Sunday, August 4, 2013

मैत्री




वाटलं होतं खूप उशीर झालाय
नवे सवंगडी मिळवायला
उतू चाललेलं मनातलं
कुणालातरी सांगायला

बराच आनंद
बरंच दु:ख
आणि साचून राहीलेलं
बोचरं सुख
कधी वाटलेला मोकळेपणा
तर कधी लागलेली रुखरुख
वाटलं होतं खूप उशीर झालाय
हे सगळं बोलायला
उतू चाललेलं मनातलं
कुणालातरी सांगायला

काही अनुभव
काही भावना
काही अतीव सुखाचे क्षण
काही तीव्र वेदना
कधी जाणवलेला एकटेपणा
तर कधी हवासा वाटणारा एकांत
वाटलं होतं खूप उशीर झालाय
हे सगळं बोलायला
उतू चाललेलं मनातलं
कुणालातरी सांगायला

उत्तर शोधता शोधता
एकदा सहज उमगलं
मैत्रीच्या नात्याचं
गुपीत मग समजलं
उशीर कसला हो
आणि लवकर ते काय
आयुष्यरूपी दुधावरची
मैत्री म्हणजे साय

वेळ लागत नाही
ऋणानुबंध जुळायला
सभोवतालच्या गर्दीतून
'आपली' माणसं हुडकायला
योग मात्र यावा लागतो
त्यांना शोधू लागायला
आपल्याच नशीबाचं दान
नियतीकडून मागायला





Thursday, June 6, 2013

हे आणि ते - १: पाहुणचार

एकदा माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो. "ए श्रीsssssss ये ना रे" भयानक हेल काढत तीच ती जान्हवी तिटकारा यावा इतक्या लाडीकपणे एक एक शब्द उच्चारून श्रीला आधी वात आणि मग झोप दोन्ही आणत होती असा ज्वलंत विषय कम् दृष्य सुरू असताना मी तोंड उघडण्याचं धारिष्ट्य केलं आणि मी विचारलेला प्रत्येक प्रश्नावर आणि दिलेल्या प्रत्येक उत्तरावर "आँ?! क्कॉय? हां हां, हो का? क्कॉय? हां बोल आता" अशा प्रतिक्रिया उपस्थित काकु-आत्या इत्यादी मंडळींकडून मिळत गेल्या. आजीला कमी ऐकू येतं त्यामुळे मला तिच्याशी जोराने बोलावं लागत होतं आणि रोज अशा पद्धतीने बोलण्याची सवय नसल्याने तोच वरच्या पट्टीतला आवाज इतरांशी बोलताना लागत होता. मला इथे आमंत्रण नव्हतं मान्य, पण मी आल्यावर लक्ष देऊन चार शब्द नीट बोलले गेले असते तर मी काय त्या हेलकाढू जान्हवी आणि बावळट शिरोमणी श्रीच्या प्रेमालापात विघ्न आणून त्यांच्या सिरिअलचा बट्ट्याबोळ करणार होतो का? असो. तर, टीव्हीवर चाललेली बोंबाबोंब, लग्नघरातली गडबड, माझा मोठा आवाज या अभूतपूर्व गोंधळात आजीची सदिच्छा भेट मी कशीबशी उरकली आणि पुढ्यातला चिवडा लाडू पोटात ढकलून, तिथून अक्षरश: पळ काढला.

तिथून बाहेर पडलो आणि गेल्याच वर्षी आलेला एक अतिशय छान अनुभव आठवला. माझ्या एका कलीग-कम्-मैत्रिणीकडे सहकुटुंब जेवायला आमंत्रण होतं. शनिवारी संध्याकाळी साडेसातला जायचं असं ठरलं होतं पण मुलांना तयार करण्याच्या गडबडीत पोहोचायला आठ वाजलेच. आम्ही पोहोचलो तेव्हा ती आणि तिचा नवरा, दोघांनीही "या..." म्हणून सुहास्य वदनाने स्वागत केले. औपचारिक हसू लगेच ओळखू येतं मला, हे मात्र तसं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. ते "या" बोलले नसते तरी निव्वळ ते स्मितहास्य पाहूनच ते अगदी मनापासून केलेलं स्वागत आहे हे मला जाणवलं असतंच. सुरवातीच्या गप्पा झाल्यावर पावभाजी हा मेनू असल्याचं समजलं. "अगदी last moment ठरलं पाव भाजीचं" मैत्रीण म्हणाली. आमच्या 'कुटुंबाला' पावभाजी अत्यंत प्रिय असल्याने तिच्या चेहर्‍यावर विशेष आनंद पसरला. मलाही उगाच भारंभार पदार्थ नसल्याने बरं वाटलं. बरेच पदार्थ असणं चुकीचं नाही, पण मग एकाचीही धड मजा घेता येत नाही. तेव्हा पावभाजी जिंदाबाद करत गप्पा मारत मारत सगळ्यांनी सही झालेल्या पावभाजीवर ताव मारला. मग दोघांनी आम्हाला सगळं घर दाखवलं. काही वेळाने पुलंच्या म्हैस कथेतल्या वर्णनाप्रमाणे दोन ट्रकवाले, दोन एसटीवाले, आणि दोन मुंग्या या समोरासमोर भेटल्या की काहीतरी टिकटिक टिकटिक टिकटिक टिकटिक झालंच पाहीजे या न्यायाने दोघा बायकांचं स्वयंपाकघरात काहीतरी गुफ्तगू झालं. मग पुन्हा गप्पा झाल्या आणि आल्यापासून साधारण दोनेक तासांनी आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी मी दोघांनाही पावभाजी आणि पाहुणचार आवडल्याचा एसएमएस केला तेव्हा दोघांनीही उत्तर पाठवताना भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.

त्या शनिवारी रात्री उशीरा झोप आणि रविवारी लवकर उठल्याने झोप अनावर होऊन मी रविवारी दुपारी बराच वेळ झोपलो. त्यामुळे रात्री जागरण झालं. मला सकाळी लवकर उठून चालायला जायचं असल्यामुळे ती झोप सोमवारी सकाळीही पूर्ण झाली नाही. मंगळवारच्या झोपेवरही याचा परिणाम झाला आणि माझं काम हळु हळु होऊ लागलं. लक्ष केंद्रित करण्यावर झालेल्या परिणामामुळे मी लक्षपूर्वक काम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करु लागलो आणि त्या भानगडीत इतरांशी बोलणं कमी झालं. या मौनामुळे त्या मैत्रिणीचा गैरसमज झाला आणि तिने मला विचारलं की "का रे बाबा शनिवारी तू आमच्याकडे येऊन गेल्यानंतर काही घडलं का? I am finding you a little aloof. आमच्याकडून काही चूक झाली आहे का?" खरं तर तसं काहीही नव्हतं. पण तिने हा विचार केला याचंच मला खूप कौतुक वाटलं. झोपेच्या खोबर्‍याची कथा सांगून तिचा गैरसमज मी लवकरच दूर केला, पण भेटीनंतर काहीही कारणाने का असेना 'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. या निमित्ताने आधी लक्षात न आलेली आणखी एक आणि महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची छान पद्धत. त्या दिवशी आम्हाला झालेल्या उशीरामुळे आमची वाट बघत असताना वेळ घालवायला त्यांनी कदाचित टीव्ही सुरू केलेला असावा. आम्ही घरात पाऊलही ठेवण्याच्या आत तो बंद झालेला होता. मला आत्ता आठवलं की यजमानांना रिमोट खाली ठेवताना मी बघितलं होतं बहुतेक. आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, मोबाईलशी चाळा नाही की मोबाईल वाजणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही - दोघांनीही संपूर्ण लक्ष आमच्यावरच केंद्रित केलेलं होतं आणि हे सगळं सहज होत होतं - दोघांच्याही वागण्यात कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. आम्ही काही सारखे कुणाकडे जातो असं नाही. पण बर्‍याच काळानंतर आम्हाला पाहुणे म्हणून गेल्यावर इतका छान अनुभव आला. शिवाय संपूर्ण वेळ आमच्याकडेच लक्ष दिल्याने अगदी राजेशाही पाहुणचार झाल्यासारखं वाटलं. समोरच्याच्या मनाचा आणि आनंदाचा इतका बारकाईने विचार करणार्‍या या साध्या स्वभावाच्या दांपत्याने केलेल्या आदरातिथ्य आणि त्याबद्दल केलेल्या पाठपुराव्याचं खूप कौतुक वाटलं.

'
अतिथी देवो भवया वचनाचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता हे निश्चित. दुसर्‍या दिवशी पूजा करताना हात जोडल्यावर बाप्पाने त्यांना कायम सुखात ठेवावं अशी इच्छा आपोआप व्यक्त केली गेली, आणि तेव्हापासून त्या दोघांचा समावेश माझ्या रोजच्या प्रार्थनेत होतो आहे.




Friday, May 10, 2013

हिंदी चित्रपटांचा 'जॉय'



अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने एप्रिल-जून २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

जुन्या हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी २०११ हे साल दु:खद आठवणी ठेऊन गेलं. आधी शम्मी कपूर आणि मग देव आनंद यांना आपल्यातून हिरावून नेत त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का दिला. २०१२ तरी चांगलं जाईल असं वाटत असतानाच ९ मार्चला जॉय मुखर्जीवर काळाची झडप पडली आणि एका वेगळ्याच युगाचा अस्त जवळ येत चालल्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

नाही, ते युग म्हणजे अभिनयाचं युग नव्हे. कारण जॉय त्याच्या अभिनयासाठी  कधीच नावाजला गेला नव्हता. किंबहुना आपली अभिनयाची मर्यादित कुवत त्याने सुरवातीलाच जोखली असावी. कारण गोरागोमटा पण भावशून्य चेहरा घेऊन अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याच्या फंदात पडताना तो कधीही दिसला नाही. इंग्रजीत एक म्हण आहे If I cannot overwhelm with my quality, I will overwhelm with my quantity. मुद्राभिनय हा आपला प्रांत नव्हे, ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या जॉयने मग त्याला जे जमत असे त्यावरच जास्तीत जास्त भर दिला. चित्रपटातल्या नायिकेच्या मागे गाणी गात फिरत असतानाच चेहर्‍यावर कमालीचा भोळेपणा व गोडवा लेऊन वावरणं हे जॉय मुखर्जी नामक उत्साहाच्या मूर्तीला जसं आणि जितकं जमलं तसं क्वचितच कुणाला जमलं असेल (प्रगतीपुस्तकात फारशी उठावदार कामगिरी कधीच करता न आल्याने त्यावर सही घेण्यासाठी तीर्थरूपांसमोर चेहर्‍यावर जबरदस्त भोळेपणा आणि बिच्चारा असण्याचे भाव घेऊन जायचो ते आठवलं. याला अभिनय म्हणतात महाराजा! पण जॉय मुखर्जी आणि माझ्या प्रगतीपुस्तकाचा काय संबंध? हो की नाही?).

त्याच्या वडीलांनी घरातच त्याला आखाडा तयार करुन एक मल्ल त्याच्या प्रशिक्षणासाठी नेमलेला आणि त्याला व्यायामाचा एक ठराविक आराखडा आखून त्यावर अंमल करायची जबाबदारी सोपवलेली. मग काय! मुळातच देखण्या असलेल्या जॉयचा बांधा नियमित व्यायामामुळे अतिशय रेखीव आणि सुद्धृढ व्हावा यात काही आश्चर्य नव्हतं. रोशोगुल्ला छाप अती गोड दिसणं हे व्यक्तिमत्वाचं एक व्यवच्छेदक लक्षण असलेल्या समस्त बंगाली नटांत धिप्पाड आणि पिळदार शरीरयष्टीच्या जॉयचं वेगळेपण साहजिकच उठून दिसायचं. मात्र इतकं कमावलेलं शरीर असूनही शर्ट काढून भिरकावण्याची गरज त्याला कधीही भासली नाही. त्याच दणकट शरिरयष्टीनिशी टी-शर्ट, शैलीदार टोप्या आणि तत्सम रंगेबिरंगी कपड्यात तो अतिशय देखणा दिसे.


विश्वजीत हा त्याच्याच पठडीतला, पण त्याच्या मागे कुणी गॉडफादर नव्हता. मात्र जॉयच्या मस्तकावर अनेकांचा वरदहस्त होता. आपले सख्खे कुटुंबीयच चित्रपटसृष्टीत आपले गॉडफादर असण्याचा फायदा जॉय इतका क्वचितच कुणाला मिळाला असेल. त्याचे वडील शशिधर मुखर्जी, काका सुबोध मुखर्जी, अशोक कुमार आणि किशोर कुमार हे सख्खे मामा असा जवळजवळ सगळाच कुटुंबकबिला चित्रपटसृष्टीत अगोदरच पाय रोवून उभा होता. जॉयचे वडील आणि निर्माते शशिधर मुखर्जी यांनी १९६० साली त्याच्यासाठी काढलेला 'लव्ह इन सिमला' हा तूफान यशस्वी ठरल्याने जॉय पदार्पणातच तरुण सिनेरसिकांच्या मनात आपले छोटेसे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटातून त्याच्या बरोबरीने अझरा आणि साधना या नट्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यात अझरा ही पुढे फारशी चमक दाखवू शकली नाही तर साधनाने तिच्या वैशिष्ठ्यपूर्ण 'साधना कट' म्हणून ओळखल्या गेलेल्या केशरचनेसकट तूफान लोकप्रियता मिळवली.


सिमला सारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रिकरण झालेल्या या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे अशा प्रकारच्या संगीतप्रधान हलक्याफुलक्या प्रेमकथा घेऊन काढलेल्या चित्रपटांना नाव काय ठेवायचं असा अनेकांना पडलेला प्रश्न सुटला. देशातच नव्हे तर परदेशातही एखाद्या विशिष्ठ शहरात चित्रिकरण झाल्यास आणि काही समर्पक नाव न सुचल्यास चक्क 'लव्ह इन...' किंवा तत्सम शब्द जोडून त्या शहरांचंच नाव चित्रपटाला दिलं जाण्याचा गंमतीदार पायंडा पडला. खुद्द जॉयने १९६६ साली "जापाssssssन, लव्ह इन टोकियोsssss" असा आरोळीवजा चित्कार ठोकत बरंचसं चित्रिकरण टोकयोमधे झालेल्या अशाच एका चित्रपटात नायकाची भूमिका केली. त्या चित्रपटाचं नाव वाचक सूज्ञ असल्याने सांगण्याची गरज नाही! कथानक घडत असलेल्या आणि चित्रिकरण झालेल्या शहराचं आणि देशाचं नाव एका गाण्यात गुंफण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा.

                    

एकोणीसशे पन्नासचं दशक देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार या त्रयीने प्रेक्षकांना झुलवण्यात - आणि अर्थातच बलराज सहानी आणि अशोक कुमार यांच्यासारख्यांनी त्यांना जमिनीवर ठेवण्यात यश मिळवलेलं असताना पडद्यावर धम्माल करणार्‍या जॉय मुखर्जीच्या नर्मविनोदी सादरीकरण असलेल्या रहस्यप्रधान प्रेमकथा यांनी सिनेरसिकांच्या मनाचा एका वेगळ्या प्रकारे ठाव घेतला. मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात मजा करायला जाणे ही प्रेक्षकांची मागणी त्यांनी नक्कीच पूर्ण केली. मग अशा प्रकारचे हलकेफुलके चित्रपट जॉयचा बालेकिल्लाच बनला.

स्वातंत्र्य मिळून एका तपाहून अधिक काळ लोटून गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी किशोरावस्थेत असलेल्या अनेकांना आता चित्रपट बघताना तरी ते कष्टप्रद दिवस विसरून स्वप्नमय आणि आशावादी दुनियेत शिरण्याची गरज भासू लागली होती. अशा वेळी त्यांच्या समोर सादर झाला तो १९६० सालचाच 'हम हिंदूस्तान'. या चित्रपटात सुनील दत्त, आशा पारेख, हेलन, लीला चिटणीस, प्रेम चोपडा, गजानन जहागिरदार आणि संजीव कुमार अशी भरभक्कम मंडळी असून सुद्धा सुनिल दत्तच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत असलेला जॉय मुखर्जी निश्चितच लक्षात राहतो तो त्याच्या हेलनबरोबरच्या प्रणयदृश्यांमुळे. हा चित्रपटही प्रचंड यशस्वी झाल्याने जॉयलाही त्याचा फायदा झालाच.

 


त्याकाळी जॉय मुखर्जींचे अनेक चाहते असले तरी कालांतराने ते टिकले नसावेत हा माझा गैरसमज माझ्या एका आजीनेच दूर केला. एकदा आजी आणि आजोबा दूरदर्शनवर एक मुसाफिर एक हसीना बघत होते. आजोबांना चक्क घोरताना बघून "तेव्हा थियेटरात झोपले होते, आता काय घरातल्या घरात बघतोय....दिली ताणून! किती गोड दिसतो ना रे जॉय?" अर्थातच साधना असलेली दृश्य आली की आजोबांची झोप तात्पुरती उडत असे आणि "गाणं लागलंय ना, म्हणून जाग आली" अशी लंगडी सबब ते पुढे करत. आजोबा-आजींचा हा प्रेमळ संवाद ऐकल्यावर आजोबा साधनाचे उघड तर आजी जॉय मुखर्जीची छुपी फॅन असल्याचा शोध मला लागला. छुपी अशासाठी की जॉयबद्दल बोलताना बिचकत बिचकत ती "शम्मीएवढा नाही, पण तरी छान नाचतो....नाही?" असं शेपूट हळुच जोडत असे.


हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ मानलेल्या गेलेल्या १९५० आणि १९६०च्या दशकात केवळ सुश्राव्य संगीतामुळे अनेक चित्रपटांनी सुमार कथा आणि त्याहून सुमार अभिनय असूनदेखील तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवलं. सुदैवाने तेव्हा पायरसी इतकी फोफावलेली नसल्याने आणि घरोघरी रेडिओ आणि दूरदर्शन संच नसल्याने फक्त गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तरी सिनेरसिकांना चित्रपटगृहांचाच आश्रय घ्यावा लागे. अनावश्यकरित्या अचाट लांबी ठेवलेल्या या अत्यंत रटाळ चित्रपटाला यश मिळालं ते कर्णमधूर संगीतामुळेच. रफी आणि आशाच्या जादूई आवाजातल्या 'आप यूंही अगर हमसे मिलते रहे', 'बहोत शुकरिया, बडी मेहेरबानी', 'मुझे देखकर, आपका मुस्कुराना' अशा गाण्यांनी आणि साधना व जॉयच्या तितक्याच गोड चेहर्‍याने या चित्रपटाला लोकप्रिय केलं.

स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या रफीला एका वेगळ्या अर्थाने परकायाप्रवेशाची कला अवगत होती. कसलेल्या नटांच्या बाबतीत तर तो स्वतःचा आवाज हा त्यांचाच आवाज असल्याचा भास तर सहज निर्माण करीच, पण बंगाली चित्रपटसृष्टीचा देव आनंद म्हणून ओळखला गेलेला विश्वजीत, फारसा देखणा नसला तरी चेहर्‍यावर एक प्रकारचा सोज्ज्वळपणा असलेला भारत भूषण, तलवारकट मिशा शोभून दिसणारा गोरागोमटा प्रदीप कुमार आणि अर्थातच रोशोगुल्ला जॉय मुखर्जी नामक ठोकळे पडद्यावर निदान गाण्यांपुरते तरी जिवंत वाटण्याचं श्रेय त्यालाच जातं. या निर्विकार चेहर्‍याच्या नटांनी कॅमेर्‍यासमोर न केलेला अभिनय रफी आपल्या आवाजातून करुन गाणी अजरामर करुन सोडायचा आणि पर्यायाने चित्रपट अक्षरशः चालवायचा असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॉयच्या 'फिर वोही दिल लाया हूं' या चित्रपटातील गाणी. त्यातली इतर गाणी श्रवणीय आहेतच; पण या सगळ्यावर कळस चढवला तो 'आंचल में सजा लेना कलियाँ, जुल्फों मे सितारे भर लेना' या गाण्याने. चेहर्‍याच्या मूळच्या गोडव्याला प्रेमळ आर्जवाची जोड देऊन जॉयने हे गाणं थोडं तरी प्रेक्षणीय केलं. सोबत आशा पारेख असल्यावर प्रेक्षकांना आणखी काय हवं?  गिटार गदेसारखी खांद्यावर घेऊन 'लाखों है निगाह में, जिंदगी की राह में' गात फिरणारा जॉय ती गिटार वाजवू शकेल इतपत भास नक्की निर्माण करु शकायचा.


आपले वडील फिल्मिस्तान स्टुडीओचे संस्थापक जरी असले तरी सेटवर मात्र जॉय 'अमक्याचा मुलगा' किंवा 'मी म्हणजे कोण आहे माहीत आहे का' अशा आढ्यतेने कधीही वावरला नाही. उलट निर्माता आणि दिग्दर्शकाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचीच त्याची वृत्ती राहिली. या चित्रपटात त्याच्या बरोबर प्रथमच नायिकेची भूमिका करणारी आशा पारेख त्याची आठवण सांगताना म्हणते "जॉय बरोबर काम करणं म्हणजे काम वाटत नसे. शाळेची सहल निघाल्यासारखं खेळीमेळीचं वातावरण सेटवर असायचं. शिवाय जॉय खूप मनमेळावू आणि सगळ्यांना मदत करणारा होता. 'आँखों से जो उतरी है दिल में' हे गाणं माझ्यावर चित्रित होणार होतं. नेमकी फिल्म कमी पडणार अशी शक्यता निर्माण झाली, आणि गाण्याचं चित्रिकरण त्या दिवशी पूर्ण होणार नाही अशी आम्हा सगळ्यांनाच भीती वाटू लागली. पण जॉयने प्रचंड मदत केली आणि चित्रिकरण त्याच दिवशी पूर्ण झालं.

आशाने त्यानंतर जॉय बरोबर 'जिद्दी' आणि 'लव्ह इन टोकियो' हे तूफान लोकप्रिय चित्रपट केले; पण जॉयचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणता येईल तो 'शागीर्द' हा मात्र सायरा बानोच्या वाट्याला आला. यात आय. एस. जोहरने साकारलेला वृद्धत्वाकडे झुकत चाललेला, जगावर कावलेला, आणि 'कधीही प्रेमात पडू नकोस, कधीही लग्न करु नकोस' अशी शिकवण देणारा प्रोफेसर आणि मग तोच मदनबाणाचा शिकार झाल्यावर त्यालाच प्रेमाचे धडे देणारा जॉय मुखर्जीने साकारलेला शागीर्द या दोन व्यक्तीरेखांनी मिळून धम्माल उडवून दिली. यातलं "दुनियाsss पागल है, या फिर मैं दीवाना; मुझको चाहती है झुल्फों मे उलझाना..." या गाण्यात जॉय जे काही नाचलाय त्याला तोड नाही. आजही जी गाणी टि.व्ही.वर लागताच उठून नाचत सुटावसं वाटतं त्यात ह्या गाण्याचा नक्कीच समावेश आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम विनोदपटांमधे गणला जातो.



तरुणांनी त्याच्या फॅशनचं अनुकरण करणं आणि तरुणींनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणं हे त्याचं नशीब मात्र फार काळ टिकलं नाही. १९६८ सालच्या हमसाया पासून त्याच्या कारकिर्दीला झपाट्याने उतरती कळा लागली. मुळातच नगण्य अभिनयक्षमता असणार्‍या जॉय मुखर्जीकडे दोन गोष्टी होत्या. त्यापैकी एक नैसर्गिक तर दुसरी मिळवलेली. ती नैसर्गिक गोष्ट म्हणजे अर्थातच त्याचा गोड चेहरा आणि ती मिळवलेली गोष्ट म्हणजे नियमित व्यायामानं कमावलेलं पिळदार शरीर. हळूहळू त्याने व्यायामाकडे दुर्लक्ष करायला सुरवात केली. पत्नीची- नीलमची नजर चुकवून तो हळूच सटके आणि बाहेर जाऊन अरबटचरबट खाऊन येई. त्याचं यश आणि त्याचं व्यायामाकडे होत चालेलेलं दुर्लक्ष आणि चुकीचा आहार यांचा काही जवळचा संबंध होता असं ठामपणे म्हणता येणार नाही, पण या वाईट सवयींनी आपला प्रताप दाखवायला सुरवात नक्कीच केली. हळूहळू 'वेळ घालवायला उत्तम' या हेतूने जॉयचे चित्रपट बघायला जाणार्‍या प्रेक्षकांना आणि अर्थातच निर्माता-दिग्दर्शकांना राजेश खन्ना, जीतेंद्र आणि मग अमिताभ बच्चन अशा नटांच्या रूपाने समर्थ आणि उत्तम पर्याय मिळाल्याने जॉयची गरज भासेनाशी झाली.

कारकिर्दीला उतरती कळा हे फारच सौम्य शब्द म्हणावे लागतील, कारण हमसाया आणि त्या नंतरचा जॉय मुखर्जीचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट आपटला. ही अपयशाची माळ त्याच्या हैवान (१९७७) या शेवटच्या चित्रपटापर्यंत कायम राहिली. सूज्ञपणा म्हणा किंवा हतबलता, जॉयने काळाची पावले ओळखून अभिनयातून आपलं अंग काढून घेतलं. त्याचं शेवटचं यश हे मात्र त्याने छलिया बाबू (पुन्हा १९७७) ह्या राजेश खन्ना आणि झीनत अमान अभिनित चित्रपटाचं दिग्दर्शन करुन मिळवलं. या चित्रपटाने बर्‍यापैकी यश मिळवलं असलं तरी त्याचा कोणताही फायदा जॉयला वैयत्तिक स्वरूपात झाला नाही. जॉय मुखर्जीने मग एकोणिसशे पंचाईंशी साली आलेल्या 'ब' दर्जाच्या फूलन देवी (१९८५) या चित्रपटात खलनायकाची भूमिकाही करुन पाहिली, मात्र त्याचाही त्याच्या चित्रपटसृष्टीतल्या गमावलेल्या स्टारपदाला परत आणण्याच्या दृष्टीने काहीही फायदा झाला नाही. इतरांसारख्या त्यानं चरित्र भूमिकाही न केल्यानं जॉय जो संन्यस्त झाला तो कायमचाच. शेवटी शेवटी त्याची ओळख काजोल आणि राणी मुखर्जीचा काका अशी करुन द्यावी लागत असे.


शम्मी कपूर आणि देव आनंदच्या मृत्यूने बसलेले धक्के पचायच्या आधीच ९ मार्चला वयाच्या अवघ्या त्र्याहत्तराव्या वर्षी जॉय मुखर्जीनेही इहलोकाला राम राम ठोकल्याची बातमी आली आणि त्याच्या जाण्याने जे जे चांगलं, जुनं आणि कदाचित म्हणूनच असलेलं सोनं यांचं युग संपत चालल्याची जाणीव अधिकच ठळक झाली. त्या काळच्या किंचित नटांची जितकी टिंगल-टवाळी प्रेक्षक करीत त्याच्या एक सहस्त्रांश टीका आजच्या सुनील शेट्टी, अक्षय कुमार, जॉन अब्राहम वगैरे प्रभूतींना सहन करावी लागली असेल असं वाटत नाही. अनेकांची तर "मला विश्वजीत, जॉय मुखर्जी आणि बबिता हे वेगवेगळे ओळखू यायचेच नाहीत" असं म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यावेळच्या अनेक उत्कृष्ठ नटांना प्रचंड प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणा किंवा प्रथितयश अभिनेत्यांना प्रत्येक चित्रपटात घेणं अनेक निर्मात्यांना परवडण्यासारखं नव्हतं म्हणा, ती पोकळी भरून काढली ती मात्र विश्वजीत, भारत भूषण, प्रदीपकुमार, जॉय मुखर्जी यांच्यासारख्या त्यावेळच्या माठ, ठोकळा आणि पुतळा अशा विशेषणांनी हिणवल्या गेलेल्या नटांनीच. या सगळ्यात जॉय मुखर्जी इतकी छाप कुणीच पाडली नसेल. जॉय इतका उत्साह, प्रचंड प्रमाणात असलेली आणि ओसंडून वाहणारी ऊर्जा त्याने अनेक गाण्यांत घातलेल्या धागडधिंग्याच्या रूपात अजरामर राहील. नायिकेसमोर आर्जवं करताना चेहर्‍यावर आणलेला भोळेपणाचा आव हा आव न वाटता खराच वाटावा इतपत अभिनय त्याला नक्की जमला. शम्मी कपूर खालोखाल जॉय मुखर्जीच्या कपड्यांचं, नाचण्याचं अनुकरण त्याकाळी केलं जाई एवढं सांगणं जे जॉयच्या त्याकाळी तरुणांच्या मनातलं स्थान काय होतं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.

आजोबा त्यांच्या पांढर्‍या विजारीवर पांढरे बूट आजीला आवडतं म्हणून घालायचे म्हणे. आणखी काय सांगू?


-----------------------------------------------------------------------------------

जॉय मुखर्जीचे चित्रपटः
  • लव्ह इन सिमला, हम हिंदूस्तानी  - १९६०
  • ऊम्मीद, एक मुसाफिर एक हसीना - १९६२
  • फिर वोही दिल लाया हूं  - १९६३
  • जिद्दी, जी चाहता है, इशारा, दूर की आवाज, आओ प्यार करें  - १९६४
  • बहू बेटी - १९६५
  • साज़ और आवाज, ये जिंदगी कितनी हसीन है, लव्ह इन टोकियो - १९६६
  • शागीर्द - १९६७
  • हमसाया, एक कली मुस्कायी, दिल और मुहब्बत - १९६८
  • दुपट्टा - १९६९
  • पुरस्कार, मुजरिम, इन्स्पेक्टर, एहसान, आग और दाग  - १९७०
  • कहीं आर कहीं पार - १९७१
  • एक बार मुस्कुरा दो - १९७२
  • हैवान - १९७७
-----------------------------------------------------------------------------------

Wednesday, May 1, 2013

दुधावरची साय


दुधावरची साय
जणू तुझं असणं
त्याचाच भाग असून
वेगळं उठून दिसणं

(फेसबुकवर चहावर केलेली एक छोटी कविता वाचून सुचलेलं काहीतरी)

Wednesday, January 9, 2013

सर्व स्वाभिमानी आणि देशभक्त भारतीय नागरिकांसाठी प्रतिज्ञा



मी भारताचा नागरिक आणि जगभरातील शांतताप्रिय जनतेचा एक भाग म्हणून अशी प्रतिज्ञा करतो की सरकारपातळीवर काहीही निर्णय झाला तरीही पाकिस्तान या देशाशी संबंधित असलेल्या कुठल्याही खेळाचे सामन्यांचे तिकीटे काढून प्रत्यक्ष दर्शन तर सोडाच, पण प्रक्षेपण आणि संबंधित कार्यक्रम—मग ते भारतीय संघाशी खेळत असले तरी—दूरदर्शन संचावर बघणार नाही, आकाशवाणीवर ऐकणार नाही आणि आंतरजालावर त्यासंबंधी कुठल्याही बातम्या वाचणार नाही किंवा धावसंख्या/गोलसंख्या वगैरे कुणालाही विचारणार नाही.

तसेच पाकिस्तान या देशाचे नागरिक सहभागी होत असलेला कुठलाही चित्रपट, मालिका, संगीताधारित कार्यक्रम बघणार नाही किंवा त्यासंबंधित कुठलीही बातमी वाचणार नाही.

पाकिस्तानी नागरिकांशी जगभरात कुठेही संबंध ठेवणार नाही. कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला—मग तो रुग्ण म्हणून समोर आला तरीही—कुठल्याही प्रकारची सेवा पुरवणार नाही.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानी शिक्षक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक, वैद्यक वगैरे—म्हणजेच पाकिस्तानचा कुठलाही नागरिक—सहभागी होत असलेल्या कुठल्याही समारंभात/कार्यक्रमात/सभेत सहभागी होणार नाही.

Sunday, October 28, 2012

पुणे बस डे ला पाठिंबा...नाही!



देव आनंदला एकदा एक जेष्ठ पत्रकार महाशयांनी विचारलं, "तू तुझे सिनेमे गोल्डीला दिग्दर्शित करायला का नाही सांगत. त्यावर देव म्हणाला होता "अगर गोल्डी डायरेक्ट करेगा तो मैं क्या करुंगा?" हे म्हणजे हरभजनसिंगने "अगर सचिन बॅटिंग करेगा तो मैं क्या करुंगा" अस म्हणण्यासारखं होतं. अगदी सकाळ वृत्तसमूहासारखं आहे नै का? मला वाटतं भल्या सकाळी सकाळपैकी कुणाच्या तरी डोक्यात अचानक कल्पनांची सकाळ होऊन "पी.एम.टी. बस चालवत असेल तर मग सकाळ काय करणार?" असा दिव्य विचार आला असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी अनेकांना वेठीला......सॉरी हां....तर त्यांनी व्यवसायिक, कारखानदार, राजकारणी अशा अनेकांना मदतीला घेऊन एक नोव्हेंबरला पुणे बस दिन साजरा करण्याचं ठरवलं. त्या  दिवशी नागरिकांनी फक्त बसनेच प्रवास करायचा असं ठरलं.

मला एकदम भडभडून आलं. पण म्हटलं त्या दिवशी बसने जाता आलं नाही तर? तर मग टिव्हीवर या दिवसाच्या यशाच्या बातम्या बघून भागवायचं? छे छे!! म्हणूनच आज कात्रज ते कोथरुड डेपो प्रवास करण्याची संधी आली तेव्हा अचानक मला बस प्रेमाचा उमाळा आला. कात्रज बस स्टँडवर उभी असलेली सुंदर खाशी नसली तरी सुबक लांबुडकी बस कपाळावर 'कोथरुड डेपो'चं कुंकू लाऊन उभी असलेली दिसली आणि विराट कोहलीला फुलटॉस दिसल्यावर होत नसेल इतका आनंद मला झाला आणि मी त्यात जाऊन बसलो. आता बस क्रमांक आठवत नाही. पण वांदो नथी. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात. तुम्हाला हवं तिथे नेऊन हापटलं की झालं बघा. चौदा रुपये सुट्टे नसल्याने पन्नास रुपये कंडक्टरला देऊन आणि तीस रुपये घेऊन बाकीचे सहा रुपये कधी येतात याकडे अर्ध लक्ष ठेऊन प्रवास सुरू केला. आणि लवकरच बस प्रवासाच्या आनंदावर विरजण पडायला सुरवात झाली. सुरवातीला दमदार स्टार्ट घेऊन रोरावत स्टँडबाहेर पडलेली बस मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच करत मार्गाक्रमण करु लागली. बस अचानक बंद पडत असे, ती चालक पुन्हा पुन्हा सुरू करत असे. खोक् खोक् खोकून आणि प्रेक्षकांच्या तोंडावर ड्वायलाग मारुन मारुन भरपूर पिडून मगच खपणार्‍या टीबीसम्राज्ञी लीला चिटणीस, सुलोचना, निरुपा रॉय, अचला सचदेव इत्यादी सिनेआयांप्रमाणे अ ते ज्ञ यांपैकी एकाही अक्षराने लिहून द दाखवता येणारे असंख्य आवाज करुन ही बस शेवटी सणस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या परिसरात कुठेतरी बंद पडली.

कंडक्टरने खाली उतरून प्रवाशांना हाकत हाकत दुसर्‍या बशीत भरण्यास सुरवात केली. "ओ, सहा रुपये" असं म्हटल्यावर त्याने दारावर पूरग्रस्तांसाठी वर्गणी मागितल्यावर अतिशय दयार्द्र नजरेने पण तितक्याच अलिप्तपणे डब्यात लोकं पैसे टाकतात तसे माझ्या खिशात सहा रुपये टाकले. आणि लगोलग मला एका बशीत भरला. ही बस ६८ क्रमांकाची बरं का. आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक MH12 AQ 3414. या बसचा भोंगा उर्फ हॉर्न सोडला तर सगळे भाग वाजत होते. काही वेळाने माझ्या शरीरातल्या २०६ हाडांपैकी सगळीच्या सगळी वाजायला लागून तो आवाज या आवाजात मिसळतोय की काय आसा भास होऊ लागला. शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटल्याने कुठे लागू नये ही कसरतही सुरू होतीच. दुसर्‍या दिवशी "बाबांना टुच केलं बाबा लल्ले नाई" हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून मनातल्या मनात रामरक्षा म्हणत शेवटी एकदाचा कोथरुड डेपोचा थांबा आला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो पुन्हा चुकून सुद्धा बस मधे न पाऊल ठेवण्याचा निश्चय करुनच.

बस डे. माफ करा. मी नाही प्रवास करणार त्या दिवशी. तुम्हाला रोज बस नीट चालवता येत नसतील तर वर्षातला एक दिवस बसने प्रवास करुन काय साध्य होणार. निव्वळ बस उत्तमरित्या चालवल्या तर अनेक मार्गांवर बस चालवून कोट्यावधीचा महसूल मिळण्याची शक्यता असताना अशी सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीला उपाशी ठवण्याचं पातक राजकारण्यांकडून घडतं. आणि मग उठल्याबसल्या टगेगिरी करणारे आणि कार्यकर्त्यांवर मायेचे सिंचन करणारे मंत्री असोत की 'पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुधारू' असं निवडणूक जाहीरनाम्यात लिहून नंतर राष्ट्रकुलाला लुटण्यात व्यग्र होऊन त्या आश्वासनाची सुरळी करणारे खेळप्रिय मंत्री असोत कुणालाच काहीच करावसं वाटत नाही. तासंतास बस येत नाही, आली तर लहान मुलांना खेळायलाही उपयोगी पडणार नाही अशा रितीने खुळखुळा झालेल्या अवस्थेतला बसवजा पत्र्याचा डबा येतो. चालकाने गिअर बदलला तर गिअरस्टिक सकट मागच्या सहा आसने खडखड्खड्खड करत हादरतात. थांब्यावर बस थांबत नाही. काय काय लिहू? मला नाही हो आवडत गाडी चालवत बाईक उडवत रोज जायला. पण काय काय सहन करायचं रोज?

म्हणून टीकेचा धनी व्हायचा धोका पत्करुन म्हणतो. पुणे बस डे ला माझा पाठिंबा नाही. कदापि नाही. पुणे बस डे गेला खड्ड्यात!!

--------------------------------------------------------------------------------------
हीच ती वाजणारी बस:



या चित्रफितीत येणारे गाड्यांच्या हॉर्नचे वगळता सगळे खड्खड्खड्खड् आवाज हे बसच्या भागांचे आहेत.

--------------------------------------------------------------------------------------