Thursday, May 19, 2011

संस्कृत भाषेचे अनोख्या पद्धतीने संवर्धन: हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर

नुकत्याच झालेल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत.



आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक. या व्हिडिओत तेजाब सिनेमातल्या "एक, दो, तीन...." गाण्याचं आणि वक्त चित्रपटातलं "ए मेरी जोहरा जबीं" या गाण्याचं रूपांतर आहे.



ह्या व्हिडिओत "लकडीकी काठी, काठी पे घोडा..." या गाण्याचं रूपांतर आहे.



Friday, May 6, 2011

व्यसन

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो." ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

लेखाच्या नावासंदर्भात वरचा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही). हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".

असेल अपवादात्मक ठिकाण, म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे अनेक मुलं शालेय गणवेशात बसलेली दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"

"अहो शेट, लय भारी गिर्‍हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं" मालक उत्तरले.

निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.

मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.


ई-व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारे तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.

माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.

हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्‍यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं जातं. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.

किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल बोललं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.


ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.

इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणारी ही सगळी शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच सायबर रिलेशनशिप अ‍ॅडिक्शन हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात. उपचारांच्या दुसर्‍या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.

सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्‍यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्‍यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्‍यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अ‍ॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.


मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.

तर मग, करताय ना आजच निश्चय?

Tuesday, May 3, 2011

आणखी एक राधिका

८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.

"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्‍याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".

सुदैवाने चार दिवसांत पोलीसांनी यशस्वी(!) तपास करुन खुन्याला अटक केली. विजय उर्फ राम सिंग हा तो खूनी. पोलीसांनी नेहमीच्या पद्धतीने चौदावं रत्न दाखवून त्याची चौकशी केली तेव्हा जे उघड झालं ते समजल्यावर मात्र हा विषय डोक्यातून जाईना.

उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील राम सिंग हा राधिकाच्या घराजवळच असणार्‍या एका शिवणकाम कारखान्यात कामाला होता. राधिकाचा पाठलाग करणे आणि तिला छेडणे हा त्याचा आवडता छंद होता. तसंही मुलींना अशा प्रकारे त्रास देणे हे प्रकार नवीन नव्हते, पण त्याचा राधिकावर विशेष "जीव" असावा. असाच एकदा राधिकाचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच राधिकाने धावत रस्त्यातच उभ्या असलेल्या काही लोकांना गाठले आणि "तो माणूस मला छेडतोय" अशी आरोळी ठोकली. एखादा चोर, मुलींना छेडणारा नि:शस्त्र गुंड असे कोणी तावडीत सापडले की हात साफ करायला लोक टपलेलेच असतात. अर्थातच त्या लोकांनी मग "लडकी को छेडता है" किंवा तत्सम डायलॉग मारत त्याला बेदम चोप दिला. अशा अनेक गोष्टी कानावर आल्याने राम सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आले. असेच काही दिवस गेले पण राम सिंग राधिकाचा पाठलाग करणे आणि तिने स्पष्ट नकार दिल्यावरही तिच्याकडे आपल्या एकतर्फी "प्रेमाची" कबूली देणे सोडेना.

नोकरी गेल्याने राम सिंगने मुंबई गाठली आणि तिथे रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याच्या विकृत डोक्यातून राधिकाचा विचार जाता जाईना. त्याने वारंवार दिल्लीला येऊन राधिकाच्या मागावर राहणे सोडले नाही. एकदा राधिका बस मधून उतरून पादचारी पुलावरून जात असताना पुन्हा त्याने राधिकाला गाठले आणि त्याच्याशी लग्न करण्याची गळ घातली. तिच्याही मनात त्याच्याविषयी 'प्रेमभावना' असल्याचा त्याचा समज होता. तसं बोलून दाखवल्यावर राधिकाने तिथेच त्याच्या श्रीमुखात भडकावली. आता हा आपल्याला त्रास देणार नाही अशा समजूतीत असलेल्या राधिकाला मात्र राम सिंगच्या मनात भडकलेल्या सूडाग्नीची कल्पना कशी असावी?

विजय उर्फ राम सिंगने आपला सूडाग्नी शमवण्यासाठी राधिकालाच संपवण्याचा घाट घातला. त्याने सरळ गुरगाव गाठले आणि तिथून दोन हजार रुपये देऊन एक 'कट्टा' उर्फ गावठि पिस्तूल विकत घेतले. गंमत म्हणावी की दैवदुर्विलास, आपल्या देशात डि.व्ही.डी प्लेअर आणि पिस्तुल या दोन वस्तू एकाच किंमतीत आणि सहजतेने विकत घेता येतात.

पिस्तूल घेऊन पूर्ण तयारीने तो पुन्हा दिल्लीला आला आणि एके दिवशी संधी साधून त्याने राधिकाला गाठले. पुन्हा त्याला झिडकारून राधिकाची पाठ वळताच त्याने खिशातून पिस्तुल काढले. पण लगेच न चालवता जिना सुरू होण्याच्या जराच आधी त्याने तिच्यावर झाडून जिन्यावरुन उतरुन पळ काढला. पुलावर बर्‍यापैकी वर्दळ असल्याने काही क्षण कुणाला काय झाले ते समजेना. ह्याच गोंधळाचा फायदा घेऊन राम सिंग तसाच पिस्तूल हातात घेऊन पळाला आणि दिल्लीच्या गर्दीत दिसेनासा झाला.

पोलीसांनी तिच्या घरच्यांकडे आणि महाविद्यालयातील मित्रपरिवाराकडे आधी चौकशी केली. मग इतर तपास सुरु झाला आणि राम सिंगच्या खोलीत राहणार्‍या मित्रांकडून माहिती मिळाल्यावर तपास वेगाने करुन त्याला मुंबईतून अटक केली. राम सिंगला त्याच्या कृत्याविषयी अजिबात पश्चात्ताप नव्हता "माझी बायको नाही झाली तर आता इतर कुणाचीही होणार नाही" असले विकृत समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकत होते.

मला सर्वात जास्त क्लेषकारक वाटलेली बाब म्हणजे राधिकाच्या घरच्यांच्या चौकशीत पोलीसांना जी धक्कादायक बाब समजली ती होय. असे काही प्रकार अनेक दिवस सुरू असल्याचे राधिकाने तिच्या घरच्यांना सांगितलेच नव्हते! मग त्याचं नावही ठाऊक असणं दूरच राहिलं. राम सिंगला जेव्हा अटकेनंतर तिच्या घरच्यांनी पाहिले तोपर्यंत त्यांनी त्याला त्यांच्या घराच्या आसपास बघितलेही नव्हते!! राधिकाने जरी फक्त तिच्या घरच्यांना 'एक माणूस आपला पाठलाग करत असतो आणि आपल्याला छेडत असतो" असं नुसतं सांगितलं असतं तरी पुढची कारवाई करुन पुढची अप्रिय घटना टाळता आली असती.

हे समजल्यावर मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. असे का झाले असावे? याला घरचे वातावरण कारणीभूत असावे का? शक्य आहे. कारण असले प्रकार घडल्यावर "तुझीच काहीतरी चूक असेल" अशी मुक्ताफळे उधळणारे पालक आहेतच की. मुलांना आई-वडीलांची इतकी भीती वाटावी, की छेडछाड आणि पाठलागासारख्या गंभीर बाबीही त्यांना सांगायला संकोचावे? मुलांना - आणि विशेषतः मुलींना) धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना आपल्यापासून दूर करत आहोत ह्याची जाणीव पालक म्हणून आपल्याला राहिली नाही असे झाले आहे का? मुले आणि आई-वडील/एकूणच घरातले यांच्यातला संवाद इतका हरवत चालला आहे का, की आपल्या अब्रू आणि जिवाला असलेल्या धोक्याबाबतही घरच्यांशी बोलावेसे मुलांना वाटू नये? की राधिकाला वाटलं तशी ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी वाटत नाही अनेक मुलांना? बाहेर घडणारं सगळं आपल्या आई-वडिलांना सांगणारी मुले आहेत, मान्य. पण अगदी काहीच न बोलणारी, थोडंच सांगणारी, किंवा नेमकं महत्वाचं तेच न सांगणारीही मुलं आहेतच की.

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का?

अशा अनेक राधिका या आधी झाल्या आहेत. पुढेही होतील. पण मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने — जेणेकरुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकता येतील — आपल्याला काय करता येईल?

Tuesday, March 29, 2011

चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

काही विशिष्ठ संवेदनशील विषय असलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं मी सहसा टाळतो. पण अशाच एका विषयावर बनलेल्या एका उत्तम चित्रपटाने अखेर माझी ती सवय मोडली. अमेरिकेत सर्रास आढळणार्‍या आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्‍या आपल्या भरकटलेल्या भारतीय तरुण पिढीपर्यंत ते लोण पसरण्याचा धोका असलेला तो विषय म्हणजे पौगंडावस्थेतील गर्भधारणा अर्थात टीनएज प्रेग्नंसी.

सुदैवाने हा प्रकार समाजमान्य नसल्याने आजपावेतो आपल्याकडे ह्या विषयावर चित्रपट निघालेले नाहीत. पण ज्या पद्धतीने आणि वेगाने वैयत्तिक स्वातंत्र्याचा अर्थ हा अनिर्बंध स्वैराचार असा लावण्यात येऊन नैतिक, संस्कृतिक अध:पतन होत आहे, त्याच प्रकारे हे सगळं सुरू राहिल्यास चित्रपट काढण्याइतका हा प्रकार भारतात बोकाळेलच यात संशय नाही.


जूनो (Juno) हा नितांतसुंदर चित्रपट नुकताच सोनी पिक्स वर बघितला. आधी विषय लक्षात आल्यावर दुसरी वाहिनी लावायला रिमोटकडे हात गेलाच होता, पण जे. के. सिमन्स (बर्न आफ्टर रिडींग मधला सी.आय.ए. अधिकारी) या अभिनेत्याला बघून उत्सुकता निर्माण झाली आणि चित्रपट पूर्ण बघायचा निर्णय घेतला. सुदैवाने तो योग्य ठरला.

नर्मविनोदी अंगाने जाणार्‍या या चित्रपटाची सुरवातच शोडषवर्षीय नायिका जूनो (एलन पेज) हिला आपण गरोदर असल्याचा साक्षात्कार होण्यात होते. तिचा नुकताच दुरावलेला बॉयफ्रेंड पॉली ब्लीकर (मायकल सेरा) हाच त्या होणार्‍या मुलाचा बाप असल्याचंही तिच्या लक्षात येतं. वर म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत हा प्रकार सर्रास असल्याने फारशी बावचळून न जाता जूनो घडल्या प्रकाराला 'आलिया भोगासी असावे सादर' या न्यायाने सामोरी जाण्याचं ठरवते. आपण आई व्हायला अजून तयार नसल्याची तिला सुदैवाने जाणीव असल्याने आणि तिच्या दृष्टीने होणारं मूल ही एक नसती ब्याद असल्याने जूनोच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे गर्भपात करुन या कटकटीपासून सुटका करुन घेण्याचा. पण लवकरच तो विचार जूनो बाजूला सारते आणि ह्या मुलाला जन्म देऊन एका मूल नसलेल्या जोडप्याला दत्तक देऊन सुखी करण्याचा निर्णय घेते.

आपण केलेला प्रकार आणि आपला मूल दत्तक देण्याचा निर्णय आधी आपली मैत्रिण लिया (ऑलिव्हिया थर्लबी) हिला सांगते आणि मग आपल्या आई-वडीलांच्या कानावर घालते. जूनो लियाच्या साक्षीने तिच्या वडिलांना आणि सावत्र आईला कबुली देते तो प्रसंग फारच गंमतीदार आहे. आपल्या अवघ्या सोळा वर्षाच्या पोरीने चक्क गरोदर रहाण्याचा पराक्रम केलेला आहे या धक्क्यापेक्षा चक्क "चला, मला वाटलं ही ड्रग्स वगैरे मधे अडकली की काय" असं म्हणून तिचे वडील मॅक (जे. के. सिमन्स) सुटकेचा नि:श्वास टाकतात.
आता जूनोने निर्णय घेतल्यावर तिच्या घरातले सगळेच तिला मदत करायला मनात अजिबात किंतु न ठेवता पुढे येतात. अगदी तिच्या सावत्र आई सकट. मात्र तिला आधार देत असतानाच तिने केलेल्या घोडचुकीची आणि तिच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव तिला करुन द्यायला ते विसरत नाहीत. जुनो तिच्या वडिलांबरोबर त्या मूल दत्तक घेऊ इच्छिणार्‍या जोडप्याला म्हणजेच मार्क (जेसन बेटमन) आणि व्हेनेसा (जेनिफर गार्नर) या दोघांना भेटते आणि पहिल्याच भेटीत क्लोज्ड अ‍ॅडोप्शन (closed adoption) चा प्रस्ताव मांडते. क्लोज्ड अ‍ॅडोप्शन म्हणजे बाळ एकदा दत्तक गेल्यावर त्याच्या पुढच्या प्रगतीबद्दल कुठलीही माहिती खर्‍या आईला मिळणार नाही असा करार.

यानंतर जूनोचं त्या घरी जाणं-येणं वाढतं आणि ती लवकरच व्हेनेसा आणि मार्कचा विश्वास संपादन करते. जुनो व्हेनेसाला तिच्या बाळाशी बोलायला प्रोत्साहन देऊन आपलीशी करते आणि रॉक संगीताच्या मुख्य समान आवडीमुळे मार्कचीही मैत्री संपादन करते.



बाळाचा पिता(!) असलेला पॉली ब्लीकर याच्या विषयी मनात असणार्‍या भावनांबाबत मात्र तिच्या मनात बर्‍यापैकी गोंधळ असतो. त्याने प्रॉमला दुसर्‍या मुलीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजल्यावर मात्र तोपर्यंत त्याच्याशी फटकून असणारी आणि अंतर ठेऊनच वागणारी जूनो त्याच्यावर भडकते. पॉली मात्र कमालीचा संयम बाळगत लांब रहाण्याचं तिनेच सुचवल्याचं तिला शांतपणे सांगतो आणि वर तिचा मानसिक गोंधळही अधोरेखित करतो. याची परिणिती जूनो अंतर्मुख होण्यात होते.


ब्रेनने दिलेला सल्ला न मानता जूनो मार्कला तो घरी एकटा असतानाही भेटतच रहाते आणि या भानगडीत मार्क तिच्यात कधी गुंतत जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. अशाच एका भेटी दरम्यान तो व्हेनेसाला सोडणार असल्याचं जुनोला सांगतो आणि जुनोवरचं प्रेम अप्रत्यक्षरित्या व्यक्त करतो. त्याच सुमारास तिथे आलेल्या व्हेनेसाला तो त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात बाप होणे हा एक अडथळा आहे आणि अजून पितृत्व स्वीकारायला तयार नसल्याचं सांगून दु:खी करतो.

आपलं मूल एका गरजू पण समजूतदार आणि सुखी कुटुंबाला देऊन निश्चिंत होण्याची स्वप्नं बघत असलेल्या जूनोला या प्रकाराने प्रचंड धक्का बसतो आणि ती तिथून निघून जाते. काही वेळाने मात्र परत येऊन ती फक्त व्हेनेसासाठी एक चिठ्ठी दारात ठेवते, ज्यात ती लिहीते, "व्हेनेसा, तू अजूनही (दत्तक घायला) तयार असलीस तर मी ही (मूल द्यायला) तयार आहे — जूनो" (Vanessa: If you're still in, I'm still in. — Juno).

पुढे काय होतं? मार्कपासून विभक्त झाल्यावर सिंगल मदरच्या रुपात बाळाचं संगोपन करायला सज्ज होऊन जूनोचं मूल व्हेनेसा खरंच दत्तक घेते की ती जबाबदारी शेवटी जूनोलाच उचलावी लागते? पॉली आणि जूनो पुन्हा एकत्र येतात, की जूनो बाळंत झाल्यावर ते ही विभक्त होतात? या प्रश्नांची उत्तरं इथे सांगण्यात काहीच हशील नाही. ती मिळवण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.


हा चित्रपट मला आवडण्याची कारणे अनेक आहेत. सामान्यत: पाश्चात्य भयपटात जजमेंट डे, गॉड, एंजल, सेटन, डीमन्स, टेस्टामेंट, जुडास, जीवन हे ईश्वराने दिले आहे त्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार मानवाला नाही (संदर्भ: गर्भपात, देहदंड) वैगरे अनेक ख्रिस्ती धार्मिक संदर्भ उघडपणे येतात, तर काही चित्रपटांत हेच संदेश छुप्या रीतीने दिले जातात. मला तरी ह्या चित्रपटात उघड काय किंवा छुपा काय, असले कसलेही संदर्भ जाणवले नाहीत आणि हीच बाब माझ्या दृष्टीने ह्या चित्रपटाचं एक महत्वाचं बलस्थान आहे. २००७ साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा काही छिद्रान्वेषी समीक्षकांनी जूनोने गर्भपाताचा निर्णय रद्ध करणे या एका गोष्टीमुळे हा चित्रपट चक्क छुपा धर्मिक संदेश देत असल्याचे आरोप केले होते म्हणे. मुळात या चित्रपटात नायिका जुनोच्या मनात गर्भपात करण्याचा विचार येणे आणि तो ती ज्या कारणामुळे टाळते ते कारण लक्षात घेता ही टीका अनाठायी असल्याचं सहज लक्षात येतं.

त्यातलं मुख्य म्हणजे असा संवेदनशील विषय उत्तमरित्या आणि अत्यंत नि:पक्षपातीपणे हाताळण्यात निर्माता जॉन माल्कोविच आणि दिग्दर्शक जेसन राईट्मन आणि त्यातले अतिशय गुणी कलाकार यशस्वी झाले आहेत. यात लेखिका डायाब्लो कोडी हिच्या सशक्त पटकथेचा सिंहाचा वाटा आहे.

विषय हाताळला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल, कारण गर्भपात आणि टीनएज प्रेग्नंसी या दोन्हीबद्दल चित्रपटात कुठल्याही प्रकारचं - विरुद्ध किंवा समर्थनार्थ - भाष्य करण्याचं संपूर्णपणे टाळलेलं आहे. एलन पेज, जे. के. सिमन्स, मायकल सेरा, अ‍ॅलिसन जॅनी, जेनिफर गार्नर इत्यादी कलाकारांनी कमालीच्या पोक्त आणि संयत अभिनयाने पात्रांची मानसिक आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत ताकदीने पार पाडलं आहे.

इथे थोडं जूनोची सावत्र आई या व्यक्तिरेखेवर बोलण्याचा मोह आवरत नाहीये. ब्रेन ही जूनोला नेहमी आधारच देताना दिसते. अगदी इस्पितळात सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरणीला झापण्यापासून ते मार्कला - म्हणजेच एका लग्न झालेल्या पुरुषाला - वारंवार न भेटण्याचा पोक्त सल्ला जुनोला देण्यापर्यंत तिचं जूनोवरचं प्रेम दिसतं (ब्रेन म्हणते: "You don't understand the dynamics of marriage"). या चित्रपटाचा कधी हिंदी किंवा मराठी अवतार निघाला तर सावत्र आई खूप म्हणजे खूपच फुटेज खाणार हे निश्चित!


पॉली आणि जूनो ह्यांच्यातलं नातं कसं फुलत जातं ते बघणं हा एक प्रसन्न अनुभव आहे. किंबहुना त्यांचा पोक्तपणा आपल्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का देऊन जातो. आपल्या पोरीला तिच्या चुकीची जाणीव करुन देतानाच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जूनोचे आई-वडील ब्रेन आणि मॅक, व्हेनेसाला सुरवातीला जूनोबद्दल वाटणारा स्वाभाविक अविश्वास आणि त्याचं दाट मैत्रीत झालेलं रूपांतर, तसंच मार्क पासून विभक्त झाल्यावरही जूनोचा निश्चय बघून मूल दत्तक घेण्याच्या आपला निर्णयावर ठाम असणारी व्हेनेसा ह्या गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करुन जातात.

हा चित्रपट माझ्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांच्या यादीत केव्हाच जमा झाला आहे. जूनो तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री देतो. बघा आणि ठरवा.....आणि आवडला तर सांगायला नक्की विसरू नका.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


संदर्भ: कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया.
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


या आधीचे लेख:
चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू (२००८): एक अनोखा अनुभव
चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?) 

Wednesday, March 16, 2011

आयचाघोरसचा सिद्धांत

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)

Tuesday, December 28, 2010

मनोरंजनाचे घेतले व्रत - ३: अशोक कुमार उर्फ दादामुनी

माझे आजोबा मी फक्त पाच वर्षांचा असताना हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू, ज्यांना आम्ही काकाआजोबा म्हणायचो, ते आणि काकूआजी, यांनी स्वतःच्या नातवंडांवर कुणी करणार नाही इतकं प्रेम आमच्यावर केलं. त्यामुळे माझ्या आजोबांबरोबर जे नातं फुलण्याआधीच संपलं ते मात्र काकाआजोबांबरोबर बर्‍यापैकी बहरलं. त्यांचा सहवास मला मी आठवीत असेपर्यंत लाभला.

हे आजोबा-आजी दक्षिण मुंबईतील पंडित पलुस्कर चौकातल्या हंसराज दामोदर ट्रस्ट बिल्डींगमधे राहत. हा भाग म्हणजे ऑपेरा हाऊस जिथे आहे तो परिसर. काकूआजीची एक दातार आडनावाची मैत्रीण होती. तिचे यजमान एम.टी.एन.एल. मधे मोठे अधिकारी होते. मी बघितलेला पहिला व्हीडिओ कॅसेट रेकॉर्डर (व्ही.सी.आर.) हा त्यांच्याकडेच. सिनेमा बघायची हुक्की आली की आम्ही काकूआजीला मस्का लावायचो. आजीचा दातारांकडे फोन जायचा. मग आजी फर्मान काढायची, "चला रे योगेशदादाकडे" (मैत्रिणीच्या मुलाचं नाव). पडत्या फळाची आज्ञा घेऊन आमची चिमुकली पाऊले आजीचा हात धरून लिफ्ट नसलेल्या त्या इमारतीचे चार मजले उतरून केनडी ब्रीज खालून जाणार्‍या रेल्वेगाड्या बघत बघत एम.टी.एन.एल. क्वार्टर्सच्या दिशेने चालायला लागायची.

त्या व्ही.सी.आर.वर मी बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे खूबसूरत. हा चित्रपट बघायला जाताना मी अर्धवट झोपेतच होतो. पण त्यातल्या अशोक कुमार उर्फ दादामुनींना बघून मी खडबडून जागा झालो. एक हनुवटीचा भाग सोडला तर त्यांची चेहरेपट्टी तंतोतंत काकाआजोबांशी मिळतीजुळती होती. अगदी केशरचनेसकट. घरी परत आल्यावर उत्साहात सगळ्यांसमोर सिनेमाचं आणि अर्थातच सिनेमातल्या प्रेमळ आजोबांच तपशीलवार वर्णन झालं.

तेव्हापासून आजोबा म्हटलं की अशोक कुमार अशी एक विशिष्ठ प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. पण इतर नायक, नायिका, खलनायक, दिग्दर्शक वगैरे लोकांसारखं मुद्दामून नाव पाहून सिनेमा बघावा असं मात्र त्यांच्या बाबतीत कधीच झालं नाही. कारण आमच्या पिढीला ते नायकाच्या रूपात फारसे आठवतच नाहीत; आठवतात ते कर्तबगार जेष्ठ बंधू, संवेदनशील मनाचे वडील, प्रेमळ सासरे, लाघवी आजोबा या रुपांत - थोडक्यात, दादामुनी म्हणूनच.

कालांतराने अशोक कुमार नायक असलेले काही मोजके पण त्याकाळी गाजलेले चित्रपट दूरदर्शन आणि नंतर स्टार गोल्डच्या कृपेने बघायला मिळाले. अर्थात अशोक कुमार हे काही चित्रपटसृष्टीत नायक व्हायला आलेच नव्हते. त्यांना अधिक रस होता तो कॅमेर्‍यामागे चालणार्‍या तांत्रिक बाबींमध्ये. म्हणूनच जेव्हा बॉम्बे टॉकीजचे हिमांशु राय यांनी 'जीवन नैया'चा नायक नजमल हुसेनच्या हातात अचानक नारळ ठेऊन निरंजन पाल यांच्या सांगण्यावरून लॅब विभागात काम करणार्‍या कुमुदलाल कुंजीलाल गांगुली या तरुणाला नायक बनवायचा घाट घातला, तेव्हा त्याने तडक पाल यांच्या घरी जाऊन "कशाला माझ्या आयुष्याची वाट लावताय?" असा मिश्किल प्रश्न टाकला. या सिनेमाचा जर्मन दिग्दर्शक फ्रॉन्ज ऑस्टेन हा वेगळ्या कारणाने त्याच्याशी सहमत होता. त्याने चक्क त्या तरुणाला त्याच्या अवाढव्य जबड्यामुळे पडद्यावर हीरो म्हणून अजिबात भवितव्य नसल्याचं तोंडावर सांगितलं ("You will never make it in films because of your tremendous jaws").

पण इतर नायकांच्या बाबतीत अनेकांनी वर्तवलेल्या अशा प्रकारच्या भाकितांप्रमाणेच ह्या भाकितालाही खोटं ठरवत मारुन मुटकून 'हुकुमावरून' नायक बनलेल्या अशोक कुमारने नंतर मात्र अभिनयक्षेत्रात मागे वळून पाहिलंच नाही. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त तो इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकला. गंमत म्हणजे कॅमेर्‍यासमोरील अशोक कुमारच्या भवितव्याचं अंधःकारमय वर्णन करणार्‍या याच फ्रॉन्ज ऑस्टेनने नंतर तो नायक असलेले अनेक चित्रपट दिग्दर्शित केले.



बॉम्बे टॉकीजने त्याकाळी धाडसी आणि वादग्रस्त सामाजिक विषयांना हात घालणारे अनेक चित्रपट काढले. त्यातलाच एक म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण तरूण आणि अस्पृश्य समजल्या जाणार्‍या समाजातली तरूणी यांच्यातली प्रेमकथा सादर करणारा १९३६ सालचा 'अछुत कन्या' हा सिनेमा. याही सिनेमात अनुभवी देविका राणी समोर नायक म्हणून समर्थपणे उभं राहत अशोक कुमारने आपला दर्जा दाखवून दिला.

१९४३ साली आलेला 'किस्मत' हा फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण सामाजिक वातावरण ढवळून काढणारा ठरला. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी खलनायकाच्याही वरताण दुष्कृत्ये आणि क्रूरकर्मे करणारे नायक किंवा आपल्या हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी अगदी वाट्टेल ते थराला जाणार्‍या अ‍ॅन्टी हीरोंचे सिनेमे बघत मोठे झालेल्या आमच्या पिढीला या सिनेमाने त्यावेळी केवढी खळबळ माजवली होती ते सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तोपर्यंत अगदी सरळमार्गी (की भोळसट?), निर्व्यसनी, आणि सभ्य नायक बघायची सवय असलेल्या तत्कालीन समाजाला चक्क ओठांत सिगारेट घेऊन वावरणारा पाकीटमार हीरो बघून एक प्रकारचा मोठा संस्कृतिक धक्काच बसला. 'किस्मत'ने मात्र प्रचंड लोकप्रिय होत तीन वर्षांहून अधिक काळ सिनेमागृहांत हाऊस फुल्लचा बोर्ड मिरवत ठाण मांडलं. त्यानंतर अशा प्रकारचे हीरो असलेल्या सिनेमांची लाट जरी आली नाही तरी साधनशुचितेला फारसे महत्व न देता इप्सित 'साध्य' करण्याकडे अधिक कल असलेले नायक मात्र प्रेक्षकांनी स्वीकारले ते कायमचेच.



अशोक कुमार यांनी निर्माता म्हणून बनवलेल्या तीन चित्रपटांपैकी पहिला म्हणजे १९४९ साली बॉम्बे टॉकीजसाठी बनवलेला गूढपट 'महल'. तो प्रचंड सुपरहीट ठरला. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने नायिका मधुबाला आणि प्रामुख्याने 'आएगा आनेवाला' या गाण्याच्या तूफान लोकप्रियतेमुळे पार्श्वगायिका लता मंगेशकर या दोघींनाही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं.


लाजर्‍या हावभावांनी अछुत कन्या मधे 'मै बन का पंछी बन के संग संग डोलूं रे..." असं म्हणणार्‍या अशोक कुमारने (पार्श्वगायनही त्याचंच) मग 'हावडा ब्रिज' मधे सिगारेटचे झुरके घेत "आईये मेहेरबाँ, बैठीये जानेजाँ" असा पुकारा करणार्‍या सौदर्यस्म्राज्ञी मधुबालाचं मादक आव्हान चेहर्‍यावर कमालीचं सूचक हास्य बाळगत स्वीकारलं आणि "ये क्या कर डाला तूने.." अशी तिची कबुलीही ऐकली. अशोक कुमारचा या चित्रपटातला वावर हा म्हणजे संयत आणि प्रगल्भ अभिनय कसा असावा याचा उत्तम नमूना.



वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्‍या या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमारने वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमारने अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.



या प्रवासात अशोक कुमारला ज्या दोन गोष्टींनी साथ दिली ती म्हणजे त्याच त्या अजस्त्र जबड्यामुळे चेहर्‍याला लाभलेलं नैसर्गिक प्रौढत्व आणि कृत्रीमतेचा लवलेशही नसलेलं प्रसन्न हास्य. अशोक कुमारच्या चरित्र भूमिकांची सुरवात खरं तर १९५८ सालच्याच 'चलती का नाम गाडी' मधे मनमोहन (किशोर कुमार) आणि जगमोहन (अनुप कुमार) या दोन धाकट्या भावांचा सांभाळ करणार्‍या ब्रिजमोहनची भूमिका करतानाच झाली होती, पण त्यावर शिक्कामोर्तब केलं ते राजेंद्रकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या १९६० साली आलेल्या 'मेरे मेहबूब'ने. यात त्यांनी नायिका साधनाचा मोठा भाऊ साकारला होता. मुस्लिम-सोशल म्हणुन ओळखले जाणारे अनेक सिनेमे एकेकाळी आले. अशा सिनेमात कुणीही सोम्यागोम्या नवाब वगैरेंच्या भूमिका करत असे, पण खर्‍या नवाबासारखं रुबाबदार दिसणं आणि त्याच थाटात वावरणं म्हणजे काय ते या सिनेमात अशोक कुमारला बघितल्यावर कळतं.

राज-देव-दिलीपच नव्हे, तर अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांसारखे अनेक लहानथोर सिनेस्टार आले आणि गेले, पण दादामुनींना त्यांच्या अढळपदावरून कुणीच हलवू शकलं नाही. आधी हीरो म्हणून राज्य केलेल्या अनेक अभिनेत्यांनी नंतर चरित्र भूमिका केल्या, पण कथानकाची गरज वगैरे बाबी आणि काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांची सहज प्रवृत्ती ही नेहमीच इतर कलाकारांवर कुरघोडी करण्याची असल्याने एकूणच आयुष्याच्या उतरार्धात त्यांच्या कारकीर्दीला मर्यादा आल्या. याउलट दादामुनींनी मात्र कुठेही आपली भूमिका वरचढ न होऊ देता इतर कलाकारांना आपापली भूमिका फुलवायला संपूर्ण वाव देत स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यश मिळवलं. अगदी त्यांची प्रमुख किंवा अत्यंत महत्वाची भूमिका असलेल्या चित्रपटात सुद्धा त्यांनी याला अपवाद केला नाही. मग तो १९७८ सालचा राकेश रोशन बरोबरच्या 'खट्टा मीठा' मधला होमी मिस्त्री हा पारशी विधुर असो किंवा 'छोटीसी बात' मधल्या अरुण प्रदीपचा (अमोल पालेकर) 'गुरूजी' कर्नल ज्युलीअस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग असो.

चरित्र भूमिका करत हिंदी चित्रपटात जम बसवू पाहणार्‍या श्रीराम लागूंना आपल्याला मनाजोगत्या भूमिका मिळत नाहीत अशी नेहमी तक्रार असे. त्यांना एकदा दादामुनींनी त्यांच्या यशाचे रहस्य सांगताना समजावलं होतं की चित्रपटसृष्टीत सतत लोकांच्या डोळ्यांसमोर राहणं महत्वाचं आहे, त्यामुळे फार चिकित्सा न करता ज्या भूमिका मिळतील त्या स्वीकारत जावं. हव्या तशा भूमिका त्यातूनच मिळतात.

दादामुनींना आपल्या कारकिर्दीत अनेक सटरफटर भूमिका जरी कराव्या लागल्या तरी अशा सकारात्मक वृत्तीमुळे साहजिकच त्यांना असंख्य वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिकाही मिळाल्या. याचा आणखी एक फायदा असा झाला की त्यांच्यावर कधी ज्याला साचेबद्ध (टाईपकास्ट) म्हणतात तसं होण्याची वेळ आली नाही.

वर उल्लेख केलेल्या 'खूबसूरत' मध्ये प्रेमळ, सज्जन, सुनेवर मुलीसारखं प्रेम करणारा आणि शेवटी शिस्तीचा अतिरेक होतोय हे जाणवल्यावर बायकोला सुनावून भावी सुनेचीच बाजू घेणारा सासरा त्यांनी अगदी उत्तमरित्या उभा केला होता. 'मिली' मधे मुलीच्या जवळजवळ असाध्य असलेल्या आजाराने आतून व्यथित झालेला तरीही इतरांना धीर देणारा बाप साकारताना दादामुनी अमिताभइतकाच भाव खाऊन जातात. आशीर्वाद मधल्या जोगी ठाकूरची तडफड त्यांनी इतक्या ताकदीने उभी केली आहे, की हा सिनेमा पाहिल्यावर आपल्या पोटच्या पोरीचं लग्न लपुनछपून पाहण्याची वेळ आपल्या शत्रूवरही येऊ नये असं वाटल्यावाचून राहत नाही. त्याच सिनेमातलं त्यांच्याच आवाजातलं "रेलगाडी, रेलगाडी" कोण विसरू शकेल? हे गाणं आज भारतातलं पहिलं रॅप गाणं म्हणून ओळखलं जातं. पाकीजा मधला शहाबुद्दीन (आधी प्रियकर आणि मग बाप) आणि शौकीन मधला 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' या गाण्याची आठवण करुन देणारा चावट म्हातारा अशा दोन टोकं असलेल्या व्यक्तिरेखा त्यांनी जीव ओतून साकार केल्या.

अगदीच साधारण असला, तरी व्हिक्टोरिया नंबर २०३ हा चित्रपट केवळ प्राण (राणा) आणि अशोक कुमार (राजा) या दोन कसलेल्या अभिनेत्यांच्या धमाल जोडीमुळेच हीट झाला. आजही ह्या चित्रपटाचा विषय निघाला की नायक-नायिके आधी हेच दोघे आठवतात. प्राण आणि अशोक कुमार या दोघांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेते म्हणून मिळालेले नामांकन हाच काय तो या सिनेमाचा फिल्मफेअर पुरस्कारांमधला सहभाग.

अष्टपैलू अभिनेता हे विशेषण आजकाल सरसकट कुणालाही लावलं जातं. पण ज्यांनी गोल्डीचा 'ज्वेल थीफ' पाहिलाय त्यांना हे विशेषण अशोक कुमारला कसं शोभून दिसतं हे वेगळं सांगायची गरज भासणार नाही. हीरोगिरीवरुन 'दादा'गिरीकडे वळलेल्या अशोक कुमारने आपल्या नेहमीच्या 'इमेज'च्या विरोधात जात या चित्रपटात चक्क खलनायक साकारला. एवढंच नव्हे, तर त्या भूमिकेचं सोनं केलं, इतकं की हिंदी चित्रपटसृष्टी एका उत्कृष्ठ खलनायकाला मुकली असं तो चित्रपट पाहिल्यानंतर वाटू शकतं. चित्रपटाच्या शेवटी एक मजेशीर दृश्य आहे. नायक विनय (देव आनंद) मेला आहे असं समजून ज्वेल थीफ उर्फ प्रिन्स अमर (अशोक कुमार) हा आपला गाशा गुंडाळून कायमचा पळून जायच्या तयारीत असतो. त्याच वेळी विनय तिथे पोहोचतो आणि त्याच्यावर पिस्तुल रोखतो. आता हीरोने व्हिलनवर पिस्तुल रोखणे यात मजेशीर काय असं आपल्याला वाटू शकतं. पण खरी गंमत यानंतर आहे. विनयला जिवंत बघून धक्का बसलेल्या प्रिन्स अमर वर पिस्तुल रोखलेला विनय म्हणतो "....और फिर ऐसे बढिया बढिया अ‍ॅक्टरों की सोबत मे रह कर थोडी बहुत अ‍ॅक्टींग तो आदमी सीख ही जाता है." पुन्हा सिनेमा बघितलात तर हा सीन जरा बारकाईने बघा. हे दोघं अभिनय करत नसून एकमेकांशी खरंच बोलताहेत असा भास होतो. देव आनंदला जिद्दी मधे चमकवणार्‍या अशोक कुमारला ज्वेल थीफ मधे केलेला हा मानाचा मुजरा वाटतो. अर्थात, सदैव 'एव्हरग्रीन' रहाण्याच्या अट्टाहासामुळे देव आनंद दादामुनींकडून थोडीफार अ‍ॅक्टींग वगळता फारसं काही शिकला नसावा हे उघडच आहे.

दादामुनींच्या उत्कृष्ठ अभिनयाची उदाहरणं देताना जवळ जवळ दोनशे ते अडीचशे सिनेमांपैकी कुठल्या सिनेमांचं नाव घ्यावं आणि कुठल्याचं वगळावं याचा निर्णय करणे केवळ अशक्य आहे. अशोक कुमार यांच्या बाबतचं माझं वैयत्तिक मत बाजूला ठेवून तटस्थपणे पाहिलं, तरी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत इतकं मायाळू आणि प्रसन्न असं एकही व्यक्तिमत्व माझ्या तरी डोळ्यांसमोर येत नाही. अशोक कुमारला दादामुनी (बंगालीत मोठा भाऊ) हे गोड टोपणनाव मात्र त्यांच्याच एका बहिणीने (निर्माते शशिधर मुखर्जी यांची पत्नी) त्यांना दिलं. सिनेमाच्या क्षेत्रात सज्जन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोजक्याच व्यक्तींमधे ते मोडत, त्यामुळे हे टोपणनाव अल्पावधीत सर्वांनीच स्वीकारलं.



इतक्या सज्जन माणसाच्या वाट्याला काही कटू अनुभव आले नसते तरच नवल होतं. पण एक प्रसंग मात्र त्यांच्या कायम लक्षात राहिला. अशोक कुमारसाठी परिणीता बनवण्याची जबाबदारी असलेल्या बिमल रॉयनी चित्रपटाचं थोडं चित्रिकरण कलकत्त्यात करण्याच्या बहाण्याने चक्क 'परिणीता'च्या निर्मितीत गुंतलेल्या कलाकारांचा संच वापरून स्वत: निर्मिती आणि दिग्दर्शन करत असलेल्या 'दो बिघा जमीन' हा चित्रपट सगळाच्या सगळा चित्रित केला. त्याबद्दल जाब विचारल्यावर 'परिणीता' न भूतो न भविष्यती असा लोकप्रिय सिनेमा होणार असल्याचं बिमल रॉयनी रंगवून सांगितलं आणि स्वत:चा 'दो बिघा जमीन' हा त्या आधी प्रदर्शित न करण्याचं आश्वासनही दिलं, पण नंतर सोयीस्कररित्या ते पाळायला विसरले. या घटनाक्रमाचा धक्का बसलेल्या अशोक कुमारने त्या नंतर त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. सुंदर कलाकृती (दो बिघा जमीन, परिणीता, मधुमती, बंदिनी, वगैरे) निर्माण करणारे प्रत्यक्षात किती कोत्या मनाचे असू शकतात याचा हा उत्तम नमूना म्हणायला हवा.

दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केल्याखेरीज दादामुनींच्या बाबतीतलं कुठलही लिखाण अपूर्ण आहे. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'हम हिंदूस्तानी' मधला साकारलेला डॉक्टर आणि बहादुरसहा जफर मलिकेत खूप काही करण्याची इच्छा असलेला पण प्राप्त परिस्थितीकडे हताशपणे बघणे सोडून काही करू शकत नसलेला बहादूरशहा या भूमिका आपल्या अभिनयाने त्यांनी अविस्मरणीय केल्या. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. या आधी कधीही अशोक कुमारबरोबर कॅमेर्‍यासमोर यायची संधी न मिळालेला शम्मी कपूर या जाहिरातीत त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं म्हणून प्रचंड हरखून गेला होता.


लग्नाआधी एकमेकांचा चेहराही न बघितलेले दादामुनी आणि त्यांची पत्नी शोभा यांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं आणि त्यांचं लग्न पत्नी शोभाचा मृत्यू होईपर्यंत टिकलं. असं असलं, तरी त्यांचे वैवाहिक जीवन मात्र संपूर्णपणे सुखाचं झाले नाही. त्याबद्दल बोलताना दादामुनींनी अनुराधा चौधरींना दिलेल्या एका मुलाखतीत आपलं मन मोकळं केलं होतं. शोभाला काही काळाने दारूचं व्यसन लागलं. इतकं, की दिवसभराच्या कामाने थकून घरी आलेल्या त्यांना पाणी, चहा वगैरे हातात घेऊन सुहास्यवदनाने बायकोला समोर बघण्याची इच्छा सतत मारावी लागली. त्याऐवजी त्यांना दिसे ती तर्र होऊन पडलेली शोभा. बराच काळ सहन केल्यावर शेवटी त्यांनी वेगळं रहायला सुरवात केली, पण तरी शोभाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. दादामुनींची माफी मागून तिने त्यांच्याबरोबर पुन्हा रहायला सुरवात केली. मात्र तिचं पिणं काही सुटलं नाही. अखेर अनेक दिवस इस्पितळात काढल्यानंतर दादामुनींसोबत लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा मनातच ठेऊन तिने बरोबर दोन दिवस आधी या जगाचा निरोप घेतला.

दादामुनी पुढे म्हणतात, "तिची इच्छा अपूर्ण राहिल्याचा परिणाम म्हणून की काय, जाताना तिचे डोळे अर्धवट उघडे होते. मला कुणीतरी सांगितलं इच्छा अपूर्ण राहिल्यावर असं होतं म्हणे. मला माहीत होतं ती माझ्या प्रेमाला आसुसलेली होती. पण मी पूर्ण प्रयत्न करूनही तिचं व्यसन सोडवू शकलो नाही. विचित्र गोष्ट अशी, की मी तिच्या चेहर्‍याचं चुंबन घेतल्यावर तिचे डोळे पूर्णपणे मिटले. जणू आता कसलीच इच्छा राहिली नसावी." यानंतर दादामुनींनी चित्रपटात काम करणं जवळ जवळ बंद केलं.

माणसाने किती दुर्दैवी असावं? ज्यांनी त्यांना खांदा द्यायचा त्याच दोन्ही धाकट्या भावांचा मृत्यु त्यांना बघावा लागला. १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी दादामुनींचा वाढदिवशीच किशोर कुमारचं निधन झाल्यापासून त्यांनी आपला वाढदिवस साजरा करणंही सोडून दिलं. मग १९९७ साली २० सप्टेंबर रोजी अनुपही हे जग सोडून गेला.

काकाआजोबा मी आठवीत असताना, म्हणजे १९९१ साली वयाच्या ६४व्या वर्षी हे जग सोडून गेले. काकाआजोबा गेल्यानंतर मी जेव्हा जेव्हा मी दादामुनींना सिनेमात बघत असे तेव्हा तेव्हा मला आजोबांची जास्तच आठवण येत असे आणि मग दादामुनींचा सहभाग असलेली दृश्ये अधिकच समरस होऊन बघितली जात. माणूस कशात आणि कोणात नात्यांची पोकळी भरून काढायला भावनिक आधार शोधेल सांगता येत नाही. कदाचित फ्रॉइडकडे याची उत्तरं असू शकतील.

मला तीन लोकांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. पुलंना मी भेटलो. सचिन तेंडुलकरला कधीतरी भेटेन, फक्त हात लाऊन बघता आला तरी चालेल. पण दादामुनींना भेटण्याचं स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं. स्वतः होमिओपथीचे तज्ञ असलेले दादामुनी मात्र अनेक वर्ष दम्याशी झुंज दिल्यावर थकले होते. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानंतर दोनच महिन्यांनी त्यांनी १० डिसेंबर २००१ रोजी ह्या जगाचा निरोप घेतला. मी फक्त दोनदा भरपूर रडल्याचं मला आठवतंय. एकदा काकाआजोबा गेल्यावर आणि दुसर्‍यांदा माझे हे सिनेमातले आजोबा देवबाप्पाला भेटायला निघून गेले तेव्हा.



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः चित्रपट बघणे, दूरदर्शन मुलाखती, व आंतरजालावरील अनेक.
लेखातील छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -