Sunday, August 28, 2016

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस खुले पत्र

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस,

सप्रेम नमस्कार पी.आय.एल. विशेष

पत्र लिहिण्यास कारण की गणेशोत्सव जवळ आला आहे व हल्ली तुमच्या परवानगीशिवाय देशात काहीही होत नसल्याने हे काही प्रश्न:

१) घरी गणपती आणू की नको? आमच्याकडे सद्ध्या दीड दिवस गणपती असतो. दुसर्‍या दिवशी मधलाच वार असल्याने यंदा सुट्टी काढावी लागलेली आहे. राष्ट्रहिताविषयी तुमची तळमळ लक्षात घेता गणपती आणणे रद्द करावे व एक दिवस राष्ट्राच्या उभारणीसाठी फुकट घालवू नये की कसे या विषयी आपले यंदा काय निर्देश आहेत?

२) गणपती किती दिवस आणू? दीड/५/७/११/२१?

३) गणपती आणताना व विसर्जन करावयास नेताना आम्ही आमची खाजगी चारचाकी वापरतो. यंदाही तीच वापरली चालेल का? की गणेशोत्सवात चारचाकी मोठ्या प्रमाणात वापरल्याने प्रदूषण खूप होते असे आपले मत आहे? तसे असल्यास दुचाकी वापरली चालेल का?
३) अ) दुचाकी वापरल्यास त्यावर दुचाकी चालवणारा व मागे गणपती (आणि जीव मुठीत) धरुन बसणारा अशा दोन व्यक्ती चालतील का? की सोबत गणपती आहे म्हणून ते तीन धरले जाऊन दंड होईल? मग गाडी चालवणार्‍याने गणपतीला पाठुंगळीला बांधून बसावे असे आपले निर्देश आहेत काय?
३) ब) चारचाकी वापरणे चालणार असल्यास प्रश्न क्रमांक ३ उपप्रश्न अ प्रमाणे चालक धरुन पाच माणसे बसलेली चालतील की फक्त चार जणांनी बसून गणपतीला चालकाच्या बाजूला सीटबेल्ट लावून बसवावे? यासंदर्भात आपले निर्देश काय असणार आहेत?
३) क) गणपती आणण्यात व विसर्जन करायला जाताना दुचाकीवरुन जाणार्‍या मर्त्य मानवांबरोबरच गणपतीलाही हेल्मेट घालणे गरजेचे असेल का? कारण आम्हा मागासलेल्या हिंदूंमधे प्राणप्रतिष्ठापना होण्याअगोदर मूर्तीत प्राण नसतात व उत्तरपूजा झाल्यावर तो पार्थीव होतो त्यामुळे त्याला हेल्मेट घालणे गरजेचे नसावे. तरी पण आपण म्हणालात तर घालतो. काय करावे त्या सूचना आपण द्याव्यात ही विनंती.

४) गणपती किती उंच चालेल? आम्ही नेहमी १२ इंचाचा आणतो. कारण आमच्याकडे तेवढ्याच उंचीची मूर्ती मावेल एवढाच मीठा लाकडी देव्हारा आहे. यंदाही १२ इंचाचा चालेल की कमी करू?

५) नैवैद्य म्हणून केल्या जाणाऱ्या मोदकांचा परीघ व उंची किती असावी?
५) अ) प्रतिमोदक किती ग्रॅम साखर व नारळ वापरले जावेत?

६) गणेशोत्सवात प्रत्येक घराला किती किलो तुप वापरावयाची परवानगी आहे? त्यासंदर्भात आपण नि:संदिग्ध निर्देश देणार आहात काय?

७) प्रत्येक आरतीच्या वेळी किती आरत्या म्हटल्या जाव्यात? आमच्याकडे जुनाट, बुरसटलेल्या प्रथेनुसार अर्थातच गणपतीच्या आरती पासून सुरवात करुन मग देवीची, शंकराची, रामाची, मारुतीची, विठ्ठलाची, दत्ताची, आणि शेवटी घालीन लोटांगण अशा आरत्या म्हटल्या जातात. या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालतील का? की नेहमीच्या पूजेत आम्ही फक्त गणपती, देवी, असं म्हणून घालीन लोटांगण घालतो तसं घातलेलं चालेल? की गणेशोत्सव आहे म्हणून फक्त गणपतीचीच आरती म्हणावी?
७) अ) या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालणार असतील तर आरत्या म्हणण्याचा क्रम काय असावा? त्याच क्रमाने यंदाही म्हटल्या चालतील का? आपण क्रम ठरवून दिल्यास सोपे पडेल.
७) ब) यात देवीची म्हणजे महिषासुरमर्दीनीची आरती म्हणावी की वगळावी? की म्हटल्याने महिषासुरसमर्थकांच्या भावना दुखावतील का? या संदर्भात दिल्ली व जे.एन.यु परिसर व उर्वरित भारत यांच्या साठी आपण वेगवेगळे निर्देश देणार का?

८) आरत्या म्हणताना त्यात किती जण असावेत?

९) आरत्या म्हणताना आवाजाची पातळी किती असावी म्हणजे शेजार्‍यांना आवाजाचा त्रास होणार नाही?
९) अ) त्या संदर्भात आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असल्यास डेसिबल मापक यंत्र सरकारने जनतेला सवलतीत उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश आपण द्यावेत अशी नम्र आणि लोटांगण घालून विनंती.

१०) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची संख्या किती असावी?
१०) अ) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची जातीनिहाय विभागणी काय असावी? उदाहरणतः समजा १० व्यक्ती जमल्यास त्यापैकी किती तथाकथित उच्चवर्णीय, अनुसूचीत जातीजमातीचे, आर्थिकदृष्ट्या मागास, दलित, महादलित, वगैरे असावेत? या संदर्भातल्या आपल्या निर्देशांची वाट बघत आहे.

११) दुसर्‍या दिवशी जेवायला आमच्याकडे ब्राह्मण बोलावण्याची पद्धत आहे. ते बोलवावेत काय? की आम आदमी पक्षाच्या तिहार मधल्या एखाद्या आमदार किंवा कार्यकर्त्याला बोलवावे?

१२) पूजेसाठी दुर्वा आणल्या चालतील की तो वृक्षतोडीच्या कसल्याशा कायद्याखाली गुन्हा ठरवण्याचा आपला मानस आहे?

भारतातल्या न्यायालयांसमोर साडेतीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे मध्यंतरी वाचले. काय लोक असतात? आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या लक्षात घेऊन कुणी खटले दाखल करतच नाही. लोकांना फार हौस कोर्टाची पायरी चढण्याची. आजोबांच्या वेळेपासून सुरू झालेले दिवाणी दावे नातू मरायला टेकला तरी निकाली लागत नाहीत हे माहित असताना न्यायव्यवस्थेवरचा ताण लक्षात न घेता वकील आणि न्यायप्रक्रियेवर खर्च करण्याची लोकांची हौस जिरत नाही हे खरंच. ती आपण जिरवाल ही खात्री आहे. पण अशा कोट्यावधी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसारख्या अनावश्यक आणि सटरफटर खटल्यांकडे लक्ष न देता आपण नालायक आणि रिकामटेकड्या हिंदूंचे सण व प्रथा यांच्याकडे लक्ष देत आहात हे नि:संशय प्रशंसनीय आहे. वर्षानुवर्ष चालणार्‍या व न्यायाधिशांच्या डोक्याची मंडई करणार्‍या या यडचाप खटल्यांपेक्षा पटकन निर्णय देऊन आटपता (आणि रिकामटेकड्या हिंदूंना आपटता) येतील अशा दिवाळीचे फटाके, जलीकट्टू, होळीचे पाणी, दहीहंडीची उंची, विविध जत्रांच्या वेळी दिले जाणारे कोंबड्यांचे बळी, तसेच आता गणेशोत्सव कसे साजरे करावेत याकडे आपण दिलेले लक्ष हे खरेच कौतुकास्पद आहे.

या संदर्भात मुख्य न्यायाधीश म्हणून आपण पुढाकार घेतच आहात तर मला व माझ्या काही समविचारी मित्रांना वरील प्रश्न पडले आहेत त्या संदर्भात आपण स्पष्ट निर्देश द्यावेत जेणेकरून आम्हाला खाजगी गणेशोत्सव नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयसंमत अशा पद्धतीने साजरे करता येतील अशी आपल्याला नम्र व साष्टांग नमस्कार घालून विनंती.

आपला नम्र,
© मंदार दिलीप जोशी

ता. क. संघी पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी हे रीतसर निवडणूक लढवून लोकनियुक्त सरकार तुमच्या मर्जीशिवाय चालवतात म्हणजे काय? त्यांचे ऑडिट तातडीने होणे आवश्यकच आहे. त्यासाठी जनमताचा कौल घ्यायला २०१९ पर्यंत थांबण्याची काय गरज? ते लगेचच करायला पायजेल आहे. (सॉरी बारामतीशेजारच्या पुण्यात राहत असल्याने पटकन ती भाषा तोंडात आली.) शिवाय तुम्हाला फालतू प्रक्रीयेतून न जाता जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावून न्यायालयासमोरच्या प्रश्नांना वाचा फोडायचे महत्त्वाचे काम आहेच, तिथे आपण कार्यक्रमांची शोभा (डे नव्हे) वाढवायला जालच. ते आटपले असल्यास आमच्या वरील प्रश्नांसंदर्भात आपण सहानुभूतीने विचार करुन निर्देश द्याल ही खात्री आहे.

Friday, August 26, 2016

पंडित नामा ९: श्री बी. के. गंजू

बी. के. गंजू
निवासः छोटा बाझार, श्रीनगर
व्यवसायः नोकरी, दूरसंचार विभाग, केंद्र शासन
हत्या: २२ मार्च १९९०

"काश्मीर में अगर रहना होगा
अल्लाह-हू-अकबर कहना होगा"

काश्मीरमधे रस्त्यावर घोळक्याने फिरणार्‍या जमावाची ही आणखी काही आरोळ्यारूपी मुक्ताफळे. यातली पहिली घोषणा एका 'सेक्युलर' परिचिताला सांगितल्यावर त्याने लगेच "तुम्ही नाही का, 'अगर इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा' म्हणता!" असे तारे तोडले. आवाजात शक्य तितकं मार्दव आणून त्याला 'वंदे मातरम्' चा अर्थ देशाला आई मानून वंदन करणे असा आहे, कुठल्याही विशिष्ठ इश्वराला वंदन करणे नव्हे, हे लक्षात आणून दिलं. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी हे मानणारे काश्मीरमधले पंडित काश्मीरच्या भूमीला माता समजून वंदन करायला केव्हाही तयार झाले असते. पण त्यासाठी जबरदस्तीचे धर्मांतर कुणाला मंजूर होईल? आम्ही मानतो त्याच इश्वराला तुम्ही मानलं पाहीजे ही जबरदस्ती माथेफिरूच करु शकतात, आणि अशी जबरदस्ती काश्मिरात सर्रास सुरु होती.

श्रीनगर मधल्या छोटा बाझार जवळच्या एका मशीदीच्या एका भिंतीवर लावलेल्या एका 'खतम करायच्या व्यक्तीं'च्या यादीत श्री बी. के. गंजूंचं नाव पाहून एकाने ती गोष्ट श्री गंजूंना सांगितली. आत्तापर्यंत अशा घटना आणि याद्यांची केवळ ऐकीव माहिती असलेल्या गंजू दांपत्याचं स्वतःचंच नाव त्या यादीत लागल्याचं पाहून धाबं दणाणलं. नक्की कुणाची मदत घ्यावी, कुणाशी बोलावं हे त्यांना समजेना. काश्मीरमधे पोलीसांची मदत घेणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच होतं. आता कुंपणच शेत खाऊ लागलं होतं. ती रात्र गंजू दांपत्याने एकमेकांकडे पण शून्यात बघत घालवली. जरा जरी आवाज झाला तरी ते दचकत. त्यांना कुणीतरी दार ठोठावत असल्याचाही मधेच भास होई. ही रात्र कधी संपणारच नाही की काय अशी भीती दोघांना वाटू लागली. क्वचित ताण असह्य होऊन मग डोळ्यांतून घळाघळा अश्रू ओघळत. आपण साधे नोकरदार. आपण कुणाचं काय वाकडं केलं आहे? असा श्री गंजूंना प्रश्न पडे. पण याचं उत्तर एकच होतं. त्यांनी काश्मिरात हिंदू म्हणून जन्म घेण्याचं घोर पातक केलेलं होतं.

पहाटे केव्हातरी यांत्रिकपणे सौ गंजू उठल्या आणि देवघरात गेल्या. पण त्यांना साधं निरंजन लावण्याचाही धीर होईना. मग त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन तिथेही दिवा न लावता अर्धवट अंधारात चहा केला. सगळी रात्र भीतीने थरथरत विचित्र मनस्थितीत जागून काढलेल्या गंजू दांपत्याला तो चहा ना धड गोड लागला ना ते त्याची उष्णता अनुभवत त्याचा धड आस्वाद घेऊ शकले. तेवढ्यात फोनच्या आवाजाने ते पुन्हा दचकले. ते घरात आहेत की नाहीत हे बघायला कुणीतरी फोन केला गेला असावा. अर्थातच तो फोन घ्यायची त्यांची हिंमतच झाली नाही.

सकाळी साधारण नऊच्या सुमारास दारावर थाप पडली आणि त्या बरोबरच "गंजू साहेब कुठे आहेत, आम्हाला काही तातडीचं काम आहे त्यांच्याकडे" हे शब्द कानावर पडले. नक्की काय घडतं आहे याची अर्थातच पूर्ण कल्पना असणार्‍या सौ. गंजू "ते घरी नाहीत. ऑफिसला गेले आहेत" असं उत्तरल्या. दार ठोठावणार्‍यांचा त्यावर विश्वास बसला नाही. "असं कसं होईल, इतक्या लवकर ते ऑफिसला कसे जातील? दार उघडा. खूप तातडीचं काम आहे हो आमचं", त्यांनी अजून हेका सोडलेला नव्हता. पण सौं गंजूंनी कोणताही धोका पत्करायचा नाही असंच ठरवलं होतं. त्यांनी आता त्यांच्या हाकांना उत्तर द्यायचंही थांबवलं. काही वेळाने दारावरच्या थापा थांबल्या आणि दार उघडायच्या विनंत्याही. आता बाहेरून कुठलाही आवाज येत नव्हता. बहुतेक बाहेर जे कुणी होतं ते बहुतेक गेले असावेत असं वाटून सौ गंजूंनी एका खिडकीतून हळूच बाहेर डोकावून बघितलं तेव्हा बाहेर कुणीच दिसलं नाही. सौ गंजूंनी नवर्‍याला पोलीसांना हळूच फोन करण्याचा सल्ला दिला. फोन झालाच होता तेवढ्यात घराच्या एका बाजूच्या खिडकीच्या बाजूने जोरात धडक बसल्याचा आवाज झाला. कुणीतरी घरात घुसण्याचा प्रयत्न करत होतं. प्रसंगावधान राखून सौ. गंजूंनी श्री बी. के. गंजूंना गच्चीवर ठेवलेल्या आणि धान्याच्या पोत्यांनी वेढलेल्या एका रिकाम्या पिंपात जाऊन लपायला सांगितल. श्री गंजू धावले.

काही वेळातच दोन अतिरेकी घरात घुसण्यात यशस्वी ठरले. त्यांच्यापैकी एकाच्या हातात कलाशनिकोव्ह** होती आणि दुसर्‍याच्या हातात पिस्तूल. आता सौ गंजूंना विचाराच्या फंदात न पडता त्या दोघांनी घराच्या कानाकोपरा शोधायला सुरवात केली. कसंही करुन त्यांना श्री गंजूंना शोधायचंच होतं. एका रिकाम्या खोलीला लावलेलं कुलूप तोडुन ते आत शिरले. तिथेही आपलं सावज न सापडल्याने ते वैतागले. रक्ताला चटावलेल्या हिंस्त्र श्वापदाच्या आवेशात "तो उंदीर फार काळ मोकाट फिरू शकणार नाही. कधी ना कधी सापडेलच", असं म्हणून ते घराबाहेर पडले.

आता सौ गंजूंनी सुटकेचा नि:स्वास सोडला. या वेळी कदाचित त्यांनी असाही विचार केला असेल की पहिली संधी मिळताच काश्मीर खोरं सोडून जम्मू किंवा इतर कुठेतरी पळून जायचं.

पण दुर्दैवाने तसं व्हायचं नव्हतं. श्री गंजू हे गच्चीवर पिंपात लपताना गंजूंच्या एका काश्मिरी मुसलमान शेजार्‍याने बघितलं होतं. गंजूंच्या घरातून बाहेर पडलेले अतिरेकी काही अंतर जाताच त्या शेजार्‍याने त्यांना गंजूंच्या घराच्या छताकडे बघा अशी खूण केली. आपली खेप 'फुकट' जाणार नाही या आनंदात आणि अर्थातच इतका वेळ फुकट घालवल्याच्या संतापात ते दोघे पुन्हा श्री गंजूंच्या घराकडे धावतच निघाले. आता पुतळ्यासारख्या निश्चल उभं राहिलेल्या सौ. गंजूंकडे डुंकूनही न बघता ओलांडून ते घराचा जिना धडाधडा चढून आपल्या लक्ष्याच्या दिशेने गच्चीवर निघाले. वर जाताच वेळ न दवडता त्यांनी श्री बी. के. गंजूंवर गोळ्यांचा वर्षाव केला. रक्ताच्या चिळकांड्या आजूबाजूच्या तांदळाच्या पोत्यांवर उडाल्या. आता त्या हरामखोरांचं समाधान झालं होतं. तरीही शेवटच्या घटका मोजणार्‍या श्री गंजुंना ते दोघे अतिरेकी "आता तुझ्या घरच्यांना तुझ्या रक्ताने माखलेले हेच तांदूळ खाऊ देत. काय चविष्ट लागेल ना मग जेवण!" असं बोलून खुनशी आनंदात हातातलं पिस्तुल आणि कलाशनिकोव्ह नाचवत निघून गेले. मागे धाय मोकलून आकांत करणार्‍या सौ गंजूंना सोडून.

"दिल मे रखो अल्लाह का खौफ
हाथ मे रखो कलाशनिकोव्ह"

अल्लाहचं नाव घेत कलाशनिकोव्ह हातात घेतलेल्या त्याच्या बंद्यांनी आणखी एका काश्मीरी काफिराला संपवलं होतं.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण कृ. , शके १९३८
२६ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

**कलाशनिकोव्ह = मशीनगन

Tuesday, August 23, 2016

पंडित नामा ८: प्रोफेसर के. एल. गंजू व सौ गंजू

प्रोफेसर के. एल. गंजू, सौ. गंजू
वयः दोघांचेही चाळीशीत
निवासः सोपोर
व्यवसायः अनुक्रमे व्याख्याता व शिक्षिका
हत्या: २ मे १९९०

मागील काही लेखात आपण पाहिलं की काश्मीरात दहशतवाद्यांनी सुरवातीला प्रामुख्याने समाजधुरीणांना लक्ष्य करुन सुनियोजित पद्धतीने काटा काढण्याचा सपाटा लावला होता. दुर्दैवाने यात अतिरेक्यांना मदत करणारे किंवा मख्खपणे पंडितांवरचे अत्याचार बघत बसणारे हे पंडितांचेच सख्खे शेजारी आणि कार्यालयातले सहकारी असणारे काश्मीरचे सर्वसामान्य मुस्लीम नागरिकच होते. याच मालिकेतला एक दुर्दैवी बळी म्हणजे प्रोफेसर के. एल. गंजू व त्यांची पत्नी. 

सोपोर शेतकी महाविद्यालयात व्याख्याता असणारे श्री के. एल. गंजू हे एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना काश्मीरमधल्या चिघळत गेलेल्या परिस्थितीची जाण होती. दहशतवादाची झळ आपल्याला व आपल्या कुटुंबाला लागू शकते याचीही कल्पना त्यांना होती. मात्र आपली लोकप्रियता व काश्मीरीयत यांच्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास असलेल्या श्री गंजूंना या गोष्टींच्या जोरावर आपण या संकटातून तरून जाऊ असा आत्मविश्वास होता. आपण कुणाचं वाकडं केलेलं नाही, आपल्याकडून समाजाची सेवाच घडलेली आहे, आपल्याला अनेक मुस्लीम मित्र व चाहते आहेत - मग आपलं वाईट होणं शक्यच नाही या आदर्शवादी पण तितक्याच भोळसट विचारांनी त्यांचा घात केला. काश्मीर खोरे वेळेवर सोडण्याचा निर्णय न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ आलेल्या अनेक उदाहरणांपैकी हे एक.

श्री. के. एल. गंजू व शिक्षिका असणारी त्यांची पत्नी हे नेपाळमधे पार पडलेल्या एका परिषदेहून परतले. त्यांच्याबरोबर त्यांचा 'पिस्ता' म्हणून ओळखला जाणारा एक नुकताच मिसरुडही न फुटलेला तरूण नातेवाईक मुलगा सोबत होता. घरी पोहोचल्यावर रात्रीचं जेवण घेत असतानाच साधारण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार अतिरेकी घरात घुसले. त्यातल्या एकाकडे अत्याधुनिक अशा कलाश्निकोव्ह रायफली आणि बाकीच्या तिघांकडे पिस्तुलं होती. (कोण म्हणतं रे काश्मीरात विकास नाही झाला? आँ?). या चौघा अतिरेक्यांनी त्या तिघांनाही भरल्या ताटावरून उठून आपल्यासोबत चलण्याची आज्ञा केली. दहशतवादाच्या कहाण्या ऐकून असलेल्या गंजू कुटुंबियांना आता आकांत करण्याचंही त्राण अंगात नव्हतं. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची पूर्ण कल्पना असलेले ते तिघे मन आणि भावना दोन्ही गोठलेल्या अवस्थेत निमूटपणे त्या अतिरेक्यांसोबत निघाले.

हे सगळं घडत असताना त्यांचे शेजारी मख्खपणे बघत उभे होते. त्यातल्या काहींनी त्या अतिरेक्यांना त्याच भागातले असल्याने ओळखलंही होतं. पण कुणीही गंजू कुटुंबियांना वाचवायला दयेची भीक मागण्यापुरतंही पुढे झालं नाही. सुंठीवाचून खोकला जात असेल तर कोण उगाच बोलेल? नाही का! मग ते फक्त बघत बसले. इतकंच नव्हे, तर अतिरेक्यांनी या तिघांना घेऊन गेल्यावरही कुणीही जवळच्या लष्कराच्या ठाण्यात वर्दी देण्याचीही तसदी घेतली नाही. कहर म्हणजे पोलीस स्टेशनला फोन करुन कुणी घडला प्रकार कळवलाही नाही. ज्या काश्मीरीयतवर फाजील विश्वास ठेऊन श्री गंजू यांनी काश्मीर सोडलं नव्हतं, त्याच काश्मीरीयतचे पाईक म्हणवणार्‍या शेजार्‍यांनी त्यांचे खरे रंग दाखवले. 

श्री. के. एल. गंजू, त्यांची पत्नी, व 'पिस्ता' यांना सोपोरमधे असलेल्या झेलम नदीवरच्या पुलावर मधोमध नेऊन उभं करण्यात आलं. श्री के एल गंजू यांना अगदी जवळून सहा गोळ्या घालण्यात आल्या. पहिली गोळी झाडली जात असताना प्रतीक्षिप्त क्रियेने केलेल्या हातवार्‍यांनी गोळ्या झाडणार्‍या अतिरेक्याचं चित्तं विचलीत होऊन गोळी 'पिस्ता'च्या पायाला ओझरती निसटून गेली. का कोण जाणे पण श्री गंजू यांचा मृतदेह रात्रभर जवळच्या मशीदीत ठेवण्यात आला आणि सकाळी झेलम नदीत फेकून देण्यात आला. 

असं म्हणतात की श्री गंजूंना मारल्यावर 'पिस्ता'ला अतिरेक्यांनी दोन पर्याय दिले. "आम्ही तीन पर्यंत आकडे मोजू. एक तर प्रोफेसरसाहेबांना भेटायला नदीत उडी मार नाहीतर त्यांच्या बायकोवर आम्ही जे काही (अत्याचार) करू ते उघड्या डोळ्यांनी बघ" असा इशारा देण्यात आला. या परिस्थितीत तुम्ही आम्ही जे केलं असतं तेच त्याने केलं. त्याने एकदा सौ. गंजूंकडे शेवटचं बघितलं आणि एकदा त्यांच्याकडे वखवखलेल्या नजरेने बघणार्‍या त्या अतिरेक्यांकडे. मग त्या नराधमांनी "तीन" म्हणताच त्या पोराने परमेश्वराचे नाव घेत झेलम नदीत उडी मारली. 

या नंतर सौ. गंजू यांचं काय झालं हे सांगायला ना श्री गंजू जिवंत होते, ना पिस्ता हजर होता. पोलीसांकडे नोंदीत अनेक दिवस 'बेपत्ता' असलेल्या सौ गंजू यांचं काय झालं असावं हे वेगळं सांगायला नकोच. ते आधीच्या अनेक उदाहारणांवरुन स्पष्ट आहेच. काही पत्रकारांच्या मते सौ गंजूंवर आधी सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि मग त्यांना अतिशय नृशंसपणे ठार करण्यात आलं. या अतिरेक्यांपैकी एकाला नंतर अटक करण्यात आली तेव्हा त्याने सांगितलं की सौ गंजूंना मारल्यावर त्यांच्या मृतदेहाला दगड बांधून नवर्‍याप्रमाणेच झेलम नदीत फेकून देण्यात आलं. पण त्यांचा मृतदेह आजतागायत सापडलेला नाही. जिवंत माणसांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणारे काश्मीरातले पोलीस दल सौ. गंजू यांचा मृतदेह शोधायचा प्रयत्न करतील अशी शक्यता शून्यच होती.

श्री गंजू यांचा गोळ्यांनी चाळण झालेला आणि सडलेला मृतदेह काही दिवसांनी झेलमच्या किनार्‍यावर मिळाला. 

सुदैवाची गोष्ट अशी, की पोहायला न येणारा 'पिस्ता' मात्र झेलम मातेच्या कृपेने हात पाय मारत कसाबसा काही अंतरावर किनार्‍याला लागला. दोन दिवस घाबरत लपत छपत खोर्‍यात काढून मग त्याने जम्मूला पळ काढला.

काश्मीरमधे दहशतवाद १९८९-९० सालापासून अचानक सुरू झाला का? नाही. त्याही अगोदर काश्मीरी पंडितांवर विविध इस्लामी राज्यकर्त्यांनी अनेको अत्याचार केले. पण देश स्वतंत्र झाल्यावर वाटलं होतं, आता तरी हे अंतर्गत अत्याचार थांबतील. आता तरी सततचे शिरकाण थांबेल. पण नाही. स्वातंत्र्यानंतरही हे सुरूच राहिलं आणि १९८९-९० सालात त्याचा भडका उडून २००३-४ साल उजाडेपर्यंत काश्मीर खोर्‍यातून काश्मीरी पंडितांचं जवळजवळ उच्चाटन झालं. आज काश्मीर खोर्‍यात हिंदू नसल्यात जमा आहेत. पण त्याने उर्वरीत काश्मीरींचं समाधान झालं आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. इतकं सगळं होऊनही केंद्र सरकारने काश्मीरात ओतलेले कोट्यावधी रुपये, काश्मीरी विद्यार्थ्यांना देशभरात मिळणार्‍या सवलती, काश्मीरात राज्य सरकारी नोकर्‍यात असलेले मुबलक आरक्षण, पर्यटनाने मिळणारा पैसा याने काश्मीरी नागरीकांमधे काहीही फरक पडलेला नाही. अजूनही जिहाद आणि आझादीचे भूत डोक्यावरुन उतरलेले नाही. एक कोवळ्या वयातला मुलगा अतिरेकी होतो, चकमकीत मारला जातो, यावरुन धडा न घेता त्याचा बाप आपली मुलगी सुद्धा जिहादला द्यायला तयार होतो, तेव्हा खरंच लायकी नसलेल्या लोकांवर आपण पैसे खर्च करतो आहोत ही भावना प्रबळ होत जाते.

काश्मीरमधल्या परिस्थितीचा सुरवातीपासून तिथल्या राज्य सरकारांनी व केंद्रातील काँग्रेस सरकारांनी, इस्लामी जहाल मानसिकतेने पछाडलेली तिथली प्रशासन व्यवस्था व सर्वसामान्य मुस्लीम काश्मीरी जनता, आणि अर्थातच कीड लगलेले पोलीस दल यांना नियंत्रणात ठेवण्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आज काश्मीर खोर्‍यावर आणि लाखो काश्मीरी पंडितांवर ही परिस्थिती ओढवली आहे. खुर्ची व मतांच्या हव्यास आणि त्यापोटी दिलेला असंख्य पंडितांचा बळी हे म्हणजे आपल्याच व्यवस्थेने भारतीय नागरिकांची भारताच्या घटनेवर असलेल्या श्रद्धेचा घात करत आपल्याच पाठीत खुपसलेला सुरा आहे.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण कृ. ६, शके १९३८
२३ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Monday, August 15, 2016

कीर्तनकार, परंपरा, आणि विनोद

काल परवापासून किर्तनकारांवर केलेला एक विनोद फिरतो आहे:
जिवनात एवढी संपत्ती कमवुन काय करणार आहात ?शेवटी मेल्यावर काहीच बरोबर येत नाही..असं सांगणारे महाराज एका किर्तनाचे वीस हजार रुपये घेतात...!!!!
आणि खाली फिदी फिदी फिदी फिदी चे स्मायली
मेल्यावर वर काहीच नेता येत नाही बरोबर आहे. पण जगायला तर पैसे लागतात ना? बाहेर जाऊन टपरीवरचा साधा चहा आता सहा रुपयांच्या खाली मिळत नाही मग निव्वळ जगण्यासाठी आवश्यक दोन वेळचं जेवण, अन्न, वस्त्र, आणि निवार्‍याची सोय पैसे न घेता कशी करता येईल याचा विचार केला आहे का कधी? मुलांच्या शिक्षणाचा खर्च? इतर नैमित्तिक खर्च? साधी राहणी ठेवायची म्हटली तरी हे खर्च कितीतरी असतात. मग कीर्तनकारांनी पैसे घेतले तर बिघडलं कुठे?
प्रत्येक उत्तम कीर्तनकाराच्या मागे सखोल अभ्यास, अनुभव, व कीर्तनकला जोपासण्यासाठी घेतलेले अपार कष्ट असतात. त्या कष्टाचं मोल त्यांना मिळायलाच हवं. प्रत्येकाला योग्य बिदागी मिळवण्याचा अधिकार आहे. मग ते तुम्ही आम्ही असू की देवळातले पुजारी असोत की कीर्तनकार. अर्थात, सगळेच कीर्तनकार काही विद्वान, अभ्यासू, सदवर्तनी वगैरे नसतात हे ही मान्य. पण म्हणून कीर्तनात जे म्हटलंच जात नाही ते सरसकट सगळ्या कीर्तनकारांच्या तोंडी घालणं कितपत बरोबर आहे? आणि सगळ्यांचा डोळा हिंदू कीर्तनकार आणि पुजारी यांना मिळणार्‍या पैशावर का?
कीर्तन ही गोष्ट रोज सकाळी नऊ ते पाच करण्याची गोष्ट नाही. म्हणजे ती नोकरी नाही. तेव्हा तीनशे पासष्ट दिवस रोज बुवा कीर्तन करुन वीस वीस हजार कमवत आहेत हे अतिशय चुकीचे गृहतिक आहे. हे खरं आहे की कीर्तनकार वीस हजारा पासून ते पन्नास हजार आणि जास्त अनुभवी माणूस असेल तर लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो. मात्र काही दिवस भरपूर काम तर काही दिवस काहीच नाही हे नेहमीचेच असल्याने इंग्रजीत म्हणतात तसं it evens out.
हे काम प्रचंड बौद्धिक कष्टाचं काम आहे. रामायण, महाभारत, वेद, पुराणं यांचा अभ्यास; संस्कृत भाषेवर प्रभुत्व; आवश्यक तेव्हा योग्य संदर्भ आठवणं; आपल्या मायमराठी व इतर भाषांतल्या संतसाहित्याचा अभ्यास, इतकंच नव्हे तर इतर धर्मातले संदर्भ लक्षात ठेवणं, या व अशा अगणित बाबी तर आहेतच शिवाय कीर्तनाला सगळ्यात आवश्यक म्हणजे चांगल्या आवाजाला जोड म्हणून उत्तम गायनकला असणं आवश्यक असतं. निदान समोरचा श्रोतावर्ग झोपणार नाही अशा प्रकारे कीर्तन रंगवणं हे खायचं काम नाही. समोर शंभर दोनशेच्या घरात आकडा असलेला श्रोतावर्ग बघितल्यावर सभाधीटपणा हा गूण हवा हे वेगळं सांगायला नको. (टीम मीटींगमधे सात-आठ जणांच्या समोर उभं राहून पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन देताना त-त-प-प करत फाफलणार्‍यांनी तर हे नक्कीच लक्षात ठेवावं.)

मुळात आधी स्वतःच एखादं काल्पनिक गृहतिक मांडायचं आणि स्वतःच त्याची टर उडवायची ही हिंदूद्वेष्ट्यांची सवयच आहे. काय करणार आहात इतकी संपत्ती कमवून असं कुणीच कीर्तनात म्हणणार नाही. आत्तापर्यंत अनेक कीर्तनं ऐकली, त्यात कुणीही असं म्हणाल्याचं आठवत नाही. पैशाची हाव असू नये, कुणाला लुबाडून पैसे मिळवू नयेत असाच पैशाविषयी बोलताना बहुतेक कीर्तनकारांचा सूर असतो. तेव्हा एखादं वाक्य अर्धवट उचलून त्यावर असले विनोद तयार करायचे आणि सोशल मिडीयावर पाठवून हिंदूंचीही अप्रत्यक्ष मानखंडना करायची ही हिंदूद्वेष्ट्यांची एक कार्यपद्धती आहे.
हिंदूधर्माभिमानी असाल तर असले खोडसाळ जोक पुढे ढकलत जाऊ नका. मी सुद्धा आधी या विनोदावर हसलो होतो पण नंतर मूर्खपणा लक्षात आल्यावर सावध झालो. तेव्हा असले विनोद तुम्हाला आले, तर पटकन हसण्याची उबळ दाबून जरा विचार करा. आणि 'आला मेसेज, केला फॉरवर्ड' असं करत जाऊ नका.
बोला आर्यसनातन वैदिक हिंदू धर्म की जय.

© मंदार दिलीप जोशी

रावणाचं उदात्तीकरण, रामनवमी, रक्षाबंधन व दसरा, आणि आपण

गेले अनेक दिवस रावणाचं उदात्तीकरण करणारा आणि रामावर दोषारोपण करणारा एक संदेश व्हॉसॅप आणि फेसबुकवर फिरतो आहे आणि त्यावर अनेकांकडे उत्तर नाही. राखीपौर्णिमा किंवा दसरा असे सण आले की अशा संदेशांना ऊत येतो. त्या संदेशात रावणासारखा भाऊ हवा, रामासारखा नको असं ती मुलगी आईला उत्तर देते आणि त्याकरता रामाने सीतेचा त्याग केला पण रावणाने आपल्या बहिणीसाठी म्हणजे शूर्पणखेसाठी युद्ध करुन जीवही दिला एवढंच नव्हे तर सीतेचं हरण केल्यावर तिला स्पर्शही नाही केला असं कारण देते. यावर आई अवाक होते. असे अनेक संदेश आहेत, पण थोड्याफार फरकाने मुद्दे तेच उचलले गेले आहेत. आता आपण एक एक मुद्दा घेऊ. पहिला मुद्दा सीतेच्या त्यागाचा. मुळात सीतेच्या त्यागाचा प्रसंग हा 'उत्तर रामायणात' (उत्तर कांड) आलेला आहे. ‘उत्तर’ या शब्दाचा संस्कृत भाषेनुसार अर्थ होतो ‘च्या नंतर’. जसे की आयुर्वेदात ‘उत्तरतंत्र’ आढळते. हे उत्तरतंत्र मूळ संहितेच्या नंतर कोणीतरी इतर लेखकाने भर घालण्याकरता जोडलेले असते. थोडक्यात, उत्तर रामायण हे रामायण रचून झाल्यावर मागाहून जोडण्यात आले असून महर्षी वाल्मिकी हे त्याचे लेखक नाहीतच मुळी! त्यांनी रचलेले रामायण संपते ते युद्धकांडात. युद्धकांडाच्या शेवटी रामायणाची फलश्रुतीदेखील आलेली आहे हा आणखी एक पुरावा. कोणत्याही स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते. ती संपली की स्तोत्र पूर्ण होते हा साधा नियम इथेही लागू होतो. जे मूळ रामायणातच नाही ते त्या बिचार्‍या रामाच्या माथी मारायचे उद्योग हे ‘काड्याघालू’ लोक करत असतात. पण तसे करताना सीतामातेच्या धरणीप्रवेशानंतर प्रभू रामचंद्रांनी केलेल्या दुःख विलापाचे उत्तर रामायणातील वर्णन मात्र सोयीस्करपणे विसरतात! मुळात रामायण संपूर्ण वाचायचं नाही; वर स्वतःचा शहाणपणा सिद्ध करण्यासाठी कपोलकल्पित गोष्टी चघळत बसायच्या असे यांचे उद्योग.** आता काही अतीहुशार लोक असं म्हणतील की मग लव आणि कुश यांचे काय? त्यांचा जन्म झालाच नाही का? आणि त्यांचा जन्म वाल्मीकी ॠषींच्या आश्रमात झाला त्याचे काय? उत्तर असं की राम आणि सीता अयोध्येला परत आल्यावर त्यांना मुलं होऊ शकत नाहीत का? लव आणि कुश अयोध्येत जन्माला आलेच नाहीत असं कशावरुन? त्यांचं जन्म प्रमाणपत्र आहे का? समजा मानलं की सीता वनात गेली. बरं, सीता वनात गेली असेल तर त्याचं कारण फक्त रामाने तिला 'टाकलं' असंच का असावं? दुसरं काहीही कारण असू शकतं ना? धार्मिक बाबतीत राजांना सल्ला देणारे, प्रसंगी दटावणारे ऋषीमुनी हे सर्वसामान्य लोकांपेक्षा धार्मिक बाबतीत निश्चितच कट्टर असणार. त्यामुळे सीतेला वाल्मीकींच्या आश्रमात पाठवण्याचा हा निर्णय कुणाशीही सल्लामसलत न करता घेतला असण्याची शक्यता शून्य आहे. आजही कदाचित तिला प्रसूतीआधी अधिक सात्त्विक वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात रहायला मिळावं अशीही शक्यता असूच शकते ना? लोकांपेक्षा अधिक "सनातनी" असणारे हे साधूसंत-ऋषीमुनी, सीतेच्या चारित्र्यावर किंवा पावित्र्यावर संशय घेऊन तिला सोडलं, लोकापवादामुळे तिचा त्याग केला म्हणावं तर ती वनात गेल्यावर तिला आश्रमात इतर साधूसंतांच्या सोबत सुखेनैव कशी राहू देतील? याचा विचार ना उत्तर रामायण रचणार्‍यांनी केला ना आज रामावर दोषारोपण करणार्‍या ढकलबहाद्दरांनी. आता जर तरच्या भाषेतून बाहेर पडूया. सीतामातेला आपल्या मुलांचा जन्म ऋषींच्या आश्रमात व्हावा असे डोहाळे लागले आहेत असे रामायण सांगते!! आता बोला!!! पण त्यासाठी मूळ वाल्मिकी रामायण वाचावं लागतं. टीव्हीवरच्या मालिका पाहून इतिहास आणि पौराणिक बाबी समजत नसतात. आता वळूया रावणाकडे. रावण वेदशास्त्रसंपन्न विद्वान होता, वीणावादनात प्राविण्यप्राप्त होता हे खरेच आहे. पण म्हणून तो मोठा ठरत नाही. याकुब मेमन चार्टर्ड अकाउटंट होता (तोच तो कुबेरांचा सनदी लेखपाल), ओसामा बिन लादेन सिव्हील इंजिनिअर होता, आणखी अनेक दहशतवादी उच्चशिक्षित होते आणि आहेत म्हणून ते महान ठरत नाहीत. सुशिक्षित असणं ही सुसंस्कृतपणाचा मापदंड असू शकत नाही हे आजही आपण समाजात बघतो. रावणाची पापकर्म अनेक आहेत. रावण हा अत्यंत स्त्रीलंपट होता. स्त्रीकडे केवळ भोगविलासाची वस्तू म्हणूनच तो बघत असे. रावणाने सीतेला हात का नाही लावला, त्या मागे देखील त्याचे एक पापकर्म दडलेले आहे. एकदा देवलोकावर आक्रमण करण्याच्या हेतूने निघाला असता त्याच्या सैन्याचा कैलास पर्वतावर तळ पडला. त्याच वेळी स्वर्गलोकीची अप्सरा रंभा तिथून जात असलेली त्याला दिसली. तिच्यावर अनुरक्त झालेल्या रावणाने तिला त्याच्याशी रत होण्याविषयी विनंती केली (व्हॉट्सअ‍ॅप ढकलबहाद्दरांसाठी कठीण शब्दांचे अर्थ = माझ्याबरोबर शय्यासोबत कर असं विनवलं). पण रंभा त्याला नकार देत म्हणाली की "हे रावण महाराज, मी तुमचे बंधू कुबेर महाराजांचा पुत्र नलकुबेर याच्यावर अनुरक्त झाले असून मी त्याला भेटायला चालले आहे. तस्मात मी तुमच्या सुनेसारखी आहे. तेव्हा असे वागणे आपल्याला शोभत नाही." रंभेच्या या बोलण्याचा रावणावर काहीही परिणाम झाला नाही. कामातुराणां न भयं न लज्जा म्हणतात त्याप्रमाणे तो म्हणाला, "हे रंभे, तू स्वर्गलोकीची अप्सरा आहेस. तुम्ही अप्सरा कोणत्याही एका पुरुषाबरोबर लग्न करुन राहूच शकत नाही. तू कुणा एकाची असूच शकत नाहीस." असं म्हणून रावणाने रंभेवर बलात्कार केला. हे कुबेरपुत्र नलकुबेर याला समजताच त्याने रावणाला शाप दिला की तू रंभेची इच्छा नसताना तिच्याशी रत होण्याचे पाप केले आहेस, त्यामुळे तू यापुढे कोणत्याही स्त्रीशी तिच्या परवानगीशिवाय रत होऊ शकणार नाहीस. तू तसं केलंस तर तुझ्या मस्तकाचे सात तुकडे होऊन तू मृत्यू पावशील / भस्म होशील'. म्हणून सीतेला प्रदीर्घकाळ बंदीवासात ठेऊन देखील तिला तो साधा स्पर्श करु शकला नाही. त्यामुळे सीतेला त्याने हातही लावला नाही यात त्याचा सात्त्विकपणा नव्हे तर नाईलाज आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्ही नाही का, सिग्नल लाल असला तर इकडे तिकडे बघता आणि पोलीसमामा दिसला की चुपचाप थांबून आपण किती कायदा पाळतो हे दाखवायला अगदी गाडीची पुढची चाकं झेब्रा क्रॉसिंगच्या मागे ठेऊन भोळेभाबडे भाव चेहर्‍यावर आणून थांबता, अगदी तसंच. त्यामुळे रावण सीतेला फक्त हत्या करण्याची धमकीच देऊ शकला. अनेक विनवण्या करुन सीता बधत नाही हे बघितल्यावर शापग्रस्त रावणाने सीतामातेला एक वर्षाची मुदत देऊन सांगितलं की एक वर्षाच्या आत तू स्वतःहून माझ्याशी रत झाली नाहीस तर मी तुझी हत्या करेन. सीतेने आपल्याशी स्वतःहून रत व्हावे म्हणून तिचे मन वळवण्यासाठी धमकी देताना माझे ऐकले नाहिस तर तुझे मांस न्याहारी म्हणून उद्या माझ्यासमोर असेल असा श्लोक स्पष्ट पणे आला आहे (वाल्मिकी रामायण, सुंदरकांड, सर्ग २२). अशी विशिष्ठ धमकी देण्याचे कारण म्हणजे रावण स्वत:ही नरमांसभक्षक होता. जेव्हा हनुमान सीतेला भेटायला लंकेला गेला, तेव्हा त्याने रावणाला "तू माझ्याशी स्वतःहून रत झाली नाहीस तर तुझी आणखी दोन महिन्यांनी हत्या करेन" अशी धमकी सीतेला देताना ऐकलं. यावरुन काय ते समजून जा. रावणाला फक्त स्वतःची स्तुती ऐकण्याची सवय होती. जेष्ठांनी व हितचिंतकांनी दिलेला सल्ला ऐकणे त्याला आवडत नसे. म्हणूनच सीतामातेला परत करा आणि रामाशी शत्रूत्व करू नका असा सल्ला देणार्‍या स्वतःच्या सख्ख्या भावाला म्हणजेच बिभीषणाला स्वतःपासून दूर केलं. मंत्री शुक आणि स्वतःचे आजोबा माल्यवान यांचाही योग्य पण त्याच्या मताविरुद्ध जाणारा सल्ला पसंत न पडल्याने या दोघांनाही त्याने स्वतः पासून दूर केलं. या उलट रामाने स्वतःच्या वडिलांनी दिलेल्या वराचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला. इतकंच नव्हे तर परत चलण्यासाठी विनवायला आलेल्या भावावरच राज्याचा भार सोपवून परत पाठवलं. मुळात राक्षस लोक कसे होते त्याचंही वर्णन रामायणात आलेलं आहे. रावणी वृत्तीचे लोक हे नरमांसभक्षक असून त्याचे अनेक उल्लेख वाल्मिकी रामायणात आले आहेत. रावणाचे राज्य गोदवरी पर्यंत पसरलेले नसून चंपा सरोवर म्हणजे सुग्रीवाच्या राज्यापर्यंत पसरले होते.तिथे कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेले तपस्वी आपली नित्यकर्मे करीत त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना मारुन खाणे हि मानवी संस्कृतीला घातक असे रावणाचे अन्यायी राज्य संपवणे हा हेतु होता. येता जाता दुसर्‍याच्या शेतातली कणसं कापून खावीत तसं राक्षस लोक दंडकारण्यातल्या मनुष्यवस्तीचा वापर करत. स्वत: रामानेच सीतेजवळ या परिस्थितीचे असे वर्णन केले आहे, ते चार्ता दण्डकारण्ये मुनय: संशितव्रता: वसंत: कालकालेषु नवे मूलफलाशना:। न लभंते सुखं भीरु राक्षसै: क्रूरकर्मभि" ॥५॥ भक्ष्यन्ते राक्षसैर्भीमैर्नरमांसोपजीविभि: । ते भक्श्यमाणा मुनयो दण्डकारण्यवासिन: ॥६॥ वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग १० "हे सीते ,हे दण्डकारण्यातले व्रतधारी मुनि अत्यंत दीन झालेले आहेत. ते बिचारे समयानुरुप उत्पन्न होणार्‍या कंदमूलफलावर उपजिविका करणारे आहेत व आपल्या व्रतनियमात दंग राहून ते कोणाच्या भानगडीत पडत नाहीत. तरिही क्रुरकर्मे नरमांसभक्षक भयानक राक्षस त्यांना खाऊन फस्त करित असतात. कारण नरमांस हे तर राक्षसांच्या उपजिविकेचे साधनच होय.मानवजातीचा केवढा भयानक संहार या दुष्ट सवयींच्या लोकांनी चालवला असेल." रावणाची बहीण शूर्पणखेच्या सन्मानाला धक्का लागला म्हणून रावणाने युद्ध केलं अशी फेकाफेकी केली जाते. त्याच बहिणीशी तो कसा वागला याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. शूर्पणखेचं पाळण्यातलं नाव मीनाक्षी असं होतं. तारुण्यात पदार्पण केल्यावर तिने दुष्टबुद्धी/विद्युतजिव्हा या असुराशी रावणाच्या परवानगी शिवाय विवाह केला. दुष्टबुद्धी हा महत्वाकाक्षी असल्याने रावणाला असा संशय होता की शूर्पणखेशी विवाह करण्यामागे दुष्टबुद्धीचा रावणाचे राज्य हडप करण्याचा उद्देश असावा, म्हणून त्याने प्रथम या विवाहाला आक्षेप घेतला. मात्र पत्नी मंदोदरीने त्याला बहिणीच्या इच्छेचा मान राखण्याविषयी विनवलं तेव्हा त्याने या विवाहाला मान्यता दिली. असे जरी असले तरी त्याच्या मनात राग खदखदत होताच. पुढे रावणाने दुष्टबुद्धीवर हल्ला करुन त्याला ठार मारलं. याला आपण आजच्या काळात काय म्हणतो बरं? बरोब्बर, हॉनर किलिंग. बहिणीच्या नवर्‍याची हत्या करणारा रावण तुम्हाला महात्मा आणि आदर्श भाऊ वाटतो? यामुळे साहजिकच कृद्ध झालेली शूर्पणखा सूडाने खदखदू लागली. आपल्या नवर्‍याची हत्या करणार्‍या भावाचा सूड घेण्यासाठी ती तडफडू लागली. अशात इकडे तिकडे भटकत असताना तिला राम व लक्ष्मण हे रघुकुळातले वीर पुरुष दिसले व तिच्या मनातल्या रावणाविषयीच्या सूडभावनेने आता एका षडयंत्राला जन्म दिला. आधी राम व नंतर लक्ष्मणावर अनुरक्त झाल्याचे दाखवणार्‍या शुर्पणखेने सीतेवर हल्ला करताच लक्ष्मणाने तिला रोखून तिचे नाक कापले. शूर्पणखेने याची तक्रार आधी तिचा एक भाऊ खर या राक्षसाकडे केली. खर आणि दूषण हे दक्षिण भारतात रावणाचे राज्य राखत असत. या दोन राक्षसांनी राम व लक्ष्मणावर हल्ला केला असता राम व लक्ष्मण या दोघांनी त्यांचे सहजपणे पारिपत्य केले. रावणाचे राज्य थोडे थोडे कुरतडले जाण्याने आनंदीत झालेली शूर्पणखा आता रावणाकडे राम व लक्ष्मणाची तक्रार घेऊन गेली. आता मात्र रावण भडकला, कारण राम व लक्ष्मणांनी "त्याच्या राज्यात घुसखोरी करुन त्याच्या बहिणीला विद्रूप केलं होतं आणि मग खर आणि दूषण या भावांना ठार मारलं होतं." आत्तापर्यंत शूर्पणखेच्या सन्मानाशी काहीही कर्तव्य नसणारा रावण त्याच्या राज्यावर झालेल्या हल्ल्याने मात्र चिडला व त्याने रामपत्नी सीतामातेचे हरण केले. पुढे जे घडलं ते सर्वविदीत आहेच त्यामुळे ते सांगत बसत नाही. रावणाच्या वासनांधते विषयी आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा हिमालयात फिरत असताना रावणाला ब्रह्मर्षी कुशध्वज यांची कन्या वेदवती दिसली. मुळातच स्त्रीलंपट असणारा रावण तिच्यावर लट्टू झाला नसता तरच नवल होतं. तिला बघताच रावणाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व तिला अविवाहित राहण्याचे कारण विचारले. तिने रावणाला सांगितले की तिचा विवाह भगवान विष्णूंशी करण्याचा माझ्या पित्याचा मानस होता. हे कळताच माझी अभिलाषा बाळगणार्‍या एका दैत्यराजाने माझ्या वडिलांची हत्या केली. त्याने दु:खी झालेल्या माझ्या मातेनेही त्यांच्या मागे आपला जीव दिला. तेव्हा पासून माझ्या पित्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मी श्रीविष्णूची आराधना करत आहे. हे ऐकताच अनाथ व 'उपलब्ध' असलेल्या वेदवतीला रावणाने 'त्याची' होण्याविषयी विनवणी करण्यास सुरवात केली. पण वेदवती मनाची पक्की होती. तिने रावणाला साफ नकार दिला. रावणाने तिचे केस पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच वेदवतीने स्वतःचे केस कापून टाकले व अग्नीत प्रवेश केला. आणि मरता मरता रावणाला शाप दिला की मी आता मृत्यू पावते आहे पण पुन्हा जन्म घेऊन तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेन. इथून पुढे वेदवतीविषयी काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एका गोष्टीत अग्नीत प्रवेश केलेल्या वेदवतीला अग्नीदेवांनी वाचवून स्वतःच्या घरी सांभाळ केला. पुढे रावण सीतेला पळवून घेऊन जात असताना सीतेच्या जागी वेदवतीला ठेऊन रावणाला फसवलं आणी सीतेला स्वतःच्या घरी ठेवलं. पुढे सीतेनेच रामाला ही गोष्ट सांगून वेदवतीचाही पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा आग्रह केला तेव्हा रामाने तो एकपत्नीव्रता असल्याचे सांगून त्याला नकार दिला. तेव्हा वेदवतीने पुन्हा अग्नीत प्रवेश केला. पुढे एका जन्मात पद्मावती म्हणून पुनर्जन्म झालेल्या वेदवतीशी विवाह करुन श्रीविष्णूने श्रीनिवासरूपात तिच्या पित्याच्या इच्छेचा मान राखला. अशीही गोष्ट सांगितली जाते की वेदवतीच सीतेच्या रूपात जन्म घेऊन रावणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. काय आहे की मी जसा त्या काळात नव्हतो तसेच रामावर वाट्टेल ते आरोप करणारे हिंदू द्वेषीही नव्हते आणि त्यांनी पसरवलेले ढकलसंदेश खरे मानून चालणारे भोळसट लोकही. त्यामुळे सख्ख्या बहिणीच्या नवर्‍याची संशयावरुन हत्या करणारा आणि दिसेल त्या सुंदर स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न किंवा प्रत्यक्ष बलात्कार करणारा रावण हा आजच्या बहिणींचा आदर्श कसा असू शकतो हे माझ्या अल्पबुद्धीच्या आकलनापलिकडची गोष्ट आहे. त्याची तूलना करायचीच तर आजकालच्या बिल क्लिंटन, टायगर वुड्स किंवा तत्सम बाईलवेड्या एतद्देशीय बलात्कार्‍यांशी करता येईल. सत्ताप्राप्तीसाठी खुर्ची राखण्यासाठी जीवाचं रान करणार्‍या अनेक आधुनिक स्वयंघोषीत जाणत्या राजांशी करता येईल. अनेक मोहात पाडतील असे प्रसंग आले असतानाही शेवटपर्यंत एकपत्नीव्रत पाळणार्‍या रामाशी नक्कीच नाही. वाचकहो, एक मोठे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचले जात आहे. जे जे भारतीय, ते ते कसे टाकाऊ हे सिद्ध करण्याचा व ते निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक सण आला की तो सण कसा प्रदूषण पसरवतो, नैसर्गिक साधनांचा र्‍हास कसा करतो हे सांगणारे संदेश सोशल मिडियावर फिरू लागतात. मग भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम, कृष्ण, यांच्यावर चिखलफेक सुरू होते. इतकंच नव्हे तर डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या देवमाणसाबद्दलही "बाँब डॅडी" आणि संघाचा युद्धखोर अजेंडा पुढे चालवणारे भारतीय पुरुषसत्ताक पद्धतीचे पुरस्कर्ते असेही घृणास्पद आरोप केले जातात. विश्वास बसत नसेल तर राजदीपपत्नी सागरिकाच्या नावाने आंतरजालावर शोधा. हीच गत सचिन तेंडुलकरने आपल्या उद्योगपती मित्राचे अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पर्रीकरांकडे शब्द टाकण्याची कंंडी पिकवणे असो किंवा अमिताभ बच्चनचे नाव पनामा पेपर्स मधे येण्याची. दुर्दैवाने आपल्या भारतीय लोकांची एक वाईट सवय आहे. आत्मक्लेषाची. आत्मपीडेची. या बद्दल डॉक्टर सुबोध नाईक यांनी लिहीलेला एक परिच्छेद उद्धृत करु इच्छितो: "स्वतःमध्येच तुमचा परीक्षक असणे हे तसे तुमच्या प्रगतीसाठी खूप छान आहे. पण तुमच्यामध्ये असलेला समीक्षक हा कधी तुमचे मूल्यमापन करता करता तुमचे अवमूल्यन करायला लागतो हेच तुम्हाला बऱ्याच वेळा समजत नाही. तुमच्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही फक्त आणि फक्त टीकाच करता. "माझ्याजवळ काहीही चांगले नाही, मी कधीही चांगला नव्हतो" असा तुमचा विश्वास ठाम होत जातो. स्वतःची टीका, स्वतःचे अवमूल्यन केल्याशिवाय तुम्हाला बरेच वाटत नाही. एका अर्थाने तुम्ही आत्मक्लेषक (masochist) बनता आणि तिथेच तुम्ही संपता. ब्रह्मदेव सुद्धा मग तुम्हाला मदत करू शकत नाही. हे जसे वैयक्तिक झाले तसे हे राष्ट्राचेही होते." अहो ते प्रभू रामचंद्र साक्षात मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांच्या पायाच्या नखांची सरदेखील आम्हाला येणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आत्मक्लेषास प्रवृत्त करणार्‍या फुटीरतावादी शक्तींना प्रोत्साहन देऊ नका. रामाच्या आडून हिंदूंच्या श्रद्धा-आस्था यांवर बंदूक चालवू बघणार्‍या शक्तींना बळ देऊ नका.
सहज जाता जाता सांगतो, शंबूक वधाची गोष्टदेखील मूळ रामायणात नाही

संदर्भः
१) वाल्मीकी रामायण
२) वैद्य रीक्षित शेवडे, डोंबिवली
३) रामायणाशी संबंधीत अनेक स्त्रोत
४) चंद्रशेखर साने 

© 
मंदार दिलीप जोशी
श्रावण शु. ११, शके १९३८

Sunday, August 7, 2016

पंडित नामा - ७: पंडित दीनानाथ मुजू

पंडित दीनानाथ मुजू
७१, रावळपोरा हाऊसिंग कॉलनी, श्रीनगर
मृत्यूसमयी वयः ७८
व्यवसायः निवृत्त सरकारी कर्मचारी
हत्या: ७ जुलै १९९०

काश्मीरमधे इस्लामी दहशतवादाच्या सुरवातीच्या काळात अतिरेक्यांनी ज्या पंडितांना लक्ष्य केलं होतं त्यात प्रामुख्याने सर्व पदांवरील सरकारी कर्मचारी, दुकानदार व व्यापारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पुजारी व भटजी, शिक्षक, आणि तत्सम प्रवर्गातील काश्मीरी हिंदूं सामील होते. म्हणजेच अतिरेक्यांनी काश्मीरी पंडित समाजाच्या आर्थिक, संस्कृतीक, सामाजिक, व राजकीय अशा सगळ्याच आधारस्तंभांना अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने घरात घुसून, रस्त्यावरुन चालताना, कार्यालयात, पळवून नेऊन शक्य तिथे यमसदनास धाडण्याचे सत्र आरंभलं.

याच हत्यासत्रातला एक दुर्दैवी बळी म्हणजे पंडित दीनानाथ मुजू. पंडित दीनानाथ यांचे सामाजिक कार्य खूप होते. शिक्षक आणि मुख्याध्यापक (म्हणजे बरखा दत्तच्या फर्ड्या इंग्रजीत हेडमास्टर बरं का) म्हणून पुढच्या पिढीचे शिक्षक तयार करणार्‍या सरकारी शिक्षक विद्यालयात कार्यरत असताना त्यांनी अनेक सामाजिक  कार्ये सुरु करुन ती जोमाने सुरू ठेवलीच होती, पण त्यांचा उत्साह निवृत्तीनंतरही टिकून होता. मुख्याध्यापकपदावरुन ते निवृत्त झाले खरे, पण समाजकार्यातून त्यांनी कधीच निवृत्ती घेतली नाही. सर्वानंद कौल प्रेमी यांच्याप्रमाणेच पंडित दीनानाथ मुजू हे अत्यंत लोकप्रिय होते. पंडित दीनानाथ हे निव्वळ शिक्षक नव्हे तर अनेकांचे मागदर्शक आणि आधार म्हणून ओळखले जात. शिक्षणक्षेत्राबरोबरच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास, तत्त्वज्ञान, ब्रह्मविद्या, काश्मीरी शैव धर्म, आणि जे. कृष्णमूर्ती यांचे विचार या गोष्टींत पंडित दीनानाथ यांना खूप रस होता व या विषयांचा त्यांचा खोल अभ्यासही होता.  या विषयांसंबंधी त्यांच्याकडे अनेक पुस्तकेही संग्रही होती. विश्वबंधुत्व ही संकल्पना अक्षरशः जगणारे पंडित दीनानाथ यांचे सामाजिक कार्य प्रामुख्याने गरीब व मागासलेले वर्ग यावर केंद्रीत झालेले होते. स्त्रीयांचे सक्षमीकरण हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. थियोसॉफोकल सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विमेन्स वेलफेअर ट्रस्ट या संस्थेचे तहहयात सदस्य असलेल्या पंडितजींनी या संस्थेच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केलं. ही संस्था काश्मीरात स्त्रीयांसाठी शैक्षणीक संस्था काढण्याचे काम करत असे. असे हे पंडित दीनानाथ मुजू संपूर्ण काश्मीरात एक संतप्रवृत्तीचे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते.

वृद्धापकाळात जन्मभूमी आणि पिढीजात घर सोडून जायचं जीवावर आलेल्या पंडीत दीनानाथ यांनी संभाव्य धोका ओळखून श्रीनगरच नव्हे तर काश्मीर खोरेही सोडण्याविषयी आपल्या मुलांचे मन वळवलं. आणि म्हणूनच मुजू परिवार निर्वंश होण्यापासून वाचला. पंडित दीनानाथ मुजू व त्यांची पत्नी हे दोघं मात्र जीवाला मुकले. मात्र त्यांचा मृत्यू इतरां अनेकांप्रमाणे क्लेषदायक झाला नसावा. सहा जुलै १९९० साधारण मध्यरात्रीच्या सुमारास काही दहशतवादी पंडित दीनानाथांच्या घरात शिरले आणि पंडितजी व त्यांच्या पत्नीला गोळ्यांचा वर्षाव करुन ठार मारलं. हे आणि इतकंच घडलं असावं असं सकाळी त्यांचे मृतदेह पाहून पोलीसांना समजलं.

जेव्हा पंडित दीनानाथ यांच्यासारखा एक माणूस संपवला जातो, तेव्हा निव्वळ एक माणूस मरत नाही. फक्त एक बाप किंवा भाऊ किंवा कुणाचा मित्र मरत नाही. समाज त्याबरोबरच बरंच काही गमावतो. भावी पिढ्या घडवणारा एक हाडाचा शिक्षक जातो, त्याचबरोबर अनेक पिढ्यांचं भविष्यही नष्ट होतं. एक विद्वान मरतो, त्याच बरोबर समाजाला त्याच्याकडून मिळणारं ज्ञानही. समाजाचा उत्थानासाठी झटणारा एक सामाजिक कार्यकर्ता हा इहलोक सोडून जातो तेव्हा होणारं नुकसान अपरिमित असतं. विविध धर्म व उपासनापद्धतींचा तसेच तत्त्वज्ञानांचा अभ्यासक संपवला जातो, तेव्हा जगाकडे उघड्या डोळ्यांनी व मोकळ्या मनाने बघण्याची समाजाची दृष्टी नाहीशी होते. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी झटणारा एक तळमळीचा कार्यकर्ता ठार केला जातो, तेव्हा समाज व देश किती वर्ष मागे फेकला जातो याची कल्पनाही करण अवघड आहे. समाज शारिरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही आक्रसत जातो. पण याचं सोयरसुतक सत्य काय ते एकाच पुस्तकात एकटवलं आहे आणि त्या पलीकडे जग नाही असं मानणार्‍यांना काय असायचं? यापलिकडे जे बोलतील त्यांना संपवणं, आणि त्या पुस्तकापलीकडे जे ज्ञानवर्धन करणारं साहित्य असेल ते जाळणं एवढीच अक्कल असेल तर कोण काय करणार.

पंडित दीनानाथ मुजू तर गेले. पण एक प्रश्न कायम सतावतो तो म्हणजे आणि त्यांच्यासारख्या अनेक दिग्गज विद्वानांकडच्या साहित्यसंपदेचं काय झालं असावं? याचं उत्तर  बहुतांशी १९९५ साली काश्मीरात घडलेल्या एका प्रसंगात सापडतं. पण तो प्रसंग वर्णन करण्याआधी थोडंसं इतिहासात डोकावूया.

११९९ मधे भारतावर एक भयानक नुकसान करणारं इस्लामी आक्रमण झालं, ते तुर्की बादशहा बख्तियार खिलजीच्या रूपात. हजारो लाखो हिंदू मारणारे इतर इस्लामी आक्रमणकारी एका बाजूला आणी हा राक्षस एका बाजूला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. त्या काळी फक्त भारतालाच नव्हे तर जगाला ज्ञानप्रदान करणारं नालंदा विश्वविद्यालय एक अत्यंत भव्य अशा प्रकारचं विद्यापीठ होतं. सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) स्थापन झालेल्या या विद्यापीठाला सम्राट हर्षवर्धनाने शंभर खेड्यांइतकी जमीन दान दिली होती. विविध देशातील दहा हजार विद्यार्थी शिकत असलेल्या या विध्यापीठात निव्वळ प्रवेश घ्यायलाही अत्यंत कठीण अशी परीक्षा द्यावी लागे. सनातन वैदिक धर्माबरोबरच बौद्ध व जैन तत्त्वज्ञान, वेदाध्ययन, भाषा व व्याकरण, आयुर्वेद, गणित, पाणिनी सूत्र अशा असंख्य विषयांचे अध्यापन तिथे केले जात असे. अशा या विद्यापीठाचं ग्रंथालयही अवाढव्य होतं.

बख्तियार खिलजीने नालंदा नगरी बरोबरच नालंदा विश्वविद्यालयाचा विध्वंस करण्याचा निश्चय केला. कुराणापलिकडे  काहीही सत्य नाही आणि काही ज्ञान नाही आणि त्या बाहेर जे सापडेल ते हराम आहे सबब ते नष्ट केलंच पाहीजे या शिकवणीला अनुसरून विश्वविद्यालयाला एके दिवशी आग लावण्यात आली. या विद्यापीठाचं प्रचंड मोठं असलेलं ग्रंथालय पुढचे कित्येक महिने जळत होतं. या वरुन किती अनमोल ग्रंथ व त्यातलं अमर्याद ज्ञान नष्ट झालं असेल याची कल्पनाही करता येणार नाही.

काश्मिरी दहशतवाद्यांनी मात्र जाळाजाळीबरोबरच पंडीतांच्या ग्रंथसंपदेबाबत एक नावीन्यपूर्ण धोरण अवलंबलं होतं. खिलजीच्या काळात फक्त सोनंनाणं संपत्ती म्हणून जमा करता येत असे किंवा  विकता येत असे. नव्या काळात ज्ञानालाही किंमत आली. मग ज्याला किंमत आहे, ते जाळायचं कशाला? ते विकायचं, आणि त्यातून आपला जिहाद चालवायला पैसे कमवायचे. १९९५ साली घडलेली ती घटना वर्णन करताना एक अनाम पंडित म्हणतात, की एके दिवशी देवदर्शन करून सायकलवरुन घरी परतत असताना वाटेत त्यांच्या एका मुसलमान सहकारी व्याख्यात्याने थांबवून एक विचित्र बातमी दिली. तिथून काही अंतरावर एका टपरीवजा झोपडीत एका बोटमालकाने पंडितांच्या घरातून चोरलेली हजारो पुस्तकं आणि दुर्मीळ हस्तलिखीतं विक्रीला ठेवली आहेत. पंडितजींनी सायकल त्या दिशेला वळवली आणि अनेक किलोमीटर दामटवून त्या स्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना खरंच एक बोटमालक पुस्तकविक्री करताना दिसला. शेडमधे युरोप व अमेरिकेतील बरेच विद्वान व अभ्यासक जमा झालेले दिसले. जी पुस्तकं आणि हस्तलिखीतं मागूनही हजारो रुपयांना विकायला त्यांच्या पंडित मालकांनी नकार दिला असता ती ग्रंथसंपदा आता विदेशी ग्राहकांना वीस रुपये किलोने विकली जात होती. पंडितजींना पाहून तो बोटवाला म्हणाला, "तुम्ही पंडितांसारखे दिसता, मग तुमच्यासाठी वेगळा भाव आहे. तुम्हाला किलोमागे तीस रुपये द्यावे लागतील." पंडितजींनी खिशातून सरळ शंभर रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि ती आगाऊ रक्कम असल्याचं सांगत त्यांना तिथून नेता येतील तितकी पुस्तकं उचलायला सुरवात केली. पंडितजींनी त्यांना झेपेल इतकं केलं, पण   विदेशी ग्राहकांना विकल्या गेलेल्या असंख्य पुस्तकांचं काय? ती काही कुठल्या लष्करी मोहीमेअंतर्गत लुटली गेली नव्हती, त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अशक्य होतं. ही पुस्तकं विदेशात का होईना पण वाचली जात आहेत, उपयोगात आणली जात आहेत हे समाधानही फोल आहे. कारण वेद, पुराणं, व स्मृतिग्रंथांचा पाश्चात्य देशात अभ्यास होऊन ते अत्यंत विकृत स्वरूपात आपल्यापुढे माडला जाण्याचा इतिहास फार जुना नाही. इंटरनॅशनल शाळांचा व मिशनरी शाळांनी कॉन्व्हेन्टीकरण केलेल्या आजच्या शिक्षणात जे जे भारतीय व जे जे हिंदू ते ते टाकाऊ असं ब्रेनवॉशिंग करुन अनेक पिढ्या बरबाद करुन झालेल्याच आहेत. पण तो एक वेगळा व मोठा विषय आहे.

पंडित दीनानाथ यांच्याकडेही अशीच ग्रंथसंपदा असेल. त्या पुस्तकांचं काय झालं असेल? ती जाळली गेली असतील की अशाच एखाद्या ठिकाणी किलोच्या भावाने विकली गेली असतील? जगात कुठे कुठे असतील ही पुस्तकं? कुणास ठाऊक. बख्तियार खिलजीला या नव्या जिहादींचा निश्चितच अभिमान वाटला असता. फक्र.

पंडित दीनानाथजींसारख्यांच्या आत्म्याला मात्र स्वतःच्या मृत्यूपेक्षा या पुस्तकांचा मृत्यू अधिक चटका लावून गेला असेल हे नक्की.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण शु. ५, शके १९३८, नागपंचमी
०७ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------