Showing posts with label चित्रपट मराठी. Show all posts
Showing posts with label चित्रपट मराठी. Show all posts

Monday, February 5, 2018

यंटम - एक प्रगल्भ प्रेमकथा

कथा तीच. घासून गुळगुळीत झालेली. प्रेम तेच. अडनिड्या वयातलं, कॉलेजातलं. धडपडही तीच. तिचं नाव पत्ता शोधून काढण्याची. होकारही तसाच. वाट बघत असल्यासारखा.  अंहं, समीर आशा पाटील यांचा यंटम हा चित्रपट हा सैराटच्या पठडीतला नक्कीच नाही. प्रतिसाद देण्याची आणि प्रेम करण्याची, आणाभाका घेण्याची पद्धत मात्र संयमी, पोक्त, आणि विचार करण्याचीही. चित्रपटाची सुरवात होताच "अरे देवा, कुठे आलो या सिनेमाला" हे उद्गार सिनेमा संपेपर्यंत "मस्त होता, खूप आवडला" इतके बदलले होते.

चित्रपटाच्या रंगा (वैभव कदम) या नायकाचे रंगाचे वडील रावसाहेब (सयाजी शिंदे) हे सनईवादक, आपल्या दोन साथीदारांबरोबर 'सुपारी' घेऊन लग्नात सनईवादन करुन आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट . एकेकाळी आपल्या सनईवादनाने अनेक लग्नसमारंभ आणि कदाचित काही मैफिली गाजवलेले रावसाहेब आता वयोमानपरत्वे थकत चालले आहेत. तरीही हातावर पोट असल्याने आणि घरच्या जबाबदार्‍यामुळे काम करत राहणं हे त्यांना भाग आहे. हल्ली डीजेचा काळ असल्याने फारसं कुणी सनईवादकांना आमंत्रण देत नाही, त्यामुळे आताशा त्यांना फारशा 'तारखा' मिळत नाहीत. ढोल, ताशे, आणि डीजेच्या गदारोळात ऐकूही न जाणारी सनई यामुळे होणारा अपमान त्यांच्यातल्या हाडाच्या कलाकाराचं काळीज चिरत जातो. तरीही लग्नात ताशा वाजवणारा आपला मुलगा रंगा हाताशी यावा, त्याने सनई शिकून आपली जागा घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. पण रंगाला सनई वाजवणं आवडत नाही, त्याला अजून आयुष्याची दिशा सापडलेली नाही. असेच दिवस ढकलत असताना तो त्याच्याच कॉलेजातल्या मीराच्या (अपूर्वा शेलगावकर) प्रथम तुज पाहता न्यायाने 'प्रेमात' पडतो. त्यावेळी ती कॉलेजच्या केमिस्ट्री लॅबमधे असल्याने त्यांची केमिस्ट्री लवकर जुळली असावी असा एक पाणचट विनोद करायची हुक्की शेजारच्या वटारलेल्या डोळ्यांच्या कल्पनेनेच मनातच राहिली. तर ते असो.

कमीतकमी संवादात प्रेमाची कबूली, आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांच्याच बरोबर रंगा आणि मीराने पहिल्यांदा फिरायला जाणं, मीराने तिच्या आईचा उल्लेख करण आणि तिच्या काळजातला सल रंगापुढे मांडणं, आणि रंगाने तिची साथ देण्याचं वचन देणं हे ज्या पद्धतीने दिग्दर्शक समीर आशा पाटील आपल्यापुढे मांडतात त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. टीनएज प्रेमकथा हा या चित्रपटाचा गाभा असला तरी चित्रपट फक्त याच मर्यादित परिघात हा फिरत राहत नाही. टीनएज मधलं प्रेम दाखवायचं म्हणजे एखादं काही विशिष्ठ मानसिकतेच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेऊन दाखवलेलं आचकटविचकट गाणं, धुसमुसळे उत्तान प्रणयप्रसंग, कथेला असलेली जातीय किनार, नायिकेच्या बापाचा थयथयाट, आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे नायकाने खांद्याच्या वर असलेल्या अवयवाचा उपयोग करण्यापेक्षा कमरेखालच्या अवयवाच्या इच्छा पुरवण्याच्या मागे लागणे यांपैकी कशाचाही उपयोग करुन घेण्याच्या आहारी न जाता लेखक-दिग्दर्शक समीर आपल्यापुढे एक सकस कथा सादर करतात.

आपल्या दोन इरसाल आणि टग्या मित्रांच्या मदतीने कॉलेजच्या ऑफिसातून मीराचा पत्ता धडपड करुन रंगा मिळवतो आणि मग सुरु होते त्यांची लवशिप अर्थात प्रेमकथा. सुरवातीला वडिलांनी आग्रह करुनही सनई शिकण्याला टाळाटाळ करणर्‍या रंगाची मीराला सनई ऐकायला आवडते हे ऐकून विकेट पडते. मग तो वडिलांकडून रीतसर सनईवादनाच प्रशिक्षण घ्यायला सुरवात करतो. दुर्दैवाने घरातली भिंत दादासाहेबांच्याच अंगावर पडून ते जखमी झाल्याने त्यांच्या निवृत्तीची प्रक्रिया वेग घेऊन रंगाच्या अंगावर त्याची पहिली 'तारीख' लवकरच येऊन पडते. रंगाला मिळालेल्या पहिल्या 'तारखेला' तो साथीदारांसोबत सनई कशी वाजवतो, मीरा आणि रंगाच्या प्रेमाचं पुढे काय होतं हे इथे सांगण्यात मजा नाही. ते चित्रपटगृहातच जाऊन पहा. दादासाहेबांच्या अंगावर पडलेली भिंत ही त्यांच्या निवृत्तीचं रूपक म्हणून आणि रंगाने एक जबाबदार मुलगा म्हणून दादासाहेबांची गादी पुढे चालवण्याचं, सनईवादक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं रूपक म्हणून डागडूजी केलेली, पुन्हा उभी राहिलेली भिंत वापरण्याची कल्पना खूप आवडली. आणखी काही लिहीलं तर चित्रपटाची कथाच लिहील्यासारखं होईल. इथे स्पॉयलर देणार नाही.

चित्रपटातल्या सर्वांचंच काम चांगलं झालेलं आहे. यात रंगाच्या रम्या आणि जेड्या या मित्रांचं काम करणारे अनुक्रमे अक्षय थोरात आणि ऋषिकेश झगडे यांचंही काम उत्तम झालेलं आहे. सयाजी शिंदे यांच्या अभिनयाबद्दल मज पामाराने काय बोलावं, तो उत्तमच आहे. सयाजी शिंदे यांनी इतक्या वर्षांनंतरही स्वतःचा नाना पाटेकर होण्यापासून स्वतःला वाचवलेलं आहे त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात.

हा चित्रपट बघताना ठायी ठायी सैराटशी तूलना करण्याचाही मोह आवरत नाही. टिनएज प्रेमकथा या जॉनरचे असंख्य चित्रपट आले आणि गेले. मात्र या जॉनरची इतकी उत्तम हाताळणी समीर यांच्याइतक्या चांगल्या पद्धतीने क्वचितच कुणी केली असेल. अडनिड्या वयात मुलामुलींना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण, मग त्याला इन्फॅच्यूएशन म्हणा किंवा प्रेम, यांचं काय करायचं, पुढे काय इत्यादी प्रश्नांना फारसा विचार न करता बहुतेक अशा चित्रपटांत उथळपणाची फोडणी दिलेली आढळते. आता चित्रपट हा चित्रपटासारखा बघावा अशी प्रवचने देणार्‍यांनी जुगनू हा धर्मेन्द्रचा चित्रपट दोन डझन वेळा पाहून बँकेत तशाच पद्धतीने चोरी केल्याची कबूली एका गुन्हेगाराने दिली होती हे सोयीस्कररित्या विसरतात आणि सैराट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा बघून अंगात विशेष काहीही कर्तृत्व नसताना तशाच पद्धतीने पळून गेल्याच्या आणि मग पश्चात्ताप पावल्याच्या  बातम्यांकडे दुर्लक्षही करतात. चित्रपट या माध्यमाची ताकद कमी लेखणारे तरुणांना जबाबदारीची जाणीव आणि आयुष्याकडे प्रगल्भपणे बघण्याची दिशा देण्याचं काम क्वचितच करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर यंटम हा चित्रपट वैशिष्ठ्यपूर्ण ठरतो आणि कदाचित म्हणूनही समीर आशा पाटील यांना पाठीवर प्रेक्षकांच्या शाबासकीची थाप पडावी असा रास्त हक्कही पोहोचतो.

तर, या सिनेमाला मी किती तारे देईन? पूर्वार्धात बोअर केल्याबद्दल अर्धा आणि साधारण पंधरा मिनीटे लांबी कमी ठेऊ न शकल्याबद्दल अर्धा असा उगाचच एक गुण कापून ५ पैकी ४ तारे मी यंटमला देईन. ते पण मी एखाद्या चित्रपटाची इतकी स्तुती करतो आहे हे पाहून जनतेस झीट येऊ नये म्हणून. नाहीतर साडेचार तारे दिले असते. तर ते असो. यंटम बघायला चित्रपटगृहाच्या क्षमतेच्या एक पंचमांश सुद्धा प्रेक्षक नव्हते तेव्हा तो कधी जाईल सांगता येत नाही तेव्हा लवकर पाहून घ्या.

टळटीप (म्हणे लेख किंवा टीपा आवडल्या नाहीत तर टळा या अर्थाने):
(१) हा चित्रपट बघायचा की नाही याबद्दल लेखन वाचूनही शंका असेल तर एक टीप देतो. मला कुठल्याही चित्रपटाबद्दल इतकं चांगलं बोलताना बघितलंय? आता ठरवा.
(२) ही चित्रपट समीक्षा नव्हे. माझी वैय्यक्तिक मतं आहेत. मी चित्रपट आवडला तर त्याबद्दलची माझी मतं लिहीतो, आवडला नाही तर चित्रपटाची सालटी काढायला कमी करत नाही. तेव्हा यात व्यक्त झालेल्या मतांवर ठाम आहे. ती मला बदलायला सांगू नये. बदलणार नाहीत.

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३९

Thursday, January 28, 2016

महाबोअर 'नटसम्राट'

मी: "मला 'नटसम्राट' आवडला नाही"

एक दर्दी: "तुम्हाला तो कळला नसेल"

कळला नसेल?

एक सर्कीट, शिवराळ, आणि दारूडा नाटकवाला थेरडा निवृत्त झाल्यावर आपली सगळी प्रॉपर्टी मुलांत वाटून टाकतो आणि मग स्वतःच्याच कर्माने लागोपाठ दोघांनीही घराबाहेर पडायला भाग पाडल्याने रस्त्यावर येतो, मधेच त्याची बायको खपते, आणि मग शेवटी तो मरतो. वगैरे वगैरे.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

साध्वी प्राची किंवा आदित्यनाथ का कोण यांनी एखादे वादग्रस्त वक्तव्य केल्यावर बरखा दत्त जसा थयथयाट सुरू करते आणि अर्णब गोस्वामी कानठळ्या बसवणार्‍या आवाजात त्याचं ते जगप्रसिद्ध "नेशन वॉन्ट्स टू नो" नामक तांडव सुरु करतो तशीच चिडचिड मला "नटसम्राट हा चित्रपट माझ्या मते टुकार सिनेमा आहे" हे सडेतोड आणि निर्भीड वक्तव्य केल्यानंतर अनेकांकडून अनुभवायला मिळाली.

शाहरुख खान ने देवदासची भूमिका केलेल्या चित्रपटाबद्दल जुन्या देवदासमधे पारोची भूमिका केलेल्या वैजयंतीमालाचं मत विचारल्यावर तिने "Dilip Saab played the role of Devdas, Shahrukh was Shahrukh as usual" असं  मत व्यक्त केलं होतं. अर्थात ती जुन्या आणि नव्या दोन्ही चित्रपटांचीच तूलना होती. इथे जुनं नाटक आणि त्यावर आधारित सिनेमा आहेत हे लक्षात घेतलं तरी त्यामागचा अर्थ बदलत नाही. म्हणून जुनी मंडळी कदाचित त्याच सडेतोडपणे 'श्रीराम लागू प्लेड द रोल ऑफ अप्पासाहेब बेलवलकर अ‍ॅन्ड नाना पाटेकर प्लेड नाना पाटेकर अ‍ॅज युज्वल' असं म्हणाली, तर त्यांचं हे मत किमान या सिनेमापुरतं सत्यापासून फार दूर नसेल. चित्रपटात कुठेही अप्पासाहेब बेलवलकर न दिसता प्रत्येक दृश्याच्या प्रत्येक फ्रेममधे नाना पाटेकरच दिसत राहतो.

इथे मी 'नटसम्राट' हे नाटक आणि सिनेमा यांची तूलना करत नाही. ती मी कट्यारच्या वेळीही केली नव्हती आणि इथेही करणार नाही. कारण दोन्ही नाटकं न पाहिलेल्या भाग्यवान लोकांत मी मोडतो. भाग्यवान अशासाठी की कट्यार काळजात का घुसली नाही या विषयी नाटकाचे दर्दी असलेल्या लोकांकडून टीकात्मक लेख वाचलेले आहेत. नाटक पाहिल्यामुळे अपरिहार्यपणे होणारी ती तूलना इथे आपसूक टाळली गेली. त्यामुळे म्हणा किंवा तरीही म्हणा, एक स्वतंत्र सिनेमा म्हणून मला तो आवडला. नटसम्राटच्या बाबतीत मात्र तसं इथे झालेलं नाही. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. बर्‍याच वर्षांनी काहीतरी जबरदस्त गंभीर अनुभवायला मिळेल असं वाटलं होतं. या आणि इतर अनेक अपेक्षा पूर्ण तर झाल्या नाहीतच पण घोर निराशा पदरी पडली.

एक तर आईवडिलांनी म्हातारपणीचं आर्थिक नियोजन करताना मुलांना स्वतःच्या मृत्यूआधीच सगळी संपत्ती देऊन टाकणे आणि मग मुलांनी त्यांना देशोधडीला लावणे ही संकल्पना असलेले निव्वळ मराठीतलीच असंख्य नाटकं, चित्रपट, आणि मालिका किंवा त्यातली उपकथानके हे आजच्या प्रेक्षकांनी पाहीले आहेत. त्यामुळे तो विषय सादर करुन 'अरेरे गरीब बिच्चारे आई-वडील' दाखवून प्रेक्षकांकडून अश्रू वसूल करणे हे म्हणजे मराठी चित्रपटाला किमान २५ वर्ष मागे नेऊन ठेवण्यातला प्रकार आहे. आता हे मागे नेऊन ठेवणे म्हणजे काय आणि तुमच्या मते पुढे येणं म्हणजे काय ते विचारु नका. लेख लिहीताना एक छान वाक्य म्हणून लिहीलं ते. अगदी या चित्रपटात असलेल्या अनेक गोष्टींसारखंच.

संपूर्ण चित्रपटभर नाना पाटेकर एका अत्यंत विचित्र सुरात संवादफेक करतो. त्यामुळे त्याचे संवाद ऐकताना रॉबिन विल्यम्सच्या Cricket is basically baseball on valium या वक्तव्याची आठवण येते. नटसम्राट इज नाना पाटेकर ऑन ड्रग्स. तुम्हाला आठवत असेल तर राजेश खन्नाने 'अमर प्रेम' या चित्रपटात अशीच कंटाळवाणी संवादफेक केली होती. माणूस दारुडा किंवा म्हातारा दाखवायचा असेल तर अशा प्रकारे ड्रग्सच्या अंमलाखाली असल्या सारखा सूर लावायलाच हवा का?

चित्रपटाचं कथानक हे नेहमी वाहतं असायला हवं. तो फ्लो इथे कुठेही आढळत नाही. चित्रपटातलं प्रत्येक महत्वाचं दृश्य (किंवा कोणतंही दृश्य घ्या हो, शेणच खायचं असेल तर त्याला प्रेफरन्स असतो का? की बुवा गायीचं चांगलं आणि बकरीचं वाईट?) हे दिग्दर्शकाने नानाला "हां, तर बरं का नाना, आता पुढचा सीन असा असा आहे' हे सांगितल्यामुळे नानाने होज्जाओ शुरू म्हणत केल्यासारखा वाटतो. अगदी "कुणी घर देता का घर" हा संवाद असलेलं दृश्य सुद्धा अपेक्षित परिणाम साधत नाही. त्या जागी नानाने यशवंत मधला "एक मच्छर, साला एक मच्छर, आदमी को हिजडा बना देता है...." हा लांबलचक संवाद म्हटला असता तरी मला कळलं नसतं इतका मी हे दृश्य येईपर्यंत बधीर झालो होतो. त्यामुळे जिथे हा चित्रपट भिडायला हवा, तिथे तो मला जाम बोअर वाटायला लागला. चित्रपट 'नटसम्राट' हे नाव देऊन न काढता 'नानाची ठिगळं' या नावाखाली एखादी डॉक्युमेंटरी म्हणून काढला असता तरी चाललं असतं असा एक विचार चमकून गेला.

आता जरा पुन्हा कथानकाकडे वळूया. म्हणजे मी वळतो. तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊ शकता. मला चित्रपट बघताना तो पर्याय नव्हता, तुम्हाला हे वाचताना आहे. तर, जाणार्‍यांना अच्छा टाटा.

पण थांबा. चित्रपट तिकीट विकत घेऊन बघितला असेल, हा लेख फुकट आहे. तेव्हा वाचाच.

तर, नाटकात काम करणारा अत्यंत उत्तम नट, ज्याला त्याच्या अभिनयामुळे नटसम्राट ही पदवी देण्यात आलेली आहे, तो एके दिवशी 'कुठेतरी थांबायचं' म्हणून निवृत्त होतो. (पचतंय का? अभिनय म्हणजे क्रिकेट आहे का सुनिल गावसकर सारखं जमतंय तो पर्यंत रिटायर व्हायला? तो सत्तरीचा अनेक व्याधींनी ग्रस्त असलेला अँग्री यंग मॅन स्वतःचा मुलगा ओल्ड मॅन व्हायला टेकला तरी अजून चित्रपट, जाहीरात, टिव्ही कार्यक्रम एक ना दोन अनेक प्रकारात काम करतो आहे, अशा जमान्यात वावरणार्‍या प्रेक्षकांनी हा आउटडेटेड अप्पासाहेब बेलवलकर का चालवून घ्यायचा? पण ते असो.).

अशा प्रत्येक दृश्याचं पोस्ट मॉर्टम करत बसलो तर दिवस जाईल हे लिहीण्यात. ठीकाय ब्वॉ, व्हायचं असेल कुणाला रिटायर, आहे ब्वॉ तसं कथानक, आपल्याला काय.

तर, नाटकात काम करणारा एक सर्किट आणि अट्टल बेवडा थेरडा दारूच्या नशेतच मूर्खासारखं स्वतःची प्रॉपर्टी मुलगा आणि मुलीत वाटून टाकतो. मुलाला घर आणि मुलीला पैसे वगैरे.

बरं मुलाबरोबर सून आणि नात यांच्या बरोबर गपगुमान रहावं तर ते ही नाही. लहान वयाच्या मुलीला कविता शिकवता शिकवता अर्वाच्य शिव्या शिकवतो आणि तोंड वर करुन त्याचं समर्थनही करतो. कोणते आजोबा आपल्या नातवंडांना अशा घाणेरड्या शिव्या शिकवतात? अगदी गॅरेजवालेही आपल्या घरात नातवंडांशी बोलताना खूप जपून बोलत असतील. नाटकवाला ही पार्श्वभूमी दाखवली की त्याच्या नावावर काय वाट्टेल ते खपवता येतं अशी संबंधितांची समजूत आहे का?

या वरुन त्याच्यात आणि सुनेत झालेल्या वादाचं पर्यवसान त्याने घर सोडण्यात आणि मग मुलीकडे जाण्यात होतं. तिथे तो दारूच्या नशेत पार्टीत तमाशा करतो आणि जावयाच्या बॉसच्या मुलाच्या नाटकावर गरळ ओकतो. अरे शोन्या, सुखानं जगायचंय ना? पण ते नाही. आम्ही नाना पाटेकर आहोत किनै? मग थयथयाट करायलाच हवा!

समाजातला खोटेपणा सहन होत नाही, मग मुखवटे घालून घालून वावरायचं नाही म्हणत सगळे शिष्टाचार सोडून स्वतःच्याच घरच्यांशी मन मानेल तसं वागायचं स्वातंत्र्य घेणं हे कितपत बरोबर? किंबहुना या चित्रपटातल्या अप्पासाहेबाला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकच समजत नाही आणि मग त्याच्याबरोबर चित्रपटही वाहवत जातो.

मग बहुतकरुन वेळ जात नाही म्हणून एकाकीपणाला कंटाळलेल्या स्वतःच्याच मित्राचा त्यानेच सांगितलं म्हणून झोपेच्या गोळ्या देऊन खून करतो (आपण नसता केला, मित्राने सांगितलं तरी) आणि वर त्याचंही समर्थन करतो.  मग चोरीचा आळ घेतला म्हणून मुलीच्या घरातूनही बाहेर पडतो आणि त्याची बायको रस्त्यातच कुठेतरी मरते आणि हा पुलाखाली वन-पूल-किचन ची खोली असल्यागत, हक्काची (आणि सेक्युलर) स्वयंपाकीणबाई असलेल्या जागेत राहू लागतो. आणि मग एक दोन दॄश्यांनंतर मरतो. सिनेमा खतम, पैसा (थेटरवालेको) हजम. जा घरी.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

एकंदरीत चित्रपटात ठायी ठायी दिग्दर्शक आपल्याला "वि.वा.शिरवाडकरांच्या अजरामर (हॉss हॉss हॉss हॉssहॉss)*** नाटकावर आधारित आहे आणि त्यात नाना पाटेकर आहे म्हणून चालवून घ्या" असा दम भरत असल्याचा भास होत राहतो. नाना आहे म्हणून आवडून घ्यायचा असेल तर मग 'यशवंत' काय वाईट होता? अमिताभ बच्चन आहे म्हणून 'लाल बादशाह' आवडून घ्यायचा का? आँ? अरे बैल समजता का प्रेक्षकांना तुम्ही? कुणी उत्तर देता का उत्तर?

वास्तविक, आवडलेल्या सिनेमावर लिहीणे आणि न आवडलेल्यावर वेळ व शक्ती वाया न घालवणे हा माझा मी स्वतःवरच घालून घेतलेला नियम. त्याला मी का मुरड घातली? तर चित्रपट आवडला नाही कारण तो "तुम्हाला समजला नसेल" या अतार्किक आरोपामुळे.

पुन्हा सांगतो, नटसम्राट हा एक अत्यंत, प्रचंड, महाभयानक बोअर सिनेमा आहे. कुणी फुकट दाखवला तरी बघू नका. नाना पाटेकरच बघायचा असेल तर क्रांतीवीर बघा.

--------------------------------------------------
*** इथे मी पाताळविजयम या मद्राशी सिनेमातल्या राक्षसासारखा हॉss हॉss हॉss हॉssहॉss असं का हसलो ते कृपया विचारू नका. उत्तर आवडणार नाही.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ४, शके १९३७
--------------------------------------------------



Sunday, January 4, 2015

लोकमान्य - एक युगपुरुष

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.


सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन  नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.

मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्‍या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्‍या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था काढणार्‍या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्‍या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्‍यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्‍यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी झटणार्‍या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्‍या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्‍या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्‍या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?

याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्‍याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्‍याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या  भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.

"डॉग्स अ‍ॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अ‍ॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्‍यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्‍या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्‍या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.


हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्‍याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्‍या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.



सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.


लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्‍याच अंशी' हे शब्द वापरले होते.

दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.

चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.



भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.

असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्‍यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?

चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.

------------------------------------------------------------------------------------


ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw

http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc

http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU

पत्रकार परिषद १
 http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc

गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg

गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature=iv&src_vid=0DeqgxST6Fg&v=UhlSmycJ4e8