Wednesday, August 14, 2013

अंधश्रद्धा नव्हे प्रथमोपचार संच..

लेखकः श्री केतन लिमये

टीपः हा लेख श्री केतन लिमये यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या परवानगी शिवाय ह्या ब्लॉगवर टाकत आहे. श्री केतन लिमये यांनी हा लेख इथे बघितल्यास व यांची इच्छा असल्यास हा लेख इथून त्वरेने काढून टाकण्यात येईल.

 

आजच प्रा. प्र. के. घाणेकर यांचे " डोळस भटकंती " हे पुस्तक वाचताना एक नवीन माहिती मिळाली. ती म्हणजे आपण जे रस्त्यात पडलेली लिंबू मिरची अशी माळ (त्याला दृष्टमाळ असा म्हणतात ) बघतो ना त्याबद्दल .. याच दृष्टामाळा एके काळच्या प्रथमोपचाराची साधने होती. पूर्वी शहरांपेक्षा गावे आणि जंगले जास्त होती. त्यात ग्रामीण भागात सोयी सुविधा अत्यल्प. शेती करून जगणारी ही माणसे. साहजिकच रस्त्याची कमतरता आणि त्यामुळे दळणवळणाचे मुख्य साधन म्हणजे गावा गावांना जोडणाऱ्या पायवाटा. म्हणूनच पूर्वी या फिरण्यात सूर्यामुळे होणारा उष्णतेचा त्रास, साप चावणे, बारीक जखमा, खरचटणे हे या प्रवासातले उपद्रव. अश्या वेळी जंगलातून किंवा कमी लोकवस्तीतून फिरताना लवकर मदत उपलब्ध होते नसे.. त्यावर कोणीतरी हा तोडगा शोधला. त्याने ही प्रथमोपचाराची माळ बनवली. ही माळ घराबाहेर, किंवा एखाद्या झाडावर टांगलेली असे. म्हणजे जरी एखादे घर बंद असले तरी त्या पंथास्ताला हे प्रथमोपचार साहित्य उपलब्ध होईल.

आपल्याकडे विषारी सापांची संख्या तशी कमी आहे. (४च) त्या विषारी सर्पांमध्ये Neurotoxic आणि Hemotoxic अशी दोन प्रकारची विषे असतात ज्यामुळे मृत्यू संभवतो. परंतु बरेच वेळा सापांची माहिती नसेल तर साप चावलेल्या व्यक्तीला आपल्याला चावलेला साप विषारीच आहे असे वाटत असते. त्यासाठी अश्या माणसाला मिरची चावायला दिली जाते कारण साप चावला की माणसाची संवेदना कमी कमी होत जाते. त्यात चवीची संवेदना आधी नष्ट होते. तर ही मिरची चावल्यावर जरा त्याला त्यातला तिखटपणा जाणवला तर ती Neurotoxic विषबाधा नसते. असा हा एकदम सोपा आणि सुटसुटीत उपाय.तसेच दुसरा भाग म्हणजे लिंबू. लिंबाचा रस उन्हाच्या बाधेवर गुणकारी असतो. तसेच ही माळ एका अणकुचीदार तारेने टांगली जायची. उद्देश असा की चालण्यात काटा घुसला तर तो काढण्यासाठी याचा सुई सारखा उपयोग होई. तसेच लहान मुलाना हे मिरची, सुई अश्या गोष्टी घटक ठरू शकतील म्हणून दाराबाहेर किवा उंच फांद्यांवर हे टांगण्याची प्रथा सुरु झाली.

आता सगळीकडे तसे दळणवळण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. तेव्हा आता या गोष्टीचा तसा उपयोग नाहीये. तरी आपल्या दृष्टमाळा विकण्याचा धंदा अबाधित चालावा म्हणून काही लोक अजूनही हे विकतात. मामुली किंमत असल्यामुळे आपणही या वस्तू अंधश्रद्धेच्या वाटेला जाऊन घेतो. त्यामागच्या विज्ञानाचा विचारच करीत नाही .. आता हे थांबवले पाहिजे कारण लिंबू मिरच्या आपल्या जेवणाच्या पानामाधला महत्वाचा घटक आहे म्हणून ही खाण्यासाठीच वापरली गेली पाहिजेत. शेतकर्‍यांचे श्रम असे रस्त्यात फेकून देणे थांबवायला हवे.