Monday, August 15, 2016

रावणाचं उदात्तीकरण, रामनवमी, रक्षाबंधन व दसरा, आणि आपण

गेले अनेक दिवस रावणाचं उदात्तीकरण करणारा आणि रामावर दोषारोपण करणारा एक संदेश व्हॉसॅप आणि फेसबुकवर फिरतो आहे आणि त्यावर अनेकांकडे उत्तर नाही. राखीपौर्णिमा किंवा दसरा असे सण आले की अशा संदेशांना ऊत येतो. त्या संदेशात रावणासारखा भाऊ हवा, रामासारखा नको असं ती मुलगी आईला उत्तर देते आणि त्याकरता रामाने सीतेचा त्याग केला पण रावणाने आपल्या बहिणीसाठी म्हणजे शूर्पणखेसाठी युद्ध करुन जीवही दिला एवढंच नव्हे तर सीतेचं हरण केल्यावर तिला स्पर्शही नाही केला असं कारण देते. यावर आई अवाक होते. असे अनेक संदेश आहेत, पण थोड्याफार फरकाने मुद्दे तेच उचलले गेले आहेत. आता आपण एक एक मुद्दा घेऊ. पहिला मुद्दा सीतेच्या त्यागाचा. मुळात सीतेच्या त्यागाचा प्रसंग हा 'उत्तर रामायणात' (उत्तर कांड) आलेला आहे. ‘उत्तर’ या शब्दाचा संस्कृत भाषेनुसार अर्थ होतो ‘च्या नंतर’. जसे की आयुर्वेदात ‘उत्तरतंत्र’ आढळते. हे उत्तरतंत्र मूळ संहितेच्या नंतर कोणीतरी इतर लेखकाने भर घालण्याकरता जोडलेले असते. थोडक्यात, उत्तर रामायण हे रामायण रचून झाल्यावर मागाहून जोडण्यात आले असून महर्षी वाल्मिकी हे त्याचे लेखक नाहीतच मुळी! त्यांनी रचलेले रामायण संपते ते युद्धकांडात. युद्धकांडाच्या शेवटी रामायणाची फलश्रुतीदेखील आलेली आहे हा आणखी एक पुरावा. कोणत्याही स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते. ती संपली की स्तोत्र पूर्ण होते हा साधा नियम इथेही लागू होतो. जे मूळ रामायणातच नाही ते त्या बिचार्‍या रामाच्या माथी मारायचे उद्योग हे ‘काड्याघालू’ लोक करत असतात. पण तसे करताना सीतामातेच्या धरणीप्रवेशानंतर प्रभू रामचंद्रांनी केलेल्या दुःख विलापाचे उत्तर रामायणातील वर्णन मात्र सोयीस्करपणे विसरतात! मुळात रामायण संपूर्ण वाचायचं नाही; वर स्वतःचा शहाणपणा सिद्ध करण्यासाठी कपोलकल्पित गोष्टी चघळत बसायच्या असे यांचे उद्योग.** आता काही अतीहुशार लोक असं म्हणतील की मग लव आणि कुश यांचे काय? त्यांचा जन्म झालाच नाही का? आणि त्यांचा जन्म वाल्मीकी ॠषींच्या आश्रमात झाला त्याचे काय? उत्तर असं की राम आणि सीता अयोध्येला परत आल्यावर त्यांना मुलं होऊ शकत नाहीत का? लव आणि कुश अयोध्येत जन्माला आलेच नाहीत असं कशावरुन? त्यांचं जन्म प्रमाणपत्र आहे का? समजा मानलं की सीता वनात गेली. बरं, सीता वनात गेली असेल तर त्याचं कारण फक्त रामाने तिला 'टाकलं' असंच का असावं? दुसरं काहीही कारण असू शकतं ना? धार्मिक बाबतीत राजांना सल्ला देणारे, प्रसंगी दटावणारे ऋषीमुनी हे सर्वसामान्य लोकांपेक्षा धार्मिक बाबतीत निश्चितच कट्टर असणार. त्यामुळे सीतेला वाल्मीकींच्या आश्रमात पाठवण्याचा हा निर्णय कुणाशीही सल्लामसलत न करता घेतला असण्याची शक्यता शून्य आहे. आजही कदाचित तिला प्रसूतीआधी अधिक सात्त्विक वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात रहायला मिळावं अशीही शक्यता असूच शकते ना? लोकांपेक्षा अधिक "सनातनी" असणारे हे साधूसंत-ऋषीमुनी, सीतेच्या चारित्र्यावर किंवा पावित्र्यावर संशय घेऊन तिला सोडलं, लोकापवादामुळे तिचा त्याग केला म्हणावं तर ती वनात गेल्यावर तिला आश्रमात इतर साधूसंतांच्या सोबत सुखेनैव कशी राहू देतील? याचा विचार ना उत्तर रामायण रचणार्‍यांनी केला ना आज रामावर दोषारोपण करणार्‍या ढकलबहाद्दरांनी. आता जर तरच्या भाषेतून बाहेर पडूया. सीतामातेला आपल्या मुलांचा जन्म ऋषींच्या आश्रमात व्हावा असे डोहाळे लागले आहेत असे रामायण सांगते!! आता बोला!!! पण त्यासाठी मूळ वाल्मिकी रामायण वाचावं लागतं. टीव्हीवरच्या मालिका पाहून इतिहास आणि पौराणिक बाबी समजत नसतात. आता वळूया रावणाकडे. रावण वेदशास्त्रसंपन्न विद्वान होता, वीणावादनात प्राविण्यप्राप्त होता हे खरेच आहे. पण म्हणून तो मोठा ठरत नाही. याकुब मेमन चार्टर्ड अकाउटंट होता (तोच तो कुबेरांचा सनदी लेखपाल), ओसामा बिन लादेन सिव्हील इंजिनिअर होता, आणखी अनेक दहशतवादी उच्चशिक्षित होते आणि आहेत म्हणून ते महान ठरत नाहीत. सुशिक्षित असणं ही सुसंस्कृतपणाचा मापदंड असू शकत नाही हे आजही आपण समाजात बघतो. रावणाची पापकर्म अनेक आहेत. रावण हा अत्यंत स्त्रीलंपट होता. स्त्रीकडे केवळ भोगविलासाची वस्तू म्हणूनच तो बघत असे. रावणाने सीतेला हात का नाही लावला, त्या मागे देखील त्याचे एक पापकर्म दडलेले आहे. एकदा देवलोकावर आक्रमण करण्याच्या हेतूने निघाला असता त्याच्या सैन्याचा कैलास पर्वतावर तळ पडला. त्याच वेळी स्वर्गलोकीची अप्सरा रंभा तिथून जात असलेली त्याला दिसली. तिच्यावर अनुरक्त झालेल्या रावणाने तिला त्याच्याशी रत होण्याविषयी विनंती केली (व्हॉट्सअ‍ॅप ढकलबहाद्दरांसाठी कठीण शब्दांचे अर्थ = माझ्याबरोबर शय्यासोबत कर असं विनवलं). पण रंभा त्याला नकार देत म्हणाली की "हे रावण महाराज, मी तुमचे बंधू कुबेर महाराजांचा पुत्र नलकुबेर याच्यावर अनुरक्त झाले असून मी त्याला भेटायला चालले आहे. तस्मात मी तुमच्या सुनेसारखी आहे. तेव्हा असे वागणे आपल्याला शोभत नाही." रंभेच्या या बोलण्याचा रावणावर काहीही परिणाम झाला नाही. कामातुराणां न भयं न लज्जा म्हणतात त्याप्रमाणे तो म्हणाला, "हे रंभे, तू स्वर्गलोकीची अप्सरा आहेस. तुम्ही अप्सरा कोणत्याही एका पुरुषाबरोबर लग्न करुन राहूच शकत नाही. तू कुणा एकाची असूच शकत नाहीस." असं म्हणून रावणाने रंभेवर बलात्कार केला. हे कुबेरपुत्र नलकुबेर याला समजताच त्याने रावणाला शाप दिला की तू रंभेची इच्छा नसताना तिच्याशी रत होण्याचे पाप केले आहेस, त्यामुळे तू यापुढे कोणत्याही स्त्रीशी तिच्या परवानगीशिवाय रत होऊ शकणार नाहीस. तू तसं केलंस तर तुझ्या मस्तकाचे सात तुकडे होऊन तू मृत्यू पावशील / भस्म होशील'. म्हणून सीतेला प्रदीर्घकाळ बंदीवासात ठेऊन देखील तिला तो साधा स्पर्श करु शकला नाही. त्यामुळे सीतेला त्याने हातही लावला नाही यात त्याचा सात्त्विकपणा नव्हे तर नाईलाज आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्ही नाही का, सिग्नल लाल असला तर इकडे तिकडे बघता आणि पोलीसमामा दिसला की चुपचाप थांबून आपण किती कायदा पाळतो हे दाखवायला अगदी गाडीची पुढची चाकं झेब्रा क्रॉसिंगच्या मागे ठेऊन भोळेभाबडे भाव चेहर्‍यावर आणून थांबता, अगदी तसंच. त्यामुळे रावण सीतेला फक्त हत्या करण्याची धमकीच देऊ शकला. अनेक विनवण्या करुन सीता बधत नाही हे बघितल्यावर शापग्रस्त रावणाने सीतामातेला एक वर्षाची मुदत देऊन सांगितलं की एक वर्षाच्या आत तू स्वतःहून माझ्याशी रत झाली नाहीस तर मी तुझी हत्या करेन. सीतेने आपल्याशी स्वतःहून रत व्हावे म्हणून तिचे मन वळवण्यासाठी धमकी देताना माझे ऐकले नाहिस तर तुझे मांस न्याहारी म्हणून उद्या माझ्यासमोर असेल असा श्लोक स्पष्ट पणे आला आहे (वाल्मिकी रामायण, सुंदरकांड, सर्ग २२). अशी विशिष्ठ धमकी देण्याचे कारण म्हणजे रावण स्वत:ही नरमांसभक्षक होता. जेव्हा हनुमान सीतेला भेटायला लंकेला गेला, तेव्हा त्याने रावणाला "तू माझ्याशी स्वतःहून रत झाली नाहीस तर तुझी आणखी दोन महिन्यांनी हत्या करेन" अशी धमकी सीतेला देताना ऐकलं. यावरुन काय ते समजून जा. रावणाला फक्त स्वतःची स्तुती ऐकण्याची सवय होती. जेष्ठांनी व हितचिंतकांनी दिलेला सल्ला ऐकणे त्याला आवडत नसे. म्हणूनच सीतामातेला परत करा आणि रामाशी शत्रूत्व करू नका असा सल्ला देणार्‍या स्वतःच्या सख्ख्या भावाला म्हणजेच बिभीषणाला स्वतःपासून दूर केलं. मंत्री शुक आणि स्वतःचे आजोबा माल्यवान यांचाही योग्य पण त्याच्या मताविरुद्ध जाणारा सल्ला पसंत न पडल्याने या दोघांनाही त्याने स्वतः पासून दूर केलं. या उलट रामाने स्वतःच्या वडिलांनी दिलेल्या वराचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला. इतकंच नव्हे तर परत चलण्यासाठी विनवायला आलेल्या भावावरच राज्याचा भार सोपवून परत पाठवलं. मुळात राक्षस लोक कसे होते त्याचंही वर्णन रामायणात आलेलं आहे. रावणी वृत्तीचे लोक हे नरमांसभक्षक असून त्याचे अनेक उल्लेख वाल्मिकी रामायणात आले आहेत. रावणाचे राज्य गोदवरी पर्यंत पसरलेले नसून चंपा सरोवर म्हणजे सुग्रीवाच्या राज्यापर्यंत पसरले होते.तिथे कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेले तपस्वी आपली नित्यकर्मे करीत त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना मारुन खाणे हि मानवी संस्कृतीला घातक असे रावणाचे अन्यायी राज्य संपवणे हा हेतु होता. येता जाता दुसर्‍याच्या शेतातली कणसं कापून खावीत तसं राक्षस लोक दंडकारण्यातल्या मनुष्यवस्तीचा वापर करत. स्वत: रामानेच सीतेजवळ या परिस्थितीचे असे वर्णन केले आहे, ते चार्ता दण्डकारण्ये मुनय: संशितव्रता: वसंत: कालकालेषु नवे मूलफलाशना:। न लभंते सुखं भीरु राक्षसै: क्रूरकर्मभि" ॥५॥ भक्ष्यन्ते राक्षसैर्भीमैर्नरमांसोपजीविभि: । ते भक्श्यमाणा मुनयो दण्डकारण्यवासिन: ॥६॥ वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग १० "हे सीते ,हे दण्डकारण्यातले व्रतधारी मुनि अत्यंत दीन झालेले आहेत. ते बिचारे समयानुरुप उत्पन्न होणार्‍या कंदमूलफलावर उपजिविका करणारे आहेत व आपल्या व्रतनियमात दंग राहून ते कोणाच्या भानगडीत पडत नाहीत. तरिही क्रुरकर्मे नरमांसभक्षक भयानक राक्षस त्यांना खाऊन फस्त करित असतात. कारण नरमांस हे तर राक्षसांच्या उपजिविकेचे साधनच होय.मानवजातीचा केवढा भयानक संहार या दुष्ट सवयींच्या लोकांनी चालवला असेल." रावणाची बहीण शूर्पणखेच्या सन्मानाला धक्का लागला म्हणून रावणाने युद्ध केलं अशी फेकाफेकी केली जाते. त्याच बहिणीशी तो कसा वागला याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. शूर्पणखेचं पाळण्यातलं नाव मीनाक्षी असं होतं. तारुण्यात पदार्पण केल्यावर तिने दुष्टबुद्धी/विद्युतजिव्हा या असुराशी रावणाच्या परवानगी शिवाय विवाह केला. दुष्टबुद्धी हा महत्वाकाक्षी असल्याने रावणाला असा संशय होता की शूर्पणखेशी विवाह करण्यामागे दुष्टबुद्धीचा रावणाचे राज्य हडप करण्याचा उद्देश असावा, म्हणून त्याने प्रथम या विवाहाला आक्षेप घेतला. मात्र पत्नी मंदोदरीने त्याला बहिणीच्या इच्छेचा मान राखण्याविषयी विनवलं तेव्हा त्याने या विवाहाला मान्यता दिली. असे जरी असले तरी त्याच्या मनात राग खदखदत होताच. पुढे रावणाने दुष्टबुद्धीवर हल्ला करुन त्याला ठार मारलं. याला आपण आजच्या काळात काय म्हणतो बरं? बरोब्बर, हॉनर किलिंग. बहिणीच्या नवर्‍याची हत्या करणारा रावण तुम्हाला महात्मा आणि आदर्श भाऊ वाटतो? यामुळे साहजिकच कृद्ध झालेली शूर्पणखा सूडाने खदखदू लागली. आपल्या नवर्‍याची हत्या करणार्‍या भावाचा सूड घेण्यासाठी ती तडफडू लागली. अशात इकडे तिकडे भटकत असताना तिला राम व लक्ष्मण हे रघुकुळातले वीर पुरुष दिसले व तिच्या मनातल्या रावणाविषयीच्या सूडभावनेने आता एका षडयंत्राला जन्म दिला. आधी राम व नंतर लक्ष्मणावर अनुरक्त झाल्याचे दाखवणार्‍या शुर्पणखेने सीतेवर हल्ला करताच लक्ष्मणाने तिला रोखून तिचे नाक कापले. शूर्पणखेने याची तक्रार आधी तिचा एक भाऊ खर या राक्षसाकडे केली. खर आणि दूषण हे दक्षिण भारतात रावणाचे राज्य राखत असत. या दोन राक्षसांनी राम व लक्ष्मणावर हल्ला केला असता राम व लक्ष्मण या दोघांनी त्यांचे सहजपणे पारिपत्य केले. रावणाचे राज्य थोडे थोडे कुरतडले जाण्याने आनंदीत झालेली शूर्पणखा आता रावणाकडे राम व लक्ष्मणाची तक्रार घेऊन गेली. आता मात्र रावण भडकला, कारण राम व लक्ष्मणांनी "त्याच्या राज्यात घुसखोरी करुन त्याच्या बहिणीला विद्रूप केलं होतं आणि मग खर आणि दूषण या भावांना ठार मारलं होतं." आत्तापर्यंत शूर्पणखेच्या सन्मानाशी काहीही कर्तव्य नसणारा रावण त्याच्या राज्यावर झालेल्या हल्ल्याने मात्र चिडला व त्याने रामपत्नी सीतामातेचे हरण केले. पुढे जे घडलं ते सर्वविदीत आहेच त्यामुळे ते सांगत बसत नाही. रावणाच्या वासनांधते विषयी आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा हिमालयात फिरत असताना रावणाला ब्रह्मर्षी कुशध्वज यांची कन्या वेदवती दिसली. मुळातच स्त्रीलंपट असणारा रावण तिच्यावर लट्टू झाला नसता तरच नवल होतं. तिला बघताच रावणाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व तिला अविवाहित राहण्याचे कारण विचारले. तिने रावणाला सांगितले की तिचा विवाह भगवान विष्णूंशी करण्याचा माझ्या पित्याचा मानस होता. हे कळताच माझी अभिलाषा बाळगणार्‍या एका दैत्यराजाने माझ्या वडिलांची हत्या केली. त्याने दु:खी झालेल्या माझ्या मातेनेही त्यांच्या मागे आपला जीव दिला. तेव्हा पासून माझ्या पित्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मी श्रीविष्णूची आराधना करत आहे. हे ऐकताच अनाथ व 'उपलब्ध' असलेल्या वेदवतीला रावणाने 'त्याची' होण्याविषयी विनवणी करण्यास सुरवात केली. पण वेदवती मनाची पक्की होती. तिने रावणाला साफ नकार दिला. रावणाने तिचे केस पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच वेदवतीने स्वतःचे केस कापून टाकले व अग्नीत प्रवेश केला. आणि मरता मरता रावणाला शाप दिला की मी आता मृत्यू पावते आहे पण पुन्हा जन्म घेऊन तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेन. इथून पुढे वेदवतीविषयी काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एका गोष्टीत अग्नीत प्रवेश केलेल्या वेदवतीला अग्नीदेवांनी वाचवून स्वतःच्या घरी सांभाळ केला. पुढे रावण सीतेला पळवून घेऊन जात असताना सीतेच्या जागी वेदवतीला ठेऊन रावणाला फसवलं आणी सीतेला स्वतःच्या घरी ठेवलं. पुढे सीतेनेच रामाला ही गोष्ट सांगून वेदवतीचाही पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा आग्रह केला तेव्हा रामाने तो एकपत्नीव्रता असल्याचे सांगून त्याला नकार दिला. तेव्हा वेदवतीने पुन्हा अग्नीत प्रवेश केला. पुढे एका जन्मात पद्मावती म्हणून पुनर्जन्म झालेल्या वेदवतीशी विवाह करुन श्रीविष्णूने श्रीनिवासरूपात तिच्या पित्याच्या इच्छेचा मान राखला. अशीही गोष्ट सांगितली जाते की वेदवतीच सीतेच्या रूपात जन्म घेऊन रावणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. काय आहे की मी जसा त्या काळात नव्हतो तसेच रामावर वाट्टेल ते आरोप करणारे हिंदू द्वेषीही नव्हते आणि त्यांनी पसरवलेले ढकलसंदेश खरे मानून चालणारे भोळसट लोकही. त्यामुळे सख्ख्या बहिणीच्या नवर्‍याची संशयावरुन हत्या करणारा आणि दिसेल त्या सुंदर स्त्रीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न किंवा प्रत्यक्ष बलात्कार करणारा रावण हा आजच्या बहिणींचा आदर्श कसा असू शकतो हे माझ्या अल्पबुद्धीच्या आकलनापलिकडची गोष्ट आहे. त्याची तूलना करायचीच तर आजकालच्या बिल क्लिंटन, टायगर वुड्स किंवा तत्सम बाईलवेड्या एतद्देशीय बलात्कार्‍यांशी करता येईल. सत्ताप्राप्तीसाठी खुर्ची राखण्यासाठी जीवाचं रान करणार्‍या अनेक आधुनिक स्वयंघोषीत जाणत्या राजांशी करता येईल. अनेक मोहात पाडतील असे प्रसंग आले असतानाही शेवटपर्यंत एकपत्नीव्रत पाळणार्‍या रामाशी नक्कीच नाही. वाचकहो, एक मोठे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचले जात आहे. जे जे भारतीय, ते ते कसे टाकाऊ हे सिद्ध करण्याचा व ते निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक सण आला की तो सण कसा प्रदूषण पसरवतो, नैसर्गिक साधनांचा र्‍हास कसा करतो हे सांगणारे संदेश सोशल मिडियावर फिरू लागतात. मग भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम, कृष्ण, यांच्यावर चिखलफेक सुरू होते. इतकंच नव्हे तर डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या देवमाणसाबद्दलही "बाँब डॅडी" आणि संघाचा युद्धखोर अजेंडा पुढे चालवणारे भारतीय पुरुषसत्ताक पद्धतीचे पुरस्कर्ते असेही घृणास्पद आरोप केले जातात. विश्वास बसत नसेल तर राजदीपपत्नी सागरिकाच्या नावाने आंतरजालावर शोधा. हीच गत सचिन तेंडुलकरने आपल्या उद्योगपती मित्राचे अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पर्रीकरांकडे शब्द टाकण्याची कंंडी पिकवणे असो किंवा अमिताभ बच्चनचे नाव पनामा पेपर्स मधे येण्याची. दुर्दैवाने आपल्या भारतीय लोकांची एक वाईट सवय आहे. आत्मक्लेषाची. आत्मपीडेची. या बद्दल डॉक्टर सुबोध नाईक यांनी लिहीलेला एक परिच्छेद उद्धृत करु इच्छितो: "स्वतःमध्येच तुमचा परीक्षक असणे हे तसे तुमच्या प्रगतीसाठी खूप छान आहे. पण तुमच्यामध्ये असलेला समीक्षक हा कधी तुमचे मूल्यमापन करता करता तुमचे अवमूल्यन करायला लागतो हेच तुम्हाला बऱ्याच वेळा समजत नाही. तुमच्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही फक्त आणि फक्त टीकाच करता. "माझ्याजवळ काहीही चांगले नाही, मी कधीही चांगला नव्हतो" असा तुमचा विश्वास ठाम होत जातो. स्वतःची टीका, स्वतःचे अवमूल्यन केल्याशिवाय तुम्हाला बरेच वाटत नाही. एका अर्थाने तुम्ही आत्मक्लेषक (masochist) बनता आणि तिथेच तुम्ही संपता. ब्रह्मदेव सुद्धा मग तुम्हाला मदत करू शकत नाही. हे जसे वैयक्तिक झाले तसे हे राष्ट्राचेही होते." अहो ते प्रभू रामचंद्र साक्षात मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांच्या पायाच्या नखांची सरदेखील आम्हाला येणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आत्मक्लेषास प्रवृत्त करणार्‍या फुटीरतावादी शक्तींना प्रोत्साहन देऊ नका. रामाच्या आडून हिंदूंच्या श्रद्धा-आस्था यांवर बंदूक चालवू बघणार्‍या शक्तींना बळ देऊ नका.
सहज जाता जाता सांगतो, शंबूक वधाची गोष्टदेखील मूळ रामायणात नाही

संदर्भः
१) वाल्मीकी रामायण
२) वैद्य रीक्षित शेवडे, डोंबिवली
३) रामायणाशी संबंधीत अनेक स्त्रोत
४) चंद्रशेखर साने 

© 
मंदार दिलीप जोशी
श्रावण शु. ११, शके १९३८

Sunday, August 7, 2016

पंडित नामा - ७: पंडित दीनानाथ मुजू

पंडित दीनानाथ मुजू
७१, रावळपोरा हाऊसिंग कॉलनी, श्रीनगर
मृत्यूसमयी वयः ७८
व्यवसायः निवृत्त सरकारी कर्मचारी
हत्या: ७ जुलै १९९०

काश्मीरमधे इस्लामी दहशतवादाच्या सुरवातीच्या काळात अतिरेक्यांनी ज्या पंडितांना लक्ष्य केलं होतं त्यात प्रामुख्याने सर्व पदांवरील सरकारी कर्मचारी, दुकानदार व व्यापारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पुजारी व भटजी, शिक्षक, आणि तत्सम प्रवर्गातील काश्मीरी हिंदूं सामील होते. म्हणजेच अतिरेक्यांनी काश्मीरी पंडित समाजाच्या आर्थिक, संस्कृतीक, सामाजिक, व राजकीय अशा सगळ्याच आधारस्तंभांना अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने घरात घुसून, रस्त्यावरुन चालताना, कार्यालयात, पळवून नेऊन शक्य तिथे यमसदनास धाडण्याचे सत्र आरंभलं.

याच हत्यासत्रातला एक दुर्दैवी बळी म्हणजे पंडित दीनानाथ मुजू. पंडित दीनानाथ यांचे सामाजिक कार्य खूप होते. शिक्षक आणि मुख्याध्यापक (म्हणजे बरखा दत्तच्या फर्ड्या इंग्रजीत हेडमास्टर बरं का) म्हणून पुढच्या पिढीचे शिक्षक तयार करणार्‍या सरकारी शिक्षक विद्यालयात कार्यरत असताना त्यांनी अनेक सामाजिक  कार्ये सुरु करुन ती जोमाने सुरू ठेवलीच होती, पण त्यांचा उत्साह निवृत्तीनंतरही टिकून होता. मुख्याध्यापकपदावरुन ते निवृत्त झाले खरे, पण समाजकार्यातून त्यांनी कधीच निवृत्ती घेतली नाही. सर्वानंद कौल प्रेमी यांच्याप्रमाणेच पंडित दीनानाथ मुजू हे अत्यंत लोकप्रिय होते. पंडित दीनानाथ हे निव्वळ शिक्षक नव्हे तर अनेकांचे मागदर्शक आणि आधार म्हणून ओळखले जात. शिक्षणक्षेत्राबरोबरच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास, तत्त्वज्ञान, ब्रह्मविद्या, काश्मीरी शैव धर्म, आणि जे. कृष्णमूर्ती यांचे विचार या गोष्टींत पंडित दीनानाथ यांना खूप रस होता व या विषयांचा त्यांचा खोल अभ्यासही होता.  या विषयांसंबंधी त्यांच्याकडे अनेक पुस्तकेही संग्रही होती. विश्वबंधुत्व ही संकल्पना अक्षरशः जगणारे पंडित दीनानाथ यांचे सामाजिक कार्य प्रामुख्याने गरीब व मागासलेले वर्ग यावर केंद्रीत झालेले होते. स्त्रीयांचे सक्षमीकरण हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. थियोसॉफोकल सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विमेन्स वेलफेअर ट्रस्ट या संस्थेचे तहहयात सदस्य असलेल्या पंडितजींनी या संस्थेच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केलं. ही संस्था काश्मीरात स्त्रीयांसाठी शैक्षणीक संस्था काढण्याचे काम करत असे. असे हे पंडित दीनानाथ मुजू संपूर्ण काश्मीरात एक संतप्रवृत्तीचे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते.

वृद्धापकाळात जन्मभूमी आणि पिढीजात घर सोडून जायचं जीवावर आलेल्या पंडीत दीनानाथ यांनी संभाव्य धोका ओळखून श्रीनगरच नव्हे तर काश्मीर खोरेही सोडण्याविषयी आपल्या मुलांचे मन वळवलं. आणि म्हणूनच मुजू परिवार निर्वंश होण्यापासून वाचला. पंडित दीनानाथ मुजू व त्यांची पत्नी हे दोघं मात्र जीवाला मुकले. मात्र त्यांचा मृत्यू इतरां अनेकांप्रमाणे क्लेषदायक झाला नसावा. सहा जुलै १९९० साधारण मध्यरात्रीच्या सुमारास काही दहशतवादी पंडित दीनानाथांच्या घरात शिरले आणि पंडितजी व त्यांच्या पत्नीला गोळ्यांचा वर्षाव करुन ठार मारलं. हे आणि इतकंच घडलं असावं असं सकाळी त्यांचे मृतदेह पाहून पोलीसांना समजलं.

जेव्हा पंडित दीनानाथ यांच्यासारखा एक माणूस संपवला जातो, तेव्हा निव्वळ एक माणूस मरत नाही. फक्त एक बाप किंवा भाऊ किंवा कुणाचा मित्र मरत नाही. समाज त्याबरोबरच बरंच काही गमावतो. भावी पिढ्या घडवणारा एक हाडाचा शिक्षक जातो, त्याचबरोबर अनेक पिढ्यांचं भविष्यही नष्ट होतं. एक विद्वान मरतो, त्याच बरोबर समाजाला त्याच्याकडून मिळणारं ज्ञानही. समाजाचा उत्थानासाठी झटणारा एक सामाजिक कार्यकर्ता हा इहलोक सोडून जातो तेव्हा होणारं नुकसान अपरिमित असतं. विविध धर्म व उपासनापद्धतींचा तसेच तत्त्वज्ञानांचा अभ्यासक संपवला जातो, तेव्हा जगाकडे उघड्या डोळ्यांनी व मोकळ्या मनाने बघण्याची समाजाची दृष्टी नाहीशी होते. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी झटणारा एक तळमळीचा कार्यकर्ता ठार केला जातो, तेव्हा समाज व देश किती वर्ष मागे फेकला जातो याची कल्पनाही करण अवघड आहे. समाज शारिरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही आक्रसत जातो. पण याचं सोयरसुतक सत्य काय ते एकाच पुस्तकात एकटवलं आहे आणि त्या पलीकडे जग नाही असं मानणार्‍यांना काय असायचं? यापलिकडे जे बोलतील त्यांना संपवणं, आणि त्या पुस्तकापलीकडे जे ज्ञानवर्धन करणारं साहित्य असेल ते जाळणं एवढीच अक्कल असेल तर कोण काय करणार.

पंडित दीनानाथ मुजू तर गेले. पण एक प्रश्न कायम सतावतो तो म्हणजे आणि त्यांच्यासारख्या अनेक दिग्गज विद्वानांकडच्या साहित्यसंपदेचं काय झालं असावं? याचं उत्तर  बहुतांशी १९९५ साली काश्मीरात घडलेल्या एका प्रसंगात सापडतं. पण तो प्रसंग वर्णन करण्याआधी थोडंसं इतिहासात डोकावूया.

११९९ मधे भारतावर एक भयानक नुकसान करणारं इस्लामी आक्रमण झालं, ते तुर्की बादशहा बख्तियार खिलजीच्या रूपात. हजारो लाखो हिंदू मारणारे इतर इस्लामी आक्रमणकारी एका बाजूला आणी हा राक्षस एका बाजूला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. त्या काळी फक्त भारतालाच नव्हे तर जगाला ज्ञानप्रदान करणारं नालंदा विश्वविद्यालय एक अत्यंत भव्य अशा प्रकारचं विद्यापीठ होतं. सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) स्थापन झालेल्या या विद्यापीठाला सम्राट हर्षवर्धनाने शंभर खेड्यांइतकी जमीन दान दिली होती. विविध देशातील दहा हजार विद्यार्थी शिकत असलेल्या या विध्यापीठात निव्वळ प्रवेश घ्यायलाही अत्यंत कठीण अशी परीक्षा द्यावी लागे. सनातन वैदिक धर्माबरोबरच बौद्ध व जैन तत्त्वज्ञान, वेदाध्ययन, भाषा व व्याकरण, आयुर्वेद, गणित, पाणिनी सूत्र अशा असंख्य विषयांचे अध्यापन तिथे केले जात असे. अशा या विद्यापीठाचं ग्रंथालयही अवाढव्य होतं.

बख्तियार खिलजीने नालंदा नगरी बरोबरच नालंदा विश्वविद्यालयाचा विध्वंस करण्याचा निश्चय केला. कुराणापलिकडे  काहीही सत्य नाही आणि काही ज्ञान नाही आणि त्या बाहेर जे सापडेल ते हराम आहे सबब ते नष्ट केलंच पाहीजे या शिकवणीला अनुसरून विश्वविद्यालयाला एके दिवशी आग लावण्यात आली. या विद्यापीठाचं प्रचंड मोठं असलेलं ग्रंथालय पुढचे कित्येक महिने जळत होतं. या वरुन किती अनमोल ग्रंथ व त्यातलं अमर्याद ज्ञान नष्ट झालं असेल याची कल्पनाही करता येणार नाही.

काश्मिरी दहशतवाद्यांनी मात्र जाळाजाळीबरोबरच पंडीतांच्या ग्रंथसंपदेबाबत एक नावीन्यपूर्ण धोरण अवलंबलं होतं. खिलजीच्या काळात फक्त सोनंनाणं संपत्ती म्हणून जमा करता येत असे किंवा  विकता येत असे. नव्या काळात ज्ञानालाही किंमत आली. मग ज्याला किंमत आहे, ते जाळायचं कशाला? ते विकायचं, आणि त्यातून आपला जिहाद चालवायला पैसे कमवायचे. १९९५ साली घडलेली ती घटना वर्णन करताना एक अनाम पंडित म्हणतात, की एके दिवशी देवदर्शन करून सायकलवरुन घरी परतत असताना वाटेत त्यांच्या एका मुसलमान सहकारी व्याख्यात्याने थांबवून एक विचित्र बातमी दिली. तिथून काही अंतरावर एका टपरीवजा झोपडीत एका बोटमालकाने पंडितांच्या घरातून चोरलेली हजारो पुस्तकं आणि दुर्मीळ हस्तलिखीतं विक्रीला ठेवली आहेत. पंडितजींनी सायकल त्या दिशेला वळवली आणि अनेक किलोमीटर दामटवून त्या स्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना खरंच एक बोटमालक पुस्तकविक्री करताना दिसला. शेडमधे युरोप व अमेरिकेतील बरेच विद्वान व अभ्यासक जमा झालेले दिसले. जी पुस्तकं आणि हस्तलिखीतं मागूनही हजारो रुपयांना विकायला त्यांच्या पंडित मालकांनी नकार दिला असता ती ग्रंथसंपदा आता विदेशी ग्राहकांना वीस रुपये किलोने विकली जात होती. पंडितजींना पाहून तो बोटवाला म्हणाला, "तुम्ही पंडितांसारखे दिसता, मग तुमच्यासाठी वेगळा भाव आहे. तुम्हाला किलोमागे तीस रुपये द्यावे लागतील." पंडितजींनी खिशातून सरळ शंभर रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि ती आगाऊ रक्कम असल्याचं सांगत त्यांना तिथून नेता येतील तितकी पुस्तकं उचलायला सुरवात केली. पंडितजींनी त्यांना झेपेल इतकं केलं, पण   विदेशी ग्राहकांना विकल्या गेलेल्या असंख्य पुस्तकांचं काय? ती काही कुठल्या लष्करी मोहीमेअंतर्गत लुटली गेली नव्हती, त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अशक्य होतं. ही पुस्तकं विदेशात का होईना पण वाचली जात आहेत, उपयोगात आणली जात आहेत हे समाधानही फोल आहे. कारण वेद, पुराणं, व स्मृतिग्रंथांचा पाश्चात्य देशात अभ्यास होऊन ते अत्यंत विकृत स्वरूपात आपल्यापुढे माडला जाण्याचा इतिहास फार जुना नाही. इंटरनॅशनल शाळांचा व मिशनरी शाळांनी कॉन्व्हेन्टीकरण केलेल्या आजच्या शिक्षणात जे जे भारतीय व जे जे हिंदू ते ते टाकाऊ असं ब्रेनवॉशिंग करुन अनेक पिढ्या बरबाद करुन झालेल्याच आहेत. पण तो एक वेगळा व मोठा विषय आहे.

पंडित दीनानाथ यांच्याकडेही अशीच ग्रंथसंपदा असेल. त्या पुस्तकांचं काय झालं असेल? ती जाळली गेली असतील की अशाच एखाद्या ठिकाणी किलोच्या भावाने विकली गेली असतील? जगात कुठे कुठे असतील ही पुस्तकं? कुणास ठाऊक. बख्तियार खिलजीला या नव्या जिहादींचा निश्चितच अभिमान वाटला असता. फक्र.

पंडित दीनानाथजींसारख्यांच्या आत्म्याला मात्र स्वतःच्या मृत्यूपेक्षा या पुस्तकांचा मृत्यू अधिक चटका लावून गेला असेल हे नक्की.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण शु. ५, शके १९३८, नागपंचमी
०७ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Saturday, July 23, 2016

पंडित नामा - ६: चुन्नीलाल शल्ला

चुन्नीलाल शल्ला
इन्स्पेक्टर ऑफ पोलीस, जम्मू-काश्मीर राज्य
राहणार सोपोर
कार्यभूमी: लानगेट, कूपवाडा
-----------------------------

यहाँ क्या चलेगा, निझाम-ए-मुस्तफा
ला शर्कीया, ला गर्बीया, इस्लामिया इस्लामिया

इथे काय चालेल, राज्य मुस्तफाचं
ना पौर्वात्य, ना पाश्चिमात्य, फक्त इस्लामचं फक्त इस्लामचं

काश्मीरात रस्तोरस्ती, मशीदींवरच्या भोंग्यांवरुन, आणि दफनभूमींमधे दिल्या जाणार्‍या जिहादी आरोळ्यांनी आता जोर पकडला होता. नुकतंच अफगाणीस्तानवरचा आपला ताबा सोडून रशियाने आपलं सैन्य नुकतंच माघारी बोलावलं होतं. त्यानंतर बराच काळ त्यासंबंधीच्या बातम्या टीव्हीवर दिसत असत. टीव्हीवर रशियन रणगाडे माघारी जात असल्याची आणि अफगाणिस्तानातले मुजाहिद हवेत गोळीबार करत असल्याची दृष्य पाहून काश्मीरमधल्या मुसलमानांच्या घराघरात जल्लोष केला जायचा. एखाद्या सामन्यात आपल्या देशाचा संघ जिंकल्यावर जसा आनंद आपल्याला होतो तसाच मिनी आनंदोत्सव अशी दृष्य पाहून साजरा व्हायचा. काय संंबंध होता रशियाच्या अफगाणीस्तानातून माघारीचा आणि इथे साजरा केल्या जाणार्‍या आनंदाचा? खरं तर काहीच नाही. पण काश्मीरी मुसलमानांच्या दृष्टीने फक्त हा विजय फक्त अमेरीकापुरस्कृत अफगाणी स्वातंत्र्यसैनिकांचा नव्हता, तिथे फक्त अफगाणी मुजाहिद जिंकत नव्हते, तर हा विजय इस्लामचा होता. इराण आणि पाकिस्तानच्या जवळच इस्लामी जगतावर आलेलं रशियन संकट दूर झालेलं होतं. अफगाणिस्तानात लवकरच अलाहच्या अंमल प्रस्थापित होणार होता. मुस्तफाचं राज्य येणार होतं. येणार काय, रशियाच्या माघारीने आलेलंच होतं. आता तिथल्या विजयाची पुनरावृत्ती काश्मीरात करायला अल्लाहच्या बंद्यांना कितीसा वेळ लागणार होता? दुर्दैव असं की हे अल्लाहचे बंदे स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांनी पछाडले होते. दार-उल-हरब (युद्धभूमी, अजून इस्लामच्या अंमलाखाली नसलेला) असलेला काश्मीर त्यांना दार-उल-इस्लाम (इस्लामचं राज्य असलेला) करायचा होता.

म्हणूनच अशा घोषणा ऐकल्या की काश्मीरी पंडितांच्या छातीत धडकी भरत असे आणि त्यांच्या मुसलमान शेजार्‍यांच्या मनात उकळ्या. कारण आता त्यांच्या भागातल्या काफिरांचा अंजाम जवळ आल्याचा तो आगाझ होता. गिरीजा टिक्कू, सतीशकुमार टिक्कू, आणि अशा कित्येक काश्मिरी पंडितांच्या हत्येला त्यांच्याच शेजारी, तथाकथित मित्र, सहकारी अशा अनेक परिचितांनी कधी इस्लामी दहशतवाद्यांना माहिती देणं व इतर मदत करणं तर कधी प्रत्यक्ष हत्येत सहभाग अशा स्वरूपात भागही घेतला होता. याचाच एक भयानक उदाहरण म्हणजे चुन्नीलाल शल्ला.

चुन्नीलाल शल्ला. जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या पोलीस खात्यात लानगेट इथे नेमणूक झालेले एक पोलीस निरिक्षक (इन्स्पेक्टर). जवळजवळ सहा महिन्यानंतर लानगेट येथील पोस्टिंगवरुन चुन्नीलाल यांना सोपोरमधल्या घरच्यांना भेटायला जाण्यासाठी सुट्टी मिळाली आणि त्याच आनंदात ते सोपोरला जाण्यासाठी बस मधे बसले. त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखाली काम करणारा एक मुसलमान हवालदार पण त्याच बसमधे बसला. सोपोरमधे त्या सुमारास जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घालायला सुरवात केली होती. या कारणास्तव आपल्याला कुणी पटकन ओळखू नये म्हणून चुन्नीलाल यांनी भरघोस दाढी वाढवली होती. दहशतवाद्यांना चुन्नीलाल या बसने येत असल्याचा सुगावा लागला होता. बस सोपोरला पोहोचली आणि दोन अतिरेकी चुन्नीलाल यांना शोधत बसमधे घुसले. बसमधे सगळीकडे नजर टाकल्यावरही चुन्नीलाल काही त्यांना 'दिसले' नाहीत. त्यांची फारच निराशा झालेली होती. ते याच वैतागात बसबाहेर पडणार तेवढ्यात त्याच बसमधे बसलेल्या चुन्नीलाल यांच्या हाताखाली काम करणार्‍या मुसलमान हवालदाराने त्यांना हाका मारून परत बोलावलं आणि चुन्नीलाल कोण आहेत याकडे त्यांच लक्ष वेधलं. 

पण पुढे जे झालं ते इतकं भयानक होतं की ज्याची कल्पना स्वतः चुन्नीलाल यांनाही करता आली नसणार. त्या दोन दहशतवाद्यांनी चुन्नीलाल यांना गोळ्या घातल्या तर ते पटकन मरतील असं वाटलं म्हणून की काय, त्या दोघांनी काही करण्याची वाट न बघता त्या हवालदाराने आपल्याजवळचा एक चाकू काढला आणि चुन्नीलाल यांच्या उजव्या गालावर चालवून वाढवलेल्या दाढीसकट संपूर्ण उजव्या बाजूचा गाल कापून काढला. रक्ताळलेला आणि मांस लोंबत असलेला चुन्नीलाल यांचा चेहरा आता खूपच भेसूर दिसू लागला. अत्यंत अनपेक्षित अशा या हल्ल्याने चुन्नीलाल यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्याची त्यांना संधी न देता त्या हवालदाराने त्यांचा बखोट पकडून, "अरे डुकरा, तुला मी असा बरा आमच्यासारखी दाढी ठेवू देईन दुसर्‍या गालावर सुद्धा!" असं म्हणून त्यांचा दुसरा गालही कापून काढला. आता आपण इथे जे करायला आलो होतो ते करायला न मिळालेल्या त्या दोन दहशतवाद्यांनी त्या हवालदाराच्या मदतीने चुन्नीलाल यांना बसमधून फरफटत बाहेर काढलं आणि "तुझ्यावर बंदुकीच्या गोळ्या पण फुकट घालवणार नाही" असं हिणवत त्यांच्या आधीच जखमी चेहर्‍यावर हॉकी स्टीक्सच्या फटक्यांचा वर्षाव केला.

आणि चुन्नीलाल शल्ला यांना तिथेच रस्त्यात तडफडत मरायला सोडून ते तिघे तिथून निघून गेले.

परवा एका व्हॉट्सॅप ग्रूपवर एकाने मला टोमणा मारला. तुला फक्त अतिरेकीच भेटलेले दिसतात! काय आहे की व्हॉट्सॅपवर टोमणेबाजी पटकन करता येते. त्याला फार डोकं चालवावं लागत नाही. पण त्याला उत्तर द्यायला वेळ लागतो. उत्तरादाखल नुकतीच वाचलेलं एक अप्रतीम लेखन इथे उधृत करतो. नाही, मला फक्त अतिरेकी नाही तर मला सगळाच्या सगळा फुटबॉल संघ भेटला आहे. कसा? सांगतो. इस्लामचे पाईक हे एखाद्या फुटबॉल संघासारखे असतात. अतिरेकी हे स्ट्रायकर्स सारखे असतात. प्रत्यक्ष 'गोल' करणारे. जहालमतवादी हे मिडफील्डर्स सारखे असतात जे अतिरेक्यांना थेट रसद पुरवतात. डिफेन्डर मंडळी म्हणजे इस्लाममधली तथाकथित मवाळ मुसलमान. हे सगळे एकच असले तरी डिफेन्डर सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात की आमचा अतिरेक्यांशी काही संबंध नाही बुवा, पण प्रत्यक्षात त्यांचं काम इस्लामवर होणार्‍या रास्त टीका आणि आरोपांना उत्तर देणं असतं. उदारमतवादी म्हणजे गोलकीपर. परिस्थिती हाताबाहेर जात आहे असं वाटलं की बचावासाठी हे उतरतात. म्हणजे इस्लाम म्हणजे शांततेचा धर्म, तुम्ही समजता तसा इस्लाम नाहीच, अमुकचा आम्ही निषेध करतो अशी थापेबाजी करण्याचं काम यांच्याकडे असतं.

चुन्नीलाल शल्ला यांना मारायला आलेले अतिरेकी आणि त्यांना सक्रीय मदत करणारा चुन्नीलाल यांच्याच हाताखालचा तो मुसलमान हवालदार, हे या फुटबॉल संघात कुठे बसतात हे तुम्हीच तपासून पहा.

काश्मीरमधली आणखी एक घोषणा आठवली.

झलझला आया है कुफ्र के मैदान में
लो मुजाहिद आ गये मैदान में

काफिरांच्या प्रदेशात भूकंप आला आहे,
मुजाहिद मैदानात उतरलेत.

काश्मीरात सगळाच्या सगळा संघ मैदानात उतरलाय आता. एका डोळे झाकलेल्या वृत्तवाहिनीच्याच भाषेत सांगायचं तर उघडा डोळे, बघा नीट!

-------------------------------------------------------- 
© मंदार दिलीप जोशी 

आषाढ कृ. ४, शके १९३८
२३ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------



Wednesday, July 20, 2016

पंडित नामा - ५: सतीश कुमार टिक्कू

सतीश कुमार टिक्कू, व्यवसायिक
श्रीनगर
हत्या: २ फेब्रूवारी १९९०

नारा-ए-तकबीर, अल्लाह-हू-अकबर!

अशा घोषणा आता काश्मीरमधे ऐकू येणं नित्याची बाब झाली होती. रस्त्यावर या घोषणा घुमू लागल्या की काश्मीरी पंडितांच्या पोटात गोळा येत असे. कारण १९४७च्या फाळणीच्या जखमा हळू हळू भरत चालेल्या असल्या, तरी त्या वेळच्या कटू आठवणी अजूनही अनेकांच्या स्मृतीपटलावरुन पुसल्या गेल्या नव्हत्या. अनेक मार्गांनी अजूनही जिवंत होत्या. त्या वेळी दंगेखोर मुसलमानांचा जत्था हिंदू वस्त्यांवर हल्ला करण्याआधी ते ही घोषणा देत. घोषणा कसली? युद्ध पुकारल्याची आरोळीच ती. धर्मयुद्ध. जिहाद.

या आरोळ्या ऐकल्या की पंडितांंचा जीव घाबरागुबरा होत असे, दारं खिडक्या बंद केल्या जात, आणि घरातलं जितकं सामान बॅगांमधे भरुन सहज उचलून नेता येणं शक्य असे तितकं सामान घेऊन घरातले सगळे दुसर्‍या दिवशी सकाळी घरावर तुळशीपत्र ठेऊन काश्मीर खोरे सोडण्यासाठी बाहेर पडत असत. काश्मीरी पंडितांची ही खात्री पटत चालली होती की आता आपला कुणीही तारणहार उरलेला नाही, अगदी आधीच्या कार्यकाळात उत्तम कारभार केलेले आणि म्हणूनच परत बोलावले गेलेले जगमोहन सुद्धा. कारण जहाल इस्लामी मानसिकता आणि फुटीरतावादी चळवळीने प्रशासनाला पार पोखरून टाकलेलं होतं. अगदी राज्य पोलीस दलातल्या अनेक पोलीसांनाही फुटीरतावाद्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतलेलं होतं, इतकंच नव्हे तर अनेक फुटीरतावादीही पोलीस दलात नोकरी मिळवण्यात यशस्वी झालेले होते. त्यामुळे राज्यपालपदाची धुरा दुसर्‍यांदा खांद्यावर घेतलेल्या जगमोहन यांची अवस्था रुग्णाच्या नातेवाईकांना "आता आशा नाही, तुम्ही मनाची तयारी करा" असं सांगायला पाठवलेल्या एखाद्या डॉक्टरसारखी झालेली होती.

हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


मशीदींवर लावलेल्या कर्ण्यांतूनच सुरवातीला अशा धमक्या कधीही केव्हाही दिल्या जात. पण नंतर या घोषणा देण्याच्या पद्धतीमधे सुसूत्रता आली. जणू काही वेळापत्रक ठरवून दिलं गेलं असावं. आता या आरोळ्या रात्र पडताच सुरु होत आणि पहाटेपर्यंत चालू ठेवल्या जात. कदाचित रात्रीच्या शांततेत अधिकाधिक दूरवर ऐकू जाव्यात हा उद्देश असावा. अधून मधून घोषणा द्यायचा कंटाळा आला की जिहादसमर्थक भाषणे व गाण्यांची कॅसेट वाजवली जात असे. कॅसेट संपली की पुन्हा नव्या जोमाने आरोळ्या सुरू होत. काश्मीरी हिंदूंची रात्रीची झोप तर हिरावून घेतली गेलीच होती पण दिवसाही काही बरी परिस्थिती नसे.

अशा आरोळ्या ठोकत आता दंगलखोरांचे जत्थेच्या जत्थे दिवसाढवळ्या रस्त्यावरुन फिरू लागले होते. आता फुटीरतावाद्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली होती. रस्त्यावरून घोषणा देत चालणार्‍या अशा मोर्च्याच्या अग्रभागी आता घरातून बाहेर काढलेल्या काश्मीरी पंडिताना चालवण्याची चाल खेळली जात होती. प्रथमदर्शनी निव्वळ मानसिक यातना देण्याचा किंवा घोषणांची परिणामकारकता वाढवण्याचा आणि त्यायोगे इतर पंडितांमधे भीती वाढवण्याचा उद्देश दिसत असला तरी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण वेगळंच होतं. या जमावावर जर सैन्याने किंवा अर्धसैनिक दलाने (पॅरामिलीटरी फोर्स) गोळीबार केलाच तर त्याचे पहिले बळी हे पंडितच ठरावेत अशी ती योजना होती. कुठल्या घरात पंडित राहतात, सापडले नाही तर त्यांच्या लपण्याच्या जागा कुठल्या, ते कुठे सापडण्याची शक्यता आहे इत्यादी माहिती अर्थातच स्थानिक काश्मीरी मुसलमानांकडून गोळा केली जाई. त्यामुळे काश्मीरी मुसलमान असलेले सख्खे शेजारी, कार्यातले सहकारी, मित्र, इतर ओळखीचे दुकानदार अशा कुणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती उरलेली नव्हती.

काश्मीर सोडून जम्मूत स्थायिक व्हायचं सतीशने ठरवलं असलं तरी पटकन गाशा गुंडाळायला सुरवात केली तर दगाफटका होईल म्हणून हळू हळू सामान हलवू असं सतीश कुमार टिक्कू आपल्या वडिलांना सांगत असे. व्यावसायिक असलेल्या सतीशचे अनेक मुसलमान मित्र आणि परिचित होते. फारुख अहमद दार हा असाच एक मित्र. सतीशबरोबर तो अनेकदा स्कूटरवर त्याच्या मागे बसून फिरायचा. म्हणूनच एके दिवशी जेव्हा सतीशला दाराबाहेर नेहमीसारखीच फारुखची हाक ऐकू आली तेव्हा त्याला कसलाही संशय आला नाही. बाहेर येताच सतीशला त्याच्यावर गोळीबार करण्याच्या तयारीत असलेले फारुख व इतर काही तरुण दिसले. त्यांच्यापैकी एक जवळच राहणारा असल्याचं सतीशला आठवलं. ते सगळेच त्याच्या कमीअधिक ओळखीचे होते. त्यांच्यापैकी एकाने सतीशवर पिस्तूल रोखताच सतीशने बचावाचा प्रयत्न म्हणुन हातातली कांगरी (एक प्रकारची लहानशी टोपली) त्याच्या दिशेने फेकून मारली. त्याच वेळी झाडल्या गेलेल्या पहिल्या गोळीनं सतीशच्या हनुवटीचा वेध घेतला. कळवळून सतीश खाली पडला. कोसळलेल्या सतीशवर त्या तरुणांनी त्याच्यावर आणखी गोळ्या झाडल्या. सतीश सुदैवी ठरला. त्याच्या वाट्याला इतर अनेकांसारख्या यातना आल्या नाहीत. गोळीबारात तो जागीच ठार झाला.

सतीशवर गोळ्या झाडणार्‍यांपैकी फारुख अहमद दार हा पुढे जवळजवळ वीसहून अधिक मुडदे पाडणारा अतिरेकी बिट्टा कराटे या नावाने कुख्यात झाला.  त्याच्या वीस बळींपैकी सतरा बळी काश्मीरी पंडित तर उर्वरित तीन काश्मीरी मुसलमान होते. त्याला पकडल्यावर घेतलेल्या मुलाखतीची ही लिंक:



ही मुलाखत पाहून अक्कल आणि डोकं गहाण ठेवणं या लोकांसाठी किती सहज आहे हे लक्षात येतं. वरुन आदेश आला असता तर मी आईलाही मारलं असतं असं म्हणणारा बिट्टा कराटे बघितला आणि चटकन काही दिवसांपूर्वी धर्मद्रोह केल्याच्या आरोपाखाली एका इस्लामीक स्टेटच्या अतिरेक्याने आपल्या आईला गोळी घातल्याची बातमी आठवली, आणि अंगावर शहारा आला.

मुलाखतीचा काही भाग भाषांतरित करुनः

पत्रकारः किती जणांना मारलंस?

कराटे: लक्षात नाही.

पत्रकारः म्हणजे इतक्या माणसांना मारलंस की लक्षातही नाही?

कराटे: दहा बारा जणांना मारलं असेल.

पत्रकारः दहा की बारा की वीस?

कराटे: वीस असेल.

पत्रकार: सगळे काश्मीरी पंडित होते? की काही मुसलमान पण होते?

कराटे: काही मुसलमानही होते.

पत्रकारः किती मुसलमान होते आणि किती पंडित होते? काश्मीरी पंडित जास्त होते का?

कराटे: हो पंडित जास्त होते.

पत्रकारः पहिला खून कोणाचा केलास?

कराटे: सतीश कुमार टिक्कू.

पत्रकारः कोण होता हा? का मारलं?

कराटे: पंडित होता. वरुन आदेश होता. मारलं.

कराटे पकडला गेला, पण सोळा वर्ष तुरुंगात काढल्यावरही त्याला शिक्षा होऊ शकली नाही. त्याचा सुटकेचा आदेश काढताना न्यायाधीशांनी जे शब्द वापरले त्यात वर वर्णन केलेली पोखरलेली प्रशासनिक परिस्थिती डोकावते. सरकार पक्षावर कडक ताशेरे ओढताना न्यायाधीश म्हणाले की बिट्टाला शिक्षा व्हावी अशा प्रकारे खटला चालवण्याची सरकारी वकील व एकंदरितच सरकार पक्षाची इच्छाच दिसत नव्हती. कराटेचा खटला हा प्रातिनिधिक आहे. काश्मीरी पंडितांची हत्या केल्याबद्दल जे जे खटले दाखल झाले त्यांच्यापैकी एकाही खटल्यात कुणालाही आजतागायत शिक्षा झालेली नाही.

कराटे तुरुंगातून सुटला, त्याने लग्न केलं, आणि तो बापही झाला. सतीश कुमार टिक्कू, अशोक कुमार काजी यांच्यासह वीस हत्या करणारा फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटेच्या नशीबात एक कुटुंबवत्सल आयुष्य लिहीलेलं होतं. पण ज्यांचा पोटचा पोर त्याने मारला, त्या सतीशच्या वडिलांच्या म्हणजेच श्री पृथ्वीनाथ टिक्कू यांच्या नशीबात मात्र रोज आपल्या मुलाच्या फोटोकडे पाहून अश्रू ढाळणं आणि आणि आपल्या तीन मजली आणि सत्तेचाळीस खिडक्यांच्या घराच्या आठवणीने गहिवरणं लिहीलेलं होतं. काश्मीर सोडताना टिक्कू कुटुंबियांना त्यांचं हे अवाढव्य घर कवडीमोल भावाने विकावं लागलं.



हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


कसली आझादी? कुणापासून आझादी? काश्मीरातच पिढ्यानपिढ्या राहणार्‍या आणि तिथल्याच भूमीपुत्र असणार्‍या पंडितांपासून आझादी? का? इस्लाम खतरेमें है असं कुणीतरी डोक्यात भरवलं आणि तुम्हाला ते पटलं म्हणून? आणि कोण जालीम? ज्यांच्यावर अत्याचार झाले ते काश्मीरी हिंदू जालीम? आणि 'हमारा काश्मीर' छोड दो? शेजारधर्मापेक्षा इस्लाम महत्त्वाचा? प्रेमाच्या धर्मापेक्षा कुठलंतरी वाळवंटी पुस्तक जे तुम्हाला निष्पाप पोरीबाळींची अब्रू लुटायला आणि निरपराध नागरिकांचे गळे कापायला शिकवतं ते महत्त्वाचं? अरे खुळे र खुळे तुम्ही. पण लक्षात ठेवा. मारलेल्या प्रत्येक निरपराधाच्या प्राणांचा हिशेब नियती चुकवल्यावाचून राहणार नाही.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ कृ. १, शके १९३८
२० जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Sunday, July 17, 2016

पंडित नामा - ४: सर्वानंद कौल प्रेमी


सर्वानंद कौल प्रेमी (मृत्यूसमयी वयः ६४), मुलगा विरेन्दर कौल (मृत्यूसमयी वयः २७)
सोफ साली, अनंतनाग, काश्मीर
हत्या: ३० एप्रिल १९९०

गेल्या शतकातला सगळ्यात क्रूर नेता कोण किंवा कुठल्या राजकीय विचारधारेला सगळ्यात क्रूर म्हणता येईल असं तुम्हाला विचारलं तर मला खात्री आहे शंभरपैकी नव्व्याण्णव लोक हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष यांचं नाव घेतील. पण त्यांची माणसं मारण्याची पद्धत बघितली, आणि इस्लामी अतिरेक्यांबरोबर तूलना केली तर हिटलर आणि त्याची नाझी पिलावळ चक्क दयाळू महात्मे वाटायला लागतील याचीही मला खात्री आहे. त्यांचा भर निदान फक्त लवकरात लवकर माणसं मारण्यावर होता. पद्धतीही त्यांनी तशाच शोधल्या. पण काश्मीर मधल्या अतिरेक्यांचा भर मरताना आणि मरणोत्तरही ज्याला मारतो आहोत त्याची आणि त्याच्या नातेवाईक व इतर जवळच्यांची जास्तीत जास्त किती शारिरीक व मानसिक विटंबना करता येईल यावर भर असे. हे आपण आधीच्या एखाद दोन लेखात पाहिलंच आहे. त्याचा प्रत्यय श्री सर्वानंद कौल आणि त्यांचा मुलगा विरेन्दर कौल यांच्या हत्येच्या वेळीही आला.

आपला हिंदू धर्म काय सांगतो? "सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया: | सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखमाप्नुयात  ||" श्री सर्वानंद कौल हे अक्षरशः जगत होते. ते जितके धर्मिक तितकेच सर्वसमावेशक कश्मीरियतवर मनापासून श्रद्धा असणार्‍या श्री सर्वानंद यांना काश्मीरच्या समभावी समाजमनावर आणि शांतताप्रेमावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच त्यांनी नातेवाईकांच्या अनेक विनंत्यांना धुडकावून लावत नुकत्याच दहशतवादाच्या छायेखाली आलेल्या आपल्या लाडक्या काश्मीरला सोडून इतरत्र स्थलांतरित व्हायला नकार दिला. कुठल्याही समाजाला, मग तो इतर देशापासून वेगळा जरी झाला, तरी कवी, लेखक, विचारवंत, विद्वान इत्यादी मंडळींची गरज असतेच. एका वेगळ्या झालेल्या प्रदेशाला, समाजाला वेगळ्या राजकीय ओळखीबरोबरच आपली अशी वेगळी संस्कृतिक ओळख असावी अशी भावना असतेच, म्हणूनच कदाचित एक सुप्रसिद्ध कवी आणि विद्वान म्हणून काश्मीरमधे लोकप्रिय असलेल्या श्री सर्वानंद यांना मुस्लिमबहुल भागात राहूनही आपल्याला धोका होणार नाही असं वाटत असावं. आपल्या देव्हार्‍यात हिंदू धार्मिक ग्रंथांबरोबरच कुराणाची एक अतिशय दुर्मीळ अशी हस्तलिखीताची प्रत बाळगणार्‍या श्री सर्वानंद यांचा आपल्या लोकसंग्रहावर त्यांचा गाढ विश्वास असल्याने ते निर्धास्त होते आणि सोफ साली सोडायला नाखूष. पण त्यांच्या या भाबड्या विश्वासाला लवकरच तडा जाणार होता.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एके रात्री त्यांच्या घरात तीन दहशतवादी घुसले आणि कौल कुटुंबियांना त्यांच्याकडच्या मौलवान वस्तू एके ठिकाणी एकत्र करायला सांगितलं गेलं. सोनंनाणं आणि इतर दागिने, पश्मीना चादरी आणि शाली, भारी साड्या यांचा एके ठिकाणी ढग रचला गेला. घरातल्या स्त्रीपुरुषांच्या अंगावरचं सोनं ओरबाडलं गेलं आणि हा सगळा ऐवज एका बॅगेत भरला गेला. मग त्या तीन दहशतवाद्यांनी सर्वानंद यांना ती बॅग उचलून त्यांच्या सोबत चलण्याची आज्ञा केली. आता कौल यांच्या घरात रडण्याचा भयंकर आवाज घुमू लागला. बायकांचा हा आकांत पाहून त्या दहशतवाद्यांनी विरेन्दरला, "आम्ही सर्वानंद यांना कोणताही धोका पोहोचवू इच्छित नाही, ते परत येतील" असं आश्वासन दिलं आणि वर, "तुला हवं तर तू आमच्या बरोबर येऊ शकतोस" अशी मखलाशीही केली. रात्र फार झाल्याने वडिलांना परत यायला अडचण होईल म्हणून विरेन्दर त्यांच्या बरोबर निघाला. पुढे काय वाढून ठेवलं होतं हे आधी समजलं असतं तर, 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः' या श्लोकाप्रमाणे कौल कुटुंबियांनी विरेन्द्रला जाऊ दिलं नसतं. घरातला वडीलधारी माणूस म्हणून सर्वानंद गेले, तरी किमान विरेन्दरचा आधार तरी उरला असता. पण तसं व्हायचं नव्हतं.

या नंतर दोन दिवसांनी श्री सर्वानंद कौल व विरेन्दर कौल यांचे मृतदेह घरापासून बरंच लांब सापडले. दोघांनाही खूप वेदनादायी मृत्यू आला होता हे त्यांच्या मृतदेहाकडे पाहून समजत होतं. माणूस क्रूरतेच्या कुठल्या थराला जाऊ शकतो हे त्यांच्या मृत शरीरांकडे बघितल्यावर लक्षात येत होतं. दोघांच्याही सर्वांगावर सिगारेटचे चटके दिल्याचे डाग होते. दोघांचेही हातपाय मोडलेले होते. इतकंच नव्हे तर दोघांचेही डोळे धारदार शस्त्राने काढलेले होते. हे कमी म्हणून की काय कपाळावर आपण जिथे गंध लावतो तेवढ्याच भागाला अतिरेक्यांनी सोलून काढलं आणि मग मधोमध लोखंडी सळीने भोसकलं होतं. कदाचित अजूनही ते दोघे वाचले तर काय करा म्हणून त्यांना गोळ्याही घातल्या गेल्या. मी सुरवातीला म्हटलं की या दहशतवाद्यांची माणसं मारण्याची पद्धत पाहून हिटलर व त्याचे नाझी सहकारी लाजले असते ते उगाच नाही.

सर्वेपि सुखिनः सन्तु अशी जरी आपली स्तुत्य भूमिका असली आणि सर्वदेव नमस्कारम् केशवं प्रतिगच्छती असं जरी म्हटलेलं असलं तरी ते एकतर्फी असून चालत नाही. समोरच्याची भूमिका आम्ही म्हणू तेच सत्य, आमचाच धर्म बरोबर आणि आमचाच देव सर्वश्रेष्ठ, आमच्या देवाला तुम्ही मानत नसाल तर आम्ही तुम्हाला संपवू, तुमच्या पोरीबाळी आमची मालमत्ता आहेत अशी भूमिका असली तर तुमच्या सद्भावनेचा काडीचा उपयोग होत नाही. म्हणूनच म्हणून मग 'माय नेम इज खान अ‍ॅन्ड आय अ‍ॅम नॉट अ टेररिस्ट' अशी सिनेमांची नावं पाहिली की खिक् करुन हसायला येतं आणि बरोबरच येतो तो भयानक संताप.

कुठेही घडणारी दहशतवादी कृत्य ही स्थानिक रसद, मग ती सक्रीय असो वा नैतिक पाठिंबा देणारी, असेल तरच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला लक्ष ठेवा. फ्लॅट संस्कृतीत राहूनही आपण लक्ष ठेऊ शकतो. तेव्हा रामदास स्वामी म्हणाले तसं "अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी ||" हे अखंड लक्षात ठेवून तसं वागणं क्रमप्राप्त आहे. 

पंडित नामा मालिकेतल्या पुढच्या कथेसाठी पुन्हा काही दिवसांनी भेटू.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ शु. १३, शके १९३८
१७ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------