Showing posts with label चित्रपट इंग्रजी. Show all posts
Showing posts with label चित्रपट इंग्रजी. Show all posts

Tuesday, February 1, 2022

क्लिंट इस्टवूडचा 'ग्रॅन टॉरिनो': मेक अमेरिका ग्रेट अगेन समजून घेताना

आमच्या लहानपणी सोशल मीडिया नव्हता आणि माहिती मिळवण्याचे दोन-तीनच मार्गच उपलब्ध होते ते म्हणजे सरकारी दूरदर्शन व आकाशवाणी आणि शाळेतली क्रमिक पुस्तकं. या दोन्ही माध्यमांनी असा समज करून दिला होता की कम्युनिस्ट रशिया अर्थात युएसएसआर हा भारताचा खरा मित्र. लहानपणी याच भारावलेल्या मनाने मुंबईत आलेल्या रशियन फेस्टिव्हला हजेरी लावली होती, या पातळीपर्यंत देशवासीयांचे मेंदू तेव्हा बधीर केले गेले होते. तेव्हा आमच्या बालमेंदूत राजकारणात, त्यातही आंतरराष्ट्रीय राजकारणात, कुणीही मित्र नसतो, असतात ते फक्त हितसंबंध (interests) हा प्रकाश पडायचा होता. आमचं बहुतेक लहानपण आणि तारुण्यातली काही वर्ष अमेरिकन भांडवलशाहीला नावे ठेवणारे साहित्य आणि पत्रकारितेच्या मार्फत केले गेलेले लिखाण वाचण्यात गेली नसती तरच नवल होते. 

ज्याप्रमाणे श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर आपल्यापैकी अनेकांना राजकारणात रस निर्माण झाला, त्यावर लिहावं, बोलावं, हिरीरीने चर्चा करावी, वादविवादात सहभागी व्हावं असं वाटलं, त्याच प्रमाणे २०१७ साली डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अनेकांना अमेरिकन राजकारणातही रस निर्माण झाला. त्याची बीजे क्लिंटन आणि ओबामा यांच्या कारकिर्दीत रोवली गेली होतीच, मात्र प्रामुख्याने भारतीय जनता अमेरिकन अध्यक्ष निवडीची पद्धत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांच्यातली साठमारी, अमेरिकन डावे आणि उजवे, अमेरिकन राष्ट्रवाद इत्यादीत रस घेऊ लागली ती ट्रम्प अध्यक्ष झाल्यावरच.  

२०१६ साली आपल्या राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा करताना निवडणुक प्रचारात एक घोषवाक्य वापरलं, जे खूप लोकप्रिय झालं, ते म्हणजे Make America Great Again (अमेरिकेला पुन्हा महान बनवा). हेच घोषवाक्य पुन्हा २०२० साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांच्या वेळीही वापरण्यात आलं. या घोषवाक्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना अभिप्रेत असलेला अर्थ नेमका कोणता जे जाणून घेण्यासाठी विकीपिडिया आणि आंतरजालावर अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. या लेखातून मात्र आपण तो अर्थ एका सिनेमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुढे लिहीण्याआधीच सांगतो, हा लेख वाचून सिनेमा बघायला गेलात तर कदाचित तुम्हाला तो रटाळ वाटण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकन सिनेमा म्हटल्यावर तुम्हाला अभिप्रेत असलेला मसाला त्यात नाही. दुसरी गोष्ट अशी की हा लेख थोडासा वरातीमागून घोडं या प्रकारात मोडतो, कारण आता ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, आणि पुन्हा निवडणुक लढवायची त्यांची इच्छा असली तरी २०२४ साली रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार कोण असेल हे आज छातीठोकपणे कुणालाच सांगता येणार नाही. 

MAGA

हा सिनेमा म्हणजे लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेता क्लिंट ईस्टवूड याने दिग्दर्शित केलेला व त्याचीच प्रमुख भूमिका असलेला Gran Torino हा २००८ साली आलेला चित्रपट.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------

डाव्यांनी गेली सत्तर वर्ष अमेरिका पोखरण्याकडे विशेष लक्ष दिल्याने अमेरिका त्यांच्या जीवनमूल्यांना आव्हान देत असलेल्या एका सांस्कृतिक संकटाचा सामना करत आहे. अनेक वर्ष "ह्या ह्या, अमेरिकेला कसली आलीये संस्कृती" या समजाखाली असल्याने मला याबद्दल वाचन करताना अनेक गोष्टी ध्यानात आल्या. तसं बघायला गेलं तर Gran Torino हा एक अत्यंत सामान्य कथा असलेला चित्रपट आहे, पण लक्षपूर्वक बघितल्यास अमेरिकन जीवनमूल्यांवर एक उत्तम भाष्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. सिनेमातले अनेक घटक अमेरिकन जीवनमूल्यांचे दर्शन घडवत असतानाच त्यांवर घोंघावणार्‍या संकटांकडेही लक्ष वेधते. हा सिनेमा २००८ साली आला तेव्हा क्लिंट इस्टवूड ७८ वर्षांचे होते. हे म्हातारबुवा आजही तितक्याच तडफेने चित्रपटक्षेत्रात सक्रीय आहेत आणि अजूनही अनेक वर्ष काम करण्याची खुमखुमी राखून आहेत. दुसरं विश्वयुद्ध आणि कोरियन युद्ध अमेरिकेच्या ज्या पिढीने अनुभवलं त्या पिढीचं क्लिंट प्रतिनिधित्व करतात. स्वतः क्लिंट हे कोरियन युद्धात लढलेले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे समर्थक आहेत. अमेरिकेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका ज्या पिढीचे क्लिंट हे जिवंत उदाहरण आहेत. अस्सल अमेरिकन मातीने बनलेले आहेत.

Clint Eastwood in Gran Torino

क्लिंट इस्टवूडच्या या सिनेमातले त्यानेच साकारलेले प्रमुख पात्र आहे कोरियन युद्ध लढलेला एक माजी सैनिक वॉल्ट कोवाल्स्की. वॉल्ट फोर्ड कंपनीतून निवृत्त झालेला आहे आणि एकेकाळी अमेरिकन चारचाकी उद्योगाचा पाठीचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डेट्रॉइटमधे राहत असतो. आता तिथे फारसे अमेरिकन राहत नाहीत. आता तिथे व्हियतनाम युद्धात लाओसच्या कम्युनिस्ट कब्जानंतर विस्थापित झालेले आणि अमेरिकेत स्थलांतर केलेले हमोंग जमातीचे लोक राहतात. चित्रपट सुरु होतानाच आपल्याला दिसतं की वॉल्टच्या बायकोचं नुकतंच निधन झालं आहे आणि वॉल्ट त्या घरात एकटाच डेझी या आपल्या म्हातार्‍या लॅब्रेडॉर कुत्रीसोबत राहतो. वॉल्ट आणि त्याच्या मुलांचे एकमेकांशी पटत नाही आणि त्याची मुले त्याच्याशी एक अंतर राखूनच वागतात. वॉल्टची नातवंडे आजोबाकडे असलेल्या वस्तू कशा मागायच्या या चिंतेत. कडवा अमेरिकन असलेल्या वॉल्टचे सगळे शेजारी आशियायी हमाँग जमातीचे लोक आहेत. वॉल्टला ते अजिबात आवडत नाहीत आणि तसं तो अनेकदा उघडपणे बोलूनही दाखवतो; त्यांच्यापैकी त्याच्या सख्ख्या शेजारी असलेल्या हमोंग कुटुंबातील ताओ हा किशोरवयीन मुलगा त्याच्याकडे त्याच्याकडे जंपर केबल मागायला येतो तेव्हा वॉल्ट त्याची zipperhead म्हणून संभावना करतो. ताओची एक बहीण आहे (सू). कोमल हृदयाच्या लिबरंडू मंडळींनी हा सिनेमा बघूच नये कारण संपूर्ण चित्रपटभर वॉल्टच्या तोंडी अशी वांशिक शेरेबाजी आहे आणि त्याला येणारी उत्तरेही मजेशीर आहेत. आणखी एक पात्र आहे ते म्हणजे त्याच्या बायकोचे 'अंत्यसंस्कार' करणारा एक तरूण पाद्री. वॉल्टच्या बायकोची वॉल्टने चर्चमध्ये कन्फेशन बॉक्समधे एकदा तरी जावं अशी इच्छा होती असा दावा तो करतो. अर्थातच वॉल्ट त्याला हाडतुड करुन हाकलून लावतो. वॉल्टला अधुनमधून खोकला येतो आणि त्याला असलेला आजार वॉल्ट जगापासून लपवतोही. एकंदर वॉल्ट कोवाल्स्की हा जगाला कावलेला तिरसट म्हातारा म्हणून आपल्यापुढे येतो.

Walt and Tao

ताओ हा साधाभोळा, जवळपास बावळट आहे. तिथल्या हमाँग मवाल्यांपैकी काही गुंड त्याला आपल्या टोळीत सामील करुन घ्यायला नेतात आणि वॉल्टची १९७२ सालची मॉडेल असलेली फोर्ड ग्रॅन टोरिनो (Gran Torino) चोरायला सांगतात. नवखा असलेला ताओ गाडी चोरताना बावचळतो, वॉल्टला त्याच्या आवाजाने जाग येते आणि तो आपली भलीथोरली रायफल घेऊन त्याला तिथून हुसकावून लावतो. नंतर त्याच ताओला मारहाण करायला आलेल्या त्याच गुंडांपासून वॉल्ट त्याला वाचवतो आणि चक्क त्याच्या कुटुंबाचा जवळचा माणूस होतो. हळूहळू वॉल्ट थाओला आपल्या पंखांखाली घेतो. वॉल्ट त्याला टोळीत जाण्यापासून रोखतो, त्याला लहानमोठी मॅकेनिकची आणि प्लंबरची कामे करायला शिकवतो, लोकांशी कसं बोलावं वागावं याचे धडे देतो, आपला बावळटपणा दूर करुन त्याच्या आवडीच्या मुलीला डेटवर कसे न्यावे याच्या टिप्स देतो, आणि तिला फिरवता यावं यासाठी वॉल्ट एरवी कुणाला हातही लावू देत नसे अशी त्याची प्राणप्रिय Ford Gran Torino गाडी देतो.  या सगळ्या गोष्टी त्या हमाँग टोळीला आवडत नाहीत आणि चित्रपटाची पुढची कथा ही याच संघर्षाची आहे. 

Walt teaches Tao to fix his roof

गंमत म्हणजे वॉल्ट स्वतः पोलिश स्थलांतरित आहे... पण आतून पूर्णपणे अमेरिकन आहे. अर्थात अमेरिका हा जवळपास अख्खाच स्थलांतरितांचा देश आहे पण जसेजसे ते तिथल्या जीवनमूल्यांना आत्मसात करत जातात तसे तसे ते अमेरिकन होत जातात. वॉल्ट ज्या भागात राहतो तिथे सगळेच स्थलांतरित आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण चित्रपटभर वांशिक आणि इतर तिरकस  शेरेबाजी दिसते (politically incorrect innuendo). वॉल्ट पोलिश आहे, त्याचा न्हावी इटालियन आहे, आणि दोघे एकमेकांना शिव्या देण्याच्या आवेशात पोलॅक (पोलिश  लोकांसाठी वापरला जाणारा पर्यायवाची अपमानजनक शब्द) आणि 'ज्यू' म्हणतात. शेजारच्या हमाँग मुलीला म्हणजे सू ला तो म्हणतो माझ्या कुत्र्याला खाऊ नका त्यावर ती चेष्टेतच पण ताडकन उत्तरते की नाही आम्ही फक्त मांजरंच खातो. कुणीही या वांशिक शेरेबाजीचं वाईट वाटून घेत नाही आणि कुणाच्याही भावना दुखावत नाहीत. हळूहळू आपल्याला कळत जातं की स्थलांतरितांप्रती असलेला वॉल्टचा राग हा वांशिक नसून त्यांच्यात त्याला जो अमेरिकन जीवनमूल्यांचा अभाव दिसतो त्यावर आहे. तो लोकांना जशी जशी आपल्यात अमेरिकन जीवनमूल्ये आत्मसात करताना बघतो, वॉल्टच्या मनात त्यांच्याबद्दल तशी तशी स्वीकृतीची भावना वाढत जाते. समोरच्या घरातल्या एका बाईच्या हातून गाडीतून पिशव्या काढताना भाजी/फळं पडतात तेव्हा तिची चेष्टा करणार्‍या तीन मवाल्यांना पाहून 'काय ही आजची पिढी' असे निराशाजनक उद्गार काढणारा वॉल्ट तिच्या मदतीला जाणार तोच तो ताओला तिच्या मदतीला धावून जाताना पाहून चमकतो. ताओ मग तिच्या घरापर्यंत सामान पोहोचवतो आणि इकडे वॉल्ट हे बघत आपला आधीचा समज खोटा ठरल्याचे पाहून सुखावतो. वॉल्ट ताओला आपल्या हाताखाली घेऊन निरनिराळी कामे शिकवतो. त्याला आपली बाग साफ करायला लावतो, त्याच्याकडून आपले घर रंगवून घेतो, आपल्या घराचे छत त्याच्याकडून दुरुस्त करुन घेतो आणि स्वतः ताओच्या घराचं तुंबलेलं ड्रेनेज साफ करुन देतो. हळूहळू ही सगळी कामे शिकवल्यावर त्याला आपल्या एका बिल्डर मित्राकडे कामाला लावतो... बिल्डर मित्राशी बोलतानाही वॉल्ट तो आयरिश आहे यावर शेरेबाजी करायला विसरत नाही. अशा तर्‍हेने तो जवळजवळ गँगमधे सामील होण्याच्या बेतात असलेल्या एका तरुणाचा गुरू होतो, त्याला योग्य मार्गावर आणतो आणि त्याला एक कर्तव्यपरायण नागरिक म्हणून जगायला शिकवतो. अमेरिका घडवणार्‍या प्रमुख जीवनमूल्य 'आपल्या हाताने आपली कामे करावीत आणि स्वतःसाठी मेहनतीने कमवून जगावे' आहे आणि वॉल्ट त्याचे मूर्त रूप आहे.

Irish builder

Italian barber

दुसरीकडे त्याच्यासमोर आणखी एक अमेरिका आहे जी पुढच्या पिढीला गिळंकृत करायला उभी आहे. सामाजिक न्यायाअंतर्गत (social welfare) वेगवेगळ्या भत्त्यांवर जगणारे बेरोजगार स्थलांतरित तरुण गुन्हेगारीकडे वळलेले त्याला दिसतात. एकेकाळी आपल्या कुशीत भरभराटीला आलेला अमेरिकन कार उद्योग बघितलेले डेट्रॉईट आज अमेरिकन जीवनमूल्यांच्या र्‍हासाचा साक्षीदार असलेले एक उद्ध्वस्त शहर आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ऑटॉमोबाईल उद्योग लोकांना भत्ताजीवी करुन ठेवणार्‍या सामाजिक न्याय योजना, कामगार संघटना, आणि बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेपुढे तग धरू शकला नाही, आणि त्या वॉल्टच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला ज्याने फोर्ड मोटर कंपनीत तीस वर्ष काम केलं होतं आणि ज्या वॉल्टची सर्वात मौल्यवान प्रॉपर्टी म्हणजे १९७२ची चमकदार मॉडेल ग्रॅन टोरिनो होती. 

मी नेहमी सांगतो तसं हा चित्रपटही बघण्यात मजा आहे, इथे सगळे सांगून तुमची मजा घालवू इच्छित नाही. पण आपला मुख्य विषय सिनेमाच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांची Make America Great Again या घोषणेतून नेमकं काय अभिप्रेत होतं हा आहे, तेव्हा त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगणे अत्यावश्यक आहे.

चित्रपट संपता संपता वॉल्ट त्या तरुण पाद्र्याला, फादर जॅनोविचला जाऊन भेटतो आणि मला कन्फेशन मधे जायचे आहे असे सांगतो. वारंवार मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तुसड्यागत वागून आपल्याला हाकलणारा वॉल्ट आज  अचानक कन्फेशनमध्ये जायला कसा काय तयार झाला असे फादरला साहजिकच आश्चर्य वाटते. वॉल्ट कोरियन युद्धात लढलेला माजी सैनिक आहे आणि युद्धाच्या अनेक अत्यंत क्लेशकारक स्मृती तो बाळगून आहे. युद्धात त्याने अनेक शत्रूसैनिक इत्यादी लोकांना ठार केलेले आहे. पण वॉल्टच्या कन्फेशनमधे कोरियन युद्धाचा उल्लेखही येत नाही. वॉल्ट कोवाल्स्की ज्या तीन गोष्टींचीव कबूली देतो त्या असतात:

(१) १९६८ सालच्या एका क्रिसमस पार्टीत त्याने एका परस्त्रीचं चुंबन घेतलेलं असतं.
(२) एकदा एक बोट आणि तिची मोटर विकून आलेल्या ९०० डॉलर रकमेवर कर भरलेला नसतो; ही एक प्रकारे चोरीच झाली.
(३) आपल्या दोन्ही मुलांशी त्याचे कधीच घट्ट नाते तयार होऊ शकलेले नसते, त्यांना तो कधीच समजून घेऊ शकला नाही ही त्याची खंत असते. का कोण जाणे पण असे झालेले असते खरे. 

वॉल्ट जे कन्फेस करतो, आणि जे करत नाही, त्यातून अमेरिकन कोअर वैय्यक्तिक जीवनमूल्ये कोणती हे आपल्याला कळतं. ज्या तीन गोष्टींची त्याला खंत असते, ज्या गोष्टी 'कन्फेस' करणे त्याला आवश्यक वाटले ती त्याच्या लेखी पापं असतात. नात्यात एकनिष्ठ असणे, व्यवसायिक आणि आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता, आणि कुटुंबाची, मुलांची प्रेमळपणे काळजी घेणे ही ती जीवनमूल्ये होत. युद्धावर जाणे आणि माणसे मारणे हे दु:खद असले तरी पाप समजली जात नाहीत, वॉल्टही तसं समजत नाही.  

Walt in confession

हां, ही एक गोष्ट वेगळी की आपल्यासमोर येणारे अमेरिकेचं चित्र अगदी वेगळे आहे ज्याच्याशी या तीन मूल्यांची कुठेही सांगड घालता येत नाही. पण अमेरिकेला मोठे करण्यात, जगाचे नेतृत्व करावे इतक्या पातळीवर आणून ठेवण्यात याच मूल्यांचे कसोशीने पालन करणार्‍या पिढीचा मोठा वाटा आहे. आज समाजवादी वेलफेअर स्टेट बनलेल्या डेमोक्रॅट अमेरिकेत याच मूल्यांचे वेगाने पतन होताना उघड्या डोळ्यांनी बघण्याची आज अनेकांवर वेळ आलेली आहे. याचमुळे अफगाणिस्तान सारख्या सटरफटर देशातून मार खाऊन परतलेल्या अमेरिकेची सदसद्विवेकबुद्धी इतकी सडलेली आहे की सत्ताधार्‍यांचा कसल्याही प्रकारचं विचारमंथन करण्याकडे कल उरलेला नाही. याचमुळे आज भारतीयांना अमेरिकेच्या घेण्याजोग्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत; दिसतं काय तर दारू ढोसून नाचणारा आणि अर्धनग्न पोरींच्या मागे धावणारा अमेरिका नावाचा देश, आणि त्याचीच नक्कल करावीशी वाटते. या समाजवादी डेमोक्रॅट संकटतून अमेरिका बाहेर येईल का, ट्रम्प यांच्या स्वप्नातली अमेरिका, Make America Great Again ही घोषणा सत्यात येईल का, हे मात्र तिथल्या जनतेवरच अवलंबून आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

श्री नरेन्द्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे या कडव्या राष्ट्रवादी मानसिकतेच्या त्रयीचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणखी काही काळ राहिला असता तर कदाचित आजचे चित्र थोडे वेगळे दिसले असते. पण दुर्दैवाने २०१६ मध्ये प्रकृतीच्या कारणास्त्व शिंजो अ‍ॅबे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि २०२१ साली झालेल्या वादग्रस्त निवडणुकांत डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. आज जागतिक राजकारणाच्या पटलावर फक्त आपल्या देशात पंतप्रधान नरेन्द्र मोदीच घट्टपणे पाय रोवून उभे आहेत. जागतिक घडामोडींचा ज्याप्रमाणे भारतावर प्रभाव पडतो, त्याचप्रमाणे भारतीय ध्येयधोरणांचाही आंतरराष्ट्रीय राजकारणात पडसाद जाणवतात. म्हणूनच राष्ट्रीय चरित्र निर्माण करायचे असेल, भारतीय जीवनमूल्ये जपायची असतील, हिंदू संस्कृतीचा र्‍हास रोखायचा असेल तर आज आपण सगळ्यांनी त्यांच्या लहानमोठ्या चुका, आपापसातले क्षुल्लक मतभेद, आणि भाषा/प्रांतवाद, यांच्या पलीकडे विचार करत श्री नरेन्द्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यकच नव्हे तर अनिवार्य आहे.

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ १५, शके १९४३

Monday, March 15, 2021

रनअवे ज्युरी आणि डाव्यांची चित्रपटीय लबाडी

२००३ साली आलेला हा सिनेमा अजून लक्षात आहे तो त्यात असलेल्या जीन हॅकमन आणि डस्टिन हॉफमन या दिगग्ज कलाकारांमुळे. चित्रपट साधारणपणे मसाला चित्रपट असतात तसा आहे, पण गंमत त्याच्या कथेत दडली आहे. किंवा असं म्हणणं जास्त योग्य ठरेल की त्याच्या गोष्टीने जे दडवलं आहे त्यात खरी गंमत आहे.

रनअवे ज्युरी पोस्टर

अमेरिकेत एका गोळीबारात ११ लोक मारले जातात. त्यापैकी एकाची पत्नी गोळीबार ज्या बंदुकीने केलेला असतो ती बनवणाऱ्या कंपनीवर नुकसानभरपाईसाठी खटला दाखल करते. खटला सुरू असताना दोन्ही पक्षाच्या वकिलांना एक फोन येतो की जो पक्ष त्याला, म्हणजे फोन करणाऱ्याला, १० मिलियन डॉलर देईल त्याच्या बाजूने तो ज्यूरीला निकाल द्यायला भाग पाडेल.

मग सस्पेस थ्रिलर जॉनर चित्रपटाला साजेशा काही घटना घडतात आणि शेवटी त्या बाईच्या बाजूने उभा असलेला वकील ते पैसे द्यायला नकार देतो वगैरे वगैरे. कथेच्या तपशीलात जाण्यात अर्थ नाही. हां एक गोष्ट म्हणजे ज्यूरीत एक माजी अमेरिकन मरीन असतो जो त्या बाईला नुकसानभरपाई देण्याच्या विरोधात असलेला दाखवलाय, आणि शेवटी त्या बाईच्या बाजूने निकाल लागून बंदूक बनवणाऱ्या कंपनीच्या वकिलाला ज्यूरीला लाच दिल्याच्या आरोपाखाली अटक होते इतका तपशील सद्ध्या पुरेसा आहे.

आता कथेतली गोम सांगतो. हा चित्रपट लीगल थ्रिलर म्हणजे कोर्टाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या थरार कादंबऱ्यांचा लेखक जॉन ग्रीशॅम याच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. कादंबरीचं चित्रपटात रूपांतर करताना एक महत्वाचा बदल असा केला आहे की कादंबरीत सिगारेट कंपनी विरोधात खटला लढवणारी बाई फुफ्फुसांच्या कर्करोगाने दगावलेल्या नवऱ्याची बायको दाखवली गेली आहे, आणि चित्रपटात मात्र साफ बदलून शस्त्रास्त्र बनवणारी कंपनी आणि गोळीबारात गेलेल्या माणसाची पत्नी असा बदल केला गेला आहे.  

आता इथे जॉन ग्रीशॅमची किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांची कल्पकता तोकडी पडली होती का? तर नाही. मग कादंबरीत असलेली सिगारेट कंपनी सिनेमात आणता आणता बंदूक बनवणारी कंपनी का आणि कशी झाली?

इथे येते डाव्यांची लबाडी. पुस्तकापेक्षा सिनेमा या दृकश्राव्य माध्यमाची ताकद कुणी ओळखली असेल तर डाव्यांनीच. तुम्हाला वाटत असेल की बॉलिवूड म्लेंच्छ किंवा वामपंथी विचारप्रवाह म्हणजे नेरेटीव्ह चालवतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉलिवूडच्या शंभर पटींनी हॉलिवूड हे डाव्या विचारांनी भारलेलं आहे. जे डावे मद्यपान, धूम्रपान, आणि इतर सगळ्या प्रकारच्या व्यसनांचा पुरस्कर करणारे डावे सिगारेट कंपनीच्या विरोधात सिनेमा कसा बनवतील? 

बनवतील सुद्धा, बनलेही (थँक्यू फॉर स्मोकिंग, १९९७), पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना या कथेत बदल करताना बंदूका बनवणाऱ्या कपन्यांवर 'नेम धरला' हे आहे.

हॉलिवूडचे सिनेमे नीट बघितले तर आपल्याला एक समान धागा नेहमी दिसून येतो की एफबीआय, सीआयए, आणि सेना यांना बहुतेक वेळा भ्रष्ट आणि क्रूर दाखवलं जातं (आठवा: Jason Bourne मालिका. आठवा: रनअवे ज्युरी मधल्या जीन हॅकमनचाच एनिमी ऑफ द स्टेट हा सिनेमा ). अशा चित्रपटांतला नायक असलेला सैनिक नेहमी अन्यायग्रस्त असतो आणि आदेशांच्या विरोधात जाऊन नेहमी काहीतरी करत असतो. अनेक सिनेमात मुख्य तक्रारीचा सूर एका गोष्टीच्या विरोधात असतो ती म्हणजे म्हणजे अमेरिकन नागरिकांना त्यांच्याच घटनेने (म्हणजे संविधान बरं का) असलेला शस्त्र बाळगण्याचा अधिकार.

या पूर्ण डाव्यांच्या लॉबीला शस्त्र बाळगण्याच्या याच अधिकारावर आक्षेप आहे. वास्तविक त्यांना आशा प्रत्येक व्यवस्थेवर आक्षेप घेतात जी अमेरिकन नागरिकांना स्वतःसाठी किंवा देशासाठी लढण्यास प्रेरित आणि प्रवृत्त करते. अमेरिकेच्या घटनेच्या सेकंड अमेंडमेंटमध्ये अमेरिकन नागरिकांना शस्त्र (बंदुका) बाळगण्याचा आणि स्वसंरक्षणासाठी ती वापरण्याचा अधिकार दिलेला आहे. मान्य आहे की अधूनमधून अमेरिकेत रागाच्या भरात किंवा इतर कारणांनी केल्या गेलेल्या गोळीबाराच्या घटना घडत असतात, तरीही अमेरिकेत कुणीही शस्त्र बाळगण्याचा आपला हा अधिकार सोडण्याच्या मनःस्थितीत नाही.

सरळ साधा विचार करा, जेव्हा एखादा गुन्हेगार खुनासारखा एखादा गुन्हा करायला प्रवृत्त होतो तेव्हा तो कुठली मानवता पाळतो बरं? ज्या गुन्ह्यामुळे मृत्युदंडाची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, तो गुन्हा करणारा माणूस इतर कुठले कायदे पाळणार आहे.  मग शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराला बेकायदेशीर ठरवण्यात आणि शांतताप्रिय सामान्य नागरिकांचा स्वसंरक्षणाचा अधिकार हिरावून घेऊन त्यांचा जीव धोक्यात घालण्यात काय हंशील?

गोळीबाराच्या घटना घडल्यावर प्रत्येक वेळी शस्त्र (बंदुका) बाळगण्याच्या विरोधात डावे अशा प्रकारचं भावनिक आवाहन करतात की जणू बंदूक स्वतःहून आली आणि गोळीबार करून गेली आहे. वर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंड देण्यालाही त्यांचा विरोध असतो. म्हणजे गंमत बघा

  • जे शस्त्र बाळगून अमेरिकन नागरिक स्वसंरक्षण करू शकतील तो अधिकार काढून घेण्यासाठी लॉबीग करायचं.
  • बंदूक वापरणारा माणूस नव्हे तर बंदूक दोषी असा विचारप्रवाह चालवायचा (कुणाला रे गुरमेहर कौर आठवली? "पाकिस्तान डिड नॉट किल माय फादर, वॉर डिड" हाहा).
  • असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना जरब बसावी आणि गुन्हे कमी व्हावेत म्हणून असलेली मृत्युदंडाची शिक्षा द्यायलाही विरोध करायचा.

सूज्ञ वाचकांना यातली गोम किंवा पॅटर्न लक्षात आला असेलच. डाव्यांना तुम्ही ज्या ज्या प्रकारे स्वतःच संरक्षण करू शकाल असा प्रत्येक अधिकात हिरावून घ्यायचा आहे, इतकंच नव्हे तर अशी प्रत्येक संस्था नष्ट करायची आहे जी तुमच्या अधिकारांचं आणि पर्यायाने तुमचं रक्षण करू शकतील. याच बरोबर त्यांना कायदे हे गुन्हेगारांच्या बाजूने असा वाकवायचे आहेत ज्यायोगे कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा सुनावणं अत्यंत अवघड व्हावं आणि झालीच तर कमीतकमी शिक्षा व्हावी (कुणाला रे निर्भया केस आणि शिवणयंत्र आठवलं?).

यात डाव्यांचा फायदा काय? त्यांचं कुठलं उद्दिष्ट साध्य होतं? तर समाजावर संपूर्ण नियंत्रण. फक्त उत्पादनाची साधने आणि वितरण व्यवस्था यांवर ताबाच नव्हे तर हरप्रकारे संपूर्ण नियंत्रण. तुमच्या संसाधनांवर, तुमच्या विचारांवर, तुमच्या स्वातंत्र्यावर. यात नागरिकांच्या हातात जोवर बंदूक असेल, तोवर त्यांचं मनोबल पूर्णपणे तोडणं शक्य होणार नाही. हातात शस्त्र असलेला माणूस एका मर्यादेपलीकडे वाकणार नाही, संपूर्ण समर्पण करणार नाही. तुम्ही अमेरिकेत झालेल्या ब्लॅक लाईव्हज मॅटर वाल्यांनी केलेल्या दंगली आणि संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवलं असेल तर त्यावेळी अशा घटना घडल्याचं तुमच्या लक्षात आलं असणार की काही ठिकाणी घरं आणि दुकानं जाळायला आणि फोडायला आलेला हिंसक जमाव हा तिथल्या नागरिकांच्या हातातल्या बंदुका नुसत्या पाहूनच पार्श्वभागाला पाय लावून पळाला होता.

ब्लॅक लाईव्हज् मॅटर अर्थात च्या दंगलखोरांपासून आपल्या मालमत्तेचं रक्षण करायला उभं असलेलं बंदुकधारी मार्क आणि पॅट्रेशिया मॅक्लॉस्की (Mark and Patricia McCloskey) हे दांपत्य

म्हणूनच अमेरिकेतील डावे अमेरिकन घटनेच्या (तेच ते, संविधान) सेकंड अमेंडमेंटच्या गेली अनेक दशके मागे लागलेले आहेत.

भारतात १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रजांनी भारतीयांना निःशस्त्र केलं तो निर्णय मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर चाचा नेहरूंनी फिरवला नाही. त्याचा परिणाम असा आहे की जे गुन्हेगार वैयक्तिक किंवा सामूहिक प्रवृत्ती व शिकवणीने प्रेरित होऊन गुन्हे करतात ते कायदे धाब्यावर बसवून निर्भयपणे गच्चीवर दगड, घरात धारदार शस्त्रे, बंदुका वगैरे बाळगत असतात आणि योजना आखून हल्लेही करत असतात (कुणाला रे दिल्ली दंगल आठवली?) आणि सगळे कायदे पाळणाऱ्या नागरीकांना प्रतिकार करायला मात्र काहीच नसतं (याला आणखी अनेक कारणे आहेत पण निःशस्त्र करणारे कायदे हे एक मुख्य कारण नाकारता येत नाही). थोडक्यात, आपला हातात शस्त्र नसलेला जेक गार्डनर झालेला आहे. 

तेव्हा स्वसंरक्षणासाठी करायच्या तयारी बरोबरच शस्त्र बाळगण्याचे परवाने मिळणे सहज सुलभ होण्याच्या दृष्टीने संसद व न्यायालय या दोन्ही मार्गांनी लढा देणे आवश्यक आहे.

तस्मादुत्तिष्ठ!

प्रेरणा: डॉ राजीव मिश्रा

🖋️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. २, शके १९४२


Thursday, March 11, 2021

द डेथ ऑफ स्टालिन (२०१७): साम्यवादी हुकूमशाहीचं विनोदी विच्छेदन

रशियाचे सम्राट झार निकोलस, त्यांची पत्नी, चार मुली, आणि राजकुमार अलेक्सी यांची निघृण हत्या करुन साम्यवादी बोल्शेविक क्रांतीने रशियातली राजेशाही संपवली आणि गरीब, पिडीत, शोषित, कष्टकरी (proletariat) जनतेचा प्रतिनिधी म्हणून गर्भश्रीमंत कॉम्रेड लेनिन सोवियत रशियाचा अध्यक्ष बनला आणि त्याच्या मृत्यूनंतर कॉम्रेड स्टालिन. याच स्टालिनच्या मृत्यू आणि त्या नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट साम्यवादी हुकुमशाही व्यवस्थेची भयानकता आणि दहशत आपल्यापर्यंत चक्क विनोदाच्या माध्यमातून पोहोचवतो.

चित्रपट सुरु होतो तो रेडियो मॉस्कोच्या एका प्रेक्षागृहात सुरु असलेल्या एका वाद्यसंगिताच्या मैफिलीने. या मैफलीचे थेट प्रक्षेपण स्टालिन ऐकतो आणि प्रक्षेपण हाताळणार्‍या कर्मचार्‍याला फोन करुन "मला या मैफिलीचं ध्वनिमुद्रण हवं आहे, ते घ्यायला कुणालातरी पाठवतोय" असा आदेश देतो. हे ऐकल्यावर त्या कर्मचार्‍याचं धाबं दणाणतं. कारण या मैफलीचे फक्त थेट प्रक्षेपण केलेले असतं पण ध्वनिमुद्रण मात्र केलेलेच नसतं, मग स्टालिनला ध्वनिमुद्रण पाठवणार कसं? शिवाय फोन होईस्तोवर नुकतीच मैफल संपलेली असल्याने अर्धेअधिक प्रेक्षक बाहेर पडलेले असतात आणि कलाकारांची आवराआवर सुरु असते. त्याही परिस्थितीत मैफलीच्या थेट प्रक्षेपणासारखी वाटावरणनिर्मिती व्हावी म्हणून कलाकारांना पुन्हा गोळा केलं जातं, बाहेर पडत असलेल्या प्रेक्षकांना दम देऊन पुन्हा बसवलं जातं, आणि प्रेक्षकांच्या उर्वरित रिकाम्या जागा भरायला अक्षरशः रस्त्यावरुन जाणार्‍या आणि सापडलेल्या  कुणालाही आणून प्रेक्षक म्हणून बसवलं जातं. कुणालाही म्हणजे अक्षरशः कुणालाही, मग त्यात एक उलटी दोन सुलटी करुन स्वेटर विणणारी बाई, एक फळं हादडणारी बाई, आपल्या आयुष्यात प्रेक्षागृह न बघितलेलं आणि चेहर्‍यावर 'अजि म्या मार्क्स पाहिला' असे भाव घेऊन वावरणारं एक जोडपं अशी सगळी ध्यानं पाहून आपण फिसकन् हसायला सुरवात करतो. स्टालिनसाठी पुन्हा सगळा पसारा मांडून ध्वनिमुद्रण करायचं इथवर ठीक, पण ऐकलेल्या मैफलीत आणि ध्वनिमुद्रणात स्टालिनला फरक जाणवला तर काय या दहशतीने मैफलीचा मूळ संचालक म्हणजे कंडक्टर झीट येऊन पडतो आणि ध्वनिमुद्रण हाताळणार्‍या कर्मचार्‍यापुढे उपलब्ध वेळात नवा कंडक्टर शोधण्याचं नवीन झेंगट येऊन उभं राहतं. इथेही दुसर्‍या एका म्युझिक कंडक्टरला नाईट गाऊनमधेच उचलून आणतात आणि तसंच मैफल दिग्दर्शित करायला उभं करतात.

तर अशा रितीने मैफल संपते आणि ध्वनिमुद्रण हाताळणारा कर्मचारी स्टॅलिनपर्यंत पोचवण्यासाठी तयार झालेली ध्वनिमुद्रिका घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या हातात ती ठेवत असतानाच संगीत मैफलीतली पियानोवादक ("मी पुन्हा पियानो वाजवायला हवा असेल तर माझा मेहनताना वाढव" असं सांगून ते कबूल करुन घेऊन मगच पुन्हा पियानो वाजवायला तयार झालेली) मारिया त्या ध्वनिमुद्रिकेच्या पाकिटात एक चिठ्ठी सारते. त्या चिठ्ठीमध्ये तिने स्टॅलिनवर बिनधास्तपणे जहरी टीका केलेली . ग्रामोफोनवर ध्वनिमुद्रिका लावून स्टॅलिन मैफलीचा आनंद पुन्हा लुटण्यासाठी सज्ज होत असताना त्याला खाली पडलेली ती चिठ्ठी दिसते ती वाचत असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागतं आणि तो जागीच कोसळतो. सकाळी चहा घेऊन येणार्‍या सेविकेला स्टालिनची अवस्था दिसते आणि मग सुरु होतात अचाट प्रकार. सगळ्यात आधी तिथे पोहोचतो तो गृहमंत्री बेरिया. तिथे पोहोचताच तो स्टालिनच्या त्याही अवस्थेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवू पाहतो. मागोमाग तिथे पोहोचतो उपाध्यक्ष मेलेंकॉव्ह आणि त्यानंतर घाईघाईत नाईट ड्रेसवर कोट पँट चढवून धावतपळत आलेला सरचिटणीस निकिता क्रुश्चेव्ह. मागोमाग कामगार मंत्री कगानोविच, व्यापारमंत्री मियोकन, आणि (आपल्या विशिष्ट पद्धतीने ठेवलेल्या दाढीसाठी जगप्रसिद्ध असलेला) संरक्षणमंत्री बुल्गानिन तिथे हजर होतात. मग परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह, सैन्यप्रमुख फील्ड मार्शल झुकॉव्ह हेही या खेळात सामील होतात आणि जशीजशी 'पात्रांची' संख्या वाढते तसातसा गोंधळ वाढत जातो.


स्टॅलिनच्या अचानक मृत्यूने निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग, त्यातूनच त्याच्या या सहकार्‍यांना दिसणार्‍या विविध संधी, त्यात एकमेकांचा कल कुठे आणि कुणाकडे आहे याचा अंदाज घेत कुरघोडी करण्याची आणि आघाडी उघडण्याची सतत चालवलेली अगदी पार स्टालिनच्या अंत्यविधीपर्यंत आणि नंतरही चाललेली कटकारस्थानं, स्टॅलिनच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचे हिशोब चुकते करणे, ठार मारण्यासाठी चिह्नित केलेल्या लोकांच्या यादीत सतत होणारे बदल, दीर्घकाळ स्टालिनच्या मर्जीने अत्याचार करत अनेकांचे जीव घेऊन आपल्या खुर्च्या आणि जीव अबाधित राखणाऱ्या त्याच्या सहकारी मंत्र्यांनी तो मेल्यावर अचानक आपण उदारमतवादी आहोत हे दाखवायची धडपड करणे आणि दिखाऊपणासाठी का होईना अनेक कैद्यांना सोडणे इत्यादी दयाळू धोरणे आखणे, स्टालिनची मुलगी स्वेतलाना आणि मुलगा वॅसिली यांना 'मॅनेज' करण्याची धडपड, अशा प्रसंगांमुळे परिस्थिती प्रत्येक क्षणाला कूस बदलते आणि आपली  उत्कंठा वाढवत नेत एका अंगावर येणार्‍या प्रसंगाने चित्रपटाचा शेवट होतो.

या रुक्ष घडामोडी घडत असताना यात विनोदनिर्मितीला वाव कुठे मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. पण चित्रपट पाहताना लेखक डेव्हिड स्नायडर व इयान मार्टिन आणि दिग्दर्शक अरमांडो इयानुची (Armando Ianucci) इत्यादींना पहिल्या दृश्यापासून पुन्हा पुन्हा दाद द्यावीशी वाटते. सुरवातीपासून शेवटापर्यंत कुठेही आपल्याला कंटाळा येत नाही. उपरोल्लेखित संगीत मैफलीचे उदाहरण घ्या - स्टालिनची दहशत इतकी की सुरवातीला दारावर थाप पडल्यावर प्राण कंठाशी आणून 'आता नाही येणे जाणे' असे भाव चेहर्‍यावर आणत बायकोचा निरोप घेणारा, त्याला का बोलावलं जात आहे हे समजल्यावर बुचकळ्यात पडलेला कंडक्टर शेवटी त्याच्या मनासारखी मैफल पार पडल्याने सुटका झाल्याचे जे भाव चेहर्‍यावर आणतो तो क्षण चित्रपटाच्या त्या भागाचा परमोच्च बिंदू आहे. 


स्टालिन मेला आहे की नाही, नसेल तर पुन्हा कार्यरत होण्याइतका बरा होईल की नाही, हे ठरवायला डॉक्टर बोलवावेत तर मॉस्कोतल्या सगळ्या चांगल्या डॉक्टरांना मारुन टाकल्याने गोची झालेली असते, म्हणून मग मैफल हाताळणारा कर्मचारी जशी वाट्टेल ती माणसे प्रेक्षक म्हणून धरून आणतो तसे अक्षरशः 'ध्यानं' वाटतील अशा डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय स्टाफला धरून आणले जाते ती वेड्यांची मांदियाळी पाहून आपल्याला पोट धरधरून हसणं भाग पाडतं. अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीची परिस्थिती असलेले प्रसंग आणि प्रसंगांच्या मालिका विनोदाच्या माध्यमातून प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतात. अगदी झाडाकडे तोंड करुन लघवी करणारा मेलेंकॉव्ह आणि त्याच्याशी गप्पा मारणारा लेवेरँटी बेरिया हे दृश्य सुद्धा त्याच्या खुसखुशीत संवादांमुळे आपल्याला हसवून जातं. आवश्यक तिथे तिरकस, हवे तिथे बोचरे, आणि जिथे हवे तिथेच असलेले संवाद ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.  

साम्यवादी राजवटीत होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी; संपत्ती, जीव, आणि अब्रू यापैकी कशाचीच शाश्वती नसणे आपलं बूड शाबूत रहावं म्हणून सतत चालणारी नेत्यांची केविलवाणी धडपड आणि जनरल सेक्रेटरी (इथे स्टालिन) यांच्याशी एकनिष्ठ असण्याच्या शपथा घेणे; ठार मारावयाच्या व्यक्तींच्या याद्या स्टालिनच्या कार्यालयवजा निवासस्थानाबाहेर एनकेव्हिडी (NKVD) च्या अधिकार्‍यांच्या हातात ठेवताना बेरिया त्यांना देत असलेल्या सूचना ही दृश्ये प्रथम हसवत असली तरी चित्रपट जसजसा शेवटाकडे जाऊ लागतो तसतसं त्यातला थंड क्रूरपणा ठळकपणे जाणवू लागतो. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर झालेल्या पार्टी मिटींगमधे विविध पदे आणि जबाबदार्‍यांचे वाटप इत्यादी बाबतीत 'एकमताने' घेतलेले निर्णय हे दृश्य साम्यवादी राजवटीत असलेला वास्तविक भंपकपणा दाखवतं., याखेरीज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात प्रमुख घटना किंवा मुख्य पात्रांच्या मागे पार्श्वभूमीवर सतत हिंसा दिसते. म्हणजे एकट्याने किंवा घोळक्याने लोकांना धरुन नेलं जात आहे, बंद दाराआडून ऐकू येणारा गोळीबार, ढकलून दिल्याने कुणीतरी जिन्यावरुन गडगडत खाली पडतंय, निव्वळ स्टालिन आजारी असल्याची बातमी घेऊन आलेल्या सैनिकाला झालेली अटक, इत्यादी प्रसंग संपूर्ण चित्रपटभर दिसत राहतात, आणि हे असं सतत दिसणारं थंडपणे चालणारं दमन हा कम्युनिस्ट कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीचा स्थायी भाव सतत चित्रपटभर अधोरेखित होत राहतो. म्हणूनच चित्रपटाच्या पोस्टरवर शेक्स्पिअरच्या 'कॉमेडी ओफ एरर्स'च्या धर्तीवर असलेले 'कॉमेडी ओफ टेरर्स' हे शब्द शोभतात. 

एखाद्या गोष्टीचं गांभीर्य चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचे अनेक मार्ग असले तरी चक्क विनोदाचा वापर करुन सादरीकरण प्रभावीपणे करण्यात यशस्वी ठरणारा कदाचित हा एकमेव सिनेमा असावा. चित्रपटाची लय आणि गती शेवटपर्यंत टिकून राहते याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. या आधी हुकूमशाहीवर विनोदी अंगाने टिप्पणी करणारे सिनेमे झाले नाहीत असं नाही, त्यातली चटकन आठवणारी नावे म्हणजे चार्ली चॅप्लिनचा द ग्रेट डिक्टेटर ते हल्ली हल्ली म्हणजे २०१२ साली आलेला साशा बॅरन कोहेनचा द डिक्टेटर हे दोन सिनेमे. मात्र या दोन्ही चित्रपटांत परिस्थितीवर भाष्य करायला विनोदाचा वापर करण्याऐवजी विनोदनिर्मितीकडे कल अधिक दिसून येतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर प्रेक्षकांना हसवणे हा प्रमुख उद्देश आणि त्याला तोंडी लावायला अनुक्रमे हिटलर आणि अरबी लष्करी हुकूमशहा हे हुकमी भावनिक पत्ते घेऊन दोन्ही सिनेमे बनवले आहेत असं वाटून जातं. या सर्व चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर साम्यवादी हुकूमशाहीची गोष्ट सांगण्याला प्राधान्य देणारा आणि तरीही विनोदनिर्मितीच्या योग्य जागा हेरून आपल्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवणारा 'द डेथ ऑफ स्टालिन' ठळकपणे उठून दिसतो. 

पु. ल. देशपांडे आपल्या अंतु बर्वा या व्यक्तिचित्रात म्हणतात, "विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य अस कवच." हा चित्रपट त्याही पलिकडे जाऊन आपल्याला हसवत हसवत अंतर्मुख व्हायला भाग पाडतो, आणि म्हणूनच वेगळा ठरतो. नेहमीच्या हेरकथा आणि विनोदपटांनी कंटाळला असाल तर हा चित्रपट नक्कीच एक सुखद धक्का देऊन जाईल हे नक्की. 

म्हणूनच 'द डेथ ऑफ स्टालिन' बघायला विसरू नका!

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. १३, शके १९४२, महाशिवरात्री



Monday, November 2, 2020

शॉन कॉनरी - झाले बहु होतील बहु परी यासम हाच अर्थात नोबडी डझ इ़ट बेटर

कुठल्याही मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वडिलांकडून काही गोष्टींचा वारसा मिळतोच. स्थावर जंगम मालमत्ता ही झाली संपत्तीची गोष्ट, पण इतरही अनेक गोष्टी असतात. आमच्या तीर्थरुपांकडून चार प्रमुख गोष्टींचा वारसा मिळाला तो म्हणजे शिस्त व वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, वाचनाची आवड, आणि जेम्स बाँड.

त्या काळात रंगीत टीव्ही घेऊन तसा काही काळ लोटला होता, आणि मग आमच्याकडे आला होता व्हीसीपी अर्थात व्हिडिओ कॅसेट प्लेअर. त्यावर अनेक दर्जेदार सिनेमे बघायला मिळाले पण नंतर बाबांनी रांग लावली ती जेम्स बाँडच्या सिनेमांची. व्हिडिओ कॅसेट भाड्याने देणार्‍या दुकानांतून कॅसेट आणून बघितलेला जेम्स बाँडचा बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे You Only Live Twice हा मात्र जेम्स बाँडचा पहिला नव्हता. मात्र त्यात खोटं मरुन पुन्हा जिवंत झालेल्या शॉन कॉनरीचं कमांडर बाँडचं नौसैनिकाच्या गणवेशातलं देखणं रुपडं मनात भरलं ते कायमचंच. यानंतर मनात ठसलेलं दृष्य म्हणजे १९६२ साली आलेला पहिल्या बाँडपटातलं डॉक्टर नो मधलं जेम्स बाँड त्याचा प्रसिद्ध "माय नेम इज बाँड, जेम्स बाँड" हा संवाद म्हणतो ते दृश्य.


इंग्लंडची लोकं बाकी काही करोत न करोत बोलबच्चन या प्रकारात वाकबगार आहेत. नाव आणि ००७ या कोड नंबर सकट काहीच सिक्रेट नसलेला हा सिक्रेट एजंट कदाचित एरवी हास्यास्पद ठरला असता, पण संबंधितांनी हे रसायन असं काही जुळवून आणलं की आज सहा दशके व्हायला आली तरी इंग्रजी सिनेरसिकांवरचे त्याचे गारूड अजूनही कायम आहे. या रसायनाने सिनेरसिकांवर खोल परिणाम केला त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे अर्थातच शॉन कॉनरी. त्याने घातलेल्या पायावर इतर नटांनी कळस चढवला नाही पण इमारतीचा विस्तार मात्र नक्कीच केला. खरं तर हे वाक्य, 'जेम्स बाँड नामक इमारतीचा शॉन कॉनरीने सुरवातीलाच कळस निर्मिल्यामुळे इतरांना पायापर्यंत जाण्यापलिकडे आणि कळसाला शोभेलसं आपलं काम हवं याकडे लक्ष देण्यापलीकडे काही करण्यासारखं काम उरलं नाही' असं असायला हवं.

'जेम्स बॉण्ड'चा जनक इयान फ्लेमिंग हा कट्टर ब्रिटिश परंपरेचा पाईक होता तसेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश रॉयल नौदलात नोकरी करताना त्याने युद्धभूमीवरील साहसाचाही अनुभव घेतला होता. त्यामुळे जेम्स बाँड या व्यक्तीरेखेला त्याने 'ब्रिटिश'च रंगविणे साहजिकच होते. डॉक्टर नो या पहिल्या बाँडपटासाठी डेव्हिड निव्हेन या ब्रिटिश अभिनेत्याची त्यामुळेच निवड करण्यात आली होती. पण निव्हेन यानी 'मी या भूमिकेसाठी वयामुळे योग्य वाटत नाही...' (त्यावेळी ते ५२ वर्षांचे होते) असे सांगून नकार दिल्यावर मग पुन्हा सुरु झालेल्या शोधात शॉन कॉनेरी ह्या स्कॉटिश अभिनेत्याची निवड झाली. आणि पुढे इतिहास घडला.

शॉन कॉनरी बाँड सर्वाधिक लोकप्रिय का करु शकला केला याला अनेक कारणे आहेत. शॉनचे व्यक्तिमत्व आणि ब्रिटिश मर्दपाणाची त्याने पडद्यावरची बदललेली व्याख्या ही त्यातली प्रमुख कारणे होती. शॉन कॉनरीच्या बाँडमध्ये ब्रिटिशांच्या ठायी असलेला एक प्रमुख गुण म्हणजे देशाबद्दल आणि राज्यकर्त्यांबद्दल असलेला आत्यंतिक प्रामाणिकपणा हा प्रकर्षाने दिसतो. त्याच बरोबर एमआय-५ आणि बॉसने नेमून दिलेली कामगिरी कसलाही विधीनिषेध न बागळगता आणि प्रसंगी घालून दिलेला प्रत्येक नियम मोडून पार पाडणे, स्त्रीसंग करतानाही आपण हे देशासाठी करतो आहोत याचं भान बाळगणे (थंडरबॉलमधला एक संवाद आठवा: All I did was for King and Country) आणि त्यामुळे त्याच्या रंगेलपणाला आलेली एक ग्लॅमरस झळाळी ही वैशिष्ट्येही शॉन कॉनरीच्या बाँडने प्रेक्षकांच्या मनावर ठसवली. एखादा नट म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ आहे असं म्हटलं जातं, त्याच धर्तीवर शॉन कॉनरी हा बाँडची भूमिका करणार्‍या प्रत्येक नटासाठी नक्कीच ती कशी करावी हे शिकवणारं अभिनयाचं विद्यापीठ ठरला हे नक्की.

नट पडद्यावर काय बोलतो हे संवाद लेखक ठरवत असेल, पण शॉन कॉनरी ज्या पद्धतीने अगदी मिष्किल संवाद अत्यंत गंभीरपणे म्हणायचा त्याला तोड नव्हती. याचं उदाहरण म्हणून डॉक्टर नो मधलं एकच दृश्य पुरेसं आहे. त्याला विमानतळावर घ्यायला पाठवलं आहे असं भासवणार्‍या ड्रायव्हर-कम-गुंडाला ठार करुन त्याची बॉडी त्याच गाडीत टाकून जेम्स बाँड ब्रिटिश दूतावासासमोर गाडी उभी करतो आणि दाराशी उभ्या असलेल्या गार्डला "गाडी लाव" असं निष्काळजीपणे सांगून तसंच पुढे ड्रायव्हरच्या मृतदेहाकडे अंगुलीनिर्देश करत "याच्यावर लक्ष ठेव, कुठे पळायला नको" असं सांगतो हा संवाद शॉन ज्या पद्ध्तीने म्हणतो ते बघा म्हणजे मी काय म्हणतो आहे त्याची खात्री पटेल.

अभिनयाचा फार विस्तीर्ण परीघ नसतानाही रसिकांच्या मनावर एका व्यक्तिरेखेमुळे इतकी खोल छाप पाडणारा शॉन कॉनरी हा एक विरळा अभिनेता होता हे मात्र खरेच. शॉन कॉनरीच्या जेम्स बाँडपलीकडे भूमिका गाजल्या तरी तो आज प्रामुख्याने ओळखला जातो तो जेम्स बाँडमुळेच. बाँडपलीकडे त्याने केलेल्या मला आवडलेल्या भूमिका म्हणजे:

(१) मध्ययुगीन ख्रिस्ती चर्चेसच्या काळात घडलेली खुनांची मालिका एक प्रवासी प्रिस्ट (मंक) कसा यशस्वीरीत्या उलगडतो त्याची चित्तथरारक गोष्ट. हू-डन-इट छापाचा चित्रपट. यातली मध्यवर्ती भूमिका अर्थातच शॉन कॉनरीने साकारलेली त्या प्रवासी मंकची.

(२) या लेखात दुसरा असला तरी बाँडपट वगळता शॉनची मला सर्वाधिक आवडलेली भूमिका म्हणजे 'मॅन हू वूड बी किंग' हा जबरदस्त चित्रपट. यात सहाय्यक अभिनेता म्हणून शॉन ज्याला जवळचा मित्र मानत असे असा आणखी एक ताकदीचा अभिनेता मायकल केन आणि शॉन यांनी जी धमाल उडवून दिली आहे त्याला तोड नाही.

(३) एकाच वेळी सुंदर, गोड, आणि मादक वाटणार्‍या कॅथरीन झेटा-जोन्स बरोबर प्रेक्षकांना पटावा असा या वयात देखील रोमान्स करणारा शॉन कॉनरीचा धाडसी चोर ज्यात आहे तो 'एन्ट्रॅपमेन्ट'.

(४) शामळू निकोलस केज हा ज्या सिनेमात शॉन कॉनरीच्या छत्रछायेत चक्क अ‍ॅक्शन हीरो वाटून जातो तो 'द रॉक' हा चित्रपट. गंमत म्हणजे यात त्याने तारुण्यात अमेरिकेने अटक केलेल्या ब्रिटिश गुप्तहेराची भूमिका केली आहे.

(५) 'द हंट फॉर रेड ऑक्टोबर' या चित्रपटातला शॉनने साकारलेला अमेरिकेकडे 'डिफेक्ट' होऊ इच्छिणारा रशियन आण्विक पाणबुडीचा कॅप्टन.

(६) 'द अन्टचेबल्स' मधला शॉनने रंगवलेला तडफदार धाडसी कॉन्स्टेबल. 

जाता जाता पुन्हा जेम्स बाँडकडे वळूया. 'ऑन हर मेजेस्टीज सिक्रेट सर्विस' मध्ये लेझन्बीने चित्रपटाचा असा काही चुथडा केला होता की त्या व इतर काही कारणांनी जॉर्ज पुढचे बाँडपट करणार नाही हे नक्की झाल्यावर, आणि जॉन गॅविन या ००७च्या भूमिकेसाठी निवड झालेल्या नटाबद्दल युनायटेड आर्टिस्ट्स या स्टुडियोतले बॉसेस साशंक असल्याने पुन्हा शॉन कॉनरीला 'जेम्स बाँडच्या भुमिकेसाठी 'डायमंड्स आर फॉरेव्हर'मध्ये पुन्हा पाचारण करण्यात आलं. या चित्रपटाने चक्क बाँडपटांच्या यादीतील सर्वाधिक गल्ला जमवणार्‍या यादीत चक्क तिसर्‍या क्रमांकावर उडी घेतली. इतकंच नव्हे तर नियमित बाँड फ्रॅन्चायझीचा भाग नसलेल्या पण कादंबरीतून चित्रपटनिर्मितीचेहक्क ज्याच्याकडे होते त्या केव्हीन मॅक्लॉरी (Kevin McClory) ने 'थंडरबॉलचा' रिमेक 'नेव्हर से नेव्हर अगेन' असं बारसं करुन केला तो त्यावेळी तब्बल ५३ वर्ष वयाच्या शॉनला घेऊनच.

सर्वोत्कृष्ठ बाँड कुठला यावर माझी काही मित्रांशी चर्चा झाली. त्यात जॉर्ज लेझन्बीला ताबडतोब निकालात काढण्यात आले. रॉजर मूरचा मिश्किल बाँड अनेकांना प्रिय असला तरी टीकाकार आणि खुद्द रॉजर मूर साहेबांनीच कबूल केल्याप्रमाणे कधी डावी भुवई उडवणे तर कधी उजवी भुवई उडवणे यापलीकडे त्यांचा अभिनय बाँडपटात तरी कधी दिसला नाही असं अनेकांचं मत पडलं. टिमथी डॅल्ट्न हा व्यक्तिश: मला खूप आवडत असला तरी बाँडला अतिगंभीर करण्याचा दोष त्याला लागू शकतो. पिअर्स ब्रसनन हा सर्वोत्कृष्ठ बाँड आहे असं एका मित्राचं मत आहे आणि ते पटण्यासारखं असलं तरी त्याच्यात बाँडला लागणारा जो निष्ठूरपणा असतो तो पुरेसा दिसत नाही हे माझं मत. आणि डॅनियल क्रेगबद्दल न बोललेलं बरं, त्याच्यावर तर चक्क craignotbond क्रेग नॉट बाँड अशी त्याला बाँडची भूमिका मिळू नये किंवा मिळालेली रद्ध व्हावी म्हणून मोहीम चालवायला स्वतंत्र संकेतस्थळच उघडलेलं होतं. आमच्या घरी तो 'चम्या दिसतो' यावर एकमत आहे.

यातलं चूक किंवा बरोबर हे बाजूला ठेवून या मतमतांरांमध्ये इतकं वैविध्य का आहे याचं कारण शोधाताना पुन्हा पुन्हा आपण शॉन कॉनरीपाशीच येऊन थांबतो. याचं गारूड इतकं आहे की माझ्या मुलालाही सिनेमातलं इंग्रजी अजिबात कळत नसताना हार्ड् डिस्कवर शॉन कॉनरी वगळून दुसर्‍या कुणाचाही बाँडपट लावला तरी "बाबा हा अ‍ॅक्टर नको तो आधीचा लावा" असं म्हणावंसं वाटतं यातच सारं आलं.

अशा या अपरिमित आनंद देणार्‍या, सिनेरसिकांच्या मनातील एकमेव जेम्स बाँड असलेल्या आणि शेवटपर्यंत स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या शॉन कॉनरीला श्रद्धांजली.

© मंदार दिलीप जोशी

टीपः यात मला काय वाटतं इतकंच लिहीलेलं आहे. कारण शॉन कॉनरीचा प्रवास हा कामगार, बॉडी बिल्डर, मॉडेल, ते अभिनेता हा कसा झाला हे अनेक ठिकाणी अनेक वेळा आधीच नोंदवलं गेलं असल्याने त्यात नवीन काहीच नाही.

Tuesday, July 14, 2020

केप फियर: तिटकाऱ्याची परिसीमा

Cape Fear नावाचा इंग्रजी सिनेमा आहे. त्यात बलात्काराच्या गुन्ह्याखाली १४ वर्ष शिक्षा भोगून आलेला मॅक्स हा त्याच्या वकीलाच्या मागे लागतो. खटल्या दरम्यान वकिलाने काही पुरावे दडवल्याने त्याची शिक्षा कमी होऊ शकणार असते ती झालेली नसते. कदाचित मॅक्स निर्दोष सुटू शकला असता ते ही अर्थातच होऊ शकलेलं नसतं.  

तुरुंगात वकिली शिकलेल्या मॅक्सच्या मनात यामुळे त्याच्या सॅम बावडेन या वकिलाबद्दल इतका द्वेष भरलेला असतो की तो त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मागे अत्यंत भयानकपणे लागतो. 

मॅक्स म्हणजे रॉबर्ट डी निरोची संवादफेक इतकी प्रभावी आहे की आपण अनेकदा डोकं धरून बसतो. आपल्या छातीतली धडधड शेवटपर्यंत थांबत नाही. सॅम इतका बोलतो, इतका बोलतो की अगदी चित्रपटाच्या शेवटी मॅक्स केडी बोटीबरोबर जखडला गेल्याने नदीत ओढला जातो त्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सतत बोलत, गरळ ओकत असतो. 

हा कधी एकदाचा मरतो आणि याची कारस्थाने थांबतात आणि याचं बोलणं बंद होतं असं आपल्याला वाटत राहतं. 


Robert De Niro in White Shirt and Cap With Nick Nolte in Cape Fear ...

रॉबर्ट डी निरोच्या अफलातून अभिनयासाठी आणि अप्रतिम दिग्दर्शनासाठी हा सिनेमा एकदा तरी नक्की बघा.


🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसास्वादक, 📗 पुणे ग्रीनकार्ड होल्डर 


Monday, July 13, 2020

देवाचिये द्वारी गुदमरे जीव

खूप पूर्वी 'दी ओमेन' नावाचा एक इंग्रजी हॉरर सिनेमा बघितला होता. त्यात जन्माला आल्यावर थोड्याच वेळात बाळ मृत झाल्याने हॉस्पिटलचा फादर त्या बाळाच्या वडिलांना म्हणजे रोबर्टला गुप्तपणे दुसरंच बाळ त्याचंच आहे असं त्याच्या बायकोला म्हणजे कॅथरीनला भासवत दत्तक घ्यायला लावतो. ते बाळ म्हणजे डेमियन (संपूर्ण कथा नेटवर उपलब्ध आहे म्हणून इतकंच सांगतो की डेमियन हा अँटीख्राईस्ट/माणूस नसलेला/सैतान/वगैरे असतो). 

डेमियनला एकदा रॉबर्ट आणि कॅथरीन त्याला चर्चमध्ये घेऊन जायला म्हणून निघतात. जसेजसे ते चर्चच्या जवळ येतात तसतसा डेमियन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागतो आणि शेवटी तो इतका हिंसक होतो की त्याला परत घरी घेऊन जावं लागतं.

आज ग्रेगरी पेकचा एक दुसरा सिनेमा बघताना हा सिनेमा सहज आठवला. अगदी सहज.

https://youtu.be/LO3KlIShoHo

देवाचिये द्वारी गुदमरे जीव
दिशा चुकलेल्या मनुष्याचा

🖋️ मंदार दिलीप जोशी
🎞️ चित्रपट रसस्वादक, 📗 पुणे ग्रीन कार्ड होल्डर

Monday, September 16, 2019

दिग्दर्शन म्हणजे काय

शिरीष कणेकर आपल्या फिल्लमबाजी या एकपात्री कार्यक्रमात म्हणतात, की कुठल्यातरी चित्रपटात माला सिन्हा पहिल्याच सीनमध्ये घागरच्या घागर भरून पाणी नेते, तर पुढे तिची आंघोळ का नाही दाखवली?" यातला विनोदाचा भाग सोडला तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रसिद्ध रशियन लेखक अँटॉन चेकोव्ह याने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या अनेक पत्रात एक उल्लेख आढळतो. तो म्हणतो की "नाटकाचा एक नियम असावा. पहिल्या अंकात जर तुम्ही भिंतीवर बंदूक दाखवलीत, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडालाच पाहिजे. नाहीतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय?"

लायसन्स टू किल या चित्रपटात जेम्स बॉण्डचा अमेरिकन सीआयएमधला मित्र फिलिक्स लाईटर आणि त्याची पत्नी डेला त्यांच्या लग्नात त्याला त्यांचं आणि त्याचं नाव कोरलेला एक सिगारेट लायटर भेट देतात. जेम्स बॉण्ड लगेच तो पेटवून बघतो तेव्हा त्यातून नेहमीच्या लायटरपेक्षा खूप मोठी आणि लांब ज्योत बाहेर फेकली जाते.

कुणाला अपाय होत नाही पण याचा संदर्भ पुढे सिनेमात कुठेही न आल्यामुळे आपण हे दृश्य जवळजवळ विसरलेलो असतो.

पुढे फिलिक्सने पकडलेला अंमली पदार्थांचा तस्कर अर्थात ड्रग स्मगलर सांचेझ हा डेलावर आपल्या माणसांकरवी बलात्कार करवतो आणि फिलिक्सला गंभीर जखमी करवतो.

याचा बदला म्हणून जेम्स बॉण्ड अर्थातच गुप्तरीतीने सांचेझच्या मागे लागून त्याचं साम्राज्य नष्ट करतो. शेवटच्या मारामारीत ड्रग्स मिसळलेल्या गॅसोलीनने म्हणजे रॉकेलने माखलेला सांचेझ जेम्सला मारायला कोयता सदृश्य शस्त्र उगारतो तेव्हा जेम्स त्याला विचारतो की मी हे सगळं का केलं हे तुला जाणून घ्यायची उत्सुकता नाही का? "Don't you want to know why?" हे ऐकून सांचेझ क्षणभर थांबतो. जेम्स खिशातून तोच सिगारेट लायटर काढून त्याला दाखवतो आणि त्यावरची नावं वाचून डोळे विस्फारलेल्या सांचेझला लायटर पेटवून त्यातून निघालेल्या मोठ्या ज्योतीचा वापर करून पेटवून देतो आणि तिथून निसटतो.

तर, लायटरमधली सर्वसाधारण लायटरपेक्षा कैक पटींनी मोठी असलेली ज्योत का दाखवली हे आपण केव्हाच विसरलेलो असतो, किंबहुना मठ्ठ सिनेमांवर पोसलेल्या आपल्या सिने-मनाला हा प्रश्नही पडत नाही. पण शेवटी याचं उत्तर मिळतं, नव्हे दिग्दर्शक आपल्याला देतो.

याला दिग्दर्शन म्हणतात.

©️ मंदार दिलीप जोशी

Sunday, June 2, 2019

जेम्स बॉन्ड - शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे काय रे भाऊ?

आपण जेम्स बॉन्डच्या प्रत्येक चित्रपटात पाहिलं असेल, की त्याचे आवडते पेय म्हणजे मार्टिनी. तो जिथे कुठे हे पेय घईल, ते देणार्‍याला म्हणजे सर्व करणार्‍याला तो फक्त एवढंच सांगून थांबत नाही. तो पुढे म्हणतो, "शेकन, नॉट स्टर्ड". याचं काहीही बोध न होणारं विनोदी मराठी भाषांतर म्हणजे "हलवून दे, ढवळून नको".

आता हे शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे नेमकं काय? नक्की काय शेकवायचं...आपलं...हलवायचं असतं...आणि ते स्टर्ड म्हणजे ढवळायचं का नसतं? तर ते शेकन म्हणजे काय असतं ते आधी पाहू. मार्टिनी हा एक कॉकटेलचा प्रकार आहे. तर शेकन कॉकटेले एकात दुसरं मिसळून ढवळून चालत नाहीत. ती व्यवस्थित हलवून तयार करण्याकरता बाजारात पूर्णपणे स्टीलपासून बनवलेला एक खास 'शेकर' मिळतो. या शेकरचे एकूण तीन भाग असतात. तळाकडचा म्हणजे खालचा स्टीलचा मोठा कप असतो त्यात पेये घातली जातात. या भागाला दोन भागांचे असलेले एक स्टीलचेच झाकण असते. ते दोन भाग म्हणजे एक गाळणी आणि त्यावर असलेला एक स्टीलचा कप. आधी म्हटल्याप्रमाणे हा शेकर संपूर्ण स्टीलचा बनवलेला असल्याकारणाने ही चाळणी आणि कपही स्टीलचेच असतात.



जेम्स बॉन्डला जर त्याची लाडकी मार्टिनी शेकन करुन द्यायची असेल तर त्यात व्होडका आणि व्हर्मूथ (vermouth) अशी दोन पेये वापरावी लागतात. व्हर्मूथ म्हणजे ड्राय अर्थात चवीला कडूसर. व्हर्मूथ हा एक व्हाईट वाईनचा प्रकार असून त्यात साखर अगदी अत्यल्प असते. अशा या कडूसर व्हाईट वाईनमध्ये काही वनस्पतींचा अर्क उतरवला की व्हर्मूथ तयार होते. आपल्याकडे जसं एखादी रेसिपीत "मीठ चवीप्रमाणे" असं लिहीलेलं असतं तसं यातही चवीनुसार जास्तीची साखर घालतात. व्हर्मूथचे च्या अनेक ब्रॅण्डपैकी 'मार्टिनी' याच नावाचा व्हर्मूथचा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. तर त्याची कृती अशी, की एक 'मार्टिनी ग्लास' फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा. मग एकास चार या प्रमाणात व्हर्मूथ व व्होडका घ्यायची...अंहं, एकत्र करायची नाही. पण यांचेही प्रमाण साधारण १४ मिली व्हर्मूथ आणि ५६ मिली व्होडका असे ठरलेले आहे. आता वर उल्लेख केलेल्या शेकरमधला कप भरून बर्फ घ्यायचा आणि त्यात व्हर्मूथ टाकायची. पण यात बर्फ आणि व्हर्मूथ एकत्र करणे हा उद्देश नसून त्या बर्फाला व्हर्मूथने 'ओले' करणे एवढाच आहे. त्यामुळे ताबडतोब कपावर गाळणी लावली जाते आणि ती व्हर्मूथ लगेच गाळली जाते. मग त्या शेकरमधल्या व्हर्मूथयुक्त बर्फात व्होडका टाकली जाते. आता गाळणीचे झाकण लाऊन मग शेकर पूर्ण बंद करून तो व्यवस्थित हलवायचा. म्हणजे उरलेले औषध संपवायला आपण त्यात पाणी घालून हलवतो तसे...ख्या ख्या. आता हे शेकलेले अर्थात शेकन अर्थात हलवलेले मिश्रण शेकरच्या गाळणीद्वारे त्या थंड केलेल्या ग्लासात गाळायचे. पुन्हा चवीकरता हवे असल्यास त्यात एक लिंबाचे साल टाकायचे.

झाली बॉन्ड साहेबांची 'व्होडका मार्टिनी, शेकन नॉट स्टर्ड' तयार!

'स्टर्ड' मार्टिनी तयार करताना फरक इतकाच की व्होडका शेकरमध्ये ओतली की हलवायच्या ऐवजी बारीकश्या चमच्याने थोडीशी ढवळली जाते. ती त्या थंड ग्लासात गाळली की झाली तयार 'मार्टिनी, स्टर्ड नॉट शेकन'!

पण जेम्स बॉन्डला शेकनच का लागते? स्टर्ड मार्टिनी तयार करण्याच्या कृतीचा आणि त्या पेयाची मजा घेण्याचा काय संंबंध? तर जेम्स बॉन्ड कोण आहे? तर गुप्तहेर. आता तो गावभर...आपलं....जगभर "बॉन्ड, जेम्स बॉन्ड" अशी ओळख देत बोंबलत फिरतो ते सोडा. तर, गुप्तहेराने नशा केली तर तो त्याचं काम कसं करणार? म्हणजे जिथे मार्टिनी मिळते अशा बारमधे किंवा हॉटेलात स्टाईलीत रुबाबात एन्ट्री तर मारायची असते, आणि तिथे आणखी शायनिंग मारत मद्यपान तर करायचं आहे, शिवाय नशाही हवी आहे, पण इतकीही नाही की झिंगून बेसावधपणा येईल - कारण त्याला त्याची कामगिरीही पार पाडायची आहे. पण मार्टिनी मूळ कशी तयार केली जाते, तर स्टर्ड अर्थात ढवळून. पण तसे केल्याने त्यातले अल्कोहॉलचे प्रमाण तसेच राहते. आता हे एका गुप्तहेराला कसे चालणार? म्हणून जेम्स बॉन्डला मार्टिनी शेकन हवी असते. वर दिलेल्या कृतीप्रमाणे हलवल्यामुळे कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, कारण हलवल्याने बर्‍यापैकी अल्कोहोल उडून जाते. त्यामुळे जेम्स बॉन्डला अपेक्षित न झिंगता नशा येऊन ताजेतवानेपणा आणणारे पेय तयार होते.

शॉन कॉनरी, रॉजर मूर, जॉर्ज लेझनबी, टिमथी डाल्टन, पिअर्स ब्रोस्नन यांनी ही शेकन नॉट स्टर्डची परंपरा सुरु ठेवली होती. डॅनियल क्रेगचा बॉण्ड मात्र कॅसिनो रॉयॅल (२००६) मधे जुगाराच्या एका टप्प्यात कोट्यावधी डॉलर हरल्यावर जेव्हा वेटर त्याला "सर, शेकन ऑर स्टर्ड?" असं आदबीने विचारतो, तेव्हा सटकून म्हणतो "डू आय लुक लाईक आय गिव्ह अ डॅम?"

असं करु नकोस बाबा, आम्हाला आपलं तू विचारल्यावर "शेकन नॉट स्टर्ड" असंच म्हणत जा रे.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ १४, शके १९४१

Friday, December 23, 2011

चित्रपट परिचय - ५ | इनव्हिक्टस Invictus: खेळातून राष्ट्रीय एकात्मता - एक आगळावेगळा प्रयत्न

सत्तावीस वर्ष गोर्‍या लोकांनी तुरुंगात खितपत पडायला लावल्यावर - आणि त्यापैकी बहुतांश काळ सहा बाय पाच फुटांच्या एका खोलीत काढायला लागल्यावर - एका सामान्य कृष्णवर्णीय माणसाची सुटकेनंतर काय प्रतिक्रिया होईल? सुटल्यावर पहिली गोळी त्याने एका गोर्‍याला घालणे हीच. आणि समजा त्याच माणसाच्या ताब्यात देशाची धुरा सोपवली तर? कल्पना करवत नाही ना?

पण इथेच माणूस आणि देवमाणूस यातला फरक स्पष्ट होतो. ही गोष्ट आहे अर्थातच नेल्सन मंडेला यांची. इतकी वर्ष तुरुंगात खितपत पडल्यावरही 'सूड' ही भावना या महामानवाला शिवली देखील नाही. इतकंच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षपद हातात आल्यावर राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नांमधे गोरे आणि काळे यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येईल हेच प्रमुख उद्दिष्ट त्यांनी ठेवलं.

दोन देशांमधली दरी मिटवण्यासाठी क्रिकेटचा वापर म्हणजेच क्रिकेट डिप्लोमसी आपल्याला नवीन नाही. मंडेलांनी देशांतर्गत एकी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रग्बी या खेळाचा साधन म्हणून केलेला उपयोग मात्र नाविन्यपूर्ण म्हटला पाहीजे. इनव्हिक्टस हा अशाच धाडसी प्रयत्नांवर आधारलेला चित्रपट.


मंडेला यांची १९९० साली तुरुंगातून झालेली सुटका इथे हा चित्रपट सुरू होतो. मग झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात त्यांचा पक्ष विजयी झाल्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडही होते. वाढत चाललेली गुन्हेगारी आणि बेरोजगारी यांना रोखणे आणि आर्थिक डोलारा सावरणे या आणि अशा अनेक आव्हानांना ते भिडतात. राष्ट्रीय रग्बी संघाच्या म्हणजेच स्प्रिंगबॉक्सच्या एका सामन्याला ते हजेरी लावतात तेव्हा यच्चयावत कृष्णवर्णीय प्रेक्षक हे आपल्याच राष्ट्रीय संघाच्या विरोधात घोषणाबाजी करताना तर विरोधी संघाला पाठिंबा देताना त्यांना दिसतात. कारण काळ्यांच्या दृष्टीने स्प्रिंगबॉक्स म्हणजे अपार्थाइड या वर्णद्वेषी कायद्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ असतो. हे पाहिल्यावर कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांच्यातील दुरावा मिटवणं ही किती कर्मकठीण गोष्ट आहे हे त्यांच्या लक्षात येतं. पण "An optimist is a person who finds an opportunity in every calamity" हे वाक्य अंगी भिनवलेल्या मंडेला यांना या खेळातच एक आशेचा किरण दिसतो. जवळ जवळ वर्षभरातच दक्षिण आफ्रिका रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार असल्याने ही संधी साधून रग्बी हा खेळच राष्ट्रीय एकात्मता साधायला उपयुक्त ठरू शकेल अशी त्यांची मनोमन खात्री होते.



आधीच वर्णद्वेषी राजवटीचं प्रतीक म्हणून कृष्णवर्णिय जनतेत बदनाम असलेल्या स्प्रिंगबॉक्स संघाला त्याच्या वाईट कामगिरीचं कारण पुढे करुन सरळ बरखास्त करावं अशा निर्णयाप्रत कृष्णवर्णियांचं संख्याधिक्य असलेली दक्षिण आफ्रिकन क्रिडा समिती येते. पण निराळाच विचार आणि एक निश्चित ध्येय मनात असलेल्या मंडेलांच्या हस्तक्षेपामुळे स्प्रिंगबॉक्स संघाला आणखी संधी द्यावी या त्यांच्या विनंतीला समिती तयार होते. आणि मग सुरू होतो एक जबरदस्त प्रवास.

स्प्रिंगबॉक्स संघाने विश्वचषक जिंकल्यास ते राष्ट्रीय ऐक साधण्याच्या दृष्टीने एक मोठे यश ठरू शकेल असा विश्वास मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचा कप्तान François Pienaar (मॅट डेमन) याच्याकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्त करतात. तुरुंगात असताना त्यांना स्फूर्तीदायक ठरलेली Invictus ही कविता ते François ला ऐकवतात.



हा अशक्यप्राय वाटणारा विजय प्रत्यक्षात आणायचा असेल तर कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे जाणून François आणि त्याचे संघ ढोर मेहनतीला सज्ज होऊन प्रशिक्षण आणि सरावाला सुरवात करतात. एकदा तर मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सरावाच्या ठिकाणी अचानक भेट देतात. मंडेलांच्या कल्पनेशी संघनायक François सहमत असला तरी वांशिक संघर्ष, रक्तपात, आणि परस्पर द्वेष यांनी अनेक तपं देशात आंतरिक कलह माजवलेला असताना रग्बी हा खेळ देशात काळ्या-गोर्‍यांची कशी काय एकी घडवून आणणार अशी शंका अनेक दक्षिण आफ्रिकी नागरिकांना असते.


मंडेलांच्या सूचनेनुसारच संघातले खेळाडू फक्त बंदिस्त सरावात आनंद न मानता सामान्य नागरिकांत - मुख्यत्वेकरून कॄष्ण्वर्णीय नागरिकात मिसळणे - हा सरावाचा एक भागच बनवून टाकतात. चित्रपटातला हा भाग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. खेळाडू रस्त्यावर, मैदानात गरीब वस्तीतल्या कॄष्ण्वर्णीय लहान मुलांबरोबर खेळतात तेव्हा त्या लहानग्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हे काही सांगून जातो, ते शब्दांत माडणं निव्वळ अशक्य आहे. यासाठी हा चित्रपटच बघायला हवा.

सरावाचा भाग म्हणून लोकांत मिसळल्याने जनतेत एक सुंदर सकारात्मक संदेश जातो आणि अधिकाधिक कॄष्ण्वर्णीय नागरिक स्प्रिंगबॉक्सला पाठिंबा देऊ लागतात. पहिल्या सामन्यात स्थानिक जनतेचा फारसा पाठिंबा मिळवू न शकलेला हा संघ मात्र दुसर्‍या आणि पुढच्या सामन्यांत मात्र सर्व जमातींचे प्रेक्षक बघून हरखून जातो. अर्थात साक्षात राष्ट्राध्यक्ष मंडेला यांचा वरदहस्त या मोहिमेला असल्याने जनता अधिकच विश्वासाने आणि आत्मीयतेने स्प्रिंगबॉक्सकडे पाहू लागते. मंडेलांचा सशक्त पाठिंबा, नियोजनबद्ध सराव, जनतेच्या सर्व थरातून मिळणारा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा पाठिंबा यांनी संघाची कामगिरी सातत्याने सुधारत जाते आणि विजेतेपद तर सोडाच, पण हा संघ फारफार तर उप-उपांत्य फेरी गाठेल हा तज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरवत स्प्रिंगबॉक्सचा संघ न्युझिलंड ऑल ब्लॅक्स या जगातल्या सर्वोत्तम संघाविरुद्ध अंतीम सामना खेळायला सज्ज होतो. अंतीम सामन्यात राष्ट्राध्यक्ष मंडेला हे स्प्रिंगबॉक्स संघाचा शर्ट घालून मैदानात दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी अवतारतात.


मग पुढे काय होतं? François Pienaar च्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा स्प्रिंगबॉक्स संघ अंतीम सामना जिंकतो का? मंडेलांचं स्वप्न पूर्ण होतं का? हे सगळं बघायला मात्र चित्रपट प्रत्यक्षच बघा.

मला वाटलेला चित्रपटाचा सगळ्यात जमेचा भाग म्हणजे इतर चरित्रात्मक चित्रपटांसारखं (उदा. गांधी) कुठेही चरित्रनायकाचं अवास्तव उदात्तीकरण केलेलं नाही, त्याला देवत्व वगैरे बहाल केलेलं नाही. गोरे आणि काळे यांची एकी घडवून आणण्यामागे मंडेला यांची फक्त आणि फक्त मानवतावादी वृत्ती आहे असं न दाखवता त्यामागचा त्यांचा वास्तववादी दृष्टीकोन आणि राजकीय दूरदृष्टीही चित्रपटात दाखवली आहे. प्रशासकीय व्यवस्थेतले महत्वाचे घटक असलेले नोकरशहा आणि संरक्षण ज्यांच्या हातात ते सैन्य आणि पोलीस यांत असलेल्या गौरवर्णीयांचं अनुभव (आणि संख्याधिक्य सुद्धा) लक्षात घेऊन अतिशय कौशल्याने त्यांचे हितसंबंध जपत, कुणालाही फारसं न दुखावता कृष्ण्वर्णीयांनाही या विभागात योग्य संधी कशा मिळतील याची काळजी मंडेलांनी घेतली त्याचीही छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळते.

मंडेला यांच्या अंगरक्षकांमधे असलेले गोरे आणि काळे सदस्य यांच्यातली धुसफुस दाखवणारं दॄश्य इथे ठळकपणे आठवतं. एकाच वेळी गंभीर आणि गंमतीदार वाटणारं दृश्य लक्ष देऊन बघण्यासारखं आहे. तसंच आणखी एक दृश्य - आपल्याला गोर्‍यांसोबत काम करावं लागणार हे समजताच अंगाचा तीळपापड झालेल्या काळा अंगरक्षक जेसन राष्ट्राध्यक्ष मंडेलांच्या ऑफिसात आपलं गार्‍हाणं घेऊन जातो. याच गोर्‍यांनी कदाचित आपल्यावर गोळ्या झाडल्या असतील मागे अस उद्विग्नपणे म्हणणार्‍या जेसनला समजावताना मंडेला म्हणतात "Reconciliation starts here.........." हे वाक्य त्यांच्यातला नेता जागा असल्याचं दाखवतं तर "Forgiveness starts here too. Forgiveness libarates the soul. It removes fear. That is why it is such a powerful weapon.", या वाक्यातून त्यांच्यातला महामानव बोलतो.

पात्रनिवडीसाठी संबंधितांचं खास अभिनंदन केलंच पाहिजे. नेल्सन मंडेला यांच्या भूमिकेसाठी मॉर्गन फ्रीमन या जेष्ठ आणि गुणी चरित्र अभिनेत्याची इतर कुठल्याही पर्यायांचा विचार न करता झालेली निवड हा एक अचूक ठरलेला निर्णय. मॉर्गन फ्रीमन यांनी नेल्सन मंडेला यांच्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच अभ्यास केलेला स्पष्ट दिसतो. संपूर्ण चित्रपट बघताना कुठेही आपण मॉर्गन फ्रीमन या स्टारला बघत नसून साक्षात मंडेलाच पडद्यावर वावरत आहेत असं वाटत राहतं इतका अप्रतीम मुद्राभिनय आणि मंडेला यांच्या देहबोलीची आणि उच्चारांची उत्कृष्ठ नक्कल फ्रीमन यांनी केली आहे. मंडेला यांना बोलताना ज्यांनी टीव्हीवर ऐकलं असेल त्यांना फ्रीमन यांचं कौतुक करण्यावाचून पर्याय राहणार नाही. बॉर्न आयडेंटिटी आणि त्याचे सिक्वेल, ऑशन्'स चित्रपट मालिका, सिरिआना, द डिपार्टेड आणि अशा अनेक यशस्वी चित्रपटातून आपला चतुरस्त्र अभिनय सादर करणारा मॅट डेमन याने आपल्या नेहमीच्या डॅशिंग अ‍ॅक्शन हीरोचं बेअरिंग थोडं बाजूला ठेऊन संयत अभिनयाचं सुंदर दर्शन घडवलं आहे. बॉलिवुडशी तूलना करायची तर अशा प्रकारच्या भूमिका आपल्याकडे जॅकी श्रॉफच्या वाट्याला यायच्या.

पण आधी एक इशारा देऊ इच्छितो. दिग्दर्शक म्हणून क्लिंट इस्टवूड हे नाव आणि कलाकारात मॉर्गन फ्रीमन आणि मॅट डेमन ही नावं वाचून हा सिनेमा बघायला जाणार असाल तर पुन्हा विचार करा. कारण या दोघांच्या सशक्त अभिनयाने नटलेला या चित्रपट मात्र थरारक, वेगवान, किंवा अंगावर काटा आणणारा वगैरे अजिबात नाही. अनेक ठिकाणी बर्‍यापैकी संथ तर काही ठिकाणी तर हा चक्क डॉक्युमेंटरी चालली आहे की काय असं वाटण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना हा चित्रपट चक्क कंटाळवाणाही वाटू शकतो. सुरवातीला काही दृश्यांमधे संवादही कृत्रिम आणि पाठांतर करुन म्हटल्यासारखे - म्हणजेच सहजतेनं न येता नाटकी वाटतात. पण कथेच्या आत्म्याशी मात्र चित्रपट संपूर्ण प्रामाणिक राहतो. शिवाय नेल्सन मंडेलांच नामक जादुगार मॉर्गन यांनी इतक्या जबरदस्तपणे उभा केला आहे की चित्रपटातल्या बाकी तृटींकडे लक्षच जात नाही.

मंडेला यांच्या बरोबर उलट मार्गाक्रमण केलेल्या शेजारच्या झिंबाब्वेतल्या रॉबर्ट मुगाबे यांच्या नेतृत्वाखाली आज झिंबाब्वेची आज अराजक, हिंसा, आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे चालेलेली ससेहोपलट आपण बघतोच आहोत. मंडेला यांनी स्प्रिंगबॉक्स रग्बी संघात गोर्‍यांच संख्याधिक्य असूनही हा संघ जास्तीत जास्त ताकदवान आणि यशस्वी कसा होईल याकडे लक्ष दिलं, तर मुगाबे यांच्या द्वेष आणि सूडानेच भरलेल्या राजवटीने देशाच्या सर्वच क्षेत्रात बजबजपुरी ही माजवलीच पण कमकुवत असलेला - म्हणजे 'झिंबाब्वे उभा राहिला, आम्ही नाही पाहिला' - असा झिंबाब्वेचा क्रिकेट संघ फ्लॉवर बंधू, अ‍ॅन्डी ब्लिगनॉट, मरे गुडविन, पॉल स्ट्राँग, नील जॉनसन, एड्डो ब्रँडिस यांच्यासारख्या अनेक गुणी खेळाडूंमुळे हळूहळू प्रगती करत सामने आणि मालिका जिंकायला सुरवात करत असतानाच त्यांना त्यांच्या गौरवर्णामुळे (रिव्हर्स रेसिझम/डिस्क्रिमिनेशन?) संघाबाहेरच नव्हे तर देशाबाहेरही पडायला भाग पाडून झिंबाब्वेतल्या क्रिडा क्षेत्राचीही ससेहोलपट केली. १९९५ साली रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलेल्या दक्षिण आफ्रिकेने त्या पाठोपाठ २००३ साली क्रिकेट विश्वचषक आणि २०१० सालचा फुटबॉल विश्वचषकाचं यजमानपदही भूषवलं आणि खेळजगतावर आपला ठसा उमटवला.

चित्रपटातील एका दृश्यात मंडेला यांच्या सुटकेनंतर त्यांच्या मोटारींचा ताफा एका रग्बी मैदानावरुन जात असताना एक शा़ळकरी मुलगा शाळेच्या रग्बी प्रशिक्षकाला विचारतो, "हे कोण आहे सर?" त्याला उत्तर मिळतं, "It's the terrorist Mandela, they let him out. Remember this day boys, this is the day our country went to the dogs."

या पार्श्वभूमीवर मुगाबेंच्या सारखं वागणं मंडेला यांना अशक्य होतं का? नक्कीच नाही. लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे इतकी वर्ष ज्यांच्यामुळे तुरुंगात सडावं लागलं, तर बाहेर पडल्यावर पहिली गोळी त्यातल्याच एका गोर्‍यालाच घालावीशी वाटली असती. पण हाडाचे लोकशाहीवादी असलेल्या नेल्सन मंडला यांच्या मनाला सूड, प्रतिशोध वगैरे तर नाहीच, पण गोर्‍यांप्रती द्वेषभावनाही शिवली नाही. दक्षिण आफ्रिकेत अनेक शतकं गोर्‍यांचे अत्याचार सहन केल्यानंतर काळ्यांची मानसिकता काय असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. तसंच 'आता काळ्यांच्या हातात राज्य गेलं - मग आपलं भवितव्य काय' ही चिंता गोर्‍यांनाही सतावणं साहजिकच. पण याही परिस्थितीतून मार्ग काढून मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेला स्थैर्य मिळवून देण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली. अनेक जाती-जमातींमधे विभागले गेलेले आणि गुलामी आणि भेदभाव यांच्याखाली पिचलेले कृष्ण्वर्णीय आणि वर्षानुवर्ष फक्त राज्यकर्त्याची भूमिका करण्याची सवय झालेले गौरवर्णीय यांच्यात परस्पर सहकार्यच नव्हे तर सौहार्द निर्माण करण्याची किमया त्यांनी करुन दाखवली. काळ्यांची प्रगती व्हावी आणि गोर्‍यांना हा देश त्यांचाच वाटत रहावा ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यात आज जर दक्षिण आफ्रिका बर्‍याच अंशी यशस्वी झाला असेल तर तो निव्वळ नेल्सन मंडेला आणि त्यांच्या समविचारी सहकार्‍यांमुळेच.

चित्रपटातील एका दृश्यात एक सुंदर संवाद आहे. François Pienaar आणि त्याचा संघ मंडेला यांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं त्या तुरुंगाला भेट देतात. ते ठिकाण बघून एका संघसहकार्‍याशी बोलताना François म्हणतो ".......I was thinking about how you spend 30 years in a tiny cell, and come out ready to forgive the people who put you there." हे वाक्य ऐकल्यावर मंडेला नामक महामानवाला मनोमन वंदन केल्यावाचून राहवत नाही.

कधी कधी वाटतं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच आपल्याकडे नेल्सन मंडेला यांच्याइतकी दूरदृष्टी असलेला, समाजाभिमुख राजकारण करणारा आणि अर्थातच त्यांच्या इतका करिश्मा असलेला नेता आपल्या देशाला मिळाला असता तर....... तर कदाचित आज जी जातीय राजकारणाची बजबजपुरी माजली आहे ती माजली नसती. सार्‍या जर आणि तर च्या गोष्टी. दुर्दैवाने हल्ली समाजोपयोगी कामे किती यापेक्षा उपद्रवमूल्य किती हे बघितले जाते. भविष्यात असा नेता कदाचित निर्माण झालाच तर त्याच्यावर असा चित्रपट आपल्याकडे निर्माण होईलही. पण तो पर्यंत आपण इन्व्हिक्टस सारख्या चित्रपटांचा आस्वाद जरूर घेऊ शकतो.  

हा लेख वाचून चित्रपट बघावासा वाटल्यास आणि बघून चित्रपट आवडल्यास जरूर कळवा.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकात पूर्वप्रकाशित
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


या आधीचे लेख:
चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू
चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट
चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

Tuesday, March 29, 2011

चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

काही विशिष्ठ संवेदनशील विषय असलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं मी सहसा टाळतो. पण अशाच एका विषयावर बनलेल्या एका उत्तम चित्रपटाने अखेर माझी ती सवय मोडली. अमेरिकेत सर्रास आढळणार्‍या आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्‍या आपल्या भरकटलेल्या भारतीय तरुण पिढीपर्यंत ते लोण पसरण्याचा धोका असलेला तो विषय म्हणजे पौगंडावस्थेतील गर्भधारणा अर्थात टीनएज प्रेग्नंसी.

सुदैवाने हा प्रकार समाजमान्य नसल्याने आजपावेतो आपल्याकडे ह्या विषयावर चित्रपट निघालेले नाहीत. पण ज्या पद्धतीने आणि वेगाने वैयत्तिक स्वातंत्र्याचा अर्थ हा अनिर्बंध स्वैराचार असा लावण्यात येऊन नैतिक, संस्कृतिक अध:पतन होत आहे, त्याच प्रकारे हे सगळं सुरू राहिल्यास चित्रपट काढण्याइतका हा प्रकार भारतात बोकाळेलच यात संशय नाही.


जूनो (Juno) हा नितांतसुंदर चित्रपट नुकताच सोनी पिक्स वर बघितला. आधी विषय लक्षात आल्यावर दुसरी वाहिनी लावायला रिमोटकडे हात गेलाच होता, पण जे. के. सिमन्स (बर्न आफ्टर रिडींग मधला सी.आय.ए. अधिकारी) या अभिनेत्याला बघून उत्सुकता निर्माण झाली आणि चित्रपट पूर्ण बघायचा निर्णय घेतला. सुदैवाने तो योग्य ठरला.

नर्मविनोदी अंगाने जाणार्‍या या चित्रपटाची सुरवातच शोडषवर्षीय नायिका जूनो (एलन पेज) हिला आपण गरोदर असल्याचा साक्षात्कार होण्यात होते. तिचा नुकताच दुरावलेला बॉयफ्रेंड पॉली ब्लीकर (मायकल सेरा) हाच त्या होणार्‍या मुलाचा बाप असल्याचंही तिच्या लक्षात येतं. वर म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत हा प्रकार सर्रास असल्याने फारशी बावचळून न जाता जूनो घडल्या प्रकाराला 'आलिया भोगासी असावे सादर' या न्यायाने सामोरी जाण्याचं ठरवते. आपण आई व्हायला अजून तयार नसल्याची तिला सुदैवाने जाणीव असल्याने आणि तिच्या दृष्टीने होणारं मूल ही एक नसती ब्याद असल्याने जूनोच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे गर्भपात करुन या कटकटीपासून सुटका करुन घेण्याचा. पण लवकरच तो विचार जूनो बाजूला सारते आणि ह्या मुलाला जन्म देऊन एका मूल नसलेल्या जोडप्याला दत्तक देऊन सुखी करण्याचा निर्णय घेते.

आपण केलेला प्रकार आणि आपला मूल दत्तक देण्याचा निर्णय आधी आपली मैत्रिण लिया (ऑलिव्हिया थर्लबी) हिला सांगते आणि मग आपल्या आई-वडीलांच्या कानावर घालते. जूनो लियाच्या साक्षीने तिच्या वडिलांना आणि सावत्र आईला कबुली देते तो प्रसंग फारच गंमतीदार आहे. आपल्या अवघ्या सोळा वर्षाच्या पोरीने चक्क गरोदर रहाण्याचा पराक्रम केलेला आहे या धक्क्यापेक्षा चक्क "चला, मला वाटलं ही ड्रग्स वगैरे मधे अडकली की काय" असं म्हणून तिचे वडील मॅक (जे. के. सिमन्स) सुटकेचा नि:श्वास टाकतात.
आता जूनोने निर्णय घेतल्यावर तिच्या घरातले सगळेच तिला मदत करायला मनात अजिबात किंतु न ठेवता पुढे येतात. अगदी तिच्या सावत्र आई सकट. मात्र तिला आधार देत असतानाच तिने केलेल्या घोडचुकीची आणि तिच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव तिला करुन द्यायला ते विसरत नाहीत. जुनो तिच्या वडिलांबरोबर त्या मूल दत्तक घेऊ इच्छिणार्‍या जोडप्याला म्हणजेच मार्क (जेसन बेटमन) आणि व्हेनेसा (जेनिफर गार्नर) या दोघांना भेटते आणि पहिल्याच भेटीत क्लोज्ड अ‍ॅडोप्शन (closed adoption) चा प्रस्ताव मांडते. क्लोज्ड अ‍ॅडोप्शन म्हणजे बाळ एकदा दत्तक गेल्यावर त्याच्या पुढच्या प्रगतीबद्दल कुठलीही माहिती खर्‍या आईला मिळणार नाही असा करार.

यानंतर जूनोचं त्या घरी जाणं-येणं वाढतं आणि ती लवकरच व्हेनेसा आणि मार्कचा विश्वास संपादन करते. जुनो व्हेनेसाला तिच्या बाळाशी बोलायला प्रोत्साहन देऊन आपलीशी करते आणि रॉक संगीताच्या मुख्य समान आवडीमुळे मार्कचीही मैत्री संपादन करते.



बाळाचा पिता(!) असलेला पॉली ब्लीकर याच्या विषयी मनात असणार्‍या भावनांबाबत मात्र तिच्या मनात बर्‍यापैकी गोंधळ असतो. त्याने प्रॉमला दुसर्‍या मुलीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजल्यावर मात्र तोपर्यंत त्याच्याशी फटकून असणारी आणि अंतर ठेऊनच वागणारी जूनो त्याच्यावर भडकते. पॉली मात्र कमालीचा संयम बाळगत लांब रहाण्याचं तिनेच सुचवल्याचं तिला शांतपणे सांगतो आणि वर तिचा मानसिक गोंधळही अधोरेखित करतो. याची परिणिती जूनो अंतर्मुख होण्यात होते.


ब्रेनने दिलेला सल्ला न मानता जूनो मार्कला तो घरी एकटा असतानाही भेटतच रहाते आणि या भानगडीत मार्क तिच्यात कधी गुंतत जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. अशाच एका भेटी दरम्यान तो व्हेनेसाला सोडणार असल्याचं जुनोला सांगतो आणि जुनोवरचं प्रेम अप्रत्यक्षरित्या व्यक्त करतो. त्याच सुमारास तिथे आलेल्या व्हेनेसाला तो त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात बाप होणे हा एक अडथळा आहे आणि अजून पितृत्व स्वीकारायला तयार नसल्याचं सांगून दु:खी करतो.

आपलं मूल एका गरजू पण समजूतदार आणि सुखी कुटुंबाला देऊन निश्चिंत होण्याची स्वप्नं बघत असलेल्या जूनोला या प्रकाराने प्रचंड धक्का बसतो आणि ती तिथून निघून जाते. काही वेळाने मात्र परत येऊन ती फक्त व्हेनेसासाठी एक चिठ्ठी दारात ठेवते, ज्यात ती लिहीते, "व्हेनेसा, तू अजूनही (दत्तक घायला) तयार असलीस तर मी ही (मूल द्यायला) तयार आहे — जूनो" (Vanessa: If you're still in, I'm still in. — Juno).

पुढे काय होतं? मार्कपासून विभक्त झाल्यावर सिंगल मदरच्या रुपात बाळाचं संगोपन करायला सज्ज होऊन जूनोचं मूल व्हेनेसा खरंच दत्तक घेते की ती जबाबदारी शेवटी जूनोलाच उचलावी लागते? पॉली आणि जूनो पुन्हा एकत्र येतात, की जूनो बाळंत झाल्यावर ते ही विभक्त होतात? या प्रश्नांची उत्तरं इथे सांगण्यात काहीच हशील नाही. ती मिळवण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.


हा चित्रपट मला आवडण्याची कारणे अनेक आहेत. सामान्यत: पाश्चात्य भयपटात जजमेंट डे, गॉड, एंजल, सेटन, डीमन्स, टेस्टामेंट, जुडास, जीवन हे ईश्वराने दिले आहे त्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार मानवाला नाही (संदर्भ: गर्भपात, देहदंड) वैगरे अनेक ख्रिस्ती धार्मिक संदर्भ उघडपणे येतात, तर काही चित्रपटांत हेच संदेश छुप्या रीतीने दिले जातात. मला तरी ह्या चित्रपटात उघड काय किंवा छुपा काय, असले कसलेही संदर्भ जाणवले नाहीत आणि हीच बाब माझ्या दृष्टीने ह्या चित्रपटाचं एक महत्वाचं बलस्थान आहे. २००७ साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा काही छिद्रान्वेषी समीक्षकांनी जूनोने गर्भपाताचा निर्णय रद्ध करणे या एका गोष्टीमुळे हा चित्रपट चक्क छुपा धर्मिक संदेश देत असल्याचे आरोप केले होते म्हणे. मुळात या चित्रपटात नायिका जुनोच्या मनात गर्भपात करण्याचा विचार येणे आणि तो ती ज्या कारणामुळे टाळते ते कारण लक्षात घेता ही टीका अनाठायी असल्याचं सहज लक्षात येतं.

त्यातलं मुख्य म्हणजे असा संवेदनशील विषय उत्तमरित्या आणि अत्यंत नि:पक्षपातीपणे हाताळण्यात निर्माता जॉन माल्कोविच आणि दिग्दर्शक जेसन राईट्मन आणि त्यातले अतिशय गुणी कलाकार यशस्वी झाले आहेत. यात लेखिका डायाब्लो कोडी हिच्या सशक्त पटकथेचा सिंहाचा वाटा आहे.

विषय हाताळला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल, कारण गर्भपात आणि टीनएज प्रेग्नंसी या दोन्हीबद्दल चित्रपटात कुठल्याही प्रकारचं - विरुद्ध किंवा समर्थनार्थ - भाष्य करण्याचं संपूर्णपणे टाळलेलं आहे. एलन पेज, जे. के. सिमन्स, मायकल सेरा, अ‍ॅलिसन जॅनी, जेनिफर गार्नर इत्यादी कलाकारांनी कमालीच्या पोक्त आणि संयत अभिनयाने पात्रांची मानसिक आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत ताकदीने पार पाडलं आहे.

इथे थोडं जूनोची सावत्र आई या व्यक्तिरेखेवर बोलण्याचा मोह आवरत नाहीये. ब्रेन ही जूनोला नेहमी आधारच देताना दिसते. अगदी इस्पितळात सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरणीला झापण्यापासून ते मार्कला - म्हणजेच एका लग्न झालेल्या पुरुषाला - वारंवार न भेटण्याचा पोक्त सल्ला जुनोला देण्यापर्यंत तिचं जूनोवरचं प्रेम दिसतं (ब्रेन म्हणते: "You don't understand the dynamics of marriage"). या चित्रपटाचा कधी हिंदी किंवा मराठी अवतार निघाला तर सावत्र आई खूप म्हणजे खूपच फुटेज खाणार हे निश्चित!


पॉली आणि जूनो ह्यांच्यातलं नातं कसं फुलत जातं ते बघणं हा एक प्रसन्न अनुभव आहे. किंबहुना त्यांचा पोक्तपणा आपल्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का देऊन जातो. आपल्या पोरीला तिच्या चुकीची जाणीव करुन देतानाच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जूनोचे आई-वडील ब्रेन आणि मॅक, व्हेनेसाला सुरवातीला जूनोबद्दल वाटणारा स्वाभाविक अविश्वास आणि त्याचं दाट मैत्रीत झालेलं रूपांतर, तसंच मार्क पासून विभक्त झाल्यावरही जूनोचा निश्चय बघून मूल दत्तक घेण्याच्या आपला निर्णयावर ठाम असणारी व्हेनेसा ह्या गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करुन जातात.

हा चित्रपट माझ्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांच्या यादीत केव्हाच जमा झाला आहे. जूनो तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री देतो. बघा आणि ठरवा.....आणि आवडला तर सांगायला नक्की विसरू नका.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


संदर्भ: कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया.
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


या आधीचे लेख:
चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू (२००८): एक अनोखा अनुभव
चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)