एप्रिलमध्ये रामकथामाला, चित्र ज्ञानेश्वरी या पुस्तकांच्या लेखिका सौ Deepali Patwadkar यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी" हे पुस्तक भेट दिले.
साक्षात दीपालीताईंची भेट आणि वर पुस्तकांच्या खजिन्यात भर टाकायला मिळालेले हे रत्न याने तो दिवस सार्थक झाला!
टीप: मागे भिंतीवर दिसणारी चित्रे दीपालीताईंनीच काढलेली आहेत!
पुस्तक वाचून बरेच दिवस झाले असले तरी त्याबद्दल लिहायला ऑगस्ट अर्थात श्रावण उजाडला. मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही पण मला काय वाटलं ते व्यक्त करतो. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर चर्च आणि मिशनरी यांच्या कारवायांवर अशा एखाद्या पुस्तकाची गरज होती आहे हे पुस्तक ती नक्कीच पूर्ण करते.
सेक्युलर व्यवस्था म्हणजे separation of Church and Government याचा अर्थ आपण असा घेत होतो की चर्चच्या कारवायांत तिथल्या राज्यकर्त्यांचा सहभाग नसावा. पण चर्च आणि मिशनरी आणि व्यापारी कंपन्या, ब्रिटिश आणि सरकार, हे सगळे वेगवेगळे नसून चर्च आणि मिशनरी यांना युरोपातील सरकारे, राजे महाराजे आणि व्यापारी कंपन्या यांचा पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य होते हे या पुस्तकातून स्पष्ट होते.
किंबहुना सुरवातीचा थोडाच काळ वगळला तर वसाहतवादाच्या हेतूंपैकी नेटिव्ह जनतेला धर्मांतर करून ख्रिश्चन करणे हा वसाहतवादाचा अविभाज्य भाग होता ही बाब हे पुस्तक सप्रमाण सिद्ध करते. इतकेच नव्हे तर एतद्देशीय जनता आणि संस्कृतींच्या बाबतीत ब्रिटिश राज्यकर्त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीचा होता की १७७० ते १९४४ पर्यंत साथीच्या रोगांनी आणि घडवून आणलेल्या दुष्काळांत अंदाजे १३ कोटी भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर सांपत्तिक, संस्कृतिक, आणि मानवी जीवनाची मिशनरी आणि ब्रिटीशांनी जितकी हानी केली आहे त्याची गणती होऊच शकत नाही.
हे पुस्तक लहान असले तरी एक लहानसा बॉम्ब आहे, कारण यात प्रत्येक मुद्दा हा संदर्भासकट येतो. तसेच, शेवटी असलेली परिशष्टे ही परिपूर्ण आणि माहितीचा खजिना आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना या पुस्तकाबद्दल जास्तीतजास्त जागृती होणे आवश्यक आहे.
हे पुस्तक भारतीय विचार साधनाच्या संकेतस्थळावर इथे उपलब्ध आहे.
🖊️ मंदार दिलीप जोशी
श्रावण शु दशमी, शके १९४४