Sunday, June 5, 2016

अली नामक एका वादळाला श्रद्धांजलीक्ले म्हणजे माती. माती - लोक जिला पायदळी तुडवतात ती. जिला कायम तुच्छ लेखलं जातं ती माती. एखाद्याला नेस्तोनाबूत केल्यावर आपण म्हणतो 'धूळ चारली', आय मेड हिम बाईट द डस्ट.

कॅशिअस मार्सेलिअस क्ले या नावाने जन्मलेल्या त्या विलक्षण मानवाने एक दिवस ठरवलं की मी माती म्हणून ओळखला जाणार नाही. मला कुणी तुच्छ म्हणू शकणार नाही. आणि मला कुणी धूळही चारू शकणार नाही. आय विल नॉट बाइट द डस्ट, एव्हर. क्ले ऐवजी त्याने अली हे नाव धारण केलं. अली म्हणजे 'उच्च', 'वरचा', 'उत्कृष्ठ'. आणि मग कृष्णवर्णीयांविरुद्ध होत असलेल्या अन्याय आणि भेदभावाने पेटून उठलेला कॅशिअस मार्सेलिअस क्ले झाला मोहम्मद अली. अली!!!

लहान मुलांत प्रचंड उर्जी असते. त्याला योग्य वळण लावल्यास मोठे चमत्कार घडू शकतात. अलीच्या आयुष्यात असाच एक चमत्कार घडला. सायकल चोरली म्हणून चोरट्याला ठोकून काढण्याची गर्जना करणार्‍या अलीला योग्य दिशा दाखवली ती एका पोलीस अधिकार्‍याने. ठोकून काढायला आधी ते कसं करायचं ते शिकावं लागतं असा धडा त्याने अलीला दिला, आणि दिशा दाखवली मुष्टीयुद्धाच्या प्रशिक्षणाची. आणि मग तो पुढची दोन दशकांहून अधिक काळ थांबलाच नाही. प्रतिस्पर्ध्यांना ठोकून काढणे हे एकमेव लक्ष्य ठरवून तो त्यात यशस्वी होत गेला. इतका, की एकोणीसशे साठ साली व्यावसायिक मुष्टीयोद्धा झाल्या नंतर सलग एकोणीस लढती त्याने जिंकल्या. त्यातल्या तब्बल पंधरा लढतीत त्याने प्रतिस्पर्धी मुष्टीयोद्ध्यांना भुईसपाट, म्हणजे नॉक आउट केलं.

पण अलीची रग केवळ प्रतिस्पर्ध्याला रिंगमधेच नामोहरम करण्यावर समाधान होत नसे. आपल्याकडे जसं क्रिकेटमधे प्री-मॅच स्लेजिंग होतं, तसं अली प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अतिशय आढ्यताखोर आणि अपमानास्पद वक्तव्य करुन त्याला भयानक राग आणत असे. प्रतिस्पर्ध्याला उद्देशून शेलक्या विशेषणांचा उपयोग करण्यात तो कुठलाही विधिनिषेध बाळगत नसे. कधी कुणाला अमुकच राउंडमधे आडवा करण्याची वल्गना असे, कधी कुणाला "तुला आता पेन्शनीतच काढतो" अशी धमकी असे, तर कुणाला कुठल्यातरी प्राण्याची उपमा देऊन हिणवणं असे. लढतीच्या आधीच प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यात जाण्याची कुठलीही संधी अलीने सोडली नाही. त्याला पहिलं विश्वविजेतेपद मिळवून देणार्‍या लढती आधी देखील त्याने त्याचा प्रतिस्पर्धी सॉनी लिस्टन याला 'अस्वल' अशी उपमा देऊन त्याला प्राणीसंग्रहालयात टाकण्याची गरज असल्याचा चिमटा काढला होता. अक्षरशः राक्षसी चणीचा अवाढव्य लिस्टन हे ऐकल्यावर प्रचंड भडकला होता. प्रत्यक्ष लढतीच्या वेळी रिंगमधे मात्र लिस्टनला त्याचा राग अलीवर काढता आला नाही. त्या वेळी विश्वविजेता हा किताब राखण्यात लिस्टन अयशस्वी ठरला आणि अलीला त्याचं पहिलं विश्वैजेतेपद मिळालं.

अलीने या लढतीनंतर इस्लामचा स्वीकार केला. क्लेचा अली कसा झाला, त्याची बीजं कुठे रोवली गेली हे शोधताना एक सर्वश्रुत कथेचा आधार घ्यावा लागतो. आपल्या मित्रांबरोबर 'फक्त श्वेतवर्णीयांसाठी' असलेल्या एका हॉटेलात अली गेला. तिथे त्याला जेवण देण्यास तिथल्या व्यवस्थापनाने नकार दिला. अर्थात, हे एकंच कारण असेल असे नव्हे, पण या घटनेचा खोल परिणाम त्याच्यावर झाला हे निश्चित.

लढतीआधी इतरांना हिणवून चीड आणणारा आणि कदाचित त्याचाच उपयोग लढतीत करुन घेणारा अली मात्र लढतीच्या वेळी स्वतःच्या रागावरचा ताबा कधीच सुटू देत नसे. धर्म आणि नाव बदलून काळ लोटला तरी अर्नी टेरेल हा मुष्टीयोद्धा त्याला कायम 'क्ले' असंच संबोधत असे. त्याचा राग मनात ठेऊन अलीने त्याच्या विरुद्ध एकोणीसशे सदुसष्ट साली लढतीला उतरल्यावर प्रत्येक जोरदार ठोशागणिक "अंकल टॉम, सांग माझं नाव काय आहे?" असं सुनावत त्याला ठोकत गेला. ही अत्यंत चुरशीची झालेली लढत अलीनेच जिंकली हे वेगळं सांगायला नकोच.

(हे लिहीत असताना उगाचच जॉनी मेरा नाम सिनेमात देव आनंद प्राणला ठोसे लगावत असताना प्रत्येक ठोशागणिक "मेरा नाम जॉनी नहीं है" असं ठणकावतो त्याची आठवण झाली. देव आनंद कुठे, मोहम्मद अली कुठे! Silly me! पण असंही असू शकेल, की या लढतीत घडलेल्या या शारीरिक आणि शब्दांच्या आदानप्रदानाचा उपयोग चित्रपटकर्त्यांनी सिनेमा बनवताना कशावरुन केला नसेल? शक्यता आहे. असो, अवांतर खूप झालं.)

जगात आपला काही संबंध नाही तिथे नाक खुपसायची आणि लष्कर घुसवायची ही अमेरिकेची वाईट खोड. पण अंगात प्रचंड रग असली आणि लढण्याची कायम खुमखुमी असली तरी तो पर्यंत संपूर्ण धर्मांध झालेल्या आणि धर्माव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी युद्ध करायला नाखुष असलेल्या अलीने व्हियेतनाम युद्धाच्या वेळी लष्करात दाखल व्हायचा आदेश आल्यावर त्याला स्पष्ट नकार दिला. आणि वर "ज्यांचे आपल्याशी कोणतेही वैर नाही त्या व्हियेतनामी लोकांना मारायला मी का हातात बंदूक घेऊ?"अशी मखलाशीही केली. साहजिकच त्याबद्दल त्याने सरकारचा रोष ओढवून घेतला आणि त्याच्या मुष्टीयुद्ध खेळण्यावर बंदी आणण्यात आली. तीन वर्ष हे तूफान शांत राहिलं. पण तो तेव्हा स्वस्थ बसला नाही. त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि तिथे मात्र त्याला न्याय मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरची बंदी उठवली आणि हे वादळ पुन्हा धुमाकूळ घालायला सज्ज झालं.

पण देवांनाही प्रसंगी माघार घ्यायला लागते अशा या जगात कुणीच कायम अजिंक्य राहू शकत नाही. अलीलाही याचा अनुभव जो फ्रेझिअर विरुद्धच्या जगप्रसिद्ध लढतीत आला. फ्रेझिअरला दमवण्यासाठी रिंगच्या दोरांचा आधार घेत रिंगमधे त्याला फिरवणार्‍या अलीला फ्रेझिअरने मारलेल्या एका जोरदार हुकच्या फटक्याने आडवं केलं. अली मोजून तीन सेकंदांनी उठला. मात्र तो पर्यंत पंचांनी फ्रेझिअरला विजेता घोषित केले होते. अशा तर्‍हेने अलीला पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. असं जरी असलं तरी एकोणवीसशे एकहात्तर सालची ही लढत मुष्टीयुद्धाच्या विश्वातील आजपर्यंतची सर्वोत्तम लढत म्हणून मानली जाते.

मात्र पराभव शांतपणे घेईल तो अली कसला? या लढतीनंतर या वादळाने दोन वेळा विश्वविजेतेपद स्वतःकडे अक्षरशः खेचून आणलं. त्यातल्या पहिल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत हेविवेटचा बादशहा जॉर्ज फोरमनला हरवून तर दुसरं विश्वविजेतेपद जो फ्रेझिअर विरुद्धची लढत जिंकून तीन वर्ष आधी झालेल्या पराभवाचा वचपा काढत तो विश्वविजेता झाला.

अत्यंत अहंकारी आणि उर्मट असलेल्या अलीला स्वत:बद्दल इतका आत्मविश्वास होता, की त्याने स्वतःच्या आत्मचरित्राचं शीर्षक 'द ग्रेटेस्ट' असं ठेवलं. त्याची दुसरी मुलगी लैला अली, ही देखील मुष्टीयोद्धा म्हणून प्रसिद्धी पावली.

अखेर एकोणवीसशे एक्क्याइंशी साली या तूफानाने निवृत्ती पत्करली. त्याचं दुर्दैव असं की कारकीर्दीत तब्बल एकोणतीस हजारावर ठोसे खाऊन ताठ उभा असलेल्या अलीला निवृत्तीनंतर लगेचच पार्किन्सन्स या आजाराने गाठलं आणि त्याच्या साध्या साध्या हालचालींवरही बंधनं आली. पण, पण, पण, स्वस्थ 'बसेल' तो अली कसला. त्याने त्याही अवस्थेत पार्किन्सन्सग्रस्त रुग्णांसाठी सामाजिक कार्य सुरु केलं आणि ते खूप वाढवलं.

अशा या बहुपेडी व्यक्तीमत्वावर चित्रपट निघाला नसता तरच नवल होतं. हॉलीवुडच्या अत्यंत हरहुन्नरी, अष्टपैलू, आणि धमाल अभिनेता विल स्मिथ याने "अली" या नावानेच काढलेल्या चित्रपटात खूप मेहनत घेऊन अलीची भूमिका केली होती. वाचनाचा कंटाळा असेल, तर हा सिनेमा नक्की पहावा.दुर्दैवाने या आजारातच काल त्याचा मृत्यू झाला, आणि दैवदुर्विलास असा की क्ले या नावाचा तिटकारा असणारा अली, मातीतच विसावण्यास सज्ज झाला.

या वादळाला नम्र श्रद्धांजली.

अली, तू कायम जगाच्या स्मरणात राहशील. रेस्ट इन पीस अली. रेस्ट इन पीस.

--------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ १४, शके १९३७
--------------------------------------

4 comments:

 1. ही तू फक्त एकच बाजू लिहिलीस. मुष्टीयोद्धा म्हणून असेल कितीही ग्रेट पण माणूस म्हणून तितकाच फालतू इसम होता तो हे माझं वैयक्तिक मत. पक्का अंधइस्लामी, आढ्यताखोर, उर्मट. धर्मापुढे राष्ट्रहिताला काहीही किंमत नाही असं मानणारा. युद्धात लढायला त्याने नकार दिला त्याचं तू दिलेलं कारण हे अर्धवट आहे. पूर्ण कारण म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की अल्लाने किंवा पैगंबराने आज्ञा दिलेलं युद्ध हेच फक्त खरं युद्ध.ते म्हणजे काफरांविरुद्धचा जिहाद. आणि फक्त आणि फक्त त्याच युद्धात मी लढेन. असली अतिरेकी मतं असलेल्या माणसाला मी हिरो मानू शकत नाही. सॉरी. मोठी झाली प्रतिक्रिया त्याबद्दल सॉरी पण कालपासून काहीही माहिती नसतानाही उदो उदो करून टाकलेल्या असंख्य पोस्ट्स वाचून डोकं उठायची पाळी आली होती.म्हणून शेवटी बोललोच.पुन्हा सांगतो, तो खेळाडू म्हणून असेल महान परंतु माणूस म्हणून खचितच नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. हे लक्षातच नव्हतं आलं. काही योग्य बदल केले आहेत.

   Delete
 2. लेख म्हणून छान आहे पण वैयक्तिक मताबद्दल हेरंब यांच्याशी सहमत!!!

  ReplyDelete
  Replies
  1. हो म्हणूनच लेखात काही बदल केले

   Delete