आवड आहे, गती आहे म्हणून या बेभरवशाच्या आणि तूलनेने स्थिरता नसलेल्या व्यवसायात आत्मविश्वासाने उडी मारत. असंच साहस करत ऋषिदांनीही या मायावी दुनियेत प्रवेश केला. बी. एन. सरकार यांच्या कलकत्ता मधल्याच न्यु थियेटर्स मध्ये त्यांनी कॅमेरामनची नोकरी पत्करली. मग काही काळाने कैंचीदा म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या काळच्या प्रख्यात सिनेसंकलक सुबोध मित्तर यांच्याकडे त्याच संस्थेत संकलनकौशल्य आत्मसात केलं. अखेर ते ज्या संधीची वाट बघत होते ती संधी त्यांच्याकडे चालून आली. बिमल रॉय यांच्या सिद्धहस्त मार्गदर्शनाखाली दो बिघा जमीन या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक या नात्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मुखर्जींचा प्रवेश झाला. या चित्रपटाचं संकलनही त्यांनीच केलं.


ऋषिदांना स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शन करण्याची पहिली संधी मिळाली ती १९५७ सालच्या मुसाफिर पासून. दिलीप कुमार, किशोर कुमार, केष्टो मुखर्जी, सुचित्रा सेन, उषा किरण, दुर्गा खोटे अशा अनेक कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट वास्तविक तीन कथांची गुंफण होती. आपल्या पहिल्याच चित्रपटात असा प्रयोग करणं हे अत्यंत धाडसाचं आणि म्हणूनच कौतुकास्पद होतं. मुसाफिर बॉक्स ऑफिसवर आपटला असला, तरी मुखर्जींच्या दिग्दर्शनकौशल्याने प्रभावित झालेल्या राज कपूरने त्यांच्याकडे आर.के स्टुडिओच्या अनाडीचं दिग्दर्शन सोपवलं.

साधंसोपं कथानक, सामाजिक संदेश, आणि मर्यादित पण रोचक व्यक्तिरेखा असलेला अनाडी प्रचंड लोकप्रिय झाला. दुग्धशर्करा योग असा की त्याने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही वाहवा मिळवली. त्या वर्षीचा उत्कृष्ठ दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार हुकला असला तरी अनाडीला आणि त्याच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या कलावंतांना मिळून तब्बल पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. मुखर्जींच्या या दुसर्‍याच चित्रपटाने त्यांना दिग्दर्शक म्हणून लोकमान्यता मिळवून दिली. या धवल यशानंतर ऋषिकेश मुखर्जींनी मागे वळून पाहिलंच नाही.

 

सामाजिक आशय असलेला किंवा एखादा संदेश देणारा चित्रपट हा सुरवातीपासून शेवटापर्यंत गंभीरच असायला हवा असा एकेकाळी निर्माता-दिग्दर्शक आणि समीक्षकांचा समज होता. असे चित्रपट म्हणजे एक तर अडीच-तीन तास प्रेक्षकांना रडवायचं किंवा लांsssब चेहरा करून बसायला भाग पाडायचं या त्याकाळच्या (आणि कमी-अधिक प्रमाणात आजच्याही) चित्रपटीय प्रथेला  मुखर्जी यांचे चित्रपट म्हणजे सणसणीत अपवाद ठरले. 'प्रेक्षकांची करमणूक' या बाबतीत कुठेही कमी न पडता गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे ताकदीने सादरीकरण हे मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ठ्य होतं.

सत्यकाम या चित्रपटात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर उद्भवलेल्या एकंदर सामाजिक परिस्थितीने आपल्या आदर्शांच्या झालेल्या ठिकर्‍या आणि मूल्यांची पदोपदी चाललेली चेष्टा-अपमान पाहून व्यथित झालेल्या तरुणाची कथा, नमक हराम मधील कामगारवर्गाचा संघर्ष, अभिमान मधल्या पती-पत्नीं मध्ये पुरुषी अहंकारामुळे झालेला बेबनाव असे अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे प्रभावीपणे सादरीकरण करून मुखर्जी यांनी ते चित्रपट तितकेच मनोरंजकही होतील याची पुरेपूर काळजी घेतली. अशोक कुमार आणि संजीव कुमारच्या अभिनयानं नटलेला आशीर्वाद, धर्मेंद्रचा अनुपमा, बलराज सहानी अभिनीत अनुराधा यासारखे वेगळे चित्रपटही सरळ सरळ धंदेवाईक सिनेमांमध्ये मोडणारे नसले तरीही ते अजूनही तितक्याच आवडीने बघितले जातात ते याच कारणाने. या पैकी 'अनुराधा'ला  १९६१ साली उत्कृष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि जर्मनीतल्या गोल्डन बेअर पुरस्कारासाठी नामांकितही झाला.

धर्मेन्द्रची पहिली ओळख आजच्या प्रेक्षकांना होते ती प्रामुख्याने त्याच्या जेम्स बाँड छाप मारधाडपटांतूनच. अशा चित्रपटांपासून धर्मेन्द्रप्रेमाची सुरवात होणारा त्याचा चाहतावर्ग सत्यकाम आणि अनुपमा या चित्रपटांमधला त्याचा नियंत्रित आणि संयत अभिनय पाहून आश्चर्यचकित होतो. या दोन्ही चित्रपटांतला धर्मेंद्रचा सशक्त अभिनय बघून इंग्रजीत ज्याला director's actor म्हणतात ते नक्की काय ते नेमकं समजतं आणि इथेच ऋषिदांच्या प्रतिभेसमोर आपण नतमस्तक होतो. गुड्डीतला सिनेनटाच्या रंग फासलेल्या चेहर्‍याआड दडलेल्या माणसाचं दर्शन घडवणारी धर्मेन्द्रची भूमिका आणि जया भादुरीच्या अभिनयाला असलेल्या 'द गर्ल नेक्स्ट डोअर' च्या प्रतिमेमुळे आलेल्या मर्यादा या चित्रपटात एक बलस्थान म्हणून समोर येतात तेव्हा उत्पल दत्त यांच्या प्रोफेसर गुप्तांच्या "जय धर्मेन्द्र" सारखं 'जय हृषिदा' म्हटल्यावाचून राहवत नाही. स्त्रीप्रधान चित्रपटात पूर्वी दिसायच्या त्या रडकथा. पण रेखाने ऋषिदांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या जबरदस्त अभिनयाने गाजवलेले खूबसूरत आणि झूठी हे त्याला सणसणीत अपवाद आहेत.

त्यांच्या अत्युत्तम कलाकृतींमध्ये गणल्या गेलेल्या आनंद (१९७१) मधली कर्करोगग्रस्त आनंद या तरुणाची वेदना ही प्रेक्षकांना फक्त अश्रू ढाळायला लावत नाही. आपण आनंदने केलेल्या विनोदांवर चक्क हसतो देखील. कुठेही लांबलचक संवाद, अकारण लावलेलं पाल्हाळ, आणि सतत उपदेशांचा मारा यातलं काहीही आपल्याला या सिनेमात दिसत नाही. डॉ. भास्कर बॅनर्जीच्या डोळ्यांत आपलं मरण स्पष्ट पाहून आनंद त्यालाच धीर देतो आणि 'बाबूमोषाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहीये!' या साध्यासोप्या शब्दात जगायचं कसं हे शिकवून जातो. या चित्रपटात आपल्याला राजेश खन्नातला सुपरस्टार दिसत नाही, आपल्याला दिसतो तो आतड्याच्या कर्करोगाने हळू हळू मरणाकडे खेचला जात असतानाही इतरांचेच अश्रू पुसणारा आनंद. आपला प्रेमभंग विसरून मित्राचं, डॉ. भास्करचं प्रेम जुळवायला झटणारा आनंद. आणि 'मौत तू एक कविता है...मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको' म्हणत मृत्यूशी काव्यमय मैत्री करणारा आनंद. यानंतर १९७२ साली आलेल्या बावर्ची मधल्या प्रमुख भूमिकेसाठी राजेश खन्नाची निवड निश्चित झाली तेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या यशोशिखरावर होता. अशा या सुपरस्टारला अर्ध्या बाहीच्या खाकी शर्ट आणि अर्ध्या विजारीत, डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर टॉवेल या अवतारात ऋषिदांनी दाखवण्याचं धाडस केलं. आनंद प्रमाणेच या चित्रपटातही राजेश खन्नाने साकारलेल्या नायकाला 'नायिका' नाही! देवळात प्रवेश करताना आपली पादत्राणं बाहेर काढून जावं तसं ऋषिदांच्या कॅमेर्‍यासमोर येण्याआधी 'स्टार'पदाच्या चपला आपोआप काढल्या जात त्या या अशा. सबकुछ राजेश खन्ना असलेल्या साध्यासुध्या आनंद इतकाच त्याचा बावर्चीही आपल्याला अंतर्मुख करतो आणि कुठेही प्रचारकी भाषा न वापरता एकत्र कुटुंबव्यवस्थेचे फायदेही दाखवून देतो.

व्यक्तिरेखांमधे रंग भरणे हा ऋषिदांच्या दिग्दर्शनकौशल्याचा एक महत्त्वाचा पैलू. त्यांच्या चित्रपटांत छोट्या भूमिका करणारे कलाकार आणि त्त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा ठळपणेही लक्षात राहतात. आनंद मधला जॉनी वॉकरचा इसाभाई सुरतवाला म्हणजेच 'मुरारीलाल' आणि आसित सेनचा औषधखाऊ सेठ चंद्रनाथ, काली बॅनर्जीने साकारलेली बावर्ची मधली आधी कृष्णावर जळणारी आणि मग तिची बाजू घेऊन आपल्याच आईशी भांडणारी मीता, बावर्चीमधलाच बायल्या नृत्यशिक्षक गूफी पेंटल, चित्रपटात काम मिळेल म्हणून गावाहून पळून आलेला आणि स्वप्नभंगाचं दु:ख आईपासून लपवणारा असरानीचा गुड्डीतला कुंदन, चुपके चुपके मधे धर्मेन्द्रने ".....जी ओ गू क्युं नहीं होता?" म्हणताच नाकाला पदर लाऊन उठणारी उषा किरण, अभिमान मधला डेव्हीडचा ब्रिजेश्वर राय, गोलमाल मधला युनुस परवेझचा नाकात बोटं घालणारा बडे बाबू, इन्स्पेक्टरच्या भूमिकेतला ओमप्रकाश....अशी उदाहरणं असंख्य आहेत. ही माणसं त्यांच्या लकबी, स्वभाववैशिष्ठ्यांसह आपल्याला आजही आठवतात ती त्यांच्या सुंदर व्यक्तिरेखाटनामुळे.

कितीही मोठा नट असो, फारशा चौकशा न करता जगन्मित्र असलेल्या ऋषिदांच्या चित्रपटात काम करायला नेहमीच उत्सुक असे. राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या त्याकाळच्या 'स्टार' अभिनेत्यांबरोबर त्यांनी एका पेक्षा एक सरस चित्रपट दिले. त्यापैकी अमिताभने त्यांच्याकडे सर्वाधिक चित्रपट केले. मुखर्जींची जादू अशी, की आपल्या सुपरस्टार पदाचा जराही अभिमान न बाळगता अमिताभने त्यांच्या अनेक चित्रपटात अगदी छोट्या म्हणजेच २-३ मिनिटांच्या पाहुण्या भूमिकाही केल्या. आठवा: गोलमाल चित्रपटातल्या 'सपने में देखा सपना' या गाण्यात अमोल पालेकर सुपरस्टार झाल्यावर भाव घसरलेला, फुटपाथवर बसलेला निराश अमिताभ. सुपरस्टार देव आनंद हा उत्कृष्ठ अभिनेता म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हता. मात्र जेव्हा जेव्हा त्याच्यातला अभिनय काढून घेणारा दिग्दर्शक मिळाला तेव्हा तेव्हा त्याचा अभिनय नावाजला गेला. ऋषिदांनी देवला दिग्दर्शित केलेल्या असली नकली मधे त्याने केलेला नैसर्गिक अभिनय हे त्याचंच एक उदाहरण आहे.

चित्रपटाची कथा आणि विषय कुठलाही असला तरी ऋषिकेश मुखर्जी यांचे बहुतेक सगळे चित्रपट निखळ कौटुंबिक करमणूक म्हणूनच ओळखले जातात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या चित्रपटातील साधेपणा व त्यांनी माणसांचे आपापसातले नातेसंबंध यांचे अत्यंत तरलतेने पडद्यावर केलेले सादरीकरण. मुखर्जी यांना वरवर साध्या आणि सोप्या घटना प्रसंगांची पडद्यावर मांडणी करणं जास्त कठीण आहे हे ठाऊक असूनही ते अशाच आव्हानात्मक विषयांमध्ये अधिक रस घेत. त्यांच्या चित्रपटांमधून दिल्या जाणार्‍या संदेशांची कटूता आणि बटबटीतपणा संपूर्णपणे वर्ज्य करुन मनोरंजनरूपी साखरेच्या गोड वेष्टनात गुंडाळूनच दिली गेली पाहीजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. इंग्रजीत जे रचना तत्व (design principle) म्हणून वापरलं जातं ते K.I.S.S. म्हणजेच Keep it Simple, Stupid या तत्वाचा अनेक दिग्गज समीक्षकांच्या मते हिंदी चित्रपटांमध्ये मुखर्जी यांच्या इतका उपयोग कुणीच केला नसेल, अपवाद असलाच तर तो फक्त बासू चॅटर्जींचा. मुखर्जीं यांनी व्यावसायिक मसालापटांचा झगमगाट आणि कलात्मक चित्रपटांतलं अंगावर येणारं वास्तव या दोन्हीत सुवर्णमध्य साधला. आपल्या प्रत्येक निर्मितीत सर्वसामान्य माणसाची बदलती मानसिकता प्रतिबिंबित केल्याने त्यांचे बहुसंख्य चित्रपट प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत ठरले यात काही नवल नव्हे.
मुखर्जी यांचे सुरवातीचे चित्रपट हे विचारप्रवर्तक, सामाजिक किंवा गंभीर कथा असणारे असले, तरी त्यांच्या कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात त्यांनी त्याबरोबरच अनेक विनोदी आणि करमणूकप्रधान चित्रपटांची मालिकाच सादर केली.

विनोदाच्या एका विशिष्ठ शैलीला मी वुडहाऊस शैली असं म्हणतो. पी. जी. वुडहाऊस यांच्या गोष्टी वाचताना हळू हळू वातावरणनिर्मिती होऊन एका क्षणी फिसकन् हसू येतं किंवा हास्यस्फोट होतो. या शैलीचं दुसरं वैशिष्ठ्य असं की विनोदनिर्मितीसाठी काही ओढून ताणून विशेष प्रयत्न केले गेले आहेत असं वाटत नाही. कथेतल्या पात्रांच्या संवादांमधून आणि कथा जशी उलगडते त्यातून जी स्वाभाविक आणि सहज वातावरणनिर्मिती होते त्याचा ह्या हास्यस्फोटात महत्त्वाचा वाटा असतो. या प्रकारच्या विनोदांनी जर सभ्यपणाबरोबरच सुसंस्कृतपणाही जपला तर त्यांचा सगळ्या कुटुंबाबरोबर आनंद घेता येतो. हीच शैली चित्रपटांसारख्या वेगळ्या माध्यमातही आपल्याला दिसते.
मुखर्जी यांच्या चित्रपटांत हीच शैली आपल्याला प्रकर्षाने जाणवते. काही सन्माननीय अपवाद वगळता आजचे तथाकथित विनोदी चित्रपट बघितले तर प्रेक्षकांकडून हशा वसूल करायला आचकट-विचकट हावभाव, विचित्र अंगविक्षेप, किंवा सरळ सरळ घाणेरडी भाषा यांचाच प्रामुख्याने आधार घेतलेला आढळतो. मध्यमवर्गाची नाडी अचूक ओळखलेल्या मुखर्जी यांनी चुपके-चुपके, गोलमाल, नरम-गरम, रंग बिरंगी या त्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये कुठेही असले प्रकार तर वापरले नाहीतच पण द्वैअर्थी किंवा अश्लील संवादांना जवळजवळ पूर्णपणे फाटा देऊन सकस व अभिरूचीपूर्ण विनोदनिर्मिती केली. शिवाय नायक हा एक तर 'बस्ती में रहने वाला' अत्यंत गरीब किंवा मग महाल सदृश्य बंगल्यात राहणारा गर्भश्रीमंत" अशा टोकाच्या प्रकारांच्या वाट्याला क्वचितच जाऊन, मध्यमवर्गाचे यथार्थ दर्शन घडवलं.

समाजाच्या एखाद्या वर्गाचं जगणं सिनेमात दाखवणं म्हणजे तो राहतो ते घर, तो वावरतो ती ठिकाणं आणि आजूबाजूची माणसं समानशीले व्यसनेषु सख्यम् आहेत की नाही एवढंच मर्यादित जग दाखवणं नव्हे. त्यांचं हात-पाय धुताना, पाणी पिताना, सिगारेट ओढताना, चालताना, कपडे घालताना या आणि अशा दैनंदिन गोष्टींच दर्शनही तितकंच प्रत्ययकारी व्हायला हवं. ऋषिदांनी या वातावरणनिर्मितीत किती प्राविण्य मिळवलं होतं ते सांगायला गोलमाल या चित्रपटातलं उदाहरण प्रातिनिधिक ठरावं. चित्रपटाच्या सुरवातीला अमोल पालेकर घरी येतो, एका तंद्रीत आणि उत्साहात धाकट्या बहिणीला मॅचबद्दल सांगत असतो. तिला जेवण वाढायला सांगून बाथरूममध्ये हात-पाय धुतो, आणि बाथरूमचं दार तसंच उघडं ठेऊन टेबलाशी येऊन बसतो. दोन सेकंदांनी गप्पा चालू ठेवत बहीण त्याला खायला देते आणि दार ओढून घेते. आपल्या सर्वांवरच लहानपणापासून घरातल्या आई-आजी आणि इतर मोठ्यांकडून तिन्हीसांजेला काय करावं काय करु किंवा बोलू नये याचे संस्कार झालेले आहेत. बावर्ची मधे 'ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांचाच विश्वास आपल्यावर नाही...यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांबरोबर अपघातात मेलो असतो तर बरं झालं असतं' असं रडवेली झालेली कॄष्णा (जया भादुरी) सांगते. हे ऐकल्यावर दुर्गा खोटे सात्त्विक संतापाने त्यांच्या खास ठसक्यात "सुनोsss, शाम के वक्त लडकी की बातें सुनो" म्हणतात तेव्हा आपल्याला याच संस्कारांचं मायाळू रूप दिसतं.

नर्मविनोदी संवादांची पखरण असलेला गोलमाल इतका लोकप्रिय झाला, की सलग एका चित्रपटगृहात पाच वर्ष धो धो चालणारा सिनेमा अशी ज्याची ख्याती त्या शोले या अफाट लोकाश्रय लाभलेल्या सिनेमासमोरही त्याने तिकीटबारीवर दणक्यात धंदा केला. रूढ अर्थाने 'हीरो' या संकल्पनेत न बसणार्‍या अमोल पालेकर सारख्या अभिनेत्यालाही या चित्रपटाने हिंदीत चांगलीच लोकप्रियता मिळाली, तसंच उत्पल दत्त यांच्या सारख्या मातब्बर अभिनेत्याने चरित्र अभिनेताही कशाप्रकारे उत्कृष्ठ दर्जाचा विनोदी अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं.

ह्याच दोन कलाकरांना घेऊन कुठेही तोचतोचपणा न जाणवू देता त्यांनी नरम गरम व रंगबिरंगी हे धमाल चित्रपट सादर केले. चुपके चुपके या चित्रपटात तर त्यांनी धमालच उडवून दिली. तो पर्यंत 'अँग्री यंग मॅन' आणि अ‍ॅक्शन हीरो म्हणून मान्यता पावलेल्या अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांनी या चित्रपटात असरानी, ओमप्रकाश व केष्टो मुखर्जी यांच्यासारख्या नावाजलेल्या विनोदी अभिनेत्यांच्या तोडीस तोड विनोदी अभिनय केला, याचं श्रेय अर्थातच मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाला जातं. याच मालिकेतला १९९८ साली आलेला झूठ बोले कौवा काटे हा खास ऋषिदा पठडीतला नर्मविनोदी चित्रपट मात्र सपशेल आपटला. झूठ बोले कौवा काटे अयशस्वी होण्यामागे कदाचित सिनेरसिकांची बदलेली (की बिघडलेली?!) अभिरुची आणि पात्रनिवड (उत्पल दत्तला पर्याय म्हणून अमरीश पुरी आणि अमोल पालेकरला पर्याय म्हणून अनिल कपूर) ही कारणं असू शकतील. नर्मविनोदी चित्रपटांबाबत बोलताना दीप्ती नवल आणि फारुख शेख या त्याकाळच्या अनोख्या हिट जोडीने धमाल उडवून दिलेला किसीसे ना कहना हा चित्रपट आपण विसरूच शकत नाही. यातही उत्पल दत्त यांनी त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने कहर केला होता.
दिग्दर्शनाबरोबरच गाण्यांच्या नितांतसुंदर चित्रिकरणामध्येही त्यांनी प्राविण्य मिळवलं होतं. गुड्डी चित्रपटातलं 'हम को मन की शक्ती देना' तसंच आनंद मधील 'कहीं दूर जब दिन ढल जाए' ही दोनच उदाहरणं आपल्याला याची ग्वाही देण्यास पुरेशी आहेत. त्यांच्या सिनेमात कुठेही गाणी 'घातली आहेत' असं वाटत नाही. ती कथानकाचा एक भाग होऊन किंवा कथा सांगण्याचं एक माध्यम बनून ती आपल्यापुढे सादर होतात. हे कौशल्य त्यांच्या व्यतिरिक्त फक्त विजय आनंद उर्फ गोल्डी ला साधलं होतं.

दूरदर्शनचा प्रभाव वाढू लागल्यावर मुखर्जी यांनी तलाश, हम हिंदुस्तानी (यात दादामुनी डॉक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसले), धूप छांव, रिश्ते आणि उजाले की ओर यासारख्या मालिकांद्वारे छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला. त्यांनी सेन्सॉर बोर्ड व एन.एफ.डी.सी या दोन संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. चित्रपटक्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने या प्रतिभावंत कलावंताला १९९९ साली गौरवण्यात आलं. २००१ साली चित्रपटक्षेत्रातल्या कामगिरी बद्दल ऋषिदांना 'पद्म विभूषण' हा देशाचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान देण्यात आला.



ऋषिकेश मुखर्जी हे फक्त उत्कृष्ठ दिग्दर्शकच नव्हे, तर एक सहृदय 'बॉस'ही होते याचं एक उदाहरण मंजू सिंग यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. गोलमाल मधे अमोल पालेकर यांच्या धाकट्या अविवाहीत बहिणीची भूमिका साकारणार्‍या मंजू सिंग या प्रत्यक्षात दोन मुलींची आई होत्या. या गोष्टीची जाणीव असलेले मुखर्जी इतर जेष्ठ कलाकारांना सरळ सांगत, "मी हिचा सहभाग असलेली दृश्ये आधी चित्रीत करणार आहे म्हणजे तिला लवकर घरी जाता येईल."
रोमँटिक दृश्ये आणि पती-पत्नींमधले नाते यांचे सुंदररित्या चित्रिकरण करणार्‍या मुखर्जी यांची पत्नी मात्र त्यांच्या आधी ३० वर्ष हे जग सोडून त्यांना एकटं करून गेल्या. त्यांचा एक मुलगा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दम्याचा तीव्र झटका येऊन मरण पावला. त्यांना तीन मुलीही आहेत. प्राणीप्रेमी असलेले मुखर्जी आपल्या बांद्र्याच्या सदनिकेत आपल्या काही पाळीव कुत्र्यांच्या आणि क्वचित भेट देणार्‍या एखाद्या मांजराच्या सहवासात राहत. मुले आणि नातेवाईक येऊन-जाऊन असले, तरी ते आपल्या आयुष्याची शेवटची काही वर्ष घरात एकटेच होते - सोबत असलीच तर हेच पाळीव प्राणी व काही नोकर यांची.

"ये दुनिया एक रंगमंच है और हम सब उसमे काम करनेवाली कठपुतलीयां है" असा काहीसा संवाद आनंद मधे आहे. योगायोग असा की ऋषिकेश मुखर्जींनी या जग नामक रंगमंचाचा निरोप घेतला तो याच चित्रपटातली अजरामर गाणी गाणार्‍या मुकेशच्याच स्मृतीदिनी. मूत्रपिंडाचा विकार बळावल्याने ऋषिदांचं २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झालं.

आजच्या चित्रपटांत सर्वसामान्य माणूस कुठेही दिसत नाही. दिसतो तो नुसता चकचकाट. गाण्यांत दिसतं तो आधुनिकतेच्या नावाखाली ठेक्याला आलेलं अवास्तव महत्त्व, वाद्यांचा गदारोळ, आणि आचकटविचकट नाच. नात्यांचं साधंसोपं भावस्पर्शी चित्रिकरण लोप पावलंय आणि त्याच्या जागी आलं आहे ते स्वार्थासाठी एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे संवाद. हळुवारपणे प्रेम व्यक्त होणं कधीच संपलं आहे. त्याजागी आलं आहे ते 'लोकांना हवं ते आम्ही दाखवतो' च्या नावाखाली हवं ते ओरबाडून घेण्याची चटक लावणारी वासनांधता. शिव्याशाप आणि अश्लीलतेने ओतप्रोत भरलेले संवाद आज विनोदाची झूल पांघरून आमच्यावर अधिराज्य करु पाहत आहेत. निखळ विनोद तर औषधालाही नाहीत. ही अशी अंगावर येणारी करमणूक पाहिली की जीव गुदमरतो आणि मग कळवळून म्हणावसं वाटतं, "ऋषिदा, तुम्ही परत या हो!"
 



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संदर्भः आंतरजालावरील अनेक संकेतस्थळं व माझे चित्रपटप्रेम.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

दुसरा लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत | विजय आनंद उर्फ गोल्डी

Friday, September 3, 2010

किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू


मला आवडणार्‍या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं. तसंच त्यानं गायलेली इतर मराठी गाणी शोधायची होती. पण...आळस, आळस, आणि आळस!! या आळसाला लवकरच शॉक ट्रीटमेंट मिळाली....


* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

"अश्विनीssss येsss नाssss" आमच्या ऑफिसच्या बस मधला डेक दणाणला आणि माझे हातपाय बसल्याजागी थिरकू लागले. अनेक दिवस कॅबचालक आणि कंपनी व्यवस्थापनाच्या मागे लागल्यावर अखेर आमच्या बसमधे एकदाचं डेक विराजमान झालं आणि ऑफिस आणि घर यांमधला प्रवास काहीसा सुखकर वाटू लागला.


"अरे, हा किशोर कुमार गातोय की काय!?", मला जुनी हिंदी गाणी ह्या विषयातला जाणकार समजणार्‍या एका सहकर्मचार्‍याने हा प्रश्न विचारला. अशी वासरं असली की आपल्याला सहज लंगडी गाय होता येतं. फक्त खर्‍या जाणकारांसमोर तोंड बंद ठेवायचं म्हणजे आपण सुरक्षित राहतो हे मी अनुभवावरून शिकलोय. आजूबाजूला तसले कुणी घातकी मनुष्यप्राणी नसल्याची खात्री केली आणि एक प्रकारचा गूढ, ज्ञानी वगैरे छाप भाव चेहर्‍यावर आणत मी एका दमात उत्तरलो, "हं, बरोबर. ती गायिका आहे ना ती अनुराधा पौडवाल; संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल होते; १९८७ सालचा गंमत जंमत हा चित्रपट". अनेक वर्षांपूर्वी हा सिनेमा मी चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला असल्याने एवढं ज्ञान मी सहज फेकू शकत होतो.

"कित्ती मज्जा नै, किशोर कुमारने मराठीत पण गाणी म्हटली आहेत? हे एकच का रे?" गाडीच्या मागल्या शिटांच्या दिशेने एच.आर. मधली एका सुबकठेंगणी विचारती झाली. "बहुतेक" अस मोघम उत्तर देऊन गप गुमान बसावं की नाही! पण अप्रेझल जवळ येऊ घातलं होतं, आणि एरवी केलेल्या 'गुड मॉर्निंग'ला साधं उत्तर देण्याची तसदी न घेणारी ती ह्युमन रिसोर्स मधली वुमन मला एकाच वेळी किशोर कुमार आणि मराठी गाणी ह्या विषयातला महत्त्वाचा सोर्स समजू लागली होती. त्यामुळे अप्रेझल्स पर्यंत तरी त्या सुसरबाईची पाठ मऊच राहू द्यावी असा विचार करून अंगात पुरेसा उत्साह आणला आणि "म्हणजे काय, एकच नाही काही, चांगली तीन मराठी गाणी म्हटली आहेत" असं बोलून गेलो. "अय्या चक्क तीन? शप्पथ! कुठली रे?", ताडकन पुढचा प्रश्न आला. हे मात्र अनपेक्षित होतं. बोंबला! करायला गेलो गणपती आणि झाला मारुती!! कधी कधी आपण इंप्रेशन मारायला त्या भावनेच्या भरात बोलून जातो आणि मग ते निस्तरत बसावं लागतं. मस्तपैकी तोंडघशी पडण्याचा प्रसंग उदभवला आहे हे झटकन माझ्या लक्षात आलं. पण माझे ग्रह त्या दिवशी उच्चीचे असावेत. हा प्रश्न माझ्यावर आदळायला आणि महामार्गावर आमच्या गाडीसमोर एक दुचाकीस्वार तेलाच्या तवंगावरून घसरून अक्षरश: तोंडघशी पडायला एकच गाठ पडली आणि मला सगळ्यांच लक्ष तिकडे गेल्याचा फायदा मिळाला.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

पण अशी सुटका काही वारंवार होणार नव्हती. ती बया मला 'अ‍ॅट दी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी' गाठणार हे निश्चित होतं. तेव्हा तत्पूर्वी जरा आपल्या माहितीचं रूपांतर ज्ञानात केलेलं नक्कीच चांगलं असं वाटून जुन्या वर्तमानपत्रांची कात्रणं, पुस्तक वाचन, आणि अर्थातच माहितीसाठी आंतरजालावर फेरफटका अशा तर्‍हेने अस्मादिकांच संशोधन सुरु झालं. आंतरजालावर संगीताला वाहून घेतलेल्या अनेक फोरम्सना भेट देताना खूप मजा वाटली. त्यात एक अत्यंत आनंदाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कुमार सानू आणि हिमेशच्या अनुक्रमे सानूनासिक आणि भयाण स्वरांवर पोसलेल्या आजच्या तरुण पिढीलाही चांगलीच भुरळ घातली आहे. एवढंच नव्हे तर किशोर कुमारच्या एकट्याच्या नावाने निघालेल्या अनेक फोरम्सचे आणि कम्युनिटीजचे बहुतांश सदस्य तरुण तुर्क आहेत.

म्हणजेच किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

किशोर कुमारने हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण त्याची मराठी गाणी किती? हा प्रश्न विचारला तर अनेकांच उत्तर "एकच" असं येऊन "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याचा विषय निघेल. आता तुम्ही म्हणाल की किशोरचा विक्षिप्त स्वभाव आणि कंजूषपणाबद्दल बोलता बोलता गाडी त्याच्या मराठी गाण्यांवर कुठे बरं आली? ह्या दोन गोष्टींचा काय संबंध? थांबा. सांगतो.

किशोरने गायलेल्या एकूण तीन मराठी गाण्यांपैकी हे गाणं सर्वाधिक वेळा वाजवलं आणि दाखवलं गेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा ते टि.व्ही. वर दिसलं आहे तेव्हा तेव्हा पडद्यावरच्या अशोक सराफ आणि चारूशीला बरोबरच पडद्यामागे म्हणजेच रेकॉर्डिंग स्टुडीओमध्ये किशोरदा आणि अनुराधा पौडवाल हेही बागडताना दिसले आहेत. ह्यामुळे किशोरने मराठीत फक्त एकच गाणं गायलंय हे अज्ञान पसरायला फारसा वेळ लागला नाही. अर्थातच बाकीची गाणी आहेत तरी कोणती हे मात्र फारसं कुणी सांगू शकणार नाही हे ओघानं आलंच.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

"ए, शुक्रवारी त्या अ‍ॅक्सिडेंटच्या भानगडीत मी तुला परत विचारायचं विसरलेच", सोमवारी सकाळी कँटीनमध्ये चहा पीत असताना मला त्या बयेनं गाठलंच. "कोणती रे ती किशोरची बाकीची दोन गाणी?"

पण आता अस्मादिक पूर्ण तयारीत होते. पुन्हा त्याच दिवशीच्या उत्साहात मी जवाब देता झालो, "अगं सोप्पय, 'घोळात घोळ' ह्या सिनेमातलं 'हा गोरा गोरा मुखडा' आणि 'माझा पती करोडपती' मधलं 'तुझी माझी जोडी जमली गं' ही ती दोन गाणी". "अरे ही मी ऐकली आहेत, माझी आई लावते बर्‍याच वेळा घरी. पण ती किशोरकुमारनं म्हटली आहेत हे मला माहीतच नव्हतं. थँक्यू हं." असं म्हणून तरंगत निघून गेली.

"अरेच्या, गाणं मराठीत असलं तरी हिला किशोरचा आवाज कसा ओळखू आला नाही?" असा प्रश्न मला अजिबात पडला नाही. कारण मागे एकदा तिनं एक आंतरराष्ट्रीय कसोटी सामना चालू असताना "प्लीज वेलकम सुनील गावसकर इन्टू द कॉमेंट्री बॉक्स" हे वाक्य अर्धवट ऐकल्यावर "अय्या, गावसकर आला का बॅटींगला? अजून खेळतोय म्हणजे कम्मालच नै. काय स्टॅमिना असेल बै या वयात" अशी मुक्ताफळं भर कँटीनमध्ये उधळून अनेकांचा रक्तदाब एकदम लो केला होता. त्यामुळे हिला थोडं डोकं है थोडे की जरूरत है आणि ते परमेश्वराने लवकरात लवकर तिला द्यावं अशी मनोमन प्रार्थना करत मी सोमवारच्या कामाला भिडलो.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

किशोरने गायलेली तीन मराठी गाणी:
(१) अश्विनी ये ना | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट गंमत जंमत (1987) | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर





(२) हा गोरा गोरा मुखडा** | चित्रपट घोळात घोळ (1988) | संगीत दिग्दर्शक अनिल मोहिले | गीतकार सुधीर नांदोडे




(३) तुझी माझी जोडी जमली गं | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट माझा पती करोडपती (1988) | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर





**दुर्दैवाने हे गाणं युट्यूब वर उपलब्ध नाही.