Showing posts with label काश्मीर. Show all posts
Showing posts with label काश्मीर. Show all posts

Friday, May 29, 2020

दुसरा पुलवामा हल्ला आणि काही निरीक्षणे

काल पुलवामा इथेच आणखी एक दहशतवादी हल्ला लष्कराने उधळून लावला. 

४० जवान गमावलेल्या या आधी झालेल्या हल्ल्याला एक वर्ष होऊन गेलेलं आहे तो अजूनही आपल्या स्मरणात ताजा आहे. कारण तो झाला होता. यात काही वेगळं नाही, कारण सर्वसाधारण मानवी स्वभावाचा एक भाग असा आहे की एखादे संकट ओढवले तर त्याच्या स्मृती मनात कोरल्या जातात आणि जी संकटे आपल्या कळत नकळत टाळली जातात त्यांना आपले मन विस्मृतीच्या कप्प्यात ढकलते आणि त्या भोवताली घडणार्‍या घटनांना महत्त्व दिले जात नाही. मात्र प्रत्येक घटना जोडून बघितली तर ती टळलेली संकटे घडण्यामागे किती भानगडी दडलेल्या आहेत हे लक्षात येतं. 

अधिक खोलात जाण्याआधी काल नेमकं काय घडलं ते थोडक्यात पाहूया. तब्बल ६० किलो हून अधिक आयईडी स्फोटके भरलेली मोटार उडवून देऊन 'पुलवामा'सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडवण्याचा मोठा कट सुरक्षा दलांनी गुरुवारी उधळला (काही ठिकाणी हा उल्लेख ४५ किलो आहे पण हे प्रमाणही कमी नाही व त्याने घटनेचे गांभीर्यही कमी होत नाही). याचा व्हिडिओ आपण बघितला असेलच, सहज उपलब्ध आहे. स्फोटकांच्या वजनावरुन साधारणतः सर्वसामान्य जनतेला त्याची तीव्रता कळत नाही. पण तूलना केली तर पटकन लक्षात येतं. ६० किलो स्फोटके काय हाहा:कार घडवू शकतात हे समजून घेण्याकरता या संदर्भात एक उदाहरण पाहूया. आंतरजालावर शोध घेतला तर आपल्याला सहज ही माहिती मिळू शकेल की ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वॉरहेड म्हणजे स्फोटके असलेला भाग हा २०० किलोचा असतो. या कार मधली स्फोटके जवळजवळ त्याच्या एक तृतियांश होती. आता क्षणभर थांबून विचार करा. ६०+ किलो स्फोटके. लष्कराच्या सुमारे पन्नासएक जवानांना घेऊन जाणार्‍या एखाद्या बसवर किंवा इतर साधारण वाहनावर याचा काय परिणाम झाला असता याचा विचार करा. मागचा पुलवामा हल्ला आठवून बघा. आता आलं ध्यानात?


आपल्या जबरदस्त सैन्याने हा हल्ला उधळून लावताना निव्वळ एक दहशतवादी हल्ला टाळलेला नाही, तर एक मोठा लष्करी कारवाई देखील टाळलेली आहे. मागच्या वेळी बालाकोट प्रतिहल्ला करुन पाकीस्तानची जिरवून खरोखर 'करुन दाखवणार्‍या' केंद्र सरकारकडून त्याहून तीव्र आणि कितीतरी पटीने मोठ्या स्वरुपाची प्रतिशोधात्मक कारवाई केली जावी म्हणून दबाव आला असता आणि ते एरवी योग्यही झालं असतं, पण संपूर्ण जगासहित भारतही चीनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी झुंजत असताना या कारवाईचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक जीवनावर होणारे परिणाम अजिबात परवड्ण्यासारखे ठरले नसते आणि ठरणार नाहीत. अर्थात पाकिस्तानही कोरोनाबाधित आहेच, पण अस्मानी आदेश असताना ते सदसद्विवेक बुद्धीने वागतील ही अपेक्षा ठेवणे म्हणजे घोर मूर्खपणा आहे. शिवाय चीनच्या सीमेवरील कुरापती आणि अचानक धूमजाव करुन सामंजस्याचे नाटक करणे या घडामोडीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. भारताने चीनसमोर लष्करी आणि राजकीय कणखरता दाखवल्याने नरम पडल्याचा देखावा करणारा चीन स्वस्थ बसला असेल असं अजिबात नाही. भारत-चीन सीमेवरुन भारतीय सैन्यबळ आणि जगाचं लक्ष भारताच्या पश्चिम सीमेकडे वळवून भारताला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी पाकिस्तानला "छू" केलं असल्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. 

आता काही थेट गोष्टी या हल्ल्याच्या परिप्येक्ष्यात बघू:

एकः
आणखी एक  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या साधारण महिनाभरात केलेल्या काही ट्वीट्स पहा. त्या अशा अर्थाच्या होत्या की "पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे खोटे आरोप भारत करत आहे. पाकिस्तानवर बलप्रयोग करण्याचे भारत कारण शोधत असून असे निमित्त भारत स्वतःच्याच भूमीत एक खोटा हल्ला घडवून आणण्याची योजना आखत आहे". असे खोटारडे आरोप करणार्‍या इम्रान खानच्या एक नव्हे तर तब्बल चार ट्वीट्स सापडल्या. इतक्या वेळा बोंब ठोकण्यामागचे कारण उघड आहे. पाकिस्तान पुलवामा येथे नव्याने हल्ला घडवून आणण्याची योजना खूप पूर्वीपासून आखत होता आणि आपण त्या गावचेच नाही असं जगासमोर भासवण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता. दुर्दैवाने जगात मूर्खांचा आणि भारतात घरभेद्यांचा आणि एकंदरच कुठेही लिबरलांचा तुटवडा नसल्याने अनेकांचा त्यावर विश्वासही बसला असता. 

इम्रान खानच्या ट्विट्स

दोन:
काही दिवसांपूर्वी आम्ही काही मित्रमंडळी साकेत गोखले नामक एका इसमाने केलेल्या एका ट्वीट बद्दल एका ग्रूपवर बोलत होत. या इसमाने १३ मे रोजी एक ट्विट केलं होतं त्यात लष्करी तपासणी नाक्यावर वारंवार इशारे देऊनही न थांबून गाडी तशीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका २५ वर्षीय इसमाला काश्मीरमधल्या बुडगाम येथे भारतीय लष्कराने गोळी घालून ठार मारलं असा उल्लेख केला होता. साकेत गोखलेने ट्विटमध्ये 'आता जगातील सर्वात मोठी लोकशाही ट्रॅफिकचे नियम मोडले म्हणुन जनतेला गोळ्या घालत आहे' अशी मखलाशी केलेली होती.  ट्रॅफिकचे नियम मोडणं आणि काश्मीरमध्ये तपासणी नाक्यावर न थांबता वाहन तसेच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे यातला फरक गोखले साहेबांना कळत नसावा असं नाही, पण या निमित्ताने दहशतवादी हल्ला करायची पूर्वतयारी किंवा सराव म्हणून ज्या घटनेकडे बघता येईल त्या घटनेला या ट्विटमधून ट्रॅफिक नियमांचे साधं उल्लंघन या सदराखाली किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या इसमाने रिट्वीट केलेली एक ट्वीटही इथे देतो आहे. किती जबरदस्त वातावरणनिर्मितीची तयारी असते पहा. तपासणी नाक्यांचा अदमास घेण्याचा प्रयत्न करणारी असू शकेल अशी ही घटना १३ मेला घडते आणि २८ मेला ६०+ किलो स्फोटकांनी भरलेली गाडी लष्कराने उडवून देत आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला टाळणे हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. पण खरंच तो योगायोग असेल का, याचा सूज्ञ वाचकांनीच विचार करावा. 

Wednesday, September 14, 2016

पंडित नामा ११ (अंतिम भाग): नदीमार्ग हत्याकांड

हा पंडित नामा मालिकेतला शेवटचा भाग. यात आपण काश्मीरी पंडितांच्या वेचून केलेल्या खूनांच्या दहा वेगवेगळ्या घटना बघितल्या. या भागात एका सामूहिक हत्याकांडाबद्दल आपण वाचणार आहोत. इथे फक्त दहाच अशा घटना वर्णन केलेल्या असल्या तरी अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत. नोंदवल्या न गेलेल्याही अशा अनेक घटना आहेत पण मुळात हिंदूंच्या जीवाला किंमतच कमी असल्याने त्यांचा शोध घेण्याची तसदीही कुणी घेतलेली नाही.

काश्मीरी पंडित - त्यांना इथून जायचं नव्हतं. पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी दशतवाद्यांनी त्यांना निर्वासित व्हायला भाग पाडलं. गोळीबार आणि बाँबफेकीने घडवलेल्या अत्याचार व हत्याकांडांच्या प्रभावातून राहती घरंच नव्हे तर सरकारी इमारती व शाळाही सुटल्या नाहीत. त्यांच्या घरातल्या स्त्रीयांवर त्यांच्या डोळ्यादेखत अमानुष बलात्कार झाले. त्यांना हाल हाल करुन ठार मारण्यात आलं. आमची मुंबई, आमचं पुणं, हमारा इंदोर, नम्म बँगळुरू, आमार बांगला, आपणो गुजरात अशा अस्मिता बाळगणार्‍या तुम्हा आम्हांसारखंच त्यांचंही त्यांच्या जन्मभूमीवर प्रेम होतं, काश्मीरवर प्रेम होतं. तिथल्या हिरव्यागार गवताच्या प्रत्येक पात्यावर, शीतल व स्वच्छ जलावर, जमीनीच्या प्रत्येक इंच मातीवर त्यांचं नितांत प्रेम होतं. काश्मीर खोरं सोडताना त्यांना किती मानसिक क्लेष झाले असतील याची कल्पना कदाचित आपण कधीच करु शकणार नाही. प्रेमाने बायकोच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र असो वा घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले खानदानी दागिने असोत, कवडीमोल भावाने विकावे लागले...का?  फक्त जीव वाचवून पळून जाता यावं म्हणून. दिल में रखो अल्लाह का खौफ, हाथ में रखो कलाशनिकोव्ह यातल्या अल्लाहच्या खौफला दिलात ठेवायला काहीच आक्षेप नसणार्‍या पण दहशतवाद्यांच्या हातातल्या कलाशनिकोव्हच्या टप्प्यातून बाहेर पडता यावं म्हणून पळून जाताना काहींना बस, ट्रक, इत्यादी वाहने मिळाली तर इतर अनेकांना वेरीनागच्या बर्फाने आच्छादित धोकादायक पर्वतराजीला ओलांडून जवाहर बोगद्यापर्यंतचा प्रवास चक्क पायी करावा लागला.  

काश्मीरमधे या आधीही हिंदूंना इस्लामी आक्रमकांच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं होतं, या आधीही ते अनेकदा विस्थापित झाले होते. पण १९८९ च्या सुमारास सुरू झालेल्या या अत्याचारांच्या सत्राने मात्र काश्मीर खोर्‍याच्या लोकसंख्येची रचनाच संपूर्णपणे बदलून गेली. काश्मीर खोरं आता पूर्णपणे इस्लामबहुल झालं. 

काश्मीरात अतिरेक्यांनी घडवलेल्या सामूहिक हत्याकांडांपैकी तीन सगळ्यात भयानक समजली जातात. वंधामा इथे काश्मीरी पंडितांचे झालेले सामूहिक हत्याकांड, अनंतनाग जिल्ह्यातील छित्तिसिंगपुरा येथे २००० साली झालेल्या ३६ शीखांच्या हत्या, आणि २००३ साली नदीमार्ग येथे झालेले पंडित हत्याकांड ही ती तीन हत्याकांडे होत.

१९९० नंतर काश्मीर खोर्‍यात शिल्लक राहिलेल्या काश्मीरी पंडितांची संख्या नगण्य होती. पुलवामा जिल्ह्यातील शोपियान मधल्या नदीमार्ग येथे फक्त ५२ काश्मीरी पंडित राहत असत, ते ही चार कुटुंबांचा भाग होते. 

२३ मार्च २००३ च्या रात्री काही अतिरेकी नदीमार्ग गावात शिरले. अतिरेक्यांना गावात शिरताना पाहून'बंदोबस्तावरचे' पोलीस पार्श्वभागाला पाय लावून पळून गेले. ते तिथे थांबले असते तरी परिस्थितीत काहीही फरक पडणार नव्हताच.अतिरेक्यांनी मशीनगनच्या जोरावर त्यांनी घराघरात शिरून जितक्या हिंदूंनाबाहेर काढता येईल तितक्या हिंदूंना फरफटतघराबाहेर काढण्यात आलं. यात साठी ओलांडलेल्या वृद्धांपासून ते जमेतेम चालायला शिकलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्या वयोगटातल्या पंडितांचा समावेश होता. सगळ्यांना एका ओळीत उभं करुन धडाधड गोळ्या घालण्यात आल्या. यात अकरा पुरुष, अकरा महिला व दोन लहान मुलांचा समावेश होता. सर्वात वृद्ध एक ६५ वर्षांचे आजोबा तर सगळ्यात लहान एक २ वर्षांचं मूल होतं.

काही फोटो देतो आहे. त्रास होईल. नाईलाज आहे.




त्या दोन वर्षाच्या निरागस मुलाची काय चूक होती? काय चूक होती त्या उरलेल्या २२ जणांचीही? पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या शाळेतल्या मुलांना पाकिसाननेच पोसलेल्या अतिरेक्यांनी ठार केलं तेव्हा अचानक मानवतेचा पुळका आलेल्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. 

पण खरं उत्तर एकच. ते हिंदू होते. काश्मीरी पंडित होते. बाकीच्यांप्रमाणे १९९०च्या दशकात पळून न जाता अजूनही काश्मीर खोर्‍यात राहत होते. अतिरेक्यांच्या व त्यांना नियंत्रित करणार्‍या त्यांच्या पाकिस्तानी मालकांच्या मते त्यांनी मरायलाच हवं होतं. 


या हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांपैकी तीन अतिरेक्यांना मात्र मुंबई पोलीसांनी एका आठवड्याच्या आत म्हणजे २९ मार्च रोजी कंठस्नान घातलं. हत्याकांडात सहभागी असलेल्या एका चौथा अतिरेक्याला एप्रिल मधे अटक झाली. हा हल्ला पाकिस्तानातल्या लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेच्याच सदस्यांनी केल्याचं उघड झालं.

शासकीय पातळीवरुन पुढे काय झालं? केन्द्र सरकारने पाकिस्तानची 'कडी निंदा' केली. अमेरिकेने पाकिस्तानला नियंत्रण रेषेचा आदर करण्याची एक प्रेमळ टपलीत मारली. राज्य सरकारने 'आम्ही (उरल्यासुरल्या) पंडितांना संरक्षण देऊ त्यांनी काश्मीर खोरे सोडून जाऊ नये' असं पोकळ आणि तितकंच चीड आणणारं भंपक आश्वासन दिलं. 

आजही काश्मीरमधला हिंसाचार थांबलेला नाही. काफीर भारताला काश्मीरमधून पूर्णपणे हुसकावून लावणे हे पाकिस्तानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ताजा उसळलेल्या हिंसाचारा मागे राज्य सरकारमधे काफीर देशाच्या काफीर पक्ष असलेल्या भाजपचा असलेला सहभागामुळे उठलेला पोटशूळ आहे. बुरहान वानीचं मारलं जाणं हे फक्त निमित्त. त्यांना दार-उल-हरब (इस्लामच्या नियंत्रणात नसलेला) असलेला काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारत देश हा दार-उल-इस्लाम मधे परीवर्तित करायचा आहे.

राज्यात ओतले जाणारे कोट्यावधी रुपये, पर्यटनामुळे मिळणारा महसूल, राज्य व केन्द्र सरकारी नोकर्‍यांत मिळणारे भरपूर आरक्षण आणि देशभरातकाश्मीरी विद्यार्थ्यांना मिळणार्‍या अमाप सवलती यांच्या बदल्यात जर सैन्यावर दगड आणि पेट्रोल बाँब फेकले जाणार असतील आणि रोज दंगली होणार असतील तर त्याला उत्तर हे गोळीनेच दिलं गेलं पाहीजे. भारत सरकारने आता काश्मीरी लोकांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की भारतीय कायदे मानत नसाल आणि कायदा व सुव्यवस्था राखणार नसाल तर सरळ आपलं चंबुगबाळं उचला आणि तुमचे लाड होतील त्या देशात चालायला लागा, इथली एकही इंच जमीन आणखी मिळणार नाही. गंमत म्हणजे यांना हवी असलेली आझादी पाकिस्तानच्या ताब्यातल्या आझाद काश्मीरला पण हवी आहे. त्यांना पाकिस्तान पासून स्वातंत्र्य हवं आहे. गिलगीट-बाल्टीस्तानलाही स्वातंत्र्य हवं आहे. बलुचिस्तानही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाच आहे. तेव्हा सरकारने लवकरात लवकर पाकिस्तान तेरे टुकडे होंगे हा प्रोजेक्ट तडीस न्यायला हवा. 

पण सरकारने यंव करावं आणि त्यंव करावं या पेक्षा आपण काय करु शकतो याकडे लक्ष देऊया. आपल्या शेजारीपाजारी लक्ष ठेवा. काश्मीरी विद्यार्थी भाडेकरू म्हणून ठेवताना काश्मीरी पंडित वगळून कुणालाही जागा देऊ नका किंवा विकू नका. काश्मीरी पंडितांच्या मालकीचे दुकान असेल तर तिथून आवर्जून खरेदी करा व इतर काश्मीरी लोकांकडे आपला पैसा जाऊ देऊ नका. इतकंच काय तर काश्मीर खोर्‍यात पर्यटनालाही जाऊ नका. आपला पैसा हा कुठल्याही प्रकारे आपल्याच हिंदू बांधवांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्यांच्या व देशाच्या मुळावर उठलेल्यांच्या खिशात जाऊ देऊ नका. 

कारण आता फक्त सरकारवर निष्ठा ठेऊन ठेविले अनंते तैसेचि रहावे या चालीवर चित्ती समाधान ठेवून जगण्याचे दिवस गेले!

----------------------------------

या मालिकेसाठी मी अनेक संदर्भ वापरले. त्यात प्रामुख्याने दोन पुस्तकांचा समावेश आहे:

१) My Frozen Turbulence in Kashmir - लेखक श्री जगमोहन (भूतपूर्व राज्यपाल, जम्मू आणि काश्मीर)
२) Our Moon Has Blood Clots - राहुल पंडिता

यातले पहिले पुस्तक My Frozen Turbulence in Kashmir काश्मीर समस्येवरच्या माहितीसाठी सगळ्यात अस्सल स्त्रोत मानला जातो. जम्मू आणि काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल श्री जगमोहन यांनी त्यांच्या कार्यकालात राज्यात इतकं भरीव काम केलं होतं, की त्यांचे शत्रू देखील त्यांचे नाव आजही आदराने घेतात. आज काश्मीर आपल्या हातातून गेलेलं नाही याचं श्रेय या माणसाला जातं. त्यामुळे कुणाला काश्मीर समस्येवर काही वाचन करायचं असल्यास सगळ्यात आधी हे पुस्तक वाचा इतकाच सल्ला देऊन मी थांबणार नाही, तर ते विकत घ्या व संग्रही ठेवा असा माझा आग्रह असेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.

दुसरं पुस्तक Our Moon Has Blood Clots हेस्वतः एका काश्मीरी निर्वासिताने म्हणजे राहुल पंडिताने लिहीलेलं असल्याने ते सुद्धा वाचायला हवं. मात्र हे पुस्तक वाचून माझी निराशा झाली कारण लेखकाने त्यात बरंच पाणी घातलेलं आहे. इकडून तिकडून किस्से उचलून पुस्तकात टाकण्याचे चमत्कारही लेखकाने केलेले आहेत. कारण पुस्तकात असलेलेच किस्से इतर अनेक स्त्रोतात अधिक तपशीलातही सापडतात. राहुल पंडिताचा उल्लेख स्वतः अनेक काश्मीरी पंडितही आदराने करत नाहीत. राहुल पंडित यांची नक्षलवादाबद्दलची सहानूभूतीपर मते आणि आमीर खानची इंटॉलरन्सवरची इतरत्र केलेली भलामण विषयांतराच्या भीतीने इथे देत नाही. पण या उल्लेखावरुन वाचकवर्गाने काय ते समजून जावे. तरीही हे पुस्तक स्वतः एका काश्मिरी हिंदूने लिहीलेलं असल्याने किमान एकदा नजरेखालून घालायला हरकत नाही. 

३) आंतरजालावरील काश्मीरी पंडीतांना वाहिलेली पाने व इतर आंतरजालीय स्त्रोत. 

४) ट्विटरवरील काश्मीरी पंडितांची खाती - यांचाही मी ऋणी आहे. ट्विटर आजकाल अनेक चांगल्या वाईट कारणांसाठी चर्चेत आहे पण शोधल्यास त्यावर माहिती आणि ज्ञानाचा खजीना सापडू शकतो. काळाच्या उदरात गडप झालेल्या अनेक गोष्टी तिथे सापडतात आणि अनेकांचे बुरखे टराटरा फाटतात.

५) ही मालिका लिहीताना वेळोवेळी मला प्रोत्साहन देणारा एक अनामिक मित्र. त्याच्याच विनंतीवरुन नाव गुप्त ठेवत आहे.

--------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी 
भाद्रपद  शु.१२/१३ शके १९३८

-------------------------------------------------------- 

Thursday, September 1, 2016

पंडित नामा १०: ए. के. रैना

ए. के. रैना (एम.टेक., केमिकल इंजिनिअरिंग)
निवासः हंदवाडा
जन्मः ४ जून १९४६
हत्या: २० मार्च १९९०




बटा चालीव, मगर बटीने वरय

अर्थः सगळी पुरुष मंडळी काश्मीर सोडून जा, आणि तुमच्या बायका मुली मात्र मागे सोडून जा.

काश्मीरी पंडितांना फक्त या घोषणाच ऐकू यायच्या असं नव्हे, तर ज्यांच्या शेजारी ते वर्षानुवर्ष राहिले तेच मुसलमान शेजारी अगदी बायकापोरांसकट जोरजोरात मशीदीत या घोषणा द्यायला जमताना दिसायचे. हे दृश्य बघितल्यावर पंडितांचा धीर खचत चालला होता. इतका, की घरातल्या पुरुष दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले किंवा त्यांना अतिरेक्यांनी गायब केलं तर मागे राहीलेल्या घरातल्या बायकामुलींची अब्रू सुरक्षित रहावी म्हणून जीव देण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरात रॉकेल, पेट्रोल, डिझेल, केरोसीन यापैकी जे मिळेल ते जसं साठवता येईल तसं आणि जिथे साठवता येईल तिथे साठवायला सुरवात केली होती. अर्थात किती जणींवर स्वतःला जाळून घेण्याची वेळ आली या संदर्भात काही तपशील उपलब्ध नाही. आणि ज्या कुणी जळून केल्या असतील त्यांच्यापैकी किती जणींनी स्वतःला जाळून घेतलं असेल आणि किती जणींना अत्याचार झाल्यावर जाळून टाकण्यात आलं असेल याबद्दलही काहीच माहिती उपलब्ध नाही. इतिहास जसा जेते लिहीतात तसा आपल्याला सोयीचा नसेल तो इतिहास जेते पुसूनही टाकतात याचा प्रत्यय काश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार शोधताना पुरेपूर येतो. तर, पाठीत वार करणार्‍या शेजार्‍यांबरोबरच जहाल इस्लामी मानसिकतेची लागण झालेले राज्यातले पोलीस दल आणि अतिरेक्यांबद्दल सहानुभूती असलेले अतिशय भ्रष्ट प्रशासन यांनी पंडितांना खोर्‍यात राहूच द्यायचं नाही असा चंग बांधला होता.

सरकारी सेवेत उच्चपदावरील काश्मीरी पंडितांच्या निवासाची, त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्ग व वेळांची इत्यंभूत माहिती त्यांचेच शेजारी व कार्यालयातील सहकारी अतिरेक्यांना पुरवत असत.

श्री ए. के. रैना हे असेच एक उच्चपदावर असलेले सरकारी नोकर. नियमितपणे येणार्‍या हिंदू सरकारी कर्मचार्‍यांच्या हत्येच्या बातम्यांनी ते विचलित नक्कीच होत असत. एकदा त्यांच्या एका मित्राची त्याच्याच घरासमोर करण्यात आली तेव्हा त्यांना जबर धक्का बसला होता. काही दिवस काश्मीर खोरे सोडून मग परिस्थिती पुर्वपदावर आली की परत येऊ अशी चर्चा रैना यांच्या घरात चालत असे. पण श्री रैना पुन्हा पुन्हा एकच गोष्ट मुलांना बोलून दाखवत की, "मी कुणाचं काही वाईट केलेलं नाही, कुणाकडून एक छदामही लाच न मागता कायम प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत आलो आहे, मग माझं कुणीच काही वाकडं करणार नाही".

नियमित होणारे बाँबहल्ले व गोळीबार अशा अतिरेकी कारवाया, कधीही निघणारे मोर्चे, दगडफेक व इतर हिंसक घटनांमुळे तेव्हा संचारबंदी लागू होण्याचे प्रसंग वारंवार येत असंत. पळवलं जाण्याच्या भीतीने श्री रैना यांच्या मुलांचं शाळेत जाणं केव्हाच बंद झालेलं असलं तरी अन्नपुरवठा खात्याचे उपसंचालक असल्याने त्यांना स्वतःला मात्र कुठल्याही परिस्थितीत नोकरीवर हजर रहावं लागत असे. मग तो सरकारी सुट्टीचा दिवस असो किंवा रविवार. अगदी सणासुदीला सुद्धा त्यांना उपलब्ध रहावं लागत असे. त्यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय तडकाफडकी सुट्टीवर जाणं शक्य नव्हतं. म्हणून रैना कुटुंबियांनी हळू हळू घरातल्या जीवनावश्यक वस्तूंच्या बांधाबांधीला प्रारंभ केला होता. कुटुंबियांना जम्मूला सोडून पुन्हा परत कामावर हजर व्हायचं अशी श्री रैना यांची योजना होती. त्यांचा मुलगा विकास यामुळे जरा खट्टू झाला होता, कारण त्याला समाजकार्याची प्रचंड आवड होती आणि जसं जसं वय वाढत जाइल तसं तसं ते वाढवत नेण्याची त्याची इच्छा होती. मात्र त्या वेळी जीव वाचवणं सगळ्यात महत्वाचं असल्याने ते तात्पुरतं बासनात गुंडाळून ठेवायला तो तयार झाला.

२० मार्चच्या सकाळी नेहमीप्रमाणे ध्यानधारणा व पूजाअर्चा संपल्यावर श्री रैना यांनी घरच्यांशी गप्पा मारल्या, भरपूर थट्टामस्करी केली व हसतमुखाने त्यांच्या कार्यालयात गेले. विवेकला पोटात दुखत होतं म्हणून तो परिचयाच्या एका डॉक्टरांकडे गेला आणि आल्यावर औषध घेऊन झोपून गेला. पण लवकरच त्याची झोपमोड झाली. अचानक दारावर थाप पडली आणि श्री रैना यांच्या ऑफिसात काम करणारा एक सहकारी रडत रडत घरात शिरला. श्री रैना बाँबस्फोटात जखमी झाले आहेत ही बातमी घेऊन तो आला होता. ताबडतोब विवेकचा मोठा भाऊ आणि त्याचा एक मित्र त्याच्या आईवडीलांना घेऊन श्री रैनांच्या ऑफिसात जायला निघाले. सगळ्यांना आशा होती की श्री रैना बाँबस्फोटात जखमी झाले आहेत म्हणजे ते अजून हयात आहेत आणि उपचाराअंती ते लवकरच बरे होतील. तिथे पोहोचल्यावर त्यांना जरासं वेगळं दृश्य बघायला मिळालं. कदाचित त्या वेळी झालेल्या आवाजांनी बसलेल्या धक्क्याने त्या सहकार्‍याचा नक्की काय घडलं याबाबत गोंधळ उडाला असावा. श्री रैना हे बाँबस्फोटात जखमी झालेले नव्हते तर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. श्री रैना यांच्या उजव्या हाताचं मधलं बोट एका गोळीने छाटलं गेलं होतं तर त्यांचा बळी छातीत घुसलेल्या दोन गोळ्यांनी घेतला होता. जागोजागी पसरलेलं रक्त आणि ऑफिसातलं फर्निचरची अवस्था या दोन गोष्टी काय घडलं असेल याची गोष्ट सांगत होत्या.  श्री रैना यांच्यावर गोळ्या झाडल्या जात असताना त्यांनी टेबलाची ढाल करुन स्वसंरक्षणाचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण कलाशनिकोव्ह मधून सुसाट निघालेल्या गोळ्यांनी त्या टेबलाचा फार काळ निभाव लागला नव्हता हे उघड होतं.या हत्येला जबाबदार होता तो कुप्रसिद्ध अतिरेकी बिट्टा कराटे. श्री रैना त्यांना हॉस्पिटलमधे नेतानाच मरण पावले.

श्री रैना यांच्या ऑफिसातल्या सगळ्या मुस्लीम सहकार्‍यांना त्या दिवशी काय होणार आहे याची कल्पना होती असं नंतर समोर आलं. पण श्री रैना यांना योग्य इशारा देण्याची कुणीही तसदी घेतली नाही. एक काफीर कमी होतो आहे तर कशाला आपण मधे पडा असा विचार करुन सगळे गप्प बसले. ओठांवर अल्लाहचं नाव आणि कलाशनिकोव्ह घेतलेले त्यांना अधिक प्रिय वाटत होते हे उघड होतं.

आधी एका भागात आपण वाचल्याचं आठवत असेल तर बिट्टा कराटेचं यथावकाश 'पुनर्वसन' झालं, त्याने लग्न केलं आणि त्याला मूलंही झालं. थोडक्यात, अनेकांचा बळी घेतलेला नराधम आता कुटुंबवत्सल झाला. सौ चूहे खाके बिल्ली चली हजको या म्हणीआ उगम नक्की कधी झाला हे सांगता येणार नाही, मात्र ही म्हण अनेकांचे संसार उध्वस्त करुन मग स्वतः संसारात 'सेटल' झालेल्या अशाच हरामखोरांना बघितल्यावर निर्माण झाली असावी.

रैना कुटुंब एक अत्यंत सुखी कुटुंब होतं. कुणाच्या ना अध्यात ना मध्यात असणारी ही मंडळी शांतपणे आपलं आयुष्य कंठत होती. संध्याकाळी जमल्यावर दिवसभरात काय काय झालं ते सगळं मुलं त्यांच्या वडिलांना म्हणजे श्री रैना यांना सांगायची आणि वडील त्यांच्या कार्यालयात घडणार्‍या गंमती जमती घरच्यांना सांगत. दोन्ही मुलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. असं एक आनंदी शांततप्रिय कुटुंब बिट्टाने उध्वस्त केलं.

श्री रैना यांच्या हत्येनंतर इतर पंडित कुटुंबांप्रमाणेच रैना कुटुंबियही जम्मूला स्थलांतरीत झाले. रैनांच्या पत्नीला तब्बल पाच वर्षांनी पेन्शन मंजूर झालं, कारण त्याही तेव्हा सरकारी सेवेत होत्या. त्यांची बदली जम्मूला करण्यात आली होती. विवेकला जम्मूतल्या स्थानिक सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला तर कालांतराने त्याच्या मोठ्या भावाने पटना  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. रैना कुटुंबियांचा चरितार्थ व नातेवाईकांच्या मदतीने मुलांचे शैक्षणिक प्रवेश व नंतरचे शिक्षण जरी सुरळीत चालू झाले असले तरी त्यांना बसलेला मानसिक धक्का जबरदस्त होता. आर्थिक नुकसान भरुन काढता येतं. पण मनाला झालेली खोल जखम अनेक दिवस ठसठसत राहते. एकेमेकांना घट्ट धरुन राहणार्‍या रैना कुटुंबियांना काय धक्का बसला असेल याची आपण कदाचित कल्पनाही करु शकणार नाही. विवेक म्हणतो "बदला घेण्याची भावना मला कधी कधी रात्र रात्र झोपू देत नसे."

पण इतर अनेकांप्रमाणेच विवेकनेही झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायला हातात बंदूकच काय, साधा दगडही नाही घेतला. त्याच्या गुरूच्या सल्ल्याने विवेकने यंग्स इंडिया ही सेवाभावी संस्था सुरु केली. निर्वासित काश्मीरी पंडित व इतर सर्वांसाठी पर्यावरण विषयक, ग्रामस्वच्छता, पाण्यासाठी हँडपंप बसवून देणे, काश्मिरी पंडित युवकांना नोकरीसाठी सहाय्य करणे, या कामांपासून ते सरकारी कामात गोरगरीबांना  सहाय्य करणे इथपर्यंत ही संस्था काम करु लागली. या संस्थेने पार युनिसेफबरोबर काम करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. विवेकचं म्हणणं आहे की "मला मित्रासारख्या असलेल्या परमप्रिय वडिलांच्या हत्येनंतर मी चुकीच्या मार्गाला लागू शकलो असतो. पण मी तसं न करता सकारात्मकतेकडे वळलो आणि माझं आयुष्य बर्‍यापैकी सुखकर झालं."

हे बरोबर की चूक माहित नाही. पण विवेकसारखे अनेक आहेत ज्यांच्यापैकी कुणीही बदला घ्यायला हिंसेचा मार्ग स्वीकारलेला नाही.

पण हे धर्माच्या नावावर हिंसेचा नंगानाच घालणार्‍यांना कोण समजावणार? अल्लाहला न मानणारे काफीर आहेत आणि काफीरांना ठारच मारलं गेलं पाहीजे या भावनेने ग्रस्त असलेल्यांना कोण समजावणार? आणि आपली काहीही चूक नसताना आपल्या जीवावर उठलेल्यांना चर्चेने नव्हे तर गोळीनेच उत्तर द्यायचं असतं हे तरी सत्तेतल्या लोकांना कोण समजावणार?

---------- काही मनातले ----------

आत्तापर्यंतचे दहा भाग वैय्यक्तिक हत्त्यांची गोष्ट सांगणारे होते. त्यानंतरचे एक किंवा दोन भाग सामूहिक हत्याकांडांवर आधारित असतील. त्यानंतर ही मालिका संपेल. ही मालिका लिहायला सुरवात करताना अमुक भाग लिहावेत असं ठरवलेलं नव्हतं. काश्मीरमधे अतिरेकी बुरहान वानीला सैन्याने संपवल्यानंतर उसळलेल्या पण आधीपासून व्यवस्थित पूर्वतयारीकरुन सुरु झालेल्या हिंसाचाराने हे लिहायला मला भाग पाडलं असं म्हटलं तरी चालेल.

ही मालिका लिहीत असताना मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. मी काही फार मोठा लेखक नाही, मला जे मनापासून भावतात त्या विषयांवर मी लिहीतो इतकंच. 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।। या समर्थवचनांचं जितकं शक्य होईल तितकं पालन मी करतो. तेव्हा माझ्या लेखनकौशल्याबद्दलच्या कौतुकपर टिप्पण्यावगळून बाकीच्या गोष्टींकडे वळतो. मुळात या विषयावर तू लिहीतोस याचंच कौतुक आहे असं एका जाणकाराने मला सांगितलं. तसंच तुमच्या या मालिकेमुळे बर्‍याच माहित नसलेल्या गोष्टी समजल्या अशा अनेक प्रतिक्रिया आहेत. माझे बरेच गैरसमज होते ते दूर झाले असंही एका व्यक्तीने सांगितलं.

या उलट "हे लिहून काय होणार, 'हा मेला, ती मेली' या माहितीचा फायदा काय?" अशीही एक अत्यंत असंवेदनशील प्रतिक्रिया एका व्यक्तीकडून मिळाली. त्यात त्या व्यक्तीचा दोष नाही. मुळात आपल्यात राष्ट्रीय चरित्र हीच गोष्ट नव्याने निर्माण करायला हवी आहे. इस्लामी दहशतवाद हा आतासारखा आपल्या दारापर्यंत यायलाच हवा असं नाही. ज्याप्रमाणे आपल्या पायाला ठेच लागली की तोंड वेदनेने कळवळतं, डोळ्यांतून पाणी येतं, आणि हात लगेच पायाच्या मदतीला धावतो, त्याप्रमाणे देशात कुठेही घडणार्‍या अशा घटनांच्या बाबतीत आपली प्रतिक्रिया झाली पाहीजे. अगदी रस्त्यावर उतरून निदर्शनं करणं जमलं नाही तरी चालेल पण आपापले कामधंदे सांभाळूनकरता येण्याजोगी अनेक कामं आहेत. उदाहरणतः सरकारला पत्र पाठवणं, ज्या लोकांकडून आपल्या जवानांचा अपमान होतो त्या लोकांकडून काहीही खरेदी न करणं, आपल्या जवळपासच्या अशा गरजूंना मदत करणं, आपल्यापैकी जे उत्तम लेखन करु शकतात त्यांनी या विषयावर लेखन करुन जनजागृती करावी, अशी अनेक कामं आपण नक्कीच करु शकतो.

प्रश्न उरला मी का लिहीतो याचा. एका व्यक्तीने मला विचारलं होतं, तुला या लिखाणाचा त्रास होत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना अरनेस्ट हेमिन्गवे या लेखकाचं एक वाक्य आठवलं: "Write hard and clear about what hurts". माझ्या आजूबाजूला आणि देशात काय चाललंय याचा मला त्रास होतो म्हणूनच मी लिहीतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचं तर लिहीलं नाही तरच मला त्रास होईल.

आता शेवटच्या भागात लवकरच भेटूया. तेव्हा संदर्भांचीही यादी देईन.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण अमावस्या, बैल पोळा, शके १९३८
१ सप्टेंबर इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Friday, August 26, 2016

पंडित नामा ९: श्री बी. के. गंजू

बी. के. गंजू
निवासः छोटा बाझार, श्रीनगर
व्यवसायः नोकरी, दूरसंचार विभाग, केंद्र शासन
हत्या: २२ मार्च १९९०

"काश्मीर में अगर रहना होगा
अल्लाह-हू-अकबर कहना होगा"

काश्मीरमधे रस्त्यावर घोळक्याने फिरणार्‍या जमावाची ही आणखी काही आरोळ्यारूपी मुक्ताफळे. यातली पहिली घोषणा एका 'सेक्युलर' परिचिताला सांगितल्यावर त्याने लगेच "तुम्ही नाही का, 'अगर इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा' म्हणता!" असे तारे तोडले. आवाजात शक्य तितकं मार्दव आणून त्याला 'वंदे मातरम्' चा अर्थ देशाला आई मानून वंदन करणे असा आहे, कुठल्याही विशिष्ठ इश्वराला वंदन करणे नव्हे, हे लक्षात आणून दिलं. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी हे मानणारे काश्मीरमधले पंडित काश्मीरच्या भूमीला माता समजून वंदन करायला केव्हाही तयार झाले असते. पण त्यासाठी जबरदस्तीचे धर्मांतर कुणाला मंजूर होईल? आम्ही मानतो त्याच इश्वराला तुम्ही मानलं पाहीजे ही जबरदस्ती माथेफिरूच करु शकतात, आणि अशी जबरदस्ती काश्मिरात सर्रास सुरु होती.

श्रीनगर मधल्या छोटा बाझार जवळच्या एका मशीदीच्या एका भिंतीवर लावलेल्या एका 'खतम करायच्या व्यक्तीं'च्या यादीत श्री बी. के. गंजूंचं नाव पाहून एकाने ती गोष्ट श्री गंजूंना सांगितली. आत्तापर्यंत अशा घटना आणि याद्यांची केवळ ऐकीव माहिती असलेल्या गंजू दांपत्याचं स्वतःचंच नाव त्या यादीत लागल्याचं पाहून धाबं दणाणलं. नक्की कुणाची मदत घ्यावी, कुणाशी बोलावं हे त्यांना समजेना. काश्मीरमधे पोलीसांची मदत घेणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच होतं. आता कुंपणच शेत खाऊ लागलं होतं. ती रात्र गंजू दांपत्याने एकमेकांकडे पण शून्यात बघत घालवली. जरा जरी आवाज झाला तरी ते दचकत. त्यांना कुणीतरी दार ठोठावत असल्याचाही मधेच भास होई. ही रात्र कधी संपणारच नाही की काय अशी भीती दोघांना वाटू लागली. क्वचित ताण असह्य होऊन मग डोळ्यांतून घळाघळा अश्रू ओघळत. आपण साधे नोकरदार. आपण कुणाचं काय वाकडं केलं आहे? असा श्री गंजूंना प्रश्न पडे. पण याचं उत्तर एकच होतं. त्यांनी काश्मिरात हिंदू म्हणून जन्म घेण्याचं घोर पातक केलेलं होतं.

पहाटे केव्हातरी यांत्रिकपणे सौ गंजू उठल्या आणि देवघरात गेल्या. पण त्यांना साधं निरंजन लावण्याचाही धीर होईना. मग त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन तिथेही दिवा न लावता अर्धवट अंधारात चहा केला. सगळी रात्र भीतीने थरथरत विचित्र मनस्थितीत जागून काढलेल्या गंजू दांपत्याला तो चहा ना धड गोड लागला ना ते त्याची उष्णता अनुभवत त्याचा धड आस्वाद घेऊ शकले. तेवढ्यात फोनच्या आवाजाने ते पुन्हा दचकले. ते घरात आहेत की नाहीत हे बघायला कुणीतरी फोन केला गेला असावा. अर्थातच तो फोन घ्यायची त्यांची हिंमतच झाली नाही.

सकाळी साधारण नऊच्या सुमारास दारावर थाप पडली आणि त्या बरोबरच "गंजू साहेब कुठे आहेत, आम्हाला काही तातडीचं काम आहे त्यांच्याकडे" हे शब्द कानावर पडले. नक्की काय घडतं आहे याची अर्थातच पूर्ण कल्पना असणार्‍या सौ. गंजू "ते घरी नाहीत. ऑफिसला गेले आहेत" असं उत्तरल्या. दार ठोठावणार्‍यांचा त्यावर विश्वास बसला नाही. "असं कसं होईल, इतक्या लवकर ते ऑफिसला कसे जातील? दार उघडा. खूप तातडीचं काम आहे हो आमचं", त्यांनी अजून हेका सोडलेला नव्हता. पण सौं गंजूंनी कोणताही धोका पत्करायचा नाही असंच ठरवलं होतं. त्यांनी आता त्यांच्या हाकांना उत्तर द्यायचंही थांबवलं. काही वेळाने दारावरच्या थापा थांबल्या आणि दार उघडायच्या विनंत्याही. आता बाहेरून कुठलाही आवाज येत नव्हता. बहुतेक बाहेर जे कुणी होतं ते बहुतेक गेले असावेत असं वाटून सौ गंजूंनी एका खिडकीतून हळूच बाहेर डोकावून बघितलं तेव्हा बाहेर कुणीच दिसलं नाही. सौ गंजूंनी नवर्‍याला पोलीसांना हळूच फोन करण्याचा सल्ला दिला. फोन झालाच होता तेवढ्यात घराच्या एका बाजूच्या खिडकीच्या बाजूने जोरात धडक बसल्याचा आवाज झाला. कुणीतरी घरात घुसण्याचा प्रयत्न करत होतं. प्रसंगावधान राखून सौ. गंजूंनी श्री बी. के. गंजूंना गच्चीवर ठेवलेल्या आणि धान्याच्या पोत्यांनी वेढलेल्या एका रिकाम्या पिंपात जाऊन लपायला सांगितल. श्री गंजू धावले.

काही वेळातच दोन अतिरेकी घरात घुसण्यात यशस्वी ठरले. त्यांच्यापैकी एकाच्या हातात कलाशनिकोव्ह** होती आणि दुसर्‍याच्या हातात पिस्तूल. आता सौ गंजूंना विचाराच्या फंदात न पडता त्या दोघांनी घराच्या कानाकोपरा शोधायला सुरवात केली. कसंही करुन त्यांना श्री गंजूंना शोधायचंच होतं. एका रिकाम्या खोलीला लावलेलं कुलूप तोडुन ते आत शिरले. तिथेही आपलं सावज न सापडल्याने ते वैतागले. रक्ताला चटावलेल्या हिंस्त्र श्वापदाच्या आवेशात "तो उंदीर फार काळ मोकाट फिरू शकणार नाही. कधी ना कधी सापडेलच", असं म्हणून ते घराबाहेर पडले.

आता सौ गंजूंनी सुटकेचा नि:स्वास सोडला. या वेळी कदाचित त्यांनी असाही विचार केला असेल की पहिली संधी मिळताच काश्मीर खोरं सोडून जम्मू किंवा इतर कुठेतरी पळून जायचं.

पण दुर्दैवाने तसं व्हायचं नव्हतं. श्री गंजू हे गच्चीवर पिंपात लपताना गंजूंच्या एका काश्मिरी मुसलमान शेजार्‍याने बघितलं होतं. गंजूंच्या घरातून बाहेर पडलेले अतिरेकी काही अंतर जाताच त्या शेजार्‍याने त्यांना गंजूंच्या घराच्या छताकडे बघा अशी खूण केली. आपली खेप 'फुकट' जाणार नाही या आनंदात आणि अर्थातच इतका वेळ फुकट घालवल्याच्या संतापात ते दोघे पुन्हा श्री गंजूंच्या घराकडे धावतच निघाले. आता पुतळ्यासारख्या निश्चल उभं राहिलेल्या सौ. गंजूंकडे डुंकूनही न बघता ओलांडून ते घराचा जिना धडाधडा चढून आपल्या लक्ष्याच्या दिशेने गच्चीवर निघाले. वर जाताच वेळ न दवडता त्यांनी श्री बी. के. गंजूंवर गोळ्यांचा वर्षाव केला. रक्ताच्या चिळकांड्या आजूबाजूच्या तांदळाच्या पोत्यांवर उडाल्या. आता त्या हरामखोरांचं समाधान झालं होतं. तरीही शेवटच्या घटका मोजणार्‍या श्री गंजुंना ते दोघे अतिरेकी "आता तुझ्या घरच्यांना तुझ्या रक्ताने माखलेले हेच तांदूळ खाऊ देत. काय चविष्ट लागेल ना मग जेवण!" असं बोलून खुनशी आनंदात हातातलं पिस्तुल आणि कलाशनिकोव्ह नाचवत निघून गेले. मागे धाय मोकलून आकांत करणार्‍या सौ गंजूंना सोडून.

"दिल मे रखो अल्लाह का खौफ
हाथ मे रखो कलाशनिकोव्ह"

अल्लाहचं नाव घेत कलाशनिकोव्ह हातात घेतलेल्या त्याच्या बंद्यांनी आणखी एका काश्मीरी काफिराला संपवलं होतं.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण कृ. , शके १९३८
२६ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

**कलाशनिकोव्ह = मशीनगन

Tuesday, August 23, 2016

पंडित नामा ८: प्रोफेसर के. एल. गंजू व सौ गंजू

प्रोफेसर के. एल. गंजू, सौ. गंजू
वयः दोघांचेही चाळीशीत
निवासः सोपोर
व्यवसायः अनुक्रमे व्याख्याता व शिक्षिका
हत्या: २ मे १९९०

मागील काही लेखात आपण पाहिलं की काश्मीरात दहशतवाद्यांनी सुरवातीला प्रामुख्याने समाजधुरीणांना लक्ष्य करुन सुनियोजित पद्धतीने काटा काढण्याचा सपाटा लावला होता. दुर्दैवाने यात अतिरेक्यांना मदत करणारे किंवा मख्खपणे पंडितांवरचे अत्याचार बघत बसणारे हे पंडितांचेच सख्खे शेजारी आणि कार्यालयातले सहकारी असणारे काश्मीरचे सर्वसामान्य मुस्लीम नागरिकच होते. याच मालिकेतला एक दुर्दैवी बळी म्हणजे प्रोफेसर के. एल. गंजू व त्यांची पत्नी. 

सोपोर शेतकी महाविद्यालयात व्याख्याता असणारे श्री के. एल. गंजू हे एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना काश्मीरमधल्या चिघळत गेलेल्या परिस्थितीची जाण होती. दहशतवादाची झळ आपल्याला व आपल्या कुटुंबाला लागू शकते याचीही कल्पना त्यांना होती. मात्र आपली लोकप्रियता व काश्मीरीयत यांच्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास असलेल्या श्री गंजूंना या गोष्टींच्या जोरावर आपण या संकटातून तरून जाऊ असा आत्मविश्वास होता. आपण कुणाचं वाकडं केलेलं नाही, आपल्याकडून समाजाची सेवाच घडलेली आहे, आपल्याला अनेक मुस्लीम मित्र व चाहते आहेत - मग आपलं वाईट होणं शक्यच नाही या आदर्शवादी पण तितक्याच भोळसट विचारांनी त्यांचा घात केला. काश्मीर खोरे वेळेवर सोडण्याचा निर्णय न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ आलेल्या अनेक उदाहरणांपैकी हे एक.

श्री. के. एल. गंजू व शिक्षिका असणारी त्यांची पत्नी हे नेपाळमधे पार पडलेल्या एका परिषदेहून परतले. त्यांच्याबरोबर त्यांचा 'पिस्ता' म्हणून ओळखला जाणारा एक नुकताच मिसरुडही न फुटलेला तरूण नातेवाईक मुलगा सोबत होता. घरी पोहोचल्यावर रात्रीचं जेवण घेत असतानाच साधारण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार अतिरेकी घरात घुसले. त्यातल्या एकाकडे अत्याधुनिक अशा कलाश्निकोव्ह रायफली आणि बाकीच्या तिघांकडे पिस्तुलं होती. (कोण म्हणतं रे काश्मीरात विकास नाही झाला? आँ?). या चौघा अतिरेक्यांनी त्या तिघांनाही भरल्या ताटावरून उठून आपल्यासोबत चलण्याची आज्ञा केली. दहशतवादाच्या कहाण्या ऐकून असलेल्या गंजू कुटुंबियांना आता आकांत करण्याचंही त्राण अंगात नव्हतं. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची पूर्ण कल्पना असलेले ते तिघे मन आणि भावना दोन्ही गोठलेल्या अवस्थेत निमूटपणे त्या अतिरेक्यांसोबत निघाले.

हे सगळं घडत असताना त्यांचे शेजारी मख्खपणे बघत उभे होते. त्यातल्या काहींनी त्या अतिरेक्यांना त्याच भागातले असल्याने ओळखलंही होतं. पण कुणीही गंजू कुटुंबियांना वाचवायला दयेची भीक मागण्यापुरतंही पुढे झालं नाही. सुंठीवाचून खोकला जात असेल तर कोण उगाच बोलेल? नाही का! मग ते फक्त बघत बसले. इतकंच नव्हे, तर अतिरेक्यांनी या तिघांना घेऊन गेल्यावरही कुणीही जवळच्या लष्कराच्या ठाण्यात वर्दी देण्याचीही तसदी घेतली नाही. कहर म्हणजे पोलीस स्टेशनला फोन करुन कुणी घडला प्रकार कळवलाही नाही. ज्या काश्मीरीयतवर फाजील विश्वास ठेऊन श्री गंजू यांनी काश्मीर सोडलं नव्हतं, त्याच काश्मीरीयतचे पाईक म्हणवणार्‍या शेजार्‍यांनी त्यांचे खरे रंग दाखवले. 

श्री. के. एल. गंजू, त्यांची पत्नी, व 'पिस्ता' यांना सोपोरमधे असलेल्या झेलम नदीवरच्या पुलावर मधोमध नेऊन उभं करण्यात आलं. श्री के एल गंजू यांना अगदी जवळून सहा गोळ्या घालण्यात आल्या. पहिली गोळी झाडली जात असताना प्रतीक्षिप्त क्रियेने केलेल्या हातवार्‍यांनी गोळ्या झाडणार्‍या अतिरेक्याचं चित्तं विचलीत होऊन गोळी 'पिस्ता'च्या पायाला ओझरती निसटून गेली. का कोण जाणे पण श्री गंजू यांचा मृतदेह रात्रभर जवळच्या मशीदीत ठेवण्यात आला आणि सकाळी झेलम नदीत फेकून देण्यात आला. 

असं म्हणतात की श्री गंजूंना मारल्यावर 'पिस्ता'ला अतिरेक्यांनी दोन पर्याय दिले. "आम्ही तीन पर्यंत आकडे मोजू. एक तर प्रोफेसरसाहेबांना भेटायला नदीत उडी मार नाहीतर त्यांच्या बायकोवर आम्ही जे काही (अत्याचार) करू ते उघड्या डोळ्यांनी बघ" असा इशारा देण्यात आला. या परिस्थितीत तुम्ही आम्ही जे केलं असतं तेच त्याने केलं. त्याने एकदा सौ. गंजूंकडे शेवटचं बघितलं आणि एकदा त्यांच्याकडे वखवखलेल्या नजरेने बघणार्‍या त्या अतिरेक्यांकडे. मग त्या नराधमांनी "तीन" म्हणताच त्या पोराने परमेश्वराचे नाव घेत झेलम नदीत उडी मारली. 

या नंतर सौ. गंजू यांचं काय झालं हे सांगायला ना श्री गंजू जिवंत होते, ना पिस्ता हजर होता. पोलीसांकडे नोंदीत अनेक दिवस 'बेपत्ता' असलेल्या सौ गंजू यांचं काय झालं असावं हे वेगळं सांगायला नकोच. ते आधीच्या अनेक उदाहारणांवरुन स्पष्ट आहेच. काही पत्रकारांच्या मते सौ गंजूंवर आधी सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि मग त्यांना अतिशय नृशंसपणे ठार करण्यात आलं. या अतिरेक्यांपैकी एकाला नंतर अटक करण्यात आली तेव्हा त्याने सांगितलं की सौ गंजूंना मारल्यावर त्यांच्या मृतदेहाला दगड बांधून नवर्‍याप्रमाणेच झेलम नदीत फेकून देण्यात आलं. पण त्यांचा मृतदेह आजतागायत सापडलेला नाही. जिवंत माणसांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणारे काश्मीरातले पोलीस दल सौ. गंजू यांचा मृतदेह शोधायचा प्रयत्न करतील अशी शक्यता शून्यच होती.

श्री गंजू यांचा गोळ्यांनी चाळण झालेला आणि सडलेला मृतदेह काही दिवसांनी झेलमच्या किनार्‍यावर मिळाला. 

सुदैवाची गोष्ट अशी, की पोहायला न येणारा 'पिस्ता' मात्र झेलम मातेच्या कृपेने हात पाय मारत कसाबसा काही अंतरावर किनार्‍याला लागला. दोन दिवस घाबरत लपत छपत खोर्‍यात काढून मग त्याने जम्मूला पळ काढला.

काश्मीरमधे दहशतवाद १९८९-९० सालापासून अचानक सुरू झाला का? नाही. त्याही अगोदर काश्मीरी पंडितांवर विविध इस्लामी राज्यकर्त्यांनी अनेको अत्याचार केले. पण देश स्वतंत्र झाल्यावर वाटलं होतं, आता तरी हे अंतर्गत अत्याचार थांबतील. आता तरी सततचे शिरकाण थांबेल. पण नाही. स्वातंत्र्यानंतरही हे सुरूच राहिलं आणि १९८९-९० सालात त्याचा भडका उडून २००३-४ साल उजाडेपर्यंत काश्मीर खोर्‍यातून काश्मीरी पंडितांचं जवळजवळ उच्चाटन झालं. आज काश्मीर खोर्‍यात हिंदू नसल्यात जमा आहेत. पण त्याने उर्वरीत काश्मीरींचं समाधान झालं आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. इतकं सगळं होऊनही केंद्र सरकारने काश्मीरात ओतलेले कोट्यावधी रुपये, काश्मीरी विद्यार्थ्यांना देशभरात मिळणार्‍या सवलती, काश्मीरात राज्य सरकारी नोकर्‍यात असलेले मुबलक आरक्षण, पर्यटनाने मिळणारा पैसा याने काश्मीरी नागरीकांमधे काहीही फरक पडलेला नाही. अजूनही जिहाद आणि आझादीचे भूत डोक्यावरुन उतरलेले नाही. एक कोवळ्या वयातला मुलगा अतिरेकी होतो, चकमकीत मारला जातो, यावरुन धडा न घेता त्याचा बाप आपली मुलगी सुद्धा जिहादला द्यायला तयार होतो, तेव्हा खरंच लायकी नसलेल्या लोकांवर आपण पैसे खर्च करतो आहोत ही भावना प्रबळ होत जाते.

काश्मीरमधल्या परिस्थितीचा सुरवातीपासून तिथल्या राज्य सरकारांनी व केंद्रातील काँग्रेस सरकारांनी, इस्लामी जहाल मानसिकतेने पछाडलेली तिथली प्रशासन व्यवस्था व सर्वसामान्य मुस्लीम काश्मीरी जनता, आणि अर्थातच कीड लगलेले पोलीस दल यांना नियंत्रणात ठेवण्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आज काश्मीर खोर्‍यावर आणि लाखो काश्मीरी पंडितांवर ही परिस्थिती ओढवली आहे. खुर्ची व मतांच्या हव्यास आणि त्यापोटी दिलेला असंख्य पंडितांचा बळी हे म्हणजे आपल्याच व्यवस्थेने भारतीय नागरिकांची भारताच्या घटनेवर असलेल्या श्रद्धेचा घात करत आपल्याच पाठीत खुपसलेला सुरा आहे.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण कृ. ६, शके १९३८
२३ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Sunday, August 7, 2016

पंडित नामा - ७: पंडित दीनानाथ मुजू

पंडित दीनानाथ मुजू
७१, रावळपोरा हाऊसिंग कॉलनी, श्रीनगर
मृत्यूसमयी वयः ७८
व्यवसायः निवृत्त सरकारी कर्मचारी
हत्या: ७ जुलै १९९०

काश्मीरमधे इस्लामी दहशतवादाच्या सुरवातीच्या काळात अतिरेक्यांनी ज्या पंडितांना लक्ष्य केलं होतं त्यात प्रामुख्याने सर्व पदांवरील सरकारी कर्मचारी, दुकानदार व व्यापारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पुजारी व भटजी, शिक्षक, आणि तत्सम प्रवर्गातील काश्मीरी हिंदूं सामील होते. म्हणजेच अतिरेक्यांनी काश्मीरी पंडित समाजाच्या आर्थिक, संस्कृतीक, सामाजिक, व राजकीय अशा सगळ्याच आधारस्तंभांना अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने घरात घुसून, रस्त्यावरुन चालताना, कार्यालयात, पळवून नेऊन शक्य तिथे यमसदनास धाडण्याचे सत्र आरंभलं.

याच हत्यासत्रातला एक दुर्दैवी बळी म्हणजे पंडित दीनानाथ मुजू. पंडित दीनानाथ यांचे सामाजिक कार्य खूप होते. शिक्षक आणि मुख्याध्यापक (म्हणजे बरखा दत्तच्या फर्ड्या इंग्रजीत हेडमास्टर बरं का) म्हणून पुढच्या पिढीचे शिक्षक तयार करणार्‍या सरकारी शिक्षक विद्यालयात कार्यरत असताना त्यांनी अनेक सामाजिक  कार्ये सुरु करुन ती जोमाने सुरू ठेवलीच होती, पण त्यांचा उत्साह निवृत्तीनंतरही टिकून होता. मुख्याध्यापकपदावरुन ते निवृत्त झाले खरे, पण समाजकार्यातून त्यांनी कधीच निवृत्ती घेतली नाही. सर्वानंद कौल प्रेमी यांच्याप्रमाणेच पंडित दीनानाथ मुजू हे अत्यंत लोकप्रिय होते. पंडित दीनानाथ हे निव्वळ शिक्षक नव्हे तर अनेकांचे मागदर्शक आणि आधार म्हणून ओळखले जात. शिक्षणक्षेत्राबरोबरच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास, तत्त्वज्ञान, ब्रह्मविद्या, काश्मीरी शैव धर्म, आणि जे. कृष्णमूर्ती यांचे विचार या गोष्टींत पंडित दीनानाथ यांना खूप रस होता व या विषयांचा त्यांचा खोल अभ्यासही होता.  या विषयांसंबंधी त्यांच्याकडे अनेक पुस्तकेही संग्रही होती. विश्वबंधुत्व ही संकल्पना अक्षरशः जगणारे पंडित दीनानाथ यांचे सामाजिक कार्य प्रामुख्याने गरीब व मागासलेले वर्ग यावर केंद्रीत झालेले होते. स्त्रीयांचे सक्षमीकरण हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. थियोसॉफोकल सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विमेन्स वेलफेअर ट्रस्ट या संस्थेचे तहहयात सदस्य असलेल्या पंडितजींनी या संस्थेच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केलं. ही संस्था काश्मीरात स्त्रीयांसाठी शैक्षणीक संस्था काढण्याचे काम करत असे. असे हे पंडित दीनानाथ मुजू संपूर्ण काश्मीरात एक संतप्रवृत्तीचे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते.

वृद्धापकाळात जन्मभूमी आणि पिढीजात घर सोडून जायचं जीवावर आलेल्या पंडीत दीनानाथ यांनी संभाव्य धोका ओळखून श्रीनगरच नव्हे तर काश्मीर खोरेही सोडण्याविषयी आपल्या मुलांचे मन वळवलं. आणि म्हणूनच मुजू परिवार निर्वंश होण्यापासून वाचला. पंडित दीनानाथ मुजू व त्यांची पत्नी हे दोघं मात्र जीवाला मुकले. मात्र त्यांचा मृत्यू इतरां अनेकांप्रमाणे क्लेषदायक झाला नसावा. सहा जुलै १९९० साधारण मध्यरात्रीच्या सुमारास काही दहशतवादी पंडित दीनानाथांच्या घरात शिरले आणि पंडितजी व त्यांच्या पत्नीला गोळ्यांचा वर्षाव करुन ठार मारलं. हे आणि इतकंच घडलं असावं असं सकाळी त्यांचे मृतदेह पाहून पोलीसांना समजलं.

जेव्हा पंडित दीनानाथ यांच्यासारखा एक माणूस संपवला जातो, तेव्हा निव्वळ एक माणूस मरत नाही. फक्त एक बाप किंवा भाऊ किंवा कुणाचा मित्र मरत नाही. समाज त्याबरोबरच बरंच काही गमावतो. भावी पिढ्या घडवणारा एक हाडाचा शिक्षक जातो, त्याचबरोबर अनेक पिढ्यांचं भविष्यही नष्ट होतं. एक विद्वान मरतो, त्याच बरोबर समाजाला त्याच्याकडून मिळणारं ज्ञानही. समाजाचा उत्थानासाठी झटणारा एक सामाजिक कार्यकर्ता हा इहलोक सोडून जातो तेव्हा होणारं नुकसान अपरिमित असतं. विविध धर्म व उपासनापद्धतींचा तसेच तत्त्वज्ञानांचा अभ्यासक संपवला जातो, तेव्हा जगाकडे उघड्या डोळ्यांनी व मोकळ्या मनाने बघण्याची समाजाची दृष्टी नाहीशी होते. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी झटणारा एक तळमळीचा कार्यकर्ता ठार केला जातो, तेव्हा समाज व देश किती वर्ष मागे फेकला जातो याची कल्पनाही करण अवघड आहे. समाज शारिरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही आक्रसत जातो. पण याचं सोयरसुतक सत्य काय ते एकाच पुस्तकात एकटवलं आहे आणि त्या पलीकडे जग नाही असं मानणार्‍यांना काय असायचं? यापलिकडे जे बोलतील त्यांना संपवणं, आणि त्या पुस्तकापलीकडे जे ज्ञानवर्धन करणारं साहित्य असेल ते जाळणं एवढीच अक्कल असेल तर कोण काय करणार.

पंडित दीनानाथ मुजू तर गेले. पण एक प्रश्न कायम सतावतो तो म्हणजे आणि त्यांच्यासारख्या अनेक दिग्गज विद्वानांकडच्या साहित्यसंपदेचं काय झालं असावं? याचं उत्तर  बहुतांशी १९९५ साली काश्मीरात घडलेल्या एका प्रसंगात सापडतं. पण तो प्रसंग वर्णन करण्याआधी थोडंसं इतिहासात डोकावूया.

११९९ मधे भारतावर एक भयानक नुकसान करणारं इस्लामी आक्रमण झालं, ते तुर्की बादशहा बख्तियार खिलजीच्या रूपात. हजारो लाखो हिंदू मारणारे इतर इस्लामी आक्रमणकारी एका बाजूला आणी हा राक्षस एका बाजूला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. त्या काळी फक्त भारतालाच नव्हे तर जगाला ज्ञानप्रदान करणारं नालंदा विश्वविद्यालय एक अत्यंत भव्य अशा प्रकारचं विद्यापीठ होतं. सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) स्थापन झालेल्या या विद्यापीठाला सम्राट हर्षवर्धनाने शंभर खेड्यांइतकी जमीन दान दिली होती. विविध देशातील दहा हजार विद्यार्थी शिकत असलेल्या या विध्यापीठात निव्वळ प्रवेश घ्यायलाही अत्यंत कठीण अशी परीक्षा द्यावी लागे. सनातन वैदिक धर्माबरोबरच बौद्ध व जैन तत्त्वज्ञान, वेदाध्ययन, भाषा व व्याकरण, आयुर्वेद, गणित, पाणिनी सूत्र अशा असंख्य विषयांचे अध्यापन तिथे केले जात असे. अशा या विद्यापीठाचं ग्रंथालयही अवाढव्य होतं.

बख्तियार खिलजीने नालंदा नगरी बरोबरच नालंदा विश्वविद्यालयाचा विध्वंस करण्याचा निश्चय केला. कुराणापलिकडे  काहीही सत्य नाही आणि काही ज्ञान नाही आणि त्या बाहेर जे सापडेल ते हराम आहे सबब ते नष्ट केलंच पाहीजे या शिकवणीला अनुसरून विश्वविद्यालयाला एके दिवशी आग लावण्यात आली. या विद्यापीठाचं प्रचंड मोठं असलेलं ग्रंथालय पुढचे कित्येक महिने जळत होतं. या वरुन किती अनमोल ग्रंथ व त्यातलं अमर्याद ज्ञान नष्ट झालं असेल याची कल्पनाही करता येणार नाही.

काश्मिरी दहशतवाद्यांनी मात्र जाळाजाळीबरोबरच पंडीतांच्या ग्रंथसंपदेबाबत एक नावीन्यपूर्ण धोरण अवलंबलं होतं. खिलजीच्या काळात फक्त सोनंनाणं संपत्ती म्हणून जमा करता येत असे किंवा  विकता येत असे. नव्या काळात ज्ञानालाही किंमत आली. मग ज्याला किंमत आहे, ते जाळायचं कशाला? ते विकायचं, आणि त्यातून आपला जिहाद चालवायला पैसे कमवायचे. १९९५ साली घडलेली ती घटना वर्णन करताना एक अनाम पंडित म्हणतात, की एके दिवशी देवदर्शन करून सायकलवरुन घरी परतत असताना वाटेत त्यांच्या एका मुसलमान सहकारी व्याख्यात्याने थांबवून एक विचित्र बातमी दिली. तिथून काही अंतरावर एका टपरीवजा झोपडीत एका बोटमालकाने पंडितांच्या घरातून चोरलेली हजारो पुस्तकं आणि दुर्मीळ हस्तलिखीतं विक्रीला ठेवली आहेत. पंडितजींनी सायकल त्या दिशेला वळवली आणि अनेक किलोमीटर दामटवून त्या स्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना खरंच एक बोटमालक पुस्तकविक्री करताना दिसला. शेडमधे युरोप व अमेरिकेतील बरेच विद्वान व अभ्यासक जमा झालेले दिसले. जी पुस्तकं आणि हस्तलिखीतं मागूनही हजारो रुपयांना विकायला त्यांच्या पंडित मालकांनी नकार दिला असता ती ग्रंथसंपदा आता विदेशी ग्राहकांना वीस रुपये किलोने विकली जात होती. पंडितजींना पाहून तो बोटवाला म्हणाला, "तुम्ही पंडितांसारखे दिसता, मग तुमच्यासाठी वेगळा भाव आहे. तुम्हाला किलोमागे तीस रुपये द्यावे लागतील." पंडितजींनी खिशातून सरळ शंभर रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि ती आगाऊ रक्कम असल्याचं सांगत त्यांना तिथून नेता येतील तितकी पुस्तकं उचलायला सुरवात केली. पंडितजींनी त्यांना झेपेल इतकं केलं, पण   विदेशी ग्राहकांना विकल्या गेलेल्या असंख्य पुस्तकांचं काय? ती काही कुठल्या लष्करी मोहीमेअंतर्गत लुटली गेली नव्हती, त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अशक्य होतं. ही पुस्तकं विदेशात का होईना पण वाचली जात आहेत, उपयोगात आणली जात आहेत हे समाधानही फोल आहे. कारण वेद, पुराणं, व स्मृतिग्रंथांचा पाश्चात्य देशात अभ्यास होऊन ते अत्यंत विकृत स्वरूपात आपल्यापुढे माडला जाण्याचा इतिहास फार जुना नाही. इंटरनॅशनल शाळांचा व मिशनरी शाळांनी कॉन्व्हेन्टीकरण केलेल्या आजच्या शिक्षणात जे जे भारतीय व जे जे हिंदू ते ते टाकाऊ असं ब्रेनवॉशिंग करुन अनेक पिढ्या बरबाद करुन झालेल्याच आहेत. पण तो एक वेगळा व मोठा विषय आहे.

पंडित दीनानाथ यांच्याकडेही अशीच ग्रंथसंपदा असेल. त्या पुस्तकांचं काय झालं असेल? ती जाळली गेली असतील की अशाच एखाद्या ठिकाणी किलोच्या भावाने विकली गेली असतील? जगात कुठे कुठे असतील ही पुस्तकं? कुणास ठाऊक. बख्तियार खिलजीला या नव्या जिहादींचा निश्चितच अभिमान वाटला असता. फक्र.

पंडित दीनानाथजींसारख्यांच्या आत्म्याला मात्र स्वतःच्या मृत्यूपेक्षा या पुस्तकांचा मृत्यू अधिक चटका लावून गेला असेल हे नक्की.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण शु. ५, शके १९३८, नागपंचमी
०७ ऑगस्ट इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Saturday, July 23, 2016

पंडित नामा - ६: चुन्नीलाल शल्ला

चुन्नीलाल शल्ला
इन्स्पेक्टर ऑफ पोलीस, जम्मू-काश्मीर राज्य
राहणार सोपोर
कार्यभूमी: लानगेट, कूपवाडा
-----------------------------

यहाँ क्या चलेगा, निझाम-ए-मुस्तफा
ला शर्कीया, ला गर्बीया, इस्लामिया इस्लामिया

इथे काय चालेल, राज्य मुस्तफाचं
ना पौर्वात्य, ना पाश्चिमात्य, फक्त इस्लामचं फक्त इस्लामचं

काश्मीरात रस्तोरस्ती, मशीदींवरच्या भोंग्यांवरुन, आणि दफनभूमींमधे दिल्या जाणार्‍या जिहादी आरोळ्यांनी आता जोर पकडला होता. नुकतंच अफगाणीस्तानवरचा आपला ताबा सोडून रशियाने आपलं सैन्य नुकतंच माघारी बोलावलं होतं. त्यानंतर बराच काळ त्यासंबंधीच्या बातम्या टीव्हीवर दिसत असत. टीव्हीवर रशियन रणगाडे माघारी जात असल्याची आणि अफगाणिस्तानातले मुजाहिद हवेत गोळीबार करत असल्याची दृष्य पाहून काश्मीरमधल्या मुसलमानांच्या घराघरात जल्लोष केला जायचा. एखाद्या सामन्यात आपल्या देशाचा संघ जिंकल्यावर जसा आनंद आपल्याला होतो तसाच मिनी आनंदोत्सव अशी दृष्य पाहून साजरा व्हायचा. काय संंबंध होता रशियाच्या अफगाणीस्तानातून माघारीचा आणि इथे साजरा केल्या जाणार्‍या आनंदाचा? खरं तर काहीच नाही. पण काश्मीरी मुसलमानांच्या दृष्टीने फक्त हा विजय फक्त अमेरीकापुरस्कृत अफगाणी स्वातंत्र्यसैनिकांचा नव्हता, तिथे फक्त अफगाणी मुजाहिद जिंकत नव्हते, तर हा विजय इस्लामचा होता. इराण आणि पाकिस्तानच्या जवळच इस्लामी जगतावर आलेलं रशियन संकट दूर झालेलं होतं. अफगाणिस्तानात लवकरच अलाहच्या अंमल प्रस्थापित होणार होता. मुस्तफाचं राज्य येणार होतं. येणार काय, रशियाच्या माघारीने आलेलंच होतं. आता तिथल्या विजयाची पुनरावृत्ती काश्मीरात करायला अल्लाहच्या बंद्यांना कितीसा वेळ लागणार होता? दुर्दैव असं की हे अल्लाहचे बंदे स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांनी पछाडले होते. दार-उल-हरब (युद्धभूमी, अजून इस्लामच्या अंमलाखाली नसलेला) असलेला काश्मीर त्यांना दार-उल-इस्लाम (इस्लामचं राज्य असलेला) करायचा होता.

म्हणूनच अशा घोषणा ऐकल्या की काश्मीरी पंडितांच्या छातीत धडकी भरत असे आणि त्यांच्या मुसलमान शेजार्‍यांच्या मनात उकळ्या. कारण आता त्यांच्या भागातल्या काफिरांचा अंजाम जवळ आल्याचा तो आगाझ होता. गिरीजा टिक्कू, सतीशकुमार टिक्कू, आणि अशा कित्येक काश्मिरी पंडितांच्या हत्येला त्यांच्याच शेजारी, तथाकथित मित्र, सहकारी अशा अनेक परिचितांनी कधी इस्लामी दहशतवाद्यांना माहिती देणं व इतर मदत करणं तर कधी प्रत्यक्ष हत्येत सहभाग अशा स्वरूपात भागही घेतला होता. याचाच एक भयानक उदाहरण म्हणजे चुन्नीलाल शल्ला.

चुन्नीलाल शल्ला. जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या पोलीस खात्यात लानगेट इथे नेमणूक झालेले एक पोलीस निरिक्षक (इन्स्पेक्टर). जवळजवळ सहा महिन्यानंतर लानगेट येथील पोस्टिंगवरुन चुन्नीलाल यांना सोपोरमधल्या घरच्यांना भेटायला जाण्यासाठी सुट्टी मिळाली आणि त्याच आनंदात ते सोपोरला जाण्यासाठी बस मधे बसले. त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखाली काम करणारा एक मुसलमान हवालदार पण त्याच बसमधे बसला. सोपोरमधे त्या सुमारास जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घालायला सुरवात केली होती. या कारणास्तव आपल्याला कुणी पटकन ओळखू नये म्हणून चुन्नीलाल यांनी भरघोस दाढी वाढवली होती. दहशतवाद्यांना चुन्नीलाल या बसने येत असल्याचा सुगावा लागला होता. बस सोपोरला पोहोचली आणि दोन अतिरेकी चुन्नीलाल यांना शोधत बसमधे घुसले. बसमधे सगळीकडे नजर टाकल्यावरही चुन्नीलाल काही त्यांना 'दिसले' नाहीत. त्यांची फारच निराशा झालेली होती. ते याच वैतागात बसबाहेर पडणार तेवढ्यात त्याच बसमधे बसलेल्या चुन्नीलाल यांच्या हाताखाली काम करणार्‍या मुसलमान हवालदाराने त्यांना हाका मारून परत बोलावलं आणि चुन्नीलाल कोण आहेत याकडे त्यांच लक्ष वेधलं. 

पण पुढे जे झालं ते इतकं भयानक होतं की ज्याची कल्पना स्वतः चुन्नीलाल यांनाही करता आली नसणार. त्या दोन दहशतवाद्यांनी चुन्नीलाल यांना गोळ्या घातल्या तर ते पटकन मरतील असं वाटलं म्हणून की काय, त्या दोघांनी काही करण्याची वाट न बघता त्या हवालदाराने आपल्याजवळचा एक चाकू काढला आणि चुन्नीलाल यांच्या उजव्या गालावर चालवून वाढवलेल्या दाढीसकट संपूर्ण उजव्या बाजूचा गाल कापून काढला. रक्ताळलेला आणि मांस लोंबत असलेला चुन्नीलाल यांचा चेहरा आता खूपच भेसूर दिसू लागला. अत्यंत अनपेक्षित अशा या हल्ल्याने चुन्नीलाल यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्याची त्यांना संधी न देता त्या हवालदाराने त्यांचा बखोट पकडून, "अरे डुकरा, तुला मी असा बरा आमच्यासारखी दाढी ठेवू देईन दुसर्‍या गालावर सुद्धा!" असं म्हणून त्यांचा दुसरा गालही कापून काढला. आता आपण इथे जे करायला आलो होतो ते करायला न मिळालेल्या त्या दोन दहशतवाद्यांनी त्या हवालदाराच्या मदतीने चुन्नीलाल यांना बसमधून फरफटत बाहेर काढलं आणि "तुझ्यावर बंदुकीच्या गोळ्या पण फुकट घालवणार नाही" असं हिणवत त्यांच्या आधीच जखमी चेहर्‍यावर हॉकी स्टीक्सच्या फटक्यांचा वर्षाव केला.

आणि चुन्नीलाल शल्ला यांना तिथेच रस्त्यात तडफडत मरायला सोडून ते तिघे तिथून निघून गेले.

परवा एका व्हॉट्सॅप ग्रूपवर एकाने मला टोमणा मारला. तुला फक्त अतिरेकीच भेटलेले दिसतात! काय आहे की व्हॉट्सॅपवर टोमणेबाजी पटकन करता येते. त्याला फार डोकं चालवावं लागत नाही. पण त्याला उत्तर द्यायला वेळ लागतो. उत्तरादाखल नुकतीच वाचलेलं एक अप्रतीम लेखन इथे उधृत करतो. नाही, मला फक्त अतिरेकी नाही तर मला सगळाच्या सगळा फुटबॉल संघ भेटला आहे. कसा? सांगतो. इस्लामचे पाईक हे एखाद्या फुटबॉल संघासारखे असतात. अतिरेकी हे स्ट्रायकर्स सारखे असतात. प्रत्यक्ष 'गोल' करणारे. जहालमतवादी हे मिडफील्डर्स सारखे असतात जे अतिरेक्यांना थेट रसद पुरवतात. डिफेन्डर मंडळी म्हणजे इस्लाममधली तथाकथित मवाळ मुसलमान. हे सगळे एकच असले तरी डिफेन्डर सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात की आमचा अतिरेक्यांशी काही संबंध नाही बुवा, पण प्रत्यक्षात त्यांचं काम इस्लामवर होणार्‍या रास्त टीका आणि आरोपांना उत्तर देणं असतं. उदारमतवादी म्हणजे गोलकीपर. परिस्थिती हाताबाहेर जात आहे असं वाटलं की बचावासाठी हे उतरतात. म्हणजे इस्लाम म्हणजे शांततेचा धर्म, तुम्ही समजता तसा इस्लाम नाहीच, अमुकचा आम्ही निषेध करतो अशी थापेबाजी करण्याचं काम यांच्याकडे असतं.

चुन्नीलाल शल्ला यांना मारायला आलेले अतिरेकी आणि त्यांना सक्रीय मदत करणारा चुन्नीलाल यांच्याच हाताखालचा तो मुसलमान हवालदार, हे या फुटबॉल संघात कुठे बसतात हे तुम्हीच तपासून पहा.

काश्मीरमधली आणखी एक घोषणा आठवली.

झलझला आया है कुफ्र के मैदान में
लो मुजाहिद आ गये मैदान में

काफिरांच्या प्रदेशात भूकंप आला आहे,
मुजाहिद मैदानात उतरलेत.

काश्मीरात सगळाच्या सगळा संघ मैदानात उतरलाय आता. एका डोळे झाकलेल्या वृत्तवाहिनीच्याच भाषेत सांगायचं तर उघडा डोळे, बघा नीट!

-------------------------------------------------------- 
© मंदार दिलीप जोशी 

आषाढ कृ. ४, शके १९३८
२३ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------



Wednesday, July 20, 2016

पंडित नामा - ५: सतीश कुमार टिक्कू

सतीश कुमार टिक्कू, व्यवसायिक
श्रीनगर
हत्या: २ फेब्रूवारी १९९०

नारा-ए-तकबीर, अल्लाह-हू-अकबर!

अशा घोषणा आता काश्मीरमधे ऐकू येणं नित्याची बाब झाली होती. रस्त्यावर या घोषणा घुमू लागल्या की काश्मीरी पंडितांच्या पोटात गोळा येत असे. कारण १९४७च्या फाळणीच्या जखमा हळू हळू भरत चालेल्या असल्या, तरी त्या वेळच्या कटू आठवणी अजूनही अनेकांच्या स्मृतीपटलावरुन पुसल्या गेल्या नव्हत्या. अनेक मार्गांनी अजूनही जिवंत होत्या. त्या वेळी दंगेखोर मुसलमानांचा जत्था हिंदू वस्त्यांवर हल्ला करण्याआधी ते ही घोषणा देत. घोषणा कसली? युद्ध पुकारल्याची आरोळीच ती. धर्मयुद्ध. जिहाद.

या आरोळ्या ऐकल्या की पंडितांंचा जीव घाबरागुबरा होत असे, दारं खिडक्या बंद केल्या जात, आणि घरातलं जितकं सामान बॅगांमधे भरुन सहज उचलून नेता येणं शक्य असे तितकं सामान घेऊन घरातले सगळे दुसर्‍या दिवशी सकाळी घरावर तुळशीपत्र ठेऊन काश्मीर खोरे सोडण्यासाठी बाहेर पडत असत. काश्मीरी पंडितांची ही खात्री पटत चालली होती की आता आपला कुणीही तारणहार उरलेला नाही, अगदी आधीच्या कार्यकाळात उत्तम कारभार केलेले आणि म्हणूनच परत बोलावले गेलेले जगमोहन सुद्धा. कारण जहाल इस्लामी मानसिकता आणि फुटीरतावादी चळवळीने प्रशासनाला पार पोखरून टाकलेलं होतं. अगदी राज्य पोलीस दलातल्या अनेक पोलीसांनाही फुटीरतावाद्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतलेलं होतं, इतकंच नव्हे तर अनेक फुटीरतावादीही पोलीस दलात नोकरी मिळवण्यात यशस्वी झालेले होते. त्यामुळे राज्यपालपदाची धुरा दुसर्‍यांदा खांद्यावर घेतलेल्या जगमोहन यांची अवस्था रुग्णाच्या नातेवाईकांना "आता आशा नाही, तुम्ही मनाची तयारी करा" असं सांगायला पाठवलेल्या एखाद्या डॉक्टरसारखी झालेली होती.

हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


मशीदींवर लावलेल्या कर्ण्यांतूनच सुरवातीला अशा धमक्या कधीही केव्हाही दिल्या जात. पण नंतर या घोषणा देण्याच्या पद्धतीमधे सुसूत्रता आली. जणू काही वेळापत्रक ठरवून दिलं गेलं असावं. आता या आरोळ्या रात्र पडताच सुरु होत आणि पहाटेपर्यंत चालू ठेवल्या जात. कदाचित रात्रीच्या शांततेत अधिकाधिक दूरवर ऐकू जाव्यात हा उद्देश असावा. अधून मधून घोषणा द्यायचा कंटाळा आला की जिहादसमर्थक भाषणे व गाण्यांची कॅसेट वाजवली जात असे. कॅसेट संपली की पुन्हा नव्या जोमाने आरोळ्या सुरू होत. काश्मीरी हिंदूंची रात्रीची झोप तर हिरावून घेतली गेलीच होती पण दिवसाही काही बरी परिस्थिती नसे.

अशा आरोळ्या ठोकत आता दंगलखोरांचे जत्थेच्या जत्थे दिवसाढवळ्या रस्त्यावरुन फिरू लागले होते. आता फुटीरतावाद्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली होती. रस्त्यावरून घोषणा देत चालणार्‍या अशा मोर्च्याच्या अग्रभागी आता घरातून बाहेर काढलेल्या काश्मीरी पंडिताना चालवण्याची चाल खेळली जात होती. प्रथमदर्शनी निव्वळ मानसिक यातना देण्याचा किंवा घोषणांची परिणामकारकता वाढवण्याचा आणि त्यायोगे इतर पंडितांमधे भीती वाढवण्याचा उद्देश दिसत असला तरी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण वेगळंच होतं. या जमावावर जर सैन्याने किंवा अर्धसैनिक दलाने (पॅरामिलीटरी फोर्स) गोळीबार केलाच तर त्याचे पहिले बळी हे पंडितच ठरावेत अशी ती योजना होती. कुठल्या घरात पंडित राहतात, सापडले नाही तर त्यांच्या लपण्याच्या जागा कुठल्या, ते कुठे सापडण्याची शक्यता आहे इत्यादी माहिती अर्थातच स्थानिक काश्मीरी मुसलमानांकडून गोळा केली जाई. त्यामुळे काश्मीरी मुसलमान असलेले सख्खे शेजारी, कार्यातले सहकारी, मित्र, इतर ओळखीचे दुकानदार अशा कुणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती उरलेली नव्हती.

काश्मीर सोडून जम्मूत स्थायिक व्हायचं सतीशने ठरवलं असलं तरी पटकन गाशा गुंडाळायला सुरवात केली तर दगाफटका होईल म्हणून हळू हळू सामान हलवू असं सतीश कुमार टिक्कू आपल्या वडिलांना सांगत असे. व्यावसायिक असलेल्या सतीशचे अनेक मुसलमान मित्र आणि परिचित होते. फारुख अहमद दार हा असाच एक मित्र. सतीशबरोबर तो अनेकदा स्कूटरवर त्याच्या मागे बसून फिरायचा. म्हणूनच एके दिवशी जेव्हा सतीशला दाराबाहेर नेहमीसारखीच फारुखची हाक ऐकू आली तेव्हा त्याला कसलाही संशय आला नाही. बाहेर येताच सतीशला त्याच्यावर गोळीबार करण्याच्या तयारीत असलेले फारुख व इतर काही तरुण दिसले. त्यांच्यापैकी एक जवळच राहणारा असल्याचं सतीशला आठवलं. ते सगळेच त्याच्या कमीअधिक ओळखीचे होते. त्यांच्यापैकी एकाने सतीशवर पिस्तूल रोखताच सतीशने बचावाचा प्रयत्न म्हणुन हातातली कांगरी (एक प्रकारची लहानशी टोपली) त्याच्या दिशेने फेकून मारली. त्याच वेळी झाडल्या गेलेल्या पहिल्या गोळीनं सतीशच्या हनुवटीचा वेध घेतला. कळवळून सतीश खाली पडला. कोसळलेल्या सतीशवर त्या तरुणांनी त्याच्यावर आणखी गोळ्या झाडल्या. सतीश सुदैवी ठरला. त्याच्या वाट्याला इतर अनेकांसारख्या यातना आल्या नाहीत. गोळीबारात तो जागीच ठार झाला.

सतीशवर गोळ्या झाडणार्‍यांपैकी फारुख अहमद दार हा पुढे जवळजवळ वीसहून अधिक मुडदे पाडणारा अतिरेकी बिट्टा कराटे या नावाने कुख्यात झाला.  त्याच्या वीस बळींपैकी सतरा बळी काश्मीरी पंडित तर उर्वरित तीन काश्मीरी मुसलमान होते. त्याला पकडल्यावर घेतलेल्या मुलाखतीची ही लिंक:



ही मुलाखत पाहून अक्कल आणि डोकं गहाण ठेवणं या लोकांसाठी किती सहज आहे हे लक्षात येतं. वरुन आदेश आला असता तर मी आईलाही मारलं असतं असं म्हणणारा बिट्टा कराटे बघितला आणि चटकन काही दिवसांपूर्वी धर्मद्रोह केल्याच्या आरोपाखाली एका इस्लामीक स्टेटच्या अतिरेक्याने आपल्या आईला गोळी घातल्याची बातमी आठवली, आणि अंगावर शहारा आला.

मुलाखतीचा काही भाग भाषांतरित करुनः

पत्रकारः किती जणांना मारलंस?

कराटे: लक्षात नाही.

पत्रकारः म्हणजे इतक्या माणसांना मारलंस की लक्षातही नाही?

कराटे: दहा बारा जणांना मारलं असेल.

पत्रकारः दहा की बारा की वीस?

कराटे: वीस असेल.

पत्रकार: सगळे काश्मीरी पंडित होते? की काही मुसलमान पण होते?

कराटे: काही मुसलमानही होते.

पत्रकारः किती मुसलमान होते आणि किती पंडित होते? काश्मीरी पंडित जास्त होते का?

कराटे: हो पंडित जास्त होते.

पत्रकारः पहिला खून कोणाचा केलास?

कराटे: सतीश कुमार टिक्कू.

पत्रकारः कोण होता हा? का मारलं?

कराटे: पंडित होता. वरुन आदेश होता. मारलं.

कराटे पकडला गेला, पण सोळा वर्ष तुरुंगात काढल्यावरही त्याला शिक्षा होऊ शकली नाही. त्याचा सुटकेचा आदेश काढताना न्यायाधीशांनी जे शब्द वापरले त्यात वर वर्णन केलेली पोखरलेली प्रशासनिक परिस्थिती डोकावते. सरकार पक्षावर कडक ताशेरे ओढताना न्यायाधीश म्हणाले की बिट्टाला शिक्षा व्हावी अशा प्रकारे खटला चालवण्याची सरकारी वकील व एकंदरितच सरकार पक्षाची इच्छाच दिसत नव्हती. कराटेचा खटला हा प्रातिनिधिक आहे. काश्मीरी पंडितांची हत्या केल्याबद्दल जे जे खटले दाखल झाले त्यांच्यापैकी एकाही खटल्यात कुणालाही आजतागायत शिक्षा झालेली नाही.

कराटे तुरुंगातून सुटला, त्याने लग्न केलं, आणि तो बापही झाला. सतीश कुमार टिक्कू, अशोक कुमार काजी यांच्यासह वीस हत्या करणारा फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटेच्या नशीबात एक कुटुंबवत्सल आयुष्य लिहीलेलं होतं. पण ज्यांचा पोटचा पोर त्याने मारला, त्या सतीशच्या वडिलांच्या म्हणजेच श्री पृथ्वीनाथ टिक्कू यांच्या नशीबात मात्र रोज आपल्या मुलाच्या फोटोकडे पाहून अश्रू ढाळणं आणि आणि आपल्या तीन मजली आणि सत्तेचाळीस खिडक्यांच्या घराच्या आठवणीने गहिवरणं लिहीलेलं होतं. काश्मीर सोडताना टिक्कू कुटुंबियांना त्यांचं हे अवाढव्य घर कवडीमोल भावाने विकावं लागलं.



हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


कसली आझादी? कुणापासून आझादी? काश्मीरातच पिढ्यानपिढ्या राहणार्‍या आणि तिथल्याच भूमीपुत्र असणार्‍या पंडितांपासून आझादी? का? इस्लाम खतरेमें है असं कुणीतरी डोक्यात भरवलं आणि तुम्हाला ते पटलं म्हणून? आणि कोण जालीम? ज्यांच्यावर अत्याचार झाले ते काश्मीरी हिंदू जालीम? आणि 'हमारा काश्मीर' छोड दो? शेजारधर्मापेक्षा इस्लाम महत्त्वाचा? प्रेमाच्या धर्मापेक्षा कुठलंतरी वाळवंटी पुस्तक जे तुम्हाला निष्पाप पोरीबाळींची अब्रू लुटायला आणि निरपराध नागरिकांचे गळे कापायला शिकवतं ते महत्त्वाचं? अरे खुळे र खुळे तुम्ही. पण लक्षात ठेवा. मारलेल्या प्रत्येक निरपराधाच्या प्राणांचा हिशेब नियती चुकवल्यावाचून राहणार नाही.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ कृ. १, शके १९३८
२० जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Sunday, July 17, 2016

पंडित नामा - ४: सर्वानंद कौल प्रेमी


सर्वानंद कौल प्रेमी (मृत्यूसमयी वयः ६४), मुलगा विरेन्दर कौल (मृत्यूसमयी वयः २७)
सोफ साली, अनंतनाग, काश्मीर
हत्या: ३० एप्रिल १९९०

गेल्या शतकातला सगळ्यात क्रूर नेता कोण किंवा कुठल्या राजकीय विचारधारेला सगळ्यात क्रूर म्हणता येईल असं तुम्हाला विचारलं तर मला खात्री आहे शंभरपैकी नव्व्याण्णव लोक हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष यांचं नाव घेतील. पण त्यांची माणसं मारण्याची पद्धत बघितली, आणि इस्लामी अतिरेक्यांबरोबर तूलना केली तर हिटलर आणि त्याची नाझी पिलावळ चक्क दयाळू महात्मे वाटायला लागतील याचीही मला खात्री आहे. त्यांचा भर निदान फक्त लवकरात लवकर माणसं मारण्यावर होता. पद्धतीही त्यांनी तशाच शोधल्या. पण काश्मीर मधल्या अतिरेक्यांचा भर मरताना आणि मरणोत्तरही ज्याला मारतो आहोत त्याची आणि त्याच्या नातेवाईक व इतर जवळच्यांची जास्तीत जास्त किती शारिरीक व मानसिक विटंबना करता येईल यावर भर असे. हे आपण आधीच्या एखाद दोन लेखात पाहिलंच आहे. त्याचा प्रत्यय श्री सर्वानंद कौल आणि त्यांचा मुलगा विरेन्दर कौल यांच्या हत्येच्या वेळीही आला.

आपला हिंदू धर्म काय सांगतो? "सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया: | सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखमाप्नुयात  ||" श्री सर्वानंद कौल हे अक्षरशः जगत होते. ते जितके धर्मिक तितकेच सर्वसमावेशक कश्मीरियतवर मनापासून श्रद्धा असणार्‍या श्री सर्वानंद यांना काश्मीरच्या समभावी समाजमनावर आणि शांतताप्रेमावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच त्यांनी नातेवाईकांच्या अनेक विनंत्यांना धुडकावून लावत नुकत्याच दहशतवादाच्या छायेखाली आलेल्या आपल्या लाडक्या काश्मीरला सोडून इतरत्र स्थलांतरित व्हायला नकार दिला. कुठल्याही समाजाला, मग तो इतर देशापासून वेगळा जरी झाला, तरी कवी, लेखक, विचारवंत, विद्वान इत्यादी मंडळींची गरज असतेच. एका वेगळ्या झालेल्या प्रदेशाला, समाजाला वेगळ्या राजकीय ओळखीबरोबरच आपली अशी वेगळी संस्कृतिक ओळख असावी अशी भावना असतेच, म्हणूनच कदाचित एक सुप्रसिद्ध कवी आणि विद्वान म्हणून काश्मीरमधे लोकप्रिय असलेल्या श्री सर्वानंद यांना मुस्लिमबहुल भागात राहूनही आपल्याला धोका होणार नाही असं वाटत असावं. आपल्या देव्हार्‍यात हिंदू धार्मिक ग्रंथांबरोबरच कुराणाची एक अतिशय दुर्मीळ अशी हस्तलिखीताची प्रत बाळगणार्‍या श्री सर्वानंद यांचा आपल्या लोकसंग्रहावर त्यांचा गाढ विश्वास असल्याने ते निर्धास्त होते आणि सोफ साली सोडायला नाखूष. पण त्यांच्या या भाबड्या विश्वासाला लवकरच तडा जाणार होता.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एके रात्री त्यांच्या घरात तीन दहशतवादी घुसले आणि कौल कुटुंबियांना त्यांच्याकडच्या मौलवान वस्तू एके ठिकाणी एकत्र करायला सांगितलं गेलं. सोनंनाणं आणि इतर दागिने, पश्मीना चादरी आणि शाली, भारी साड्या यांचा एके ठिकाणी ढग रचला गेला. घरातल्या स्त्रीपुरुषांच्या अंगावरचं सोनं ओरबाडलं गेलं आणि हा सगळा ऐवज एका बॅगेत भरला गेला. मग त्या तीन दहशतवाद्यांनी सर्वानंद यांना ती बॅग उचलून त्यांच्या सोबत चलण्याची आज्ञा केली. आता कौल यांच्या घरात रडण्याचा भयंकर आवाज घुमू लागला. बायकांचा हा आकांत पाहून त्या दहशतवाद्यांनी विरेन्दरला, "आम्ही सर्वानंद यांना कोणताही धोका पोहोचवू इच्छित नाही, ते परत येतील" असं आश्वासन दिलं आणि वर, "तुला हवं तर तू आमच्या बरोबर येऊ शकतोस" अशी मखलाशीही केली. रात्र फार झाल्याने वडिलांना परत यायला अडचण होईल म्हणून विरेन्दर त्यांच्या बरोबर निघाला. पुढे काय वाढून ठेवलं होतं हे आधी समजलं असतं तर, 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः' या श्लोकाप्रमाणे कौल कुटुंबियांनी विरेन्द्रला जाऊ दिलं नसतं. घरातला वडीलधारी माणूस म्हणून सर्वानंद गेले, तरी किमान विरेन्दरचा आधार तरी उरला असता. पण तसं व्हायचं नव्हतं.

या नंतर दोन दिवसांनी श्री सर्वानंद कौल व विरेन्दर कौल यांचे मृतदेह घरापासून बरंच लांब सापडले. दोघांनाही खूप वेदनादायी मृत्यू आला होता हे त्यांच्या मृतदेहाकडे पाहून समजत होतं. माणूस क्रूरतेच्या कुठल्या थराला जाऊ शकतो हे त्यांच्या मृत शरीरांकडे बघितल्यावर लक्षात येत होतं. दोघांच्याही सर्वांगावर सिगारेटचे चटके दिल्याचे डाग होते. दोघांचेही हातपाय मोडलेले होते. इतकंच नव्हे तर दोघांचेही डोळे धारदार शस्त्राने काढलेले होते. हे कमी म्हणून की काय कपाळावर आपण जिथे गंध लावतो तेवढ्याच भागाला अतिरेक्यांनी सोलून काढलं आणि मग मधोमध लोखंडी सळीने भोसकलं होतं. कदाचित अजूनही ते दोघे वाचले तर काय करा म्हणून त्यांना गोळ्याही घातल्या गेल्या. मी सुरवातीला म्हटलं की या दहशतवाद्यांची माणसं मारण्याची पद्धत पाहून हिटलर व त्याचे नाझी सहकारी लाजले असते ते उगाच नाही.

सर्वेपि सुखिनः सन्तु अशी जरी आपली स्तुत्य भूमिका असली आणि सर्वदेव नमस्कारम् केशवं प्रतिगच्छती असं जरी म्हटलेलं असलं तरी ते एकतर्फी असून चालत नाही. समोरच्याची भूमिका आम्ही म्हणू तेच सत्य, आमचाच धर्म बरोबर आणि आमचाच देव सर्वश्रेष्ठ, आमच्या देवाला तुम्ही मानत नसाल तर आम्ही तुम्हाला संपवू, तुमच्या पोरीबाळी आमची मालमत्ता आहेत अशी भूमिका असली तर तुमच्या सद्भावनेचा काडीचा उपयोग होत नाही. म्हणूनच म्हणून मग 'माय नेम इज खान अ‍ॅन्ड आय अ‍ॅम नॉट अ टेररिस्ट' अशी सिनेमांची नावं पाहिली की खिक् करुन हसायला येतं आणि बरोबरच येतो तो भयानक संताप.

कुठेही घडणारी दहशतवादी कृत्य ही स्थानिक रसद, मग ती सक्रीय असो वा नैतिक पाठिंबा देणारी, असेल तरच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला लक्ष ठेवा. फ्लॅट संस्कृतीत राहूनही आपण लक्ष ठेऊ शकतो. तेव्हा रामदास स्वामी म्हणाले तसं "अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी ||" हे अखंड लक्षात ठेवून तसं वागणं क्रमप्राप्त आहे. 

पंडित नामा मालिकेतल्या पुढच्या कथेसाठी पुन्हा काही दिवसांनी भेटू.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ शु. १३, शके १९३८
१७ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------



Saturday, July 16, 2016

पंडित नामा - ३: सौ. तेजा रूपकिशन धर

पंडित नामा - ३

सौ. तेजा रूपकिशन धर
अलीकादल, काश्मीर
हत्या: ३० जून १९९०



हर अष्टमी या सणाचा दिवस होता. काश्मीरचे रहिवासी व राज्य सरकारी सेवेत लेबर ऑफिसर असलेले श्री रूपकिशन धर व त्यांची पत्नी तेजा यांचं रात्रीचं जेवण नुकतंच आटपलं होतं. जेवण झाल्यावर फिरायला जाण्याचा श्री रूपकिशन यांचा नेहमीचा शिरस्ता. त्या प्रमाणे ते पत्नीचा निरोप घेऊन फिरायला बाहेर पडले. घरी परतण्याआधी सहज गप्पा मारायला म्हणून एका मित्राच्या घरी गेले. नवरा बाहेर गेल्यावर आपल्यालाही विरंगुळा म्हणून तेजादेवींनी त्यांच्या एका वयस्कर मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं व त्यांच्याही गप्पा रंगल्या.

साधारण रात्री साडेसातच्या सुमारास दारावर थाप पडली. बाहेर काही जण "रूपकिशनजींना भेटायचं आहे" असं म्हणत होते. आता तेजादेवींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी दार न उघडताच रूपकिशनजी बाहेर गेलेत, त्यांना भेटायचं असेल तर उद्या या" असं दार वाजवणार्‍यांना ओरडून सांगितलं. बाहेर उभं असलेल्यांना धीर नसावा. त्यांनी सरळ घराचं दार तोडून आत प्रवेश केला. ते दहशतवादी होते हे स्पष्ट होतं. घरात घुसताच दार अडवून उभ्या असलेल्या तेजादेवींना ढकलून त्या दहशतवाद्यांनी घरभर रूपकिशनजींचा शोध सुरु केला. त्यांना शोधता शोधता घरात नासधूस करायला ते विसरले नाहीत. घरातला प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक वस्तूची वाट लावूनच ते थांबले. रूपकिशनजी कुठेच सापडले नाहीत याचा आता त्या नराधमांना भयानक राग आलेला होता. सगळं घर शोधून खाली येताच समोर आलेल्या तेजादेवींच्या वयोवृद्ध मैत्रिणीला रागाच्या भरात धडाधडा मुस्काडीत ठेऊन दिल्या. तेजादेवींनी त्यांना त्यांच्या वयाचा तरी मान ठेवा आणि असं करु नका असं ओरडून सांगितलं. आता ते दहशतवादी हवा तो माणूस सापडला नाही म्हणून घराच्या बाहेर पडणार तेवढ्यात एकाने वळून तेजादेवींवर बेधुंदपणे गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातल्या काही गोळ्या तेजादेवींच्या पोटात गोळ्या घुसल्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. कुणाला तरी गोळ्या घालता आल्याच्या आनंदात दहशतवादी घराबाहेर पडले.

पण अजूनही दहशतवाद्यांनी रूपकिशनजींचा शोध थांबवला नव्हता. रूपकिशनजी पळून गेले असल्याचा दहशतवाद्यांना संशय आल्याने आता त्यांनी सगळ्या मोहल्ल्याला वेढा घातलेला होता. काश्मीरमधे दहशतवादाच्या सुरवातीचा तो काळ होता आणि गावात संशयास्पद हालचाली सुरू झाल्या की लोक दारं खिडक्या बंद करुन घ्यायचे. या सगळ्या प्रकाराचा अंदाज रूपकिशनजींच्या मित्राला आल्याने त्याने त्यांना त्याच्या घराबाहेर पडू दिलं नाही. जवळजवळ रात्री दहा वाजून गेल्यानंतर कंटाळलेल्या दहशतवाद्यांनी तो मोहल्ला सोडला. आता रूपकिशनजी व त्यांच्या मित्राने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि दोघे रूपकिशनजींच्या घरी आले.

पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून रूपकिशजी खचले. पण आता वेळ घालवून चालणार नव्हतं. रूपकिशनजींनी धावतच जवळचं इस्पितळ गाठलं. तिथे आलेला अनुभव हा अधिकच भयानक होता. वास्तविक एरवी सगळं जग एकीकडे आणि डॉक्टर एकीकडे अशी आशादायक परिस्थिती असते. डॉक्टर हा रंग, जात, धर्म न बघता समोर आलेल्या रुग्णाला बरं करणे हे एकमेव कर्तव्य जाणून कामाला लागतो. म्हणूनच डॉक्टरांना आपण देव मानतो. पण इस्लामी दहशतवादाने ग्रासलेल्या काश्मीरमधे इस्लामी मूलतत्ववादाची लागण वैद्यकीय क्षेत्रातही शिरली होती. त्या इस्पितळातल्या डॉक्टरांनी रूपकिशनजींना रुग्णवाहिका नवी असेल तर ही पोलीस केस असल्याने आधी पोलीस स्टेशनमधे जाऊन तक्रार नोंदवून या असा माणूसकीविरहित सल्ला दिला. रूपकिशनजी आता महराजगंज पोलीस स्थानकाच्या दिशेने धावले. तिथे एफ.आय.आर. नोंदवला आणि मग एका रुग्णवाहिकेतून पत्नी तेजादेवींना इस्पितळात दाखल केलं. हे सगळ होईपावेतो एव्हाना बराच वेळ गेला होता. इतके तास प्रचंड रक्तस्त्राव झालेल्या तेजादेवी आता अगदीच गलितगात्र झाला होत्या. आधी इस्पितळ, मग पोलीस स्टेशन, मग तेजादेवींना घेऊन इस्पितळ अशी धावाधाव करुन प्रचंड दमलेल्या रूपकिशनजींनी तेजादेवींना डॉक्टरांच्या हवाली करुन परमेश्वराचा धावा करत बसले. पण अजून त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. तेजादेवींवर लगोलग उपचार करण्याऐवजी इस्पितळातले डॉक्टर गोष्ट ऐकायला बसलेल्या लहान मुलांच्या आविर्भावात "युद्धस्य कथा रम्या:" ऐकायला मिळतील या आशेने तेजादेवींना गोळ्या कशा लागल्या वगैरे अस्थानी आणि नुर्बुद्ध प्रश्न विचारत बसले होते. आता रूपकिशनजींचा संयम संपला आणि त्यांनी डॉक्टरांना तेजादेवींवर अजून शस्त्रक्रिया का झाली नाही असं जवळजवळ ओरडतच फैलावर घेतलं. त्यावर निर्लज्जपणे डॉक्टर म्हणाले की इस्पितळात रक्ताची कमतरता आहे. एव्हाना हे सगळं मुद्दामून चालेलेलं होतं हे रूपकिशनजींना उमगलं होतं. पण त्यांनी धीर न सोडता तेजादेवींवर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात यावी असा आग्रह धरला. आता डॉक्टरांचा नाईलाज झाल्याने त्यांनी तेजादेवींना शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटर) मधे नेलं. रूपकिशनजींच्या म्हणण्यानुसार सकाळपर्यंत तेजादेवी मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

रूपकिशनजी व तेजादेवींना एक मुलगी होती. काश्मीरमधे दहशतवादाच्या सुरवातीचा तो काळ होता. दहशतवादी कधीही हिंदूंच्या घरात घुसून घरातल्या मुलींना धरून न्यायचे, म्हणूनच धर कुटुंबियांनी त्यांच्या मुलीला जम्मूला नातेवाईकांकडे ठेवलं होतं. म्हणुन ती बिचारी वाचली. तेजादेवींच्या मृत्यूनंतर रूपकिशनजींनी त्यांचे जवळच एका ठिकाणी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले आणि अस्थीविसर्जन आटोपताच ताबडतोब अलीकादल मधलं आपलं चंबुगबाळं गुंडाळून जम्मूमधे आपल्या मुलीकडे आले. ही गोष्ट ऐकल्यावर त्यांच्या मुलीची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. तिला आपल्या आईचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही.

रूपकिशनजींचा अखेरपर्यंत दावा होता की ऑपरेशन थिएटरमधे तेजादेवींवर शस्त्रक्रियाच झाली नाही. उपचार करणार्‍या मुसलमान डॉक्टरांनी त्या निर्वाणीच्या क्षणीही तेजादेवींचा धर्म बघितला आणि उपचार करायला मुद्दामून उशीर केला. लहान मुलाने एखादं खेळणं मोडलं म्हणून दुकानात परत घेऊन जावं, आणि दुकानदाराने नंतर बघू कधीतरी म्हणून ते बाजूला ठेऊन द्यावं तसं डॉक्टरांनी जखमी तेजादेवींबरोबर खेळण्यागत वर्तणूक केली. काश्मीरी पंडितांच्या जीवाला त्यावेळी ही किंमत उरली होती. कारण एखाद्याला गोळी घालून ठार मारेपर्यंत तिथे क्रौर्य संपत नसे. त्याला तडफडत तडफडत सेकंदासेकंदाने मरताना पाहून केवळ दहशतवादीच नव्हे तर इतर  तथाकथित शांतताप्रिय मुसलमान कौम सुद्धा आनंद घेत असे हे आपण दुसर्‍या भागात वाचलंच असेल. तेच भोग तेजादेवींच्या वाट्याला आले. इथे धक्कादायक बाब अशी की सगळ्या जगाचा भरवसा सुटल्यावर ज्यांना देव म्हणावं असेच डॉक्टर दानवांपेक्षाही क्रूर झाले. अशा अनेक मुलींपासून त्यांच्या आया, वडिल, भाऊ, हिरावले गेले. पहिल्या भागात मी म्हटलं होतं, जे गोळ्या झेलून लगेच मेले ते सुटले याचं हेच कारण आहे.

वर्षानुवर्ष ज्यांची सोबत केली त्या मुसलमान शेजार्‍यांवर संकटकाळी भरवसा ठेवता येत नाही, कार्यालयातल्या मुसलमान सहकार्‍यांवर भरवसा ठेवता येत नाही, इतकंच नव्हे तर मुसलमान डॉक्टरांवरही भरवसा ठेवता येत नाही अशा परिस्थितीत काश्मीरी पंडितांचे काय हाल झाले असतील याची कल्पनाही करवत नाही. आपल्या वागण्याने काश्मीरातच नव्हे तर देशभरात यांना कुणी पटकन आपली जागा विकायला आणि भाड्याने द्यायला तयार होत नाही अशी परिस्थिती त्यांनीच निर्माण करुन ठेवली आहे, आणि मग हेच आमच्याशी भेदभाव केला जातो अशी चोराची उलटी बोंब ठोकतात. कोण देईल यांना जागा? कोण ओढवून घेईल नसती कटकट? अहो यांच्या शेजारी इथे जीवाची शाश्वती देता येत नाही तर बाकीचा धोका कोण पत्करणार? अशा गोष्टींतून काय धडा घ्यायचा ते मी सांगणार नाही. ते तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे.

१९४७ साली मुसलमानांना वेगळा देश हवा म्हणून जा बाबा आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही सुखात वेगळे रहा म्हणून पाकिस्तान तोडून दिला. आता त्यांना काश्मीर तोडून हवा आहे. तो त्यांना दिला तर इतर अनेक बाबींबरोबरच असंही होईल की पाकिस्तानची सीमा हिमाचल प्रदेश या राज्याला येऊन भीडेल. म्हणजेच शत्रू अधिक जवळ येईल. आधीच अस्तनीतले साप तयारच आहेत बाह्या सरसावून. शांतताप्रेमी भारतीयांचा संयम फार थोडा उरला आहे. राज्यकर्ते व भारताचे शत्रू या दोघांनीही त्या संयमाची अधिक परीक्षा बघू नये हे उत्तम.

अशा अनेक हृदय पिळवटून टाकणार्‍या गोष्टी आहेत. अशांपैकीच या मालिकेतली चौथी, लवकरच.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ शु. १२, शके १९३८
१६ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

Thursday, July 14, 2016

पंडित नामा - २: अशोक कुमार काजी

अशोक कुमार काजी जन्मः अज्ञात | हत्या: २४ डिसेंबर १९९० नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी या वाहिन्यांवर वाघ कसे शिकार करतात ते बघितलंय कधी? ते मुके प्राणी सुद्धा सावज एकदा तावडीत सापडलं की आधी त्याच्या नरडीचा घोट घेतात. त्याला जितक्या लवकर ठार मारता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. शत्रूला संपवणे किंवा आपली भूक भागवणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत. एखाद्याच्या क्रूरतेबद्दल वर्णन करताना आपण अनेकदा त्याला जनावरांची उपमा देतो. ते किती चुकीचं आहे हे या प्राण्यांचं फक्त निरीक्षण केल्यास आपल्याला सहज लक्षात येईल. श्रीनगर मधल्या टांकीपोराचे रहिवासी असलेले अशोक कुमार काजी हे सामाजिक कार्याची आवड असलेले अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सरकारी कर्मचारी होते. समाजातल्या सर्व स्तरांच्या समस्या सोडवण्यात त्यांना रस असे. समाजकार्याच्या याच आवडीतून त्यांचे श्रीनगरमधील सर्व स्तरातील लोकांशी ओळखी व संपर्क प्रस्थापित झाले होते. सर्व जातीधर्मांचे लोक आपल्या समस्या सोडवायला आवर्जून त्यांच्याकडे जात. जबरदस्त संघटन कौशल्य असणारे अशोक कुमार काजी यांनी श्रीनगरमधील एक सामाजिक संघटनेमार्फत समाजकार्य सुरु ठेवलं होतं. काश्मीर मधला नुकताच सुरू झालेला हिंसाचार पंडितांना लक्ष्य करणारा आहे हे लवकरच स्पष्ट झालेलं होतं. या हिंसाचारा विरोधात त्या संघटनेने थेट अतिरेक्यांच्या म्होरक्यांशी संपर्क प्रस्थापित करुन त्यांना जाब विचारण्याचं धाडस केलं होतं. आणि हेच धाडस श्री अशोक कुमार यांच्या हत्येला कारणीभूत ठरलं. संघटनेच्या या कृत्याचा बदला इस्लामी अतिरेक्यांनी श्री अशोक कुमार यांना संपवून घेण्याचं ठरवलं. त्या वेळी साधारण तिशीत असणारे श्री अशोक कुमार एके दिवशी नेहमीप्रमाणे बाजारहाट करायला बाहेर पडले. त्यांची खरेदी सुरू असतानाच त्यांना एका मुस्लीम टोळक्याने त्यांना घेरलं. काय होतंय हे लक्षात यायच्या आत त्यांनी अशोक कुमार यांच्या गुडघ्यात गोळ्या घातल्या. भयंकर वेदनांनी कळवळत ते खाली कोसळले. आजूबाजूचे सगळे दुकानदार आपल्या ओळखीचेच आहेत, ते आपल्या मदतीला येतील, त्या अतिरेक्यांना रोखतील अशा भाबड्या आशेने त्यांनी त्या दुकानदारांना व इतर ओळखीच्या लोकांना मदतीसाठी आर्त हाका मारायला सुरवात केली. पण आत्तापर्यंत आपण आपल्या समस्या ज्या भल्या माणसाकडे घेऊन जात होतो, ज्या माणसाबरोबर आपलं रोज संवाद व्हायचा, त्या माणसाला मारू नका अशी साधी विनंती करण्याचंही सौजन्य तिथल्या एकाही मुस्लीम व्यापार्‍याने दाखवलं नाही. कारण हे अतिरेकी म्हणजे इस्लामसाठी लढणारे धर्मयोद्धे असल्याने त्यांनी अशोक कुमार यांचा जीव घेण्याचा पूर्ण अधिकार होता अशी त्या दुकानदारांची ठाम समजूत होती. त्यामुळे जणू काही घडतच नाही आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांचे व्यवहार सुरु ठेवले. आपला कुणीच विरोध करत नाही हे पाहून या नराधमांचं नेतृत्व करणार्‍या बिट्टा कराटे या त्यांच्या म्होरक्याला आता चेव आला. वेदनांनी तडफडत असणार्‍या अशोक कुमार यांच्या भोवती फेर धरत त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली. अशोक कुमार यांच्या तोंडातून वेदनेने येणारा प्रत्येक आवाज हा बिट्टा व त्याच्या साथीदारांचा जल्लोष आणखी वाढवत होता. आता त्यांनी हातांनीच अशोक कुमार काजींचे केस उपटायला आणि त्यांच्या थोबाडीत द्यायला सुरवात केली. मग एकाएकी संतापाने ते सगळे त्यांच्या तोंडावर थुंकले. आता त्यांच्यापैकी एकाला आणखी एक घाणेरडं कृत्य करावसं वाटलं. त्याने त्याच्या विजारीची चेन काढली आणि आपलं लिंग अशोक कुमार यांच्या समोर नाचवत त्यांच्यावर तो मुतला. हा प्रकार बराच वेळ चालला होता. एव्हाना अशोक कुमार यांच्या वेदनांनी कळस गाठला होता. आता कदाचित परमेश्वरालाच त्यांची दया आली असावी. अचानक दुरून पोलीसांच्या जीपचा सायरन ऐकून आला. आता मात्र तिथून काढता पाय घ्यावा लागेल हे बिट्टा व त्याच्या साथीदारांच्या लक्षात आलं. त्यांनी अशोक कुमार यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत त्यांना त्या वेदनांपासून कायमची मुक्ती दिली, व विजेत्यांच्या थाटात आणखी जोरात जल्लोष करत आसपासच्या चिरपरिचित भागातून पलायन केलं. श्री अशोक कुमार यांची चूक काय? ते काश्मीरी पंडित होते. म्हणजेच ते हिंदू होते. त्यांना नुसतं ठार मारण्यात आलं नाही. त्यांना मुक्ती देण्याआधी इस्लामी अतिरेक्यांनी त्यांच्या वेदनांचा आनंद घेत त्यांचा होईल तितका अपमान करायची एकही संधी सोडली नाही. कारण त्यांना नुसतीच हत्या करुन पळून जाण्यात स्वारस्य नव्हतं, तर त्यांना अशोक कुमार काजींच्या वेदनांनी तळमळणार्‍या हाका काश्मीर खोर्‍यातल्या सगळ्या हिंदूंना ऐकवत दहशत निर्माण करायची होती. त्यांना हिंदूंना तुम्ही आता पळून गेला नाहीत तर तुमची ही हीच अवस्था होईल हा ठाम संदेश द्यायचा होता. आणि त्यात ते यशस्वी ठरले. पोलीस येऊन चौकशी करुन पंचनामा होईपर्यंत श्री अशोक कुमार यांचा मृतदेह तिथेच रक्ताळलेल्या बर्फात अनेक तास पडून होता. काश्मीरच्या तथाकथित आझादीच्या जिहादमधे आणखी एक हिंदू बळी गेला होता. काश्मीरमधल्या इस्लामी दहशतवादाचा एक बळी. श्री अशोक कुमार काजी. आता मला सांगा, यांच्यापेक्षा जनावरं कित्येक पटींनी बरी, नाही का? कारण मारलेल्या प्राण्याच्या मृत्यूचा ते ना जल्लोष करत ना ते त्याच्या वेदनांचा आनंद लुटत. पुढची गोष्ट लवकरच. -------------------------------------------------------- © मंदार दिलीप जोशी आषाढ शु. १०, शके १९३८ १४ जुलै इसवी सन २०१६ --------------------------------------------------------

Wednesday, July 13, 2016

पंडित नामा - १: गिरीजाकुमारी टिक्कू

त्यांच्यावर अन्यन्वित अत्याचार झाले. घरंदारं उध्वस्त करण्यात आली. तुम्ही इथून निघून जा, आणि तुमच्या मुली इथे सोडून जा अशा घोषणा ऐकून घ्याव्या लागल्या. दिलेल्या धमक्या खर्‍या करुन दाखवत त्यांच्या आयाबहिणींवर, मुलींवर, आणि बायकांवर निघृण बलात्कार करुन त्यांची त्याहून क्रूरतेने हत्या करण्यात आली. जे स्त्री-पुरुष गोळीने मेले, ते सुटले म्हणायचे अशा भयानक पद्धतीने क्लेष देत देत त्यांना अत्यंत वेदनादायी पद्धतीने हळू हळू मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलं. सीमेपलिकडच्या ओळखदेख नसलेल्यांनी तर घात केलाच पण वर्षानुवर्ष ओळख असलेल्यांनीही पाठीत खंजीर खुपसला. साडेतीन लाखाहून अधिक लोक देशोधडीला लागले......अहं...शब्द चुकला. आपल्याच देशात माणूस देशोधडीला कसा लागेल? पण तसंच काहीसं झालं खरं. उत्पन्नाचे स्त्रोत, जगण्याचे साधन, आणि साधनच काय जगण्याची परवानगीही त्यांना नाकारली गेली. आपल्याच देशात परक्यासारखं ट्रॅन्झीट कॅम्प मधे राहणं, अन्न-पाणी-निवार्‍याच्या शोधात भटकणं नशीबात आलं. आत्तापर्यंत ओळखलंच असेल तुम्ही मी कोणाबद्दल बोलतोय. हो, आपलेच काश्मीरी पंडित. त्यांच्याच काही सत्यकथा सांगणार आहे. पण आधीच सांगतो. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. गोष्ट पहिली: गिरीजाकुमारी टिक्कू. जन्मः १५ फेब्रुवारी १९६९ | हत्या: ११ जून १९९० या महिलेबद्दल मी प्रथम फेसबुकवर वाचलं होतं. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांबाबत पूर्ण कल्पना असली, तरी फेसबुक आणि व्हॉट्सॅपवरुन आलेल्या ढकलसंदेशात बर्‍यापैकी मसाला मिसळलेला असतो याची कल्पना असल्याने यात वर्णन केलेल्या तपशीलांवर कितपत विश्वास ठेवावा याबद्दल मी जरा साशंकच होतो. पण ती पोस्ट एका मैत्रिणीला दाखवल्यावर तिने त्याची सत्यता पटवली. कारण तिच्याच कंपनीत गिरीजाचा भाचा की पुतण्या काम करत होता आणि त्याने या कथेची सत्यता प्रमाणित केली. एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचा अंत होता होता काश्मीरात नुकताच हिंसाचार सुरु झाला होता. त्रेहगामच्या एका मुलींच्या शाळेतल्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणार्‍या गिरीजाला कुणीतरी निरोप दिला की काश्मीर खोरे कायमचे सोडण्याआधी निदान तुझा पगार तरी घेऊन जा. ती शाळेत गेली, पगार घेतला, आणि मग तिच्या एका मुस्लिम सहकार्‍याच्या घरी काही कामानिमित गेली. तिच्या शाळेत जाण्यापासून ते मुस्लीम सहकार्‍याच्या घरी जाईपर्यंतच्या प्रत्येक हालचालीवर अतिरेक्यांकडून नजर ठेवली जात होती. त्या सहकार्‍याच्या घरी ती जाताच अतिरेकी त्या घरात घुसले आणि तिला घेऊन जाऊ लागले. यावर तिच्या मुस्लीम सहकार्‍यानेही काहीच आक्षेप घेतला नाही. जणू काही अंगणात घुसलेल्या एखाद्या वांड जनावराला त्याचा मालक येऊन घेऊन जातो आहे आणि ब्याद टळली असाच त्याचा आविर्भाव होता. इतरही कुणीच आक्षेप घेतला नाही. कारण ती हिंदू होती. काफीर होती. तिच्या शरीरावर त्यांची मालकी असणं इस्लाममधे धर्ममान्य होतं. ती त्यांची "मालमत्ता" होती. मग तिला विवस्त्र करण्यात आलं. तिच्यावर त्या अतिरेक्यांनी सामूहिक बलात्कार केला. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक दिवस. आणि मग जिवंतपणीच त्या धर्मांध इस्लामी अतिरेक्यांनी तिच्या शरीराचे लाकडे कापण्याच्या करवतीने दोन तुकडे करुन मग तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. तुम्हा आम्हाला तिला झालेल्या वेदनांची स्वप्नातही कल्पना करता येणं निव्वळ अशक्य आहे. साधं भाजी चिरताना बोट कापलं तरी आपण वेदनांनी किती कळवळतो ते आठवा. आणि मग कल्पना करा. आधी सामूहिक बलात्कार झाला आहे त्या स्त्रीवर. आणि मग लाकडे कापण्याच्या करवतीने शरीराचे दोन तुकडे. आपण एक वाकप्रचार वापरतो. एखादी फार वाईट घटना घडली की आपण म्हणतो, "शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये". इथे ती ज्यांच्या बरोबर वर्षानुवर्ष राहत होती, ज्यांना मित्र समजत होती त्यांनीच शत्रू बनून तिच्यावर हे नृशंस अत्याचार केले होते. तिचा बळी घेतला होता. का? कारण ती काश्मीरी पंडीत होती. हिंदू होती. त्यांना म्हणे आझादी हवी होती. आझादीसाठी हिंसेचं समर्थन करायचंच झालं, तर हे असे अत्याचार कुठल्या मापदंडात बसवायचे? भारतालाही आझादी काही निव्वळ बिना खडग बिना ढाल मिळालेली नाही. आपल्याकडेही क्रांतीकारकांची उज्ज्वल परंपरा आहे. पण असे अत्याचार तर सोडाच, त्यांनी कारणाशिवाय स्वकीयांवर तर सोडाच पण परकीय असलेल्या निर्दोष ब्रिटीशांवरही हेतूपुरस्सर हातही उचलल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही. मग जे आपल्याच सोबत राहतात, आपले शेजारी-सहकारी आहेत, काश्मीरच ज्यांची मातृभूमी आहे, त्यांच्या अब्रूवर, जीवावर अशा प्रकारे राक्षसांनाही लाजवेल अशा पद्धतीने घाला घालण्याची ही कृत्ये कुठल्या क्रांतीकार्यात मोडतात? इस्लामी दहशतवादाने काश्मीरात अशा प्रकारे अनेक बळी घेतले. या महिलेच्या जवळच्या नातेवाईकाचा योगायोगाने शोध लागला म्हणून ही गोष्ट पहिली लिहायला घेतली. तुम्हाला कंटाळा आला का? की अंगावर काटा आला? काही असो, आपल्याला हे सारं माहीत हवं. कारण हाताला लागल्यावर डोळ्यांतून पाणी येतं, तसं आपल्याच देशातील एका राज्यात आपल्याच बांधवांवर झालेले अन्यन्वित अत्याचार आपल्या अंतःकरणाला भिडायला हवेत. कारण एखाद्या अवयवाला झालेला कर्करोग जसा पूर्ण शरीरात पसरतो, तसा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शेवटी लांब कुठेतरी काश्मीरात सुरु झालेला दहशतवाद आता तुमच्या आमच्या दाराशी येऊन ठेपला आहे. आता अतिरेकी फक्त सीमेपलिकडून काश्मीरात येत नाहीत. ते बोटीतूनही येतात. त्यांना आपल्यातच राहणारे अस्तनीतले हिरवे निखारे मदत करतात.आणि या अत्याचारांची लांबूनही झळ न लागलेले काही हिरवट पत्रमहर्षी अतिरेक्यांशी चर्चा करा असा फुकटचा सल्ला देतात. काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडताना त्यांनी सर्वस्व गमावलं असेल, पण स्वाभिमान सोबत होता. त्या जोरावर ते उभे राहीले. नोकरी केली. धंदा केला. देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून नाव कमावलं. पण आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या नावाखाली एकाही काश्मीरी पंडीताने, कुणाचीही हत्या करण्यासाठी बंदूक नाही उचलली. बंदूक सोडा हो रागाच्या भरात साधा दगड नाही उचलला भिरकवायला कुणाच्या अंगावर. त्यामुळे दहशतवादाला धर्म नसतो वगैरे भूलथापा माझ्यासमोर तरी नका ठोकू. हा सरळसरळ एका वंशाचा विच्छेद करण्यासाठी पेटून उठलेला इस्लामी दहशतवाद होता. आणि आहे. नावं वेगवेगळी असतील. पण आहे. आपल्याला हे सारं माहीत हवं. काश्मीरसाठी मोजलेली किंमत समजली की मग, "देऊन टाका एकदाचा तो काश्मीर" अशी मुक्ताफळं कुणी उधळणार नाही. कदाचित. पुढची गोष्ट उद्या. अहं... इतकी भयानक नसेल कदाचित.............कदाचित असेलही. बघा बुवा. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही. -------------------------------------------------------- © मंदार दिलीप जोशी आषाढ शु. ९, शके १९३८ १३ जुलै इसवी सन २०१६ --------------------------------------------------------