Monday, February 11, 2019

का रे भुललासी वरलिया रंगा: अमोल पालेकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रवचन

कालच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकरांनी चित्रकार कै. प्रभाकर बर्वे यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात भलतीच टेप वाजवल्याने आयोजकांनी त्यांना विषयाला धरून बोलायचा आग्रह केला यावरून देशात गदारोळ उडाला (देशात म्हणजे ज्यांना याची काही पडली आहे अशा विश्वात, बाकी आमच्या कामवालीला अमोल पालेकर कोण हे ही माहीत नाही. तर ते असो). अमोल पालेकरांच्या कृत्याचं मुद्देसूद खंडन ते सात्विक संतापातून प्रच्छन्न शिवीगाळ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर उमटल्या.
खूप पूर्वीपासून रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांबद्दल आपल्याकडे प्रचंड गैरसमज दिसून येतात.



यातला प्रमुख गैरसमज असा की विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरातल्या, जातीधर्माच्या, आणि बुद्धीच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या व्यक्तींना आपण सर्वज्ञ समजण्याची चूक करत आलो आहोत. त्यातही तथाकथित कलात्मक चित्रपटांबाबत ते सत्य दाखवतात हा आणि त्यात 'अभिनय' करणारे लोक म्हणजे बुद्धिजीवी आहेत हा सगळ्यात मोठा गैरसमज. गरीब आणि मध्यमवर्गांचं प्रतिबिंब दिसेल असे सिनेमे असतील तर मग काही विचारायलाच नको, लोकांनी डोक्यावर घेतले होते असे सिनेमे. उगाच नाही विक्रमी 'शोले' समोर 'गोलमाल'ने टिच्चून धंदा केला.

याबाबत नसीम निकोलस तलेब या मूळच्या लेबनीज अमेरिकन असलेल्या लेखक, विद्वान, सांख्यिकी तज्ञ, अर्थतज्ज्ञ, शेअर बाजार व्यापारी, वगैरे बरंच काही असणाऱ्या या विचारवंताचे विचार वाचण्यासारखे आहेत. नट नट्यांच्या विषयीचे त्यांचे विचार हे प्रामुख्याने हॉलीवूड अर्थात अमेरिकन चित्रपट उद्योगाशी संबंधित असले तरी कलाकारांची मानसिकता आणि समज ही नेहमीच स्थलातीत असल्याने भारतवर्षातील कुठल्याही चित्रपट उद्योगाला लागू होतात.

तलेब म्हणतात की "चित्रपटसृष्टीत काय घडतं याचा आणि आपण सर्वसामान्य लोक यांचा काहीही संबंध नसतो. तलेब  आपल्याला दोन प्रश्न विचारतात: एक तुमच्या मित्रपरिवारात किती अभिनेते आहेत? किती अभिनेते तुमच्या मित्रांचे मित्र आहेत? यात अस्तित्व आणि प्रचलन (presence and prevalence) यात गल्लत करू नये. काही अपवाद वगळता नटनट्या सामान्य लोकांत मिसळत नाहीत."

"रोमन साम्राज्यात तर नटांना लग्न करायलाही बंदी होती, इतकंच नव्हे तर त्यांना सर्वसामान्य जनतेशी मिसळायलाही बंदी असे. तुम्हाला एखादा स्त्रीरोगतज्ञ आणि इंजिनियर, गवंडी आणि वाहनचालक एकमेकांत मिसळताना दिसतील, पण अभिनेते हे त्यांच्याच जगात मशगुल दिसतात. किती क्षेत्र अशी आहेत जिथे लोकांना त्यांच्या दिसण्यावर आणि आपण जे नाही त्याचा अभिनय करण्यावर काम दिलं जातं? किती क्षेत्रात शरीराचा 'वापर' हा वर चढण्याकरता केला जातो?"

"इतर क्षेत्रातले लोक, उदाहरणार्थ स्त्रीरोगतज्ञ किंवा रेल्वे अभियंते, आपल्याला नैतिकतेची प्रवचनं देताना दिसत नाहीत. खरं तर बाह्य दिसणे यावरच ज्यांचं सगळं जग अवलंबून आहे अशा या प्रत्यक्ष वर्तन आणि वैयक्तिक मते यांच्यात प्रचंड तफावत असलेल्या या लोकांना आपल्याला नैतिकतेचे धडे देण्याचा काहीही अधिकार नाही."
मात्र नटनट्या हीच गोष्ट प्रत्येक सार्वजनिक मंचावर वारंवार करताना दिसतात आणि भोळसट (की बावळट?) लोक त्याला तितक्याच सातत्याने भुलताना दिसतात. याचं कारण म्हणजे नटनट्यांना आपला मंदपणा बाहेर दिसू नये याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यामुळे ते काहीही बडबडले तरी एखादा अत्यंत बुद्धिमान आणि विचारी माणूस आपल्याशी संवाद साधतो आहे असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरतात.

हा कार्यकारणभाव लक्षात घेतला की पैसे टाकून बनवलेला सिनेमा आणि विचारवंतांचा अभिनय करायला वर्षानुवर्ष पोसलेल्या नटनट्यांची अशी हंगामी वक्तव्य यात फारसा फरक उरत नाही हे आपल्याला समजतं.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यातल्या बहुतेकांचा स्वभाव मुळातच विकृत आणि द्वेषाने भरलेला असतो आणि त्याला अनेक वर्ष पद्धतशीर खतपाणी मिळालेलं असतं.

म्हणूनच मग जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, पांढऱ्या केसांचा/ची, भलंमोठं कुंकू लावलेली, दाढीवाला, अशी कोणतीही आजी किंवा माजी नटमोगरी किंवा टोणगा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुता, वगैरे पढवलेली 'पेड' वाक्य बोलताना दिसले की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कारण 'बनवलेला' सिनेमा कुणी बघायलाच गेलं नाही तर तो आपटतो, आणि यांच्या वक्तव्याला भाव दिला नाही की ते हवेत विरून जातं.

आपण फार मनावर न घेता एवढंच लक्षात घ्यायचं ―
तो धंदा असतो आणि हा सुद्धा, फक्त चेहऱ्याला रंग फासून ज्या बाजारात बसायचं त्याचं ठिकाण प्रत्येक पटकथेच्या मागणीनुसार वेगळं असतं इतकंच.



©️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. पंचमी शके १९४०

तळटीप: अपवादांनी वरील विवेचन स्वतःवर ओढवून घेऊ नये.