Tuesday, August 12, 2014

ऐकावे गे नवलच!

पुण्यातल्या हिंजवडी भागातील एक प्रतिष्ठित कंपनी. त्या कंपनीची एक कॅब. एकेदिवशी........नव्हे एके रात्री नऊ वाजता ऑफिस सुटल्यावर त्या गाडीत दोन पुरुषसहकर्मचारी बसतात. एकाला बावधनला उतरायचे आहे तर दुसर्‍याला कोथरुडला. अनपेक्षितरित्या त्याच वेळी चालकाच्या शेजारच्या आसनावर एकबंदुकधारी सुरक्षारक्षक बसतो. "रात्री महिलांना सुरक्षा पुरवायचे आदेश आहेत. आम्हीदोघे पुरुष असताना सुरक्षारक्षक कशाला? ते पण बंदुकधारी?" असा प्रश्न ते दोघे सहकर्मचारी विचारतात. "राहूदे साहेब शिकुरिटी" असे चालक म्हणतो. "असूदे तर असूदे, सुरक्षारक्षक असेल तर ते चांगलंच की" असा विचार करुन ते दोघे गप्प बसतात.

गाडी सुरू होते, आणि काही वेळाने त्या चालकाचे आणि त्या बंदुकधारी सुरक्षारक्षकाचे "चाळे" सुरू होतात. चालत्या गाडीत. मागे बसलेल्या दोघांना आधी किळस वाटते आणि मग त्यांचे धाबे दणाणते. एक तर गाडी सुरू असताना यांचे चाळे सुरू. म्हणजे'नजर हटी दुर्घटना घटी'ला खास आमंत्रण. त्यात त्या सुरक्षारक्षकाकडे बंदुक. आक्षेपघेणार तरी कसा? दुसरी गंभीर बाब म्हणजे त्यांचे चाळे संपून त्यांनी या दोघांवर बंदूक रोखून यांनाच काही केलं तर? दोघे सहकर्मचारी प्रचंड घाबरलेले. आधी बावधनचा थांबा येतो. तिथे पहिला कर्मचारी उतरतो. दुसर्‍याला पुढे कोथरुडला एकट्याने जायचे धैर्य होत नाही. तो ही बावधनवाल्याबरोबर उतरतो. मग तो बावधनवाला त्याला कोथरुडला सोडतो.

प्रसंगावधान राखून त्यातल्या कोथरुडवाल्याने तो चालक व सुरक्षारक्षकाचे चाळेमोबाईलवर व्हिडीओ चित्रिकरण करुन ठेवलेले असते. तो दुसर्‍याच दिवशी मनुष्यबळ संसाधन खात्याला, म्हणजे मराठीत एच.आर.ला, पुराव्यासकट, म्हणजे त्या विडीओ क्लिप सकट विपत्र पाठवून तक्रार करतो. आता पुढे कारवाई होईलच.

हा किस्सा प्रथम ऐकला तेव्हा मोठा धक्का बसला यानंतर असलं काही ऐकलं तर धक्का बसेलच असं नाही. आपण बाललैंगिक शोषण, कॅबवाल्यांनी महिला कर्मचार्‍यांवर केलेले अत्याचार, रोज वाचायला मिळणारे महिलांवरील बलात्कार वगैरे विषयांवर तावातावाने चर्चा करतो. पण आता शहरात राहणार्‍या प्रौढ पुरुषांनीदेखील स्वत:ला त्या दृष्टीने सुरक्षित समजू नये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रोजच्या जगण्यात जरा जरी काही वावगे आढळल्यास वेळीच आक्षेप घ्यावा म्हणजे नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही. कलम ३७७ रद्ध करावे असा गळा काढणारे काढोत, त्यांचे बरोबर असो की चूक आय सिंपली डोन्ट केअर, पण हा प्रसंग ऐकल्यावर माझा तरी हे कलम रद्ध करायला ठाम विरोध असेल. मग कोर्टासमोर हे लोक नंगानाच का घालेनात. अगदी दुसर्‍या बाजूने विचार केला तरी स्त्री असो किंवा पुरुष, सार्वजनिक ठिकाणी उर्मी दाबून ठेवता आल्याच पाहीजेत. जे काही चाळे करायचे असतील ते बंद दाराआड करा. चालत्या गाडीत लोकांच्या जीवाशी खेळ कशाला?


-------------------------------------------------
श्रावण कृ. १, शके १९३६