Saturday, December 31, 2022

खर्रा इतिहासः ख्रिसमस ट्री - एक मुघल शोध

 आपण हिंदूस्थानात मोठमोठ्या टूर्स काढत असूनही दीवान-ए-खास मधे आपल्या कामाची पुरेशी चिन्हे (souvenir) नाही अशी जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सरांना अलीकडे (म्हणजे हल्ली, कुणाकडे असं नव्हे. चावट कुठले) खंत लागून राहिली होती. बेगम शोधाबाईंच्या नादाने एक दोन मराठी मालिकांचे बघून त्यांना "प्रेझेंटेशन" द्यायची हुक्की आली होती पण त्यांच्या दिमाग-ए-मस्तिष्कचे जे विचार करण्याचे काम त्यांनी ज्या बिरबलाला औटसोर्स केले होते त्याने बादशहासरांना आवरलं म्हणून बरं झालं. 

पण अकबर सर सुद्धा कधीकधी विचार करत असत. जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सर हिंदूस्थानात जिथे जिथे टूर घेऊन गेले होते तिथल्या स्थानिक झाडांची रोपे कुंडीत आणून दीवान-ए-खासमधे ठेवण्याची सूचना त्यांनी बिरबलाला केली. पण अकबर सरांना नुसतीच झाडं बघवेनात. त्यांनी बेगम शोधाबाईंना सांगून त्या झाडांवर चायनीज प्रवासी फुं-कून-पी आणि दी-वे-लाऊ यांनी बादशहा सरांना भेट दिलेले एक हजार दिवे त्या झाडांना लावून टाकले. पण ते दिवे चायनीज असल्याने त्यातले फक्त सातशेसहाईंशीच दिवे पेटले. शोधाबाईंना चिंता लागून राहिली पण बिरबलाने त्यांना "तसे बादशहा जिल्लेइलाही अकबर सरांचेही दिवे फारसे पेटत नसल्याने काही कळणार नाही" असा दिलासा दिला.

प्रचंड थंडीला कंटाळून युरोपियन प्रवासी रिका-म-टेकडोस्की एकदा डिसेंबरात दिल्लीत आला असताना त्याने दरबारात ही रोषणाई बघितली अ‍ॅंड रेस्ट इज हिस्टरी. अशा रीतीने ख्रिसमस ट्रीची परंपरा युरोपात प्रचलित झाली. 

पण हा खर्रा इतिहास युरेशियन विकेंड इतिहासकार तुम्हाला कधी सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
पान ६६६, ओळ ८

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

🖋️ मंदार दिलीप जोशी






Sunday, December 18, 2022

प्रारब्ध

एक व्हिडिओ बघितला ज्यात एक ताई राजकीय बंदचा भाग म्हणून दुकान बंद करायला आलेल्या काही तरुणांना समजावत आहेत. त्याच ताईंच्या फेसबुक पोस्टवर जी मंडळी गरळ ओकत असतात, त्यांच्या पोस्टवर आलेल्या घाणेरड्या भाषेतल्या टिप्पण्या वाचून लहानपणी आजोबा सांगायचे ती गोष्ट आठवली.

खूप पूर्वी एका आटपाट गावात एक म्हातारा-म्हातारी आणि त्यांचा मुलगा रहायचे. बिचारे इतके गरीब होते की दिवस दिवस उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. एकदा काय झालं की गरिबीमुळे त्रासून त्यांनी भगवान शकरांकडून वर प्राप्त करून घेण्यासाठी तप करायचं ठरवलं आणि तिघेही ध्यान लावून बसले.

कैलासावरून त्यांचं तप बघत असलेल्या पार्वतीमातेला त्यांच्यावर दया आली आणि त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, "अहो, बघा ना, हे तिघे किती घोर तप ठरत आहेत. तुम्ही यांना वर का नाही देत?"

शिवशंकर हसून म्हणाले, "प्रिये, प्रारब्ध. मी वरदान दिल्याने काहीही होणार नाही. या जन्मात जे विधीलिखित आहे ते त्यांना भोगावंच लागेल."

पण पार्वतीमाता पडल्या आई. लगेच चिडून म्हणाल्या, "ते मला काही माहीत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन एक एक वर देऊन या. माझ्याच्याने यांचे कष्ट बघवत नाहीत. जाताय ना?!"

अखंड सृष्टीच्या मातेचं म्हणणं ऐकून भगवान शंकर तिघांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याकडे वर मागावा असं सांगितलं.

सर्वात आधी म्हातारीने वर मागितला. ती म्हणाली, "हे भोळ्या शंकरा, तुम्ही मला मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी जशी होते तशी करा."

भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच म्हातारीचं रूपांतर एका सुंदर षोडशवर्षीय नवरीत झालं.

हे पाहून म्हातारा भडकला. रागाने लालबुंद होऊन शंकराला म्हणाला, "हे भगवान, या मूर्ख बाईला जराही अक्कल नाही. मी वर मागतो की हिला कुत्री करा."

म्हाताऱ्याचं ऐकून भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच त्या नवतरुणीचं रूपांतर एका कुत्रीत झालं.

मग भगवान शंकरांनी त्या मुलाला वर मागायला सांगितलं. मुलगा विचारात पडला. आपल्या आईला या अवस्थेत पाहून त्याला अपार दुःख होत होतं. त्याने पटकन हात जोडले आणि शंकरांना विनंती केली, "हे देवाधिदेव, माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं करा."

भगवान शंकर "तथास्तु" म्हणाले आणि शांतपणे परत कैलासाकडे प्रस्थान करते झाले. परत आल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि पुन्हा ध्यानात गेले.

तसं या गोष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे पण हजारो वर्षांपासून परमेशवराच्या अवतारांपासून ते ऐतिहासिक काळातील थोर मंडळी आणि संत परंपरेतील महान लोक जे शिकवून गेलेत ते वाचून समजून वागण्याची अक्कल जर नसेल तर अशा बैलबुद्धीच्या लोकांना कितीही सांगितलं, तरी शेवटी प्रारब्धात असेल तसेच ते वागणार.

असे लोक कधीही बेकायदेशीरपणे रस्त्यावर चादरी अंथरून जागा बळकावलेल्या असतात त्यांना मुक्त करण्याचा उपक्रम राबवत नाहीत कारण अशा ठिकाणी काही सत्कार्य करण्याची हिंमत तर नसतेच, पण आदेशही नसतो. शिवाय नेहमी आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या घटकांवरच दमबाजी केली जाते (अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजपुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बलघातकः।) आणि त्याला आधार म्हणून काल्पनिक ऐतिहासिक अन्यायाची भावनिक फोडणी त्याला दिली जाते. अशी अरेरावी केल्यावर लोक आपल्याला घाबरतात हे एकदा कळलं की ती करणारे त्या राजकीय उतरंडीत जितक्या खालच्या पायरीवर असतील तितका त्यांचा इगो जास्त फुगतो आणि सुखावतो. मुख्य म्हणजे इतर काहीही रचनात्मक न करता उपद्रवमूल्य दाखवायला दिवसाचे काही ठराविक म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपये मिळाले तर कोण थोर पुरुषांची शिकवण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करेल? त्याला कुवत लागते आणि असल्यास बुद्धी वापरावी लागते, आणि तेवढे कष्ट घेण्याची यांची तयारी नसते. त्यापेक्षा वरून पैसे आणि आदेश आला की असली कामे ठरत फिरण्यात धन्यता वाटत असेल तर नवल काय?

तस्मात, व्हीडीओतल्या त्या ताईंनी ज्या आईच्या मायेने त्या मुलांना समजावलं ते त्यांचं कृत्य अत्यंत स्तुत्यच आहे. पण... असो. आपण आशा सोडू नये, एखादा तरी या घाणीतून बाहेर पडला तरी आपलं यश समजायचं. बाकी भगवान शकरांवर सोडून देऊया.

हर हर महादेव 🙏🏻

राजकीय बंद


🖋️ मंदारपंत जोशी

Friday, December 16, 2022

खाण तशी माती: देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम

खाण तशी माती अशी एक म्हण आहे मराठीत, त्याची आठवण झाली. 

देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम चा डँबिसपणा पहिल्या फोटोत दिसेलच. तिचे तीर्थरूपही काही कमी नाहीत. त्यांनी तर प्रचंड मोठा घोटाळा केलेला आहे. घोटाळे म्हणायला हवं.

या इसमाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे व  आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांबरोबर काढलेले फोटो दाखवून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी व्यक्ती असल्याचे भासवून: 

(१) International Youth Committee (IYC) च्या नावे देशी आणि विदेशी विद्यार्थ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत.

(२) हे साहेब तीस्ता सेटलवाडचे पुर्वोत्तर भारतीय घोटाळाबंधू असून दंगलग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर स्त्रोतांद्वारे आणि दानाद्वारे कोट्यावधी रुपये जमवले आहे.

(३) या साहेबांवर २०१६ची एक गुन्हेगारी केस प्रलंबित असून मुख्य न्याय दंडाधिकारी, इम्फाळ पूर्व यांनी त्याला फरार घोषित केलं होतं.

आणि देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया म्हणते आम्ही गरीब. 

Licypriya Kangujam KKSingh


सोशल मिडियाने बातम्या समपातळीवर आणून ठेवल्या आहेत (created a level playing field). खाती ब्लॉक करणे वगैरे प्रकार असले तरी एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता तपासणे अगदी सोपे झाले आहे. डाव्यांचा सोशल मिडियावर नियंत्रण आणण्याचा आग्रह असण्याचं कारण हेच आहे की "अरेच्या, तुम्हाला खरं कळतं, आणि तुम्ही ते जगाला सांगता पण?" थोडक्यात, सोशल मिडिया नसता, तर हे लोक आपल्याला वर्षानुवर्ष असंच येडे बनवत राहिले असते.


🖊 मंदार दिलीप जोशी

Wednesday, November 30, 2022

डोंबलाचे शेळीब्रिटी

शुक्रवारी २६ तारखेला सकाळी दापोलीला गाडीने चाललो होतो. मुर्डीचा चढ चढत असताना एके ठिकाणी गाडी डावीकडे घेऊन त्या निमुळत्या आणि खड्डेयुक्त रस्त्यावर एका गाडीला जायला जागा करून देताना अचानक त्या गाडीवाल्याने माझं लक्ष वेधून घ्यायला जोरात हॉर्न वाजवला. मी काच खाली केली तर त्याने विचारलं, "मंदार जोशी ना?"

मी दचकून म्हटलं हो.

"हांsssss मला वाटलंच, फेसबुक फोटो वरून ओळखलं मी!"

हे कमाल आहे, आता लोक चालत्या गाडीतून पण ओळखू लागले 😁

पण कसं आहे, की आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन सेलिब्रिटी आहोत, आपल्याला चार लोकं ओळखतात, अशा समजुतीत राहून डोक्यात कधी हवा जाऊ देऊ नये.

फार पूर्वी धर्मेंद्रची एक मुलाखत वाचली होती. त्यात त्याने एक किस्सा सांगितला होता तो जसा आठवेल तसा सांगतो. तो एकदा एकटाच गाडी चालवत आपल्या गावाकडे चालला होता. वाटेत त्याला एक खेडूत रस्त्याने चालत असलेला दिसला. आपण त्याला लिफ्ट देऊ, मग तो आपल्याला धर्मेंद्रने कशी लिफ्ट दिली हे सगळ्यांना सांगेल वगैरे मनात मांडे खाऊ लागला. धर्मेंद्रने गाडीत बसायला सांगितल्यावर तो बसला, पण गाडीत तो काहीच बोलेना. धर्मेंद्रने बळंच विचारलंन तेवढ्या प्रश्नांची त्याने थोडक्यात उत्तरे दिली इतकंच. त्याचं ठिकाण आल्यावर त्या खेडुताने मला इथे उतरवा असं सांगितलं.

धर्मेंद्रने गाडी थांबवल्यावर त्या खेडुताने खिशातून दोन रुपयाची नोट काढली आणि धर्मेंद्रच्या हातात ठेऊन शांतपणे आपल्या मार्गाने निघून गेला.

माझ्याही बाबतीत असंच एकदा झालं होतं. एकदा केळशीच्या उत्सवाला बाहेरगावाहून आलेल्या एक बाई मला शोधत असल्याचं समजलं, ब्लॉग लिहिणारे मंदार जोशी आलेत का असं विचारत होत्या. एका काकांनी आमची भेट घालून दिली. पुढचा काही वेळ मी हवेत होतो.

उत्सवात जो गोंधळ असतो त्यात एकाचा आवाज आणि उच्चार मला फार आवडतात म्हणून मी नेहमी पहिल्या रांगेत समोर बसत असे. त्यामुळे तो गाववाला मला ओळखतो असा माझा समज होता. एकदा प्रसादाचं जेवण आटपल्यावर तो जरा टेकला होता तिथे जाऊन मी ओळखीचं हास्य केल्यावर त्या व्यक्तीने मला विचारलं,

"कुणाकडे उतरलात?" 😁

तस्मात, फार हवेत उडू नये. ब्रह्मांडात जिथे आपली सूर्यमाला एवढूशी आहे, तिथे तुम्ही आम्ही कोण?

🖋️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, November 1, 2022

खर्रा इतिहास: फटाक्यांचा शोध

जिल्लेइलाही बादशहा जलालूद्दीन अकबर साहेब एकदा जश्न-ए-दिवटे निमित्त काय खास गोष्ट करावी असा आपल्या दिमाग-ए-मस्तिष्क मध्ये विचार करत बसले होते. ही गोष्ट त्यांना फार नवीन होती. पण वतीने विचार करणारा बिरबल काशीयात्रेला सुट्टीवर गेल्याने त्यांना हे काम करण्यास आत्मनिर्भर होणे जरुरीचे होते. या आधी मुल्क-ए-हिंदुस्थानात कुणीही केली नसेल अशी धमाल उडवून द्यावी आणि आवामचे दिल आपल्याबद्दलच्या मोहोब्बत ने भरून टाकावे असे त्यांना वाटत होते. 

काहीतरी कल्पना मिळेल म्हणून त्यांनी टीव्ही लावला. #झीट_मराठी नावाच्या वाहिनीवर कुठलीतरी आजी आपल्याच नातवाला विहिरीत ढकलून कसे ठार मारायचे असा विचार करत असलेली दिसली. बादशहा सलामतांना ती कल्पना फारशी पसंद आली नाही. मग त्यांनी चॅनल बदलला. #ठार_प्रवाह वर एक सासू आपल्या सुनेला शिऱ्यात विष घालून मारायची योजना आखत असल्याचे त्यांना दिसले. माणसं मारायचे हे असले अहिंसक प्रकार पाहून त्यांना बहुत गुस्सा आला. बादशहा सलामत जिल्लेइलाही जलालूद्दीन अकबर साहेबांच्या चौतीसाव्या बेगम साहिबांच्या वालीदा अर्थात बादशहांच्या सासूबाई #सोनी_मराठी बघत असलेल्या त्यांना दिसल्या. त्या वाहिनीवर एक इसम खोटं नाव सांगून लग्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना दिसलं. "सरळ उचलायचं ना" असं उद्गारल्यावर चौ.बे.वा. दचकल्या आणि त्यांनी चॅनल बदलला. #कलर्स_मराठी वर एक वस्ताद चाळे नामक नट "मला हे पसंत नाही" "मला ते पसंत नाही" असं ओरडत सगळीकडे आग लावत सुटलेला त्यांना दिसला. ही कल्पना मात्र त्यांना आवडली. त्यांनी लगेच चॅनलला फोन लावून वस्ताद चाळेला पाठवून द्या असा हुकूम सोडला.

"ए वस्ताद, बादशहांनी तुला लाल किल्ल्यावर बोलावले आहे" असं म्हटल्याबरोबर त्याने स्वतःची दाढी कुरवाळत खर्जातला आवाज लावून "पण माझी तर आधीच लाल आहे" अशी त्याच्या स्वभावाला अनुसरून आगाऊ टिप्पणी केली. मग बादशहांच्या सैनिकांनी त्याच्या तशरीफ वर काष्ठप्रहार करून ती आणखी लाल केली आणि वस्तादला बादशहा हुजुरांसमोर घेऊन गेले. 

बादशहा ज.म.अकबर सर त्यावेळी तुडुंब खाऊन झोपले होते. अलीकडे (म्हणजे कुणाकडे असे नव्हे, पलीकडच्या उलट) त्यांचे पोट जरा नासाज राहत असे. अशातच ते कुशीवर वळले आणि नेमकं त्याच वेळी त्यांच्या सतराव्या बेगम साहिबांच्या वालीद साहेबांनी दिलेल्या हवाबाण हरड्यांनी करामत दाखवली. ते पाहून वस्ताद चाळेच्या डोक्यात किडा वळवळला. "असं अनेकदा होतंय का?" नाक मुठीत धरलेल्या सैनिकांना त्याने लगेच सवाल पुसला. "हुजुरांना असा त्रास होतो कधी कधी, झोपेतच औषधांचा परिणाम होतो". काही नतद्रष्ट मित्रांच्या नादाने वस्ताद चाळेने एकदा नॅशनल जियोग्राफिकवर बघितलेला एक रिऍलिटी शो त्याला आठवला. सैनिकांकडून मशाल मागून घेत तो बादशहांच्या तशरीफमागे स्वस्थपणे उभा राहिला. त्याला फार वाट बघावी लागली नाही. हवाबाण हरड्यांनी लगेच पुन्हा आपला प्रभाव दाखवला, पण या वेळी जळती मशाल असल्याने ढुsssम्म असा स्फोटक आवाज होऊन मोठा जाळ झाला आणि बादशहा सलामत पटकन जागे होऊन पळत सुटले. 

आणि अशा प्रकारे कन्ट्री-ए-हिंद मध्ये फटाक्यांचा शोध लागला. पण हा इतिहास तुम्हाला विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ६७

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी

Thursday, October 27, 2022

परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे

प्रत्यक्ष आयुष्यात बहुसंख्य हिंदूंनी पुन्हा कुंकु/टिकली/गंध लावायला सुरवात करायला हवी असं नेहमी वाटत असे. मी स्वतः पाश्चात्य कपडे घालूनही मी रोज गंध लावून ऑफिसात जायचो, अजूनही जातो. खरं तर या कपड्यांना सोयीचे/नियमांअंतर्गत मोडणारे कपडे असं म्हणायला हवं. कारण कॉर्पोरेट ऑफिसात धोतर नेसून जाता येत नाही. पण अनेक ठिकाणी कुठल्याही कपड्यांसोबत कुंकू/टिकली-टिळा लावण्यावर बंधन नाही. इस्रोचे अवकाश शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन हे ही कामावर नियमित गंध लावून जात असत. जेव्हा ऑफिसात स्त्रिया टिकली लावून येतात तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व हे फक्त कॉर्पोरेट न राहता त्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते आणि एक प्रकारचं तेज चेहर्‍यावर असल्याचं भासतं. 

प्रत्यक्ष जगण्यात हिंदुत्वाची प्रतीके आणि चिह्ने आपण श्रद्धेने, अभिमानाने, आणि नियमितपणे अंगावर ल्याली पाहीजेत. या विषयावर मी माझ्या पद्धतीने काम करायला सुरवात केली होती आणि पुढेही करत राहीन. पण काल मला एका फेसबुक मैत्रिणीचे संदेश आले (चित्र १) आणि फेसबुकवर आपला वेळ अगदीच वाया जात नाही हे पटलं. कुंकू/टिळा/गंध हे कालबाह्य नाही तर अभिमानाने मिरवावे असे सांस्कृतिक, धार्मिक चिन्ह आहे हे विशेषतः तरुणांच्या मनावर ठसवले गेले पाहीजे. इथे मी कुंकू/टिकली लावण्यामागे विज्ञान, आज्ञाचक्र वगैरे बाबींबद्दल बोलत नाही कारण गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होतील. 
























एक आक्षेप समोर आला की पाश्चात्य कपड्यांवर कुंकू/टिकली लावण्याचा आग्रह बरोबर नाही. पण कुंकू-टिळा हे कपड्यांवर अवलंबून ठेवून आपण त्याचा परीघ मर्यादित करत आहोत. हे लिहीत असताना पाश्चात्य कपड्यांवर म्हणजे जीन्स-टीशर्टवर टिच्चून टिकली लावून फिरणारी एक फेसबुक अविवाहित भगिनी आठवली. तिची पोस्ट सोबत जोडली आहे, अर्थातच नाव झाकून. ती काही हिंदू धर्मातली पंडित नाही, पण तिच्या मनात जी विचारांची सुस्पष्टता आहे ती मला क्वचितच इतर लोकांच्यात दिसते (चित्र २ आणि ३). 





































पोस्टच्या सुरवातीला ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला ती विवाहित आहे आणि घरातली कर्ती स्त्री आहे. नवरा-बायको आणि एक मूल असं कुटुंब आहे. याचा अर्थ  किमान तीन जणं या विचारांनी प्रभावित झाले आहेत किंवा होतील. ते कदाचित इतरांना प्रभावित करतील. यालाच हिंदीत ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणत असावेत.

तुमच्यापैकी कुणी या बाबतीत समविचारी असेल तर मी एकटा काय करु शकतो किंवा शकते असा विचार करुन हताश होऊ नका. मात्र जे कराल त्याला भगवंताचे अधिष्ठान असावे.  

सामर्थ्य आहे चळवळीचे  जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (दा. २०.४.२६)

आपण सूज्ञ आहात, बहुत काय लिहीणे!

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. द्वितिया, शके १९४४