Monday, August 18, 2014

दहीहंडीचा सण अशा प्रकारे साजरा करता येईल का?

दहीहंडीचा सण अशा प्रकारे साजरा करता येईल का?

मित्रहो, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मला हे देखील मान्य आहे की अक्कल शिकवण्याची वेळ येते तेव्हा पहिल्यांदा काही घटिंगणांना हिंदूंचेच सण सुचतात. पण मी या बाबतीत भाष्य करण्याचे कारण म्हणजे दहीहंडीचा सण ज्या प्रकारे साजरा केला जातो त्याला प्राप्त झालेले विकृत रूप. आपण आपल्याच बांधवांना मृत्यूच्या दाढेत आणखी किती काळ लोटत राहणार आहोत? पडल्यावर ब्रह्मांड कशा प्रकारे आठवतं हे जाणून घ्यायचे असेल तर घरातल्या घरात पार्श्वभागावर पडून पहावे. म्हणूनच मेले ते सुटले असं म्हणावं अशी अवस्था अपंगत्व आलेल्यांची होते हे वेगळं सांगायला नकोच.  तेव्हा अशा प्रकारे वर्षानुवर्ष आपण मानवी नुकसान सोसून आपल्याच धर्माची हानी करुन घेण्यापेक्षा निदान या सणाच्या विकृतीकरणाकडे तरी गंभीर लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. यावरुन मला हा उत्सव साजरा करण्याची जी कल्पना सुचली आहे ती तुमच्या समोर मांडत आहे. तुम्हाला आवडली तर ती जरूर तुमच्या लाडक्या राजकीय नेत्यांपर्यंत किंवा पक्षापर्यंत पोहोचवा. एकाने जरी ही कल्पना उचलून धरली तरी मला भरून पावल्यासारखे होईल.

सद्ध्या दहीहंडी आणि त्यात लागणार्‍या मानवी थरांबद्दल बरंच काही वाचायला मिळत आहे. हंडी फोडत असताना झालेले अपघात हे अशा प्रत्येक चर्चेच्या आणि वादविवादाच्या केंद्रस्थानी दिसतात. यावर एक कल्पना सुचली आहे जेणेकरुन उत्सव उत्साहात साजराही करता येईल आणि होणारे मानवी नुकसान टाळताही येईल.

श्रीकृष्णाच्या काळात गृहिणी काही दह्याच्या हंड्या मोठमोठ्या इमारतींमधे बांधून ठेवत नसत. त्या घरातच छताला टांगून ठेवत होत्या. त्यामुळे हा उत्सव साजरा केला जाण्याची आताची पद्धत ही चर्चांमध्ये म्हटले जात असल्याप्रमाणे धोकादायकच नव्हे तर धार्मिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्याही चुकीची वाटते.

तेव्हा हा उत्सव साजरा करताना शाळांमधल्या वर्गात किंवा सभागृहात किंवा मग चक्क मंगल कार्यालय भाड्याने घ्यावा व तिथे हंडी बांधावी. जिथे हंडी बांधली जाईल तिथे हंडीची उंची साधारणपणे गावाकडच्या घरांच्या छताएवढीच असेल असे पहावे. गोविंदा म्हणून लहान मुलांना घ्यावे व जास्तीत जास्त तीन थर होतील अशा प्रकारे त्यांना हंडी फोडायला लावावी

हे करण्यासाठी जी जागा निश्चित केली जाईल तिथे गणपतीत जसे देखावे केले जातात तशा प्रकारे देखावा उभा करावा. म्हणजे जुन्याकाळचे वाटेल असे सामान, दह्याच्या हंड्या इकडेतिकडे ठेवलेल्या, एखादी जुनाट खाट, वगैरे. या देखाव्यांमुळे जास्त लोकांना काम मिळेल. अधिकाधिक सुंदर देखावा तयार करणार्‍या कलाकारांना किंवा असणार्‍या दहीहंडी मंडळांना रोख पुरस्कार द्यावेत. त्या देखाव्यात दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांची त्या वर्षीची शाळेची फी परस्पर भरली जावी. आणखी अनेक गोष्टी राबवल्या जाऊ शकतात.

तर मित्रहो, कशी वाटली कल्पना. ही कल्पना आवडल्यास इथे सांगायला विसरू नका. तसेच वर आवाहन केल्याप्रमाणे तुमच्या आवडत्या राजकीय नेत्यापर्यंत आणि पक्षापर्यंत पोहोचवायला विसरू नका.



|| धर्मो रक्षति रक्षित: ||

Thursday, April 24, 2014

टग्यामहाराज बारामतीकर

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
अंत करु पाही
मुतोनिया ||

भगिनीस याच्या
मतदान करा
अन्यथा पाण्याला
बूच मारी ||

विरोध करती
नतद्रष्ट काही
टग्या महाराजां
दृष्ट लागे ||

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला? ||

अगस्त्य अवतार
बारामतीचा टग्या
वंदावेच त्याला
पुन्हा पुन्हा ||

टग्यामागे उभा
तो जाणता राजा
आणि त्याची प्रजा
"शुभेच्छुक" ||

शाई पुसोनिया
मतदान करा
द्विगुणित करा
आनंदही ||

रामराया पुढे
हनुमान उभा
तैसेच ठाकले
हे ते दोघे ||

बोले तैसा चाले
जयांची ही कीर्ती
तयांना वंदावे
पुन्हा पुन्हा ||

Friday, January 24, 2014

मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?


गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले.

तर गुजरातच्या दंगलींच्या वेळेला नरेन्द्र मोदी मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्यावर मौत का सौदागर असल्याचा आरोप केला जातो. पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार यांच्यावर होता. यांच्याव्यतिरिक्त धरमदास शास्त्री (काँग्रेस), अर्जुनदास (काँग्रेस) व कमलनाथ (काँग्रेस) यांच्यावरही आरोप होते. १९९९ च्या निवडणुकीत वाचाळ मनमोहन सिंगांनी, 'या दंगलीत रा.स्व.संघाचा हात होता' असा धडधडीत खोटा आरोप केला होता. दंगलींनंतर पंतप्रधान राजीव गांधींनी "एक मोठे झाड पडते तेव्हा जमीन हादरतेच" असे बेजबाबदार विधान करुन शी़खांच्या जखमेवर मीठ चोळले होते. मग त्यांना हे मौ.का.सौ. हे विशेषण लावायला काँग्रेसवाले का विसरले?

आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या दंगलींत बहुसंख्य वेळेला भाजपेतर सरकारे......आणि बहुतेक ठिकाणी काँग्रेसचीच सरकारे व मुख्यमंत्री होते हे या यादीवरुन स्पष्ट आहे. अशांना का नाही मौ.का.सौ. असे विशेषण लागले? की देशपातळीवरच्या राजकारणात नरेन्द्र मोदी आपल्याला भविष्यात भारी पडू शकतात हे आधीच ओळखल्याने काँग्रेसची तंतरली? आता या सगळ्या दंगलींच्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सगळ्यांना मौत का सौदागर म्हणायला काँग्रेस तयार आहे का?