Friday, December 26, 2014

...का आज सारे गप्प

...का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?

तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?

तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!

ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?

ना निषेध दिसला कोठे
ना दिसल्या षंढ चर्चा
का आज शब्द रुसले
अन् मने रिकामी झाली?

माणुसकीचा येता गहिवर
व्हा आपल्यांचेही वाली, अन्यथा...
कळणार नाही दहशत
अंगणात केव्हा आली!

Saturday, December 20, 2014

माणुसकीचा येता गहिवर

माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार

युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार

ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार

काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार

समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार

शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्या गहिवराने
जखमा मनाच्याही नाही भरणार

चालवली बस आम्ही तेव्हा
कवितांमधुनीही दाखविले प्यार
सुरा खुपसला पाठीमध्ये
कारगिलचा तो आठवा वार

मग आले दहा नराधम
बरसल्या पुन्हा गोळ्या फार
लहानगे कोवळी जीवही होते ना
झेलत रक्तरंजित अत्याचार?

लहान, तरूण, वृद्ध, आणि महिला
क्षणात संपले इहलोकी अवतार
नाही दिसल्या मेणबत्त्या तेव्हा
पण वाटले पेढे कुंपणा पार

डोळे सातत्याने होती ओले
फुलतो रोमरोमात अंगार
आठवता ते अकाली मृत्यू अन्
अगणित झालेले बलात्कार

त्यांच्या शाळा त्यांचे शिक्षण
शिकवित नाहीत भारतप्यार
तयार होती तिथे निरंतर
सैनिक जिहादी करण्या अत्याचार

येतोच कसा तुम्हा उमाळा
विसरुन ते जहरी फुत्कार
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार

आतापर्यंत सहन करित आलो
हाच संयम आणि हेच संस्कार
अस्थानी गहिवराच्या शब्दांचे भाले
आम्ही आता नाही झेलणार

Thursday, October 30, 2014

सार्वजनिक स्वच्छता: आधी स्वतःकडे पहा

आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या पुढाकाराने 'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाले. साक्षात पंतप्रधानांनी हातात झाडू घेउन रस्ता झाडला आणि इतरांना उदाहरण घालून दिले.

पंतप्रधान झाल्यापासून अनेक बाबतीत जनता मोदीजींचा आदर्श ठेवत आहे आणि मोदी कुर्त्यापासून अनेक गोष्टींचे अनुकरणही होत आहे. मग या बाबतीत ते न झाल्यासच आश्चर्य होते. प्रत्यक्ष पंतप्रधान मोदीजींनी हातात झाडू घेतल्यामुळे आलेल्या देशात एक प्रकारची झाडलाट आली आणि त्यात इतर राजकीय नेत्यांपासून ते सरकारी व खाजगी आस्थापनांतले अधिकारी, सिनेनट, नट्या आणि नटव्या, आणि अगदी ऑफिसातले शिपाई इथपर्यंत सगळे अक्षरशः झाडून सामील झाले आणि रस्त्यांवरचा आणि परिसरातला कचरा साफ करु लागले.

इथे एक घटना आठवली. नक्की कधी ते आठवत नाही पण साधारण वर्षभरापूर्वी एका चीनी संकेतस्थळांवर भारतातल्या अनेक धार्मिक स्थळांवर कसा उकिरडा माजला आहे त्याची अनेक निवडक छायाचित्रे झळकली. चीनी संकेतस्थळ आहे म्हटल्यावर अनेकांनी देशभक्ती आणि चीनद्वेषातून 'चीन भारतावर कसे कसे हल्ले करत आहे आणि हे सुद्धा भारताचे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न बुडवायचे कारस्थान कसे आहे' यावर तावातावाने त्यावर चर्चा करायला सुरवात केली. हे खरं आहे, मात्र अशी चर्चा करत असताना एक देश म्हणून गेली काही वर्षे आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे वावडेच निर्माण झालेले आहे हे मात्र सोयिस्कररित्या विसरले गेले.

भेळ खाल्ली, टाक कागद तिथेच. चणे-दाणे खाल्ले, टाक कागद तिथेच. प्लॅस्टीकच्या कपातून चहा प्यायला, टाक तो कप खाली तिथेच. पान, गुटखा, पानमसाला खाऊन यत्र तत्र सर्वत्र घातलेले ते मंगलाचे सडे हे तर प्रत्येक कोपर्याचे व्यवच्छेदक लक्षणच झालेले आहे. चालत्या गाडीतून विविध प्रकारचा कचरा बाहेर टाकणे याचा एक सुशिक्षित नमूना नुकताच बघितला. गाडीतून शहाळ्याचे पाणी पिऊन झाल्यावर शहाळे सरळ रस्त्यावर फेकून देण्यात आले. हे असंच सुरू राहिलं तर सगळा देश जरी झाडू घेऊन उभा ठाकला तरी कमी पडेल.

तेव्हा या अभियाना अंतर्गत म्हणा किंवा स्वयंप्रेरणेने म्हणा, आपला परिसर जरूर स्वच्छ करा पण मुळात आपण वरील मार्गांनी कचरा करण्यास कारणीभूत ठरत नाही ना, याचा विचार करुन आधी अशा प्रकारच्या कचरानिर्मितीला पायबंद घाला. सुधारणा करायची असेल तर समोरच्याकडे बोट न दाखवता आणि यंत्रणांना दोष न देता स्वतःपासून सुरवात करा. तरच आपला देश स्वच्छ होऊ आणि राहू शकेल.

चला तर, आपला भारत स्वच्छ राखूया!