Sunday, August 28, 2016

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस खुले पत्र

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस,

सप्रेम नमस्कार पी.आय.एल. विशेष

पत्र लिहिण्यास कारण की गणेशोत्सव जवळ आला आहे व हल्ली तुमच्या परवानगीशिवाय देशात काहीही होत नसल्याने हे काही प्रश्न:

१) घरी गणपती आणू की नको? आमच्याकडे सद्ध्या दीड दिवस गणपती असतो. दुसर्‍या दिवशी मधलाच वार असल्याने यंदा सुट्टी काढावी लागलेली आहे. राष्ट्रहिताविषयी तुमची तळमळ लक्षात घेता गणपती आणणे रद्द करावे व एक दिवस राष्ट्राच्या उभारणीसाठी फुकट घालवू नये की कसे या विषयी आपले यंदा काय निर्देश आहेत?

२) गणपती किती दिवस आणू? दीड/५/७/११/२१?

३) गणपती आणताना व विसर्जन करावयास नेताना आम्ही आमची खाजगी चारचाकी वापरतो. यंदाही तीच वापरली चालेल का? की गणेशोत्सवात चारचाकी मोठ्या प्रमाणात वापरल्याने प्रदूषण खूप होते असे आपले मत आहे? तसे असल्यास दुचाकी वापरली चालेल का?
३) अ) दुचाकी वापरल्यास त्यावर दुचाकी चालवणारा व मागे गणपती (आणि जीव मुठीत) धरुन बसणारा अशा दोन व्यक्ती चालतील का? की सोबत गणपती आहे म्हणून ते तीन धरले जाऊन दंड होईल? मग गाडी चालवणार्‍याने गणपतीला पाठुंगळीला बांधून बसावे असे आपले निर्देश आहेत काय?
३) ब) चारचाकी वापरणे चालणार असल्यास प्रश्न क्रमांक ३ उपप्रश्न अ प्रमाणे चालक धरुन पाच माणसे बसलेली चालतील की फक्त चार जणांनी बसून गणपतीला चालकाच्या बाजूला सीटबेल्ट लावून बसवावे? यासंदर्भात आपले निर्देश काय असणार आहेत?
३) क) गणपती आणण्यात व विसर्जन करायला जाताना दुचाकीवरुन जाणार्‍या मर्त्य मानवांबरोबरच गणपतीलाही हेल्मेट घालणे गरजेचे असेल का? कारण आम्हा मागासलेल्या हिंदूंमधे प्राणप्रतिष्ठापना होण्याअगोदर मूर्तीत प्राण नसतात व उत्तरपूजा झाल्यावर तो पार्थीव होतो त्यामुळे त्याला हेल्मेट घालणे गरजेचे नसावे. तरी पण आपण म्हणालात तर घालतो. काय करावे त्या सूचना आपण द्याव्यात ही विनंती.

४) गणपती किती उंच चालेल? आम्ही नेहमी १२ इंचाचा आणतो. कारण आमच्याकडे तेवढ्याच उंचीची मूर्ती मावेल एवढाच मीठा लाकडी देव्हारा आहे. यंदाही १२ इंचाचा चालेल की कमी करू?

५) नैवैद्य म्हणून केल्या जाणाऱ्या मोदकांचा परीघ व उंची किती असावी?
५) अ) प्रतिमोदक किती ग्रॅम साखर व नारळ वापरले जावेत?

६) गणेशोत्सवात प्रत्येक घराला किती किलो तुप वापरावयाची परवानगी आहे? त्यासंदर्भात आपण नि:संदिग्ध निर्देश देणार आहात काय?

७) प्रत्येक आरतीच्या वेळी किती आरत्या म्हटल्या जाव्यात? आमच्याकडे जुनाट, बुरसटलेल्या प्रथेनुसार अर्थातच गणपतीच्या आरती पासून सुरवात करुन मग देवीची, शंकराची, रामाची, मारुतीची, विठ्ठलाची, दत्ताची, आणि शेवटी घालीन लोटांगण अशा आरत्या म्हटल्या जातात. या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालतील का? की नेहमीच्या पूजेत आम्ही फक्त गणपती, देवी, असं म्हणून घालीन लोटांगण घालतो तसं घातलेलं चालेल? की गणेशोत्सव आहे म्हणून फक्त गणपतीचीच आरती म्हणावी?
७) अ) या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालणार असतील तर आरत्या म्हणण्याचा क्रम काय असावा? त्याच क्रमाने यंदाही म्हटल्या चालतील का? आपण क्रम ठरवून दिल्यास सोपे पडेल.
७) ब) यात देवीची म्हणजे महिषासुरमर्दीनीची आरती म्हणावी की वगळावी? की म्हटल्याने महिषासुरसमर्थकांच्या भावना दुखावतील का? या संदर्भात दिल्ली व जे.एन.यु परिसर व उर्वरित भारत यांच्या साठी आपण वेगवेगळे निर्देश देणार का?

८) आरत्या म्हणताना त्यात किती जण असावेत?

९) आरत्या म्हणताना आवाजाची पातळी किती असावी म्हणजे शेजार्‍यांना आवाजाचा त्रास होणार नाही?
९) अ) त्या संदर्भात आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असल्यास डेसिबल मापक यंत्र सरकारने जनतेला सवलतीत उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश आपण द्यावेत अशी नम्र आणि लोटांगण घालून विनंती.

१०) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची संख्या किती असावी?
१०) अ) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची जातीनिहाय विभागणी काय असावी? उदाहरणतः समजा १० व्यक्ती जमल्यास त्यापैकी किती तथाकथित उच्चवर्णीय, अनुसूचीत जातीजमातीचे, आर्थिकदृष्ट्या मागास, दलित, महादलित, वगैरे असावेत? या संदर्भातल्या आपल्या निर्देशांची वाट बघत आहे.

११) दुसर्‍या दिवशी जेवायला आमच्याकडे ब्राह्मण बोलावण्याची पद्धत आहे. ते बोलवावेत काय? की आम आदमी पक्षाच्या तिहार मधल्या एखाद्या आमदार किंवा कार्यकर्त्याला बोलवावे?

१२) पूजेसाठी दुर्वा आणल्या चालतील की तो वृक्षतोडीच्या कसल्याशा कायद्याखाली गुन्हा ठरवण्याचा आपला मानस आहे?

भारतातल्या न्यायालयांसमोर साडेतीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे मध्यंतरी वाचले. काय लोक असतात? आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या लक्षात घेऊन कुणी खटले दाखल करतच नाही. लोकांना फार हौस कोर्टाची पायरी चढण्याची. आजोबांच्या वेळेपासून सुरू झालेले दिवाणी दावे नातू मरायला टेकला तरी निकाली लागत नाहीत हे माहित असताना न्यायव्यवस्थेवरचा ताण लक्षात न घेता वकील आणि न्यायप्रक्रियेवर खर्च करण्याची लोकांची हौस जिरत नाही हे खरंच. ती आपण जिरवाल ही खात्री आहे. पण अशा कोट्यावधी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसारख्या अनावश्यक आणि सटरफटर खटल्यांकडे लक्ष न देता आपण नालायक आणि रिकामटेकड्या हिंदूंचे सण व प्रथा यांच्याकडे लक्ष देत आहात हे नि:संशय प्रशंसनीय आहे. वर्षानुवर्ष चालणार्‍या व न्यायाधिशांच्या डोक्याची मंडई करणार्‍या या यडचाप खटल्यांपेक्षा पटकन निर्णय देऊन आटपता (आणि रिकामटेकड्या हिंदूंना आपटता) येतील अशा दिवाळीचे फटाके, जलीकट्टू, होळीचे पाणी, दहीहंडीची उंची, विविध जत्रांच्या वेळी दिले जाणारे कोंबड्यांचे बळी, तसेच आता गणेशोत्सव कसे साजरे करावेत याकडे आपण दिलेले लक्ष हे खरेच कौतुकास्पद आहे.

या संदर्भात मुख्य न्यायाधीश म्हणून आपण पुढाकार घेतच आहात तर मला व माझ्या काही समविचारी मित्रांना वरील प्रश्न पडले आहेत त्या संदर्भात आपण स्पष्ट निर्देश द्यावेत जेणेकरून आम्हाला खाजगी गणेशोत्सव नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयसंमत अशा पद्धतीने साजरे करता येतील अशी आपल्याला नम्र व साष्टांग नमस्कार घालून विनंती.

आपला नम्र,
© मंदार दिलीप जोशी

ता. क. संघी पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी हे रीतसर निवडणूक लढवून लोकनियुक्त सरकार तुमच्या मर्जीशिवाय चालवतात म्हणजे काय? त्यांचे ऑडिट तातडीने होणे आवश्यकच आहे. त्यासाठी जनमताचा कौल घ्यायला २०१९ पर्यंत थांबण्याची काय गरज? ते लगेचच करायला पायजेल आहे. (सॉरी बारामतीशेजारच्या पुण्यात राहत असल्याने पटकन ती भाषा तोंडात आली.) शिवाय तुम्हाला फालतू प्रक्रीयेतून न जाता जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावून न्यायालयासमोरच्या प्रश्नांना वाचा फोडायचे महत्त्वाचे काम आहेच, तिथे आपण कार्यक्रमांची शोभा (डे नव्हे) वाढवायला जालच. ते आटपले असल्यास आमच्या वरील प्रश्नांसंदर्भात आपण सहानुभूतीने विचार करुन निर्देश द्याल ही खात्री आहे.

2 comments: