Wednesday, July 20, 2016

पंडित नामा - ५: सतीश कुमार टिक्कू

सतीश कुमार टिक्कू, व्यवसायिक
श्रीनगर
हत्या: २ फेब्रूवारी १९९०

नारा-ए-तकबीर, अल्लाह-हू-अकबर!

अशा घोषणा आता काश्मीरमधे ऐकू येणं नित्याची बाब झाली होती. रस्त्यावर या घोषणा घुमू लागल्या की काश्मीरी पंडितांच्या पोटात गोळा येत असे. कारण १९४७च्या फाळणीच्या जखमा हळू हळू भरत चालेल्या असल्या, तरी त्या वेळच्या कटू आठवणी अजूनही अनेकांच्या स्मृतीपटलावरुन पुसल्या गेल्या नव्हत्या. अनेक मार्गांनी अजूनही जिवंत होत्या. त्या वेळी दंगेखोर मुसलमानांचा जत्था हिंदू वस्त्यांवर हल्ला करण्याआधी ते ही घोषणा देत. घोषणा कसली? युद्ध पुकारल्याची आरोळीच ती. धर्मयुद्ध. जिहाद.

या आरोळ्या ऐकल्या की पंडितांंचा जीव घाबरागुबरा होत असे, दारं खिडक्या बंद केल्या जात, आणि घरातलं जितकं सामान बॅगांमधे भरुन सहज उचलून नेता येणं शक्य असे तितकं सामान घेऊन घरातले सगळे दुसर्‍या दिवशी सकाळी घरावर तुळशीपत्र ठेऊन काश्मीर खोरे सोडण्यासाठी बाहेर पडत असत. काश्मीरी पंडितांची ही खात्री पटत चालली होती की आता आपला कुणीही तारणहार उरलेला नाही, अगदी आधीच्या कार्यकाळात उत्तम कारभार केलेले आणि म्हणूनच परत बोलावले गेलेले जगमोहन सुद्धा. कारण जहाल इस्लामी मानसिकता आणि फुटीरतावादी चळवळीने प्रशासनाला पार पोखरून टाकलेलं होतं. अगदी राज्य पोलीस दलातल्या अनेक पोलीसांनाही फुटीरतावाद्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतलेलं होतं, इतकंच नव्हे तर अनेक फुटीरतावादीही पोलीस दलात नोकरी मिळवण्यात यशस्वी झालेले होते. त्यामुळे राज्यपालपदाची धुरा दुसर्‍यांदा खांद्यावर घेतलेल्या जगमोहन यांची अवस्था रुग्णाच्या नातेवाईकांना "आता आशा नाही, तुम्ही मनाची तयारी करा" असं सांगायला पाठवलेल्या एखाद्या डॉक्टरसारखी झालेली होती.

हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


मशीदींवर लावलेल्या कर्ण्यांतूनच सुरवातीला अशा धमक्या कधीही केव्हाही दिल्या जात. पण नंतर या घोषणा देण्याच्या पद्धतीमधे सुसूत्रता आली. जणू काही वेळापत्रक ठरवून दिलं गेलं असावं. आता या आरोळ्या रात्र पडताच सुरु होत आणि पहाटेपर्यंत चालू ठेवल्या जात. कदाचित रात्रीच्या शांततेत अधिकाधिक दूरवर ऐकू जाव्यात हा उद्देश असावा. अधून मधून घोषणा द्यायचा कंटाळा आला की जिहादसमर्थक भाषणे व गाण्यांची कॅसेट वाजवली जात असे. कॅसेट संपली की पुन्हा नव्या जोमाने आरोळ्या सुरू होत. काश्मीरी हिंदूंची रात्रीची झोप तर हिरावून घेतली गेलीच होती पण दिवसाही काही बरी परिस्थिती नसे.

अशा आरोळ्या ठोकत आता दंगलखोरांचे जत्थेच्या जत्थे दिवसाढवळ्या रस्त्यावरुन फिरू लागले होते. आता फुटीरतावाद्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली होती. रस्त्यावरून घोषणा देत चालणार्‍या अशा मोर्च्याच्या अग्रभागी आता घरातून बाहेर काढलेल्या काश्मीरी पंडिताना चालवण्याची चाल खेळली जात होती. प्रथमदर्शनी निव्वळ मानसिक यातना देण्याचा किंवा घोषणांची परिणामकारकता वाढवण्याचा आणि त्यायोगे इतर पंडितांमधे भीती वाढवण्याचा उद्देश दिसत असला तरी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण वेगळंच होतं. या जमावावर जर सैन्याने किंवा अर्धसैनिक दलाने (पॅरामिलीटरी फोर्स) गोळीबार केलाच तर त्याचे पहिले बळी हे पंडितच ठरावेत अशी ती योजना होती. कुठल्या घरात पंडित राहतात, सापडले नाही तर त्यांच्या लपण्याच्या जागा कुठल्या, ते कुठे सापडण्याची शक्यता आहे इत्यादी माहिती अर्थातच स्थानिक काश्मीरी मुसलमानांकडून गोळा केली जाई. त्यामुळे काश्मीरी मुसलमान असलेले सख्खे शेजारी, कार्यातले सहकारी, मित्र, इतर ओळखीचे दुकानदार अशा कुणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती उरलेली नव्हती.

काश्मीर सोडून जम्मूत स्थायिक व्हायचं सतीशने ठरवलं असलं तरी पटकन गाशा गुंडाळायला सुरवात केली तर दगाफटका होईल म्हणून हळू हळू सामान हलवू असं सतीश कुमार टिक्कू आपल्या वडिलांना सांगत असे. व्यावसायिक असलेल्या सतीशचे अनेक मुसलमान मित्र आणि परिचित होते. फारुख अहमद दार हा असाच एक मित्र. सतीशबरोबर तो अनेकदा स्कूटरवर त्याच्या मागे बसून फिरायचा. म्हणूनच एके दिवशी जेव्हा सतीशला दाराबाहेर नेहमीसारखीच फारुखची हाक ऐकू आली तेव्हा त्याला कसलाही संशय आला नाही. बाहेर येताच सतीशला त्याच्यावर गोळीबार करण्याच्या तयारीत असलेले फारुख व इतर काही तरुण दिसले. त्यांच्यापैकी एक जवळच राहणारा असल्याचं सतीशला आठवलं. ते सगळेच त्याच्या कमीअधिक ओळखीचे होते. त्यांच्यापैकी एकाने सतीशवर पिस्तूल रोखताच सतीशने बचावाचा प्रयत्न म्हणुन हातातली कांगरी (एक प्रकारची लहानशी टोपली) त्याच्या दिशेने फेकून मारली. त्याच वेळी झाडल्या गेलेल्या पहिल्या गोळीनं सतीशच्या हनुवटीचा वेध घेतला. कळवळून सतीश खाली पडला. कोसळलेल्या सतीशवर त्या तरुणांनी त्याच्यावर आणखी गोळ्या झाडल्या. सतीश सुदैवी ठरला. त्याच्या वाट्याला इतर अनेकांसारख्या यातना आल्या नाहीत. गोळीबारात तो जागीच ठार झाला.

सतीशवर गोळ्या झाडणार्‍यांपैकी फारुख अहमद दार हा पुढे जवळजवळ वीसहून अधिक मुडदे पाडणारा अतिरेकी बिट्टा कराटे या नावाने कुख्यात झाला.  त्याच्या वीस बळींपैकी सतरा बळी काश्मीरी पंडित तर उर्वरित तीन काश्मीरी मुसलमान होते. त्याला पकडल्यावर घेतलेल्या मुलाखतीची ही लिंक:



ही मुलाखत पाहून अक्कल आणि डोकं गहाण ठेवणं या लोकांसाठी किती सहज आहे हे लक्षात येतं. वरुन आदेश आला असता तर मी आईलाही मारलं असतं असं म्हणणारा बिट्टा कराटे बघितला आणि चटकन काही दिवसांपूर्वी धर्मद्रोह केल्याच्या आरोपाखाली एका इस्लामीक स्टेटच्या अतिरेक्याने आपल्या आईला गोळी घातल्याची बातमी आठवली, आणि अंगावर शहारा आला.

मुलाखतीचा काही भाग भाषांतरित करुनः

पत्रकारः किती जणांना मारलंस?

कराटे: लक्षात नाही.

पत्रकारः म्हणजे इतक्या माणसांना मारलंस की लक्षातही नाही?

कराटे: दहा बारा जणांना मारलं असेल.

पत्रकारः दहा की बारा की वीस?

कराटे: वीस असेल.

पत्रकार: सगळे काश्मीरी पंडित होते? की काही मुसलमान पण होते?

कराटे: काही मुसलमानही होते.

पत्रकारः किती मुसलमान होते आणि किती पंडित होते? काश्मीरी पंडित जास्त होते का?

कराटे: हो पंडित जास्त होते.

पत्रकारः पहिला खून कोणाचा केलास?

कराटे: सतीश कुमार टिक्कू.

पत्रकारः कोण होता हा? का मारलं?

कराटे: पंडित होता. वरुन आदेश होता. मारलं.

कराटे पकडला गेला, पण सोळा वर्ष तुरुंगात काढल्यावरही त्याला शिक्षा होऊ शकली नाही. त्याचा सुटकेचा आदेश काढताना न्यायाधीशांनी जे शब्द वापरले त्यात वर वर्णन केलेली पोखरलेली प्रशासनिक परिस्थिती डोकावते. सरकार पक्षावर कडक ताशेरे ओढताना न्यायाधीश म्हणाले की बिट्टाला शिक्षा व्हावी अशा प्रकारे खटला चालवण्याची सरकारी वकील व एकंदरितच सरकार पक्षाची इच्छाच दिसत नव्हती. कराटेचा खटला हा प्रातिनिधिक आहे. काश्मीरी पंडितांची हत्या केल्याबद्दल जे जे खटले दाखल झाले त्यांच्यापैकी एकाही खटल्यात कुणालाही आजतागायत शिक्षा झालेली नाही.

कराटे तुरुंगातून सुटला, त्याने लग्न केलं, आणि तो बापही झाला. सतीश कुमार टिक्कू, अशोक कुमार काजी यांच्यासह वीस हत्या करणारा फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटेच्या नशीबात एक कुटुंबवत्सल आयुष्य लिहीलेलं होतं. पण ज्यांचा पोटचा पोर त्याने मारला, त्या सतीशच्या वडिलांच्या म्हणजेच श्री पृथ्वीनाथ टिक्कू यांच्या नशीबात मात्र रोज आपल्या मुलाच्या फोटोकडे पाहून अश्रू ढाळणं आणि आणि आपल्या तीन मजली आणि सत्तेचाळीस खिडक्यांच्या घराच्या आठवणीने गहिवरणं लिहीलेलं होतं. काश्मीर सोडताना टिक्कू कुटुंबियांना त्यांचं हे अवाढव्य घर कवडीमोल भावाने विकावं लागलं.



हम क्या चाहते है? आझादी!
ए जालीमों, ए काफिरों, काश्मीर हमारा छोड दो!!


कसली आझादी? कुणापासून आझादी? काश्मीरातच पिढ्यानपिढ्या राहणार्‍या आणि तिथल्याच भूमीपुत्र असणार्‍या पंडितांपासून आझादी? का? इस्लाम खतरेमें है असं कुणीतरी डोक्यात भरवलं आणि तुम्हाला ते पटलं म्हणून? आणि कोण जालीम? ज्यांच्यावर अत्याचार झाले ते काश्मीरी हिंदू जालीम? आणि 'हमारा काश्मीर' छोड दो? शेजारधर्मापेक्षा इस्लाम महत्त्वाचा? प्रेमाच्या धर्मापेक्षा कुठलंतरी वाळवंटी पुस्तक जे तुम्हाला निष्पाप पोरीबाळींची अब्रू लुटायला आणि निरपराध नागरिकांचे गळे कापायला शिकवतं ते महत्त्वाचं? अरे खुळे र खुळे तुम्ही. पण लक्षात ठेवा. मारलेल्या प्रत्येक निरपराधाच्या प्राणांचा हिशेब नियती चुकवल्यावाचून राहणार नाही.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ कृ. १, शके १९३८
२० जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------