Monday, February 5, 2018

यंटम - एक प्रगल्भ प्रेमकथा

कथा तीच. घासून गुळगुळीत झालेली. प्रेम तेच. अडनिड्या वयातलं, कॉलेजातलं. धडपडही तीच. तिचं नाव पत्ता शोधून काढण्याची. होकारही तसाच. वाट बघत असल्यासारखा.  अंहं, समीर आशा पाटील यांचा यंटम हा चित्रपट हा सैराटच्या पठडीतला नक्कीच नाही. प्रतिसाद देण्याची आणि प्रेम करण्याची, आणाभाका घेण्याची पद्धत मात्र संयमी, पोक्त, आणि विचार करण्याचीही. चित्रपटाची सुरवात होताच "अरे देवा, कुठे आलो या सिनेमाला" हे उद्गार सिनेमा संपेपर्यंत "मस्त होता, खूप आवडला" इतके बदलले होते.

चित्रपटाच्या रंगा (वैभव कदम) या नायकाचे रंगाचे वडील रावसाहेब (सयाजी शिंदे) हे सनईवादक, आपल्या दोन साथीदारांबरोबर 'सुपारी' घेऊन लग्नात सनईवादन करुन आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट . एकेकाळी आपल्या सनईवादनाने अनेक लग्नसमारंभ आणि कदाचित काही मैफिली गाजवलेले रावसाहेब आता वयोमानपरत्वे थकत चालले आहेत. तरीही हातावर पोट असल्याने आणि घरच्या जबाबदार्‍यामुळे काम करत राहणं हे त्यांना भाग आहे. हल्ली डीजेचा काळ असल्याने फारसं कुणी सनईवादकांना आमंत्रण देत नाही, त्यामुळे आताशा त्यांना फारशा 'तारखा' मिळत नाहीत. ढोल, ताशे, आणि डीजेच्या गदारोळात ऐकूही न जाणारी सनई यामुळे होणारा अपमान त्यांच्यातल्या हाडाच्या कलाकाराचं काळीज चिरत जातो. तरीही लग्नात ताशा वाजवणारा आपला मुलगा रंगा हाताशी यावा, त्याने सनई शिकून आपली जागा घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. पण रंगाला सनई वाजवणं आवडत नाही, त्याला अजून आयुष्याची दिशा सापडलेली नाही. असेच दिवस ढकलत असताना तो त्याच्याच कॉलेजातल्या मीराच्या (अपूर्वा शेलगावकर) प्रथम तुज पाहता न्यायाने 'प्रेमात' पडतो. त्यावेळी ती कॉलेजच्या केमिस्ट्री लॅबमधे असल्याने त्यांची केमिस्ट्री लवकर जुळली असावी असा एक पाणचट विनोद करायची हुक्की शेजारच्या वटारलेल्या डोळ्यांच्या कल्पनेनेच मनातच राहिली. तर ते असो.

कमीतकमी संवादात प्रेमाची कबूली, आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांच्याच बरोबर रंगा आणि मीराने पहिल्यांदा फिरायला जाणं, मीराने तिच्या आईचा उल्लेख करण आणि तिच्या काळजातला सल रंगापुढे मांडणं, आणि रंगाने तिची साथ देण्याचं वचन देणं हे ज्या पद्धतीने दिग्दर्शक समीर आशा पाटील आपल्यापुढे मांडतात त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. टीनएज प्रेमकथा हा या चित्रपटाचा गाभा असला तरी चित्रपट फक्त याच मर्यादित परिघात हा फिरत राहत नाही. टीनएज मधलं प्रेम दाखवायचं म्हणजे एखादं काही विशिष्ठ मानसिकतेच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेऊन दाखवलेलं आचकटविचकट गाणं, धुसमुसळे उत्तान प्रणयप्रसंग, कथेला असलेली जातीय किनार, नायिकेच्या बापाचा थयथयाट, आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे नायकाने खांद्याच्या वर असलेल्या अवयवाचा उपयोग करण्यापेक्षा कमरेखालच्या अवयवाच्या इच्छा पुरवण्याच्या मागे लागणे यांपैकी कशाचाही उपयोग करुन घेण्याच्या आहारी न जाता लेखक-दिग्दर्शक समीर आपल्यापुढे एक सकस कथा सादर करतात.

आपल्या दोन इरसाल आणि टग्या मित्रांच्या मदतीने कॉलेजच्या ऑफिसातून मीराचा पत्ता धडपड करुन रंगा मिळवतो आणि मग सुरु होते त्यांची लवशिप अर्थात प्रेमकथा. सुरवातीला वडिलांनी आग्रह करुनही सनई शिकण्याला टाळाटाळ करणर्‍या रंगाची मीराला सनई ऐकायला आवडते हे ऐकून विकेट पडते. मग तो वडिलांकडून रीतसर सनईवादनाच प्रशिक्षण घ्यायला सुरवात करतो. दुर्दैवाने घरातली भिंत दादासाहेबांच्याच अंगावर पडून ते जखमी झाल्याने त्यांच्या निवृत्तीची प्रक्रिया वेग घेऊन रंगाच्या अंगावर त्याची पहिली 'तारीख' लवकरच येऊन पडते. रंगाला मिळालेल्या पहिल्या 'तारखेला' तो साथीदारांसोबत सनई कशी वाजवतो, मीरा आणि रंगाच्या प्रेमाचं पुढे काय होतं हे इथे सांगण्यात मजा नाही. ते चित्रपटगृहातच जाऊन पहा. दादासाहेबांच्या अंगावर पडलेली भिंत ही त्यांच्या निवृत्तीचं रूपक म्हणून आणि रंगाने एक जबाबदार मुलगा म्हणून दादासाहेबांची गादी पुढे चालवण्याचं, सनईवादक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं रूपक म्हणून डागडूजी केलेली, पुन्हा उभी राहिलेली भिंत वापरण्याची कल्पना खूप आवडली. आणखी काही लिहीलं तर चित्रपटाची कथाच लिहील्यासारखं होईल. इथे स्पॉयलर देणार नाही.

चित्रपटातल्या सर्वांचंच काम चांगलं झालेलं आहे. यात रंगाच्या रम्या आणि जेड्या या मित्रांचं काम करणारे अनुक्रमे अक्षय थोरात आणि ऋषिकेश झगडे यांचंही काम उत्तम झालेलं आहे. सयाजी शिंदे यांच्या अभिनयाबद्दल मज पामाराने काय बोलावं, तो उत्तमच आहे. सयाजी शिंदे यांनी इतक्या वर्षांनंतरही स्वतःचा नाना पाटेकर होण्यापासून स्वतःला वाचवलेलं आहे त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात.

हा चित्रपट बघताना ठायी ठायी सैराटशी तूलना करण्याचाही मोह आवरत नाही. टिनएज प्रेमकथा या जॉनरचे असंख्य चित्रपट आले आणि गेले. मात्र या जॉनरची इतकी उत्तम हाताळणी समीर यांच्याइतक्या चांगल्या पद्धतीने क्वचितच कुणी केली असेल. अडनिड्या वयात मुलामुलींना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण, मग त्याला इन्फॅच्यूएशन म्हणा किंवा प्रेम, यांचं काय करायचं, पुढे काय इत्यादी प्रश्नांना फारसा विचार न करता बहुतेक अशा चित्रपटांत उथळपणाची फोडणी दिलेली आढळते. आता चित्रपट हा चित्रपटासारखा बघावा अशी प्रवचने देणार्‍यांनी जुगनू हा धर्मेन्द्रचा चित्रपट दोन डझन वेळा पाहून बँकेत तशाच पद्धतीने चोरी केल्याची कबूली एका गुन्हेगाराने दिली होती हे सोयीस्कररित्या विसरतात आणि सैराट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा बघून अंगात विशेष काहीही कर्तृत्व नसताना तशाच पद्धतीने पळून गेल्याच्या आणि मग पश्चात्ताप पावल्याच्या  बातम्यांकडे दुर्लक्षही करतात. चित्रपट या माध्यमाची ताकद कमी लेखणारे तरुणांना जबाबदारीची जाणीव आणि आयुष्याकडे प्रगल्भपणे बघण्याची दिशा देण्याचं काम क्वचितच करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर यंटम हा चित्रपट वैशिष्ठ्यपूर्ण ठरतो आणि कदाचित म्हणूनही समीर आशा पाटील यांना पाठीवर प्रेक्षकांच्या शाबासकीची थाप पडावी असा रास्त हक्कही पोहोचतो.

तर, या सिनेमाला मी किती तारे देईन? पूर्वार्धात बोअर केल्याबद्दल अर्धा आणि साधारण पंधरा मिनीटे लांबी कमी ठेऊ न शकल्याबद्दल अर्धा असा उगाचच एक गुण कापून ५ पैकी ४ तारे मी यंटमला देईन. ते पण मी एखाद्या चित्रपटाची इतकी स्तुती करतो आहे हे पाहून जनतेस झीट येऊ नये म्हणून. नाहीतर साडेचार तारे दिले असते. तर ते असो. यंटम बघायला चित्रपटगृहाच्या क्षमतेच्या एक पंचमांश सुद्धा प्रेक्षक नव्हते तेव्हा तो कधी जाईल सांगता येत नाही तेव्हा लवकर पाहून घ्या.

टळटीप (म्हणे लेख किंवा टीपा आवडल्या नाहीत तर टळा या अर्थाने):
(१) हा चित्रपट बघायचा की नाही याबद्दल लेखन वाचूनही शंका असेल तर एक टीप देतो. मला कुठल्याही चित्रपटाबद्दल इतकं चांगलं बोलताना बघितलंय? आता ठरवा.
(२) ही चित्रपट समीक्षा नव्हे. माझी वैय्यक्तिक मतं आहेत. मी चित्रपट आवडला तर त्याबद्दलची माझी मतं लिहीतो, आवडला नाही तर चित्रपटाची सालटी काढायला कमी करत नाही. तेव्हा यात व्यक्त झालेल्या मतांवर ठाम आहे. ती मला बदलायला सांगू नये. बदलणार नाहीत.

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३९

No comments:

Post a Comment