Friday, March 25, 2016

जितेन्द्र आव्हाड यांस पत्र

ह.भ.प. श्री जितेन्द्र आव्हाड साहेब

को.न.वि.वि.

"फर्ग्युसनची स्थापना शाहू महाराजांनी स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेतून केली..." असे तुम्ही परवा पुण्यात फर्ग्युसन कॉलेजात म्हणालात.

खरं सांगू? तुमची विद्वत्ता पाहून खूप भडभडून आलं हो. गेले अनेक दिवस तुम्ही मनुस्मृती विकणारे स्टॉल शोधण्यात घालवल्याने तुम्हाला फर्ग्युसन कॅालेजचे संकेतस्थळ बघायला आणि त्या महाविद्यालयाचा इतिहास वाचायला वेळ मिळाला नसेल हे मी समजू शकतो. फर्ग्युसन कुणी स्थापन केली हे आपण तपासायला गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की फर्ग्युसनची स्थापना १८८५ साली लोकमान्य बाळगंगाधर टिळक (काही काळापूर्वी सिनेमा नाही का येऊन गेला यांच्यावर, तेच ते), गोपाळ गणेश आगरकर (सिनेमात त्यांच्याबरोबर होते ते), विष्णूशास्त्री चिपळूणकर, व महादेव बल्लाळ नामजोशी यांनी केली. कालांतराने केळकर, धारप, गोळे, व वामनराव आपटे त्यांना येऊन मिळाले. कुठेतरी डायरीत लिहून ठेवा. पुढच्या निवडणूकीत उपयोग होईल.

डेक्कन एजुकेशन सोसायटीचे (यालाच फर्ग्युसन म्हणतात हां)शाहू महाराज अध्यक्ष असले, तरी ते फक्त मानाचे पद आहे. दैनंदिन कामकाजात त्यांचा काही एक संबंध येत नाही. शाहू महाराजांविषयी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे तमाम महाराष्ट्र आदर बाळगतो, पण ते संस्थेचे अध्यक्ष आहेत हे कुणीतरी तुमच्या हळूच कानात येऊन सांगितल्यामुळे शाहू महाराजांबद्दलचा तुमच्या मनातला आदर इतका वाढला, की १८७४ साली जन्मास येऊन वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी आख्खे महाविद्यालय स्थापन केले असे तुमच्या संवेदनशील मनास वाटले. त्यामुळे १८८५ साली फर्ग्युसनच्या स्थापनेच्या वेळी अजून महाराजही न झालेल्या घाटगेकुलोत्पन्न लहानग्या यशवंतरावांचं वय नेमकं किती, हा बारीकसा तपशील तुम्ही लक्षात घेतला नसेल तर ते साहजिकच म्हणावयास हवे.

तेव्हा आव्हाड साहेब, महाराष्ट्रात पडलेले सामाजिक प्रगतीचे प्रत्येक पाऊल हे ओढून ताणून शाहू-फुले-आंबेडकर यांना नेऊन चिकटवण्याचे तुमचे कौशल्य आणि प्रामाणिकपणा वादातीत आहे. पण तुम्ही बोललेले खोटे ठरून तुम्ही असे तोंडघशी पडल्यावर आम्हांस किती वेदना (इथे गुदगुल्या लिहीणार होतो पण.....) होतात म्हणून सांगू! काही खोडकर लोक परवा पासून मराठीतली 'जित्याची खोड...' ही म्हण तुम्ही सार्थ करायचा विचार करत असल्याची अफवा पसरवत होते हो. म्हणूनच सांगतो जरा वाचन वाढवत चला. नाहीतर बसिक मधे राडा होऊन तुमचा 'युवराज' कधी होईल सांगता येणार नाही. असंच चालू राहिलं तर उद्या आंबेडकरांना झालेल्या अंदमानातल्या "काळ्यापाण्या"च्या शिक्षेमुळे "चवदार तळ्याचा" संघर्ष सुचला, किंवा कुटुंबनियोजनाचं कार्य प्रथम फुलेंनी सुरू केलं आणि रं. धों. कर्वे गोट्या खेळत बसले होते असं कुठेतरी बोलून बसाल. का-ही-ही बोलून ते खपायला ये नितीसवाका बिहार नहीं ना है.

"द वेनसडे" चित्रपटात एका अतिरेक्याला जहन्नमला धाडण्याआधी आधी पोलीस अधिकारी "बस हिंदूस्तान में आकर गलती कर दी" असं म्हणतो. तसं "पुण्यात येऊन चूक केलीत राव" अशी तुमच्या सांगलीला आधीच दुखावले गेलेल्या मुखकमलावर पुन्हा प्रहार करताना सगळ्यांची भावना होती. हे पुणेकर महाडांबरट बघा. स्वतःच पाहुणा म्हणून बोलावून तुम्हालाच स्वयंपाकघरात धाडून चहा करायला लावतील (शप्पथ सांगतो मी केला आहे). गोड गोड बोलून कधी तोंडघशी पाडतील सांगता येत नाही (तुम्हाला त्याकरता फारशा मदतीची गरज आहे असं वाटत नाही, पण तरी प्रेमाने सांगतो आहे). तेव्हा परत पुण्यात आणि ते ही फर्ग्युसन कॉलेजात यायचा विचार अजाबात म्हणजे अजाबातच करु नका. अजून अनेक इशरतना तुमच्या सारख्या प्रेमळ भाईजानची गरज आहे. स्वतःचे हात, पाय आणि मुखकमल (तुम्हाला ग्राम्य भाषा आवडते म्हणून थोबाड म्हणणार होतो पण...) असे धोक्यात घालून तो हक्क तुम्ही हिरावून घेता कामा नये.

आणि हो, बाबासाहेब पुरंदरे आणि महाराष्ट्र भूषण या विषयावर ट्विटरवर आपला प्रेमळ संवाद चालू असताना 'रिप्लाय' बटनावर टिचकी मारायच्या ऐवजी तुम्ही चुकून 'ब्लॅाक' बटनावर बोटं चालवलीत ते जरा अनब्लॉक करता का? तुम्हाला इशरतच्या नावाने अँब्युलन्स चालवणे, दही-हंडी आयोजित करणे (गेल्या वेळी बोंबललं ना हो?), मनुस्मृतीचे स्टॉल हटवणे (तुम्हाला ग्राम्य भाषा आवडते म्हणून नासधूस म्हणणार होतो पण...) इत्यादी कामांतून वेळ मिळत नाही. अजून तुम्हाला तुमच्या हिताच्या व माहिती वाढावी अशा अनेक गोष्टी सांगावयाच्या आहेत (शाळा घ्यायची आहे असे म्हणणार होतो पण...). तेव्हा चर्चा करा ना गडे. नाहीतर याल असेच घाईघाईत पुण्यात आणि मग............असो.

काळजी घ्या,

आपला नटखट,
©  मंदार दिलीप जोशी
(मूळचा मुंबईकर, पण आता बाटून अधिकच कडवा झालेला पुणेकर)

फाल्गुन कृ. २, शके १९३७