Tuesday, November 30, 2010

हिंदूस्थान

येऊदे खिलजी किंवा तैमूरलंग कुणी
विठोबाचा वारकरी तो धीट आहे

पाडले बामीयान तोफांनी जरी
हासतो तरीही आज तो बुद्ध आहे

पाडा मंदिर कुठेही, आम्ही बांधू ते पुन्हा
आज आम्हा प्रत्येकात राम आहे

घरातले भेदी दिसणार आता कसे
आजही रंग कातडीचा तोच आहे

असली सुंदर सापाची नक्षी जरी
घातकी विषारी मात्र त्याचा दात आहे

ठेचून काढू सगळेच शत्रू आज ना उद्या
कुणी टपून बसला बाहेर तर कुणी आत आहे

रक्तात स्वतःच्याच भिजला वारंवार जरी
दिसेल सर्वांना ताठ उभा हिंदूस्थान आहे

Sunday, November 21, 2010

मनोरंजनाचे घेतले व्रत: विजय आनंद उर्फ गोल्डी

मला देव आनंदचे सिनेमे का आवडतात, किंबहुना का आवडायचे, त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे याचाच धाकटा भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याचा त्याच्या अनेक चित्रपटांना लाभलेला परीसस्पर्श.


विजय आनंदचं मला पहिल्यांदा दर्शन झालं ते त्याच्या सर्वोत्तम म्हणून गणला गेलेल्या 'गाईड' (१९६५) या सिनेमाच्या श्रेयनामावलीत. दूरदर्शनवर पहिल्यांदा पाहीलेल्या या चित्रपटातलं 'तेरे मेरे सपने एक रंग है' हे गाणं का कोण जाणे मनात घर करुन बसलं होतं. पुढे तो सिनेमा अनेकदा पाहिल्यावर त्याच्यातली अनेक सौंदर्यस्थळं उलगडली आणि गोल्डीच्या दिग्दर्शनाबद्दल आदर निर्माण झाला. कल्पक चित्रिकरण करून श्रवणीय असलेली गाणी प्रेक्षणीय बनवण्याची हातोटी काही मोजक्या दिग्दर्शकांना साधली होती त्यातलाच एक म्हणजे गोल्डी.

त्याचं एक वैशिष्ठ्य म्हणजे कमीत कमी गोष्टी वापरून केलेलं चित्रीकरण. देव आनंद, वहीदा, आणि दोन-तीन झाडं या शिवाय होतं काय ह्या गाण्यात? गाण्याची गंभीर प्रकृती आणि देव आनंदला फारसं नाचता वगैरे येत नसणे (अर्थातच त्यामुळे झाडांच्या फांद्यांना लटकणे वगैरे सर्कस कॅन्सल) ह्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर विजय आनंद पुढे काय आव्हान असेल याची कल्पना येते. दृश्ये बर्‍यापैकी मोठ्या टेक्स मध्ये चित्रित करणं आणि कॅमेरा हलकेच वळवून दुसर्‍या मितीत काय चाललं आहे ते दाखवणं या आपल्या वैशिष्ठ्याचा उपयोग इथेही करून त्याने हे गाणं फक्त तीन मोठ्या टेकस् मध्ये चित्रित केलं होतं.



कथा ऐकताच गोल्डीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुरवातीला नाकारली होती, पण अनेक कारणांनी इतर कुणी उपलब्ध न झाल्याने त्यालाच ती स्वीकारावी लागली. आर.के.नारायण यांच्या गाईड या पुस्तकावर आधारित सिनेमा काढणं हाच एक मोठा जुगार होता. नायिकेचे नायकाबरोबर असलेले विवाहबाह्य संबंध आणि बंडखोरपणा हे प्रमुख कारण होतंच, पण त्याचबरोबर नायक असलेल्या राजू गाईड याचं हीरो या संकल्पनेला फटकून असलेला क्वचित आप्पलपोटा वाटू शकेल असा स्वभाव, राजूमुळे आपण आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत याची जाणीव न ठेवता एका चुकीमुळे त्याला लाथाडणारी स्वार्थी नायिका रोझी, कथा नक्की कुठे चालली आहे किंवा शेवट काय होणार याच्याविषयी अजिबात अंदाज न येणे, आणि धड ना सुखांत धड ना दु:खांत असलेला शेवट. पण विजय आनंदच्या दिग्दर्शन कौशल्याने हा चित्रपट त्याकाळचा मोठा हिट ठरला. चित्रपटात गावात दुष्काळ पडतो ते दर्शवण्यासाठी दाखवलेली गावातल्या लोकांची दृश्ये आठवली तर याचा अंदाज येईल. नायकाचा विचित्र स्वभाव गृहित धरला तरी त्याच्या वेदना, आक्रोश, शेवटची धडपड काळीज चिरुन जातात. देव आनंदला अभिनय यायचा नाही हे म्हणणार्‍यांनी हा सिनेमा - शक्यता कमी आहे, पण पाहिला नसेलच तर - जरूर पहावा. गोल्डीने दगडातून देव निर्माण केलाय. याचीच परिणिती देवला त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळण्यात झाली (पहिला काला पानी साठी). शिवाय गोल्डीलाही सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शन आणि पटकथेसाठीचे फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले ते वेगळंच.

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी जसे मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक चित्रपट केले, तसं विजय आनंदने रहस्यपटांमध्ये प्राविण्य मिळवलं होतं. तीसरी मंझील (१९६६) हा १९५७ सालच्या नौ दो ग्यारह यानंतरचा गोल्डीचा पुढचा रहस्यपट. निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडला (बरं झालं, नाहीतर बेभान होऊन देव आनंद ड्रम वाजवतोय की ड्रम देव आनंदला वाजवतायत असा प्रश्न पडला असता). दिग्दर्शकाच्या भूमिकेत गोल्डी मात्र तसाच राहिला. दुर्दैवाने चित्रीकरण सुरू असतानाच देवच्या जागी नायक म्हणून आलेल्या शम्मी कपूरच्या दोन लहान मुलांची आई असलेली आणि जिच्यावर तो प्रचंड जीव टाकत असे अशी त्याची बायको गीता बाली हे जग सोडून गेली. शम्मी कपूरची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही विजय आनंदने हा चित्रपट ठरवलेल्या वेळेत पूर्ण केला. चित्रपटातील पात्रांपेक्षा कॅमेरा हाच प्रमुख निवेदक असला पाहिजे याची जाणीव असलेल्या गोल्डीने सिनेमातील पात्रांच्या बरोबर फिरत असलेल्या कॅमेर्‍याच्या वेगवान हालचाली, तुकड्यातुकड्यात चित्रीत केलेली दृश्ये एकत्र गुंफणे अशा करामतींचा प्रभावी वापर करून हिंदी चित्रपटांच्या इतिहासातल्या उत्तम थरारपटांपैकी एकाला जन्म दिला. संपूर्ण चित्रपटभर संशयाची सुई खून झालेल्या रूपाचा होणारा नवरा रमेश (प्रेम चोप्रा) आणि नर्तिका रुबी (हेलन) यांच्या भोवती फिरवत ठेऊन शेवटी अगदी अनपेक्षित पात्र (प्रेमनाथ) खलनायक म्हणून समोर आणणं या या चित्रपटातल्या रहस्याचा यु.एस.पी. ठरला.



याच क्लुप्त्यांसह नेहमीच काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न करण्यार्‍या विजय आनंदने त्याच्या पुढच्याच वर्षी ज्वेल थीफ हा आणखी एक जबरदस्त रहस्यपट सिनेरसिकांना सादर केला. रहस्यपटांची एक गोची असते. त्यांना रिपीट व्हॅल्यू नसतो असं म्हणतात. ज्वेल थीफचं वेगळेपण ह्यातच आहे की आज चाळीसहून अधिक वर्षांनीही पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा आणि क्षणभरही कंटाळा न येता तितकीच मजा आणणारा हा हिंदीतला एकमेव रहस्यपट असावा. इतर रहस्यपटांमध्ये अतीपरिचयात अवज्ञा झालेल्या अनेक गोष्टी पटकथेचा अविभाज्य भाग असल्यानं इथे कंटाळवाण्या होत नाहीत. उत्कृष्ठ पटकथा-संवाद लेखक असलेल्या गोल्डीला या सिनेमात दिग्दर्शनाबरोबर याही गोष्टी करायला मिळाल्याने असलेल्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करत अनेक अनेक नव्या गोष्टी समोर आणल्या. विचार करा, ज्वेल थीफ मध्ये अशोक कुमारच्या ऐवजी प्राण असता, तर त्यातला 'सस्पेन्स' चाणाक्ष प्रेक्षकांच्या लगेच लक्षात आला असता की नाही? किंवा एखाद्या भलत्याच व्यक्तिरेखेला खलनायक म्हणून आणलं असतं तर? सगळ्या सस्पेन्सचा तिथेच चुथडा झाला असता आणि सिनेमा साफ झोपला असता ते वेगळंच.

पण ती भूमिका अशोक कुमारने करणे यात विजय आनंदने अर्धी लढाई जिंकली. आपल्या नेहमीच्या 'इमेज'च्या विरोधात जात खलनायक साकारणार्‍या अशोक कुमारने त्या भूमिकेचं सोनं केलं, इतकं की हिंदी चित्रपटसृष्टी एका उत्कृष्ठ खलनायकाला मुकली असं तो चित्रपट पाहिल्यानंतर वाटू शकतं. खलनायकाच्या माणसांनी बेशुद्ध केल्यावर जमिनीवर पडलेल्या नायक देव आनंदला बघत बघत प्रवेश करणारा अशोक कुमार हे दृश्य म्हणजे खास गोल्डी टच. एक नायक-दोन नायिका किंवा दोन नायक-एक नायिका असलेले प्रेमाचे त्रिकोण या मसाल्याच्या जोरावर असंख्य निर्माते-दिग्दर्शक-नट मंडळींच्या घरातल्या चुली पेटल्या, पण त्याचबरोबर हिंदी चित्रपटातल्या नायकाने अनेक ललनांबरोबर जेम्स बॉंड छाप फ्लर्टींगही करणे ही एरवी धक्कादायक आणि धाडसी वाटणारी गोष्ट ज्वेल थीफमध्ये मात्र त्याकाळी कुणालाही खटकली नाही.




रहस्यपटात गाणी टाकली की तो प्रेक्षकांच्या मनावरची पकड गमावतो असाही एक समज आहे. पण 'दिल पुकारे आ रे आ रे आ रे' या गाण्यात नायिकेच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसणारा ताण बघितला तर हे गाणं उत्कंठा वाढवायला मदतच करतं हे लक्षात येईल. चित्रपटाच्या शेवटाआधी असलेल्या 'होठों पे ऐसी बात' या गाण्याचं वेगवान चित्रीकरण, नाचणार्‍या वैजयंतीमाला भोवती वेगात गोल फिरणारा कॅमेरा, एका तुकड्यात दिसणारा चेहरा अर्धवट झाकलेला प्रिन्स अमर हे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला नेऊन पोहोचवतात.

'आपली शेजारी राष्ट्रे' हा विषय विजय आनंदला त्याचा भाऊ चेतन आनंद प्रमाणेच प्रिय असावा. याचे संदर्भ त्याच्या काही चित्रपटातल्या संवादांतून आपल्याला पहायला मिळतात. 'तेरे घरके सामने' या सिनेमात नायक आणि नायिका या दोघांच्या वडिलांचं एकमेकांशी हाडवैर असतं. त्यांच्या प्रेमाचं पर्यावसान लग्नात होण्यात (असंख्य हिंदी शिणूमांप्रमाणे इथेही) हीच अडचण असते. पण ही समस्या सामोपचाराने सोडवली पाहीजे हे समजावताना गोल्डीचा नायक नायिकेला नेहरूप्रणित पंचशील तत्वांची आठवण करून देतो.

प्रख्यात दिग्दर्शक आणि हृषिकेश मुखर्जी यांच्यावरच्या माझ्या लेखात मी विजय आनंदचा उल्लेख केला होता तो गाण्यांच्या सुंदर चित्रिकरणासंदर्भात. तसं बघायला गेलं तर या दोघांच्या सिनेमांत खरं तर काही फारसं साम्य नाही, पण दोन गोष्टींचा उल्लेख करावाच लागेल. एक हे की त्यांच्या चित्रपटांतील गाणी नुसती ऐकत असलो तरी डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहतात. आणि दुसरं हे की गाणी कुठेही 'घुसवली आहेत' असं वाटत नाही. सहज आधीची दृष्ये किंवा संवाद यांच्या माध्यमातून चित्रपट आपल्याला लीलया गाण्यात घेऊन जातो.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी (१९५४) देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या विजय आनंदने दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्याने काला बाझार (१९६०) मध्ये नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्याने एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती (नायिकेचा भूतपूर्व प्रियकर). या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या 'ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं' या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो.

तेरे घर के सामने या सिनेमातलं तेच शब्द असणारं गाणं आठवा. या गाण्याच्या आधी नायक म्हणतो, "...लेकिन एक बात कहे देता हूं. चाहे आसमान टूट पडे, चाहे धरती फूट जाए, चाहे हस्तीही क्यों न मिट जाए, फिरभी मैं......" असं म्हणून थोडासा थांबल्यावर नायिका नुतन म्हणते "फिरभी मै?" आणि मग "तेरे घर के सामने...." म्हणत गाणं सुरु होतं. दारूच्या ग्लासात नुतन असल्याची कल्पना करून देव आनंद पडद्यावर हे गाणं म्हणतो. कळस म्हणजे जेव्हा बिअरच्या ग्लासात बर्फ टाकला जातो तेव्हा ग्लासातल्या नुतनचं शहारून देवला विनंती करणं आणि मग देवने चिमट्यानं तो बर्फाचा तुकडा ग्लासातून काढून टाकत तिची 'सुटका' करणं......अहाहा! निव्वळ अप्रतीम!! त्याच चित्रपटातलं 'दिल का भंवर करे पुकार' च्या आधी नायक नायिका कुतुबमिनार चढत असताना काय वातावरणनिर्मिती होते ते आठवून बघा.




काला बाझार चित्रपटातल्या एका गाण्याची तर बातच न्यारी. यात देव आनंदच्या वरच्या बर्थ वर असलेल्या नायिका वहीदाला उद्देशून तो 'उपरवाला जान कर अंजान है' असं म्हणतो, पण समोर बसलेल्या तिच्या आई-बाबांचं लक्ष जाताच 'उपरवाला म्हणजे देव' या अर्थाची खूण करून सारवासरव करतो ते लाजवाब!



जॉनी मेरा नाम चित्रपटातलं "पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले" या गाण्यात तरी काय होतं? नायक, नायिका, आणि एक छोटसं घर. पण गोल्डीने घराच्या असंख्य खिडक्यांचा धमाल वापर करून हे गाणं अजरामर केलं. हे गाणं ऐकलं की आजही डोळ्यांसमोर येतं ते ते त्यातलं वेगवेगळ्या आकाराच्या असंख्य खिडक्यांचं बंगलेवजा घर आणि त्यातून आत येण्याचा प्रयत्न करत देव आनंदचा हेमा मालिनीला पटवण्याचा प्रयत्न.

अशी असंख्य गाणी आहेत, पण एक शेवटचं उदाहरणं देऊन हे गाणं चित्रिकरण पुराण थांबवतो. ब्लॅकमेल चित्रपटातलं किशोर कुमारने गायलेलं सुप्रसिद्ध 'पल पल दिल के पास' हे गाणं सगळ्यांना माहित असेलच. नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही बरं! मी सांगणार आहे त्या चित्रपटातल्या शेवटच्या गाण्याबद्दल. चित्रपट बघण्याआधी मी फक्त 'पल पल...' हेच गाणं ऐकलं/पाहिलं होतं. डि.व्ही.डी. आणल्यावर चित्रपटातली गाणी वारंवार बघितली. चारी बाजूंनी आग लागलेली असताना जीव वाचवण्यासाठी लाकडांच्या ओंडक्यांखाली गवतात लपून बसलेले नायक-नायिका आणि बाहेर हत्यारबंद व्हिलनमंडळी - या पार्श्वभूमीवर 'मिले, मिले दो बदन' हे गाणं टाकण्याच्या गोल्डीच्या आयडीयाच्या कल्पनेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दुर्दैवाने संगीत गाजलं असलं तरी हा चित्रपट आपटला. कदाचित अगदीच बालीश कल्पनांवर आधारित असल्यानं असेल (तिरसट वैज्ञानिक, त्याचा सौर ऊर्जेविषयक संशोधन आणि शोध, वगैरे).

'कहीं और चल' हा चित्रपट दिग्दर्शित केल्यावर फायनॅन्सरकडून फसवणूक वाट्याला आलेल्या गोल्डीने नायक म्हणून कारकीर्द उताराला लागलेल्या देव आनंदला 'जॉनी मेरा नाम' मार्गे यश मिळवून दिलं. दुर्दैवाने या नंतर तूलनेने माफक यशस्वी ठरलेले 'तेरे मेरे सपने' आणि 'राम-बलराम' वगळता यशाने त्याच्याकडे नेहमी पाठच फिरवली.

'तेरे मेरे सपने' बरोबरच त्याने अनेक चित्रपटात नायकाची भूमिकाही केली, पण त्यातले 'मै तुलसी तेरे आंगन की' आणि कोरा कागज' हे दोनच उल्लेखनीय म्हणावे लागतील. दुर्दैवं असं, की त्यातही त्याच्याबरोबर असलेल्या अभिनेत्री - अनुक्रमे नूतन-आशा पारेख आणि जया भादुरी - भाव खाऊन गेल्याने तो या दोन सिनेमातही अभिनेता म्हणून दुर्लक्षितच राहिला.


कालांतराने त्याने 'तहकीकात' या दूरदर्शन मालिकेत डिटेक्टिव्ह सॅमच्या रूपात आपल्यातल्या अभिनयाची पुन्हा एकदा चुणूक दाखवली.

एव्हाना 'गाईड'मध्ये गोल्डीने ज्याला दगडाचा देव करून शेंदूर फासला त्या देव आनंदने चक्र उलटं फिरवून देवाचा दगड आणि मग दगडाची खडी करून त्यावर एव्हाना डांबरही फासला होता. आपल्याला दिग्दर्शन येतं या समजातून त्याने स्वतः ते करायला सुरुवात केली. प्रसिद्ध पत्रकार शिरीष कणेकर यांनी त्याला एकदा देव आनंदला 'गोल्डीला तो त्याचे चित्रपट दिग्दर्शित करायला का सांगत नाही' असं विचारलं असता त्याने "गोल्डी तो मोटा हो गया है" आणि "गोल्डी डायरेक्ट करेगा तो फिर मैं क्या करुंगा?" अशी दोन अचाट आणि अतर्क्य उत्तरं दिली. तेव्हा त्यांच्यातलं गोल्डी दिग्दर्शन करणार आणि देव अभिनय हे नातंही संपुष्टात आलं होतं.

चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होता. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला.

विजय आनंदने हिंदी चित्रपटसृष्टीला काय दिलं ह्याचं उत्तर सोप्प आहे. एक किस्सा सांगतो. अमर-अकबर-अँथनी मधली रक्तदान वगैरे दृश्यांचा संदर्भ देऊन एकाने मनमोहन देसाईंना "तुम्ही असले आचरट सिनेमे का बनवता?" असं विचारलं असता त्यांनी "हिंदी चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकाचं सरासरी मानसिक वय तेरा आहे असं आम्ही मानतो" असं उत्तर दिलं होतं. कुठल्या आधारावर त्यांनी हे विधान केलं होतं बाप्पा जाणे, पण ते खरं असेल तर ते तेरापर्यंत खेचून आणण्याचं श्रेय गोल्डीला निर्विवादपणे द्यावं लागेल.

अशा या गुणी दिग्दर्शकाला २३ फेब्रुवारी २००४ रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घ्यायला लावला. असं म्हणतात की देव आनंद आपल्या सबंध आयुष्यात फक्त दोनदा रडला. पहिल्यांदा त्याची आई गेली तेव्हा आणि दुसर्‍यांदा विजय आनंद गेला तेव्हा.

"हा चित्रपट पुन्हा बनवायचा झाला तर नायकाच्या भूमिकेसाठी सद्ध्याच्या अभिनेत्यांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतो?" रेडिओ मिर्ची पुरस्कृत पुरानी जीन्स फिल्म महोत्सवात (२०१०) 'तीसरी मंझील' च्या प्रदर्शनाच्या वेळी शम्मी कपूरला एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला. "मला नाही वाटत हा चित्रपट पुन्हा कुणी बनवू शकेल" प्रचंड आत्मविश्वासाने क्षणाचाही विलंब न लावता शम्मी ताडकन् उत्तरला. २००७ साली आलेल्या जॉनी गद्दार चित्रपटात एक पात्र 'जॉनी मेरा नाम' हा सिनेमा बघत असल्याचे दृश्य आहे. विजय आनंदला वाहिलेली ही श्रद्धांजली होती.



ज्याचे चित्रपट आजही निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक यांना स्फूर्तीस्थान ठरतात पण क्वचितच त्याच्या एवढी उंची गाठू शकतात अशा या ओजस्वी कलावंताला माझा सलाम!



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ: ज्वेल थीफ, तीसरी मंझील, ब्लॅकमेलच्या व्ही.सी.डी. आणि डी.व्ही.डी., माझे चित्रपट प्रेम, तसंच आंतरजालावरील अनेक.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पहिला लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत: ऋषिकेश मुखर्जी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Friday, November 12, 2010

शबरीधाम

रामायणातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरी आणि तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांची गोष्ट. एका दंतकथेनुसार शबरीचा आश्रम जिथे होता त्या ठिकाणाला भेट देण्याचा नुकताच योग आला.

अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या दंडकारण्यात राहणारी धार्मिक वृत्तीची शबरी ही पूर्णा (पुष्करणी) नदीच्या तीरावर असलेल्या निबीड अरण्यात एकांत स्थळी तपस्येकरता राहत असे. जवळच असणार्‍या सरोवराच्या काठावर स्नान, पूजा, होम इत्यादी धर्मकार्यार्थ अनेक ऋषीगण नियमित येजा करत असत. शेवटी जंगलच ते, मार्ग असा कितीसा चांगला असणार? सरोवराकडे जाणार्‍या रस्त्यावरचे बारीक बारीक दगड, काटे, आणि पायांना इजा होऊ शकेल अशा इतर अनेक गोष्टींचे त्या रस्त्यावरून निर्मूलन करून ऋषींच्या मार्गातले अडथळे शबरी दूर करत असे. स्त्रीसुलभ लज्जा म्हणा किंवा इतर काही कारण, ही सगळी कामे ती लपूनछपून करत असे. शबरी याबाबतीत इतकी काळजी घेत असे की झाडू वापरला तर त्या आवाजाने आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल म्हणून ती हातानेच ही कामे करी. ही सगळी कामे कुणी केली हे उघड झालं तर आपल्यावर नसता प्रसंग ओढवेल अशी तिला भीती होती.

रोज आपला मार्ग साफ आणि निर्धोक बघून ही साफसफाई करतं तरी कोण असा प्रश्न समस्त ऋषी-मुनी आणि इतर साधक मंडळी एकमेकांना आश्चर्याने विचारत असत.

अखेर मातंग ऋषी यांना हे रहस्य उलगडलं. शबरीशी झालेल्या भेटीत त्यांनी तिच्यातले सुप्त गुण हेरले आणि तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. असे म्हणतात की देव दिवाळी (कार्तिक पौर्णिमा) ह्या दिवशी ही भेट झाली. शबरीने आश्रमाची व तिथल्या रहिवाशांची लहान-मोठी कामे करण्याबरोबरच ज्ञानार्जनही सुरु केलं. आपल्या मृदू आणि विनयशील स्वभावाने आश्रमातल्या सगळ्यांची मने तिने लवकरच जिंकून घेतली. दिवसभर विविध कामात व्यग्र असूनही चाललेले विद्यादान लक्ष देउन ग्रहण करणे आणि काही न समजल्यास नम्रतेने शंका विचारून लगेचच निरसन करुन घेणे ही शबरीची दिनचर्याच झाली. अशा प्रकारे विद्याग्रहण करून ती अनेक विषयांत पारंगत झाली.

मातंग ऋषींनी शबरीमधली ज्ञानपिपासा ओळखून आणि पारखून घेतल्यावर तिला आपली विद्यार्थिनी म्हणून स्वीकारले. ते इतकंच करुन थांबले नाहीत तर तिला आपल्या इतर शिष्यगणांच्या बरोबरीचे स्थान दिले.

अशा प्रकारे नित्यनेमाने गुरुसेवा करत असताना एके दिवशी मातंग ऋषींनी तिला आपल्या मनातला सल बोलून दाखवला, आणि त्याचबरोबर तिला आशीर्वादही दिला. ते म्हणाले, "पोरी, माझ्या हयातीत प्रभूंनी (श्रीराम) मला दर्शन दिले नाही, पण त्यांच्या चरणकमलांनी ते तुझी पर्णकुटी नक्की पवित्र करतील".

अशीच अनेक वर्ष लोटली. सीतेच्या शोधात दंडकारण्यातून जात असताना कबंध नावाचा अत्यंत कुरूप आणि महाभयानक राक्षस राम-लक्ष्मणांना सामोरा आला. लक्ष्मणाने त्या राक्षसाचे हात कापून त्याचा वध केला. त्याच्या कलेवरावर अंत्यसंस्कार केल्यावर चितेतून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तो म्हणाला, मी दनुपुत्र असून ऋषीमुनींना त्रास देत असे, त्यामुळे स्थूलशिरा नामक ऋषींनी मला एक शाप दिला. त्या शापाच्याच प्रभावामुळे माझे मूळचे तेजस्वी रूप जाऊन हे असले विचित्र रूप प्राप्त झाले. तुम्ही माझा उद्धार केलात." असे सांगून त्याने राम-लक्ष्मणांना वंदन केले, आणि सीतेचा शोध घ्यायचा असेल तर आधी किष्किंधेच्या सुग्रीवाशी मैत्री कर असा सल्ला दिला. तसेच वाटेत शबरीमातेची भेट घ्या असंही सांगितलं.

मजल दरमजल करत वनातून मार्गक्रमण करत असताना श्रीरामांना शबरीचा आश्रम दिसला. अखेर भगवंताशी शबरीची भेट झाली. साक्षात प्रभूराम समोर दिसल्यावर शबरीच्या मुखातून बाहेर पडलेले पहिले शब्द गीत रामायणात म्हटल्याप्रमाणे "धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्रीचरणे आश्रमा" असेच असतील. शबरीने भक्तीभावाने दोघांना नमस्कार केला. तुलसीदासांच्या रामचरितमानस मध्ये या भेटीचं "स्याम गौर सुंदर दोऊ भाई, सबरी परी चरण लपटाई" असं सुंदर वर्णन केलं आहे.

पुढची गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे ते इथे लिहीत नाही. तर, शबरीचा आश्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाला भेट देण्याचं भाग्य मला नुकतंच प्राप्त झालं.

प्रभू रामाच्या चरणस्पर्शाने भारतवर्षातील अनेक ठिकाणे पवित्र झाली आहेत. गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यातील वनक्षेत्र हे त्यातीलच एक. पंचवटीच्या नैऋत्येला असणारे हे वनक्षेत्र प्राचीन दंडकारण्याचा एक भाग आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणार्‍या आहवा इथून ३४ किलोमीटर अंतरावर असणार्‍या सुबीर गावाजवळ एक 'चमक डोंगर' नामक पर्वत आहे. शबरीच्या अलौकिक आध्यात्मिक शक्तीमुळे हा डोंगर तसंच पूर्णा नदीचा परिसर प्रकाशमान झाला होता अशी कथा आहे. म्हणून त्याला तसे नाव पडले असावे. या परिसरात वास्तव्य करणारे हिंदू कोळी व अन्य आदीवासी समाजाच्या मनात रामायणकार वाल्मिकी ऋषी यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आहे. मातंग ऋषी व शबरी माता यांच्याबद्दलही स्थानिक भिल्ल समाज आणि इतर वनवासी लोकांच्या मनात अनन्य श्रद्धाभाव आहे.

ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आणि शबरी यांची जिथे भेट झाली अशी श्रद्धा आहे, तोच हा पर्वत. याच पर्वतावर शबरीधाम नामक मंदिराची निर्मिती झाली आहे. हल्ली हे स्थान म्हणजे एक तीर्थक्षेत्रच झालं आहे. दरवर्षी माघ महिन्यातल्या पौर्णिमेला जवळच असणार्‍या सरोवरातील मातंग तीर्थात स्नान करण्यासाठी हजारो भाविक जमतात. यालाही आजकाल पम्पा सरोवर म्हणतात पण मूळ पम्पा हे कर्नाटकात आहे.

डांग जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात समाजसेवा करणारे स्वामी असीमानंद हे हिंदूंच्या दृष्टीने एक थोर व्यक्तीमत्व. त्यांनी डांग जिल्ह्यात केलेल्या कामामुळे आज तिथल्या आदिवासी समाजात समृद्ध भारतीय संस्कृतीविषयी बर्‍यापैकी जागृती निर्माण झाली आहे. स्वामी असीमानंद हे मुळात अभियांत्रिकी चे पदवीधर. उच्चशिक्षित असूनही नोकरी-व्यवसाय करण्यात समाधान न मानता इथे येऊन त्यांनी हे अवघड कार्य हाती घेतले आणि तडीसही नेले..

रामायणावर प्रवचने करणारे मोरारिबापू यांनी २००२ साली स्वामी असीमानंद यांच्या विनंतीवरून शबरीधाम येथेच त्यांच्या प्रवचनांचा कार्यक्रम केला. तो करत असताना एकदा बोलता बोलता सहज त्यांच्या तोंडून "इथे आपण एक कुंभ मेळा आयोजित करुया" अशी इच्छा प्रदर्शित केली गेली. फेब्रुवारी २००६ साली सुरु झालेला हाच आगळावेगळा कुंभ मेळा आता शबरीकुंभ म्हणून ओळखला जातो. याच स्थानावर स्थानिय समितीने स्वामी असीमानंद यांच्या मार्गदर्शनाखाली एक नेटके देऊळ बांधले. करवीर पीठाच्या शंकराचार्‍यांच्या हस्ते इथे एक ध्वजारोहण कार्यक्रम आणि एक धर्म परिषदही पार पडली.

महाराष्ट्रातील नंदूरबार इथून मला या ठिकाणी पोहोचायला सुमारे दोन तास लागले.



महाराष्ट्रात सगळीकडे सूचनाफलक आणि स्थानदर्शक/दिशादर्शक फलक हे मराठी-हिंदी-इंग्रजी या तीन भाषांमध्ये लिहीण्याची पद्धत आहे. गुजरात राज्यात प्रवेश केल्यावर दिसलेले सगळे फलक फक्त गुजराती भाषेत आणि त्याच लिपीत दिसले. देवनागरी तर सोडाच, इंग्रजीतला एकही फलक दिसला नाही. अर्थात, त्यामुळे विदेशी पर्यटकांबरोबरच भारताच्या इतर भागातील पर्यटकांचीही गैरसोय होते.



रस्ता संपल्यावर दिसणारे शबरीधाम मंदिर


समोरील बाजूस असलेले एक कृत्रीम तळे


शबरीधाम मंदिराचा समोरचा भाग


मंदिराच्या भिंतीवर असलेले एक चित्र - बोरे चाखून बघताना शबरीमाता


चित्रात खालच्या बाजूला जे तीन दगड दिसत आहेत - ज्या दगडांवर बसून शबरीच्या हातची बोरे राम-लक्ष्मणांनी खाल्ली ते हेच अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आहे.


जवळून काढलेले एक छायाचित्र


भ्राता लक्ष्मणासह बोरं खात असलेले श्रीराम


शबरीधाम मंदिराच्या गच्चीवरून दिसणारा परिसर


मंदिराची आणखी काही छायाचित्रे






शबरीधाम मंदिराचा मागचा भाग


शेजारील पंपेश्वर महादेवाचे देऊळ
+



शबरीधाम नंतर मी पम्पा सरोवराला भेट दिली. याच पम्पा सरोवरात रामाने लक्ष्मणासह स्नान केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात पुढील प्रकारे येतो:


क्रमेव गत्वा प्रविलोकयन्वनं ददर्श पम्पांशुभदर्शकाननाम् |
अनेक नानाविध पक्षीसंकुलां विवेश राम: सह लक्ष्मनेन ||

स्वैर भाषांतरः ज्या पम्पा सरोवराच्या काठावर (बसून) आसपासच्या मंगलमय वनश्रीचे दर्शन घेताना त्यांना आनंद झाला, त्या सरोवरात रामाने लक्ष्मणासह स्नान करण्याचे हेतूने प्रवेश केला.

वरून दिसणारा पम्पा सरोवराचा भाग


पम्पा सरोवराच्या परिसरात बागडणारे बगळे


स्नान केल्यावर राम लक्ष्मणाला म्हणाला....

सप्तानां च समुद्राणामेषु तीर्थेषु लक्ष्मण |
उपस्पृष्टं च विधिवत्पितरस्वापि तर्पिता: ||
प्रनष्टमशुभं तत्तत्कल्याणं समुपस्थितम् |
तेन तत्वेन हृष्टं मे मनो लक्ष्मण संप्रति ||

स्वैर भाषांतरः पुष्करणी (पूर्णा) नदीच्या या रम्य सरोवरात मातंग ऋषींनी स्थापन केलेल्या सप्तसमुद्रांच्या तसेच अनेक तीर्थांच्या पवित्र जलात स्नान करुन मी पापक्षालन केलं आहे तसेच पितरांचे ऋण फेडले आहेत. याच कारणाने आपल्या वाट्याला आलेले सगळे अशुभ नाहीसे होऊन आपले कल्याण होईल. म्हणूनच आता माझ्या मनाला अतीव आनंदाचा अनुभव येत आहे.

सरोवराची इतर काही छायाचित्रे - अगदी रम्य परिसर







शबरीधाम जवळील पम्पा सरोवराजवळील देवळात मातंग ऋषींची व शबरीची मूर्ती.


या देवळाबाहेर किंवा देवळातही या मूर्ती कोणाच्या आहेत हे सांगणारी एकही पाटी आढळली नाही.

शबरीधामकडून पम्पा सरोवराकडे जातानाही रस्त्यांची अवस्था अक्षरशः दिव्य आहे. आत्तापर्यंत मला कोकणातल्या काही ठिकाणी असणार्‍या खड्ड्यातल्या रस्त्यांचा(!) अनुभव असल्याने त्याहून वाईट काही पहायला मिळेल याची अपेक्षा नव्हती, पण अनुभव आला खरा. अत्यंत कार्यक्षम कारभार असणार्‍या गुजरात सरकारच्या कामाचा प्रभाव सगळ्या गुजरातेत पहायला मिळतो, असे असताना प्रशासनाने ह्या पावन जागेकडे जाणारे रस्ते (अरुंद असले तरी) निदान बर्‍या अवस्थेत ठेवले असतील, ही अपेक्षा फोल ठरली. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते, "आमचा देश श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते चांगले आहेत असं नव्हे, तर आमचे रस्ते चांगले आहेत म्हणून आमचा देश श्रीमंत आहे". हा धडा आपण कधी घेणार?



सरोवराच्या परिसरात फक्त नावाला "गुजरात टुरिझम" अशी पाटी आहे. एक उसाच्या रसाचे दुकान आणि आणखी एक सटरफटर छाप वस्तू विकणारे लहानसे दुकान वगळता सरकार पुरस्कृत 'टुरिझम'च्या नावाने सगळा आनंद आहे. मी मुद्दामून सरोवर वगळता बाकी परिसराची जास्त छायाचित्रे नाही काढली, कारण ह्या पवित्र परिसराचा पर्यटकांनी कचरा टाकून केलेला उकिरडा पाहून मनाला अतिशय यातना झाल्या, आणि त्या कटू आठवणी फोटोत तरी येऊ नयेत ही इच्छा होती. वरच्या छायाचित्रात खालचा भाग नीट बघितलात तर तुम्हाला पर्यटकांनी काय पराक्रम करुन ठेवलाय याचा थोडाफार अंदाज येऊ शकेल.

तसंच, पोहायला जाणार्‍यांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक (लाईफगार्ड) तर फार लांबची गोष्ट आहे, एकही सुरक्षारक्षक किंवा एक साधा गाईडवजा पोर्‍याही दिसला नाही. गुजरात सरकार पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत शबरीधाम आणि पम्पा सरोवर परिसर या दोन ठिकाणांच्या बाबतीत तरी सपशेल अपयशी ठरलं असं खेदाने नमूद करावंसं वाटतं.

तरीही, ते इंग्रजीत 'इन अ लायटर व्हेन' का काय म्हणतात तसं बोलायचं झालं, तर परमेश्वर व त्याच्या लाडक्या भक्तांचं दर्शन इतक्या सहजा सहजी होत नाही, तेव्हा तेवढे कष्ट सोसायलाच हवेत आणि एकदा तरी शबरीधाम आणि पम्पा सरोवराला भेट द्यायलाच हवी.


~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ जय श्री राम ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~

संदर्भ:
(१) शबरीधाम यात्रा महात्म्य - लेखक राजेश सुरेश दिक्षित (फक्त हिंदीत उपलब्ध).
(२) गीत रामायण.

आभारः
(१) नंदूरबार येथील राष्ट्रसेविका समिती सदस्या सौ. विद्युल्लता अभ्यंकर.
(२) मायबोलीवरील गप्पागोष्टी पानावरचे अनेक ज्यांनी मला शुद्धलेखनाविषयी मदत केली: सानी, भुंगा, स्मिता बिनिवाले, व अनेक इतर.

लेखातील सर्व छायाचित्रे: प्रत्यक्ष स्थळांवर जाउन काढली आहेत. प्रताधिकार सुरक्षित.





Wednesday, November 3, 2010

चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू (२००८): एक अनोखा अनुभव

सहावीत असताना माझी शाळा बदलली आणि त्याचबरोबर पंधरा मिनिटात नाचत, बागडत दंगा करत शाळेत जाण्याची सवय सुटली. अर्थात, चालत केलेल्या प्रवासात जरी घर ते विक्रोळी रेल्वे स्थानक आणि दादरला उतरल्यावर शाळेपर्यंत, आणि मग पुन्हा संध्याकाळी शाळा ते दादर स्थानक आणि विक्रोळी स्थानक ते घर अशी भरीव वाढ झाली असली, तरी त्यातली मजा निघून गेली होती. कारण मज्जा करण्याची जागा आता "कधी एकदा स्टेशन/शाळा/घर गाठतोय" या जगप्रसिद्ध मुंबईछाप घाईने घेतली होती. लवकरच नवखेपण जाऊन अस्मादिकांचे रूपांतर चतुर मुंबईकर रेल्वे प्रवासी (ही द्विरुक्ती आहे) असं झालं, आणि मी दादर लोकल मध्ये खिडकीतली जागा किंवा निदान बसायला जागा पटकावण्यासाठी माटुंगा स्टेशन गाठायला सुरवात केली.

आता तुम्ही विचाराल की मी हे सगळं का सांगतोय? याचा आणि चित्रपटांचा काय संबंध? पण आहे संबंध, ऐका तर खरं! एके दिवशी शाळा सुटल्यावर काही काम होतं म्हणून मित्राबरोबर सहज दादर स्टेशनपर्यंत गेलो आणि फलाट क्रमांक एक/दोन वर दादर लोकलची वाट पाहू लागलो. वेळ घालवायला वरती लावलेल्या टिव्ही संचावर लागलेल्या जाहीराती पाहू लागलो. जाहीराती संपल्यावर अचानक एक सुखद धक्का बसला. तिथे चक्क माझे आवडतं कार्टून टॉम अ‍ॅण्ड जेरी दाखवत होते!! मग काय, रोज धावत धावत दादर स्टेशन गाठणे आणि गाडीची वाट बघता बघता टॉम अ‍ॅण्ड जेरी बघणे हा रोजचा उद्योग झाला. आधीच वॉल्ट डिझ्नेच्या कार्टून्सनी वेड लावलंच होतं, त्यात आता ह्याची भर पडली. मग काही वर्षांनी उपग्रह वाहिन्यांचा जमाना आला आणि कार्टून नेटवर्कच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशनचा खजिनाच मिळाला आणि इतर काही अ‍ॅनिमेटेड मंडळींशी ओळख झाली.

मात्र त्याच बरोबर घरी आणि दारी ऐकाव्या लागणार्‍या टोमण्यांमुळे एक गैरसमज झाला तो म्हणजे कार्टून्स किंवा अ‍ॅनिमेशन हा फक्त लहान मुलांनी बघण्याचा चित्रप्रकार आहे. अर्थातच हे खोटं आहे ही गोष्ट लवकरच लक्षात आली, पण अजूनही भारतात सर्वत्र तोच समज आहे. जेव्हा जेव्हा आपल्याकडे एखादा धमाल अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होतो, तेव्हा तेव्हा चित्रपटगृहात जे मोठे आपल्याला दिसतात त्यातले जवळ जवळ सगळे सिनेमा चांगला आहे म्हणून नव्हे तर फक्त लहान मुलांबरोबर कुणीतरी हवं म्हणून आलेले असतात. एकेकटे आले तरी कबूल करत नाहीत. असेच अनेक जण तर "अरे मुलीला आणणार होतो, पण तिचा एक्स्ट्रा क्लास होता, मग तिकीट वाया गेलं असतं म्हणून मित्राला घेऊन आलो," असं सांगून वेळ मारून नेतात. काही विशिष्ठ हाणामारी आणि विनोदपट वगळता आपल्या वेगळेपणामुळे जसे काही सिनेमे जसे आपल्याकडे लागत नाहीत, तसेच अनेक चांगले अ‍ॅनिमेशनपटही आपल्याकडे लागत नाहीत. असाच एक वेगळा असलेला, पण बहुतेक आपल्याकडे प्रदर्शित झालेला, अ‍ॅनिमेशनपट म्हणजे "हॉर्टन हिअर्स अ हू" हा नितांतसुंदर सिनेमा.


बघायला गेलं तर धमाल मनोरंजन, पण नीट पाहिला तर या चित्रपटातून आपल्याला चक्क अध्यात्मावर, सुजाण पालकत्वावर आणि काही सामाजिक वैगुण्यांवरही भाष्यही केल्याचं जाणवेल. आता कथेकडे वळू (हुश्श! असे काही आवाज ऐकू येताहेत मला ;) ).

नूल नावाच्या जंगलात काही नैसर्गिक घडामोडींमुळे धुळीचा एक कण एका फुलावरुन उडून हवेत तरंगत तरंगत जात असताना एका छोट्या तळ्यात आंघोळ करत असलेल्या हॉर्टन (Jim Carrey) या अत्यंत लाघवी आणि जंगलातील निसर्ग शिक्षक असलेल्या हत्तीची नजर वेधून घेतं, ते त्याला त्यातून एक अत्यंत छोटासा चित्कार ऐकू आल्यामुळे. हॉर्टन मग त्या धुळीच्या कणाची 'स्थापना' त्याच्या हातातल्या एका गुलाबी फुलावर करतो. कल्पनाशक्ती जोरात असलेल्या हॉर्टनला त्या धुळीच्या कणात अतीसूक्ष्म लोक राहत असलेलं 'हू-विल" (Who-ville) नामक एक अख्खंच्या अख्खं शहर असल्याचा साक्षात्कार होतो. या शहराचा महापौर असतो नेड मॅक्डॉड (Steve Carell). त्याच्या बरोबर राहत असतं त्याचं अवाढव्य कुटुंब - त्याची बायको सॅली (Amy Poehler) आणि "ह" (H) या अक्षराने नाव सुरू होणार्‍या शहाण्णव मुली - हो, ९६ मुली (Selena Gomez), आणि त्यांच्या पाठीवर झालेलं सत्याण्णवावं अपत्य आणि प्रथेनुसार वारसाहक्काने महापौरपदासाठीचा पुढचा दावेदार असलेला जोजो नामक मुलगा (Jesse McCartney). जोजोला मात्र पुढचा महापौर होण्यात काहीच रस नाहीये, त्याला व्हायचंय संशोधक, शास्त्रज्ञ.

ह्या महापौर साहेबांना डॉक्टर ला-रू Dr. LaRue (Isla Fisher) यांच्या सांगण्यानुसार असं लक्षात येतं की हॉर्टनने हू-विल् शहरासाठी जर लवकरच एक सुरक्षित स्थान शोधलं नाही तर हू-विल नष्ट होईल. मग ते तत्परतेने हॉर्टनला तसं सांगतात. मग सुरु होतो हॉर्टनचा माऊंट नूल या डोंगरावर तो धुळीचा कण पोहोचवण्याचा आटापिटा. अर्थातच इतर कुणाचाही एका धुळीच्या कणात एक शहर वसलंय यावर विश्वास बसत नाही, त्यामुळे हॉर्टनला जंगलातल्या जवळ जवळ सगळ्या प्राण्यांकडून कुचेष्टा आणि मानहानीला सामोरं जावं लागतं. यात आघाडीवर असते ती एक खडूस कांगारू (Carol Burnett), आणि उपद्व्यापी माकडांची जोडी असलेले विकरशॅम बंधू (Frank Welker and Dan Castellaneta).

हू-विल शहरात (हॉर्टनच्या धांदरटपणामुळे) अनेक गूढ घटना घडू लागल्याने शेवटी महापौर महाशयांना आपल्या नागरिकांना खरं खरं सांगावं लागतं. पण जसा जंगलवासी प्राण्यांचा जसा हॉर्टनवर विश्वास बसत नाही तसाच हू-विलकरांचा आपल्याच महापौरांवर विश्वास बसत नाही. दरम्यान, कांगारूबाई धुळीचा कण असलेलं ते गुलाबी फूल हॉर्टनकडून पळवण्यासाठी व्लाड व्लाडिकॉफ (Will Arnett) नामक एका खलप्रवृत्त गिधाडाला सुपारी देते. याचे उच्चार रशियन दाखवले आहेत हा उल्लेखनीय भाग. पण त्याबद्दल पुढे. व्लाडने हॉर्टनकडून ते पळवण्याच्या भानगडीत ते फूल तशाच दिसणार्‍या फुलांच्या ताटव्यात पडल्यामुळे हू-विल शहरात प्रचंड भूकंप होतो. हॉर्टनला ते फूल सापडते आणि सुदैवाने तो भूकंप आणि एका पाईपमधून येणारा हॉर्टनचा आवाज यामुळे निदान हू-विल करांना आपण एका धुळीच्या कणावर राहत असल्याची खात्री पटते. ते हॉर्टनवर त्यांचा विश्वास असल्याचे त्याला सांगतात.

शेवटी कांगारू इतर जंगलवासीयांना एकत्र करून हॉर्टनला पकडून पिंजर्‍यात टाकू पाहते आणि त्या फुलाला बिझलनटच्या उकळत्या तेलात टाकायचा आदेश देते. आता शेवटचा पर्याय म्हणून महापौर मॅक्डॉड सर्व हू-विलवासीयांना "आम्ही इथे आहोत" असं ओरडायला फर्मावतात. या प्रयत्नांत जोजो सामील होतो आणि आणि एका भोंग्यातून तोही आरोळी ठोकतो. अगदी शेवटच्या क्षणी कांगारूने तिच्या पिशवीतून अनेक वर्ष बाहेर पडू न दिलेला मुलगा रूडी (Josh Flitter) याला त्या धुळीच्या कणातून हू-विलकरांचा आवाज ऐकू येतो. आईच्या विरोधाला न जुमानता तो पिशवीच्या बाहेर झेप घेऊन ते फूल वरच्यावर उचलतो. जंगलातल्या प्राण्यांनाही आपण काय करायला जात होतो ह्याची जाणीव होते आणि ते हॉर्टनला शाबासकी देतात. हॉर्टन कांगारूकडे मैत्रीचा हात पुढे करतो आणि ती तो स्वीकारते. अशा रीतीने शेवट गोड होऊन सगळे जंगलवासी आणि हू-विल् वासी गाणं म्हणत म्हणत माऊंट नूल कडे जाऊ लागतात. याच वेळी कॅमेरा झूम-आऊट होतो आणि आपल्याला सांगतो की फक्त हू-विल् नव्हे, तर नूलचे जंगल आणि आपली पृथ्वी तसेच आपली सूर्यमालिका हे या विश्वात एका धुळीच्या कणाप्रमाणेच अतीसूक्ष्म आहे.



आता हा सिनेमा मला का आवडला ते सांगतो. वरच्या शेवटच्या दृश्याने आपणच नव्हे तर आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमालिका या अफाट विश्वाच्या पसार्‍यात किती नगण्य आकाराची आहे याची जाणीव होते आणि "मी म्हणजे कोण" कसा गर्व करणे कसे फोल आहे हे समजतं. म्हणूनच मी सुरवातीला....खरं तर सुरवातीला म्हणजे मुद्द्याला हात घालण्याआधी बरंच पाल्हाळ लावल्यानंतर....जे म्हणालो होतो ना की यात थोडं अध्यात्म किंवा तत्त्वज्ञान दिसतं म्हणून, ते हेच.

हॉर्टन आकाराने मोठा असला तरी तो आपल्या आकाराचा उपयोग 'सद् रक्षणाय' यासाठीच करतो. तो एक खरा मित्र आहे आणि कल्पक शिक्षकही. आपण जर ताकदवान असलो तर आपल्या ताकदीचा उपयोग दुर्बळांचे रक्षण करण्यासाठी केला पाहीजे, आणि आपलं वय कितीही असलं तरी आपल्या आत दडलेलं लहान मूल, आपला आतला आवाज, कल्पनाशक्ती, नव्या कल्पना यांच्यासाठी आपल्या मनाची कवाडे सदैव उघडी ठेवली पाहीजेत हे ही यातून ध्वनित होतं.
वर उल्लेख न झालेलं एक पात्र आहे चित्रपटात आणि ते म्हणजे हॉर्टनचा खास मित्र असलेला मॉर्टन (Seth Rogen) हा उंदीर. याच्या बोलण्याकडे हॉर्टन नेहमीच लक्ष देऊन ऐकतो. मुख्य म्हणजे हॉर्टन जेव्हा जेव्हा चुकतो तेव्हा तेव्हा तो त्याला झापतो. सल्लागार कसा असावा याचं मॉर्टन हे उत्तम उदाहरण असल्याचं आपल्याला लक्षात येतं.

महापौर मॅक्डॉड यांचा मुलगा जोजो हा शहाण्णव मुलींच्या पाठीवर जन्माला आला आहे असं हू-विल् शहराच्या प्राथमिक ओळखीत आपल्याला समजतं. चित्रपट बघताना लहान मुलांना यातली मेख समजणार नाही, पण बहुतेक मोठ्यांना नक्की समजेल. सिनेमा ज्या देशात बनतो त्यातले संस्कृतिक-सामाजिक संदर्भ हे त्यात येतातच. त्यामुळे मॅक्डॉड यांच कुटुंब हे एका अ‍ॅनिमेशनपटातलं असलं तरी हे संदर्भ आपल्याला दुर्लक्षित करता येत नाहीत. आपल्या ओळखीत किंवा नात्यात एक-दोन तरी कुटुंब अशी असतात की ज्यात एकतरी मुलगा हवाच या अट्टाहासापायी दोन किंवा तीन मुलींच्या पाठीवर एक मुलगा असं बघायला मिळतं. आपल्याच देशात बुरसटलेले विचार असल्याचा आपला गैरसमज यातून दूर होतो. घरोघरी या ऐवजी देशोदेशी मातीच्याच चुली हेच खरं याची जाणीव हा भाग आपल्याला करुन देतो.

जोजोचं आपल्यावर लादण्यात आलेल्या 'भावी महापौर' या लेबलामुळे नाराज असणं आणि संशोधक व्हायची इच्छा बाळगणं हेही अत्यंत सूचक आहे. आपल्याकडे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, आणि दुकानदाराचा मुलगा दुकानदार, तसंच सिनेनटाचा मुलगा अभिनेताच व्हावा, किंवा मग राजकारण्याचा मुलगा राजकारणातच पडावा, पुढारीच व्हावा अशी आई-बापाची इच्छा असते. अर्थात, कधी कधी त्यांना दुसरा पर्यायही नसतो म्हणा, पण आपल्या मुलावर आपल्या आवडी लादू नयेत, त्याला ज्यात गती आहे ते करु द्यावं हा फार महत्त्वाचा संदेश हा चित्रपट अत्यंत तरलतेने देतो. ही गोष्ट एकदा आपल्या लक्षात आली, की मग सिनेमाभर जोजोचं दु:खी चेहरा घेऊन घुम्यासारखं वावरणं आपल्या काळजाला भिडून जातं. मॅक्डॉड आणि जोजो या बाप-लेकाचं नातंही ताणावपूर्ण असलं तरी जोजोचं आपल्या बापावर प्रेमही आहे, कारण गुप्तपणे उभारलेली आपली प्रयोगशाळा तो बापाला वाईट वाटेल म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बापापासून लपवूनच ठेवतो.

चित्रपटातील कांगारू ही सामान्यांना कस्पटासमान लेखणार्‍या राज्यकर्त्यांचे प्रतीकच म्हणायला हवी. जंगलातील जनता आपल्याऐवजी हॉर्टनचं ऐकू लागली तर तिच्या सत्तास्थानाला धोका पोहोचेल अशी तिला सतत भीती असते. याच भयापोटी ती विकरशॅम बंधू या माकडांच्या जोडीला आणि व्लाड व्लाडिकॉफ या गिधाडाला हॉर्टनवर सोडते. कांगारू आणखी काही गोष्टीचं प्रतीक आहे. ते म्हणजे अतीसंरक्षित आयुष्य देऊन आपल्या मुलांतील कल्पनाशक्ती मारणारे, आपल्या गृहतिकांना धक्का देणार्‍या बाहेरच्या गोष्टींची सतत भीती बाळगून असणारे पालक यांच. म्हणूनच ती रूडीला - आपल्या मुलाला - योग्य वेळ निघून गेल्यावरही आपल्या (पाऊच) पिशवीमध्येच ठेवते.

व्लाड व्लाडिकॉफ हे गिधाड चित्रपटातला एक खलप्रवृत्त पात्र आहे आणि त्याला रशियन उच्चारात बोलताना दाखवलं आहे. इथे थोडे राजकीय संदर्भ आहेत. अमेरिकेचं ज्या ज्या देशांशी प्रत्यक्ष युद्ध किंवा शीतयुद्ध झालं आहे त्या त्या देशांचे नागरिक दाखवलेले लोक अनेक वेळा अमेरिकन आणि ब्रिटिश सिनेमातून खलनायक म्हणून आपल्या समोर येतात. मग ते डाय हार्ड भाग २ आणि ३ मधले जर्मन अतिरेकी असोत किंवा इतर अनेक चित्रपटातले रशियन माथेफिरू.

विशेष गोष्ट अशी की हा चित्रपट हे सगळं सांगतो ते कसलाही आव न आणता, सहज कथेच्या ओघात.

तात्पर्य, कार्टूनपटांची संभावना 'मुलांचे मनोरंजन' म्हणून करणार्‍यांना हा आणि कदाचित असे अनेक चित्रपट हे झणझणीत अंजन ठरावेत. चला, मी आता थांबतोच. वाचून दमले असाल तर आणि हा चित्रपट बघणार असाल तर पुढच्या वेळेपर्यंत टाटा :)



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

मोगरा फुलला दिवाळी अंक येथे पूर्वप्रकाशित.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

संदर्भ:

(१) स्टार मुव्हीज, एच.बी.ओ. वरील चित्रपट बघणे.
(२) कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया. (कंसातली नावे पात्रांना ज्यांचा आवाज वापरण्यात आला त्यांची आहेत.)

(३) सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

Thursday, October 28, 2010

चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)

मी प्रामुख्याने इंग्रजी चित्रपटांचा चाहता आहे. अगदी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. त्यांच्याकडे असलेलं विषयांच वैविध्य मला खूप आकर्षित करतं. नेहमीचे हाणामारी आणि विनोदपट तर बघतोच, पण शक्यतो थोडे वेगळे सिनेमे बघायला आवडतं. शिवाय यासारखे सिनेमे आपल्याकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसल्याने बघायला मिळत नाहीत, पण ते कुठल्यातरी वाहिनीवर किंवा डी.व्ही.डी.वर सहज बघायला मिळतात. अशाच काही मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहीण्याचा मानस आहे. सुरुवात २००८ साली आलेल्या पॅथोलोजी या सिनेमापासून करतोय. हे चित्रपटांचे परिक्षण मात्र नाही हे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलं असेलच. तुमच्यापैकी ज्यांना असे वेगळे इंग्रजी सिनेमे बघायची हौस आहे त्यांना या लेखनाचा उपयोग झाला तर मी कृतकृत्य होईन.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


तुम्हाला खून करायचाय? हो, बरोबर वाचलंत, खून - मर्डर, हत्या, खलास करणे वगैरे ज्याला म्हणतात तो.......बहुतेक मी सुरवात चुकीच्या पद्धतीने केली. जरा वेगळ्या पद्धतीने विचारतो. समजा तुम्हाला अशी हमी मिळाली की खून केल्यावर कोणतेही परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाहीत, तर तुम्ही खून कराल? हो, अगदी कुण्णा कुण्णाला कळणार नाही तुम्ही खून केलाय ते. मग, काय विचार आहे तुमचा? आता तुमच्यापैकी बहुतेक जण सरसावून बसतील. तुमचा होकार गृहीत धरतोय मी. कारण एव्हाना कदाचित ज्यांचा खून करावासा वाटतो अशी किमान दोन-चार जणांची नावंही तयार असतील तुमच्याकडे. आता मी तुम्हाला विचारलं की हे जे कोणी लोक आहेत, त्यांचे खून तुम्हाला का करायचे आहेत, तर त्याची तुमच्यापुरती वैय्यत्तिक वैमनस्यापासून किंवा समाजहित वगैरें कारणंही तुमच्याकडे तयार असतील.

इथेच पॅथोलॉजी या चित्रपटाचं वेगळेपण आहे. या चित्रपटात अनेक खून आहेत, पण त्याची कारणं अतिशय वेगळी, अगदी आपण कल्पनाही करु शकणार नाही इतकी वेगळी आहेत. इथे तोंडी लावण्यापुरती माफक मारामारीही आहे, शेवटी चित्रपटाच्या नायकाने घेतलेला सूड आहे, आणि ज्याला 'लव्ह, सेक्स और धोखा" म्हणतात ते सुद्धा आहे, पण हे सगळं हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडतो.

आधीच सांगतो. ज्यांना बिभत्स रसाचं वावडं आहे, किंवा ज्यांची हृदयं कमकुवत आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी ह्या सिनेमाच्या वाट्याला जाऊ नये. कारण हा चित्रपट अतिशय अंगावर येणारा असा आहे. मेंदूला झिणझिण्या येणं म्हणजे काय याचा अनुभव हा सिनेमा देतो.

चित्रपट सुरु होतो ते मृतदेहांची तोंडं एका इस्पितळातील निवासी विद्यार्थ्यांनी हलवण्याच्या दृश्याने. एखाद्या पपेट शो मध्ये जसं दोर्‍यांच्या सहाय्याने बाहुल्यांचे अवयव हलवले जातात तसंच, पण इथे दोर्‍यांशिवाय, फक्त हातमोजे घातलेल्या हातांनी. काल्पनिक संवाद त्या मृतदेहांच्या तोंडी घालून त्यातला आनंद लुटणे हा उद्देश. इथेच आपल्याला शिसारी येते. पण वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून काम करताना, विशेषकरून शवविच्छदनाचं काम करताना संवेदनशील होऊन चालत नाही. किंबहुना असलेला संवेदनशीलपणा दाबून टाकावा लागतो, आणि मग त्यासाठी असली कृत्य जन्म घेतात.

या चित्रपटाचा नायक टेडी ग्रे (Milo Ventimiglia) हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून अत्युच्च गुण मिळवून देशातल्या सर्वात प्रतिष्ठीत पॅथोलॉजी अभ्यासक्रमात दाखल होतो. यात त्याच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्याच्या भावी सासर्‍याचाही वशीला असावा अशा अर्थाचं दृश्य त्याचं स्वागत करणार्‍या त्याच्या वरिष्ठांशी झालेल्या त्याच्या संवादातून आपल्याला समजतं. हे वरिष्ट त्याची ओळख इस्पितळातील अतिशय हुशार (की चलाख?) समजल्या जाणार्‍या गटातील डॉक्टर जेक गॅलो (Michael Weston) याच्याशी करुन देतात. डॉ. टेडीची हुशारी ओळखलेला जेक हा लवकरच डॉक्टर टेडी याला आपल्या गटात (की कंपूत?) सामील करुन घेतो.

या गटाच्या गूढ आणि विचित्र वागण्यामुळे डॉक्टर टेडीच्या मनात त्यांच्याविषयी सुरवातीपासूनच संशय निर्माण होतो. एके दिवशी पब मध्ये मौजमजा करत असताना डॉक्टर जेक मी तुम्हाला लेखाच्या सुरवतीला विचारलेला प्रश्न टेडीला विचारतो त्यावर डॉ. टेडी जे उत्तर देतो त्यात तो म्हणतो "आपण (माणसं) म्हणजे जनावरं आहोत. दुसर्‍याचा जीव घेण्याची वृत्ती आपल्यात उपजतच असते. तुम्हाला हे एव्हाना कळलं असेल असं मला वाटत होतं. हां, आता आपण सुधारलेले, पुढारलेले, वगैरे आहोत, त्यामुळे आपण याविषयी बीअर पिता पिता चर्चा करतो, प्रत्यक्ष कृती करत नाही इतकंच." या प्रसंगामुळे डॉ. टेडी हा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि तो 'आपल्यातला' होऊ शकतो हे त्या कंपूच्या लक्षात येतं.




हळूहळू या गटाचा एक भयानक खेळ डॉ. टेडीच्या लक्षात येतो तो त्यात पहिल्यांदा फसल्यावरच. तो खेळ असतो माणसं मारण्याचा. त्या गटातल्या प्रत्येकाने एक खून करायचा आणि तो खून म्हणजे तो मृत्यु कसा झाला असावा याचा अंदाज गटातील बाकीच्यांनी वर्तवायचा. ज्याचा खून ओळखता येणार नाही तो जिंकला असा हा खेळ असतो. शहरातल्या ज्या मृत्यूंचे नक्की कारण सर्वसाधारण डॉक्टरांना कळू शकत नाही असा प्रत्येक मृतदेह त्याच इस्पितळात येत असल्याने या गटाला शवागारात त्यांची चर्चा बिनबोभाट करता येते. डॉ. टेडी हाही हळू हळू त्यात गुंतत जातो. अशा प्रकारे जाणारा प्रत्येक बळी हा एक वाईट किंवा विकृत व्यक्ती असल्याचं त्याच्या मनावर ठसवलं गेल्यामुळे या कामात त्याला एक प्रकारचा आनंदही वाटू लागतो. मात्र हळूहळू बळी गेलेली माणसं ही सर्वसाधारण असून फक्त एका विकृत आनंदासाठी हा खेळ सुरु असल्याचं टेडीच्या लक्षात येतं. मात्र त्याला या खेळाचं व्यसन लागल्याने तो यातून बाहेरही पडू शकत नाही. यागटाचं खूनसत्र सुरुच राहतं. मात्र या सगळ्याला एक विचित्र वळण लागतं ते असाच एक खून करताना डॉ. जेकची प्रेयसी असलेली डॉ. ज्युलिएट बाथ (Lauren Lee Smith) हिच्यात गुंतल्यामुळे आणि त्यांचं हे प्रकरण डॉ. जेकला समजल्यामुळे. चिडलेला जेक त्याचा पुढचा खून म्हणून ज्युलिएटचाच जीव घेतो. ज्युलिएटचा मृत्यू कसा झाला याची चर्चा हा गट करत असताना शवागारतल्या इन्सिनरेटरच्या गॅस सिलेंडरचा खटका उघडाच राहिल्याचं जेकच्या लक्षात येतं (वास्तविक हे काम टेडीचंच असतं). एका प्रचंड स्फोटात सगळे मरतात. जेक मात्र बचावतो आणि टेडीबरोबर राहत असलेल्या त्याची वाग्दत वधू ग्वेन विलियमसन (Alyssa Milano) हिचा खून करतो.

टेडी अर्थातच चिडतो, मात्र तोही या खेळात गुंतल्यानं उघडपणे काहीही बोलू शकत नाही. ग्वेनचं पोस्ट मॉर्टम दुसर्‍या एखाद्या (हुशार) डॉक्टराच्या हातात गेलं तर आपलं बिंग फुटेल ह्या भीतीने तो स्वत:च ग्वेनचं शवविच्छेदन करतो आणि मायट्रल व्हॉल्व प्रोलॅप्स्ने हृदय अचानक बंद पडल्याची नोंद मृत्युचे कारण म्हणून करतो.

आपण अत्यंत हुशारीने केलेल्या खुनाची नोंद ही नैसर्गिक मृत्यू अशी झाल्याने संतप्त झालेला डॉ. जेक एक दिवस टेडीवर इस्पितळातच हल्ला करून त्याला बांधून ठेवतो आणि जाब विचारतो. टेडी त्याला "मला माहित होत..." अशा अर्थाचं बोलत असतानाच या खूनसत्राचा मूक साक्षीदार असलेला आणि जेकच्या गटाने 'बावळट' असं लेबल लावलेल्या टेडीचा सहकारी डॉ. बेन स्ट्रॅविन्स्की (Keir O'Donnell) हा ऐन वेळी मदतीला धावून येतो आणि औषध टाकलेल्या रुमालाने जेकला बेशुद्ध करून टेडीची सुटका करतो. मग हे दोघं जेकने ज्या पद्धतीनं ग्वेनला मारलेलं असतं त्याच पद्धतीनं जेकची इहलोकीची यात्रा संपवतात.

डॉ. जेक गॅलो हा ग्वेनला कसं मारतो आणि डॉ. टेडी आणि डॉ. बेन त्याच पद्धतीनं जेकला नक्की कसं संपवतात हे मात्र इथे सांगण्यात मजा नाही. अर्थातच तुम्हाला हे आंतरजालावर अनेक ठिकाणी वाचायला मिळेलच, पण माझं ऐकाल तर ते वाचू नका. हा लेख वाचून हा चित्रपट बघायचं ठरवलंच असेल तर ते तुम्ही प्रत्यक्ष छोट्या पडद्यावर बघा. हा सिनेमा स्टार मूव्ही किंवा एच.बी.ओ. वर काही महिन्यांपूर्वी लागून गेला आहे, कदाचित पुढेही लागेल. नाहीतर डी.व्ही.डी. विकत घेऊन बघता येईल.

ह्या चित्रपटातले बहुतेक नट आपल्याकडे फारसे माहित नाहीत. तसंच हा सिनेमा भारतात आला नाही त्याला यासारखी अनेक कारणं आहेत. अर्थात, काही सणसणीत अपवाद सोडले तर चांगल्या परकीय कल्पनेचं मातेरं कसं करावं यात नैपुण्य प्राप्त केलेले हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बरेच आहेत, त्यामुळे यांपैकी एखादा महाभाग इम्रान हाश्मी, जॉन अ‍ॅब्राहिम, डिनो मोरिया किंवा तत्सम ठोकळ्यांना घेऊन एखादा मल्लिकापट किंवा बिपाशापट काढण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. (आठवा: टॉम क्रूझचा कोलॅटरल आणि त्याची भ्रष्ट नक्कल असलेला इम्रान हाश्मीचा द किलर.) तेव्हा तो अत्याचार होण्याआधी मूळ इंग्रजी चित्रपट बघून घ्या.

चित्रपटातल्या सगळ्यांची कामं विलक्षण ताकदीची झाली आहेत. रूढ अर्थाने अनुक्रमे नायक आणि खलनायक असलेल्या टेडी आणि जेक यांचे काम केलेल्या मायलो वेंटिमिग्लिया (Milo Ventimiglia) आणि मायकल वेस्टन (Michael Weston) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. अनेक भयपट आणि बीभत्स रसाने ओतप्रोत सिनेमे बघूनही हा सिनेमा माझ्यासाठी अंगावर येणारा अनुभव होता, यात या दोघांच्या सशक्त अभिनयाचा मुख्य वाटा आहे. तेव्हा पुन्हा एकदा सांगतो, हा चित्रपट डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे, तेव्हा तुम्हाला बीभत्स रसाची अ‍ॅलर्जी असेल किंवा रक्तदाबाचा किंवा हृदयविकाराचा त्रास असेल तर ह्या सिनेमा न बघणं श्रेयस्कर.

तर, माणूस खून का करतो याला काही ठोस कारण असावंच लागतं असं नाही. निव्व्ळ मजा म्हणून माणसं मारली जाऊ शकतात किंवा माणसातलं जनावर बळावलं की हे सुप्त स्वभावविशेष उफाळून बाहेर येतात म्हणूनही माणसांना संपवलं जाऊ शकतं. कदाचित म्हणूनच कारण (motive) असो किंवा नसो, पोलीस सगळ्यांवरच संशय घेत असावेत. अर्थात हे विचार नेणिवेच्या पातळीवर (subconsciously) होत असावेत. काहीही असो, शेवटी आपण जनावरं आहोत, नाही का?

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संदर्भ:

(१) स्टार मुव्हीज, एच.बी.ओ. वरील चित्रपट बघणे.


(२) कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया.

(३) सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


दीपोज्योती दिवाळी अंक येथे पूर्वप्रकाशित.