Wednesday, July 20, 2016

पंडित नामा - ५: सतीश कुमार टिक्कू

सतीश कुमार टिक्कू, व्यवसायिक
श्रीनगर
हत्या: २ फेब्रूवारी १९९०

नारा-ए-तकबीर, अल्लाह-हू-अकबर!

अशा घोषणा आता काश्मीरमधे ऐकू येणं नित्याची बाब झाली होती. रस्त्यावर या घोषणा घुमू लागल्या की काश्मीरी पंडितांच्या पोटात गोळा येत असे. कारण १९४७च्या फाळणीच्या जखमा हळू हळू भरत चालेल्या असल्या, तरी त्या वेळच्या कटू आठवणी अजूनही अनेकांच्या स्मृतीपटलावरुन पुसल्या गेल्या नव्हत्या. अनेक मार्गांनी अजूनही जिवंत होत्या. त्या वेळी दंगेखोर मुसलमानांचा जत्था हिंदू वस्त्यांवर हल्ला करण्याआधी ते ही घोषणा देत. घोषणा कसली? युद्ध पुकारल्याची आरोळीच ती. धर्मयुद्ध. जिहाद.

या आरोळ्या ऐकल्या की पंडितांंचा जीव घाबरागुबरा होत असे, दारं खिडक्या बंद केल्या जात, आणि घरातलं जितकं सामान बॅगांमधे भरुन सहज उचलून नेता येणं शक्य असे तितकं सामान घेऊन घरातले सगळे दुसर्‍या दिवशी सकाळी घरावर तुळशीपत्र ठेऊन काश्मीर खोरे सोडण्यासाठी बाहेर पडत असत. काश्मीरी पंडितांची ही खात्री पटत चालली होती की आता आपला कुणीही तारणहार उरलेला नाही, अगदी आधीच्या कार्यकाळात उत्तम कारभार केलेले आणि म्हणूनच परत बोलावले गेलेले जगमोहन सुद्धा. कारण जहाल इस्लामी मानसिकता आणि फुटीरतावादी चळवळीने प्रशासनाला पार पोखरून टाकलेलं होतं. अगदी राज्य पोलीस दलातल्या अनेक पोलीसांनाही फुटीरतावाद्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतलेलं होतं, इतकंच नव्हे तर अनेक फुटीरतावादीही पोलीस दलात नोकरी मिळवण्यात यशस्वी झालेले होते. त्यामुळे राज्यपालपदाची धुरा दुसर्‍यांदा खांद्यावर घेतलेल्या जगमोहन यांची अवस्था रुग्णाच्या नातेवाईकांना "आता आशा नाही, तुम्ही मनाची तयारी करा" असं सांगायला पाठवलेल्या एखाद्या डॉक्टरसारखी झालेली होती.

हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


मशीदींवर लावलेल्या कर्ण्यांतूनच सुरवातीला अशा धमक्या कधीही केव्हाही दिल्या जात. पण नंतर या घोषणा देण्याच्या पद्धतीमधे सुसूत्रता आली. जणू काही वेळापत्रक ठरवून दिलं गेलं असावं. आता या आरोळ्या रात्र पडताच सुरु होत आणि पहाटेपर्यंत चालू ठेवल्या जात. कदाचित रात्रीच्या शांततेत अधिकाधिक दूरवर ऐकू जाव्यात हा उद्देश असावा. अधून मधून घोषणा द्यायचा कंटाळा आला की जिहादसमर्थक भाषणे व गाण्यांची कॅसेट वाजवली जात असे. कॅसेट संपली की पुन्हा नव्या जोमाने आरोळ्या सुरू होत. काश्मीरी हिंदूंची रात्रीची झोप तर हिरावून घेतली गेलीच होती पण दिवसाही काही बरी परिस्थिती नसे.

अशा आरोळ्या ठोकत आता दंगलखोरांचे जत्थेच्या जत्थे दिवसाढवळ्या रस्त्यावरुन फिरू लागले होते. आता फुटीरतावाद्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली होती. रस्त्यावरून घोषणा देत चालणार्‍या अशा मोर्च्याच्या अग्रभागी आता घरातून बाहेर काढलेल्या काश्मीरी पंडिताना चालवण्याची चाल खेळली जात होती. प्रथमदर्शनी निव्वळ मानसिक यातना देण्याचा किंवा घोषणांची परिणामकारकता वाढवण्याचा आणि त्यायोगे इतर पंडितांमधे भीती वाढवण्याचा उद्देश दिसत असला तरी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण वेगळंच होतं. या जमावावर जर सैन्याने किंवा अर्धसैनिक दलाने (पॅरामिलीटरी फोर्स) गोळीबार केलाच तर त्याचे पहिले बळी हे पंडितच ठरावेत अशी ती योजना होती. कुठल्या घरात पंडित राहतात, सापडले नाही तर त्यांच्या लपण्याच्या जागा कुठल्या, ते कुठे सापडण्याची शक्यता आहे इत्यादी माहिती अर्थातच स्थानिक काश्मीरी मुसलमानांकडून गोळा केली जाई. त्यामुळे काश्मीरी मुसलमान असलेले सख्खे शेजारी, कार्यातले सहकारी, मित्र, इतर ओळखीचे दुकानदार अशा कुणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती उरलेली नव्हती.

काश्मीर सोडून जम्मूत स्थायिक व्हायचं सतीशने ठरवलं असलं तरी पटकन गाशा गुंडाळायला सुरवात केली तर दगाफटका होईल म्हणून हळू हळू सामान हलवू असं सतीश कुमार टिक्कू आपल्या वडिलांना सांगत असे. व्यावसायिक असलेल्या सतीशचे अनेक मुसलमान मित्र आणि परिचित होते. फारुख अहमद दार हा असाच एक मित्र. सतीशबरोबर तो अनेकदा स्कूटरवर त्याच्या मागे बसून फिरायचा. म्हणूनच एके दिवशी जेव्हा सतीशला दाराबाहेर नेहमीसारखीच फारुखची हाक ऐकू आली तेव्हा त्याला कसलाही संशय आला नाही. बाहेर येताच सतीशला त्याच्यावर गोळीबार करण्याच्या तयारीत असलेले फारुख व इतर काही तरुण दिसले. त्यांच्यापैकी एक जवळच राहणारा असल्याचं सतीशला आठवलं. ते सगळेच त्याच्या कमीअधिक ओळखीचे होते. त्यांच्यापैकी एकाने सतीशवर पिस्तूल रोखताच सतीशने बचावाचा प्रयत्न म्हणुन हातातली कांगरी (एक प्रकारची लहानशी टोपली) त्याच्या दिशेने फेकून मारली. त्याच वेळी झाडल्या गेलेल्या पहिल्या गोळीनं सतीशच्या हनुवटीचा वेध घेतला. कळवळून सतीश खाली पडला. कोसळलेल्या सतीशवर त्या तरुणांनी त्याच्यावर आणखी गोळ्या झाडल्या. सतीश सुदैवी ठरला. त्याच्या वाट्याला इतर अनेकांसारख्या यातना आल्या नाहीत. गोळीबारात तो जागीच ठार झाला.

सतीशवर गोळ्या झाडणार्‍यांपैकी फारुख अहमद दार हा पुढे जवळजवळ वीसहून अधिक मुडदे पाडणारा अतिरेकी बिट्टा कराटे या नावाने कुख्यात झाला.  त्याच्या वीस बळींपैकी सतरा बळी काश्मीरी पंडित तर उर्वरित तीन काश्मीरी मुसलमान होते. त्याला पकडल्यावर घेतलेल्या मुलाखतीची ही लिंक:



ही मुलाखत पाहून अक्कल आणि डोकं गहाण ठेवणं या लोकांसाठी किती सहज आहे हे लक्षात येतं. वरुन आदेश आला असता तर मी आईलाही मारलं असतं असं म्हणणारा बिट्टा कराटे बघितला आणि चटकन काही दिवसांपूर्वी धर्मद्रोह केल्याच्या आरोपाखाली एका इस्लामीक स्टेटच्या अतिरेक्याने आपल्या आईला गोळी घातल्याची बातमी आठवली, आणि अंगावर शहारा आला.

मुलाखतीचा काही भाग भाषांतरित करुनः

पत्रकारः किती जणांना मारलंस?

कराटे: लक्षात नाही.

पत्रकारः म्हणजे इतक्या माणसांना मारलंस की लक्षातही नाही?

कराटे: दहा बारा जणांना मारलं असेल.

पत्रकारः दहा की बारा की वीस?

कराटे: वीस असेल.

पत्रकार: सगळे काश्मीरी पंडित होते? की काही मुसलमान पण होते?

कराटे: काही मुसलमानही होते.

पत्रकारः किती मुसलमान होते आणि किती पंडित होते? काश्मीरी पंडित जास्त होते का?

कराटे: हो पंडित जास्त होते.

पत्रकारः पहिला खून कोणाचा केलास?

कराटे: सतीश कुमार टिक्कू.

पत्रकारः कोण होता हा? का मारलं?

कराटे: पंडित होता. वरुन आदेश होता. मारलं.

कराटे पकडला गेला, पण सोळा वर्ष तुरुंगात काढल्यावरही त्याला शिक्षा होऊ शकली नाही. त्याचा सुटकेचा आदेश काढताना न्यायाधीशांनी जे शब्द वापरले त्यात वर वर्णन केलेली पोखरलेली प्रशासनिक परिस्थिती डोकावते. सरकार पक्षावर कडक ताशेरे ओढताना न्यायाधीश म्हणाले की बिट्टाला शिक्षा व्हावी अशा प्रकारे खटला चालवण्याची सरकारी वकील व एकंदरितच सरकार पक्षाची इच्छाच दिसत नव्हती. कराटेचा खटला हा प्रातिनिधिक आहे. काश्मीरी पंडितांची हत्या केल्याबद्दल जे जे खटले दाखल झाले त्यांच्यापैकी एकाही खटल्यात कुणालाही आजतागायत शिक्षा झालेली नाही.

कराटे तुरुंगातून सुटला, त्याने लग्न केलं, आणि तो बापही झाला. सतीश कुमार टिक्कू, अशोक कुमार काजी यांच्यासह वीस हत्या करणारा फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटेच्या नशीबात एक कुटुंबवत्सल आयुष्य लिहीलेलं होतं. पण ज्यांचा पोटचा पोर त्याने मारला, त्या सतीशच्या वडिलांच्या म्हणजेच श्री पृथ्वीनाथ टिक्कू यांच्या नशीबात मात्र रोज आपल्या मुलाच्या फोटोकडे पाहून अश्रू ढाळणं आणि आणि आपल्या तीन मजली आणि सत्तेचाळीस खिडक्यांच्या घराच्या आठवणीने गहिवरणं लिहीलेलं होतं. काश्मीर सोडताना टिक्कू कुटुंबियांना त्यांचं हे अवाढव्य घर कवडीमोल भावाने विकावं लागलं.



हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


कसली आझादी? कुणापासून आझादी? काश्मीरातच पिढ्यानपिढ्या राहणार्‍या आणि तिथल्याच भूमीपुत्र असणार्‍या पंडितांपासून आझादी? का? इस्लाम खतरेमें है असं कुणीतरी डोक्यात भरवलं आणि तुम्हाला ते पटलं म्हणून? आणि कोण जालीम? ज्यांच्यावर अत्याचार झाले ते काश्मीरी हिंदू जालीम? आणि 'हमारा काश्मीर' छोड दो? शेजारधर्मापेक्षा इस्लाम महत्त्वाचा? प्रेमाच्या धर्मापेक्षा कुठलंतरी वाळवंटी पुस्तक जे तुम्हाला निष्पाप पोरीबाळींची अब्रू लुटायला आणि निरपराध नागरिकांचे गळे कापायला शिकवतं ते महत्त्वाचं? अरे खुळे र खुळे तुम्ही. पण लक्षात ठेवा. मारलेल्या प्रत्येक निरपराधाच्या प्राणांचा हिशेब नियती चुकवल्यावाचून राहणार नाही.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ कृ. १, शके १९३८
२० जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Sunday, July 17, 2016

पंडित नामा - ४: सर्वानंद कौल प्रेमी


सर्वानंद कौल प्रेमी (मृत्यूसमयी वयः ६४), मुलगा विरेन्दर कौल (मृत्यूसमयी वयः २७)
सोफ साली, अनंतनाग, काश्मीर
हत्या: ३० एप्रिल १९९०

गेल्या शतकातला सगळ्यात क्रूर नेता कोण किंवा कुठल्या राजकीय विचारधारेला सगळ्यात क्रूर म्हणता येईल असं तुम्हाला विचारलं तर मला खात्री आहे शंभरपैकी नव्व्याण्णव लोक हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष यांचं नाव घेतील. पण त्यांची माणसं मारण्याची पद्धत बघितली, आणि इस्लामी अतिरेक्यांबरोबर तूलना केली तर हिटलर आणि त्याची नाझी पिलावळ चक्क दयाळू महात्मे वाटायला लागतील याचीही मला खात्री आहे. त्यांचा भर निदान फक्त लवकरात लवकर माणसं मारण्यावर होता. पद्धतीही त्यांनी तशाच शोधल्या. पण काश्मीर मधल्या अतिरेक्यांचा भर मरताना आणि मरणोत्तरही ज्याला मारतो आहोत त्याची आणि त्याच्या नातेवाईक व इतर जवळच्यांची जास्तीत जास्त किती शारिरीक व मानसिक विटंबना करता येईल यावर भर असे. हे आपण आधीच्या एखाद दोन लेखात पाहिलंच आहे. त्याचा प्रत्यय श्री सर्वानंद कौल आणि त्यांचा मुलगा विरेन्दर कौल यांच्या हत्येच्या वेळीही आला.

आपला हिंदू धर्म काय सांगतो? "सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया: | सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखमाप्नुयात  ||" श्री सर्वानंद कौल हे अक्षरशः जगत होते. ते जितके धर्मिक तितकेच सर्वसमावेशक कश्मीरियतवर मनापासून श्रद्धा असणार्‍या श्री सर्वानंद यांना काश्मीरच्या समभावी समाजमनावर आणि शांतताप्रेमावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच त्यांनी नातेवाईकांच्या अनेक विनंत्यांना धुडकावून लावत नुकत्याच दहशतवादाच्या छायेखाली आलेल्या आपल्या लाडक्या काश्मीरला सोडून इतरत्र स्थलांतरित व्हायला नकार दिला. कुठल्याही समाजाला, मग तो इतर देशापासून वेगळा जरी झाला, तरी कवी, लेखक, विचारवंत, विद्वान इत्यादी मंडळींची गरज असतेच. एका वेगळ्या झालेल्या प्रदेशाला, समाजाला वेगळ्या राजकीय ओळखीबरोबरच आपली अशी वेगळी संस्कृतिक ओळख असावी अशी भावना असतेच, म्हणूनच कदाचित एक सुप्रसिद्ध कवी आणि विद्वान म्हणून काश्मीरमधे लोकप्रिय असलेल्या श्री सर्वानंद यांना मुस्लिमबहुल भागात राहूनही आपल्याला धोका होणार नाही असं वाटत असावं. आपल्या देव्हार्‍यात हिंदू धार्मिक ग्रंथांबरोबरच कुराणाची एक अतिशय दुर्मीळ अशी हस्तलिखीताची प्रत बाळगणार्‍या श्री सर्वानंद यांचा आपल्या लोकसंग्रहावर त्यांचा गाढ विश्वास असल्याने ते निर्धास्त होते आणि सोफ साली सोडायला नाखूष. पण त्यांच्या या भाबड्या विश्वासाला लवकरच तडा जाणार होता.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एके रात्री त्यांच्या घरात तीन दहशतवादी घुसले आणि कौल कुटुंबियांना त्यांच्याकडच्या मौलवान वस्तू एके ठिकाणी एकत्र करायला सांगितलं गेलं. सोनंनाणं आणि इतर दागिने, पश्मीना चादरी आणि शाली, भारी साड्या यांचा एके ठिकाणी ढग रचला गेला. घरातल्या स्त्रीपुरुषांच्या अंगावरचं सोनं ओरबाडलं गेलं आणि हा सगळा ऐवज एका बॅगेत भरला गेला. मग त्या तीन दहशतवाद्यांनी सर्वानंद यांना ती बॅग उचलून त्यांच्या सोबत चलण्याची आज्ञा केली. आता कौल यांच्या घरात रडण्याचा भयंकर आवाज घुमू लागला. बायकांचा हा आकांत पाहून त्या दहशतवाद्यांनी विरेन्दरला, "आम्ही सर्वानंद यांना कोणताही धोका पोहोचवू इच्छित नाही, ते परत येतील" असं आश्वासन दिलं आणि वर, "तुला हवं तर तू आमच्या बरोबर येऊ शकतोस" अशी मखलाशीही केली. रात्र फार झाल्याने वडिलांना परत यायला अडचण होईल म्हणून विरेन्दर त्यांच्या बरोबर निघाला. पुढे काय वाढून ठेवलं होतं हे आधी समजलं असतं तर, 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः' या श्लोकाप्रमाणे कौल कुटुंबियांनी विरेन्द्रला जाऊ दिलं नसतं. घरातला वडीलधारी माणूस म्हणून सर्वानंद गेले, तरी किमान विरेन्दरचा आधार तरी उरला असता. पण तसं व्हायचं नव्हतं.

या नंतर दोन दिवसांनी श्री सर्वानंद कौल व विरेन्दर कौल यांचे मृतदेह घरापासून बरंच लांब सापडले. दोघांनाही खूप वेदनादायी मृत्यू आला होता हे त्यांच्या मृतदेहाकडे पाहून समजत होतं. माणूस क्रूरतेच्या कुठल्या थराला जाऊ शकतो हे त्यांच्या मृत शरीरांकडे बघितल्यावर लक्षात येत होतं. दोघांच्याही सर्वांगावर सिगारेटचे चटके दिल्याचे डाग होते. दोघांचेही हातपाय मोडलेले होते. इतकंच नव्हे तर दोघांचेही डोळे धारदार शस्त्राने काढलेले होते. हे कमी म्हणून की काय कपाळावर आपण जिथे गंध लावतो तेवढ्याच भागाला अतिरेक्यांनी सोलून काढलं आणि मग मधोमध लोखंडी सळीने भोसकलं होतं. कदाचित अजूनही ते दोघे वाचले तर काय करा म्हणून त्यांना गोळ्याही घातल्या गेल्या. मी सुरवातीला म्हटलं की या दहशतवाद्यांची माणसं मारण्याची पद्धत पाहून हिटलर व त्याचे नाझी सहकारी लाजले असते ते उगाच नाही.

सर्वेपि सुखिनः सन्तु अशी जरी आपली स्तुत्य भूमिका असली आणि सर्वदेव नमस्कारम् केशवं प्रतिगच्छती असं जरी म्हटलेलं असलं तरी ते एकतर्फी असून चालत नाही. समोरच्याची भूमिका आम्ही म्हणू तेच सत्य, आमचाच धर्म बरोबर आणि आमचाच देव सर्वश्रेष्ठ, आमच्या देवाला तुम्ही मानत नसाल तर आम्ही तुम्हाला संपवू, तुमच्या पोरीबाळी आमची मालमत्ता आहेत अशी भूमिका असली तर तुमच्या सद्भावनेचा काडीचा उपयोग होत नाही. म्हणूनच म्हणून मग 'माय नेम इज खान अ‍ॅन्ड आय अ‍ॅम नॉट अ टेररिस्ट' अशी सिनेमांची नावं पाहिली की खिक् करुन हसायला येतं आणि बरोबरच येतो तो भयानक संताप.

कुठेही घडणारी दहशतवादी कृत्य ही स्थानिक रसद, मग ती सक्रीय असो वा नैतिक पाठिंबा देणारी, असेल तरच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला लक्ष ठेवा. फ्लॅट संस्कृतीत राहूनही आपण लक्ष ठेऊ शकतो. तेव्हा रामदास स्वामी म्हणाले तसं "अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी ||" हे अखंड लक्षात ठेवून तसं वागणं क्रमप्राप्त आहे. 

पंडित नामा मालिकेतल्या पुढच्या कथेसाठी पुन्हा काही दिवसांनी भेटू.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ शु. १३, शके १९३८
१७ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------



Saturday, July 16, 2016

पंडित नामा - ३: सौ. तेजा रूपकिशन धर

पंडित नामा - ३

सौ. तेजा रूपकिशन धर
अलीकादल, काश्मीर
हत्या: ३० जून १९९०



हर अष्टमी या सणाचा दिवस होता. काश्मीरचे रहिवासी व राज्य सरकारी सेवेत लेबर ऑफिसर असलेले श्री रूपकिशन धर व त्यांची पत्नी तेजा यांचं रात्रीचं जेवण नुकतंच आटपलं होतं. जेवण झाल्यावर फिरायला जाण्याचा श्री रूपकिशन यांचा नेहमीचा शिरस्ता. त्या प्रमाणे ते पत्नीचा निरोप घेऊन फिरायला बाहेर पडले. घरी परतण्याआधी सहज गप्पा मारायला म्हणून एका मित्राच्या घरी गेले. नवरा बाहेर गेल्यावर आपल्यालाही विरंगुळा म्हणून तेजादेवींनी त्यांच्या एका वयस्कर मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं व त्यांच्याही गप्पा रंगल्या.

साधारण रात्री साडेसातच्या सुमारास दारावर थाप पडली. बाहेर काही जण "रूपकिशनजींना भेटायचं आहे" असं म्हणत होते. आता तेजादेवींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी दार न उघडताच रूपकिशनजी बाहेर गेलेत, त्यांना भेटायचं असेल तर उद्या या" असं दार वाजवणार्‍यांना ओरडून सांगितलं. बाहेर उभं असलेल्यांना धीर नसावा. त्यांनी सरळ घराचं दार तोडून आत प्रवेश केला. ते दहशतवादी होते हे स्पष्ट होतं. घरात घुसताच दार अडवून उभ्या असलेल्या तेजादेवींना ढकलून त्या दहशतवाद्यांनी घरभर रूपकिशनजींचा शोध सुरु केला. त्यांना शोधता शोधता घरात नासधूस करायला ते विसरले नाहीत. घरातला प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक वस्तूची वाट लावूनच ते थांबले. रूपकिशनजी कुठेच सापडले नाहीत याचा आता त्या नराधमांना भयानक राग आलेला होता. सगळं घर शोधून खाली येताच समोर आलेल्या तेजादेवींच्या वयोवृद्ध मैत्रिणीला रागाच्या भरात धडाधडा मुस्काडीत ठेऊन दिल्या. तेजादेवींनी त्यांना त्यांच्या वयाचा तरी मान ठेवा आणि असं करु नका असं ओरडून सांगितलं. आता ते दहशतवादी हवा तो माणूस सापडला नाही म्हणून घराच्या बाहेर पडणार तेवढ्यात एकाने वळून तेजादेवींवर बेधुंदपणे गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातल्या काही गोळ्या तेजादेवींच्या पोटात गोळ्या घुसल्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. कुणाला तरी गोळ्या घालता आल्याच्या आनंदात दहशतवादी घराबाहेर पडले.

पण अजूनही दहशतवाद्यांनी रूपकिशनजींचा शोध थांबवला नव्हता. रूपकिशनजी पळून गेले असल्याचा दहशतवाद्यांना संशय आल्याने आता त्यांनी सगळ्या मोहल्ल्याला वेढा घातलेला होता. काश्मीरमधे दहशतवादाच्या सुरवातीचा तो काळ होता आणि गावात संशयास्पद हालचाली सुरू झाल्या की लोक दारं खिडक्या बंद करुन घ्यायचे. या सगळ्या प्रकाराचा अंदाज रूपकिशनजींच्या मित्राला आल्याने त्याने त्यांना त्याच्या घराबाहेर पडू दिलं नाही. जवळजवळ रात्री दहा वाजून गेल्यानंतर कंटाळलेल्या दहशतवाद्यांनी तो मोहल्ला सोडला. आता रूपकिशनजी व त्यांच्या मित्राने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि दोघे रूपकिशनजींच्या घरी आले.

पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून रूपकिशजी खचले. पण आता वेळ घालवून चालणार नव्हतं. रूपकिशनजींनी धावतच जवळचं इस्पितळ गाठलं. तिथे आलेला अनुभव हा अधिकच भयानक होता. वास्तविक एरवी सगळं जग एकीकडे आणि डॉक्टर एकीकडे अशी आशादायक परिस्थिती असते. डॉक्टर हा रंग, जात, धर्म न बघता समोर आलेल्या रुग्णाला बरं करणे हे एकमेव कर्तव्य जाणून कामाला लागतो. म्हणूनच डॉक्टरांना आपण देव मानतो. पण इस्लामी दहशतवादाने ग्रासलेल्या काश्मीरमधे इस्लामी मूलतत्ववादाची लागण वैद्यकीय क्षेत्रातही शिरली होती. त्या इस्पितळातल्या डॉक्टरांनी रूपकिशनजींना रुग्णवाहिका नवी असेल तर ही पोलीस केस असल्याने आधी पोलीस स्टेशनमधे जाऊन तक्रार नोंदवून या असा माणूसकीविरहित सल्ला दिला. रूपकिशनजी आता महराजगंज पोलीस स्थानकाच्या दिशेने धावले. तिथे एफ.आय.आर. नोंदवला आणि मग एका रुग्णवाहिकेतून पत्नी तेजादेवींना इस्पितळात दाखल केलं. हे सगळ होईपावेतो एव्हाना बराच वेळ गेला होता. इतके तास प्रचंड रक्तस्त्राव झालेल्या तेजादेवी आता अगदीच गलितगात्र झाला होत्या. आधी इस्पितळ, मग पोलीस स्टेशन, मग तेजादेवींना घेऊन इस्पितळ अशी धावाधाव करुन प्रचंड दमलेल्या रूपकिशनजींनी तेजादेवींना डॉक्टरांच्या हवाली करुन परमेश्वराचा धावा करत बसले. पण अजून त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. तेजादेवींवर लगोलग उपचार करण्याऐवजी इस्पितळातले डॉक्टर गोष्ट ऐकायला बसलेल्या लहान मुलांच्या आविर्भावात "युद्धस्य कथा रम्या:" ऐकायला मिळतील या आशेने तेजादेवींना गोळ्या कशा लागल्या वगैरे अस्थानी आणि नुर्बुद्ध प्रश्न विचारत बसले होते. आता रूपकिशनजींचा संयम संपला आणि त्यांनी डॉक्टरांना तेजादेवींवर अजून शस्त्रक्रिया का झाली नाही असं जवळजवळ ओरडतच फैलावर घेतलं. त्यावर निर्लज्जपणे डॉक्टर म्हणाले की इस्पितळात रक्ताची कमतरता आहे. एव्हाना हे सगळं मुद्दामून चालेलेलं होतं हे रूपकिशनजींना उमगलं होतं. पण त्यांनी धीर न सोडता तेजादेवींवर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात यावी असा आग्रह धरला. आता डॉक्टरांचा नाईलाज झाल्याने त्यांनी तेजादेवींना शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटर) मधे नेलं. रूपकिशनजींच्या म्हणण्यानुसार सकाळपर्यंत तेजादेवी मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

रूपकिशनजी व तेजादेवींना एक मुलगी होती. काश्मीरमधे दहशतवादाच्या सुरवातीचा तो काळ होता. दहशतवादी कधीही हिंदूंच्या घरात घुसून घरातल्या मुलींना धरून न्यायचे, म्हणूनच धर कुटुंबियांनी त्यांच्या मुलीला जम्मूला नातेवाईकांकडे ठेवलं होतं. म्हणुन ती बिचारी वाचली. तेजादेवींच्या मृत्यूनंतर रूपकिशनजींनी त्यांचे जवळच एका ठिकाणी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले आणि अस्थीविसर्जन आटोपताच ताबडतोब अलीकादल मधलं आपलं चंबुगबाळं गुंडाळून जम्मूमधे आपल्या मुलीकडे आले. ही गोष्ट ऐकल्यावर त्यांच्या मुलीची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. तिला आपल्या आईचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही.

रूपकिशनजींचा अखेरपर्यंत दावा होता की ऑपरेशन थिएटरमधे तेजादेवींवर शस्त्रक्रियाच झाली नाही. उपचार करणार्‍या मुसलमान डॉक्टरांनी त्या निर्वाणीच्या क्षणीही तेजादेवींचा धर्म बघितला आणि उपचार करायला मुद्दामून उशीर केला. लहान मुलाने एखादं खेळणं मोडलं म्हणून दुकानात परत घेऊन जावं, आणि दुकानदाराने नंतर बघू कधीतरी म्हणून ते बाजूला ठेऊन द्यावं तसं डॉक्टरांनी जखमी तेजादेवींबरोबर खेळण्यागत वर्तणूक केली. काश्मीरी पंडितांच्या जीवाला त्यावेळी ही किंमत उरली होती. कारण एखाद्याला गोळी घालून ठार मारेपर्यंत तिथे क्रौर्य संपत नसे. त्याला तडफडत तडफडत सेकंदासेकंदाने मरताना पाहून केवळ दहशतवादीच नव्हे तर इतर  तथाकथित शांतताप्रिय मुसलमान कौम सुद्धा आनंद घेत असे हे आपण दुसर्‍या भागात वाचलंच असेल. तेच भोग तेजादेवींच्या वाट्याला आले. इथे धक्कादायक बाब अशी की सगळ्या जगाचा भरवसा सुटल्यावर ज्यांना देव म्हणावं असेच डॉक्टर दानवांपेक्षाही क्रूर झाले. अशा अनेक मुलींपासून त्यांच्या आया, वडिल, भाऊ, हिरावले गेले. पहिल्या भागात मी म्हटलं होतं, जे गोळ्या झेलून लगेच मेले ते सुटले याचं हेच कारण आहे.

वर्षानुवर्ष ज्यांची सोबत केली त्या मुसलमान शेजार्‍यांवर संकटकाळी भरवसा ठेवता येत नाही, कार्यालयातल्या मुसलमान सहकार्‍यांवर भरवसा ठेवता येत नाही, इतकंच नव्हे तर मुसलमान डॉक्टरांवरही भरवसा ठेवता येत नाही अशा परिस्थितीत काश्मीरी पंडितांचे काय हाल झाले असतील याची कल्पनाही करवत नाही. आपल्या वागण्याने काश्मीरातच नव्हे तर देशभरात यांना कुणी पटकन आपली जागा विकायला आणि भाड्याने द्यायला तयार होत नाही अशी परिस्थिती त्यांनीच निर्माण करुन ठेवली आहे, आणि मग हेच आमच्याशी भेदभाव केला जातो अशी चोराची उलटी बोंब ठोकतात. कोण देईल यांना जागा? कोण ओढवून घेईल नसती कटकट? अहो यांच्या शेजारी इथे जीवाची शाश्वती देता येत नाही तर बाकीचा धोका कोण पत्करणार? अशा गोष्टींतून काय धडा घ्यायचा ते मी सांगणार नाही. ते तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे.

१९४७ साली मुसलमानांना वेगळा देश हवा म्हणून जा बाबा आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही सुखात वेगळे रहा म्हणून पाकिस्तान तोडून दिला. आता त्यांना काश्मीर तोडून हवा आहे. तो त्यांना दिला तर इतर अनेक बाबींबरोबरच असंही होईल की पाकिस्तानची सीमा हिमाचल प्रदेश या राज्याला येऊन भीडेल. म्हणजेच शत्रू अधिक जवळ येईल. आधीच अस्तनीतले साप तयारच आहेत बाह्या सरसावून. शांतताप्रेमी भारतीयांचा संयम फार थोडा उरला आहे. राज्यकर्ते व भारताचे शत्रू या दोघांनीही त्या संयमाची अधिक परीक्षा बघू नये हे उत्तम.

अशा अनेक हृदय पिळवटून टाकणार्‍या गोष्टी आहेत. अशांपैकीच या मालिकेतली चौथी, लवकरच.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ शु. १२, शके १९३८
१६ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Thursday, July 14, 2016

पंडित नामा - २: अशोक कुमार काजी

अशोक कुमार काजी जन्मः अज्ञात | हत्या: २४ डिसेंबर १९९० नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी या वाहिन्यांवर वाघ कसे शिकार करतात ते बघितलंय कधी? ते मुके प्राणी सुद्धा सावज एकदा तावडीत सापडलं की आधी त्याच्या नरडीचा घोट घेतात. त्याला जितक्या लवकर ठार मारता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. शत्रूला संपवणे किंवा आपली भूक भागवणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत. एखाद्याच्या क्रूरतेबद्दल वर्णन करताना आपण अनेकदा त्याला जनावरांची उपमा देतो. ते किती चुकीचं आहे हे या प्राण्यांचं फक्त निरीक्षण केल्यास आपल्याला सहज लक्षात येईल. श्रीनगर मधल्या टांकीपोराचे रहिवासी असलेले अशोक कुमार काजी हे सामाजिक कार्याची आवड असलेले अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सरकारी कर्मचारी होते. समाजातल्या सर्व स्तरांच्या समस्या सोडवण्यात त्यांना रस असे. समाजकार्याच्या याच आवडीतून त्यांचे श्रीनगरमधील सर्व स्तरातील लोकांशी ओळखी व संपर्क प्रस्थापित झाले होते. सर्व जातीधर्मांचे लोक आपल्या समस्या सोडवायला आवर्जून त्यांच्याकडे जात. जबरदस्त संघटन कौशल्य असणारे अशोक कुमार काजी यांनी श्रीनगरमधील एक सामाजिक संघटनेमार्फत समाजकार्य सुरु ठेवलं होतं. काश्मीर मधला नुकताच सुरू झालेला हिंसाचार पंडितांना लक्ष्य करणारा आहे हे लवकरच स्पष्ट झालेलं होतं. या हिंसाचारा विरोधात त्या संघटनेने थेट अतिरेक्यांच्या म्होरक्यांशी संपर्क प्रस्थापित करुन त्यांना जाब विचारण्याचं धाडस केलं होतं. आणि हेच धाडस श्री अशोक कुमार यांच्या हत्येला कारणीभूत ठरलं. संघटनेच्या या कृत्याचा बदला इस्लामी अतिरेक्यांनी श्री अशोक कुमार यांना संपवून घेण्याचं ठरवलं. त्या वेळी साधारण तिशीत असणारे श्री अशोक कुमार एके दिवशी नेहमीप्रमाणे बाजारहाट करायला बाहेर पडले. त्यांची खरेदी सुरू असतानाच त्यांना एका मुस्लीम टोळक्याने त्यांना घेरलं. काय होतंय हे लक्षात यायच्या आत त्यांनी अशोक कुमार यांच्या गुडघ्यात गोळ्या घातल्या. भयंकर वेदनांनी कळवळत ते खाली कोसळले. आजूबाजूचे सगळे दुकानदार आपल्या ओळखीचेच आहेत, ते आपल्या मदतीला येतील, त्या अतिरेक्यांना रोखतील अशा भाबड्या आशेने त्यांनी त्या दुकानदारांना व इतर ओळखीच्या लोकांना मदतीसाठी आर्त हाका मारायला सुरवात केली. पण आत्तापर्यंत आपण आपल्या समस्या ज्या भल्या माणसाकडे घेऊन जात होतो, ज्या माणसाबरोबर आपलं रोज संवाद व्हायचा, त्या माणसाला मारू नका अशी साधी विनंती करण्याचंही सौजन्य तिथल्या एकाही मुस्लीम व्यापार्‍याने दाखवलं नाही. कारण हे अतिरेकी म्हणजे इस्लामसाठी लढणारे धर्मयोद्धे असल्याने त्यांनी अशोक कुमार यांचा जीव घेण्याचा पूर्ण अधिकार होता अशी त्या दुकानदारांची ठाम समजूत होती. त्यामुळे जणू काही घडतच नाही आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांचे व्यवहार सुरु ठेवले. आपला कुणीच विरोध करत नाही हे पाहून या नराधमांचं नेतृत्व करणार्‍या बिट्टा कराटे या त्यांच्या म्होरक्याला आता चेव आला. वेदनांनी तडफडत असणार्‍या अशोक कुमार यांच्या भोवती फेर धरत त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली. अशोक कुमार यांच्या तोंडातून वेदनेने येणारा प्रत्येक आवाज हा बिट्टा व त्याच्या साथीदारांचा जल्लोष आणखी वाढवत होता. आता त्यांनी हातांनीच अशोक कुमार काजींचे केस उपटायला आणि त्यांच्या थोबाडीत द्यायला सुरवात केली. मग एकाएकी संतापाने ते सगळे त्यांच्या तोंडावर थुंकले. आता त्यांच्यापैकी एकाला आणखी एक घाणेरडं कृत्य करावसं वाटलं. त्याने त्याच्या विजारीची चेन काढली आणि आपलं लिंग अशोक कुमार यांच्या समोर नाचवत त्यांच्यावर तो मुतला. हा प्रकार बराच वेळ चालला होता. एव्हाना अशोक कुमार यांच्या वेदनांनी कळस गाठला होता. आता कदाचित परमेश्वरालाच त्यांची दया आली असावी. अचानक दुरून पोलीसांच्या जीपचा सायरन ऐकून आला. आता मात्र तिथून काढता पाय घ्यावा लागेल हे बिट्टा व त्याच्या साथीदारांच्या लक्षात आलं. त्यांनी अशोक कुमार यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत त्यांना त्या वेदनांपासून कायमची मुक्ती दिली, व विजेत्यांच्या थाटात आणखी जोरात जल्लोष करत आसपासच्या चिरपरिचित भागातून पलायन केलं. श्री अशोक कुमार यांची चूक काय? ते काश्मीरी पंडित होते. म्हणजेच ते हिंदू होते. त्यांना नुसतं ठार मारण्यात आलं नाही. त्यांना मुक्ती देण्याआधी इस्लामी अतिरेक्यांनी त्यांच्या वेदनांचा आनंद घेत त्यांचा होईल तितका अपमान करायची एकही संधी सोडली नाही. कारण त्यांना नुसतीच हत्या करुन पळून जाण्यात स्वारस्य नव्हतं, तर त्यांना अशोक कुमार काजींच्या वेदनांनी तळमळणार्‍या हाका काश्मीर खोर्‍यातल्या सगळ्या हिंदूंना ऐकवत दहशत निर्माण करायची होती. त्यांना हिंदूंना तुम्ही आता पळून गेला नाहीत तर तुमची ही हीच अवस्था होईल हा ठाम संदेश द्यायचा होता. आणि त्यात ते यशस्वी ठरले. पोलीस येऊन चौकशी करुन पंचनामा होईपर्यंत श्री अशोक कुमार यांचा मृतदेह तिथेच रक्ताळलेल्या बर्फात अनेक तास पडून होता. काश्मीरच्या तथाकथित आझादीच्या जिहादमधे आणखी एक हिंदू बळी गेला होता. काश्मीरमधल्या इस्लामी दहशतवादाचा एक बळी. श्री अशोक कुमार काजी. आता मला सांगा, यांच्यापेक्षा जनावरं कित्येक पटींनी बरी, नाही का? कारण मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत. पुढची गोष्ट लवकरच. -------------------------------------------------------- © मंदार दिलीप जोशी आषाढ शु. १०, शके १९३८ १४ जुलै इसवी सन २०१६ --------------------------------------------------------

Wednesday, July 13, 2016

पंडित नामा - १: गिरीजाकुमारी टिक्कू

त्यांच्यावर अन्यन्वित अत्याचार झाले. घरंदारं उध्वस्त करण्यात आली. तुम्ही इथून निघून जा, आणि तुमच्या मुली इथे सोडून जा अशा घोषणा ऐकून घ्याव्या लागल्या. दिलेल्या धमक्या खर्‍या करुन दाखवत त्यांच्या आयाबहिणींवर, मुलींवर, आणि बायकांवर निघृण बलात्कार करुन त्यांची त्याहून क्रूरतेने हत्या करण्यात आली. जे स्त्री-पुरुष गोळीने मेले, ते सुटले म्हणायचे अशा भयानक पद्धतीने क्लेष देत देत त्यांना अत्यंत वेदनादायी पद्धतीने हळू हळू मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलं. सीमेपलिकडच्या ओळखदेख नसलेल्यांनी तर घात केलाच पण वर्षानुवर्ष ओळख असलेल्यांनीही पाठीत खंजीर खुपसला. साडेतीन लाखाहून अधिक लोक देशोधडीला लागले......अहं...शब्द चुकला. आपल्याच देशात माणूस देशोधडीला कसा लागेल? पण तसंच काहीसं झालं खरं. उत्पन्नाचे स्त्रोत, जगण्याचे साधन, आणि साधनच काय जगण्याची परवानगीही त्यांना नाकारली गेली. आपल्याच देशात परक्यासारखं ट्रॅन्झीट कॅम्प मधे राहणं, अन्न-पाणी-निवार्‍याच्या शोधात भटकणं नशीबात आलं. आत्तापर्यंत ओळखलंच असेल तुम्ही मी कोणाबद्दल बोलतोय. हो, आपलेच काश्मीरी पंडित. त्यांच्याच काही सत्यकथा सांगणार आहे. पण आधीच सांगतो. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. गोष्ट पहिली: गिरीजाकुमारी टिक्कू. जन्मः १५ फेब्रुवारी १९६९ | हत्या: ११ जून १९९० या महिलेबद्दल मी प्रथम फेसबुकवर वाचलं होतं. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांबाबत पूर्ण कल्पना असली, तरी फेसबुक आणि व्हॉट्सॅपवरुन आलेल्या ढकलसंदेशात बर्‍यापैकी मसाला मिसळलेला असतो याची कल्पना असल्याने यात वर्णन केलेल्या तपशीलांवर कितपत विश्वास ठेवावा याबद्दल मी जरा साशंकच होतो. पण ती पोस्ट एका मैत्रिणीला दाखवल्यावर तिने त्याची सत्यता पटवली. कारण तिच्याच कंपनीत गिरीजाचा भाचा की पुतण्या काम करत होता आणि त्याने या कथेची सत्यता प्रमाणित केली. एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचा अंत होता होता काश्मीरात नुकताच हिंसाचार सुरु झाला होता. त्रेहगामच्या एका मुलींच्या शाळेतल्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणार्‍या गिरीजाला कुणीतरी निरोप दिला की काश्मीर खोरे कायमचे सोडण्याआधी निदान तुझा पगार तरी घेऊन जा. ती शाळेत गेली, पगार घेतला, आणि मग तिच्या एका मुस्लिम सहकार्‍याच्या घरी काही कामानिमित गेली. तिच्या शाळेत जाण्यापासून ते मुस्लीम सहकार्‍याच्या घरी जाईपर्यंतच्या प्रत्येक हालचालीवर अतिरेक्यांकडून नजर ठेवली जात होती. त्या सहकार्‍याच्या घरी ती जाताच अतिरेकी त्या घरात घुसले आणि तिला घेऊन जाऊ लागले. यावर तिच्या मुस्लीम सहकार्‍यानेही काहीच आक्षेप घेतला नाही. जणू काही अंगणात घुसलेल्या एखाद्या वांड जनावराला त्याचा मालक येऊन घेऊन जातो आहे आणि ब्याद टळली असाच त्याचा आविर्भाव होता. इतरही कुणीच आक्षेप घेतला नाही. कारण ती हिंदू होती. काफीर होती. तिच्या शरीरावर त्यांची मालकी असणं इस्लाममधे धर्ममान्य होतं. ती त्यांची "मालमत्ता" होती. मग तिला विवस्त्र करण्यात आलं. तिच्यावर त्या अतिरेक्यांनी सामूहिक बलात्कार केला. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक दिवस. आणि मग जिवंतपणीच त्या धर्मांध इस्लामी अतिरेक्यांनी तिच्या शरीराचे लाकडे कापण्याच्या करवतीने दोन तुकडे करुन मग तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. तुम्हा आम्हाला तिला झालेल्या वेदनांची स्वप्नातही कल्पना करता येणं निव्वळ अशक्य आहे. साधं भाजी चिरताना बोट कापलं तरी आपण वेदनांनी किती कळवळतो ते आठवा. आणि मग कल्पना करा. आधी सामूहिक बलात्कार झाला आहे त्या स्त्रीवर. आणि मग लाकडे कापण्याच्या करवतीने शरीराचे दोन तुकडे. आपण एक वाकप्रचार वापरतो. एखादी फार वाईट घटना घडली की आपण म्हणतो, "शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये". इथे ती ज्यांच्या बरोबर वर्षानुवर्ष राहत होती, ज्यांना मित्र समजत होती त्यांनीच शत्रू बनून तिच्यावर हे नृशंस अत्याचार केले होते. तिचा बळी घेतला होता. का? कारण ती काश्मीरी पंडीत होती. हिंदू होती. त्यांना म्हणे आझादी हवी होती. आझादीसाठी हिंसेचं समर्थन करायचंच झालं, तर हे असे अत्याचार कुठल्या मापदंडात बसवायचे? भारतालाही आझादी काही निव्वळ बिना खडग बिना ढाल मिळालेली नाही. आपल्याकडेही क्रांतीकारकांची उज्ज्वल परंपरा आहे. पण असे अत्याचार तर सोडाच, त्यांनी कारणाशिवाय स्वकीयांवर तर सोडाच पण परकीय असलेल्या निर्दोष ब्रिटीशांवरही हेतूपुरस्सर हातही उचलल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही. मग जे आपल्याच सोबत राहतात, आपले शेजारी-सहकारी आहेत, काश्मीरच ज्यांची मातृभूमी आहे, त्यांच्या अब्रूवर, जीवावर अशा प्रकारे राक्षसांनाही लाजवेल अशा पद्धतीने घाला घालण्याची ही कृत्ये कुठल्या क्रांतीकार्यात मोडतात? इस्लामी दहशतवादाने काश्मीरात अशा प्रकारे अनेक बळी घेतले. या महिलेच्या जवळच्या नातेवाईकाचा योगायोगाने शोध लागला म्हणून ही गोष्ट पहिली लिहायला घेतली. तुम्हाला कंटाळा आला का? की अंगावर काटा आला? काही असो, आपल्याला हे सारं माहीत हवं. कारण हाताला लागल्यावर डोळ्यांतून पाणी येतं, तसं आपल्याच देशातील एका राज्यात आपल्याच बांधवांवर झालेले अन्यन्वित अत्याचार आपल्या अंतःकरणाला भिडायला हवेत. कारण एखाद्या अवयवाला झालेला कर्करोग जसा पूर्ण शरीरात पसरतो, तसा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शेवटी लांब कुठेतरी काश्मीरात सुरु झालेला दहशतवाद आता तुमच्या आमच्या दाराशी येऊन ठेपला आहे. आता अतिरेकी फक्त सीमेपलिकडून काश्मीरात येत नाहीत. ते बोटीतूनही येतात. त्यांना आपल्यातच राहणारे अस्तनीतले हिरवे निखारे मदत करतात.आणि या अत्याचारांची लांबूनही झळ न लागलेले काही हिरवट पत्रमहर्षी अतिरेक्यांशी चर्चा करा असा फुकटचा सल्ला देतात. काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडताना त्यांनी सर्वस्व गमावलं असेल, पण स्वाभिमान सोबत होता. त्या जोरावर ते उभे राहीले. नोकरी केली. धंदा केला. देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून नाव कमावलं. पण आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या नावाखाली एकाही काश्मीरी पंडीताने, कुणाचीही हत्या करण्यासाठी बंदूक नाही उचलली. बंदूक सोडा हो रागाच्या भरात साधा दगड नाही उचलला भिरकवायला कुणाच्या अंगावर. त्यामुळे दहशतवादाला धर्म नसतो वगैरे भूलथापा माझ्यासमोर तरी नका ठोकू. हा सरळसरळ एका वंशाचा विच्छेद करण्यासाठी पेटून उठलेला इस्लामी दहशतवाद होता. आणि आहे. नावं वेगवेगळी असतील. पण आहे. आपल्याला हे सारं माहीत हवं. काश्मीरसाठी मोजलेली किंमत समजली की मग, "देऊन टाका एकदाचा तो काश्मीर" अशी मुक्ताफळं कुणी उधळणार नाही. कदाचित. पुढची गोष्ट उद्या. अहं... इतकी भयानक नसेल कदाचित.............कदाचित असेलही. बघा बुवा. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. -------------------------------------------------------- © मंदार दिलीप जोशी आषाढ शु. ९, शके १९३८ १३ जुलै इसवी सन २०१६ --------------------------------------------------------