Saturday, January 8, 2011

केळशीची द्वारका

दादांनी केळशीला डुंगातले जुने घर दुरुस्ती अशक्य असल्याने पाडून नवे बांधण्याचे मनोगत बोलून दाखवल्यापासून ते त्यांनी वास्तूशांत करण्याची तारीख सांगेपर्यंत कसे दिवस गेले (नुसते कॅलेंडरचे नाही काही, अक्षरशः सुद्धा. अहो म्हणजे जोशी कुटुंबाला परमेश्वराने रुद्रची भेट दिली) ते समजलंच नाही.

डुंगातले जुने घर

"एकतीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी दुपारी चारला तुम्हाला पूजेला बसायचंय, तेव्हा एक-दीड पर्यंत तरी पोहोचा." असा मातोश्रीवरुन आदेश आल्याने तस्मात एकतीस जानेवारी दोन हजार दहा या कॅलेंडर वर्षातल्या शेवटच्या दिवशी मी "सकाळी सात वाजता निघायचंय" असा संकल्प आमच्या मंडळींना सांगितला. पण भार्गवी (वय ३ वर्ष) आणि रुद्र (वय ६ महिने) यांनी संगनमताने बाबांचा प्रत्येक संकल्प मोडून काढण्याचा संकल्प केल्याप्रमाणे निरनिराळे कार्यक्रम आयोजित करुन निघायला तब्बल आठ वाजवले. सोबत आमचे सासू-सासरे दुसर्‍या गाडीतून येणार असल्याने जरा धाकधुक होती, पण चालकाला केळशी माहित असल्याने फार काळजी नव्हती.


जाताना मुळशी जवळ एका क्षुधाशांतीगृहात थांबून न्याहरी केली आणि मग वाईट, भयानक, आणि अतिभयानक अशा दर्जापातळ्यांमधे हेलकावे खाणार्‍या दिव्य रस्त्यांवरुन मार्गाक्रमण करत मंडणगडला पोहोचलो. तिथे लक्षात आलं की रुद्रचं अंग गरम लागतंय. मंडणगडच्या राज्य परिवहन मंडळाच्या स्थानकातच थांबून वडे हाणले आणि चहा घेतला. इथेच थांबून मग दोन्ही गाड्यांनी एकत्र पुढे जायचं असं ठरलं होतं पण (नशीब मे लिख्खाइच था, म्हणून पांडू काही करू न शकल्याने) दोन गाड्यांची चुकामुक झाली आणि श्वशुरगृहीची मंडळी केळशीला आमच्या आधीच पोहोचली.

केळशीला पोहोचल्यावर झोपाळा दिसताच भार्गवीने त्याचा ज्या पद्धतीने ताबा घेतला त्यावरुन केळशीची माहेरवाशिण होण्याच्या दॄष्टीने तिचा 'सेल्फ स्टडी' योग्य दिशेने सुरू आहे याची खात्री पटली. एकूण केळशीच्या माहेरवाशिणींकडे हा गुण उपजतच असावा. असो.


काकूआजी दादांबरोबरच केळशीला गेल्याने भार्गवी आणि रुद्रला लगेच पणजीदर्शन झालं.

दादांनी नात्यातल्या ज्या भावंडांचा जन्म आणि/किंवा बालपणाचा बराच काळ डुंगातल्या घरात गेला आहे अशांना या पुजेला उपस्थित राहण्यासाठी बोलावलं होतं. त्यापैकी एका गाडीतून आत्याचार (नीला आत्या, अलका आत्या आणि तिचे यजमान गांगल काका, प्रभा आत्या, प्रमा आत्या) आणि अशोक काका, वसुंधरा काकू आणि स्मिता काकू दुपारी चारच्या सुमारास आल्या. मग अनिलमामा, मामी, आणि आदित्य बाईकवरून आले.


केळशीला बी.एस.एन.एल.चा मोबाईलचा टॉवर होऊन दोन वर्ष झाली म्हणे, पण अजूनही रेंज नाही. तेव्हा केळशीला गेल्यावर मोबाईलचा उपयोग गजराचं घड्याळ किंवा पेपरवेट एवढाच. गजराचा घोळ सांगतो.


या कोंबड्याने भर थंडीत मला चांगलंच पळवलं. नाही, ते 'हाल कैसा है जनाब का' या गाण्याच्या आधी किशोर कुमार कोंबड्याच्या मागे पळतो तसं नाही. मी माझ्या मोबाईलचा गजराला मी कोंबडा आरवतो ती धुन (टोन) वापरतो. आणि हे प्रत्यक्षातले कोंबडे महाशय केव्हाही आरवायचे. केव्हाही म्हणजे अक्षरशः केव्हाही. सकाळी अकरा, दुपारी दीड, संध्याकाळी पाच, अगदी स्वतःच्या लहरी प्रमाणे. आधी मला काही कळलंच नाही. मी प्रत्येक वेळी "मोबाईल बिघडला की काय, की भार्गवी चाळे करत्ये?" असा विचार करुन जिथे असेन तिथे मोबाईल शोधायला धावायचो. पण मग हे साहेब दिसले आणि घोळ लक्षात आला.
तर, चांगली दोन तास झोप काढल्यानंतर "गुरुजी आले" या दादांच्या हाकेने मला जाग आली. महत्प्रयासाने आणि किमान दोघांच्या मदतीने कद नेसून मी पूजेला बसलो. मग मधूश्रीही आली. राक्षोघ्न होम असं या पूजेचं नाव. पितरांच्या शांती साठी आणि नकारात्मक शक्तींपासून घराचे रक्षण करण्यासाठी हा होम असतो अशी माहिती गुरुजींकडून समजली. "कद नीट नेसलंय ना? कारण मधे मधे बरंच उठणं फिरणं होणार आहे" हे चार पैकी कुठल्यातरी एका गुरुजींचं वाक्य आकाशवाणी सारखं कानावर आदळलं. ते ऐकून पोटात गोळा आला. (उगाच फिस्सकन् हसू नका. कद सारखं पायात येऊन अडखळणारा जगात मी एकटाच नाही. पुन्हा असो.)


केळशीलाही चांगलीच थंडी होती. दुपार नंतर ती चांगलीच जाणवू लागली. त्यात अर्ध लक्ष रुद्रकडे होतं. शेवटी रात्री त्याला केळशी आणि पंचक्रोशीतले लोकप्रिय डॉक्टर भागवत यांच्याकडे मधूश्री आणि दादा घेऊन गेले. ते परत येईपर्यंत कुणाच्याच जीवात जीव नव्हता. ते तासा-दीडतासाने परत आल्यावर हा ताप फक्त स्थानपरिवर्तनामुळे झालेला हवामानातील बदलामुळे असल्याचं समजलं आणि जीव भांड्यात पडला. उपरणे सोडल्यास वर काहीही न घातलेला मी संपूर्ण वेळ कुडकुडत होतो. होमाग्निमुळे थंडी कमी जाणवत होती पण फारसा फरक वाटला नाही. पण का कोण जाणे मंत्र म्हणताना गुरुजींचा आवाज अगदी वरच्या पट्टीत पोहोचला की त्या भारलेल्या वातावरणात थंडी आपोआप कमी झाल्यासारखी वाटे. पाच वाजता सुरू झालेला हा होम रात्री जवळ जवळ साडेदहापर्यंत चालला. केदार सहा वाजता वसुंधरा काकू बरोबर आला. दरम्यान इतर मंडळींनी जेवणं उरकली आणि मग शेवटी आम्ही बसलो. कधी एकदा पाठ टेकायला मिळत्ये असं झालेल्या मी लवकर जेऊन वर जाऊन झोपलो. वर अगोदरच गुरुजी आणि अनेक बाप्ये मंडळी झोपली होती. मी एका कोपर्‍यात गादीवर जाऊन अक्षरशः आदळलो. गुरुजींच्या मंत्र म्हणणार्‍या उच्चपट्टीतल्या आवाजाशी स्पर्धा करणार्‍या एका घोरण्याच्या घुर्रsssघुर्रsss आवाजाशी झटापट करत शेवटी एकदाची झोप लागली.

दुसर्‍या दिवशी वास्तूशांतीची पूजा सुरु झाली. आता मला थंडीचा इतका त्रास होऊ लागला की शेवटी वसुंधराकाकूची शाल पांघरून मी पूजेला बसलो. ती शाल 'याक' नामक एका प्राण्याच्या लोकरीने तयार केली आहे असं काकूकडूनच नंतर समजलं. 'याक' हा प्राणी जगाच्या पाठीवर नेमक्या कुठल्या प्रदेशात आढळतो अशा विचारात मी पडलो. (का कोण जाणे मला पुलंच्या 'म्हैस' कथेतला "थर्मास मात्र फर्स्टक्लास हो तुमचा, अमेरिकन दिसतोय" हे वाक्य आठवलं. पुन्हा असो.). त्या शालीने मात्र चांगलीच उब दिली. इतकी छान उब देणारं कापड ज्याच्या लोकरी पासून तयार होतं त्या गुणी प्राण्याला कोणत्या गाढवाने 'याक' असं नाव ठेवलं असावं परमेश्वर जाणे. काकू झिंदाबाद. सकाळी साधारण आठ-नऊ वाजता सुरू झालेली पूजा अखेर साडेबाराच्या सुमारास संपली. मग जमलेल्या गावातील पाहुणे जेवायला बसले. जेवण्याची व्यवस्था उत्तम होती. सगळ्यांना कुठे काही कमी पडू नये यासाठी दादांबरोबर अशोक काका आम्ही जेवायला बसल्यावर प्रमा आत्याने तिची कविता म्हणून दाखवली. मग आम्ही जेवायला बसलो. त्याच वेळी अविकाका, चारूहास आणि काकू आले. बंगळूरूच्या इंदू आत्याने केलेली कविता अशोक काकांनी म्हणून दाखवली.

सागरतीरी डोंगरा तळी, रम्य केळशी गाव
त्या गावी अतिन्यारे स्थळ एक, डुंग तयाचे नाव
डुंगामध्ये जोशीकुळाचे, एकुलेच घर छान
पुन्हा बोलवी खेळाया ते, सर्व थोर अन् सान
चला चला रे पुन्हा सर्वजण बालक होउनी पाहू
बालपणीच्या रम्य स्मृतिंच्या सुखात रंगून जाऊ
सुंदर फुलझाडांनी नटला वाडीचा परिसर
आंबा, फणस, चिकू, आवळा, नारळही भरपूर
झावळ्यांच्या जाळीतून झरती, रविकिरणांचे स्त्रोत
भूमीवरती सहज दाविती उनसावलीचे नृत्य
वाडीसरता सुरू होतसे सुंदर पाउलवाट
नागमोडी वळणांनी जाई विभागीत शेत

गावापासून दूर डोंगरी छोटीशी बावडी
आम्हां न माहित कां म्हणती तिज सारे दक्षिण माडी
शहरी मुलांना नसे आवडत मचुळ पाणी विहीरीचे
उपाय त्यावर पाणी रुचकर प्या दक्षिण माडीचे

सूर्य उगवता मुली निघतसी कटि घेऊन केळशीला
रुपेरी पडद्यावरी बालिका जशा निघती पाण्याला

मजा सृष्टीसौंदर्याची चाखित जाती रमतगमत
कोल्हेकुई कधी कानीं पडता, काटती झपझप वाट
सकाळ सुंदर मजेत जाई, भटकता परिसरात
जिभेवरी घोळतो अजूनि आजीचा गुरगुट्या भात

भोजन सरता वडील मंडळी जेव्हा विश्रामिती
वानरसेना निघे हिंडण्या तेव्हा अवतीभवती
बंद खोलीतील लिती आंब्याची टोपली खुणवी मना
बेत आखला गुपचुपगुपचुप त्यांची चव चाखण्या

युक्तीयुक्तीने कडी उघडून आंब्यांप्रत पोचलो
पदरी मावले तितुके घेऊनी वाडीत पळालो
त्या आंब्यांची रुचीच न्यारी तृप्ती काही होईना
परिणामांची क्षिती न वाटली त्यासमयी तरी कुणा

'एकच खाऊ' करता करता फस्त झाली टोपली
रुक्ष बाठींची उधळण सार्‍या वाडीभर झाली
गुपित आपुले मनी लपवुनी सारे झोपी गेले
दुसर्‍या दिवशी म्हाद्या येता भांडे उघडे पडले

गावामध्ये देऊळ सुंदर जगदंबेचे असे
सळसळ करी पिंपळ जवळी उन्हीं चांदीचा भासे
पार्श्वभूमीवर शांत जलाशय खोली ना आकळे
कंकर फेकूनी तयात बनवू वर्तुळात वर्तुळे
कथा कीर्तने गोंधळ ह्यांची मजाच न्यारी वाटे
असुर देवता देहीं पाहूनि मनी अचंबा वाटे

चलू समुद्रातीरी ओंजळीं धरुनी कैर्‍या घट्ट
पुडी कागदी उघडून त्यांना लावू तिखट मीठ
उघडता पुडी कधी अचानक सर वार्‍याची येई
उडून जाई तिखट मीठ अन् हाती कागद राही
वाळूवरचे खेळ संपता नजर सागरी जाई
अतिविशाल त्या लाटा पाहूनी मन हरखून जाई
क्षितीजापाशी कधी बुडतसे लाल रम्य एक लोटा
निरोप त्याला देता देता भरे मनी खिन्नता
मिणमिणत्या कंदिल प्रकाशी बसू सर्व अंगणी
स्तोत्रे-गाणी म्हणता म्हणता रात्र जाई रंगुनी

गोष्टी भुतांच्या कधी ऐकता तन रोमांचित झाले
कुणा न कथिता मनोमनी मग रामनाम जप चाले
इन-मीन ते दिवस सुट्टीचे अति आनंदी गेले
आजी-आजोबा आप्तेष्टांच्या प्रेमी भिजलेले
भाग्य आमुचे पुढील पिढ्यांच्या सर्व बालकां लाभो
नव्या गृही तव दिलीप वैजयंती सुख-समृद्धी राहो

ही कविता ऐकल्यावर वसुंधरा काकूला प्रभू श्रीरामांच्या "ते हि नो दिवसा गता:" ची आठवण झाली. मग आहेर वगैरे अन्य कार्यक्रम उरकल्यावर नाव घेण्याचा कार्यक्रम झाला. मधूश्रीने घेतलेला उखाणा मला आठवत नाही (वाचलो, तिलाही आठवत नाहीये). पण मी घेतलेला मात्र आठवतोय:

"मंदार, मधूश्री, रुद्र, भार्गवी, केदार; आई-दादांनी बांधली द्वारका, तिचा आम्ही होऊ आधार"

मी कॉलेजात असताना अधुनमधुन ट ला ट, फ ला फ छाप कविता करत असे त्याचे स्मरण होऊन, आधी तयार केला होता की काय अशी अनेकांना शंका आली. पण तो खरंच तिथल्या तिथे सुचला.


या सगळ्या कार्यक्रमात दोन्ही दिवस रुद्र आणि भार्गवीला व्यवस्थित आणि बराच वेळ सांभाळल्याबद्दल अशोक काका आणि वसुंधरा काकूचे विशेष आभार. त्यांना सांभाळणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.
मला बरंच लिहायचं होतं पण दोन कॅमेर्‍यांमधले फोटो एकत्र करणे, त्यांना कालानुक्रमाने लावणे, या गोष्टींसाठी लागणारा वेळ माझ्याकडे नव्हता. एरवी मी असली कामं रात्री जागून किंवा पहाटे लवकर उठून करतो, पण पोरांच्या दंग्याने महाग झालेली झोप आणि पुण्यातील थंडीने न येणारी जाग यांनी ते करू दिलं नाही. आज शेवटी वेळ मिळाला. तेव्हा फोटो उशीरा पाठवल्याबद्दल क्षमस्व.


सगळे फोटो बघण्यासाठी इथे टिचकी मारा.

केळशीवरील माझ्या अन्य एक लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

केळशीचे अन्य फोटो बघण्यासाठी इथे टिचकी मारा.